व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही प्रार्थना का करावी?

तुम्ही प्रार्थना का करावी?

तुम्ही प्रार्थना का करावी?

“तुम्ही मागता परंतु तुम्हांस मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता . . . देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याकोब ४:३, ८) येशूचा शिष्य याकोब याचे हे शब्द आपल्याला कदाचित प्रार्थना करण्यामागच्या कारणांचा विचार करण्यास प्रवृत्त करतील.

प्रार्थना म्हणजे, फक्‍त आपल्याला काय हवे आहे त्याची मागणी देवाकडे करणे नव्हे. येशूने डोंगरावरील आपल्या प्रवचनात असे म्हटले: “तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे.” तरीसुद्धा येशू पुढे म्हणतो: “मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल.” (मत्तय ६:८; ७:७) यावरून आपल्याला हे कळते, की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींविषयी आपण यहोवाला बोलून दाखवावे अशी तो अपेक्षा करतो. पण प्रार्थना करण्यामागे आणखीही कारणे आहेत.

खरे मित्र, एकमेकांना काही हवे असते तेव्हाच एकमेकांशी बोलत नाहीत. त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी असते. ते एकमेकांना आपल्या मनातली गोष्ट सांगतात तेव्हाच त्यांची मैत्री आणखी दाट होते. प्रार्थनेच्या बाबतीतही हे खरे आहे. आपल्या गरजा पुरवल्या जाव्यात एवढ्यासाठीच प्रार्थना केल्या जात नाहीत. तर सतत प्रार्थना करून, आपल्या मनातल्या सर्व गोष्टी त्याला सांगून आपली त्याच्याबद्दलची श्रद्धा व्यक्‍त करण्याद्वारे यहोवा देवाबरोबरचा आपला नातेसंबंध मजबूत केला जातो.

आपण यहोवा देवाच्या जवळ यावे म्हणून त्याने आपल्याला प्रार्थना करण्याची संधी बहाल केली आहे. त्यासाठी, पाठ केलेल्या प्रार्थना सारख्या म्हणण्याऐवजी स्वतःच्या शब्दांत आपल्या भावना आपण व्यक्‍त केल्या पाहिजेत. प्रार्थनेद्वारे यहोवाबरोबर बोलणे किती आनंदविणारे आहे! बायबलमधील एक नीतिसूत्र म्हणते: “सरळाची प्रार्थना त्याला आनंदविते.”—नीतिसूत्रे १५:८.

“माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यांतच माझे कल्याण आहे,” असे स्तोत्रकर्त्या आसाफाने गायिले. (स्तोत्र ७३:२८) परंतु देवाजवळ जाण्याकरता फक्‍त प्रार्थना करणे पुरेसे नाही. पुढील अहवालावरून तुम्हाला हे स्पष्ट होईल:

“[येशूच्या] शिष्यातील एकाने त्याला म्हटले, ‘प्रभूजी [आम्हाला] प्रार्थना करावयास . . . शिकवा.’” येशू त्याला म्हणाला: “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा: ‘हे पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो; तुझे राज्य येवो.’” (लूक ११:१, २) पण देवाचे नाव काय आहे आणि ते पवित्र कसे केले जाऊ शकते, याविषयी जाणून न घेताच आपण अर्थपूर्णरीत्या प्रार्थना कशी करू शकू? आणि देवाच्या राज्याचा काय अर्थ होतो हे जर आपल्याला समजलेले नसेल, तर येशूने शिकवलेल्या प्रार्थनेच्या अनुरूप आपण प्रार्थना कशी करू शकू? बायबलमध्ये या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. त्यामुळे बायबलचे जर आपण परीक्षण केले तर आपल्याला सर्वकाही माहीत होईल. आणि मग आपण देवाला ओळखू शकू, त्याचे मार्ग समजू शकू. यहोवा देवाबरोबर ओळख झाल्यावर आपला त्याच्याशी आणखी जवळचा संबंध आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला आणखी श्रद्धा आहे असे आपल्याला वाटेल. परिणामतः, आपण त्याला अधिक मनमोकळेपणाने प्रार्थना करू शकू.

प्रार्थनेमुळे समस्या सोडवता येतात

यहोवाच्या समीप गेल्याने आपल्या समस्या देखील सुटू शकतात. पुढील उदाहरणांवरून तुम्हाला हे दिसून येईल. प्रत्येक उदाहरणांत हे दाखवण्यात आले आहे, की ज्यांनी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचा यहोवाबरोबरचा नातेसंबंध आणखी मजबूत झाला.

ब्राझीलमध्ये मारी नावाच्या एका स्त्रीने मदतीसाठी देवाला प्रार्थना केली. समाजातल्या लोकांचा ढोंगीपणा पाहून मारीने समाजाच्या नीतिनियमांविरुद्ध बंड करायचे ठरवले. तिने तिच्या नवऱ्‍याला, मुलांना आणि घरदारही सोडून दिले. ती मादक पदार्थ घेऊ लागली. तरीसुद्धा ती आनंदी नव्हती. म्हणून एकदा तिने देवाला प्रार्थना करून मदतीसाठी याचना केली.

काही काळातच, दोन यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी आले. ईश्‍वरी मार्गदर्शन स्वीकारल्याने काय फायदा होतो या विषयाचे टेहळणी बुरूज मासिक त्यांनी तिला दिले. हे मासिक वाचून ती इतकी प्रभावीत झाली की त्याच दिवशी तिने त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली. बायबलचा अभ्यास केल्यामुळे तिच्या वागण्यात बदल झाला. ती पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाबरोबर राहायला गेली. यहोवाबद्दलची माहिती घेतल्यावर तिला त्याच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करायचे होते. मारी म्हणते, “मी माझ्या जीवनात पुष्कळ बदल केले. सुरवातीला माझ्या नवऱ्‍यानं आणि कुटुंबानं मला बायबलचा अभ्यास करण्यासाठी विरोध केला. पण माझ्यात झालेले बदल पाहून मग तेही मला उत्तेजन देऊ लागले.” काही काळानंतर मारीने प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवाची सेवा करण्यासाठी आपले जीवन त्याला समर्पित केले.

होसे बोलिव्हियात राहतो. त्याची पत्नी देखणी होती, त्याचा व्यापारही चांगला चालला होता तरीपण तो नाराज होता. दुसऱ्‍या एका स्त्रीबरोबर त्याचे संबंध असल्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले. तो खूप दारू पिऊ लागला. आपण काहीही कामाचे नाही असे त्याला सारखे वाटू लागले. होसे म्हणतो: “मी देवाला अगदी कळकळीनं प्रार्थना केली, की देवा, तुला संतुष्ट करण्यासाठी मी काय करू ते मला सांग. त्यानंतर यहोवाचे साक्षीदार माझ्या व्यापाराच्या ठिकाणी आले. त्यांनी मला मोफत गृह बायबल अभ्यासांविषयी सांगितलं. पण मी काही त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही. तीन वेळा ते माझ्याकडे आले. मी जेव्हा जेव्हा प्रार्थना करायचो, तेव्हा तेव्हा यहोवाचे साक्षीदार मला भेटायला यायचे. शेवटी मी ठरवलं की पुढच्या वेळेस साक्षीदार आल्यावर मी त्यांचं ऐकून घेईन. मी संपूर्ण बायबल वाचून काढलं होतं आणि माझ्या मनात खूप प्रश्‍न होते. त्या सर्व प्रश्‍नांची साक्षीदारांनी समाधानकारक उत्तरे दिली. यहोवाबद्दल शिकल्याने मला जीवनात नवीन उमेद मिळाली. आणि साक्षीदारांपैकी माझे मित्र बनलेल्यांनी मला खूप उत्तेजन दिले! मी ज्या स्त्रीबरोबर राहत होतो, तिला सोडून दिलं शिवाय पिणंही सोडलं. मी पुन्हा माझ्या बायकोमुलांबरोबर राहू लागलो. १९९९ सालाच्या सुरवातीला मी बाप्तिस्मा घेतला.”

इटलीतील, टमाराच्या विवाहात वादळ उठले होते. म्हणून तिने बुद्धीसाठी प्रार्थना केली. ती १४ वर्षांची होती तेव्हा तिच्या घरातल्या लोकांनी तिला मारहाण करून घरातून हाकलून लावले होते. यामुळे टमारा चिडखोर वृत्तीची बनली होती. टमारा म्हणते: “मला एक बायबल सापडलं आणि मी ते रोज वाचू लागले. एकदा संध्याकाळी मी एक वचन वाचलं. त्यात असं लिहिलं होतं, की ‘बुद्धीचा शोध करणे म्हणजे गुप्त निधी शोधून काढण्यासारखे आहे.’ मी याच बुद्धीसाठी प्रार्थना केली. (नीतिसूत्रे २:१-६) दुसऱ्‍या दिवशी सकाळी यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी आले. मी त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला खरा, पण शिकलेल्या गोष्टी आचरणात आणायला मला जरा वेळ लागला. कालांतराने मी ख्रिस्ती जीवनाचा मार्ग निवडला आणि बाप्तिस्मा घेतला. आता मी माझ्या नवऱ्‍याबरोबर इतरांना देवाच्या बुद्धीचा फायदा करून घ्यायला मदत करते.”

व्हेनेझुएलातील काराकॅस येथील उच्चभ्रू लोकवस्तीत बेट्रीझ राहत होती. तरीपण ती सुखी नव्हती. तिचा घटस्फोट झाला होता. एकदा वैतागून तिने तास न्‌ तास प्रार्थना केली. दुसऱ्‍याच दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. ती खूप वैतागली. तिने पीपहोलमधून बाहेर पाहिले तर एक जोडपे हातात ब्रिफकेस घेऊन उभे होते. तिने घरात कोणी नसल्याचे नाटक केले. मग या जोडप्याने जायच्या आधी तिच्या दाराखालच्या फटीतून एक हॅण्डबील आत सरकवले. त्यावर लिहिलं होतं, “आपले बायबल जाणून घ्या.” हॅण्डबील पाहिल्यावर ती विचार करू लागली, की मी रात्री केलेल्या प्रार्थनेचे हे उत्तर तर नसेल? तिने त्या जोडप्याला लगेच बोलावून घेतले. कालांतराने तिने बायबलचा अभ्यास सुरू केला आणि नंतर बाप्तिस्मा घेतला. आज बेट्रीझ स्वतः आनंदी आहे आणि आनंद कसा मिळवता येईल ते इतरांना शिकवण्यात दंग आहे.

कारमेनची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे तिने देवाला प्रार्थना केली. तिला दहा मुले होती आणि तिचा नवरा रफायल, दारूडा होता. ती म्हणते, “लोकांची धुणी धुऊन मी चार पैसे मिळवू लागले.” पण रफायलचं पिणं जास्तच वाढलं. ती पुढे म्हणाली: “यहोवाच्या साक्षीदारांबरोबर आम्ही बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा रफायलमध्ये बदल दिसू लागले. यहोवा त्याच्या राज्याद्वारे संपूर्ण पृथ्वीवरून दारिद्र्‌य आणि जुलूम कायमचे काढून टाकणार आहे हे आम्ही शिकलो. माझ्या प्रार्थनांचं मला उत्तरं मिळालं!” यहोवाच्या नियमांविषयी शिकल्यावर रफायलने पिणे सोडून दिले आणि ‘नवा मनुष्य’ धारण केला. (इफिसकर ४:२४) रफायल आणि कारमेनची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. रफायल म्हणतो: “आम्ही श्रीमंत नाही, आमचं स्वतःचं घरही नाही पण अंग झाकण्यापुरत्या कपड्यांत आणि टीचभर पोटाची खळगी भरण्यापुरती रोज मिळणाऱ्‍या चटणी भाकरीत आम्ही सुखी व तृप्त आहोत.”

सर्व प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल तेव्हा

प्रार्थना केल्यामुळे वर उल्लेखलेल्या लोकांना काही फायदा झाला का? निश्‍चितच झाला! तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? वर उल्लेखलेल्या लोकांच्या प्रार्थनांना तेव्हा उत्तर मिळाले जेव्हा ख्रिस्ती मंडळीतील बंधू किंवा भगिनीने या लोकांना बायबलचा अभ्यास करण्याद्वारे यहोवा देवाच्या जवळ येण्यास मदत केली.—प्रेषितांची कृत्ये ९:११.

यास्तव, प्रार्थना करण्यासाठी आपल्याकडे कारण आहे. देवाचे राज्य येवो आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही त्याच्या इच्छेप्रमाणे होवो, या प्रार्थनेचे फार लवकर, उत्तर दिले जाणार आहे. (मत्तय ६:१०) यहोवाचा विरोध करणाऱ्‍यांचा कायमचा नाश केल्यानंतर ‘पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल.’ (यशया ११:९) मग, यहोवावर प्रेम करणारे सर्व ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्‍त मुक्‍ततेचा’ आनंद लुटतील आणि त्यांच्या प्रार्थना जरूर ऐकल्या जातील.—रोमकर ८:१८-२१.

[७ पानांवरील चित्र]

आपण प्रार्थना का केली पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे का?