व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही”

“उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही”

जीवन कथा

“उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही”

हबर्ट जेर्न्‍निग्स यांच्याद्वारे कथित

“एकदा मी घानातील टेमा या बंदर-शहरापासून वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराकडे ट्रकने चाललो होतो. वाटेत, गावात जाणाऱ्‍या एका मनुष्याला मी लिफ्ट दिली. संधीचा फायदा घेऊन मी त्याला साक्ष देऊ लागलो. मला वाटलं मी खूपच चांगल्याप्रकारे त्याला सर्वकाही समजावून सांगितले. पण, गावात पोहंचल्यावर मात्र तो मनुष्य ट्रकमधून उडी टाकून अक्षरशः पळतच सुटला.”

या घटनेमुळे, माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले. त्याविषयी सांगण्याआधी कॅनडाचा रहिवासी असताना मी घानामध्ये कसा पोहंचलो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो.

सन १९४९ चा डिसेंबर महिना होता. कॅनडामधील टोरंटो शहराच्या उत्तरेकडील उपनगरात नवीनच बांधलेल्या एका घराला पाईप लाईन देण्याकरता आम्ही बर्फाळ जमीन सुमारे एक मीटर खोल खोदण्याचे काम नुकतेच संपवले होते. साहाजिकच आम्ही सगळेच कर्मचारी फार थकलो होतो. शिवाय, थंडीने काकडतही होतो. त्यामुळे आम्हाला घ्यायला येणाऱ्‍या ट्रकची वाट पाहत असताना आम्ही रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून शेकत बसलो होतो. बोलता बोलता अचानक आमच्यातला आर्नल्ड लॉर्टन नावाचा कर्मचारी आम्हाला अशा काही गोष्टी सांगू लागला ज्या पूर्वी कधीच आम्ही ऐकल्या नव्हत्या. जसे की, “युद्धे आणि युद्धांच्या बातम्या,” “या जगाचा अंत,” वगैरे वगैरे. त्यामुळे सगळे शांत झाले. काही जण पेचात पडले तर काहींना वाटले की हा काय सांगतोय. पण, मला आठवते त्यावेळी मी विचार केला: “कमालीची हिम्मत आहे बुवा याला.” कारण कोणीही त्याच्या बोलण्याला इतकी दाद देत नव्हते तरी तो आपला सांगतच होता. पण, तो जे काही सांगत होता त्याचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. आणि आमचे कुटुंब पिढ्या न्‌ पिढ्या पाळत आलेल्या क्रिस्टडेल्फिया धर्मात अशा गोष्टी मी कधीच ऐकल्या नव्हत्या. त्यामुळे तो जे काही सांगत होता ते मी लक्षपूर्वक ऐकत होतो.

अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने काही दिवसांतच मी पुन्हा आर्नल्डकडे गेलो. आज मागे वळून पाहताना समजते की १९ वर्षांच्या माझ्यासारख्या तरुणाशी आर्नल्ड आणि त्याची पत्नी, जीन किती सहनशीलतेने आणि प्रेमाने वागले. कित्येक वेळा त्यांच्याशी बोलण्याकरता मी न सांगता अचानकपणे त्यांच्या घरी टपकायचो. नैतिक मूल्यांची आणि नैतिक वर्तनाची अनेकानेक तारुण्यसुलभ प्रश्‍ने माझ्या मनाला भेडसावत होती. पण, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी मार्गी लागलो. रस्त्याच्या कडेला, शेकोटीपाशी आलेल्या त्या पहिल्या अनुभवानंतर दहा महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर २२, १९५० रोजी एक यहोवाचा साक्षीदार म्हणून माझा बाप्तिस्मा झाला आणि नॉर्थ यॉर्कमधील (सध्या टोरंटोचा भाग) विलोडेल मंडळीच्या सभांना मी उपस्थित राहू लागलो.

ख्रिस्ती बांधवांच्या सहवासाने प्रगती

मी एक नवीन धर्म स्वीकारला आहे हे माझ्या वडिलांनी ऐकले तेव्हा घरचे वातावरण अगदी तंग झाले. त्यातच काही दिवसांपूर्वीच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्‍या एकाने त्यांना धडक दिली होती. या अपघातामुळे त्यांचा स्वभाव फार चिडचिडा झाला होता. घरी आई, दोन भाऊ आणि दोन बहिणी कसेबसे दिवस काढत होते. मी स्वीकारलेल्या बायबल सत्यामुळे घरातले वातावरण अधिकाधिक तणावग्रस्त होऊ लागले. त्यामुळे आईवडिलांशी शांतीचे संबंध राखण्याकरता तसेच ‘सत्याच्या मार्गावर’ प्रगती करण्याकरता मी घर सोडण्याचे ठरवले.—२ पेत्र २:२.

सन १९५५ च्या उन्हाळ्यात मी अल्बर्टा प्रांतातील कोलमन येथल्या एका लहानशा मंडळीत आलो. येथे रॉस हंट आणि कीथ रॉबीन्स हे दोघे तरुण रेग्यूलर पायनियरिंग अर्थात पूर्ण-वेळचे प्रचार कार्य करत होते. त्यांनी मलाही या कार्याला वाहून घेण्याचे उत्तेजन दिले. आणि मार्च १, १९५२ रोजी मी सुद्धा एक रेग्यूलर पायनियर झालो.

त्यावेळी मिळालेले प्रोत्साहन आजही आठवले की मन सुखावून जाते. येथेच मला खूप काही शिकायला मिळाले आणि येथेच माझ्या क्षमतांची पारखही झाली. ॲल्बर्टा प्रांतातील लिथब्रिज मंडळीत वर्षभर पायनियरिंग केल्यानंतर मला एक ट्रॅव्हलिंग ओव्हरसियर (सर्किट ओव्हरसियर) म्हणून कार्य करण्याचे आमंत्रण मिळाले. खरं म्हणजे मी याची अपेक्षाच केली नव्हती. कॅनडाच्या पूर्व किनारपट्टीवरील मॉन्कटन, न्यू ब्रुन्सविकपासून गॅस्पे, क्विबेकपर्यंत विखुरलेल्या सर्व मंडळ्यांना भेटी देण्यासाठी मला नियुक्‍त केले होते.

त्यावेळी मी अवघ्या २४ वर्षांचा होतो. शिवाय, सत्यातही नवीन होतो. त्यामुळे हे कार्य करण्यास मला जरा संकोच वाटला. खासकरून ज्या मंडळ्यांमध्ये मी सेवा करणार होतो तिथले साक्षीदार माझ्याहून कितीतरी प्रौढ असल्यामुळे मला जास्त संकोच वाटू लागला. ही नेमणूक पार पाडण्याकरता पुढचे कित्येक महिने मी जीव ओतून प्रयत्न केले. नंतर मला आश्‍चर्याचा आणखीन एक सुखद धक्का बसला.

गिलियड स्कूल आणि गोल्ड कोस्टचा दौरा

सन १९५५ च्या सप्टेंबर महिन्यात सुमारे शंभर विद्यार्थ्यांसह मला साउथ लॅन्सिंग येथील वॉच टावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या २६ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले. पाच महिन्यांचे जोरदार प्रशिक्षण आणि गहन अभ्यास! यांचीच तर मला गरज होती. या उत्साही बंधू-भगिनींच्या सहवासात माझा उत्साह द्विगुणित झाला. त्या काळात आणखीन एक गोष्ट घडली ज्यामुळे आजपर्यंत मी फार आनंदी आहे.

मिशनरी सेवेची तयारी करणाऱ्‍या विद्यार्थ्यांमध्ये आयलीन स्टब्स नावाची एक तरुणीसुद्धा होती. आयलीनमध्ये मी अनेक चांगले गुण पाहिले. मनाचा स्थिरपणा, व्यावहारिकपणा, सुशील आणि एक आनंदी मनोवृत्ती. परंतु, मी मागचापुढचा विचार न करता थेट तिला मागणी घातली तेव्हा ती नक्कीच घाबरली असेल. पण, ती माझ्यापासून दूर पळाली नाही! आम्ही दोघांनी ठरवले, की सध्या आयलीन तिला नेमण्यात आलेल्या कॉस्टा रिकामध्ये आणि मी मला नेमण्यात आले होते तेथे, म्हणजे पश्‍चिम आफ्रिकेतील गोल्ड कोस्टमध्ये (सध्या घाना) जावे.

सन १९५६ च्या मे महिन्यात, एके दिवशी सकाळी मी ब्रुकलीन, न्यू यॉर्क येथील बंधू नेथन नॉर यांच्या दहाव्या मजल्यावरील ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळी ते वॉच टावर सोसायटीचे अध्यक्ष होते. गोल्ड कोस्ट, टोगोलँड (सध्या टोगो), आयव्हरी कोस्ट (सध्या कोत दिवॉर) अप्पर वॉल्टा (सध्या बुरकिना फासो), आणि गॅम्बिया या ठिकाणी होणाऱ्‍या प्रचाराच्या कार्याची देखरेख करण्याकरता मला एक ब्रांच सर्व्हंट (शाखा प्रतिनिधी) म्हणून ते नेमणार होते.

बंधू नॉरचे ते शब्द आजही माझ्या मनात इतके स्पष्ट आहेत जणू कालपरवाच ते माझ्याशी बोलले. ते मला म्हणाले: “तुला लगेच काम सुरू करण्याची काही गरज नाही. वाटेल तेवढा वेळ घे; इथल्या अनुभवी बांधवांकडून शिकून घे. तू तयार आहेस असे तुला वाटले, की तू ब्रांच सर्व्हंटचे कार्य सुरू करू शकतोस. . . . हे तुझे अपॉइन्टमेन्ट लेटर आहे. तिथे पोहंचल्यावर सात दिवसांनंतर कामाला सुरवात केली पाहिजे.”

‘फक्‍त सात दिवस,’ मी विचार केला. आणि मग “तुला वाटेल तेवढा वेळ घे” ‘याचं काय?’ मी अगदी सुन्‍न झालो होतो.

पुढचे काही दिवस भराभर निघून गेले. आणि काही दिवसांतच एका माल-वाहू जहाजातून माझा प्रवास सुरू झाला. मी जहाजाच्या कडेला उभा होतो. माझे जहाज सोसायटीच्या ब्रुकलीन ऑफिसच्या जवळील इस्ट रिव्हरमधून पुढे निघाले. अशाप्रकारे, गोल्ड कोस्टला जाण्याचा २१ दिवसांचा माझा समुद्र प्रवास सुरू झाला.

मी आणि आयलीन एकमेकांना नेहमी पत्र लिहित असू. पुढे १९५८ साली आमची पुन्हा भेट झाली आणि त्याच वर्षी ऑगस्ट २३ तारखेला आमचा विवाह झाला. मला एक उत्तम विवाहसोबती दिल्याबद्दल मी नेहमी यहोवाचे आभार मानतो.

तब्बल १९ वर्षे येथील इतर मिशनरींच्या आणि माझ्या आफ्रिकी बंधू-भगिनींच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचा सुहक्क मला लाभला. या काळात बेथेल परिवाराची झपाट्याने वाढ झाली. सुरवातीला हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच सदस्य तिथे होते. पण नंतर त्यांची संख्या २५ वर गेली. तो काळ आम्हा दोघांसाठी आव्हानात्मक, महत्त्वपूर्ण आणि फलदायक होता. पण, खरे सांगायचे तर तिथले उष्ण, दमट हवामान मला सहन होत नसे. मी सतत घामेजलेला असायचो. अगदी चिकचिक वाटायचे आणि त्यामुळे काही वेळा मी वैतागून जायचो. तरीसुद्धा, प्रचार कार्यात फार मजा यायची. घानातील साक्षीदारांची संख्या १९५६ साली ६,००० पासून १९७५ साली २१,००० इतकी वाढली. शिवाय, तिथे सध्या साक्षीदारांची संख्या ६०,००० झाल्यामुळे आमचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला.

अपेक्षा न केलेला “उद्याचा” दिवस

सन १९७० च्या सुमारास मला असे एक दुखणे सुरू झाले ज्याचे निदान करणे फार कठीण होते. सर्व तपासण्या केल्या तरी प्रत्येक वेळी मला हेच उत्तर मिळायचे: “तुम्हाला काहीही झालेलं नाही.” पण मला इतके आजाऱ्‍यासारखे, थकल्यासारखे किंवा अस्वस्थ का वाटत होते? दोन घटनांनी मला याची सूचना दिली. आणि मला जबरदस्त धक्का बसला. याकोबाने म्हटले त्याप्रमाणे: “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही.”—याकोब ४:१४, सुबोध भाषांतर.

पहिली घटना म्हणजे, गावात जाणाऱ्‍या तरुणाला मी लिफ्ट दिली आणि वाटेत त्याला साक्ष दिली ती घटना. त्या तरुणाशी मी न थांबता, जोरजोरात बडबडत होतो; इतकेच नाही तर माझ्या बोलण्यातला वेगही वाढतच होता. पण, मला त्याची जाणीवच झाली नाही. त्यामुळे गावात पोहंचल्यानंतर तो तरुण ट्रकमधून उडी टाकून पळत सुटला तेव्हा मी बघतच राहिलो. कारण तसे पाहिले तर घानाचे बहुतेक रहिवासी मुळातच शांत स्वभावाचे आहेत. कोणत्याही प्रसंगाला हसतमुखत सामोरे जातील असा त्यांचा स्वभाव. मग हा तरुण असे का वागला असावा? मी विचार करत बसलो. आणि कदाचित आपलेच काही तरी चुकले याची जाणीव मला झाली. नेमके काय चुकले ते मला समजत नव्हते. पण, काही तरी गडबड आहे याची पूर्ण खात्री मला पटली.

दुसरी गोष्ट म्हणजे, एकदा आयलीनने मला खूप खोदून खोदून काही प्रश्‍न विचारले आणि मला सुचवले की “हा शारीरिक रोग नसला तर कदाचित मानसिक रोग असेल.” म्हणून मग, मी काळजीपूर्वक माझी सर्व लक्षणे लिहून काढली आणि एका मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो. मी लिहिलेली लक्षणे त्याला वाचून दाखवली तेव्हा तो म्हणाला: “मॅनिक-डिप्रेसिव्ह सायकोसिस रुग्णामध्ये असतात ती सर्व लक्षणे तुमच्या केसमध्ये आहेत.”

हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच जणू सरकली. पुढच्या दोन वर्षांपर्यंत मी या आजाराला शर्थीने झुंज देत राहिलो. पण, माझी तब्येत सतत खालावत गेली. यावर कसाही करून मला उपचार करायचा होता. पण, काय करावे कुणालाही सुचत नव्हते. कित्येक दिवस मी या आजाराशी संघर्ष करत राहिलो. पण, सगळे काही व्यर्थ.

खरं म्हणजे उभे आयुष्य पूर्ण-वेळच्या सेवेत खर्च करण्याचा माझा आणि आयलीनचा मनोदय होता. शिवाय, आणखीन बरेच कार्य आम्हाला करायचे होते. त्यामुळे मी वारंवार कळकळीने यहोवाला प्रार्थना करायचो: “यहोवा तुझी इच्छा असेल तर मी ‘जगेल आणि असे करीन.’” (याकोब ४:१५) पण, ते शक्य नव्हते. त्यामुळे या कटू सत्याचा स्वीकार करून आम्ही जून १९७५ साली घाना देश आणि आमच्या अनेक जिवलग मित्रांना सोडून कॅनडात परतायचे ठरवले.

यहोवा आपल्या लोकांद्वारे मदत करतो

लवकरच माझ्या लक्षात आले, की माझ्यामुळे देवाचे कार्य काही थांबून राहणार नाही. शिवाय, मला याची देखील जाणीव झाली, की माझ्यासारखे आणखीन बरेच जण कोणत्या ना कोणत्या आजाराचे बळी आहेत. त्यावेळी १ पेत्र ५:९ या वचनातल्या शब्दांचा अर्थ मला पूर्णपणे समजला: “तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” या अनपेक्षित बदलांमध्ये देखील यहोवाने कशाप्रकारे आम्हा दोघांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले याची जाणीव मला झाली. आमच्या ‘बंधुवर्गाने’ अनेक मार्गांनी किती उत्कृष्टपणे आमची मदत केली!

आमची आर्थिक स्थिती बेताचीच होती. पण, यहोवाने कधीच आम्हाला वाऱ्‍यावर सोडले नाही. कारण आम्हाला आर्थिकरित्या आणि इतर मार्गांनी मदत करण्यास त्याने घानातील आमच्या बांधवांना प्रवृत्त केले. शेवटी, ज्यांच्यावर आम्ही मनस्वी प्रेम केले होते त्यांचा जड अंतःकरणांनी आम्ही निरोप घेतला. आणि त्या ‘उद्याच्या’ दिवसाचा सामना करण्यास निघालो जो अनपेक्षितपणे आमच्या जीवनात आला होता.

आयलीनची बहीण लिनोरा आणि तिचा पती ऑल्विन यांनी आम्हाला त्यांच्या घरी आसरा दिला. आणि कित्येक महिने आमचा सांभाळ केला. त्यांनी दाखवलेल्या उदारपणाबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. एका प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञाने मला आश्‍वासन दिले: “सहा महिन्यात तू ठणठणीत होशील.” कदाचित माझे मनोधैर्य उंचावण्यासाठी तो असे म्हणत असावा. पण, सहा वर्षं उलटून गेली तरी मी काही बरा झालो नाही. आजपर्यंत मी त्या आजाराशी झुंजत आहे. माझ्या या आजाराला आज बायपोलर मूड डिसऑडर असे म्हटले जाते. पण, या रोगाला बळी पडलेल्यांनाच माहीत आहे की एक सौम्य नाव देऊन दुखणे काही सौम्य होत नाही.

तेव्हापर्यंत बंधू नॉर देखील आजारी पडले आणि त्यातच जून १९७७ मध्ये ते वारले. स्वतः आजारी असूनही त्यांनी कितीतरी वेळा मला सांत्वन आणि सल्ला देणारी मोठमोठी, उत्तेजनात्मक पत्रे लिहिण्यासाठी वेळ आणि श्रम खर्च केले. ती सर्व पत्रे मी आजपर्यंत जपून ठेवली आहेत. त्यांच्या शब्दांनी माझ्यातील अपयशाची, पराजयाची भावना दूर करण्यास मदत केली.

माझ्या तब्येतीकडे जास्तीतजास्त लक्ष देण्याकरता १९७५ च्या अखेरीस आमच्या बहुमोल पूर्ण-वेळ सेवेचे सुहक्क आम्हाला सोडून द्यावे लागले. माझ्या डोळ्यांना दिवसाचा प्रकाश सहन होत नाही. एकाएकी मोठा आवाज आला की वाटते कोणी बंदुकीच्या गोळ्या झाडत आहे. लोकांच्या गर्दीत मी भयंकर अस्वस्थ होतो. त्यामुळे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे देखील माझ्यासाठी फार मोठा संघर्ष होता. पण, आपल्या आध्यात्मिक बंधू-भगिनींचा सहवास किती महत्त्वाचा आहे याची पूर्ण खात्री मला पटली होती. त्रास होऊ नये म्हणून मी सहसा सभा सुरू झाल्यानंतर म्हणजे सगळे आपापल्या जागी बसल्यानंतरच राज्य सभागृहात जात असे आणि सभा संपण्यापूर्वी म्हणजे सर्वजण आपापल्या जागेवरून उठण्याआधीच मी बाहेर पडत असे.

क्षेत्र सेवेत सहभाग घेणे हे माझ्यासाठी आणखीन एक आव्हान होते. कधी कधी तर घरोघरचे प्रचार कार्य करत असताना अगदी दारापाशी आल्यानंतरही दारावरची बेल वाजवण्याचे धैर्य होते नसे. पण, मी हार मानली नाही. कारण आपल्या सेवेमुळे आपले स्वतःचे आणि आपले ऐकणाऱ्‍यांचेही तारण होणार आहे याची जाणीव मला होती. (१ तीमथ्य ४:१६) काही वेळानंतर मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून दुसऱ्‍या दारात जायचो आणि पुन्हा प्रयत्न करायचो. क्षेत्र सेवेत सतत सहभाग घेतल्यामुळे मी आध्यात्मिकरित्या निरोगी राहून माझ्या समस्येचा अधिक चांगल्याप्रकारे सामना करू शकलो.

बायपोलर मूड डिसऑडर एक रोग असाध्य असल्यामुळे या व्यवस्थिकरणात तरी हा रोग माझा पिच्छा सोडणार नाही याची जाणीव मला झाली. या डिसऑडरविषयी १९८१ साली सावध राहा! * मासिकात एक उत्कृष्ट लेखमाला छापून आली होती. त्या लेखांमुळे माझ्या आजाराचे स्वरूप मला अधिक चांगल्याप्रकारे समजले. तसेच, त्याचा सामना करण्याच्या अधिक परिणामकारक पद्धती देखील मी शिकलो.

तोंड देण्यास शिकणे

या सबंध काळादरम्यान माझ्या पत्नीने अनेक त्याग आणि तडजोडी केल्या. तिच्यासारखे तुम्ही देखील कुणाची अशीच काळजी घेत असाल तर तुम्हाला आयलीनचे म्हणणे समजेल. ती म्हणते:

“मूड डिसऑडरने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या स्वभावात कधीही अचानक बदल होतो. कधी कधी रुग्ण अतिशय आनंदी आणि उत्साहपूर्ण असतो, त्याच्या मनात नवनवीन योजना आणि कल्पना येतात. तर काही तासांतच तो लगेच थकतो, चिडचिडा होतो; इतकेच नाही तर क्रोधित होतो. हा एक आजार आहे हे स्वीकारले नाही तर त्यामुळे इतरजण चिडतील आणि असे का होत आहे त्याचे कारण त्यांना समजणार नाही. अशा वेळी तुम्हाला लगेच तुमच्या योजना बदलाव्या लागतात; आणि निराशेच्या आणि उपेक्षितपणाच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.”

आता पुन्हा माझ्याबाबतीत बोलायचे तर मला खूप बरे वाटते तेव्हा मला भीती वाटू लागते. कारण या ‘उत्साहानंतर’ पुन्हा मला ‘डिप्रेशन’ येणार हे मला माहीत असते. तेव्हा, उत्साहापेक्षा ते डिप्रेशनच बरे असे वाटू लागते. कारण मग मी बरेच दिवस हालचाल करू शकत नाही आणि त्यामुळे माझ्याकडून काही विचित्र घडण्याची शक्यता कमी असते. मी जास्त उत्साही होऊ लागलो की आयलीन लगेच मला सावध करते. तसेच, मी घोर निराशेत बुडून जातो तेव्हा ती माझे सांत्वन करते, मला उत्तेजन देते.

हा आजार खूपच जोर धरतो तेव्हा सर्व काही दूर सारून स्वतःत मग्न होण्याची भीती असते. रुग्ण निराशेच्या गर्तेत जातो तेव्हा त्याला एकांत प्रिय वाटू लागतो. तर अति उत्तेजित अवस्थेत गेल्यानंतर इतरांच्या भावनांकडे तो दुर्लक्ष करतो. मी असे विचित्र वागायचो तेव्हा, हे माझ्या रोगामुळे होत आहे हे स्वीकारणे मला फार कठीण जायचे. मला वाटायचे की काही बाह्‍य समस्येमुळे जसे की माझे काही काम नीट न झाल्यामुळे किंवा कोणा दुसऱ्‍याच्या वागण्यामुळे असे होत असावे. हा माझ्यासाठी फार मोठा संघर्ष होता. पण, वेळोवेळी मला स्वतःला याची आठवण करून द्यावी लागत असे, की ‘माझ्या अवतीभोवती सर्व काही ठीकठाक आहे. माझी समस्या बाह्‍य नव्हे, आंतरिक आहे.’ हळू हळू माझ्या विचारसरणीत बदल घडून आला.

कालांतराने आम्ही दोघेही माझ्या या आजाराबद्दल एकमेकांसोबत तसेच इतरांसोबत उघडपणे स्पष्ट आणि खरे बोलण्यास शिकलो. या आजाराला आमच्या जीवनातला सर्वात प्रमुख भाग न बनू देता एक सकारात्मक मनोवृत्ती राखण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

एक सुखावह “उद्या”

कळकळीच्या प्रार्थना आणि अनेक संघर्ष करून आम्ही यहोवाचे आशीर्वाद आणि मदत अनुभवली आहे. आज आम्ही दोघेही वयोवृद्ध झालो आहोत. मला नियमितपणे डॉक्टरांकडे जावे लागते. सध्या खूप नाही तरी काही प्रमाणात औषधे चालूच आहेत. आता माझी तब्येत बऱ्‍यापैकी आहे. यहोवाच्या सेवेत आम्हाला जे सुहक्क मिळतात त्यांची आम्ही मनस्वी कदर करतो. अजूनही मंडळीत एक ख्रिस्ती वडील म्हणून मी सेवा करत आहे. आणि विश्‍वासू बंधू-भगिनींना होईल तितके पाठबळ आणि उत्तेजन देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

याकोब ४:१४ (सुबोध भाषांतर) मधले शब्द किती खरे आहेत: “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही.” नवीन जग येईपर्यंत असेच होत राहील. पण, याकोब १:१२ चे शब्द देखील तितकेच खरे आहेत: “जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीति करणाऱ्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.” तेव्हा, आपण सर्वजण विश्‍वासात अढळ राहू आणि उद्या अर्थात भविष्यात यहोवाच्या अमाप आशीर्वादांचा अनुभव घेत राहू.

[तळटीप]

^ परि. 35 सावध राहा! ऑगस्ट ८, १९८१ (इंग्रजी) अंकातील “तुम्ही जीवनाचा सामना करू शकता?;” सप्टेंबर ८, १९८१ (इंग्रजी) “तुम्ही नैराश्‍याचा सामना कसा करू शकता? आणि ऑक्टोबर २२, १९८१ (इंग्रजी) “गंभीर नैराश्‍येशी संघर्ष करणे.”

[२६ पानांवरील चित्र]

माझ्या आर्ट स्टुडिओच्या एकांतात

[२६ पानांवरील चित्र]

माझी पत्नी आयलीनसह

[२८ पानांवरील चित्र]

घानातील टेमा शहरात १९६३ साली झालेल्या “एव्हर्लास्टिंग गुड न्यूज” संमेलनात