व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे?

तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे?

तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे?

एक शब्दकोश याची व्याख्या अशी करतो, “एक यशस्वी व्यक्‍ती ती आहे जिने आयुष्यात बक्कळ पैसा, लोकांची पसंती आणि मोठा नावलौकिक कमावला आहे.” पण, हे खरे आहे का? केवळ पैसा, पसंती आणि नावलौकिक यांतूनच एखाद्याचे यश डोकावते का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याआधी या गोष्टीचा जरा विचार करा: पृथ्वीवर असताना येशूकडे धनदौलत, लोकांची पसंती किंवा लौकिक नव्हता. तरीसुद्धा तो एक यशस्वी मनुष्य होता. तो कसा?

देवाची इच्छा पूर्ण करणे आणि देवाच्या नावाचा गौरव करणे हाच काय येशूच्या जीवनाचा उद्देश होता. आणि त्याने हा उद्देश पूर्ण केल्यामुळे त्याला एक यशस्वी व्यक्‍ती म्हणता येईल. तो “देवविषयक बाबतीत धनवान” ठरला. (लूक १२:२१) देवाच्या मनाला आनंदविणारे जीवन तो जगला. (नीतिसूत्रे २७:११) म्हणूनच मृत्यूनंतर तो पुन्हा जिवंत झाला तेव्हा बक्षिसाच्या रुपात देवाने त्याला “गौरव व थोरवी” यांनी मुकुटमंडित केले. इतकेच नव्हे तर यहोवा देवाने “त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले.” (इब्री लोकांस २:९; फिलिप्पैकर २:९) होय, देवाने त्याला अशी धनदौलत, पसंती आणि लौकिक दिला जो जगातल्या कुठल्याही विद्वानाला, नेत्याला किंवा खेळाडूला कमावणे शक्य नाही. खरे तर, येशूपेक्षा यशस्वी असा कोणीही आजवर जन्माला आला नाही.

ख्रिस्ती पालकांना हे माहीत आहे की येशूचे अनुकरण करण्याद्वारे त्यांची मुले यहोवा देवाच्या नजरेत धनवान बनतील. शिवाय येणाऱ्‍या नवीन जगात त्यांना भरपूर आशीर्वाद प्राप्त होतील. तेव्हा, येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून यहोवा देवाची सेवा करणे, शक्य असल्यास पूर्ण-वेळची सेवा करणे हाच तरुणांसाठी जीवन जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग असेल.

परंतु, जगातल्या काही समाजांमध्ये तरुणांना शिक्षण संपल्यासंपल्या लगेच पूर्ण वेळच्या सेवेत उतरता येत नाही. या समाजातील मुलांकडून अशी अपेक्षा केली जाते, की शिक्षण संपताच त्यांनी नोकरीला लागावे, लग्न करावे आणि आपला संसार थाटावा. ही प्रथा पाळण्याचा दबाव तिथे राहत असलेल्या साक्षीदारांच्या मुला-मुलींवरही येतो. त्यामुळे या तरुणांना पूर्ण वेळेची सेवा करता येत नाही. (नीतिसूत्रे ३:२७) रॉबर्ट नावाच्या अशाच एका युवकाची कथा ऐका. *

विवेक आणि समाज यातील दुमत

रॉबर्ट एक यहोवाचा साक्षीदार म्हणूनच लहानाचा मोठा झाला होता. पण, तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तो वाईट मित्रांच्या संगतीला लागला आणि हे त्याच्या वागणुकीतून दिसू लागले. त्यामुळे त्याच्या आईला खूप काळजी वाटू लागली. तिने एका पायनियर बंधूला म्हणजे पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्‍या एका सेवकाला आपल्या मुलाची समजूत घालण्यास सांगितले. त्यानंतर काय झाले ते रॉबर्टच्याच तोंडून आपण ऐकू.

“त्या बांधवानं मला केलेली मदत मी कधीच विसरणार नाही! पायनियरिंग करण्यामधील त्यांचा आवेश पाहून मी देखील शाळा संपताच त्यांच्यासारखा एक पायनियर बनण्याचं ठरवलं. पण, पुन्हा एकदा आईला माझी चिंता वाटू लागली. या वेळी मात्र एका वेगळ्याच कारणासाठी. आमच्या इथे शाळा संपल्यावर मुलींनी पायनियर कार्य केले तर काही हरकत नाही. पण, मुलांकडून मात्र अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी आधी भरपूर पैसा कमवावा, जीवनात स्थिरस्थावर व्हावे आणि त्यानंतर वाटल्यास पायनियरींग करावी.

“त्यामुळे मी काही हुन्‍नर शिकून घेतले आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला. काही दिवसांनंतर बिझनेसमध्ये मी इतका गढून गेलो की केवळ नावाला मी प्रचाराला आणि सभांना जाऊ लागलो. तसे पाहिले तर मला यहोवाच्या सेवेत जास्तीत जास्त करता येत होते; पण, मी करत नव्हतो. त्यामुळे माझा विवेक मला टोचू लागला. पण, दुसरीकडे समाजाचा दबावही माझ्यावर होता. मी कोडींत सापडलो होतो. हा माझ्यासाठी खरोखरच एक संघर्ष होता. शेवटी या संघर्षात मी विजयी ठरलो. सामाजिक दबावातून स्वतःला मुक्‍त केल्यामुळे आज मी खूप आनंदी आहे. आता मी विवाहित आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी आणि माझी पत्नी पायनियरिंग करत आहोत. अलीकडेच मंडळीत एक सहायक सेवक म्हणून मला नियुक्‍त करण्यात आले. आज अगदी मनापासून मी म्हणू शकतो, की यहोवा देवाच्या सेवेत मी अधिकाधिक करत आहे आणि त्यामुळे मला खरा आनंद प्राप्त झाला आहे.”

या मासिकाने कित्येक वेळा तरुणांना हा सल्ला दिला आहे, की त्यांनी एखादे हुन्‍नर अथवा काम शिकून घ्यावे; शक्य असल्यास शाळा शिकता शिकताच हे करावे. पण, कशासाठी? श्रीमंत होण्यासाठी? नाही. तर मोठे झाल्यावर आपल्या पायांवर उभे राहून यहोवाच्या सेवेत होता होईल तितके अधिक करता येण्यासाठी. आणि खासकरून पूर्ण वेळची सेवा करण्यासाठी. पण, बहुतेक वेळा असे पाहायला मिळते, की तरुण मुले-मुली आपल्याच व्यापात इतके गुंतून जातात की त्यांच्या जीवनात देवाच्या सेवेला म्हणावे तितके महत्त्व राहत नाही. काही जण तर पूर्ण-वेळच्या सेवेचा विचारसुद्धा करत नाहीत. पण, असे का होते?

याच्या उत्तराकरता आपण पुन्हा एकदा रॉबर्टचा विचार करू या. प्रथम त्याने काही हुन्‍नर शिकून घेतली आणि मग बिझनेस सुरू केला. पण लवकरच या रटाळ जीवनाचा त्याला कंटाळा येऊ लागला. कारण त्याचे जीवन एखाद्या ट्रेडमीलवर व्यर्थ धावण्यासारखे झाले होते. त्याला पैशाच्या बळावर सुरक्षित जीवन मिळवायचे होते. पण, कोणताही मनुष्य, मग तो एक ख्रिस्ती का असेना, पैशाने खरोखरच सुरक्षित जीवन मिळवू शकतो का? आपला चरितार्थ चालवण्याची तसेच आपल्या इतर जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याची क्षमता ख्रिश्‍चनांमध्ये असली पाहिजे आणि त्याकरता त्यांना फार कष्ट करावे लागतील यात कोणताही वाद नाही. पण, ख्रिश्‍चनांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आजकालच्या परिस्थितीत बहुतेक कोणीच पैशाच्या बळावर सर्वस्वी सुरक्षित असे जीवन जगत नाहीत. म्हणूनच तर मत्तय ६:३३ मध्ये येशूने दिलेले वचन आपल्याला दिलासा देते.

आज रॉबर्टला याचा खूप आनंद होतो की त्याने समाजाचे नव्हे तर आपल्या विवेकाचे ऐकले. सध्या तो पूर्ण-वेळच्या सेवेत खूप आनंदी आहे. होय, पूर्ण-वेळची सेवा खरोखरच एक प्रतिष्ठित सेवा आहे. रॉबर्टचे जीवन आता सर्वस्वी आनंदी आहे. आणि मुख्य म्हणजे यहोवाच्या सेवेत तो “शक्य तितके अधिक” करत असल्यामुळे त्याला आंतरिक शांती लाभली आहे.

आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करा

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये बरेच हरहुन्‍नरी लोक आहेत. त्यांपैकी काही पुस्तकी ज्ञानात आणि कलेत तरबेज आहेत तर इतर काही हातकामात. पण, या सर्व क्षमता ‘जीवन, प्राण व सर्व काही देणाऱ्‍या’ यहोवा देवाकडून आपल्याला मिळालेल्या देणग्या आहेत. (प्रेषितांची कृत्ये १७:२५) आपण जिवंत नसतो तर या सर्व देणग्यांचा काहीच उपयोग झाला नसता.

स्वतःला यहोवाच्या सेवेला वाहून घेण्याद्वारे यहोवाला केलेल्या आपल्या सर्मपणाचे आपण सार्थक करीत असतो. पहिल्या शतकातील एका हरहुन्‍नरी तरुणाने असेच करण्याचा निर्णय घेतला होता. तो एका सुखवस्तू कुटुंबाचा होता. त्याचे तारुण्य किलिकियातील तार्सकर या प्रमुख शहरात गेले. खरे तर तो एक यहुदी होता; पण, रोमचे नागरिकत्व आपल्या वडिलांकडून वारशाने त्याला मिळाले होते. आणि त्यामुळे त्याला बरेच हक्क आणि विशेषाधिकारही मिळाले होते. मोठा झाल्यानंतर त्याने आपल्या काळातील सगळ्यात मोठा “प्रोफेसर” गमालिएल याच्याकडून मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षण घेतले. आणि “धनदौलत, मानमान्यता आणि लौकिक” या सर्व गोष्टी आता चुटकीसरशी त्याला मिळतील असे वाटू लागले होते.—प्रेषितांची कृत्ये २१:३९; २२:३, २७, २८.

हा तरुण होता तरी कोण? तो होता शौल. हाच शौल नंतर एक ख्रिस्ती होऊन प्रेषित पौल बनला. ख्रिस्ती बनण्याआधी खूप काही साध्य करण्याच्या ज्या आकांक्षा त्याने मनी बाळगल्या होत्या त्या सर्वांचा त्याग करून उरलेले आयुष्य देवाची सेवा करण्यास त्याने वाहून घेतले. त्यानंतर पौल केवळ एक नामांकित वकील म्हणूनच नाही तर सुवार्तेचा आवेशी प्रचारक म्हणूनही प्रसिद्ध झाला. तब्बल ३० वर्षे मिशनरी कार्य केल्यानंतर फिलिप्पै येथे राहणाऱ्‍या आपल्या मित्रांना त्याने एक पत्र लिहिले. पत्रात, ख्रिस्ती बनण्याआधी आपण काय-काय साध्य केले होते याचा उल्लेख तो करतो आणि म्हणतो: ‘ख्रिस्त येशू याच्यामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्‍यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.’ (फिलिप्पैकर ३:८) होय, आपले जीवन यहोवाच्या सेवेस वाहून दिल्याचा पौलाला कधीच पस्तावा झाला नाही!

पण, गमालिएलकडून पौलाने जे उच्च प्रशिक्षण घेतले होते त्याविषयी काय? त्या प्रशिक्षणाचा त्याला काही फायदा झाला का? निश्‍चितच! “सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात” पौलाने अनेकदा याचा उपयोग केला. पण, त्याने आपला बहुतेक वेळ सुवार्तेचा प्रचार करण्यात खर्च केला. हे असे एक कार्य होते ज्याचे शिक्षण जगात कुठेच त्याला मिळाले नसते.—फिलिप्पैकर १:७; प्रेषितांची कृत्ये २६:२४, २५.

पौलाप्रमाणे आजही काही, देव राज्याच्या कामास बढावा देण्यासाठी आपले हुन्‍नर, आपल्या क्षमता आणि आपले ज्ञान यांचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, एमीकडे कॉमर्स आणि कायदा यांत विश्‍वविद्यालयाची डिग्री आहे. ती आधी लठ्ठ पगाराची नोकरी करायची. पण, त्या सर्वाचा त्याग करून आज वॉच टावर संस्थेच्या एका शाखा दफ्तरात पगाराशिवाय सेवा करत आहे. आपल्या या जीवनाविषयी एमी म्हणते: “इथे येऊन सेवा करण्याचा जो निर्णय मी घेतला आहे तो माझ्या जीवनातला सगळ्यात उत्तम निर्णय आहे. . . . विश्‍वविद्यालयात माझ्यासोबत जे विद्यार्थी होते त्यांचे अनुकरण करण्याची माझी इच्छा नाही. मला माझ्या कामातून यशाची भावना मिळते आणि माझे जीवन फार सुखी आहे. आयुष्यात जे काही मला हवं होतं ते सगळं मला मिळालं आहे.”

पूर्ण-वेळची सेवा करण्याचा जो निर्णय एमीने घेतला, त्यामुळे ती आज आनंदी आणि समाधानी आहे आणि यहोवानेही तिला खूप आशीर्वाद दिले आहेत! आपल्या मुलांच्या बाबतीत ख्रिस्ती पालकांची आणखी काय अपेक्षा असणार!

ख्रिस्ती सेवेतील यश

ख्रिस्ती सेवेच्या बाबतीतही यशाचा अर्थ काय होतो हे जाणून घेणे जरूरीचे आहे. क्षेत्रात लोक आपली मासिके-पुस्तके स्वीकारतात किंवा मग आपण त्यांना चांगली साक्ष देतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. आणि आपण यशस्वी झालो आहोत असे आपल्याला वाटते. याउलट क्षेत्रात फारच कमी लोक आपला संदेश ऐकतात तेव्हा आपला बहुमोल वेळ उगाच वाया गेला असे वाटून आपण कदाचित निराश होऊ. पण, लक्षात ठेवा यशाचा एक अर्थ ‘पसंती प्राप्त करणे’ असा होतो. आपण खरे तर कोणाच्या पसंतीची अपेक्षा करतो? अर्थातच यहोवाच्या पसंतीची! तर मग, लोक आपला संदेश ऐकोत अगर न ऐकोत आपण यहोवाच्या नजरेत पसंती मिळवू. याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक खूप चांगली शिकवण दिली.

तुम्हाला आठवत असेल, येशूने एकदा आपल्या ७० शिष्यांना “ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे” त्यांना आपल्यापुढे पाठवले होते. (लूक १०:१) ही पहिलीच वेळ होती जेव्हा शिष्य येशूविना नगरोनगरी आणि गावोगावी प्रचार करण्यास जाणार होते. त्यामुळे पाठवण्याआधी बऱ्‍याच मार्गदर्शक सूचना येशूने त्यांना दिल्या. त्याने त्यांना सांगितले, की “कोणी शांतिप्रिय” भेटला तर त्यांनी त्याला देवाच्या राज्याविषयी चांगली साक्ष द्यावी. पण, जर कोणी त्यांचा संदेश ऐकत नसेल तर त्यांनी निराश न होता आपल्या मार्गी लागावे. येशूने त्यांना समजावून सांगितले, की जे लोक त्यांना नाकारतात ते खरे तर यहोवा देवाला नाकारतात.—लूक १०:४-७, १६.

नंतर हे ७० शिष्य प्रचार कार्यावरून परतले तेव्हा ते “आनंदाने” येऊन म्हणाले: “प्रभुजी, आपल्या नावाने भुते देखील आम्हांला वश होतात.” (लूक १०:१७) येशूचे हे शिष्य आपल्यासारखेच अपरिपूर्ण मानव होते. त्यामुळे त्यांनी लोकांमधील अतिशय शक्‍तिशाली दुष्ट आत्मिक प्राण्यांना काढले तेव्हा ते अत्यानंदित झाले! पण, त्यांना सावध करत येशू म्हणाला: “तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्‍याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्‍याचा आनंद माना.” (तिरपे वळण आमचे.) (लूक १०:२०) येशूला खरे तर हे सांगायचे होते, की त्या ७० शिष्यांकडे दुष्ट आत्मे काढण्याची शक्‍ती कायम राहणार नाही. तसेच, प्रचार कार्यात त्यांना नेहमीच यश मिळणार नाही. पण, ते विश्‍वासू राहिले तर ते कायम यहोवाची पसंती मिळवू शकतील याचा आनंद त्यांना झाला पाहिजे.

पूर्ण-वेळेच्या सेवकांची तुम्ही कदर करता का?

एकदा एका तरुणाने मंडळीतील एका वडिलांस म्हटले: “हायस्कूलमधून पास झाल्यानंतर मी नोकरी करीन. आणि नोकरी मिळाली नाही तर मग मी पूर्ण वेळची सेवा करण्याचा विचार करीन.” पण, पूर्ण वेळची सेवा करणारे अनेक जण नोकरी मिळत नाही म्हणून पायनियरिंग करत नाहीत. खरे तर, काहींनी पायनियरिंग करण्यासाठी चांगल्या नोकऱ्‍या सोडून दिल्या आहेत. तर काहींना उच्च शिक्षण घेण्याची संधी असतानाही त्यांनी तिचा त्याग केला. त्यांचे हे त्याग आपल्याला प्रेषित पौलाची आठवण करून देतात. आणि योग्य निर्णय घेतल्याबद्दल पौल, रॉबर्ट आणि एमी यांच्यासारखेच तेही आनंदी आहेत. आपल्या क्षमतांचा सर्वस्वी यहोवाच्या गौरवासाठी उपयोग करत असल्याचा अभिमान त्यांना वाटतो कारण तोच हे स्वीकारण्यास योग्य आहे.

पण, यहोवाचे अनेक विश्‍वासू साक्षीदार परिस्थितीमुळे पायनियरिंग करू शकत नाहीत. कदाचित त्यांच्यावर काही जबाबदाऱ्‍या असतील. तरीसुद्धा त्यांनी “पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने” यहोवाची सेवा केली तर त्याला आनंद होतो. (मत्ती २२:३७) ते स्वतः पायनियरिंग करू शकत नसले तरी ज्यांनी आयुष्यभर पायनियरिंग करण्याचे ध्येय ठेवले आहे त्यांची ते कदर करतात.

प्रेषित पौलाने लिहिले: “या युगाबरोबर समरुप होऊ नका.” (रोमकर १२:२) पौलाचा हा सल्ला लक्षात ठेवून, या जगाच्या संस्कृतीचा अथवा प्रवृत्तींचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडू नये म्हणून आपण लक्ष दिले पाहिजे. तुम्ही पायनियर असोत अगर नसोत यहोवाच्या सेवेला मात्र जीवनात प्रथम स्थान द्या. तुमच्यावर देवाची पसंती असेल तोपर्यंत तुम्ही निश्‍चित यशस्वी व्हाल.

[तळटीप]

^ परि. 5 नाव बदलले आहे.

[१९ पानांवरील चित्र]

पैशाच्या मागे धावणे हे एखाद्या ट्रेडमीलवर व्यर्थ धावण्यासारखे आहे