खरे ख्रिस्ती सेवा करण्यात आनंद मानतात
खरे ख्रिस्ती सेवा करण्यात आनंद मानतात
“घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता [आनंद] आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
१. आज कोणती वाईट वृत्ती सर्रास पाहायला मिळते आणि ही वृत्ती वाईट का आहे?
गत शतकाच्या शेवटल्या काही वर्षांत “मीपणा” हा शब्द बऱ्याचदा कानावर आला. मीपणाची वृत्ती म्हणजे “मी” आणि “माझं” इतकाच संकुचित विचार करण्याची आणि इतरांबद्दल जराही विचार न करण्याची स्वार्थी, लोभी वृत्ती. सन २००० दरम्यानही मीपणाची ही वृत्ती सर्रास दिसून येते. “यात माझा काय फायदा?” किंवा “मला किती मिळतील?” हे प्रश्न कित्येकदा आपण ऐकतो. पण अशी ही स्वार्थी वृत्ती आनंदी जीवनाला पोषक नाही. उलट “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता [आनंद] आहे,” या येशूने सांगितलेल्या तत्त्वाच्या ती अगदीच विरोधात आहे.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
२. देण्यात आनंद आहे असे का म्हणता येते?
२ घेण्यापेक्षा देण्यातच जास्त आनंद आहे हे खरे आहे का? निश्चितच. यहोवा देवाचा विचार करा. तो “जीवनाचा झरा” आहे. (स्तोत्र ३६:९) आपल्याला आनंद देणाऱ्या आणि आपल्या गरजा तृप्त करणाऱ्या सर्व गोष्टी तो आपल्याला पुरवतो. त्याला तर “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा असेही म्हटले आहे. (याकोब १:१७) ‘धन्यवादित [आनंदी] देव’ यहोवा सतत देतच असतो. (१ तीमथ्य १:११) त्याने निर्माण केलेल्या मानवजातीवर तो अतिशय प्रेम करतो आणि त्यामुळे तो त्यांना सर्वकाही मुबलक देतो. (योहान ३:१६) आईवडिलांचे उदाहरण घ्या. तुम्हाला जर मुले असतील, तर त्यांना लहानाचे मोठे करताना किती त्याग करावे लागतात, कितीतरी गोष्टी त्यांना द्याव्या लागतात याची तुम्हाला चांगली कल्पना असेल. पण आईवडिलांना काय काय त्याग करावे लागतात, याची कित्येक वर्षांपर्यंत मुलांना जराही कल्पना नसते. आईवडिलांचे आभार मानण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. पण तुम्हाला याचे वाईट वाटत नाही. आपले मूल वाढत आहे याचाच तुम्हाला आनंद वाटतो. तुम्ही निस्वार्थपणे आपल्या मुलांना जे काही आवश्यक असेल ते देतच राहता. का? कारण तुमच्या मुलांवर तुमचे प्रेम आहे.
३. यहोवाची व आपल्या बांधवांची सेवा करण्यात आपल्याला आनंद का वाटतो?
३ त्याचप्रमाणे, खरी उपासना प्रेमावर आधारलेली आहे. यहोवावर आणि आपल्या बांधवांवर आपले प्रेम असल्यामुळे त्यांची सेवा करण्यात आपल्याला आनंद वाटतो; त्यांच्यासाठी कित्येक त्याग करायला आपण आनंदाने तयार असतो. (मत्तय २२:३७-३९) जे मनात स्वार्थ बाळगून यहोवाची उपासना करतात ते कधीही आनंदी नसतात. पण जे कोणतीही अपेक्षा न करता सेवा करतात, काय मिळेल याचा विचार करण्याऐवजी काय देता येईल याचा नेहमी विचार करतात त्यांना खरा आनंद मिळतो. बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या आपल्या उपासनेशी संबंधित असणाऱ्या काही खास शब्दांचा अभ्यास केल्यास ही गोष्ट स्पष्ट होईल. यांपैकी तीन शब्दांचे या व पुढच्या लेखात आपण परीक्षण करू.
येशूची सार्वजनिक सेवा
४. सर्वसामान्य ख्रिस्ती धर्मात “सार्वजनिक सेवा” कशाप्रकारची असते?
४ मूळ ग्रीक भाषेत, उपासनेशी संबंधित असणारा एक महत्त्वाचा शब्द म्हणजे लिटरजिया. या शब्दाचे भाषांतर न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये “सार्वजनिक सेवा” असे करण्यात आले आहे. सर्वसामान्य ख्रिस्ती धर्मात लिटरजिया या शब्दावरून “लिटरजी” * अर्थात, सार्वजनिक प्रार्थनाविधी हा शब्द आला आहे. पण खरे पाहता हे सार्वजनिक प्रार्थनाविधी केवळ नावापुरते सार्वजनिक असतात; सर्वसामान्य जनतेला त्यांचा फारसा फायदा होत नाही.
५, ६. (अ) इस्राएलात कोणती सार्वजनिक सेवा केली जायची आणि यामुळे लोकांना कोणते फायदे व्हायचे? (ब) इस्राएलात केल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवेऐवजी कोणती अधिक श्रेष्ठ अशी व्यवस्था करण्यात आली आणि का?
५ प्रेषित पौलाने लिटरजिया हा शब्द इस्राएली याजकांच्या संदर्भात वापरला. त्याने म्हटले: “प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा [“सार्वजनिक सेवा,” NW; लिटरजिया शब्दाचे एक रूप] करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो.” (इब्री लोकांस १०:११) लेवीय याजक इस्राएलात अतिशय मोलवान सार्वजनिक सेवा करीत होते, कारण ही सेवा लोकांच्या फायद्याची होती. ते लोकांना देवाच्या नियमशास्त्राचे शिक्षण देत होते आणि त्यांच्या पापांच्या प्रायश्चित्ताकरता यज्ञ अर्पण करीत होते. (२ इतिहास १५:३; मलाखी २:७) याजक आणि इतर लोक यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालायचे तेव्हा त्यांच्या राष्ट्रात सुखासमाधानाची परिस्थिती असायची.—अनुवाद १६:१५.
६ नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या इस्राएली राष्ट्रात सार्वजनिक सेवा करण्याची संधी ही इस्राएली याजकांकरता अत्यंत मानाची होती. पण इस्राएली राष्ट्राच्या अविश्वासूपणामुळे देवाने त्यांना त्यागले तेव्हा या याजकांच्या सेवेला काही अर्थ राहिला नाही. (मत्तय २१:४३) कारण यहोवाने पूर्वीपेक्षा श्रेष्ठ अशी एक व्यवस्था केली. अर्थात, महायाजक येशूने केलेल्या सार्वजनिक सेवेची. याविषयी आपण असे वाचतो: “हा [येशू ख्रिस्त] युगानुयुग राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”—इब्री लोकांस ७:२४, २५.
७. येशूच्या सार्वजनिक सेवेमुळे होणारे फायदे सर्वोत्तम का आहेत?
७ येशूचे याजकपण कायमचे आहे, त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तोच केवळ लोकांचे पूर्णपणे तारण करू शकतो. म्हणूनच त्याची सार्वजनिक सेवा सर्वोत्तम आहे. हातांनी तयार केलेल्या मंदिरात नव्हे, तर प्रतिरूपी मंदिरात तो ही सेवा सादर करतो. हे प्रतिरूपी मंदिर म्हणजे सा.यु. २९ साली स्थापित करण्यात आलेले आध्यात्मिक मंदिर, किंवा यहोवाची उपासना करण्याकरता एक नवीन अद्भुत व्यवस्था. आज येशू त्या आध्यात्मिक मंदिराच्या परमपवित्र स्थानात म्हणजेच स्वर्गात सेवा करत आहे. तो “पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभुने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक [“सार्वजनिक सेवक,” NW; लिटरगोस] आहे.” (इब्री लोकांस ८:२; ९:११, १२) येशूची पदवी अतिशय सन्मानाची असली तरीही, तो एक “सार्वजनिक सेवक” आहे. आपल्या उच्च पदाचा उपयोग तो स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर इतरांची सेवा करण्याकरता करतो. आणि ही सेवा करण्यात त्याला आनंद वाटतो. पृथ्वीवर असताना येशूने “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता,” सर्व प्रकारच्या कठीण परीक्षांना तोंड दिले. इतरांची सेवा करण्याचा आनंद देखील यात सामील होता.—इब्री लोकांस १२:२.
८. येशूने त्याच्या सार्वजनिक सेवेद्वारे नियमशास्त्राचा करार कशाप्रकारे संपुष्टात आणला?
८ येशूच्या सार्वजनिक सेवेमुळे आणखी एक गोष्ट साध्य झाली. पौलाने लिहिले: “ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा [“सार्वजनिक सेवा,” NW] येशूला मिळाली आहे.” (इब्री लोकांस ८:६) इस्राएली लोकांसोबत यहोवाचा नातेसंबंध ज्या करारावर आधारित होता, त्या कराराचा मध्यस्थ मोशे होता. (निर्गम १९:४, ५) पण येशू हा एका नव्या कराराचा मध्यस्थ होता. या नव्या करारामुळे एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला. अनेक राष्ट्रांतून घेतलेल्या अभिषिक्त ख्रिस्तीजनांपासून बनलेल्या या नव्या राष्ट्राला ‘देवाचे इस्राएल’ म्हणण्यात आले. (गलतीकर ६:१६; इब्री लोकांस ८:८, १३; प्रकटीकरण ५:९, १०) येशूच्या सार्वजनिक सेवेचा हा किती उत्तम परिणाम! येशूची आपल्याला ओळख होऊ शकली, आणि त्याने केलेल्या सार्वजनिक सेवेमुळे आज आपण यहोवा स्वीकारेल अशा पद्धतीने त्याची उपासना करू शकतो ही खरोखर आनंदाची बाब नाही का?—योहान १४:६.
खरे ख्रिस्ती देखील सार्वजनिक सेवा करतात
९, १०. ख्रिस्ती लोक कोणकोणत्या प्रकारे सार्वजनिक सेवा करतात?
९ येशूने केलेल्या सार्वजनिक सेवेइतकी सन्मानाची सेवा कोणताही मनुष्य करू शकत नाही. अभिषिक्त ख्रिस्ती जनांना स्वर्गात अविनाशी जीवन मिळाल्यानंतर ते येशूच्या सोबत स्वर्गात राजे व याजक या नात्याने सार्वजनिक सेवा करतील. (प्रकटीकरण २०:६; २२:१-५) पण पृथ्वीवर राहणारे ख्रिस्ती देखील सार्वजनिक सेवा करतात आणि त्यात ते आनंदित आहेत. प्रेषित पौलाने केलेल्या सार्वजनिक सेवेचे एक उदाहरण पाहा. पॅलेस्टाईनमध्ये दुष्काळ पडला तेव्हा प्रेषित पौलाने युरोपातील बांधवांनी दिलेल्या देणग्या यहुदिया येथील यहुदी ख्रिश्चनांपर्यंत पोचवल्या होत्या. या मदतीमुळे त्या यहुदी ख्रिश्चनांचे दुःख त्याने कमी केले. ही एक सार्वजनिक सेवाच होती. (रोमकर १५:२७; २ करिंथकर ९:१२) आजही आपल्या बांधवांवर काही संकट किंवा नैसर्गिक विपत्ती आल्यास इतर ख्रिस्ती बांधव लगेच त्यांच्या मदतीला धावून येतात. आपल्या बांधवांची सेवा करण्यात त्यांना अतिशय आनंद वाटतो.—नीतिसूत्रे १४:२१.
१० पौलाने आणखी एका प्रकारच्या सार्वजनिक सेवेचा उल्लेख केला. त्याने लिहिले: “तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा [“सार्वजनिक सेवा,” NW] होताना जरी मी स्वतः अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करितो.” (फिलिप्पैकर २:१७) फिलिप्पै येथील मंडळीच्या बांधवांकरता पौलाने अतिशय परिश्रम घेतले. हे परिश्रम एक प्रकारची सार्वजनिक सेवा होती, व ती त्याने प्रेमाने आणि जीव ओतून केली. आज अभिषिक्त ख्रिस्ती देखील अशाचप्रकारची सार्वजनिक सेवा करत आहेत. ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ या नात्याने आपल्याला यथाकाळी आध्यात्मिक अन्न पुरवण्याकरता ते परिश्रम घेत आहेत. (मत्तय २४:४५-४७) सर्व अभिषिक्त जन मिळून एक “पवित्र याजकगण” आहेत. त्यांना “येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ” अर्पण करण्यासाठी आणि ‘ज्याने [त्यांना] अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण प्रसिद्ध करण्यासाठी’ नियुक्त करण्यात आले आहे. (१ पेत्र २:५, ९) या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता ‘अर्पिले जात असताना’ ते यास एक बहुमान आणि आनंददायक कार्य समजतात. ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असणारे त्यांचे साथीदार देखील यहोवाबद्दल आणि त्याच्या महान उद्देशांबद्दल सर्व मानवजातीला सांगण्याच्या कार्यात त्यांच्या सोबत सेवा करतात व त्यांना सहयोग देतात. * (योहान १०:१६; मत्तय २४:१४) ही सार्वजनिक सेवा किती विशेष आणि किती आनंददायक आहे!—स्तोत्र १०७:२१, २२.
पवित्र सेवा करणे
११. हन्ना संदेष्ट्रीने सर्व ख्रिस्ती लोकांकरता कशाप्रकारे उत्तम आदर्श मांडला?
११ आपल्या उपासनेशी संबंधित असणारा आणखी एक ग्रीक शब्द म्हणजे लॅट्रिया. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये या शब्दाचे “पवित्र सेवा” असे भाषांतर करण्यात आले आहे. पवित्र सेवा म्हणजे आपण करत असलेली उपासना. उदाहरणार्थ, ८४ वर्षांची विधवा संदेष्ट्री हन्ना हिच्याविषयी असे म्हटले आहे, की ती “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा [लॅट्रिया] करीत असे.” (लूक २:३६, ३७) हन्नाने सातत्याने यहोवाची उपासना केली. आपण तरुण असो वा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष, हन्नाचे उदाहरण आपल्या सर्वांकरता एक उत्तम आदर्श आहे. ज्याप्रकारे हन्ना यहोवाला मनःपूर्वक प्रार्थना करत होती आणि त्याच्या मंदिरात सातत्याने त्याची उपासना करत होती, त्याचप्रमाणे आपणही यहोवाला निरंतर प्रार्थना केली पाहिजे आणि ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहिले पाहिजे. या सर्व गोष्टी देखील आपल्या पवित्र सेवेचा भाग आहेत.—रोमकर १२:१२; इब्री लोकांस १०:२४, २५.
१२. आपल्या पवित्र सेवेचा एक प्रमुख पैलू कोणता आहे आणि ही एक सार्वजनिक सेवा आहे असेही का म्हणता येईल?
१२ प्रेषित पौलाने आपल्या पवित्र सेवेच्या आणखी एका मुख्य पैलूविषयी उल्लेख केला. त्याने म्हटले: “तुमची आठवण मी निरंतर करीत असतो. . . . ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा [“पवित्र सेवा,” NW] मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करितो.” (रोमकर १:९, १०) होय, सुवार्तेची घोषणा ही एक सार्वजनिक सेवाच आहे कारण यामुळे ऐकणाऱ्यांचा फायदा होतो, पण त्यासोबतच याद्वारे आपण यहोवा देवाची उपासना करतो. लोक कदाचित आपल्याकडे दुर्लक्ष करतील पण प्रचार करत राहण्याद्वारे आपण यहोवाला पवित्र सेवा सादर करतो. आपल्या प्रिय स्वर्गीय पित्याच्या अद्भुत गुणांविषयी आणि त्याच्या महान उद्देशांविषयी लोकांना सांगताना आपल्याला मोठा आनंद वाटतो.—स्तोत्र ७१:२३.
आपण पवित्र सेवा कोठे सादर करतो?
१३. यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या आतील अंगणात पवित्र सेवा करणाऱ्यांना कोणती आशा आहे आणि याबद्दल त्यांच्यासोबत कोण आनंद व्यक्त करतात?
१३ अभिषिक्त ख्रिस्तीजनांना पौलाने असे लिहिले: “न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण इब्री लोकांस १२:२८) अभिषिक्त जनांची स्वर्गीय राज्याची आशा अगदी निश्चित आहे, त्यामुळे परात्पर देवाची उपासना करत असताना ते अतूट विश्वास दाखवतात. यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या पवित्र स्थानात आणि आतील अंगणात पवित्र सेवा करण्याचा बहुमान केवळ त्यांना मिळाला आहे; आणि लवकरच येशूसोबत परमपवित्र स्थानात, अर्थात स्वर्गात सेवा करण्याची ते उत्कंठा बाळगतात. दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या त्यांच्या सोबत्यांना देखील त्यांच्या या अद्भुत आशेविषयी आनंद वाटतो.—इब्री लोकांस ६:१९, २०; १०:१९-२२.
उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू.” (१४. येशूच्या सार्वजनिक सेवेचा मोठ्या लोकसमुदायाला कसा फायदा होतो?
१४ दुसऱ्या मेंढरांविषयी काय? प्रेषित पौलाने दृष्टान्तात पाहिले होते त्याप्रमाणे, या शेवटल्या काळात दुसऱ्या मेंढरांचा एक मोठा लोकसमुदाय प्रकट झाला आहे आणि त्यांनी “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटीकरण ७:१४) याचा अर्थ, त्यांच्या अभिषिक्त बांधवांप्रमाणे ते देखील येशूने केलेल्या सार्वजनिक सेवेवर, अर्थात मानवजातीकरता त्याने दिलेल्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या बलिदानावर विश्वास ठेवतात. येशूच्या सार्वजनिक सेवेचा दुसऱ्या मेंढरांना देखील फायदा होतो कारण ते देखील “[यहोवाचा] करार दृढ धरून राहतात.” (यशया ५६:६) या नव्या करारात ते सहभागी नाहीत पण तरीही ते हा करार दृढ धरून राहतात, या अर्थाने की त्यातील सर्व नियमांचे ते पालन करतात आणि त्याकरवी केलेल्या व्यवस्थेला सहयोग देतात. ते देवाच्या इस्राएलसोबत सहवास राखतात आणि यातील सदस्यांसोबत मिळून कार्य करतात. ते देवाच्या नावाची जाहीर स्तुती करतात आणि त्याला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करतात.—इब्री लोकांस १३:१५.
१५. मोठा लोकसमुदाय पवित्र सेवा कोठे सादर करतो आणि त्यातील सदस्यांना या आशीर्वादाबद्दल कसे वाटते?
१५ मोठा लोकसमुदाय, “शुभ्र झगे परिधान करून . . . राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा” असलेला योहानाच्या दृष्टीस पडला. शिवाय “ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करितात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.” (प्रकटीकरण ७:९, १५) इस्राएलात यहुदी मतानुसारी, शलमोनाच्या मंदिराच्या बाहेरील अंगणात उपासना करायचे. त्याचप्रकारे मोठा लोकसमुदाय देखील त्याच्या आध्यात्मिक मंदिराच्या बाहेरील अंगणात यहोवाची उपासना करतो. येथे सेवा करण्यात त्यांना आनंद वाटतो. (स्तोत्र १२२:१) त्यांच्या अभिषिक्त साथीदारांपैकी शेवटल्या अभिषिक्त बांधवाचे स्वर्गीय पुनरुत्थान झाल्यावरही ते यहोवाचे लोक राहतील व त्याला आपली पवित्र सेवा सादर करत राहतील.—प्रकटीकरण २१:३.
यहोवाला स्वीकृत नसलेली पवित्र सेवा
१६. पवित्र सेवेसंबंधी कोणत्या गोष्टी आठवणीत ठेवणे महत्त्वाचे आहे?
१६ प्राचीन इस्राएली लोकांना यहोवाच्या नियमांनुसार त्याची पवित्र सेवा करण्याची आज्ञा देण्यात आली होती. (निर्गम ३०:९; लेवीय १०:१, २) आजही, आपली पवित्र सेवा यहोवाने स्वीकारावी असे आपल्याला वाटत असेल, तर त्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणूनच पौलाने कलस्सैकरांना असे लिहिले: ‘आम्ही तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी.’ (कलस्सैकर १:९, १०) देवाची उपासना कशी करायची हे आपण ठरवू शकत नाही. यासाठी बायबलचे अचूक ज्ञान, आध्यात्मिक समजबुद्धी आणि देवाकडून येणारी सुबुद्धी असणे आवश्यक आहे. यांशिवाय आपली उपासना व्यर्थ ठरेल.
१७. (अ) मोशेच्या काळात इस्राएली लोक खऱ्या उपासनेपासून कशाप्रकारे दूर गेले? (ब) आजच्या काळातही पवित्र सेवेपासून एखादी व्यक्ती कशाप्रकारे दूर जाऊ शकते?
१७ मोशेच्या काळात इस्राएली लोकांनी काय केले याची आठवण करा. बायबल सांगते: “देवाने त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करावयास सोडून दिले.” (प्रेषितांची कृत्ये ७:४२) यहोवाची सर्व महत्कृत्ये पाहिल्यानंतरही ते इस्राएली लोक आपला फायदा होईल असे समजून इतर देवतांची पूजा करू लागले. ते यहोवाला एकनिष्ठ राहिले नाहीत; पण आपली पवित्र सेवा देवाने स्वीकारावी असे आपल्याला वाटत असल्यास, त्याला एकनिष्ठ राहणे फार महत्त्वाचे आहे. (स्तोत्र १८:२५) आज कदाचित कोणी खरोखरच यहोवाची उपासना सोडून ग्रहताऱ्यांची किंवा सोनेरी वासरांची उपासना करणार नाही, पण मूर्तिपूजा बऱ्याच प्रकारच्या असू शकतात. येशूने आपल्या शिष्यांना “धनाची चाकरी” करू नका असे सांगितले आणि पौलाने लोभाला मूर्तिपूजा म्हटले. (मत्तय ६:२४; कलस्सैकर ३:५) सैतानाने देखील स्वतःला या जगाचा देव बनवले आहे. (२ करिंथकर ४:४) या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तिपूजा आज सर्रास दिसून येतात. यांपासून सांभाळून राहण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती स्वतःला येशूचा अनुयायी म्हणवते, पण मुळात या व्यक्तीच्या जीवनाचे ध्येय श्रीमंत होण्याचे आहे; किंवा या व्यक्तीला यहोवा देवापेक्षा स्वतःवर आणि स्वतःच्या बुद्धीवर जास्त भरवसा आहे. अशी व्यक्ती खरोखर कोणाची सेवा करत असते? यशयाच्या दिवसांतील ज्या यहुद्यांनी एकीकडे यहोवाच्या नावाने शपथ वाहिली आणि दुसरीकडे त्याच्या महत्कृत्यांचे श्रेय अशुद्ध मूर्तींना दिले त्यांच्यापेक्षा ही व्यक्ती खरच वेगळी आहे का?—यशया ४८:१, ५.
१८. पुरातन काळात आणि आज देखील पवित्र सेवा कोणत्या चुकीच्या मार्गांनी केली जाते?
१८ येशूने आणखी एक इशारेवजा सूचना दिली होती: “तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे.” (योहान १६:२) कालांतराने प्रेषित पौल बनलेल्या शौलाने जेव्हा ‘स्तेफनाच्या वधाला मान्यता दिली’ आणि जेव्हा तो “प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयींचे फूत्कार टाकीत होता” तेव्हा आपण देवाचीच सेवा करत आहोत असे साहजिकच त्यालाही वाटले असेल. (प्रेषितांची कृत्ये ८:१; ९:१) आजही जातीधर्माच्या नावावर हिंसा पेटवणाऱ्या काहींना आपण देवाची सेवा करत आहोत असे वाटते. अशारितीने, देवाची उपासना करत असल्याचा दावा करणारे कित्येकजण मुळात राष्ट्राची, जातीची, धनसंपत्तीची, स्वतःची किंवा इतर कोणत्या देवतांची उपासना करत असतात.
१९. (अ) पवित्र सेवेविषयी आपल्या कोणत्या भावना आहेत? (ब) पवित्र सेवा केव्हा आनंददायक ठरते?
१९ सैतानाला उत्तर देताना येशूने म्हटले: “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय ४:१०) येशूच्या या शब्दांकडे आपण सर्वांनी लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे! या विश्वाच्या सार्वभौम प्रभू यहोवाला पवित्र सेवा सादर करणे खरोखर एक फार मोठा, अदभुत विशेषाधिकार आहे. तसेच, आपल्या उपासनेत समाविष्ट असणाऱ्या सार्वजनिक सेवेविषयी काय म्हणता येईल? सहमानवांच्या आध्यात्मिक फायद्यासाठी ही सार्वजनिक सेवा करण्यास आपल्याला अतिशय आनंद वाटतो. (स्तोत्र ४१:१, २; ५९:१६) पण ही सेवा पूर्ण मनाने आणि योग्य प्रकारे केली तरच ती आनंददायक ठरू शकते. आज देवाची योग्य प्रकारे उपासना कोण करत आहेत? यहोवा कोणाची उपासना मान्य करतो? या प्रश्नांच्या उत्तराकरता आपल्या उपासनेशी संबंधित असलेला बायबलमधील आणखी एक शब्द पुढच्या लेखात विचारात घेऊ या.
[तळटीपा]
^ परि. 4 सर्वसामान्य ख्रिस्ती धर्मात लिटरजी किंवा सार्वजनिक सेवा यात प्रार्थनाविधी किंवा इतर धार्मिक विधींचा समावेश असतो; उदाहरणार्थ रोमन कॅथलिक चर्चमधील प्रभूभोजनाचा विधी.
^ परि. 10 प्रेषितांची कृत्ये १३:२ [NW] या वचनात अंतुखिया येथील संदेष्टे व उपदेशक यहोवाचे “सार्वजनिक सेवाकार्य” (लिटरजिया या शब्दाशी संबंधित असलेल्या एका ग्रीक शब्दाचे हे भाषांतर आहे) करत होते असे सांगण्यात आले आहे. या सार्वजनिक सेवाकार्यात सुवार्तेच्या सार्वजनिक घोषणेचा देखील समावेश असावा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• येशूने कोणती महान सार्वजनिक सेवा पार पाडली?
• आज ख्रिस्ती लोक कोणती सार्वजनिक सेवा करतात?
• ख्रिस्ती लोकांच्या पवित्र सेवेत काय सामील आहे आणि ही सेवा ते कोठे करतात?
• आपल्या पवित्र सेवेविषयी देवाला संतोष वाटावा असे वाटत असल्यास आपण काय मिळवले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्र]
आईवडील आपल्या मुलांसाठी आनंदाने त्याग करतात
[१३ पानांवरील चित्रे]
इतरांना मदत करणे आणि सुवार्तेची घोषणा करणे ही खऱ्या ख्रिस्ती लोकांची सार्वजनिक सेवा आहे
[१४ पानांवरील चित्र]
आपली पवित्र सेवा देवाला मान्य असण्याकरता अचूक ज्ञान आणि आध्यात्मिक समजबुद्धी असणे महत्त्वाचे आहे