“विश्वास आमुचा, ना डगमगणारा”!
जीवन कथा
“विश्वास आमुचा, ना डगमगणारा”!
हर्बर्ट म्यूलर यांच्याद्वारे कथित
नेदरलँड्सवर हिटलरच्या सैन्याने आक्रमण केले त्याच्या काही महिन्यांनंतर लगेच यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घालण्यात आली. आणि त्यानंतर नात्सींच्या काळ्या यादीत माझेही नाव आले; होताहोईल तितक्या लवकर ते मला पकडू इच्छित होते. ते माझ्या मागे अगदी हात धुवून लागले होते. जणू एखाद्या जंगली जनावराची शिकार करत आहेत, आणि मी त्यांची नजर चुकवत इकडे-तिकडे लपत राहिलो.
अशा या जीवनाने मी अगदी हैराण झालो होतो त्यामुळे एकदा मी माझ्या पत्नीला म्हणालो: ‘आता नाही सहन होत मला; स्वतःला त्यांच्या हवाली करून द्यावंसं वाटतं.’ त्यावेळी एका गीताचे शब्द मला आठवले: “विश्वास आमुचा, ना डगमगणारा, शत्रुंच्या लाखो प्रयत्नांना, ना जुमानणारा.” * पुढे याच गीताने मला धीर दिला. आणि जर्मनीत राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या आणि त्या दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्या जेव्हा घरून निघताना माझ्या मित्रांनी नेमके हेच गीत गाऊन मला निरोप दिला होता. अशाच काही आठवणी मी तुम्हाला सांगू इच्छितो.
आई-वडिलांचा उत्तम आदर्श
माझा जन्म १९१३ साली जर्मनीच्या कोपिट्ज शहरात झाला. त्यावेळी माझे आई-वडील इव्हॅन्जेलिकल चर्चचे सदस्य होते. * पण, माझा जन्म झाल्यानंतर १९२० मध्ये वडिलांनी चर्च सोडून दिले. कारण आता ते बायबल विद्यार्थ्यांशी (ज्यांना आज यहोवाचे साक्षीदार म्हणतात) सहवास राखू लागले होते. त्या वर्षी एप्रिल ६ तारखेला त्यांनी शहराच्या नगर नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन किरचनॉस्ट्रिट्सबेसचेइनिगंग (चर्चकडील त्याग पत्र) मागितले. अधिकाऱ्याने वडिलांना एक फॉर्म भरून दिला. पण, नंतर वडिलांनी पाहिले, की त्या त्याग पत्रात माझी बहीण, मार्था मार्गरेथा म्यूलर हिचे नाव नव्हते. म्हणून मग पुढच्या आठवडी वडील पुन्हा त्या अधिकाऱ्याकडे गेले आणि आणखीन एक त्याग पत्र दिले. त्यात म्हटले होते, की यापुढे मार्था मार्गरेथा म्यूलर ही देखील चर्चची सदस्य राहणार नाही. त्यावेळी, ती अवघ्या दीड वर्षांची होती. सांगायचे तात्पर्य हे, की यहोवाची सेवा करण्याचा प्रश्न यायचा तेव्हा अगदी लहान-लहान गोष्टींमध्ये देखील वडील विश्वासू असायचे!
त्याच वर्षी माझ्या आई-वडिलांनी बाप्तिस्मा घेतला. शिस्तीच्या बाबतीत बाबा फार कडक होते. पण, यहोवाच्या मार्गदर्शनानुसार स्वतःमध्ये बदल करण्यासही ते नेहमी तयार असायचे. त्यामुळे त्यांच्या आज्ञेत राहणे आम्हाला सोपे जायचे. यहोवाला विश्वासू राहण्याच्या मनस्वी इच्छेमुळेच आम्हाला वळण लावण्याच्या पद्धतीत आई-वडिलांनी कित्येक फेरबदल केले. उदाहरणार्थ, अशी एक वेळ होती जेव्हा रविवारच्या दिवशी ते आम्हा मुलांना घराबाहेर जायला किंवा खेळायला देत नसत. पण, १९२५ मध्ये एके रविवारी आईबाबा आम्हाला म्हणाले ‘चला, आज आपण कुठेतरी फिरायला जाऊ या,’ आणि आम्ही फिरायला निघालो; सोबत फराळाचे देखील घेतले होते. त्या दिवशी आम्ही खूप मजा केली. रविवारच्या दिवशी घराबाहेर पडण्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला होता. नाही तर दिवसभर घराच्या चार भितींमध्ये कोंडून बसावे लागले असते. पण, एकाएकी हा बदल कसा काय झाला? बाबांनी आम्हाला सांगितले, की अलीकडेच झालेल्या अधिवेशनात ते अशा काही गोष्टी शिकले होते ज्यावरून त्यांना वाटले, की रविवारच्या दिवसासाठी लावलेल्या प्रतिबंधांसंबंधी त्यांना आपले विचार बदलणे जरूरीचे आहे. वळण लावण्याच्या अशा आणखीन बऱ्याच पद्धतींत त्यांनी बदल केले होते.
आईवडिलांची तब्येत इतकी काही चांगली नसायची. तरीसुद्धा, प्रचार कार्याच्याबाबतीत त्यांनी कधीही माघार घेतली नाही. आमच्या मंडळीने एकदा रिजन्सबर्ग शहरात (ड्रेस्डनपासून जवळजवळ ३०० किलोमीटर दूर) जाऊन एक्लिसियास्टिक्स इंडिक्टड या पत्रिकेचे वाटप करण्याचे ठरवले. एके दिवशी संध्याकाळी आम्हीसुद्धा मंडळीसह ट्रेनने तेथे जाण्यास निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही शहराच्या कानाकोपऱ्यात पत्रिकांचे वाटप केले. हे काम संपल्यावर आम्ही पुन्हा ट्रेनने घरी परतलो. अशाप्रकारे, प्रचार कामासाठी आम्ही तब्बल २४ तास घराबाहेर राहिलो!
घराबाहेर पडणे
आमच्या मंडळीत ज्यूजंडग्रूपे नावाचा युवकांचा एक गट होता. यात साधारण १४ वर्षांच्या वरचे युवक होते. आध्यात्मिक प्रगती करण्याकरता मला या गटाच्या सहवासामुळे बराच फायदा झाला. कारण आमच्या मंडळीतले हे युवक मिळून काही वृद्ध बांधवांना भेटायचो. त्यांच्यासोबत आम्ही गप्पागोष्टी करायचो, खेळ खेळायचो, संगीत वाद्य वाजवायचो, बायबलचा अभ्यास करायचो; निसर्ग, विज्ञान अशा निरनिराळ्या विषयांवर चर्चा करायचो. पण, १९३२ साली माझी त्या गटापासून ताटातूट झाली. त्यावेळी मी अवघ्या १९ वर्षांचा होतो.
त्या वर्षी एप्रिल महिन्यात वडिलांना मॅग्डेबर्गमधील वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराकडून एक पत्र मिळाले. पत्रात म्हटले होते, की संस्थेला अशा एका बांधवाची गरज आहे जो पायनियरिंग करू इच्छितो आणि ज्याला कार चालवता येते. मी पायनियरिंग करावे अशी आईवडिलांची इच्छा होती हे मला माहीत होते. पण, घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी हातभार लावण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे वयाच्या १४ व्या वर्षांपासून मी सायकल, शिलाई मशीन, टाईपरायटर वगैरेची दुरुस्ती करण्याची कामे करू लागलो होतो. अशा स्थितीत मी आपल्या कुटुंबाला सोडून कसा जाऊ शकत होतो? शिवाय माझा बाप्तिस्माही झाला नव्हता. पण, माझ्या आईवडिलांना वाटत होते की मी तिथे जावे. त्यामुळे बाप्तिस्मा घेण्यासाठी मी योग्य आहे की नाही हे पाहण्याकरता वडिलांनी मला काही प्रश्न विचारले. मी दिलेल्या उत्तरांवरून त्यांना पूर्ण खात्री झाली, की मी बाप्तिस्मा घेऊ शकतो. ते मला म्हणाले: “तुला पायनियरिंगसाठी तयार झाले पाहिजे.” आणि मी तयार झालो.
एका आठवड्यानंतर मला मॅग्डेबर्गमधील वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तरात बोलावण्यात आले. आमच्या युवक गटाला मी याविषयी सांगितले तेव्हा ते आनंदाने मला निरोप देऊ इच्छित होते. आणि त्यामुळे मला निरोप देण्यासाठी त्यांनी एक आनंदी गीत गायचा विचार केला. पण, मी जे गीत निवडले होते ते ऐकून
ते चकीत झाले. कारण मी निवडलेल्या गीताचे बोल त्यांना गंभीर वाटले होते. तरीसुद्धा काही मित्रांनी आपापले वॉयलिन, मॅन्डोलिन आणि गिटार बाहेर काढले आणि सर्वजण एकसूरात गाऊ लागले: “विश्वास आमुचा, ना डगमगणारा, शत्रुंच्या लाखो प्रयत्नांना, ना जुमानणारा.” भविष्यात हेच शब्द मला धीर देणार होते याची पुसटशी देखील कल्पना मला नव्हती!एक खडतर सुरवात
मॅग्डेबर्गला पोहंचल्यावर बांधवांनी प्रथम, मला गाडी नीट चालवता येते की नाही याची परिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी मला आणि आणखी चार पायनियरांना एक कार दिली आणि बेल्जियमजवळच्या श्नाइफल या क्षेत्रात पाठवले. तेथे गेल्यानंतर काही दिवसांतच आम्हाला आमच्या कारचे महत्त्व समजले. कारण तिथल्या कॅथलिक पाळकांना आमचे कार्य आवडत नसल्यामुळे त्यांनी गावातल्या लोकांना आमच्याविरुद्ध भडकवले होते. त्यामुळे आम्ही प्रचार कार्याला जायचो तेव्हा गावकरी सहसा आमचा पाठलाग करायचे. कितीतरी वेळा कुदळ आणि खुरपे घेऊन ते आम्हाला मारायला आमच्यामागे धावले. पण, आमच्या कारमुळे आम्ही कसेबसे वाचलो.
सन १९३३ च्या स्मारक विधीनंतर रिजनल ओव्हरसियर, पॉल ग्रॉस्मान यांनी आम्हाला सांगितले की जर्मनीमध्ये प्रचार कामावर बंदी घालण्यात आली आहे. याच्या काही दिवसांनंतरच शाखा दफ्तराने मला कार घेऊन मॅग्डेबर्गला येण्यास सांगितले आणि तेथून संस्थेचे साहित्य घेऊन सॅक्सोनी (हे मॅग्डेबर्गपासून १०० किलोमीटर दूर आहे) येथे पोहंचवण्यास सांगितले. पण, मॅग्डेबर्ग पोहंचण्याआधीच गेस्टापोने (नात्सी गुप्त पोलीस) शाखा दफ्तर बंद करून टाकले होते. त्यामुळे मी लाइप्जिगमध्ये एका बांधवाकडे कार ठेवली आणि घरी परतलो. पण, अगदी थोडाच वेळ मी घरी राहिलो.
त्यावेळी स्वित्झरलँडच्या शाखा दफ्तराने मला नेदरलँड्समध्ये जाऊन पायनियरिंग करण्यास नेमले. मला असे वाटले होते, की एकदोन आठवड्यानंतर आपण नेदरलँड्सला जाण्यास निघू. पण, वडिलांचे म्हणणे होते, की मी लगेच निघावे. म्हणून मग मी काही तासांतच घराबाहेर पडलो. नंतर मला समजले, की दुसऱ्या दिवशी मला अटक करण्यास पोलिस घरी आले होते. त्यांचे असे म्हणणे होते, की सैन्यात भरती न होण्यासाठी मी पळ काढत होतो. पण, त्यांनी येण्यात थोडा उशीर केला होता.
नेदरलँड्समध्ये सुरवात
ऑगस्ट १५, १९३३ मध्ये मी हेमस्टेड शहरात (ॲमस्टरडॅमपासून २५ किलोमीटर दूर) पोहंचलो आणि तिथे एका पायनियर होममध्ये मी राहू लागलो. डच भाषेचा एक शब्दही माहीत नसताना दुसऱ्या दिवशी मी प्रचाराला निघालो. पण, एक टेस्टमनी कार्ड ज्यावर बायबलचा संदेश छापला होता ते मी माझ्यासोबत घेतले होते. त्या दिवशी एका कॅथलिक स्त्रीने माझ्याकडून रिकन्सिलिएशन पुस्तक घेतले. त्यामुळे अधिक आवेशाने मी प्रचार करू लागलो. इतकेच नव्हे तर त्या दिवशी मी २७ पुस्तिका देखील सादर केल्या. पहिल्या दिवसाच्या शेवटी, पुन्हा एकदा स्वतंत्रपणे प्रचार करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला किती आनंद झाला होता!
त्या काळी साहित्याच्या बदल्यात जे अनुदान मिळायचे त्यावरच पायनियरांचा खर्च भागत असे. महिन्याअखेरीस काही पैसे शिल्लक असले तर उरलेल्या खर्चासाठी ते सर्व पायनियरांमध्ये वाटून घेतले जात. आमच्याकडे बेताचेच पैसे असत; पण, यहोवाने कुठल्याच गोष्टीची आम्हाला कमतरता पडू दिली नाही. त्यामुळेच तर १९३४ मध्ये स्वित्झरलँडमधील अधिवेशनाला देखील मी जाऊ शकलो.
जीवनसोबत्याशी भेट
त्या अधिवेशनात एरिका फिंके ही देखील आली होती. ती अवघ्या १८ वर्षांची होती. आम्ही जर्मनीत राहायचो तेव्हापासून मी तिला ओळखत होतो. माझी बहीण, मार्गरेथाची ती मैत्रीण होती. सत्याबद्दलचा तिचा दृढ संकल्प पाहून मी खूप प्रभावित झालो होतो. सन १९३२ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला त्याच्या काही समयानंतरच कोणी तरी गेस्टापोला सांगितले की एरिकाने “हेल हिटलर” (हिटलरचा जय) म्हणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेस्टापोने तिला धरून पोलिस स्टेशनमध्ये आणले आणि तिने तसे करण्यास नकार का दिला ते विचारले. त्यावर एरिकाने पोलिस अधिकाऱ्याला प्रेषितांची कृत्ये १७:३ हे वचन वाचून दाखवले आणि म्हटले, की देवाने केवळ एका व्यक्तीला आपला उद्धारकर्ता नेमले आहे आणि तो आहे, येशू ख्रिस्त. मग, अधिकाऱ्याने तिला विचारले “तुझ्यासारखे आणखीन कितीजण आहे?” तेव्हा इतर बंधूभगिनींची नावे सांगण्यास तिने नकार दिला. तेव्हा तिला तुरूंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. पण, एरिकाने म्हटले, की तिचा जीव गेला तरी ती कोणाचे नाव सांगणार नाही. त्यामुळे तो पोलिस अधिकारी भडकला आणि तिला म्हणाला, “आताच्या आता चालती हो. हेल हिटलर!”
अधिवेशनानंतर मी नेदरलँड्सला आलो. एरिका मात्र स्वित्झरलँडमध्येच राहिली. पण, आतापर्यंत आमची गाढ मैत्री झाली होती हे आम्हा दोघांनाही समजले होते. एरिकाने स्वित्झरलँडमध्येच राहून पायनियरिंग करण्याचा निर्णय घेतला कारण तिला माहीत होते, की जर्मनीचे पोलिस तिचा शोध करत आहेत. काही महिन्यांनंतर संस्थेने तिला स्पेनला जाण्यास सांगितले. तिथे तिने मॅड्रीड, बिल्बाओ आणि नंतर सॅन सेबॅस्टिनमध्ये पायनियर कार्य केले. सॅन सेबॅस्टिनमध्ये असताना चर्च पाळकांनी तिला आणि तिच्या पायनियर सोबतीणीला फार छळले आणि नंतर त्यांना तुरुंगात डांबले. मग, १९३५ मध्ये त्यांना स्पेन सोडून जाण्याचा हुकूम मिळाला. त्यावेळी एरिका नेदरलँड्समध्ये आली आणि त्याच वर्षी आम्ही विवाह केला.
युद्धाचे काळे ढग
लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांनी हेमस्टेडमध्ये पायनियरींग केली आणि नंतर आम्ही रॉटरडम शहरात राहायला आलो. तिथेच १९३७ मध्ये आमचा मुलगा, वॉल्फगाँगचा जन्म झाला. एका वर्षानंतर आम्ही ग्रॉनिंगन या शहरात राहायला गेलो. हे शहर नेदरलँड्सच्या उत्तरी भागात आहे. तिथे जर्मनीचे एक पायनियर जोडपे, फर्डिनंड आणि हेल्गा आणि त्यांची मुलगी यांच्यासह आम्ही एकाच घरात राहायचो. सन १९३८ मध्ये संस्थेने आम्हाला सांगितले की नेदरलँड्सच्या सरकारने हा आदेश दिला आहे, की आतापासून जर्मन साक्षीदारांना नेदरलँड्समध्ये प्रचार करण्याची परवानगी नाही. त्याच काळादरम्यान मला झोन सर्वंट (सर्किट ओव्हरसियर) म्हणून नियुक्त केले गेले आणि मी आणि माझे कुटुंब लिक्ड्राकर (ज्योतिवाहक) नामक बोटीमध्ये राहू लागलो. ही बोट आमच्यासाठी एका घरासारखीच होती, त्यात नेदरलँड्सच्या उत्तरी भागात प्रचार कार्य करणारे इतर पायनियर देखील राहायचे. मी बहुतेक वेळा माझ्या कुटुंबापासून दूर असायचो. सायकलवर प्रवास करत मी मंडळ्यांना भेटी देऊन बंधूभगिनींना उत्तेजन द्यायचो. बंधूभगिनी देखील मोठ्या उत्साहाने प्रचार कार्यात सहभाग घ्यायचे; आणि काहीजण तर प्रचार कार्यात आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागले. विम कॅटलॉरे हा त्यांच्यापैकी एक युवक होता.
मी पहिल्यांदा विमला भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आले की तो सत्य तर शिकला होता; पण, सेवा कार्यासाठी तो वेळ काढू शकत नव्हता. कारण तो एका फार्मवर काम करायचा. मी त्याला म्हणालो: “तू जर यहोवाची सेवा करू इच्छितोस तर तुला एक दुसरी नोकरी शोधावी लागेल.” त्याने नेमके असेच केले. त्यानंतर मी पुन्हा एकदा त्याला भेटलो तेव्हा मी त्याला पायनियरिंग करण्याचे उत्तेजन दिले. तेव्हा तो म्हणाला: “पण, मला काम तर करावेच लागणार ना. नाहीतर पोट कसे भरणार!” त्याला आश्वासन देत मी म्हटले: “खाण्यापिण्याची तुला मुळीच कमी भासणार नाही. यहोवा जरूर तुझा सांभाळ करील.” मग, विमने पायनियर कार्य सुरू केले. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही त्याने प्रवासी ओव्हरसियरचे कार्य केले. आज विमने वयाची ८० वर्षे उलटली आहेत. तरीसुद्धा, यहोवाच्या सेवेतला त्याचा आवेश पहिल्यासारखाच आहे. यहोवाने खरोखरच त्याचा सांभाळ केला.
बंदी आणि शोध
आमची दुसरी मुलगी, राइनाचा जन्म झाला त्याच्या सुमारे एका वर्षानंतर मे १९४० मध्ये डच सेनाने नात्सींपुढे आत्म-समर्पण केले. त्यामुळे नेदरलँड्स जर्मनीच्या कब्जात आले. जुलैमध्ये गेस्टापोने संस्थेचे कार्यालय आणि छपाई कारखाना आपल्या कब्जात घेतला. याच्या पुढच्या वर्षी साक्षीदारांना अटक करण्याची जणू लाटच उसळली. त्याच वेळी मलाही पकडून कैदखान्यात डांबण्यात आले. मला तिळमात्रही शंका नव्हती की सैन्यात भरती होण्यासाठी गेस्टापो माझ्यावर दबाव आणतील; कारण यहोवाचा साक्षीदार असण्याखेरीज मी एक जर्मन देखील होतो. या शिवाय, माझे सेनेत भरती होण्याचे वय होते. आता पुन्हा कधीच मी माझ्या कुटुंबाला पाहू शकणार नाही हे सत्य पचवायला मला कठीण गेले.
मे १९४१ मध्ये गेस्टोपोने माझी तुरुंगातून सुटका केली आणि
मला सैन्यात भरती होण्याचा हुकूम दिला. मला विश्वासच बसत नव्हता की त्यांनी मला सोडून दिले होते. त्या दिवसापासून मी भूमिगत झालो आणि त्याच महिन्यात मी आपले प्रवासी कार्य सुरू केले. आता ज्यांना लवकरात लवकर पकडून गेस्टापोच्या हवाली करायचे होते अशा लोकांच्या काळ्या यादीत माझेही नाव आले होते.माझ्या कुटुंबाची सहनशीलता
माझी पत्नी आणि मुले फोर्डन गावात (नेदरलँड्सच्या पूर्वेकडे) जाऊन राहू लागले. पण, माझ्यामुळे त्यांना धोका पोहंचू नये म्हणून मी फारच कमी वेळा त्यांना पाहायला जात असे. (मत्तय १०:१६) आणि मलाही धोका पोहंचू नये म्हणून बांधव मला माझ्या नावाने नव्हे तर डाइट्स यॉन (जर्मन जॉन) या नावाने बोलवित. इतकेच नव्हे तर माझ्या चार वर्षांच्या मुलाला देखील मला “डॅड” नव्हे तर “ओम यॉन” (म्हणजे अंकल जॉन) असे म्हणायला शिकवले होते. पण, त्याच्यासाठी हे फार कठीण होते कारण त्याचे मन हे मानायला तयार नव्हते.
गेस्टापोची नजर चुकवत मी आपले प्रवासी कार्य करायचो तेव्हा एरिका एकटीच मुलांचा सांभाळ करायची आणि त्यासोबत ती प्रचार कार्यही करत असे. राइना दोन वर्षांची झाली तेव्हा एरिका तिला सायकलच्या रॅकमध्ये (जिथे सामान ठेवतात) बसवून गावात प्रचार करायला जायची. कुटुंबाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे एरिकाला कठीण जात असले तरी ते कधीच उपाशी राहिले नाही. (मत्तय ६:३३) एका कॅथलिक शेतकऱ्याची शिलाई मशीन पूर्वी कधीतरी मी दुरुस्त केली होती; हा शेतकरी एरिकाला बटाटे द्यायचा. इतकेच नव्हे तर मला आणि एरिकाला तो एकमेकांचे संदेशही पोहंचवायचा. एकदा एरिकाने एका दुकानातून एक वस्तू विकत घेतली आणि त्यासाठी दुकानदाराला तिने फक्त एक गल्डन (नेदरलँड्सचे नाणे) दिला. दुकानदाराला माहीत होते, की ती त्या गावात निराश्रित आहे आणि तिला राशन कार्ड बनवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने एरिकाला ती वस्तू मोफत दिली आणि त्यासोबत दोन गल्डनही दिले. लोकांनी दाखवलेल्या अशा सहानुभूतीमुळे एरिकाला टिकाव धरून राहणे शक्य झाले.—इब्री लोकांस १३:५.
धाडसी बांधवांच्या बरोबरीने कार्य
दरम्यान मी आपले प्रवासी कार्य करत राहिलो. पण, आता मात्र मी फक्त मंडळीच्या जबाबदार बांधवांना भेटू शकत होतो. गेस्टापो हात धुवून माझ्या मागे लागले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी केवळ काही तासच राहू शकत होतो. कित्येक बंधूभगिनींना तर मला भेटायलाच मिळत नसे. शिवाय, बंधूभगिनींनाही एकमेकांना भेटायला मिळत नसे. त्यामुळे आपल्या छोट्याशा बायबल अभ्यास गटातल्या बंधूभगिनींनाच काय ते ओळखत होते. आस्थेची गोष्ट म्हणजे, दोन सख्या बहिणी तर एकाच शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहायच्या आणि महायुद्धाच्या काळात यहोवाच्या साक्षीदार बनल्या. पण, युद्ध संपल्यानंतरच त्यांना समजले की त्या दोघीही साक्षीदार बनल्या होत्या.
संस्थेचे साहित्य छापण्यासाठी एक गुप्त स्थळ शोधून काढण्याची जबाबदारी देखील माझ्यावर सोपवण्यात आली होती. गरज पडेल तेव्हा द वॉचटावर या मासिकाच्या प्रती काढता याव्यात म्हणून आम्ही कागद, स्टेनसिल मशीन आणि टाईपरायटर देखील लपवून ठेवले. कधी कधी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी हे साहित्य नेऊन छापावे लागत असे. एकदा तर मी पुस्तके भरलेले ३० कार्टन एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहंचवले आणि तेही लोकांची नजर चुकवत. हे खरोखरच जीवावर बेतणारे काम होते.
यासोबतच, नेदरलँड्सच्या पश्चिमी शहरात राहणाऱ्या आपल्या बंधूभगिनींना अन्न-धान्य पोहंचवण्याची व्यवस्थाही आम्ही करत असू, जे जोखमीचे काम होते. नेदरलँड्सच्या पूर्वेकडील फार्मवर आम्ही अन्नधान्य पॅक करून घोडा-गाडीने ते घेऊन जात असू. पण, वाटेत एखादी नदी असली तर आम्ही पुलावरून जाऊ शकत नव्हतो कारण पुलावर २४ तास सैनिकांचा पहारा असे. त्यामुळे मग आम्ही सर्व माल नदीपाशी ठेवून लहान-लहान होड्यांमधून पलीकडे पोहंचवल्यानंतर दुसऱ्या घोडा-गाडीत टाकून शहरात नेत असू. तिथे पोहंचल्यावरही आम्ही अंधार पडण्याची वाट पाहायचो. मग, घोड्यांच्या खुरांत मोजे घालून चोर पावलांनी आम्ही मंडळीच्या त्या ठिकाणी जाऊन माल उतरवत असू जिथे अन्नधान्य ठेवण्यासाठी गोदामासारखी व्यवस्था केली होती. आणि तिथून मग गरजू बंधूभगिनींना अन्न-धान्य पुरवले जायचे.
हे गोदाम जर्मन अधिकाऱ्यांच्या नजरेत पडलेच तर बंधूभगिनींच्या जीवाला धोका पोहंचला असता. पण, तरीसुद्धा बऱ्याच बांधवांनी ही जोखीम पत्करली. आपल्या बंधूभगिनींची मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. ॲम्सटरफूर्ट शहरात राहणाऱ्या ब्लूमिक कुटुंबाने तर आपल्या बैठकीच्या खोलीचा गोदाम म्हणून वापर केला. मुख्य म्हणजे त्यांचे घर एका जर्मन बराकीच्या अगदी जवळ असताना देखील त्यांनी हा धोका पत्करला होता! यांच्यासारख्याच इतर बंधूभगिनींनी देखील आपल्या जीवाची परवा केली नाही.
बंदीच्या या खडतर काळात यहोवाने मला आणि माझ्या पत्नीला विश्वासू राहण्यास फार मदत केली. शेवटी, मे १९४५ मध्ये जर्मन सेनेचा पराजय झाला. तेव्हा कुठे माझ्या भटकंती जीवाला विसावा मिळाला. प्रवासी ओव्हरसियरचे काम पाहण्यासाठी माझ्या जागी दुसरा बंधू मिळत नाही तोपर्यंत संस्थेने मला हे काम करत राहण्यास सांगितले. मग, १९४७ साली बंधू बरटस फॉन डर बेल माझ्या जागी प्रवासी कार्य करू लागले. * तोपर्यंत आम्हाला तिसरे मूल झाले होते आणि आम्ही नेदरलँड्सच्या पूर्वेकडे स्थायिक झालो.
आयुष्यातील सुख-दुखाचे क्षण
युद्ध संपल्यानंतर मला समजले, की मी घर सोडून नेदरलँड्समध्ये आल्याच्या सुमारे एका वर्षानंतर तुरुंगातच वडीलांची जीवनज्योत मालवली होती. तब्येत बिघडल्यामुळे दोन वेळा तुरुंगातून त्यांची सुटका झाली होती; पण, दोन्ही वेळा त्यांना परत तुरुंगात डांबण्यात आले. सन १९३८ च्या फेब्रुवारी महिन्यात प्रथम बूकनवल्डमध्ये आणि त्यानंतर डेकाउ छळ छावणीत त्यांची रवानगी करण्यात आली आणि तिथेच मे १४, १९४२ रोजी ते वारले. पण, शेवटच्या घटकेपर्यंत ते सत्यात दृढ आणि विश्वासू राहिले.
आईला देखील डेकाउ छळ छावणी डांबले होते. पण, १९४५ मध्ये तिची सुटका झाली. माझ्या आईवडिलांनी एक अतूट विश्वास राखून माझ्यासमोर एक उत्तम आदर्श ठेवला होता. मला जे आध्यात्मिक आशीर्वाद मिळाले त्यासाठी मी त्यांचे फार उपकार मानतो. त्यामुळे १९५४ साली आई आमच्याकडे राहायला आली तेव्हा मला फार आनंद झाला. माझी बहीण मार्गरेथा देखील आमच्यासोबत राहू लागली. येथे येण्याआधी १९४५ पासून ती पूर्व जर्मनीत (जिथे कम्यूनिस्ट सरकार होते) पायनियरिंग करत होती. आई आजारी होती आणि तिला डच भाषा येत नव्हती. पण, प्रचार कार्य करण्याचे तिने थांबवले नाही. ऑक्टोबर १९५७ मध्ये आईचे पार्थिव जीवन समाप्त होईपर्यंत ती यहोवाला विश्वासू राहिली.
सन १९५५ मध्ये न्यूरमबर्ग, जर्मनी येथे झालेले अधिवेशन आमच्यासाठी एक विशेष अधिवेशन ठरले. त्या अधिवेशनात एरिकाची आईसुद्धा आली आहे असे ड्रेस्टनहून आलेल्या बांधवांनी एरिकाला सांगितले. त्यावेळी ड्रेस्टन पूर्व जर्मनीच्या मुठीत असल्यामुळे एरिकाने २१ वर्षांपासून आपल्या आईला पाहिले नव्हते. या अधिवेशनातच माय-लेकीचे मिलन झाले आणि त्या दोघींनी प्रेमाने एकमेकींना जवळ घेतले. किती आनंदी मिलन होते ते!
पाहता पाहता आम्हाला आठ मुले झाली. पण, दुःखाची गोष्ट अशी, की आमचा एक मुलगा कार दुर्घटनेत जीवानिशी गेला. आमची बाकी मुले विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत आणि ही आमच्यासाठी खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला या गोष्टीचा देखील आनंद होतो, की आमचा मुलगा वॉल्फगाँग आणि त्याची पत्नी प्रवासी कार्य करत आहेत आणि त्यांचा मुलगासुद्धा सर्किट ओव्हरसियर आहे.
नेदरलँड्समध्ये यहोवाच्या कार्याला कशाप्रकारे वेग मिळत आहे हे पाहण्याची सुसंधी मला मिळाली आहे. सन १९३३ मध्ये मी येथे पायनियर कार्य सुरू केले होते तेव्हा या ठिकाणी शंभरएक साक्षीदार असतील. आज मात्र त्यांची संख्या ३०,००० हून अधिक वाढली आहे. माझी आणि एरिकाची तब्येत पूर्वीइतकी चांगली नसली तरी त्या जुन्या गीताच्या बोलानुसार चालण्याचा आमचा निर्धार आजही तितकाच पक्का आहे: “विश्वास आमुचा, ना डगमगणारा.”
[तळटीपा]
^ परि. 5 गीत १९४.—यहोवाच्या स्तुतीचे गीत (इंग्रजी) (१९२८).
^ परि. 7 कोपिट्जचे नाव आता पिर्ना आहे. ड्रेस्डन शहरापासून १८ किलोमीटर दूर आणि एल्ब नदीजवळ हे शहर वसले आहे.
^ परि. 38 टेहळणी बुरूज जानेवारी १,१९९८ मध्ये बंधू फॉर डर बेल यांची “सत्याहून आणखीन चांगलं काय असेल” ही जीवन कथा दिलेली आहे.
[२३ पानांवरील चित्र]
प्रचार कार्यानंतर ‘ज्यूजंडग्रूपसह” विसावा घेताना
[२४ पानांवरील चित्र]
मी आणि माझ्या पायनियर सोबत्यांनी मिळून संपूर्ण श्नाइफल क्षेत्रात प्रचार केला. त्यावेळी मी अवघ्या २० वर्षांचा होतो
[२५ पानांवरील चित्र]
सन १९४० मध्ये एरिका आणि वॉल्फगाँगसोबत
[२६ पानांवरील चित्र]
डावीकडून उजवीकडे: माझा नातू योनाथान आणि त्याची पत्नी मिरियाम, एरिका, मी, आमचा मुलगा वॉल्फाँग आणि त्याची पत्नी यूल्या
[२६ पानांवरील चित्र]
सन १९४१ मध्ये तुरुंगात माझ्या वडिलांसोबत असलेल्या एका बांधवाने काढलेले वडिलांचे चित्र