व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाचे पाठ्यपुस्तक बायबल

जीवनाचे पाठ्यपुस्तक बायबल

जीवनाचे पाठ्यपुस्तक बायबल

“देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, . . . मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचे हे वर्णन दाखवते की बायबल फक्‍त सुविचारांचे पुस्तक नाही.

एका धार्मिक लेखकाने थोडक्यात त्याचे वर्णन अशा शब्दांत केले: “बायबलमधील संदेश श्‍वासोच्छ्‌वासाइतकाच आपल्या जीवनासाठी महत्त्वाचा आहे.” ते असेही म्हणाले: “बरे होण्याची आपली उत्कट इच्छा आणि गरज लक्षात घेऊन आपण बायबल वाचले तर आश्‍चर्यकारक परिणाम मिळू शकतात.” दिव्याचा प्रकाश जसा सगळीकडे पडतो तसेच बायबलही हल्लीच्या आधुनिक जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्‍नांवर आणि समस्यांवर प्रकाश टाकते.—स्तोत्र ११९:१०५.

बायबलमधील बुद्धी आपल्या विचारसरणीला आकार देण्यास, आपल्या समस्या सोडवण्यास, आपले जीवन सुधारण्यास आणि आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी आपल्याला भक्कम करण्यास समर्थ आहे. त्या शिवाय, बायबलच्या मदतीने आपण देवाविषयी जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यावर प्रीती करू शकतो.

जीवनाला उद्देश देणारे पुस्तक

बायबलचा लेखक, यहोवा देव याला आपल्या “एकंदर वर्तनक्रमाची माहिती” आहे. आपल्यापेक्षा त्यालाच आपल्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजांविषयी जास्त माहीत आहे. (स्तोत्र १३९:१-३) त्याने सगळा विचार करूनच मानवी वर्तनासाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. (मीखा ६:८) त्या मर्यादा आणि सूचना समजून घेण्यात आणि त्यांच्यानुसार जगण्यातच आपले भले आहे. स्तोत्रकर्ता म्हणाला की, जो “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो” तो धन्य. “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:१-३) असे असेल तर मग, याचे परीक्षण आपण केलेच पाहिजे.

बायबल हे ऐतिहासिक आणि साहित्यिकदृष्ट्या मोलाचे पुस्तक आहे असे मॉरिस नावाचे एक निवृत्त झालेले शिक्षक मान्य करत होते, परंतु ते ईश्‍वराच्या प्रेरणेने लिहिलेले आहे याबद्दल त्यांना शंका होती. देवाने आपले लिखित वचन मानवांना का दिले हे मॉरिस यांना समजावून सांगण्यात आले तेव्हा त्यांनी बायबलमधील वेगवेगळ्या भविष्यवाण्यांचे परीक्षण केले. तरुणपणी त्यांनी प्राचीन इतिहास, साहित्य, विज्ञान आणि भूगोल यांचा अभ्यास केला होता. त्यांनी कबूल केले की, ते स्वतःला फार शहाणे समजत असल्यामुळे बायबलची सत्यता पटवणारी अनेक उदाहरणे ते मान्य करायला तयार नव्हते. ते म्हणतात की, “मी ऐषाराम, पैसा आणि सुखचैन मिळवण्याच्या मागे लागलो होतो. त्यामुळे या महान पुस्तकाची सुंदरता आणि सत्यता मी लवकर समजू शकलो नाही.”

आता मॉरिस आपल्या सत्तरीत आहेत. प्रेषित थोमाला येशू प्रकट झाला होता त्या घटनेचा उल्लेख करत ते प्रशंसेच्या स्वरात म्हणतात: “मी ‘रक्‍ताने भरलेली जखम’ स्वतः हात लावून पाहिली आहे; आता बायबलविषयी कोणतीही शंका माझ्या मनात राहिली नाही. ते सत्य पुस्तक आहे अशी खात्री मला पटली आहे.” (योहान २०:२४-२९) प्रेषित पौलाने उचितपणे म्हटल्यानुसार, बायबल, हृदयात काय आहे ते दाखवून जीवनाला अर्थ देते. ते जीवनाचे पाठ्यपुस्तक आहे.

समस्यायुक्‍त जीवनाला स्थिरता

वाईट सवयी सुटण्यासाठीही बायबल लोकांना मदतदायी सूचना देते. डॅनियलने बायबलच्याच साहाय्याने धूम्रपानाची वाईट सवय सोडली, बेबंद नाच-गाणे चालत असलेल्या पार्ट्या बंद केल्या आणि दारू पिणे सोडले. (रोमकर १३:१३; २ करिंथकर ७:१; गलतीकाकर ५:१९-२१) वास्तविक पाहता, अशा सवयी सोडून “नवा मनुष्य धारण” करायला फार प्रयत्न करावा लागतो. (इफिसकर ४:२२-२४) डॅनियल म्हणतो, “हे एक आव्हान आहे कारण आपण अपरिपूर्ण आहोत.” तरीपण त्याने बदल केले. आता डॅनियल दररोज देवाचे वचन वाचतो. यामुळे यहोवासोबत जवळचा नातेसंबंध ठेवायला त्याला मदत मिळते.

पूर्वी डॅनियलने एकदाही बायबल वाचले नव्हते; तरीही त्याला लहानपणापासूनच बायबलबद्दल आदर होता. तो दररोज देवाला प्रार्थना करायचा. पण कशाची तरी कमी त्याला भासत होती. तो कधीच समाधानी नव्हता. मग, बायबलमध्ये पहिल्यांदा देवाचे नाव पाहिल्यानंतर त्याचे संपूर्ण जीवन बदलून गेले. (निर्गम ६:३; स्तोत्र ८३:१८) तेव्हापासून तो प्रार्थना करताना यहोवा हे नाव वापरू लागला. त्यामुळे, आपण कोणा व्यक्‍तीशी बोलत आहोत असे त्याला वाटू लागले. तो म्हणतो, “यहोवा माझ्यासाठी सर्वात जवळची व्यक्‍ती बनली आणि अजूनही यहोवा माझा सर्वात जवळचा मित्र आहे.”

बायबल शिकण्याआधी डॅनियलला भविष्याविषयी फारशी आशा वाटत नव्हती. तो म्हणतो, “अगदी लहान मुलालाही जगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतेय हे सांगता येईल. मला तर सारखी भीती वाटायची म्हणून मी त्याचा विचारच करायचं सोडून दिलं.” मग त्याला समजले की, देव या पृथ्वीवरील दुष्टाई काढून सर्वांसाठी एक अशी परिस्थिती निर्माण करील जेथे न्याय असेल व आज्ञाधारक मानव सर्वकाळासाठी शांतीने आणि आनंदाने जगतील. (स्तोत्र ३७:१०, ११; दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:३, ४) आज डॅनियलकडे भविष्याविषयी पक्की आशा आहे. बायबलने त्याच्या जीवनात स्थिरता आणल्यामुळे जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला त्याला मदत मिळाली आहे.

भावनिक समस्यांसाठी मदत

जॉर्जची आई वारली तेव्हा तो फक्‍त सात वर्षांचा होता. तेव्हापासून, रात्र झाली की त्याला झोप लागायची नाही. झोपल्यावर दुसऱ्‍या दिवशी आपण उठू की नाही अशी भीती त्याला वाटायची. मग एकदा, त्याने येशूचे हे शब्द वाचले: “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” येशूने हे मृत्यू आणि पुनरुत्थानासंबंधी म्हटले होते. तसेच, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल” हे येशूचे शब्द देखील त्याला स्पर्शून गेले. (योहान ५:२८, २९; ११:२५) ते वाचल्यावर त्यात तथ्य आहे असे त्याला वाटले. तसेच त्याला सांत्वन देखील मिळाले. जॉर्ज म्हणतो, “हे सत्य फक्‍त मनाला समाधान देत नाही तर हृदयालाही स्पर्शून जाते.”

डॅनियलला (सुरवातीला ज्याचा उल्लेख केला आहे) देखील भीती वाटायची. त्याच्या घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे तो दुसऱ्‍यांच्या घरी राहत असे. अशी अनेक घरे त्याने बदलली. त्यामुळे त्याने आपलेपणा कधी अनुभवलाच नाही. त्याला स्वतःच्या कुटुंबात, सुरक्षित वातावरणात राहायची फार इच्छा होती. हे बायबल अभ्यासाद्वारे शक्य झाले. डॅनियल यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीसोबत सहवास ठेवू लागला आणि तो एका आध्यात्मिक कुटुंबाचा सदस्य बनला. तेथे त्याला आपलेपणा आणि जिव्हाळा मिळाला. खरोखरच, बायबलमधील सल्ला दैनंदिन जीवनातही उपयुक्‍त ठरतो आणि त्यामुळे आपल्या मनालाही समाधान मिळते.

आपल्या मनात काय आहे, आपल्याला कशाची गरज आहे हे सर्व यहोवा जाणतो हे आपण कधीही विसरता कामा नये. देव “अंतःकरणे तोलून” पाहतो आणि “ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ” देतो.—नीतिसूत्रे २१:२; यिर्मया १७:१०.

कौटुंबिक जीवनासाठी उपयुक्‍त सल्ला

मानवी संबंधांमध्ये लागू होणारा सल्ला देखील बायबलमध्ये दिला आहे. जॉर्ज म्हणतो: “आपले एकमेकांशी पटत नाही किंवा गैरसमज होतात तेव्हा खूप तणाव वाढतो.” अशा वेळी, जॉर्ज काय करतो? तो म्हणतो: “कोणी माझ्यावर चिडलेलं असेल तर मी लगेच मत्तय ५:२३, २४ मधला सल्ला लागू करतो: ‘आपल्या भावाबरोबर समेट कर.’ एकमेकांशी बातचीत केल्यावर समस्या आपोआप सुटते. अशा वेळी, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या शांतीचा अनुभव मला येतो. बायबलमधला सल्ला खरोखरच परिणामकारक आणि उपयुक्‍त आहे.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

पती-पत्नींमध्ये मतभेद होतात तेव्हा दोघांनी ‘ऐकण्यास तत्पर, बोलावयास धीमे, रागास मंद’ असावे. (याकोब १:१९) हा सल्ला लागू केला तर आपसांत दळणवळण राहते. जॉर्ज म्हणतो: “आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि आपलेच शरीर आहे असे तिला समजावे, हा सल्ला लागू केल्यावर मला लगेच फरक दिसून येतो. मग पत्नीला माझा आदर करायला सोपं जातं.” (इफिसकर ५:२८-३३) होय, आपल्या चुका मान्य करून त्या कशा सुधाराव्यात आणि इतरांकडून चुका घडतात तेव्हा कसे वागावे याविषयी बायबलमध्ये सांगितले आहे.

कोणत्याही काळात लागू होणारा सल्ला

सुज्ञ शलमोन राजा म्हणाला: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) हे शब्द किती साधे-सरळ आणि तरीही किती अर्थभरीत आहेत!

बायबलमध्ये लोकांचे भले घडवून आणण्याची शक्‍ती आहे. ते देवावर प्रेम करणाऱ्‍यांना त्याच्या इच्छेनुसार वागायला आणि ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यात’ आनंद मिळवायला मदत करते. (स्तोत्र ११९:१) आपली परिस्थिती कशीही असली तरी बायबलमधील सल्ला-सूचना आपल्याला लागू होतात. (यशया ४८:१७, १८) म्हणून बायबलचे दररोज वाचन करावे, वाचलेल्या गोष्टींवर चिंतन करावे आणि त्या गोष्टी आपल्या जीवनात लागू कराव्यात. अशाने मन स्वच्छ, शुद्ध व हितकर गोष्टींवर केंद्रीत राहील. (फिलिप्पैकर ४:८, ९) मग तुम्हाला जीवन जगण्याचा व जीवनाचा आनंद घेण्याचा अनुभव तर येईलच पण त्याचसोबत जीवनदात्या निर्माणकर्त्याबद्दल तुमचे प्रेमही वाढेल.

अशारीतीने जीवन जगल्यास, इतर करोडो लोकांप्रमाणे तुम्हालाही बायबल फक्‍त सुविचारांचे पुस्तक वाटणार नाही. तर तुमच्याकरता ते जीवनाचे पाठ्यपुस्तक बनेल!

[६ पानांवरील चित्र]

बायबलच्या साहाय्याने हानीकारक सवयींवर मात करण्याचा निर्धार आणखी पक्का होऊ शकतो

[७ पानांवरील चित्र]

देवाशी घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करण्याविषयी बायबलमध्ये शिकवले आहे