व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा थकलेल्यांना बळ देतो

यहोवा थकलेल्यांना बळ देतो

यहोवा थकलेल्यांना बळ देतो

“[यहोवा] भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.”—यशया ४०:२९.

१. देवाने निर्माण केलेल्या वस्तूंत त्याचे सामर्थ्य कशाप्रकारे दिसून येते हे उदाहरण देऊन सांगा.

यहोवाजवळ अमर्याद सामर्थ्य आहे. त्याने निर्मिलेल्या प्रत्येक वस्तूत त्याचे हे सामर्थ्य दिसून येते! सर्व वस्तू ज्यापासून बनलेल्या आहेत त्या अणूचेच उदाहरण घ्या. हे अणू इतके सूक्ष्म असतात की पाण्याच्या एक थेंबात अब्जावधी अणू समावतात. * या पृथ्वीवरील सजीव सृष्टी, सूर्यातील आण्विक क्रियांमुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या ऊर्जेवर अवलंबून आहे. पण पृथ्वीवरील सजीव सृष्टीला सूर्यातील ऊर्जेपैकी किती ऊर्जेची आवश्‍यकता आहे? सूर्यातून उत्पन्‍न होणाऱ्‍या एकूण ऊर्जेतील अगदी लहानसा अंश पृथ्वीला मिळतो. पण हा लहानसा अंश देखील जगातल्या सर्व कारखान्यांत वापरल्या जाणाऱ्‍या एकूण ऊर्जेपेक्षा असंख्य पटीने जास्त असतो.”

२. यशया ४०:२६ यात यहोवाच्या सामर्थ्याविषयी काय सांगितले आहे?

लहानशा अणूपासून या प्रचंड विश्‍वापर्यंत, यहोवाच्या अद्‌भुत सामर्थ्याचा आपण विचार करतो तेव्हा खरोखर आपण थक्क होतो. म्हणूनच यहोवा मनुष्याला असे म्हणतो: “आपले डोळे वर करून पाहा; ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.” (यशया ४०:२६) होय, यहोवा “प्रबळ सत्ताधीश” आहे. आपल्या ‘महान सामर्थ्याचा’ उपयोग करून त्याने हे सबंध विश्‍व अस्तित्वात आणले.

आपल्याला असामान्य सामर्थ्याची गरज आहे

३, ४. (अ) कोणत्या काही कारणांमुळे आपण थकून जाण्याची शक्यता आहे? (ब) कोणता प्रश्‍न विचारात घेण्याची गरज आहे?

देवाच्या सामर्थ्याला सीमा नाही. पण मनुष्यांचे तसे नाही. ते थकतात. सभोवताल नजर फिरवली तर आपल्याला कितीतरी थकलेले चेहरे दिसतील. सकाळी झोपेतून उठल्यावरही ते थकलेले असतात, कामाला किंवा शाळेला जातात तेव्हाही थकलेले असतात, घरी परततात तेव्हा आणखी थकलेले असतात आणि शेवटी अगदीच थकूनभागून ते झोपी जातात. बरेच जण विचार करतात की थोडे दिवस कुठेतरी जाऊन फक्‍त आराम करता आला तर किती बरे होईल! यहोवाची सेवा करत असताना आपण देखील थकतो. सुभक्‍तीचे आचरण करत असताना आपल्याला बरेच परिश्रम किंवा यत्न करावे लागतात. (मार्क ६:३०, ३१; लूक १३:२४; १ तीमथ्य ४:८) शिवाय इतरही कारणांमुळे आपण शारीरिक आणि मानसिकरित्या थकतो.

आपण ख्रिस्ती आहोत याचा अर्थ सर्वसामान्य लोकांना असणाऱ्‍या समस्या आपल्याला नाहीत असे नाही. (ईयोब १४:१) आजारपण, आर्थिक समस्या, किंवा जीवनातील इतर समस्यांमुळे आपण निराश होतो, हतबल होतो. या समस्यांसोबत, धार्मिकतेमुळे देवाच्या लोकांना जो छळ सोसावा लागतो तो वेगळा! (२ तीमथ्य ३:१२; १ पेत्र ३:१४) कधीकधी जगाच्या दबावांमुळे आणि राज्य-प्रचाराच्या कार्याला होणाऱ्‍या विरोधामुळे मानसिक थकवा इतका वाढतो की यहोवाच्या सेवेत आपला आवेश कमी होऊ लागतो. आपण देवाला निष्ठावान राहू नये म्हणून दियाबल सैतान जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहे. तर मग, सैतानाच्या दबावांना तोंड देण्याकरता आणि यहोवाच्या सेवेत टिकून राहण्याकरता लागणारे आध्यात्मिक सामर्थ्य आपल्याला कसे मिळवता येईल?

५. केवळ मनुष्याच्या शक्‍तीने ख्रिस्ती सेवा पार पाडणे शक्य नाही असे का म्हणता येते?

आपल्याला आध्यात्मिक सामर्थ्य किंवा ताकद आपला सर्वसमर्थ निर्माणकर्ताच देऊ शकतो; त्याच्यावरच आपण अवलंबून राहिले पाहिजे. प्रेषित पौलाने स्पष्ट केल्याप्रमाणे ख्रिस्ती सेवा ही अपरिपूर्ण मनुष्यांच्या सामर्थ्याने साध्य करणे शक्य नाही. त्याने लिहिले: “आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.” (२ करिंथकर ४:७) आज अभिषिक्‍त ख्रिस्ती, पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या आपल्या सोबत्यांच्या सहकार्याने “समेटाची सेवा” पार पाडत आहेत. (२ करिंथकर ५:१८; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) अपरिपूर्ण मानव असून आपण देवाचे काम करत आहोत, आणि आपला विरोध करणारेही बरेचजण आहेत; तेव्हा केवळ स्वतःच्या सामर्थ्याने हे काम आपण करूच शकत नाही. तर यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचे साहाय्य आपल्याला पुरवतो आणि अशारितीने आपल्या दुर्बलतेतून त्याचे सामर्थ्य प्रकट करतो. “नीतिमानांचा आधार परमेश्‍वर आहे,” हे आश्‍वासन खरोखर किती दिलासा देणारे आहे!—स्तोत्र ३७:१७.

‘यहोवा आपले सामर्थ्य आहे’

६. यहोवा आपले सामर्थ्य आहे याचे बायबल आपल्याला कशाप्रकारे आश्‍वासन देते?

आपला स्वर्गीय पिता “प्रबळ सत्ताधीश” आहे; आपल्याला बळ किंवा ताकद देणे हे त्याच्याकरता कठीण नाही. बायबल म्हणते: “[यहोवा] भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्‍वराची आशा धरून राहणारे नवीन शक्‍ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.” (यशया ४०:२९-३१) जीवनातल्या वाढत्या दबावांमुळे कधीकधी आपली दशा स्पर्धेत धावणाऱ्‍या धावपटूसारखी होते. तो अगदी दमून गेलेला असतो, आणखी एकही पाऊल टाकता येणार नाही अशी त्याची स्थिती झालेली असते. पण लक्षात असू द्या, जीवनाच्या स्पर्धेची अंतिम रेषा अगदी जवळ आली आहे; या टप्प्यावर आपण निराश होता कामा नये. (२ इतिहास २९:११) आपला शत्रू, दियाबल “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा” फिरत आहे; तो आपल्याला खाली पाडू इच्छितो. (१ पेत्र ५:८) पण आपण सदैव हे आठवणीत ठेवले पाहिजे की ‘परमेश्‍वर आपले सामर्थ्य व आपली ढाल आहे.’ ‘भागलेल्यास जोर देण्याकरता’ त्याने कितीतरी तरतुदी केल्या आहेत.—स्तोत्र २८:७.

७, ८. यहोवाने दावीद, हबक्कूक आणि पौल यांना शक्‍ती दिली हे आपण कशावरून म्हणू शकतो?

यहोवाने दावीदाला अनेक अडथळ्यांवर मात करण्याकरता सामर्थ्य दिले. म्हणूनच दावीद यहोवावर पूर्ण विश्‍वास व भरवसा ठेवून असे म्हणू शकला: “देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंस तुडवून टाकील.” (स्तोत्र ६०:१२) संदेष्टा हबक्कूक याला देखील यहोवाने त्याचे कार्य पूर्ण करण्याकरता शक्‍ती दिली. हबक्कूक ३:१९ म्हणते: “परमेश्‍वर प्रभु, माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करितो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो.” पौलाने देखील यहोवावर विसंबून राहण्याचे उत्तम उदाहरण मांडले; त्याने लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.

दावीद, हबक्कूक व पौल यांच्याप्रमाणे आपणही पूर्ण विश्‍वास बाळगला पाहिजे की यहोवा देव आपल्याला ताकद देण्यास आणि आपले संरक्षण करण्यास समर्थ आहे. सर्वोच्च प्रभु यहोवा आपले “सामर्थ्य” आहे हे तर आपण पाहिले आहे. आता आपण पाहू या, की आध्यात्मिक शक्‍ती मिळवण्याकरता देवाच्या अनेक तरतुदींचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो.

आपल्याला ताकद देणाऱ्‍या आध्यात्मिक तरतुदी

९. आध्यात्मिक पोषण मिळवण्याकरता बायबल आधारित प्रकाशने आपल्याला कशी मदत करतात?

संस्थेच्या प्रकाशनांच्या साहाय्याने बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक उत्साह आणि ताकद मिळते. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “जो पुरुष . . . परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:१-३) शारीरिक ताकद टिकवण्यासाठी ज्याप्रमाणे अन्‍न आवश्‍यक आहे त्याचप्रमाणे, आध्यात्मिक ताकद टिकवण्यासाठी देवाच्या वचनातून व बायबल आधारित प्रकाशनांतून मिळणारे आध्यात्मिक अन्‍न घेणे आवश्‍यक आहे. म्हणूनच अर्थपूर्ण अभ्यास आणि मनन करणे महत्त्वाचे आहे.

१०. आपण अभ्यास व मनन करण्याकरता केव्हा वेळ काढू शकतो?

१० ‘देवाच्या गहन गोष्टींवर’ मनन करणे देखील आपल्याकरता अत्यंत फायदेकारक ठरते. (१ करिंथकर २:१०) पण मनन करण्यासाठी आपण केव्हा वेळ काढू शकतो? अब्राहामाचा पुत्र ‘इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला होता’ असे आपण बायबलमध्ये वाचतो. (उत्पत्ति २४:६३-६७) स्तोत्रकर्ता दावीद ‘रात्रीच्या प्रहरात देवाचे ध्यान करत असे.’ (स्तोत्र ६३:६, पं.र.भा.) आपण देखील पहाटे, संध्याकाळी, रात्री किंवा कोणत्याही वेळी देवाच्या वचनाचा अभ्यास व त्यावर मनन करू शकतो. अभ्यास व मनन यापाठोपाठ, आध्यात्मिक ताकद देणारी यहोवा देवाची आणखी एक तरतूद म्हणजे प्रार्थना.

११. नियमित प्रार्थना करण्याचे महत्त्व आपण का ओळखले पाहिजे?

११ देवाला नियमित प्रार्थना केल्यामुळे खरोखर आपल्याला आध्यात्मिक उत्साह मिळतो. म्हणूनच आपण ‘प्रार्थनेत तत्पर राहिले’ पाहिजे. (रोमकर १२:१२) कधीकधी आपल्याला एखाद्या विशिष्ट समस्येला तोंड देण्याकरता सुबुद्धी आणि ताकद यांची आवश्‍यकता असते. अशावेळी आपण यहोवाला प्रार्थना करताना या समस्येचा स्पष्टपणे उल्लेख केला पाहिजे. (याकोब १:५-८) तसेच यहोवाचे उद्देश किती अद्‌भुतरित्या पूर्ण होत आहेत हे आपण पाहतो, किंवा त्याच्या सेवेत टिकून राहण्याकरता त्याने आपल्याला शक्‍ती दिल्याचे अनुभवतो तेव्हा आपण त्याचे उपकार मानले पाहिजे व त्याची स्तुती केली पाहिजे. (फिलिप्पैकर ४:६, ७) आपण सदोदीत प्रार्थना करून यहोवासोबत घनिष्ट नाते ठेवले तर तो आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही. एका स्तोत्रात दावीद म्हणतो, “पाहा! देव माझा साहाय्यकर्ता आहे.”—स्तोत्र ५४:४.

१२. आपण पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळण्याकरता यहोवाकडे का प्रार्थना केली पाहिजे?

१२ आपला स्वर्गीय पिता यहोवा आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने शक्‍ती व सामर्थ्य देतो. पौलाने लिहिले: “स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करितो की, त्याने आपल्या ऐश्‍वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्‍न व्हावे.” (इफिसकर ३:१४-१६) आपण पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळण्याकरता यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे, हा विश्‍वास बाळगून की तो जरूर आपल्याला त्याचा आत्मा देऊन आशीर्वादित करेल. येशूने म्हटले, एखाद्या मुलाने मासा मागितल्यास त्याचा पिता त्याला साप देईल का? निश्‍चितच तो असे करणार नाही. यावरून येशूने म्हटले: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:११-१३) आपणही अशाच भरवशाने प्रार्थना केली पाहिजे. आणि हा विश्‍वास बाळगला पाहिजे की देव आपल्या विश्‍वासू सेवकांना आपल्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने “बलसंपन्‍न” करतो.

मंडळीच्या माध्यमातून आध्यात्मिक शक्‍ती

१३. ख्रिस्ती सभांविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा?

१३ ख्रिस्ती मंडळीच्या सभांच्या माध्यमातून यहोवा आपल्याला आध्यात्मिकरित्या उत्साहित करतो. येशूने म्हटले होते: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” (मत्तय १८:२०) मंडळीत नेतृत्त्व करणाऱ्‍यांनी लक्ष देण्याजोग्या बाबींच्या संदर्भात येशूने हे अभिवचन दिले होते. (मत्तय १८:१५-१९) पण त्याचे शब्द आपल्या सर्व सभांना, समेलंनांना लागू होतात कारण या सर्व सभांच्या सुरवातीला व समारोपाला त्याच्या नावाने प्रार्थना केली जाते. (योहान १४:१४) म्हणूनच, कमी लोक असोत किंवा हजारोंच्या संख्येने लोक असोत, या सर्व सभांना उपस्थित राहणे हा आपण एक बहुमान समजला पाहिजे. यहोवाने आपल्याला आध्यात्मिकरित्या बळकट करण्याकरता आणि प्रीती व सत्कर्मे यांकरता उत्तेजित करण्याकरता या सर्व सभांची तरतूद केल्याबद्दल आपण त्याचे नेहमी आभार मानले पाहिजे.—इब्री लोकांस १०:२४, २५.

१४. ख्रिस्ती वडिलांच्या परिश्रमामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?

१४ मंडळीतले ख्रिस्ती वडील देखील आपल्याला आध्यात्मिक साहाय्य आणि उत्तेजन देतात. (१ पेत्र ५:२, ३) आज ज्याप्रमाणे प्रवासी पर्यवेक्षक वेगवेगळ्या मंडळ्यांची सेवा करतात त्याप्रमाणे पौलाने बऱ्‍याच मंडळ्यांची सेवा केली व त्यांना उत्तेजन दिले. त्याला तर ख्रिस्ती बांधवांकडे जाण्याची, त्यांना उत्तेजन देण्याची आणि त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळवण्याची सदोदीत उत्कंठा वाटत असे. (प्रेषितांची कृत्ये १४:१९-२२; रोमकर १:११, १२) आपल्या मंडळीतल्या वडिलांचा आणि इतर ख्रिस्ती पर्यवेक्षकांचा आपल्या आध्यात्मिक प्रगतीत मोठा वाटा आहे; या बांधवांची आपण नेहमी कदर बाळगली पाहिजे.

१५. मंडळीतले आपले बांधव आपल्याला कशाप्रकारे “मोठा आधार” देतात?

१५ ख्रिस्ती मंडळीत आपल्यासोबत मिळून यहोवाची उपासना करणारे आपले बांधव देखील आपल्याला “मोठा आधार” देतात. (कलस्सैकर ४:१०, ११, ईजी टू रीड व्हर्शन) आपल्यावर एखादा दुःखद प्रसंग ओढवल्यास ते खऱ्‍या ‘मित्राप्रमाणे’ धावून येतात. (नीतिसूत्रे १७:१७) उदाहरणार्थ, १९४५ साली सॅक्सेनहाउसन छळ छावणीतून देवाच्या सेवकांपैकी २२० जणांना मुक्‍त करण्यात आले. त्यांना २०० किलोमीटर पायी चालत जायचे होते. त्यांच्यापैकी काहीजण खूपच अशक्‍त होते. पण ते सर्वजण एकमेकांसोबत राहिले. त्यांच्याजवळ काही लहान हातगाड्या होत्या; सर्वात अशक्‍त बांधवांना त्यात बसवून इतर बांधवांनी त्यांना ओढून नेले. हे सर्व बांधव सुखरूप पोचले का? छळ छावणीतून सुटका झालेल्या इतर लोकांपैकी याच २०० किलोमीटरच्या प्रवासात १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. पण यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकालाही आपला जीव गमवावा लागला नाही. याप्रकारच्या कित्येक घटनांविषयी वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनांतून वृत्त दिले जाते, जसे की इयरबुक तसेच जेहोवाज विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंगडम. * आपल्या लोकांनी हिंमत हारू नये म्हणून यहोवा त्यांना कशी शक्‍ती देतो हे यांसारख्या घटनांवरून दिसून येते.—गलतीकर ६:९.

क्षेत्र सेवेतून मिळणारी शक्‍ती व उत्साह

१६. सेवाकार्यात नियमित सहभाग घेतल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे आध्यात्मिक शक्‍ती मिळते?

१६ राज्य प्रचाराच्या कार्यात नियमित सहभाग घेतल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळते. या कार्यामुळे, देवाच्या राज्यावर, अनंतकाळावर आणि देवाच्या राज्याकरवी मिळणार असलेल्या अद्‌भुत आशीर्वादांवर लक्ष केंद्रित ठेवण्याकरता आपल्याला मदत मिळते. (यहुदा २०, २१) सेवेत जेव्हा आपण बायबलमध्ये दिलेली यहोवाची अभिवचने लोकांना दाखवतो तेव्हा आपली आशा आणखी दृढ होते. आपण देखील संदेष्ट्या मीखाप्रमाणे दृढनिश्‍चयाने म्हणू शकतो: “आम्ही परमेश्‍वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:५.

१७. बायबल अभ्यासांच्या संदर्भात कोणत्या उपयोगी सूचना देण्यात आल्या आहेत?

१७ इतरांना बायबलमधून सत्याचे ज्ञान देताना यहोवासोबतचे आपले नाते देखील दिवसेंदिवस दृढ होत जाते. उदाहरणार्थ सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून बायबल अभ्यास घेताना, परिच्छेदात उल्लेखलेली जास्तीतजास्त वचने वाचून त्यांवर चर्चा केली पाहिजे. यामुळे विद्यार्थ्याच्या ज्ञानात तर भर पडतेच, शिवाय आपली स्वतःची आध्यात्मिक समजबुद्धी देखील वाढते. विद्यार्थ्याला एखादा विषय किंवा एखादे उदाहरण समजायला कठीण वाटत असेल तर समजावून सांगण्याकरता पुरेसा वेळ घ्या. प्रत्येक आठवडी, ज्ञान पुस्तकातील एक अध्याय पूर्ण केलाच पाहिजे असे नाही. इतरांना देवाच्या जवळ येण्यास मदत करण्याकरता आपण अभ्यासाची चांगली तयारी करून जातो, आणि यामुळे आपला आनंद द्विगुणीत होतो.

१८. ज्ञान पुस्तकाचा कशाप्रकारे परिणामकारकरित्या उपयोग केला जात आहे हे उदाहरण देऊन सांगा.

१८ दर वर्षी, हजारो लोकांना ज्ञान पुस्तकाच्या साहाय्याने यहोवाचे समर्पित सेवक बनण्याकरता मदत केली जात आहे. यांपैकी बऱ्‍याच लोकांना तर पूर्वी बायबलविषयी काहीच ज्ञान नव्हते. उदाहरणार्थ, श्रीलंकेतील एका हिंदू माणसाने लहानपणी एक साक्षीदार बहीण परादीसविषयी सांगत असताना ऐकले होते. काही वर्षांनी तो त्या बहिणीजवळ याविषयी विचारण्याकरता गेला. लवकरच बहिणीच्या पतीने या मुलासोबत अभ्यास करायला सुरवात केली. तो दररोज अभ्यासाकरता येत असे; त्यामुळे ज्ञान पुस्तक पूर्ण करायला फार वेळ लागला नाही. तो सर्व सभांनाही येऊ लागला; पूर्वीच्या धर्माशी त्याने संबंध तोडला आणि नंतर तो एक राज्य प्रचारक बनला. त्याचा बाप्तिस्मा होण्याआधीच तो त्याच्या ओळखीच्या एका व्यक्‍तीचा बायबल अभ्यास घेऊ लागला होता.

१९. देवाच्या राज्याला जीवनात प्राधान्य देत असताना आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१९ राज्याला आपण जीवनात प्राधान्य देतो तेव्हा आपोआपच आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळते. (मत्तय ६:३३) आपल्यापुढे कित्येक परीक्षा येतात पण तरीही आपण राज्याची सुवार्ता आवेशाने आणि आनंदाने घोषित करण्याचे थांबवत नाही. (तीत २:१४) आपल्यापैकी बरेच जण पूर्णवेळची सेवा करत आहेत, तर काहीजण प्रचारकांची जेथे जास्त गरज आहे अशा भागांत सेवा करण्यासाठी स्वतःहून जात आहेत. कोणत्याही मार्गाने का होईना, आपण देवाच्या राज्याच्या वाढीकरता परिश्रम करतो, तेव्हा आपण हा भरवसा बाळगू शकतो की यहोवा आपले श्रम आणि त्याच्या नावाबद्दल आपण दाखवलेले प्रेम कधीही विसरणार नाही.—इब्री लोकांस ६:१०-१२.

यहोवाच्या सामर्थ्याने पुढे वाटचाल करा

२०. यहोवा आपले सामर्थ्य आहे आणि त्याच्यावरच आपली आशा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

२० यहोवा आपले सामर्थ्य आहे, आणि त्याच्यावरच आपली आशा आहे हे आपण आपल्या सर्व कृतींतून दाखवून दिले पाहिजे. यासाठी आपण यहोवाने त्याच्या ‘विश्‍वासू दासाच्या’ माध्यमाने केलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींचा फायदा करून घेतला पाहिजे. (मत्तय २४:४५) ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने देवाच्या वचनाचा मंडळीच्या सभांमध्ये व वैयक्‍तिकरित्या अभ्यास, मनःपूर्वक प्रार्थना, वडिलांकडून मिळणारे आध्यात्मिक साहाय्य, विश्‍वासू बांधवांची प्रोत्साहनदायक उदाहरणे आणि सेवाकार्यात नियमित सहभाग; या सर्व आध्यात्मिक तरतुदी, यहोवाने त्याच्यासोबत आपले नाते दृढ करण्यासाठी आणि त्याच्या पवित्र सेवेत पुढे वाटचाल करत राहण्यासाठी पुरवल्या आहेत.

२१. प्रेषित पेत्राने व पौलाने देवाकडून मिळणाऱ्‍या सामर्थ्यावर आपण विसंबून असल्याचे कसे व्यक्‍त केले?

२१ आपण मुळात दुर्बल असलो तरीही, यहोवावर विसंबून राहिलो तर तो आपल्याला ताकद देईल. यहोवाच्या मदतीची आपल्याला गरज आहे हे ओळखून प्रेषित पेत्राने लिहिले: “सेवा करणाऱ्‍याने ती आपण देवाने दिलेल्या शक्‍तीने करीत आहो, अशी करावी.” (१ पेत्र ४:११) देवाकडून मिळणाऱ्‍या सामर्थ्यावर आपण विसंबून आहोत हे प्रेषित पौलाने देखील व्यक्‍त केले: “ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्‍यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथकर १२:१०) आपणही पौलाप्रमाणेच पूर्ण विश्‍वास बाळगून, निर्बलास बल देणाऱ्‍या सर्वसमर्थ याह यहोवाचे गौरव करू या.—यशया १२:२.

[तळटीपा]

^ परि. 1 ही संख्या, अमेरिकन पद्धतीनुसार एकावर २० शून्य इतकी आहे.

^ परि. 15 वॉचटावर बायबल आणि ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाच्या लोकांना अधिक सामर्थ्याची गरज का आहे?

• देव आपल्या सेवकांना सामर्थ्य देतो हे बायबलमधून कसे स्पष्ट होते?

• यहोवाने आपल्याला बळकट करण्याकरता कोणत्या आध्यात्मिक तरतुदी केल्या आहेत?

• सामर्थ्याकरता यहोवावरच आपली आशा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्र]

इतरांना बायबलमधून सत्याचे ज्ञान देताना यहोवासोबतचे आपले नाते देखील दिवसेंदिवस घनिष्ट होत जाते