व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पेरुच्या आल्टीप्लेनोवर राज्य संदेशाचा प्रचार

पेरुच्या आल्टीप्लेनोवर राज्य संदेशाचा प्रचार

आपण विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहोत

पेरुच्या आल्टीप्लेनोवर राज्य संदेशाचा प्रचार

आल्टीप्लेनो हे पूर्व आणि पश्‍चिमेकडील ॲन्डीज पर्वतांच्या मधोमध अर्थात बोलिव्हिया आणि पेरूच्या सीमेवर आहे. आल्टीप्लेनो म्हणजे, “उंचवट्यावरील मैदान” किंवा “पठार.” आल्टीप्लेनोचा बराचसा भाग बोलिव्हियाच्या हद्दीत येतो.

आल्टीप्लेनोची रुंदी १०० किलोमीटर असून लांबी १००० किलोमीटर आहे. आणि त्याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून १२,००० फूट आहे. पेरूची समुद्रकिनाऱ्‍यावरील राजधानी लीमा येथून आल्टीप्लेनोकडे विमानाने जाताना, आपण एल मिस्टी या बर्फाच्छादित ज्वालामुखी पर्वतावरून जातो. हा पर्वत १९,१०१ फुटांच्या उंचीवर आहे. दूरवर, नेवाडो अम्पाटो आणि नेवाडो कोरोपुना ही २०,००० फूट उंचीची शिखरे दिसतात. मग अचानक एक विस्तीर्ण पठार नजरेस पडते. हेच दक्षिण पेरूचे आल्टीप्लेनो आहे.

आल्टीप्लेनोची राजधानी आहे प्युनो. हे शहर टिटिकाका सरोवराच्या वायव्य टोकावर आहे. टिटिकाका सरोवराशिवाय जगात दुसरे कोणतेच असे सरोवर नाही जे इतक्या उंचावर असूनही त्यात जहाज व होडी जाऊ शकतात. हा प्रदेश तीन किलोमीटरपेक्षा जास्त उंचावर असल्यामुळे पहिल्यांदाच येथे येणाऱ्‍यांना इथल्या विरळ हवेची सवय व्हायला वेळ लागतो. टिटिकाका सरोवराच्या काठी क्वेचुआ आणि आयमारा इंडियन जमातींचे लोक राहतात. हे आदिवासी लाल, हिरव्या किंवा निळ्या अशा विविध रंगांचे कपडे घालून त्यांच्या लहानलहान शेतांवर किंवा चाक्रांवर काम करताना दिसतात. पेरू देशात बोलली जाणारी मुख्य भाषा स्पॅनिश असली तरी आल्टीप्लेनो प्रदेशात क्वेचुआ आणि आयमारा या भाषा देखील बोलल्या जातात.

प्रचार कार्याची सुरवात

क्वेचुआ आणि आयमारा भाषा बोलणाऱ्‍या कित्येक नम्र व कष्टाळू लोकांनी बायबलचे अचूक ज्ञान घेतले आहे. या ठिकाणी खास पायनियर म्हणून कार्य करणाऱ्‍या पूर्णवेळ प्रचारकांच्या आवेशी प्रयत्नांवर यहोवाचा विपुल आशीर्वाद असल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

उदाहरणार्थ, टिटिकाका सरोवरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुटिना गावात होसे आणि सिलव्हिया यांना नेमण्यात आले. दोन महिन्यांच्या आत सिलव्हिया १६, तर होसे १४ बायबल अभ्यास चालवत होता. केवळ सहा महिन्यांत, मंडळीतील प्रचारकांची संख्या २३ वरून ४१ इतकी झाली. दरम्यान, सभेची उपस्थिती देखील ४८ पासून चक्क १३२ पर्यंत गेली.

होसे सांगतात, “अशा एकांत प्रदेशांतील मंडळ्यांत पहिल्यांदाच सभा आयोजित करताना आम्ही सहसा जाहीर भाषण आणि मंडळीचा पुस्तक अभ्यास या दोनच सभा ठेवतो. यामुळे नवीन लोकांना सभांना उपस्थित राहण्याची सवय करायला बरे पडते.”

पुटीनापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुनानी नावाच्या एका दुर्गम ठिकाणी दोन बहिणींनी पहिल्यांदाच सुवार्ता घोषणेचे कार्य केले. यांपैकी एक बहीण पायनियर होती. त्यांनी लुसियो * नावाच्या एका आंधळ्या माणसासोबत अभ्यास सुरू केला. या माणसाने मिगुएल या आपल्या भावालाही अभ्यासाला बोलावले. मिगुएल हा एक कॅथलिक मिशनरी आणि जवळच्याच एका खेड्यातला पुढारी देखील होता. त्याच्या एका मित्राने जेव्हा त्याला दर आठवडी मुनानी गावात जाण्याचे कारण विचारले, तेव्हा आपण यहोवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल शिकायला जातो असे त्याने सांगितले. तेव्हा कोणीतरी विचारले, “इथेच बायबल अभ्यास घेता येणार नाही का?” मिगुएलच्या खेड्यातल्या बऱ्‍याच जणांनी बायबल अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त केल्यामुळे लवकरच साक्षीदारांनी त्याठिकाणीही सभा सुरू केल्या.

मिगुएलने जे त्याला शिकायला मिळाले ते इतरांनाही सांगण्यास सुरवात केली. पण तो तर कॅथलिक मिशनरी आणि डेप्युटी गव्हर्नर देखील होता. खेड्यातल्या सर्व पुढाऱ्‍यांच्या एका सभेत, आपण कॅथलिक मिशनरी पदाचा राजीनामा देत असल्याची त्याने घोषणा केली. मग त्याच्या ठिकाणी दुसऱ्‍या कोणाला नेमण्यात आले का? उपस्थितांपैकी एकाने म्हटले: “आता तर आपण सत्य शिकत आहोत, मग नवीन मिशनऱ्‍याची काय गरज?” ही व्यक्‍ती यहोवाच्या साक्षीदारांकडून शिकायला मिळालेल्या सत्याबद्दल बोलत होती. मग दुसऱ्‍या एकाने म्हटले: “तुम्ही एकटेच कशाला राजीनामा देता? आम्ही सर्वच तुमच्यासोबत राजीनामा देतो. सर्वांचे काय म्हणणे आहे?” तेव्हा सभेला उपस्थित असलेल्या सर्वांनी एकसाथ जोराने म्हटले: “आम्ही सर्वजण राजीनामा द्यायला तयार आहोत!”

यानंतर अशाच एका सभेत मूर्तीपूजेविषयी आणि क्रॉसची उपासना करण्याविषयी चर्चा करण्यात आली. एकाने सर्वांना अनुवाद ७:२५ वाचायला सांगितले ज्यात असे म्हटले आहे: “त्यांच्या देवाच्या कोरीव मूर्ति तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारूप्याचा लोभ धरू नको व ते स्वतः करिता ठेवून घेऊ नको; घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्‍वर ह्‍याला त्याचा वीट आहे.”

मग त्या माणसाने सर्वांना विचारले, की सर्व मूर्ती जाळून टाकायला कोणकोण तयार आहेत. तेव्हा सर्वांनी लगेच हात वर केले. (प्रेषितांची कृत्ये १९:१९, २०) आज या खेड्यातल्या २५ कुटुंबांपैकी २३ कुटुंबे देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहेत. दोन जण बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक आहेत आणि पाच जोडप्यांनी यहोवा देवासमोर निर्दोष राहण्याच्या इच्छेने आपल्या लग्नाची कायदेशीर नोंदणी करण्याचे ठरवले आहे.—तीत ३:१; इब्री लोकांस १३:४.

कॅसेट्‌सच्या साहाय्याने अभ्यास

आल्टिप्लेनो येथे बरेच लोक अशिक्षित आहेत. त्यामुळे वॉचटावर संस्थेने प्रसिद्ध केलेले व्हिडियो आणि कॅसेट्‌स या क्षेत्रात अत्यंत उपयोगी पडतात. बांधव यांच्या साहाय्याने बायबल अभ्यास देखील चालवतात. डोरा नावाची एक खास पायनियर बहीण ऑडियो कॅसेटच्या साहाय्याने देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचा अभ्यास घेते. अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीला एक परिच्छेद ऐकायला देते आणि त्यानंतर त्यावर प्रश्‍न विचारते.

येथील स्थानिक आकाशवाणीवर क्वेचुआ भाषेत अपेक्षा माहितीपत्रकातील काही भाग नियमितपणे प्रक्षेपित केले जातात. तसेच स्पॅनिश भाषेतील सावध राहा! नियतकालिकाचे भाग देखील रेडियोवर ऐकवले जातात. यामुळे, यहोवाचे साक्षीदार जेव्हा लोकांच्या घरी जातात तेव्हा लोकांना त्यांच्याविषयी आधीच माहिती असते आणि बरेचजण अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्‍त करतात.

आल्टीप्लेनो जगापासून तर दूर आहे, पण देवाच्या नजरेतून मात्र ते लपलेले नाही. यहोवाचे सर्व मानवांवर प्रेम आहे. म्हणूनच ॲन्डीज पर्वतांच्या कुशीत लपलेल्या आल्टीप्लेनोवर राहणारे लोक देखील, खऱ्‍या उपासनेच्या वैभवी मंदिरात येऊन यहोवाच्या लाखो उपासकांसोबत त्याची स्तुती करत आहेत!—हाग्गय २:७.

[तळटीप]

^ परि. 10 या लेखात काही नावे बदलण्यात आली आहेत.