व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे निर्बंध तुम्हाला अत्यंत प्रिय आहेत का?

यहोवाचे निर्बंध तुम्हाला अत्यंत प्रिय आहेत का?

यहोवाचे निर्बंध तुम्हाला अत्यंत प्रिय आहेत का?

“माझा जीव तुझे निर्बंध पाळितो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत.”—स्तोत्र ११९:१६७.

१. यहोवाच्या निर्बंधांविषयी कोठे वारंवार उल्लेख आढळतो?

आपण आनंदी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे. पण खरा आनंद मिळवायचा असेल, तर देवाच्या नियमांचे पालन करणे आणि त्याच्या आदेशांनुसार वागणे आवश्‍यक आहे. म्हणूनच तो आपल्याला त्याच्या निर्बंधांची वारंवार आठवण करून देत असतो. यहोवा आपल्याला स्मरण करून देत असलेल्या निर्बंधाचा स्तोत्र ११९ या अध्यायात बऱ्‍याचदा उल्लेख केला आहे. हे स्तोत्र यहुदाचा तरुण राजा हिज्किया याने लिहिले असावे. या अर्थभरीत स्तोत्राचे सुरवातीचे शब्द असे आहेत: “जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्‍वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करितात ते धन्य.”—स्तोत्र ११९:१, २.

२. देवाच्या निर्बंधांवर आपला आनंद कशाप्रकारे अवलंबून आहे?

‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालणे’ म्हणजे त्याच्या वचनाचे अचूक ज्ञान घेणे आणि या ज्ञानाप्रमाणे जीवनात आचरण करणे. पण आपण स्वभावतःच चुका करणारे असल्यामुळे, आपल्याला यहोवाच्या निर्बंधांची वारंवार आठवण करून द्यावी लागते. “निर्बंध” असे भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू शब्दाचाच अर्थ असा होतो की देव आपल्याला त्याच्या नियमांची, आदेशांची, विधींची, आज्ञांची आणि कायद्यांची वारंवार आठवण करून देतो. (मत्तय १०:१८-२०) यहोवाने स्मरण करून दिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर आपण त्यांप्रमाणे चाललो तरच आपण आनंदी राहू शकतो. कारण असे केल्यामुळे आपल्या आध्यात्मिकतेला धोकेदायक ठरणाऱ्‍या अनेक गोष्टींपासून आणि त्यांमुळे होणाऱ्‍या दुःखदायक परिणामांपासून आपला बचाव होईल.

यहोवाच्या निर्बंधांना धरून राहा

३. स्तोत्र ११९:६०, ६१ या वचनानुसार आपल्याला कशाविषयी भरोसा आहे?

स्तोत्रकर्त्याला यहोवाचे निर्बंध प्रिय होते. म्हणूनच त्याने आपल्या स्तोत्रात म्हटले: “मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लाविला नाही. दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.” (स्तोत्र ११९:६०, ६१) यहोवाच्या आज्ञा आपल्याला छळालाही तोंड द्यायला साहाय्य करतात; कारण शत्रूंनी आपल्याला अडकविण्यासाठी टाकलेले सर्व पाश दूर करण्याचे सामर्थ्य आपल्या स्वर्गीय पित्याजवळ आहे याची आपल्याला खात्री आहे. राज्य प्रचाराचे कार्य आपल्याला सातत्याने करता यावे म्हणून योग्य वेळी तो सर्व अडथळे दूर करतो.—मार्क १३:१०.

४. यहोवा आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देतो तेव्हा आपण काय केले पाहिजे?

कधीकधी यहोवा आपल्या चुका सुधारण्यासाठी त्याच्या निर्बंधांची आपल्याला आठवण करून देतो. त्यामुळे, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही त्याच्या या निर्बंधांकरता त्याचे आभार मानले पाहिजे. देवाला प्रार्थना करताना स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत . . . तुझे निर्बंध मला प्रिय आहेत.” (स्तोत्र ११९:२४, ११९) स्तोत्रकर्त्यापेक्षा आपल्याजवळ कितीतरी जास्त पटीने यहोवाच्या आज्ञांविषयी ज्ञान आहे. कारण इब्री शास्त्रवचनांतील कितीतरी भाग ग्रीक शास्त्रवचनांत पुन्हा आढळतात. हे उतारे, नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या लोकांना यहोवाने दिलेल्या कित्येक आज्ञांची आपल्याला आठवण करून देतात. इतकेच नाही, तर ख्रिस्ती मंडळीकरता यहोवाचे काय उद्देश होते याविषयीही ते आपल्याला माहिती देतात. यहोवाला आवश्‍यक वाटते म्हणूनच तो आपल्याला विशिष्ट गोष्टींची पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. आणि त्याच्या या मार्गदर्शनाबद्दल आपण त्याचे अत्यंत आभारी आहोत. यहोवाचे ‘निर्बंध धरून राहिल्यामुळे’ आपल्या निर्माणकर्त्याला न आवडणाऱ्‍या आणि आपल्यावर नाहक दुःख ओढवणाऱ्‍या कित्येक पापांपासून किंवा वाईट मोहांपासून आपण दूर राहू शकतो.—स्तोत्र ११९:३१.

५. यहोवाचे निर्बंध आपल्याला अत्यंत प्रिय केव्हा वाटू लागतील?

यहोवाने आठवण करून दिलेले त्याचे निर्बंध आपल्याला केवळ प्रिय वाटावेत का? स्तोत्रकर्त्याने म्हटले: “माझा जीव तुझे निर्बंध पाळितो, ते मला अत्यंत प्रिय आहेत.” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र ११९:१६७) पण यहोवाचे निर्बंध आपल्याला अत्यंत प्रिय केव्हा वाटतील? आपली काळजी वाहणाऱ्‍या पित्याने या आज्ञा दिल्या आहेत अशा दृष्टीने विचार करून आपण त्या स्वीकारल्या तर आपोआपच यहोवाच्या आज्ञा आपल्याला अत्यंत प्रिय वाटू लागतील. (१ पेत्र ५:६, ७) यहोवाच्या आज्ञांची आठवण करून दिली जाणे आपल्याकरता आवश्‍यक आहे; या आज्ञा आपल्याच भल्याकरता आहेत हे जेव्हा आपण अनुभवू तेव्हा दिवसेंदिवस त्या आपल्याला अधिक प्रिय वाटू लागतील.

निर्बंधांची आठवण करून दिली जाणे का आवश्‍यक आहे?

६. यहोवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली जाणे का आवश्‍यक आहे आणि त्याचे निर्बंध आठवणीत ठेवण्याकरता आपण काय केले पाहिजे?

आपल्याला यहोवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली जाणे आवश्‍यक आहे. याचे पहिले कारण म्हणजे आपली विसरण्याची प्रवृत्ती आहे. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात असे म्हटले आहे: “काळाच्या ओघात सहसा लोक मागच्या बऱ्‍याच गोष्टी विसरत जातात. . . . कदाचित तुम्हालाही असा अनुभव आला असेल. अगदी ओळखीचे एखादे नाव किंवा काही साधीशी गोष्ट देखील कधीकधी प्रयत्न करूनही आठवत नाही. . . . अशाप्रकारचा तात्पुरता स्मरणदोष बऱ्‍याचदा घडतो. वैज्ञानिक याची तुलना, एखाद्या खोलीत अस्ताव्यस्त पडलेल्या असंख्य वस्तूंपैकी एखादी विशिष्ट हरवलेली वस्तू शोधण्याशी करतात . . . कोणतीही माहिती लक्षात ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, ती माहिती अगदी चांगल्याप्रकारे आत्मसात केल्यानंतर बऱ्‍याच काळानी तिचा पुन्हा अभ्यास करणे.” त्याचप्रमाणे, देवाचे निर्बंध आठवणीत ठेवण्यासाठी आणि आपल्याच फायद्याकरता त्यानुसार वागण्यासाठी आधी त्यांचा मनःपूर्वक अभ्यास करणे आणि पुन्हापुन्हा त्यांची उजळणी करणे महत्त्वाचे आहे.

७. खासकरून आजच्या काळात आपल्याला देवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली जाणे का गरजेचे आहे?

आजच्या काळात तर यहोवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली जाणे अधिकच गरजेचे आहे कारण मानव इतिहासात कधीही अस्तित्वात नव्हती इतकी अनीती आज या जगात आहे. देवाने आठवण करून दिलेल्या निर्बंधांकडे आपण लक्ष दिल्यास या जगाच्या अनैतिक गोष्टींकडे पाठ फिरवण्याची सुबुद्धी आपल्याला प्राप्त होईल. स्तोत्रकर्त्याने म्हटले, “माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करितो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधि पाळितो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो.” (स्तोत्र ११९:९९-१०१) आजच्या जगातल्या बहुतेक लोकांची ‘बुद्धी अंधकारमय झाली आहे; ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.’ पण देवाच्या निर्बंधांचे पालन केल्यामुळे आपण त्यांच्यासारखे न होता, “प्रत्येक वाईट मार्गापासून” दूर राहू शकतो.—इफिसकर ४:१७-१९.

८. विश्‍वासाची पारख करणाऱ्‍या कठीण परिस्थितींना यशस्वीरित्या तोंड देण्याकरता आपण काय केले पाहिजे?

या ‘अंतसमयात’ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागते; पण यहोवा आपल्याला त्याच्या निर्बंधांची वारंवार आठवण करून देत असल्यामुळे या सर्व परीक्षांना तोंड देण्याची ताकद आपल्याला मिळते. (दानीएल १२:४) अशाप्रकारे आठवण करून न दिल्यास आपण ‘ऐकून विसरणाऱ्‍यांप्रमाणे’ होण्याची शक्यता आहे. (याकोब १:२५) पण जर आपण बायबलचा आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ तयार केलेल्या विविध प्रकाशनांचा वैयक्‍तिकरित्या आणि मंडळीसोबत नियमितपणे अभ्यास केला, तर आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेणाऱ्‍या सर्व आव्हानांना तोंड द्यायला आपल्याला मदत मिळेल. (मत्तय २४:४५-४७) या सर्व आध्यात्मिक तरतुदी आपल्याला कठीण परिस्थितीतही यहोवाला संतोषवील असा योग्य निर्णय घेण्यास मदत करतात.

सभांचे महत्त्व

९. “मानवरूपी देणग्या” कोण आहेत आणि ते आपल्याला कशाप्रकारे मदत करतात?

यहोवा ख्रिस्ती सभांच्या माध्यमाने आपल्याला त्याच्या निर्बंधांची आठवण करून देत असतो. सभांमध्ये पवित्र आत्म्याने नियुक्‍त केलेले बंधू आपले मार्गदर्शन करतात. प्रेषित पौलाने लिहिले की येशूने जेव्हा “उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या [“मानवरूपी देणग्या,” NW] दिल्या.” पुढे पौल म्हणतो: “[ख्रिस्ताने] कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते ह्‍यासाठी की, त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे.” (इफिसकर ४:८, ११, १२) उपासनेकरता आपण एकत्र येतो तेव्हा, “मानवरूपी देणग्या” असणारे नियुक्‍त वडील यहोवाचे निर्बंध आपल्या लक्षात आणून देतात याबद्दल आपण आभार मानायला नकोत का?

१०. इब्री लोकांस १०:२४, २५ या वचनाचा मुख्य मुद्दा कोणता?

१० देवाने केलेल्या तरतुदींबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असू तर दर आठवड्याच्या मंडळीच्या पाचही सभांना उपस्थित राहण्याची आपल्याला आपोआपच प्रेरणा मिळेल. नियमितपणे एकत्र येण्याचे महत्त्व पौलाने जोर देऊन सांगितले होते. त्याने लिहिले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”—इब्री लोकांस १०:२४, २५.

११. प्रत्येक सभेमुळे आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो?

११ आपल्याला सभांमुळे किती फायदा होतो याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? दर आठवडी, टेहळणी बुरूज अभ्यासामुळे आपला विश्‍वास मजबूत होतो; यहोवाच्या निर्बंधांना धरून राहण्यास आपल्याला साहाय्य मिळते; तसेच, या ‘जगाच्या आत्म्यापासून’ दूर राहण्याची आध्यात्मिक शक्‍ती आपल्याला मिळते. (१ करिंथकर २:१२; प्रेषितांची कृत्ये १५:३१) जाहीर सभेत देवाच्या वचनातून आपले मार्गदर्शन केले जाते; तसेच, यहोवाच्या निर्बंधांची आणि येशूने सांगितलेल्या ‘सार्वकालिक जीवनाच्या वचनांची’ आपल्याला आठवण करून दिली जाते. (योहान ६:६८; ७:४६; मत्तय ५:१–७:२९) ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत, इतरांना देवाचे वचन शिकवण्याचे आपले कौशल्य दिवसेंदिवस वाढत जाते. तसेच सेवा सभा देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण घरोघरच्या कार्यात, पुनर्भेटी करताना, तसेच बायबल अभ्यास चालवताना आणि इतर प्रसंगी देखील अधिक चांगल्याप्रकारे सुवार्ता सादर करण्यासाठी आपल्याला या सभेतून अनेक सहायक सूचना मिळतात. मंडळीच्या पुस्तक अभ्यासात, कमी लोक असल्यामुळे आपल्याला उत्तरे देण्याची व देवाच्या निर्बंधांविषयी आपल्या भावना व्यक्‍त करण्याची जास्त संधी मिळते.

१२, १३. आशियातील एका देशात देवाच्या लोकांनी ख्रिस्ती सभांचे महत्त्व ओळखले असल्याचे कसे दाखवले?

१२ मंडळीच्या सभांना नियमित हजर राहिल्यामुळे देवाच्या आज्ञांची आपल्याला वारंवार आठवण करून दिली जाते. युद्ध, आर्थिक अडचणी आणि इतर कठीण परीक्षांना तोंड देतानासुद्धा आध्यात्मिकरित्या खंबीर राहण्यास आपल्याला यामुळे मदत मिळते. आशियातील एका देशात राहणाऱ्‍या ७० बांधवांना सभांचे किती महत्त्व वाटत होते हे त्यांच्या पुढील अनुभवावरून दिसून येते. हे बांधव बेघर झाले होते; त्यांना घनदाट जंगलात जाऊन राहावे लागले. पण कोणत्याही परिस्थितीत एकत्र मिळणे त्यांना सोडायचे नव्हते; त्यामुळे, लढाई सुरू असतानाच ते गावात परत गेले आणि अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेल्या त्यांच्या राज्य सभागृहाचे सगळे सामानसुमान काढून त्याच साहित्यातून त्यांनी जंगलात नवे राज्य सभागृह उभे केले.

१३ याच देशातल्या दुसऱ्‍या एका भागात राहणाऱ्‍या बांधवांना तेथे सुरू असलेल्या लढाईमुळे कित्येक वर्षांपासून बऱ्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. पण या परिस्थितीतही ते आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत. बांधवांना एकत्रित ठेवण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात सहायक ठरली आहे असे एका वडिलांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले? “१९ वर्षांत आम्ही एकदाही सभा रद्द केली नाही. कधीकधी बॉम्बस्फोट सुरू असल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे काही बांधव सभेच्या ठिकाणापर्यंत पोचू शकत नव्हते. पण तरीही आम्ही सभा घ्यायचोच.” खरोखर, “एकत्र मिळणे” किती महत्त्वाचे आहे हे या बांधवांनी ओळखले आहे.

१४. वृद्ध विधवा हन्‍ना हिच्याकडून आपण काय शिकू शकतो?

१४ चौऱ्‍याऐंशी वर्षांची विधवा हन्‍ना ‘कधीही मंदिर सोडून जात नसे.’ तान्ह्या येशूला मंदिरात आणले तेव्हा ती तेथेच असल्यामुळे ती त्याला पाहू शकली. (लूक २:३६-३८) तुम्ही पण एकही सभा न चुकवण्याचा प्रयत्न करता का? तसेच संमेलन व अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला वेळेवर उपस्थित राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? या सभांतून मिळणाऱ्‍या आध्यात्मिकरित्या फायदेकारक मार्गदर्शनावरून आपला स्वर्गीय पिता आपली किती काळजी घेतो हे स्पष्ट दिसून येते. (यशया ४०:११) सभा, संमेलने व अधिवेशने आपल्याकरता आनंदाचे प्रसंग असतात. तेथे उपस्थित राहून आपण यहोवाच्या निर्बंधांची आपल्याला कदर आहे हे प्रदर्शित करतो.—नहेम्या ८:५-८, १२.

यहोवाचे निर्बंध पाळणारे जगापासून वेगळे राहतात

१५, १६. यहोवाच्या निर्बंधांचे पालन केल्यामुळे आपल्या आचरणावर कसा परिणाम होतो?

१५ देवाचे निर्बंध पाळल्यामुळे आपण या दुष्ट जगापासून अलिप्त राहू शकतो. उदाहरणार्थ, देवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिल्यास लैंगिक अनैतिकतेपासून आपला बचाव होईल. (अनुवाद ५:१८; नीतिसूत्रे ६:२९-३५; इब्री लोकांस १३:४) तसेच खोटे बोलणे, फसवेगिरी करणे, किंवा चोरी करणे यांसारख्या वाईट गोष्टी करण्याच्या मोहावरही आपण मात करू शकू. (निर्गम २०:१५, १६; लेवीय १९:११; नीतिसूत्रे ३०:७-९; इफिसकर ४:२५, २८; इब्री लोकांस १३:१८) यहोवाच्या आज्ञा आपल्याला सूड घेण्यापासून, कोणाविरुद्ध मनात तक्रार बाळगण्यापासून किंवा खोटे बोलून कोणाचे नाव खराब करण्यापासून आवरतील.—लेवीय १९:१६, १८; स्तोत्र १५:१,.

१६ देवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिल्यामुळे आपण त्याच्या सेवेकरता पवित्र केलेले, किंवा खास निवडलेले लोक आहोत हे सिद्ध करतो. खरोखर या जगापासून अलिप्त राहणे आज किती महत्त्वाचे आहे! पृथ्वीवर असताना, शेवटल्या रात्री येशूने यहोवाला प्रार्थना केली तेव्हा त्याने आपल्या अनुयायांकरता देवाकडे अशी याचना केली: “मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१४-१७) यहोवाच्या पवित्र सेवेसाठी शुद्ध आणि जगापासून अलिप्त राहण्याकरता आपण सदोदीत देवाच्या वचनातील शिकवणी प्रिय मानून त्यांकडे लक्ष देत राहिले पाहिजे.

१७. देवाच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष केल्यास काय घडू शकते, आणि म्हणून आपण काय केले पाहिजे?

१७ यहोवाचे सेवक या नात्याने आपली सेवा त्याने स्वीकारावी अशी आपली इच्छा आहे. पण त्याची सेवा करण्याकरता आपण आपली योग्यता टिकवून ठेवली पाहिजे. जर आपण देवाच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष केले तर सर्वसामान्य लोकांच्या भाषेतून आणि वर्तनातून, आजकालच्या पुस्तक-मासिकांतून तसेच मनोरंजनाच्या माध्यमांतून प्रदर्शित होणारा या जगाचा आत्मा सहज आपल्यातही येऊ शकतो. तसेच, देवापासून दूर गेलेल्या लोकांचे गुण व प्रवृत्त्या देखील आपल्या व्यक्‍तिमत्त्वात येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, पैशांचा लोभ, बढाईखोरपणा, गर्व, कृतघ्नता, विश्‍वासघातकीपणा, क्रूरपणा, हूडपणा, तसेच देवाऐवजी सुखविलासाची आवड धरण्याची प्रवृत्ती. (२ तीमथ्य ३:१-५) आज आपण या दुष्ट जगाच्या अगदी शेवटल्या दिवसांत राहात आहोत; त्यामुळे यहोवाच्या निर्बंधांचे पालन करून ‘त्याच्या वचनानुसार आपला वर्तनक्रम शुद्ध राखण्याकरता’ मदत करण्यासाठी आपण नेहमी त्याला प्रार्थना करत राहिले पाहिजे.—स्तोत्र ११९:९.

१८. देवाचे निर्बंध पाळल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा होईल?

१८ यहोवाचे निर्बंध केवळ आपण काय काय करू नये याबद्दलच नाही, तर आपण काय काय केले पाहिजे याविषयीही आपल्याला सांगतात आणि ते करण्याची प्रेरणा देतात. ते आपल्याला यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्याचे, आणि त्याच्यावर आपल्या पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने व शक्‍तीने प्रेम करण्याचे प्रोत्साहन देतात. (अनुवाद ६:५; स्तोत्र ४:५; नीतिसूत्रे ३:५, ६; मत्तय २२:३७; मार्क १२:३०) तसेच देवाचे निर्बंध आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्यास प्रवृत्त करतात. (लेवीय १९:१८; मत्तय २२:३९) आणि देवाबद्दलचे व आपल्या शेजाऱ्‍याबद्दलचे हे प्रेम आपण खासकरून देवाच्या इच्छेप्रमाणे वागून आणि इतरांना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे “देवाचे ज्ञान” देऊन व्यक्‍त करतो.—नीतिसूत्रे २:१-५.

देवाचे निर्बंध जीवनदायक आहेत!

१९. यहोवाचे निर्बंध पालन करण्याजोगे आणि फायद्याचे आहेत हे आपण इतरांना कसे पटवून देऊ शकतो?

१९ आपण स्वतः यहोवाच्या निर्बंधांप्रमाणे वागलो आणि इतरांनाही असे करण्यास मदत केली तर आपण स्वतःचे आणि आपले ऐकणाऱ्‍यांचेही जीवन वाचवू शकू. (१ तीमथ्य ४:१६) पण यहोवाचे निर्बंध खरोखर पालन करण्यासारखे आणि फायद्याचे आहेत हे आपण इतरांना कसे पटवून देऊ शकतो? स्वतः बायबलच्या तत्त्वांनुसार वागून. आपले वर्तन पाहून ‘सार्वकालिक जीवनाकरता ज्यांची योग्य मनोवृत्ती आहे’ अशा लोकांना आपोआपच याची जाणीव होईल की देवाच्या वचनात दाखवलेला जीवनाचा मार्गच सर्वात उत्तम आहे. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) तसेच देवाच्या लोकांमध्ये ‘त्याचे वास्तव्य खरोखरीच आहे’ हे पाहून त्यांना आपल्यासोबत मिळून सर्वश्रेष्ठ प्रभु यहोवाची उपासना करण्याची प्रेरणा मिळेल.—१ करिंथकर १४:२४, २५.

२०, २१. देवाचे निर्बंध आणि त्याचा आत्मा आपल्याला काय करण्याची मदत करेल?

२० बायबलचा अभ्यास सातत्याने केल्यास, शिकलेल्या गोष्टींचे पालन केल्यास, आणि यहोवाने केलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींचा पूर्ण फायदा करून घेतल्यास, यहोवाचे निर्बंध आपल्याला अत्यंत प्रिय वाटू लागतील. या निर्बंधांकडे आपण लक्ष दिल्यास ते आपल्याला “नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण [करण्यास]” मदत करतील. (इफिसकर ४:२०-२४) यहोवाचे निर्बंध आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्याला, सैतानाच्या या जगात अगदी अभावाने आढळणारे उत्तम गुण विकसित करायला मदत करेल. अर्थात, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.” (गलतीकर ५:२२, २३; १ योहान ५:१९) म्हणूनच, यहोवा आपल्याला आपल्या वैयक्‍तिक अभ्यासातून, वडिलांच्या माध्यमातून किंवा सभा, संमेलने व अधिवेशने यांतून त्याच्या निर्बंधांची आठवण करून देतो, तेव्हा आपण यासाठी यहोवाचे आभार मानले पाहिजे.

२१ यहोवाचे निर्बंध पाळल्यास, खऱ्‍या उपासनेकरता आपला छळ होत असतो तेव्हा देखील आपण आनंदी राहू शकतो. (लूक ६:२२, २३) देव आपल्याला सर्वात बिकट परिस्थितीतूनही सोडवू शकतो, अशी आशा आपण सदोदीत बाळगतो. आज हा भरवसा ठेवणे खासकरून महत्त्वाचे आहे कारण सर्व राष्ट्रांना “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी” अर्थात हर्मगिदोनच्या लढाईसाठी एकत्रित केले जात आहे.—प्रकटीकरण १६:१४-१६.

२२. यहोवाच्या निर्बंधांसंबंधी आपण कोणता दृढनिश्‍चय केला पाहिजे?

२२ सार्वकालिक जीवनाचे दान आपल्याला मिळावे अशी आपली इच्छा असेल तर आपण यहोवाचे निर्बंध अत्यंत प्रिय मानले पाहिजेत आणि मनापासून त्यांचे पालन केले पाहिजे. आपणही स्तोत्रकर्त्यासारखीच मनोवृत्ती बाळगून “तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धि दे म्हणजे मी जगेन” असे म्हटले पाहिजे. (स्तोत्र ११९:१४४) “मी तुझा धावा करितो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन” असे म्हणणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही यहोवाचे निर्बंध पाळण्याचा दृढनिश्‍चय केला पाहिजे. (स्तोत्र ११९:१४६) अशारितीने, शब्दांतून व कृतींतून यहोवाचे निर्बंध आपल्याला अत्यंत प्रिय आहेत हे आपण दाखवून दिले पाहिजे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाच्या निर्बंधांबद्दल स्तोत्रकर्त्याची कशी मनोवृत्ती होती?

• देवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली जाणे का गरजेचे आहे?

• देवाच्या निर्बंधांच्या संदर्भात सभा का महत्त्वाच्या आहेत?

• यहोवाचे निर्बंध आपल्याला या जगापासून अलिप्त राहण्यास कशी मदत करतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

स्तोत्रकर्त्याला यहोवाचे निर्बंध अत्यंत प्रिय होते

[१६, १७ पानांवरील चित्रे]

हन्‍नाप्रमाणे, तुम्हीही एकही सभा न चुकवण्याचा प्रयत्न करता का?

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाचे निर्बंध पाळल्यामुळे आपण जगापासून दूर राहून त्याच्या सेवेकरता पवित्र राहू शकतो