व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या लोकांना विसावा देतो

यहोवा आपल्या लोकांना विसावा देतो

राज्य घोषकांचा वृत्तान्त

यहोवा आपल्या लोकांना विसावा देतो

एखाद्या चढणावर, सावलीखाली बसायची जागा दिसली की थकलेल्या वाटसरूला किती हायसे वाटते. नेपाळमध्ये अशा विसाव्यांना चौथरा म्हणतात. सहसा असा चौथरा मोठ्या वडाच्या झाडाखाली पाहायला मिळतो. तेथे लोक बसून थोडासा विसावा घेतात. खरे पाहता, चौथरा बांधणे हे एक पुण्याईचे काम आहे. बहुतेक वेळा, बांधणाऱ्‍यांची नावे निनावी राहतात.

नेपाळमधील अनुभवांवरून दिसून येते की, यहोवा देवाने या व्यवस्थीकरणातील अनेक “वाटसरूंना” आनंद आणि आध्यात्मिक तजेला दिला आहे.—स्तोत्र २३:२.

• लील कुमारी नावाची एक स्त्री पोखरा शहरात राहते. हे शहर बर्फाच्छादित हिमालय पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे. लील कुमारीची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची होती. त्यामुळे भविष्याविषयी तिला फारशी आशा नव्हती. एकदा एक यहोवाची साक्षीदार बहीण तिच्या घरी आली. लील कुमारीला तिने बायबलमधून भविष्याबद्दलची आशा दाखवल्यावर ती खूष झाली. आपल्याला लगेच बायबल अभ्यास हवा असे तिने सांगितले.

लील कुमारीला बायबलचा अभ्यास फार आवडायचा. परंतु, कुटुंबातल्या इतरांचा विरोध असल्यामुळे तिला फार जड जात होते. तरीही तिने अभ्यास चालूच ठेवला. ती नियमितपणे ख्रिस्ती सभांना जाऊ लागली आणि शिकत असलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करू लागली. विशेषकरून पत्नीने पतीच्या अधीनतेत राहावे हा सल्ला तिने लागू केला. त्यामुळे, तिच्या पतीला आणि तिच्या आईला दिसून आले की बायबल अभ्यासामुळे उलट कुटुंबाला फायदाच होत आहे.

तिचा पती आणि पुष्कळ नातेवाईक आता देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहेत. पोखरा येथे नुकत्याच भरवलेल्या एका संमेलनात लील कुमारी आणि तिच्यासोबत तिचे १५ नातेवाईक आले होते. त्या सर्वांना कार्यक्रम खूप आवडला. ती म्हणते: “माझ्या घरात आता शांती आहे कारण आता आमच्या कुटुंबातले सगळेजण खरी उपासना करतात. मला तर खरी मनःशांती मिळालीय.”

• नेपाळमध्ये, कायद्याच्या दृष्टीने उच्चनीचतेचा भेदभाव मानला जात नसला तरीही लोकांमध्ये अजूनही ती वृत्ती दिसून येते. त्यामुळे समानता आणि अपक्षपात या विषयांवर बायबलमधून चर्चा केली जाते तेव्हा अनेकांना याविषयी बोलायला फार आवडते. अशाच एका प्रसंगी, “देव पक्षपाती नाही” हे सूर्य माया आणि तिच्या कुटुंबाला समजल्यावर त्यांचे जीवन एकदम बदलले.—प्रेषितांची कृत्ये १०:३४.

उच्चनीचतेचा भेदभाव आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या रीतीरिवाजांच्या ओझ्याखाली ती पार दबली होती. सूर्य माया धार्मिक वृत्तीची होती. कित्येक वर्षे ती तिच्या देवतांकडे मदत मागत होती. पण तिच्या प्रार्थनांचे उत्तर तिला मिळाले नाही. अशीच एकदा कळकळीने प्रार्थना करत असताना तिची सहा वर्षांची नात, बबिता, तिला म्हणाली: “या मूर्तींपुढे तू का रडतेस? त्या काहीच मदत करू शकत नाहीत.”

बबिताची आई एका यहोवाच्या साक्षीदारासोबत बायबलचा अभ्यास करत होती. बबिता तिच्या आजीला म्हणाली, ‘तू आमच्या सभांमध्ये ये.’ सूर्य माया सभेला गेली तेव्हा वेगवेगळ्या जातीचे लोक कसे खेळीमेळीने एकमेकांशी बोलतात-चालतात हे पाहून तिला फार आश्‍चर्य वाटले. तिने लगेचच बायबल अभ्यास स्वीकारला. यामुळे तिच्या शेजाऱ्‍यांनी तिला वाळीत टाकले पण तिने माघार घेतली नाही. तिला नीट लिहिता-वाचता देखील येत नव्हते, तरीही तिच्या आध्यात्मिक प्रगतीत खंड पडला नाही.

या घटनेला आता आठ वर्षे होऊन गेली आहेत. आता तिचा पती, तिची तीन मुले असे तिच्या कुटुंबातले एकूण सहा सदस्य यहोवाचे साक्षीदार बनले आहेत. सूर्य माया सध्या पूर्ण वेळेच्या सेवेत नियमित पायनियर म्हणून आनंदाने काम करत आहे. ती इतरांना विसाव्याच्या ठिकाणी आपली जड ओझी हलकी करण्यास मदत करत आहे. हा विसावा यहोवाशिवाय आणखी कोणीही देऊ शकत नाही.