व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला मित्र बनवायचेत का?

तुम्हाला मित्र बनवायचेत का?

तुम्हाला मित्र बनवायचेत का?

“एक जिवाभावाचा मित्र लाभल्यास आयुष्यात फार काही मिळाल्यासारखं वाटतं; दोन मिळाले तर सर्व काही भरून पावल्यासारखं वाटतं; पण, तीन मिळाले तर? खरं म्हणजे तीन मित्र मिळणं जवळजवळ अशक्यच.”—हेन्री ब्रूक्स ॲडम्स.

यावरून जगात खरे मित्र किती कमी आहेत याची कल्पना येते. आपण बरेचदा लोकांना असे म्हणताना ऐकतो: “कुणाकडं मन मोकळं करणार?” “माझा कुणावरही भरवसा राहिला नाही” किंवा मग “माझा कुत्राच माझा सगळ्यात चांगला मित्र आहे.” मैत्रीसाठी आसुसलेल्या आणि एकाकी जीवन जगणाऱ्‍या लोकांच्या तोंडून बहुधा अशा व्यथा ऐकायला मिळतात.

खरी मैत्री करणे आणि ती टिकवून ठेवणे वाटते तितके सोपे नाही. एका सर्व्हेवरून लक्षात येते की “अमेरिकेत २५ टक्के लोकांना ‘बऱ्‍याच काळापासून भयाण एकाकीपणाने’ ग्रासले आहे. . . . तर फ्रांसमध्ये निम्म्याअधिक लोकांना एकाकीपणा खायला उठतो.” सध्या झपाट्याने वाढणाऱ्‍या डेटिंग क्लब्स आणि कंप्युटर चॅट रूम्सवरून, तसेच वर्तमानपत्रात सोबती मिळवण्याकरता दिलेल्या जाहिरातींमधील बेसुमार वाढीवरून समजते की लोक मैत्रीसाठी खरोखरच फार आसुसले आहेत.

न्यूरोसायकोलॉजिस्ट डॉ. डेव्हिड वीक्स यांच्या मते एकाकीपणाचा केवळ मनावरच नाही तर लोकांच्या शरीरावरही दुष्परिणाम होतो. माझ्याकडे असे बरेच रुग्ण येतात ज्यांना कमालीच्या चिंतेने आणि डिप्रेशनने (निराशा) ग्रासले आहे. डिप्रेशनचा आणि एकाकीपणाचा फार जवळचा संबंध असल्यामुळे ते एकाकीपणाचे शिकार आहेत असे म्हणता येईल..

घटस्फोट आणि विस्कटलेली कुटुंबे यांमुळे आजकाल अनेकांपुढे एकाकी जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही. ब्रिटनमध्ये घेतलेल्या एका सर्व्हेवरून असे दिसून आले की २१ व्या शतकाच्या सुरवातीला देशातील जवळजवळ ३० टक्के लोक एकाकी जीवन जगत असतील.

“शेवटल्या काळी” लोकांमध्ये स्वार्थीपणा दिसून येईल हे परमेश्‍वराच्या प्रेरणेने लिहिलेल्या एका ग्रंथाने आधीच भाकीत केले होते. (२ तीमथ्य ३:१-५) आजकाल लोकांना इतरांचे प्रेम, चांगले नातेसंबंध यांपेक्षा बंगला-गाडी, नोकरी-धंदा, पैसा-पाणी मिळवणे सगळ्यात महत्त्वाचे वाटते आणि यातच बहुतेक जण गुंग असतात. लेखक ॲन्थनी स्टोर यांनी म्हटले: “आपल्या बायकामुलांऐवजी त्यांचे आपल्या नोकरी-धंद्यावरच जास्त प्रेम आहे.”

खरे मित्र अमूल्य आहेत

तुमचे जीवन कितपत आनंदी आहे हे बऱ्‍याच प्रमाणात तुमच्या मित्र-परिवारावर अवलंबून असते. स्वतःसाठी जगणारे लोक सहसा आनंदी नसतात. कारण मन मोकळे करण्यासाठी किंवा आपले विचार अथवा इतर गोष्टी वाटून घेण्यासाठी त्यांना जवळचा असा कोणीच नसतो. येशू ख्रिस्ताचे हे शब्द किती खरे आहेत: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता [“आनंद,”NW] आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) याला दुजोरा देत जॉर्ज बायरन या इंग्रजी कवीने म्हटले: “ज्याला आनंद हवाय, त्याने आधी इतरांना आनंद द्यावा.”

मग, मित्र कुणाला म्हणता येईल? एका शब्दकोशानुसार, “प्रेमाच्या आणि आदराच्या बंधनात एखाद्याशी बांधलेल्या” व्यक्‍तीला मित्र म्हणतात. खरा मित्र तुमच्या विचारांना योग्य दिशा देतो; संकटात तुमचे साहाय्य करतो, तुम्हाला सांत्वन आणि उत्तेजन देतो. तुम्ही दुःखी होता तेव्हा तोही दुःखी होतो. शलमोन राजाने म्हटले त्याप्रमाणे: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) कालांतराने धन-दौलतीचे मोल कमी होते तसे मैत्रीच्या बाबतीत होत नाही. उलट, खरी मैत्री दिवसेंदिवस बहरत राहते आणि तिचे मोलही निरंतर वाढत जाते.

बायबल ख्रिश्‍चनांना आपली ‘अंतःकरणे विशाल’ करण्यास सांगते. (२ करिंथकर ६:१३) इतरांशी मैत्री करण्याकरता स्वतः पुढाकार घेतल्यास अनेक फायदे होऊ शकतात. उपदेशक ११:१, २ म्हणते: “आपले अन्‍न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. तू सातआठ जणास वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही.” मैत्रीच्या बाबतीत हा सिद्धान्त कसा लागू होतो? तुम्ही अनेकांशी मैत्री केली तर संकटप्रसंगी यांपैकी काहीजण नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील.

खरे मित्र आणखीन एका अर्थाने तुमचे संरक्षण करतात. “मित्राने केलेले घाय खऱ्‍या प्रेमाचे आहेत” असे नीतिसूत्रे २७:६ म्हणते. याचा अर्थ अनेकजण तुमची वरवर स्तुती करत असले तरी केवळ खरे मित्रच तुमच्या भल्याचा विचार करतील, आणि तुमचे कुठे चुकत असेल तर ते प्रेमळपणे तुमच्या लक्षात आणून देतील. इतकेच नाही तर तुम्हाला लाभदायक ठरेल असा सल्ला व मार्गदर्शनसुद्धा देतील.—नीतिसूत्रे २८:२३.

चांगला प्रभाव पाडणारे जिवलग मित्र एखाद्या दुर्मिळ भेटीसारखे आहेत. प्रेषितांची कृत्ये याच्या १० व्या अध्यायात आपण कर्नेल्याच्या जीवनातली एक घटना वाचतो. तो एक रोमी लष्करी अधिकारी होता. देवाने त्याच्या प्रार्थना ऐकल्या आहेत असे एक देवदूत त्याला येऊन सांगतो. प्रेषित पेत्र आपल्याला भेटायला येणार या अपेक्षेने कर्नेल्य ‘आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवतो.’ कर्नेल्याच्या या जिवलग मित्रांना किती आशीर्वाद मिळाले त्याचा विचार करा: सुवार्तेचा स्वीकार करणारे ते पहिले बेसुनत परराष्ट्रीय होते. आणि देवाच्या राज्यात ख्रिस्तासोबत राज्य करण्याच्या आशेने पवित्र आत्म्याने त्यांचा अभिषेक झाला. किती हा मोठा विशेषाधिकार!—प्रेषितांची कृत्ये १०:२४, ४४.

पण, प्रश्‍न आहे की तुम्हाला मैत्री कशी करता येईल? मैत्रीविषयी सविस्तर माहिती देणारे पुस्तक अर्थात बायबल यासंबंधी व्यावहारिक उत्तर आणि उपयुक्‍त सल्ला देते. (खाली दिलेली पेटी पाहा.)

खरे मित्र कुठे मिळतील

ख्रिस्ती मंडळी असे एक स्थान आहे जिथे तुम्हाला खरे आणि जिवाभावाचे मित्र मिळू शकतात. पण, त्या आधी आपला सृष्टीकर्ता आणि स्वर्गीय पिता यहोवाशी व आपला उद्धारकर्ता येशू ख्रिस्ताशी प्रथम तुम्ही मैत्री केली पाहिजे. मैत्रीसाठी सदैव पुढाकार घेणारा येशू म्हणतो: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१३, १५) तुम्ही यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याशी एक जवळचा नातेसंबंध जोडल्यास ‘सार्वकालिक वस्तीत ते तुमचा स्वीकार करतील’ याची खात्री तुम्हाला होईल. होय, यहोवा देव आणि येशू ख्रिस्तासोबतची घनिष्ठ मैत्री तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळवून देईल.—लूक १६:९; योहान १७:३.

पण, तुम्हाला त्यांच्याशी मैत्री कशी करता येईल? एक मित्र म्हणून यहोवाच्या मंडपात वस्ती करण्यासाठी काय करणे जरूरीचे आहे ते स्तोत्र १५ मध्ये सांगितले आहे. आपले बायबल उघडून स्तोत्र १५ अध्यायातील पाचही वचने वाचा. याशिवाय, येशू ख्रिस्ताने म्हटले: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.”—योहान १५:१४.

होय, देवाचे वचन, बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करून आणि शिकलेल्या गोष्टींप्रमाणे कार्य करून तुम्हाला यहोवा आणि येशू यांच्याशी निकटचा नातेसंबंध जोडायची इच्छा आहे हेच तुम्ही दाखवून देता. पण, त्याकरता ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. कारण तिथे यहोवा देवाचे ज्ञान आपल्याला मिळते. तसेच, यहोवाची वचने लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे तुम्ही नक्कीच यहोवाच्या आणि त्याच्या पुत्राच्या निकट याल.

ख्रिस्ती सभांमध्ये तुमची अशा लोकांशी ओळख होऊ शकते जे यहोवावर प्रेम करतात आणि आपल्या जीवनात “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” ही आत्म्याची फळे दाखवून देतात. (गलतीकर ५:२२, २३) एकाकीपणा घालवून मैत्री करण्याची तुमची खरोखर इच्छा असल्यास दर आठवडी होणाऱ्‍या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहा. त्यामुळे देवाच्या आनंदी लोकांसोबत मैत्री करण्यासाठी तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी याल. शिवाय, तिथे तुम्हाला जिवाभावाचे मित्र मिळतील, जे कधीही तुम्हाला अंतर देणार नाहीत.

अतूट मैत्री

खरी मैत्री ही यहोवा देवाकडून मिळालेली एक उत्कृष्ट भेट आहे. खऱ्‍या मैत्रीचा उगम यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वातून, त्याच्या स्वभावातूनच होतो. आपल्या प्रेमळ आणि उदार आत्म्यामुळेच त्याने सबंध पृथ्वीवर बुद्धिमान मानवांची निर्मिती केली आहे ज्यांच्यासोबत तुम्ही मैत्री करू शकता. तेव्हा, ख्रिस्ती बंधू-भगिनींशी सहवास राखा, त्यांना उत्तेजन द्या, त्यांच्यासह क्षेत्रात कार्य करा, त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. असे करून तुम्ही खरे तर यहोवाचे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत असाल.

मैत्रीची ही भेट तुम्ही एकमेकांना देऊ शकता. लवकरच अशी एक वेळ येणार आहे जेव्हा तुम्हाला तुमचा मित्र-परिवार वाढवण्याची सुसंधी मिळेल. त्यावेळी तुम्ही एका-दोघांशी नव्हे तर सध्या जिवंत असलेल्या लाखो लोकांशी, तसेच भविष्यात ‘मरण नसेल’ तेव्हा मृतावस्थेतून जिवंत होऊन येणाऱ्‍या असंख्य लोकांशी मैत्री करू शकाल. (प्रकटीकरण २१:४; योहान ५:२८, २९) तेव्हा, आताच मैत्री करण्यास शिका. आणि विशेषकरून यहोवा देवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांशी मैत्री करा. देवाच्या पवित्र वचनाकडे लक्ष देऊन यहोवा देवासोबत आणि येशू ख्रिस्तासोबत मैत्री जोडा. असे केल्यास पुन्हा कधीच एकाकीपणा तुम्हाला खायला उठवणार नाही.

[२२, २३ पानांवरील चौकट/चित्रे]

टिकाऊ मैत्रीकरता सहा मुद्दे

१. मैत्रीचा हात पुढे करा. अब्राहामाच्या अढळ विश्‍वासामुळे आणि त्याचे मनापासून देवावर प्रेम असल्यामुळे त्याला “देवाचा मित्र” म्हटले होते. (याकोब २:२३; २ इतिहास २०:७) मैत्री करण्यासाठी त्याने पुढाकार घेऊन आपल्या भावना यहोवा देवाकडे व्यक्‍त केल्या. (उत्पत्ति १८:२०-३३) होय, तुम्हाला एखाद्याची मैत्री हवी असेल तर त्याकरता तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. येशूने म्हटले: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल.” (लूक ६:३८) उत्तेजनपर शब्दांनी आणि मदत केल्याने गाढ मैत्रीचे बीज पेरले जाते आणि पुढे ही घनिष्ट मैत्री बहरत राहते. रॅल्फ वॉल्डो एमर्सन या अमेरिकन निबंधकाराने एकदा म्हटले: “मैत्री करण्यासाठी आधी तुम्ही स्वतः एक मित्र बनले पाहिजे.”

२. मैत्री बहरण्यासाठी वेळ द्या. अनेकांना चांगले मित्र असावेत असे वाटते. पण, मैत्रीचे बंधन पक्के करण्यासाठी वेळ द्यायची मात्र त्यांची तयारी नसते. रोमकर १२:१५, १६ हे वचन आपल्याला इतरांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे उत्तेजन देते. तिथे म्हटले आहे: “आनंद करणाऱ्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्‍या बरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा.” पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्त अतिशय व्यस्त होता. पण, आपल्या मित्रांकरता वेळ काढण्यासाठी त्याने ही सबब बनवली नाही. वेळात वेळ काढून त्याने त्यांच्याशी सहवास केला. (मार्क ६:३१-३४) लक्षात ठेवा मैत्री नाजूक रोपासारखी असते. बहरण्यासाठी या रोपाला नियमित पाणी आणि खत घालावे लागते. आणि हे सर्व करण्यासाठी साहजिकच वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे मैत्रीचे नातेसंबंध बहरण्यासाठी देखील वेळ द्यावा लागतो.

३. ऐकण्यास तत्पर असा. लक्षपूर्वक ऐकून घेणाऱ्‍या व्यक्‍तीला सहसा मैत्री करणे सोपे जाते. शिष्य याकोबाने म्हटले: “माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा” असावा. (याकोब १:१९) इतरांशी बोलताना तुम्हाला त्यांच्या भावनांची कदर आहे आहे हे दाखवा. त्यांना स्वतःविषयी बोलू द्या. आणि त्यांना आदर दाखवा. (रोमकर १२:१०) असे केल्यास त्यांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. या उलट, नेहमी तुम्हीच बोलत राहिला, किंवा सर्वांचे लक्ष तुमच्याकडेच असावे असा प्रयत्न करत राहिलात तर साहजिकच लोक तुम्हाला टाळतील. तुमच्या भावना ऐकून घ्यायला तुम्हाला कोणी सापडणार नाही.

४. क्षमाशील असा. येशूने एकदा पेत्राला सांगितले की आपण “साताच्या सत्तर वेळा” क्षमा करावयास तयार असावे. (मत्तय १८:२१, २२) खरा मित्र लहानसहान चुकांकडे दुर्लक्ष करतो. याचे एक उदाहरण लक्षात घ्या. काहींना रासबेरी हे फळ मुळीच आवडत नाही. कारण त्यात लहान-लहान बिया असतात. पण, ज्यांना हे फळ खायला आवडते ते या लहान बियांचा विचार करत नाहीत. त्याचप्रमाणे खरे मित्र लहानसहान चुकांकडे दुर्लक्ष करून एकमेकांच्या चांगल्या गुणांकडे पाहतात. पौल सल्ला देतो: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा.” (कलस्सैकर ३:१३) होय, जे क्षमा करण्यास शिकतात ते आपली मैत्री टिकवून ठेवतात.

५. इतरांच्या खाजगी जीवनात लुडबूड करू नका. प्रत्येक व्यक्‍तीला, म्हणजे अगदी तुमच्या मित्रांनासुद्धा स्वतःसाठी काही वेळ हवा असतो. नीतिसूत्रे २५:१७ योग्यपणे म्हणते: “शेजाऱ्‍याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाही तर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.” याचा अर्थ, उठसूट मित्रांच्या घरी जाणे आणि तिथे तास न्‌ तास घालवणे योग्य नाही. तेव्हा, या बाबतीत समंजसपणा दाखवा. तसेच, तुमच्या मित्रांवर मालकी असल्यासारखे वागू नका. कारण त्यामुळे हेवेदावे निर्माण होतात. आपल्या आवडीनिवडी व्यक्‍त करताना तसेच एखाद्या विषयावर आपली मते व्यक्‍त करताना समजबुद्धी दाखवा. असे केल्यास तुमच्या मित्रांना तुमचा सहवास सुखावह आणि हवाहवासा वाटेल.

६. मनाचा मोठेपणा दाखवा. मैत्री ही उदारतेमुळे देखील बहरते. प्रेषित पौल सल्ला देतो, की “परोपकारी व दानशूर असावे.” (१ तीमथ्य ६:१८) उदाहरणार्थ, आपल्या उत्तेजनपर शब्दांनी इतरांना सांत्वन द्यायला सदैव तयार असा. (नीतिसूत्रे ११:२५) मोठ्या मनाने इतरांची प्रशंसा करा आणि आपल्या शब्दांनी त्यांचे मनोबल वाढवा. इतरांच्या हिताची तुम्हाला मनस्वी काळजी आहे हे त्यांना दिसून आले तर ते तुमच्या जवळ येतील. ते आपल्यासाठी काय करू शकतात याचा नव्हे तर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याचा विचार करा.