आज देवाचे सेवक कोण आहेत?
आज देवाचे सेवक कोण आहेत?
“आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे; त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले.”—२ करिंथकर ३:५, ६.
१, २. पहिल्या शतकात सर्व ख्रिस्ती लोकांवर कोणती जबाबदारी होती, पण कालांतराने परिस्थिती कशाप्रकारे बदलली?
सामान्य युगातील पहिल्या शतकात, सर्व ख्रिश्चनांवर एक महत्त्वाची जबाबदारी होती—सुवार्तेचा प्रचार करण्याची. ते सर्व अभिषिक्त होते आणि त्याअर्थी नव्या कराराचे सेवक होते. काहींना प्रचाराव्यतिरिक्त इतरही जबाबदाऱ्या होत्या, जसे की मंडळीत उपदेश देण्याची जबाबदारी. (१ करिंथकर १२:२७-२९; इफिसकर ४:११) आईवडिलांना देखील एक अतिरिक्त महत्त्वाची जबाबदारी होती, अर्थात त्यांच्या कुटुंबाची. (कलस्सैकर ३:१८-२१) पण या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ते सर्वजण प्रचाराच्या महत्त्वपूर्ण कार्यात भाग घ्यायचे. मूळ ग्रीक भाषेत प्रचाराच्या या जबाबदारीसाठी दियाकोनिया, म्हणजेच सेवा हा शब्द वापरण्यात आला होता.—कलस्सैकर ४:१७.
२ कालांतराने मात्र, परिस्थिती बदलली. ख्रिस्ती धर्मात पाळकांचा एक वेगळा वर्ग निर्माण होऊ लागला. सामान्य ख्रिस्ती लोकांच्या तुलनेत हा पाळकवर्ग तसा लहानसाच होता. या पाळकवर्गाने प्रचार करण्याचा किंवा धर्माची शिकवण देण्याचा हक्क स्वतःपुरताच मर्यादित ठेवला. (प्रेषितांची कृत्ये २०:३०) अशारितीने, सामान्य ख्रिस्ती लोक प्रचार करण्याच्या विशेषाधिकाराला मुकले. त्यांची जबाबदारी केवळ पाळकांच्या पालनपोषणाकरता देणग्या देणे आणि चर्चमध्ये बसून त्यांचे उपदेश ऐकणे इतकीच उरली.
३, ४. (अ) चर्चेसमध्ये सेवक हे पद कशाप्रकारे बहाल केले जाते? (ब) चर्चेसमध्ये केवळ कोणाला सेवकपद मिळते पण यहोवाच्या साक्षीदारांत असे का नाही?
३ पाळकवर्गाचे सदस्य स्वतःला सेवक (ग्रीक भाषेत दियाकोनोस) म्हणवतात. * धर्मशिक्षण देणाऱ्या खास महाविद्यालयांतून किंवा सेमनरीमधून पदवी मिळाल्यानंतर त्यांना नेमणूक दिली जाते अर्थात सेवक हे पद दिले जाते. दी इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया यात असे सांगितले आहे: “‘नेमणूक’ समारंभात सेवकांना अर्थात पाळकांना एक खास पदवी विधीवत बहाल केली जाते. नेमणूक मिळालेल्यांना देवाच्या वचनातून उपदेश करण्याचा किंवा धार्मिक विधी पार पाडण्याचा अथवा या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्याचा विशेष हक्क दिला जातो.” सेवकांना हे हक्क कोण देतो? न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात सांगितल्याप्रमाणे: “ज्या चर्चेसमध्ये बिशपच्या पारंपरिक अधिकाराला आजही मानले जाते तेथे बिशपच पाळकांची नेमणूक करतो. प्रेस्बिटेरियन चर्चेसमध्ये प्रेस्बुतरांच्या न्यायमंदिराचे सदस्य सेवकांना नेमतात.”
४ अशारितीने चर्चेसमध्ये सेवक बनण्याचा बहुमान फार कमी लोकांना मिळतो. पण यहोवाच्या साक्षीदारांत असे नाही. का? कारण पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतही असे नव्हते.
देवाचे खरे सेवक कोण?
५. बायबलनुसार कोण सेवक आहेत?
५ बायबलनुसार, यहोवाचे सर्व उपासक, मग ते स्वर्गात असोत वा पृथ्वीवर, ते सर्व सेवक आहेत. देवदूतांनी येशूची सेवा केली होती. (मत्तय ४:११; २६:५३; लूक २२:४३) तसेच देवदूत, ‘ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांची सेवा’ करतात असेही म्हटले आहे. (इब्री लोकांस १:१४; मत्तय १८:१०) येशू देखील एक सेवक होता. त्याने म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही, तर सेवा करावयास . . . आला आहे.” (मत्तय २०:२८; रोमकर १५:८) येशूच्या अनुयायांना “त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे” असे सांगण्यात आले आहे. मग साहजिकच येशूच्या सर्व अनुयायांनी सेवक असू नये का?—१ पेत्र २:२१.
६. येशूचे सर्व शिष्य सेवक आहेत हे त्याच्या कोणत्या शब्दांवरून सूचित होते?
६ स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) येशूच्या अनुयायांना शिष्य बनवण्याचे कार्य देण्यात आले होते; हे त्यांचे सेवाकार्य होते. नव्या शिष्यांना येशूच्या सर्व आज्ञा शिकवायच्या होत्या. अर्थातच, शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे पालन करायलाही त्यांना शिकवायचे होते. त्याअर्थी, येशूचा प्रत्येक खरा अनुयायी सेवक होता, मग तो पुरुष असो वा स्त्री, लहान असो वा मोठा.—योएल २:२८, २९.
७, ८. (अ) सर्व ख्रिस्तीजन सेवक आहेत हे कोणकोणत्या शास्त्रवचनांवरून दिसते? (ब) एका व्यक्तीला सेवकपण बहाल करण्यासंबंधी कोणते प्रश्न येतात?
७ म्हणूनच, सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरुसलेममध्ये उपस्थित असलेल्या येशूच्या सर्व शिष्यांनी ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ घोषणा केली; यात स्त्रिया व पुरुषही सामील होते. (प्रेषितांची कृत्ये २:१-११) प्रेषित पौलाने लिहिले: “जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान् ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” (रोमकर १०:१०) हे शब्द पौलाने केवळ पाळक वर्गाला नव्हे, तर ‘रोम शहरातील देवाच्या सर्व प्रियजनांना’ उद्देशून लिहिले होते. (रोमकर १:१, ७) तसेच ‘इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणाऱ्या’ सर्वांना, “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा” असे सांगण्यात आले होते. (इफिसकर १:१; ६:१५) याव्यतिरिक्त, इब्री लोकांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखवले जात असताना ज्यांनी कोणी ऐकले त्या सर्वांना ‘न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरा’ असे सांगण्यात आले होते.—इब्री लोकांस १०:२३.
८ पण एक व्यक्ती सेवक केव्हा बनते? दुसऱ्या शब्दांत तिला सेवकपण केव्हा बहाल केले जाते? कोण तिला सेवक ठरवतो?
सेवकाची नेमणूक—केव्हा?
९. येशूला सेवक म्हणून केव्हा नेमण्यात आले आणि कोणी त्याला नेमले?
९ एका व्यक्तीला सेवक म्हणून केव्हा आणि कोणाकडून नेमले जाते या प्रश्नांच्या उत्तरांकरता येशू ख्रिस्ताचे उदाहरण पाहा. येशूजवळ सेवक म्हणून नेमण्यात आल्याचे सर्टिफिकिट किंवा कोणत्या सेमिनरीची पदवी नव्हती. त्याला कोणा मनुष्याने सेवक म्हणून नेमले नव्हते. पण तरीही तो एक सेवक होता असे आपण का म्हणू शकतो? “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला,” हे यशयाच्या भविष्यवाणीतील शब्द येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पूर्ण झाले होते. (लूक ४:१७-१९; यशया ६१:१) सुवार्ता घोषित करण्याकरता येशूला नेमण्यात आले होते हे या शब्दांवरून अगदीच स्पष्ट होते. कोणी त्याला नेमले होते? यहोवाच्या आत्म्याने त्याचा अभिषेक झाला होता त्याअर्थी येशूला स्वतः यहोवा देवाने नेमले होते. हे केव्हा घडले? येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा यहोवाचा आत्मा त्याच्यावर आला. (लूक ३:२१, २२) त्यामुळे, त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला नेमण्यात आले असे म्हणता येईल.
१०. ख्रिस्ती सेवकाला सेवकपणाची “पात्रता” कोठून प्राप्त होते?
१० येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांविषयी काय म्हणता येईल? त्यांना देखील सेवक म्हणून यहोवाने नेमले होते. म्हणूनच पौलाने म्हटले: “आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे; त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले.” (२ करिंथकर ३:५, ६) सेवक होण्याची पात्रता यहोवा आपल्या उपासकांना कशाप्रकारे देतो? तीमथ्याचे उदाहरण लक्षात घ्या. पौलाने त्याला “खिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक” म्हटले.—१ थेस्सलनीकाकर ३:२.
११, १२. तीमथ्याने सेवक बनण्याइतपत प्रगती कशाप्रकारे केली?
११ तीमथ्याला उद्देशून लिहिलेल्या पुढील शब्दांवरून तो कशाप्रकारे सेवक बनू शकला हे आपल्या लक्षात येईल: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते खिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१४, १५) तीमथ्याला सुवार्तेची जाहीर घोषणा करण्याची प्रेरणा देणारा त्याचा विश्वास, बायबलच्या ज्ञानावर आधारित होता. केवळ वाचन करून त्याने हे ज्ञान मिळवले का? नाही. वाचन करताना शास्त्रवचनांतील गोष्टींचा आध्यात्मिक बोध होण्याकरता त्याला मदतीची आवश्यकता होती. (कलस्सैकर १:९) तीमथ्याला “खातरी” करून देण्यात आली होती. त्याला “बालपणापासूनच” पवित्र शास्त्राची माहिती होती असे म्हटले आहे. तेव्हा पवित्र शास्त्राविषयी त्याला सर्वप्रथम त्याच्या आईने व आजीनेच शिकवले असावे; कारण त्याचे वडील ख्रिस्ती नव्हते.—२ तीमथ्य १:५.
प्रेषितांची कृत्ये १६:२) शिवाय त्या दिवसांत मंडळ्यांना आध्यात्मिकरित्या दृढ करण्याकरता काही बंधू त्यांना पत्र लिहायचे. तसेच, आध्यात्मिक साहाय्य पुरवण्याकरता काही बंधू या मंडळ्यांना भेटी देखील द्यायचे. या सर्व तरतुदींमुळे तीमथ्याला व त्याच्यासारख्या इतर ख्रिस्ती बांधवांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत झाली.—प्रेषितांची कृत्ये १५:२२-३२; १ पेत्र १:१.
१२ तीमथ्याला सेवक बनण्यात आणखी कोणाची मदत मिळाली? जवळपासच्या मंडळ्यांतील ख्रिस्ती बांधवांच्या सहवासामुळे त्याचा विश्वास नक्कीच दृढ झाला असेल. असे आपण का म्हणू शकतो? कारण पौल पहिल्यांदा तीमथ्याला भेटला तेव्हा तीमथ्य वयाने अजून लहान असूनही “त्याला लुस्त्रांतले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते,” असे म्हटले आहे. (१३. तीमथ्याला सेवक म्हणून केव्हा नेमले गेले आणि त्याची आध्यात्मिक प्रगती तेवढ्यावरच थांबली नाही असे आपण का म्हणू शकतो?
१३ मत्तय २८:१९, २० यात येशूने दिलेली आज्ञा लक्षात घेता, तीमथ्यानेही आपल्या विश्वासाने प्रेरित होऊन येशूप्रमाणे बाप्तिस्मा घेतला असेल असे आपण खात्रीने म्हणू शकतो. (मत्तय ३:१५-१७; इब्री लोकांस १०:५-९) देवाच्या सेवेकरता त्याने मनःपूर्वक समर्पण केल्याचे हे चिन्ह होते. तीमथ्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो एक सेवक बनला. तेव्हापासून त्याचे जीवन, त्याची शक्ती किंबहुना त्याच्याजवळ असलेले सर्वकाही देवाच्या मालकीचे झाले. हे त्याच्या उपासनेत, त्याच्या ‘पवित्र सेवेत’ समाविष्ट होते. पण फक्त सेवक म्हणवून घेण्यातच तीमथ्याने समाधान मानले नाही. तर तो आध्यात्मिक प्रगती करत राहिला. आध्यात्मिकरित्या प्रौढ असा ख्रिस्ती सेवक तो बनला. पौलासारख्या प्रौढ ख्रिस्ती बांधवांची सोबत, त्याचा स्वतःचा अभ्यास आणि उत्साही प्रचार कार्यामुळेच तीमथ्य इतकी प्रगती करू शकला.—१ तीमथ्य ४:१४; २ तीमथ्य २:२; इब्री लोकांस ६:१.
१४. ‘सार्वकालिक जीवनासंबंधी योग्य मनोवृत्ती’ असणारी व्यक्ती आज सेवक बनण्याकरता कशाप्रकारे प्रगती करते?
१४ आजही ख्रिस्ती सेवक होऊ इच्छिणारा याच टप्प्यांतून जातो. ‘सार्वकालिक जीवनासंबंधी योग्य मनोवृत्ती बाळगणाऱ्यांना’ बायबल अभ्यासाद्वारे देवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल जाणून घ्यायला मदत केली जाते. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) मग ही व्यक्ती हळूहळू बायबलच्या तत्त्वांचे पालन करायला शिकते; यहोवाला योग्यप्रकारे प्रार्थना करायला शिकते. (स्तोत्र १:१-३; नीतिसूत्रे २:१-९; १ थेस्सलनीकाकर ५:१७, १८) ती इतर बांधवांच्या सहवासाचा आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासांच्या’ सर्व तरतुदी व व्यवस्थांचा फायदा करून घेण्यास शिकते. (मत्तय २४:४५-४७; नीतिसूत्रे १३:२०; इब्री लोकांस १०:२३-२५) अशाप्रकारे आध्यात्मिक शिक्षणाच्या बहुविध पैलूंचा फायदा करून ही व्यक्ती प्रगती करते.
१५. एखादी व्यक्ती बाप्तिस्मा घेते तेव्हा काय होते? (तळटीप पाहा.)
१५ यहोवा देवाबद्दल खरे प्रेम आणि खंडणी यज्ञार्पणावर दृढ विश्वास निर्माण झाल्यावर आपोआपच ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे आपल्या स्वर्गीय पित्याला समर्पित करू इच्छिते. (योहान १४:१) ती प्रार्थनेद्वारे परमेश्वराजवळ आपली ही इच्छा व्यक्त करते आणि एकांतात असे केल्यानंतर बाप्तिस्मा घेऊन सर्वांसमोर हे जाहीर करते. बाप्तिस्मा म्हणजेच त्या व्यक्तीचा नेमणूक समारंभ असतो; कारण त्याचवेळेपासून तिला देवाचा समर्पित सेवक, दियाकोनोस म्हणून ओळखले जाते. तिने या जगापासून वेगळे राहणे आवश्यक आहे. (योहान १७:१६; याकोब ४:४) कारण तिने “जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून” कोणत्याही अटीविना स्वतःला समर्पित केले आहे. (रोमकर १२:१) * ख्रिस्ताप्रमाणे ही व्यक्ती देवाचा सेवक बनली आहे.
ख्रिस्ती सेवा काय आहे?
१६. सेवक या नात्याने तीमथ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या होत्या?
१६ तीमथ्याच्या सेवेत काय सामील होते? पौलाच्या प्रवासी कार्यात त्याचा सोबती असल्यामुळे तीमथ्याला काही खास जबाबदाऱ्या होत्या. तसेच वडील बनल्यानंतर, तीमथ्याने आपल्या ख्रिस्ती बांधवांना देवाचे वचन शिकवण्यासाठी व आध्यात्मिकरित्या त्यांना दृढ करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. पण येशू व पौलाप्रमाणेच त्याच्याही सेवेचा मुख्य पैलू सुवार्तेचा प्रचार करणे आणि शिष्य बनविणे हाच होता. (मत्तय ४:२३; १ करिंथकर ३:५) पौलाने तीमथ्याला सांगितले: “सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सुवर्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (तिरपे वळण आमचे.)—२ तीमथ्य ४:५.
१७, १८. (अ) ख्रिस्ती लोक कोणत्या सेवेत भाग घेतात? (ब) ख्रिस्ती सेवकाकरता प्रचार कार्याचे काय महत्त्व आहे?
१७ आजही ख्रिस्ती सेवेचा मुख्य पैलू सुवार्तेची घोषणा हाच आहे. ख्रिस्ती सेवक सुवार्ता घोषणेद्वारे एक सार्वजनिक सेवा करतात; ते लोकांना येशूच्या बलिदानाविषयी सांगतात आणि नम्र लोकांना यहोवाच्या नावाचा धावा करण्यास शिकवतात. (प्रेषितांची कृत्ये २:२१; ४:१०-१२; रोमकर १०:१३) मानवजातीच्या सर्व दुःखांसाठी देवाचे राज्य हा एकच उपाय आहे याची बायबलमधून ते लोकांना खात्री पटवून देतात; शिवाय देवाच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे आजही आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगता येते हे देखील ते लोकांना समजावून सांगतात. (स्तोत्र १५:१-५; मार्क १३:१०) पण ख्रिस्ती सेवक केवळ आदर्श सामाजिक जीवनाचा उपदेश देत नाही. उलट, सुभक्तीने चालणाऱ्यांना “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे,” अशी शिकवण तो लोकांना देतो.—१ तीमथ्य ४:८.
१८ ख्रिस्ती सेवकांपैकी जवळजवळ सर्वांना सुवार्तेच्या घोषणेव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. (इफिसकर ५:२१–६:४) वडील व सेवा सेवक मंडळीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात. (१ तीमथ्य ३:१, १२, १३; तीत १:५; इब्री लोकांस १३:७) अनेक ख्रिस्ती, राज्य सभागृहांच्या बांधकामात साहाय्य करतात. तर काहींना वॉचटावर संस्थेच्या बेथेल गृहांत स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याचा बहुमान मिळाला आहे. पण या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, सर्व ख्रिस्ती सेवक सुवार्तेच्या प्रचार कार्यात सहभाग घेतात. याला कोणीही अपवाद नाही. किंबहुना हे कार्य करण्याद्वारेच, प्रत्येकजण खरा ख्रिस्ती सेवक असल्याचे सिद्ध करतो.
ख्रिस्ती सेवकाची मनोवृत्ती
१९, २०. ख्रिस्ती सेवकांनी कशी मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
१९ चर्चमधील अधिकांश सेवक लोकांकडून मानसन्मानाची अपेक्षा करतात; ते आपल्या नावापुढे “रेव्हरंड” (म्हणजे, पूज्य), “फादर” आदींसारख्या पदव्या लावतात. पण खरा ख्रिस्ती सेवक अशी मनोवृत्ती बाळगत नाही; आदर व सन्मान केवळ यहोवालाच दिला पाहिजे हे तो ओळखतो. (१ तीमथ्य २:९, १०) तेव्हा कोणताही ख्रिस्ती सेवक लोकांकडून हा आदर मिळवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपल्या नावापुढे या अर्थाच्या पदव्या देखील लावत नाही. (मत्तय २३:८-१२) दियाकोनिया या शब्दाचा मूळ अर्थ “सेवा” आहे याची तो नेहमी जाणीव ठेवतो. बायबलमध्ये तर काही ठिकाणी या शब्दाचे क्रियापद, जेवणाच्या मेजावर लोकांना वाढणे यांसारख्या कामांच्या संदर्भात वापरले आहे. (लूक ४:३९; १७:८; योहान २:५) ख्रिस्ती सेवेच्या बाबतीत जरी या शब्दाचा आदराने उपयोग केला असला तरीसुद्धा दियाकोनोस हा शेवटी सेवकच आहे.
२० कोणत्याही ख्रिस्ती सेवकाने स्वतःला काही विशेष समजू नये. खरे ख्रिस्ती सेवक, मंडळीत त्यांना काही खास जबाबदाऱ्या असल्या तरीसुद्धा, नम्रपणे स्वतःला दासच समजतात. येशूने म्हटले: “जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.” (मत्तय २०:२६, २७) योग्य मनोवृत्ती बाळगण्याविषयी आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी येशूने एकदा त्यांचे पाय धुतले; सर्वात खालच्या दर्जाच्या दासाचे काम त्याने केले. (योहान १३:१-१५) येशू खरोखर किती नम्र होता! ख्रिस्ती सेवक देखील नम्रपणे यहोवा देवाची आणि येशू ख्रिस्ताची सेवा करतात. (२ करिंथकर ६:४; ११:२३) इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजून ते एकमेकांची सेवा करतात. तसेच, सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे ते सत्य न मानणाऱ्या शेजाऱ्यांचीही निःस्वार्थपणे सेवा करतात.—रोमकर १:१४, १५; इफिसकर ३:१-७.
सेवेत टिकून राहा
२१. सेवेत टिकून राहिल्यामुळे पौलाला कोणते प्रतिफळ मिळाले?
२१ पौलाला सेवेत टिकून राहण्यासाठी बरेच कष्ट सोसावे लागले. कलस्सैकरांना सुवार्ता सांगण्याकरता आपल्याला बरीच दुःखे सहन करावी लागली असे त्याने त्यांना सांगितले होते. (कलस्सैकर १:२४, २५) पण त्याने ही सर्व दुःखे सहन केल्यामुळेच बरेच जण सुवार्तेचा स्वीकार करून ख्रिस्ती सेवक बनू शकले. ते देवाचे पुत्र आणि येशू ख्रिस्ताचे बंधू बनले आणि स्वर्गात आत्मिक शरीरात त्याच्यासोबत राहण्याची आशा त्यांना मिळाली. पौल आपल्या सेवेत टिकून राहिला म्हणूनच त्या सर्वांना हे वैभवी प्रतिफळ मिळू शकले!
२२, २३. (अ) आज ख्रिस्ती सेवकांना सेवेत टिकून राहणे का सोपे नाही? (ब) ख्रिस्ती सेवेत टिकून राहिल्यामुळे कोणते अद्भुत आशीर्वाद मिळतात?
२२ आजही देवाच्या खऱ्या सेवकांना आपल्या सेवेत टिकून राहण्याकरता बरेच कष्ट सोसावे लागतात. काहींना आजारपणाला तर इतरांना म्हातारपणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आईवडिलांना आपल्या मुलांच्या पालनपोषणाकरता परिश्रम करावे लागतात; कित्येकांना तर एकट्यानेच आपल्या मुलांचे संगोपन करावे लागते. शाळाकॉलेजांत जाणाऱ्या मुलांना इतर मुलांच्या वाईट गुणांपासून व सवयींपासून सांभाळून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कित्येक ख्रिस्ती बांधवांना बिकट आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच ख्रिस्ती सेवकांना छळही सोसावा लागतो. शिवाय, आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ जगत असल्यामुळे कित्येक बांधवांना इतर अडचणींना तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१) प्रेषित पौलाप्रमाणेच आज यहोवाचे लाखो सेवक असे म्हणू शकतात: ‘सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही फार धीराने आपली लायकी पटवून देतो.’ (२ करिंथकर ६:४) ही सर्व दुःखे सहन करावी लागत असली तरीही ख्रिस्ती सेवक हिंमत हारत नाहीत. सेवेत टिकून राहण्याची त्यांची ही वृत्ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
२३ सेवेत टिकून राहिल्यामुळे पौलाला ज्याप्रमाणे वैभवी प्रतिफळ मिळाले त्याचप्रमाणे आपल्यालाही मिळेल. दुःखे सोसावी लागली तरीही आपण सेवेत टिकून राहतो तेव्हा आपण यहोवासोबतचा घनिष्ट नातेसंबंध राखू शकतो आणि त्याचे मन आनंदित करू शकतो. (नीतिसूत्रे २७:११) यामुळे आपला विश्वासही दृढ होतो. तसेच आपण आणखी शिष्य बनवतो तेव्हा ख्रिस्ती बांधवांचे आपले जागतिक कुटुंब वाढत जाते. (१ तीमथ्य ४:१६) या शेवटल्या काळात यहोवा त्याच्या सेवकांना सांभाळत आहे आणि त्यांच्या सेवेवर त्याचा विपुल आशीर्वाद आहे. १,४४,००० अभिषिक्त जनांच्या शेवटल्या सदस्यांना एकत्रित करण्यात आले आहे. आणखी लाखो जण परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगण्याची आशा बाळगतात. (लूक २३:४३; प्रकटीकरण १४:१) खरोखर ख्रिस्ती सेवा ही यहोवाच्या दयेचाच एक पुरावा आहे. (२ करिंथकर ४:१) आपल्या बहुमोल ख्रिस्ती सेवेची आपण सदैव कदर बाळगू आणि या सेवेमुळेच मिळणाऱ्या सार्वकालिक प्रतिफळाविषयी यहोवाचे उपकार मानू.—१ योहान २:१७.
[तळटीपा]
^ परि. 3 चर्चच्या अधिकाऱ्यांना संबोधला जाणारा “डीकन” हा शब्द दियाकोनोस या ग्रीक शब्दापासून आला आहे. काही चर्चेसमध्ये स्त्रियांना देखील अधिकारपदे दिली जातात. त्यांना डीकनेस म्हटले जाते.
^ परि. 15 रोमकर १२:१ हे वचन खासकरून अभिषिक्त ख्रिस्ती लोकांच्या संदर्भात असले तरीसुद्धा त्यातील तत्त्व “दुसरी मेंढरे” यांना देखील लागू होते. (योहान १०:१६) ते देखील “परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी . . . त्याच्या चरणी जडले आहेत.”—यशया ५६:६.
तुम्ही समजावू शकता का?
• पहिल्या शतकातील सर्व ख्रिश्चनांवर कोणती जबाबदारी होती?
• ख्रिस्ती सेवकाला केव्हा नेमले जाते आणि कोण त्याला नेमतो?
• ख्रिस्ती सेवकाने कशी मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
• कठीण परिस्थितीतही ख्रिस्ती सेवकाने आपल्या सेवेत का टिकून राहिले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६, १७ पानांवरील चित्रे]
तीमथ्याला बालपणापासून देवाचे वचन शिकवण्यात आले होते. त्याचा बाप्तिस्मा झाला त्यावेळी तो ख्रिस्ती सेवक बनला
[१८ पानांवरील चित्र]
बाप्तिस्मा हे देवाला केलेल्या समर्पणाचे चिन्ह आणि बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तीच्या सेवकपणाची सुरवात आहे
[२० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती सेवक स्वेच्छेने इतरांची सेवा करतात