व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवलाच पाहिजे का?

प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवलाच पाहिजे का?

प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवलाच पाहिजे का?

बारा वर्षांचा एक विद्यार्थी ॲल्जेब्राचे मूलभूत नियम समजून घेण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होता. सरांनी विद्यार्थ्यांना फळ्यावर एक गणित सोडवून दाखवले. वरवर पाहता ते अगदी अचूक आणि सोपे वाटले.

सरांनी सुरवात केली: “समजा X=Y आणि त्या दोन्हींचे मूल्य १ आहे.

“इथपर्यंत ठीक आहे,” असे त्या विद्यार्थ्याला वाटले.

पण, वरचेवर बरोबर वाटणाऱ्‍या त्या गणिताच्या चारएक टप्प्यानंतर मात्र सरांनी एक धक्कादायक उत्तर दिले. ते म्हणाले: “त्यामुळे २=१!”

बुचकळ्यात पडलेल्या आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहून सर म्हणाले: “हे कोणी चुकीचं सिद्ध करून दाखवलं तर मी मानेल.”

आपल्या अपुऱ्‍या ज्ञानाच्या बळावर त्या तरुण विद्यार्थ्याला ते सिद्ध करून दाखवणे कठीण वाटले. गणितातला प्रत्येक टप्पा वरचेवर अगदी बिनचूक वाटत होता. शिवाय, सरांना नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान होते. म्हणून मग त्या विलक्षण उत्तरावर त्याने अंधपणे विश्‍वास ठेवावा का? मुळीच नाही! त्याने विचार केला: “हे सिद्ध करून दाखवायची गरजच नाही. हे तर कोणलाही कळेल.” (नीतिसूत्रे १४:१५, १८) त्या विद्यार्थ्याला याची खात्री होती की कोणीही त्याला एक डॉलरच्या बदल्यात दोन डॉलर देणार नाही; मग ते त्याचे शिक्षक असोत अथवा वर्गातले त्याचे मित्र!

नंतर त्या विद्यार्थ्याला गणितातली ती चूक उमगली. पण, त्या अनुभवाने त्याला एक महत्त्वाचा धडा शिकवला. तो म्हणजे, एखादी ज्ञानी अथवा हरहुन्‍नरी व्यक्‍ती कावेबाजपणे आपल्यासमोर एखादा वाद मांडते, तेव्हा कदाचित आपल्याला तो वाद त्याच क्षणी खोडून काढता येणार नाही. म्हणून मग डोळे झाकून त्यावर विश्‍वास ठेवावा असा त्याचा अर्थ नाही. हा विद्यार्थी वास्तवात बायबलमध्ये १ योहान ४:१ या वचनात दिलेल्या एका व्यावहारिक सिद्धान्ताचे अनुकरण करत होता. बायबलच्या त्या वचनात म्हटले आहे, की अधिकार असलेली व्यक्‍ती अगदी ठामपणे काही सांगते तेव्हा लगेच त्यावर विश्‍वास करू नका.

पण, याचा अर्थ, आपण केवळ आपल्याच मतांना धरून राहावे असा होत नाही. इतरांचेही विचार जाणून घेतल्यास आपली चुकीची मते आपल्याला सुधारता येतील. पण, त्याच वेळी स्वतःकडे खूप ज्ञान आणि अधिकार असल्याचा दावा करणाऱ्‍या लोकांच्या दबावाखाली येऊन तुमच्या “मनात एकाएकी गोंधळ उडू” नये म्हणून लक्ष दिले पाहिजे. (२ थेस्सलनीकाकर २:२; [थेसलोनिका] मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) या लेखाच्या सुरवातीला ज्या शिक्षकाचा उल्लेख केला होता तो आपल्या विद्यार्थ्यांची केवळ गंमत करत होता. पण, गंमती नेहमीच इतक्या निरागस नसतात. काही जण इतरांना “धूर्तपणाने” आणि “युक्‍तीने” फसवण्यात अगदी पटाईत असतात.—इफिसकर ४:१४; २ तीमथ्य २:१४, २३, २४.

तज्ज्ञांचे म्हणणे नेहमीच खरे असते?

कोणत्याही क्षेत्रातले तज्ज्ञ कितीही ज्ञानी असले तरी त्यांची आपसातील मते आणि विचार एकमेकांशी जुळतातच असे नाही. कित्येकदा तर त्यांची मते ठाम नसतात, ती नेहमी बदलत राहतात. मेडिकल सायन्समध्ये चाललेल्या एका वादाचेच उदाहरणार्थ घ्या. मनुष्याच्या आजाराचे कारण काय हा प्रश्‍न आजपर्यंत वादाच्या भोवऱ्‍यात आहे. “काही वैज्ञानिकांचे असे मत आहे, की आपल्या आजारांचे कारण आपली जनुके आहेत; तर इतर काहींच्या मते आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि आपली जीवन-शैली आपल्या आजारांना कारणीभूत ठरते. सध्या या विषयावर त्यांच्यात जोरदार चर्चा चालू आहे,” असे हावर्ड युनिव्हर्सिटीचे एक प्राध्यापक म्हणतात. आपली बाजू मांडण्याकरता दोन्ही गट आपापली संशोधने आणि आकडेवारी सादर करण्यात अगदी उत्सुक आहेत. पण, तो प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही.

एके काळी वादातीत वाटणारी जगप्रसिद्ध विचारवंतांची मते देखील कित्येक वेळा खोडून काढण्यात आली आहे. उदाहरणार्थ, बर्ट्रन्ड रस्सल या तत्त्वज्ञानीने ॲरिस्टॉटलचे “सगळ्यात प्रभावशाली तत्त्वज्ञानी” असे वर्णन केले होते. पण, रस्सल यांनी स्वतः ॲरिस्टॉटलचे कित्येक सिद्धान्त “सर्वस्वी चुकीचे” आहेत असे म्हटले. तसेच, “आधुनिक काळात विज्ञान, तर्कशास्त्र किंवा तत्त्वज्ञान या क्षेत्रांत प्रगतीचे प्रत्येक पाऊल ॲरिस्टॉटलच्या शिष्यांच्या विरोधाला तोंड देऊनच टाकण्यात आले आहे.” असेही रस्सल यांनी म्हटले.—हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसफी.

“जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे”

सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना बहुधा सॉक्रिटस, प्लॅटो आणि ॲरिस्टॉटलसारख्या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानींचे बरेच शिष्य भेटत असतील. त्या काळचे सुशिक्षित लोक स्वतःला ख्रिश्‍चनांपेक्षा खूप बुद्धिमान आणि ज्ञानी समजायचे. येशूचे बहुतेक शिष्य “जगाच्या दृष्टिने ज्ञानी” नव्हते. (१ करिंथकर १:२६) खरे तर त्यावेळच्या तत्त्वज्ञानींना वाटायचे की ख्रिश्‍चनांचा विश्‍वास “अर्थहीन” व “निव्वळ मुर्खपणा” आहे.—१ करिंथकर १:२३; फिलिप्स इंग्रजी भाषांतर.

सुरवातीच्या ख्रिश्‍चनांपैकी तुम्ही एक असता तर त्या काळातल्या प्रतिष्ठित आणि बुद्धिमान लोकांच्या प्रभावशाली भाषणांनी तुम्हाला मोहून टाकले असते का? किंवा त्यांच्या अफाट ज्ञानामुळे तुम्ही थक्क झाला असता का? (कलस्सैकर २:४) प्रेषित पौलाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला असे भारावून जाण्याचे कोणतेही कारण नसते. त्याने ख्रिश्‍चनांना वारंवार याचे स्मरण करून दिले होते, की यहोवाच्या नजरेत “बुद्धीमतांची बुध्दि” अर्थहीन आहे. (१ करिंथकर १:१९) त्याने पुढे म्हटले: “आपल्या बुद्धीचा पुरावा देण्यासाठी या जगातल्या तत्त्वज्ञानींकडे, लेखकांकडे आणि समिक्षकांकडे काय आहे?” (१ करिंथकर १:२०; फिलिप्स इंग्रजी भाषांतर) पौलाच्या दिवसांतील या तत्त्वज्ञानींना, लेखकांना आणि समिक्षकांना इतके ज्ञान आणि बुद्धी असूनही मानवी समस्यांवर मात्र तोडगा काढण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले.

म्हणूनच, ख्रिस्ती लोक अशा पोकळ ज्ञानापासून चार हात दूर राहण्यास शिकले. त्या ज्ञानाविषयी बोलताना प्रेषित पौलाने म्हटले, की “जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा.” (१ तीमथ्य ६:२०) या ज्ञानाला पौलाने ‘चुकीचे’ असे यासाठी म्हटले कारण त्यात एका अति-महत्त्वपूर्ण गोष्टीची उणीव होती. ती म्हणजे, ज्या आधारावर ते आपल्या ज्ञानाची पारख करू शकत होते असा कोणताही ईश्‍वरी मूळग्रंथ अथवा संदर्भग्रंथ त्यांच्याकडे नव्हता. (ईयोब २८:१२; नीतिसूत्रे १:७) या कारणामुळे तसेच, सर्वात प्रमुख ठकबाज, सैतान याने त्यांची मने अंधळी केल्यामुळे जे लोक अशा चुकीच्या ज्ञानाला बिलगून राहतात त्यांना सत्याची कधीच ओळख होऊ शकणार नाही.—१ करिंथकर २:६-८, १४; १३:१८-२०; २ करिंथकर ४:४; ११:१४; प्रकटीकरण १२:९.

बायबल—देवाकडील मार्गदर्शक

देवाने शास्त्रवचनांत अर्थात बायबलमध्ये आपली इच्छा, उद्दिष्टे आणि सिद्धान्त सांगितले आहेत याबाबतीत सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी कधीच शंका व्यक्‍त केली नाही. (२ तीमथ्य ३:१६, १७) त्यामुळे ‘माणसांच्या संप्रदाय, तत्वज्ञान आणि पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगे कोणाच्या ताब्यात’ जाण्यापासून त्यांना संरक्षण मिळाले. (कलस्सैकर २:८) आपल्या काळातली स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. पण, लोकांना गोंधळात टाकणाऱ्‍या आणि परस्पर विरोधी मतांऐवजी देवाच्या वचनाच्या भक्कम पायावर आपण आपला विश्‍वास उभारू शकतो. (योहान १७:१७; १ थेस्सलनीकाकर २:१३; २ पेत्र १:२१) हा पाया नसता तर आपण अशा एका कठीण परिस्थितीत सापडलो असतो ज्यात मानवी सिद्धान्तांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या निसरड्या वाळूवर काहीतरी मजबूत बांधण्याचा निष्फळ प्रयत्न आपल्याला करावा लागला असता.—मत्तय ७:२४-२७.

पण, कोणी म्हणेल ‘एक मिनिट, एक मिनिट, विज्ञानाने हे शाबीत करून दाखवले नाही का की बायबल चुकीचे आहे? त्यामुळे मनुष्याच्या बदलत्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच बायबलसुद्धा भरवशालायक नाही.’ उदाहरणार्थ, बर्ट्रन्ड रस्सल यांनी म्हटले: “पृथ्वी विश्‍वमंडळाच्या केंद्रस्थानी नाही हे सिद्ध करण्याकरता कॉपरनिकस, केल्पर आणि गॅलिलिओ यांना फक्‍त ॲरिस्टॉटलचाच नव्हे तर बायबलचा देखील विरोध करावा लागला.” (तिरपे वळण आमचे.) तसेच, पृथ्वी कोट्यवधी वर्षे जुनी आहे हे सिद्ध करणारे अमाप प्रमाण उपलब्ध असूनही निर्मितीवर विश्‍वास ठेवणारे ठामपणे असे म्हणत नाहीत का, की बायबलनुसार पृथ्वीची निर्मिती २४ तासांच्या ६ दिवसांत झाली आहे?

पण, वास्तविकता ही आहे की पृथ्वी ही विश्‍वमंडळाच्या केंद्रस्थानी आहे असे बायबल मुळीच म्हणत नाही. खरे तर, देवाच्या वचनाचे पालन न करणाऱ्‍या चर्चच्या धर्मगुरूंनी ही शिकवण जगासमोर मांडली. तसेच, पृथ्वी कोट्यवधी वर्षे जुनी आहे या वैज्ञानिक मताशी उत्पत्तीचा निर्मिती अहवाल असहमत नाही. शिवाय, निर्मितीचा प्रत्येक दिवस केवळ २४ तासांचा होता असे उत्त्पत्तीमध्ये कोठेही सांगितलेले नाही. (उत्पत्ति १:१, ५, ८, १३, १९, २३, ३१; २:३, ४) बायबलचा खुल्या मनाने अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल की बायबल एखादे विज्ञानाचे पुस्तक नसले तरी त्यात लिहिलेल्या गोष्टी ‘मूर्ख’ अथवा अर्थहीन नाहीत. उलट, सिद्ध झालेल्या विज्ञानाशी बायबल पूर्णपणे सुसंगत आहे. *

‘तर्कशक्‍ती’

येशूचे बहुतेक शिष्य साधे आणि सरळ लोक होते. तसेच, ते जास्त शिकले-सवरलेलेही नव्हते. तरीसुद्धा, देवाकडून मिळालेली एक क्षमता त्यांच्याकडे होती. ती म्हणजे ते निरनिराळ्या पार्श्‍वभूमीतून आले असले तरी त्यांच्याकडे तर्क करण्याची शक्‍ती आणि विचार करण्याची क्षमता होती. देवाची ‘उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय हे समजून घेण्याकरता’ प्रेषित पौलाने सहख्रिश्‍चनांना आपल्या ‘तर्कशक्‍तीचा’ (NW) पुरेपूर उपयोग करण्यास सांगितले.—रोमकर १२:१, २.

देवाकडून मिळालेल्या या ‘तर्कशक्‍तीमुळेच’ त्याच्या वचनाशी सुसंगत नसलेले तत्त्वज्ञान किंवा शिक्षण निरर्थक आहे याची पूर्ण समज सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना प्राप्त झाली होती. काही वेळा तर त्या काळातले काही बुद्धिमान लोक ‘सत्य दाबून’ देवाच्या अस्तित्वाचे असंख्य पुरावे सभोवार असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत होते. म्हणूनच, प्रेषित पौलाने त्यांच्याविषयी म्हटले: “स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.” किंबहुना, देवाचे आणि देवाच्या उद्देशांचे सत्य नाकारल्यामुळे “ते आपल्या कल्पनांनी शुन्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.”—रोमकर १:१८-२२; यिर्मया ८:८, ९.

स्वतःला शहाणे समजणारे लोक सहसा म्हणतात, की “जगात देवच नाही.” किंवा “बायबल भरवशालायक नाही” अथवा “हे ‘शेवटले दिवस’ नाहीत.” पण, ज्याप्रमाणे २=१ असे म्हणणे मूर्खपणाचे आहे त्याप्रमाणेच या कल्पना देखील देवाच्या नजरेत मूर्खपणाच्या अथवा अर्थहीन आहेत. (१ करिंथकर ३:१९) मोठमोठ्या अधिकारपदावर असणाऱ्‍या लोकांचे म्हणणे जर देवाच्या वचनाविरुद्ध असेल किंवा ते देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करत असतील अथवा आपल्या व्यावहारिक ज्ञानाचे उल्लंघन करत असतील तर त्यांचे म्हणणे बिलकुल ऐकू नये. सांगायचे तात्पर्य हे, की “देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो” या सिद्धान्ताचे अनुकरण करणेच सगळ्यात शहाणपणाचे ठरेल.—रोमकर ३:४.

[तळटीप]

^ परि. 20 याविषयावर वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांत सविस्तर चर्चा केली आहे. त्या पुस्तकांची नावे आहेत, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) आणि आपली काळजी वाहणारा कोणी निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी).

[३१ पानांवरील चित्रे]

लोकांच्या बदलत्या मतांऐवजी देवाच्या वचनाच्या भक्कम पायावर आपण आपला विश्‍वास उभारू शकतो

[Credit Lines

डावीकडे, एपिक्यरस: Photograph taken by courtesy of the British Museum; मध्ये वरती, प्लॅटो: National Archaeological Museum, Athens, Greece; उजवीकडे, सॉक्रिटस: Roma, Musei Capitolini