व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चीआपासच्या उंच पठारी प्रदेशापर्यंत शांतीची सुवार्ता पोहंचते

चीआपासच्या उंच पठारी प्रदेशापर्यंत शांतीची सुवार्ता पोहंचते

चीआपासच्या उंच पठारी प्रदेशापर्यंत शांतीची सुवार्ता पोहंचते

“चीआपास राज्यात मानवतेला काळीमा फासणारी एक घटना घडली. एका . . . शस्त्रधारी टोळीने ४५ लाचार शेतकऱ्‍यांची आणि १३ निष्पाप बालकांची निर्घृणपणे हत्या केली.” अशी बातमी डिसेंबर २२, १९९७ च्या “एल युनिव्हर्सल” या बातमीपत्रात छापून आली होती. ही घटना चीआपास राज्यातील ॲक्टीएल शहरात घडली होती.

चीआपास राज्य मेक्सिकोच्या अतिदक्षिणेकडे व ग्वाटेमालाच्या सीमेवर वसले आहे. गरिबी आणि अन्यायाला कंटाळून स्थानिक मायावंशीय इंडियन्सच्या एका गटाने १९९४ सालच्या जानेवारी महिन्यात, इजेरसिटो झापाटिस्टा डी लिबेरासियॉन नासियोनलच्या (EZLN, नॅशनल लिबरेशन झापाटिस्टा आर्मी) नावाखाली सशस्त्र बंड पुकारले. यावर शांतीमय उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते नेहमी रेंगाळत गेले. शासन आणि बंडखोरांनी केलेल्या छाप्यांमुळे व लोकांना अटक केल्यामुळे शांती येण्याऐवजी निष्पाप लोकांच्या रक्‍ताचे पाट वाहिले, अनेक लोक आपला जीव गमावून बसले. यामुळे पुष्कळ शेतकऱ्‍यांना आपला जीव वाचवण्यासाठी आपले घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी पळून जावे लागले.

पण या अशांत राज्यात एक गट असा आहे जो शांतीची जोपासना करतो आणि या अनिश्‍चित व राजकीय झगडे चाललेल्या परिस्थितीत तटस्थ आहे. या गटातील लोक सर्वांना हा संदेश अगदी आवेशाने सांगत आहेत, की संपूर्ण जगभरात राहणाऱ्‍या मानवजातीला भेडसावत असलेल्या समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे देवाचे राज्य. (दानीएल २:४४) पण हे लोक कोण आहेत? या लोकांना यहोवाचे साक्षीदार म्हटले जाते. येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करून हे यहोवाचे साक्षीदार चीआपासच्या पठारावर दूरवर राहणाऱ्‍या लोकांपर्यंत देवाच्या राज्याची सुवार्ता पोहंचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. (मत्तय २४:१४) पण चीआपासमधील अशांत वातावरणात त्यांनी कशाप्रकारे प्रचार कार्य केले आणि त्यांना कोणते प्रतिफळ मिळाले त्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

“मी यहोवाचा साक्षीदार आहे”

अडॉल्फो ओकोसिंगोमधील रेडिओ स्टेशनमध्ये काम करतो. अलिकडेच तो राज्य प्रचारक बनला होता. असेच एकदा काम करत असताना कोणी तरी जोरजोराने दार वाजवू लागले. अडॉल्फोने दार उघडताच काही बुरखाधारी लोक सरळ आत घुसले आणि त्या सर्वांनी अडॉल्फोच्या डोक्यावर बंदुका रोखून धरल्या. त्यातील काही जण प्रक्षेपण विभागात गेले आणि त्यांनी सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचे रेडिओवरून घोषित केले.

मग ते अडॉल्फोला म्हणाले की तूही आमच्या गटात सामील हो. त्यांनी त्याला गणवेष आणि बंदुकही दिली. पण अडॉल्फोने या गोष्टी घेण्यास नकार दिला. अद्याप त्याचा बाप्तिस्मा झाला नव्हता तरीसुद्धा त्याने त्यांना उत्तर दिले, “मी यहोवाचा साक्षीदार आहे.” त्याने त्यांना समजावून सांगितले, की फक्‍त देवाचे राज्यच या पृथ्वीवर शांती आणू शकते. हा मनुष्य आपल्यापुढे वाकणार नाही हे पाहिल्यावर त्यांनी त्याला जाऊ दिले. या घटनेविषयी बोलताना अडॉल्फो म्हणाला: “या घटनेमुळे माझा विश्‍वास आणखी पक्का झाला.”

काही दिवसांनंतर परिस्थिती शांत झाली खरी; पण अजूनही लष्कराचेच वर्चस्व होते. अशा परिस्थितीतही, अडॉल्फोला एका स्थानिक मंडळीच्या वडिलांनी, दंगा झालेल्या क्षेत्रातील ख्रिश्‍चनांच्या एका गटाबरोबर कार्य करण्यास सांगितले तेव्हा त्याने हे आमंत्रण आनंदाने स्वीकारले. प्रवासादरम्यान येणाऱ्‍या प्रत्येक चेकपॉईन्ट्‌सला तो, स्वतःची ओळख यहोवाचा साक्षीदार असल्याचे करून द्यायचा. त्यामुळे सर्व सैनिक त्याचा आदर करायचे. कालांतराने अडॉल्फोचा बाप्तिस्मा झाला. ख्रिश्‍चनांच्या त्या गटाची एक मंडळी तयार झाली तेव्हा अडॉल्फोला खूप आनंद झाला; आपल्या परिश्रमांचे सार्थक झाल्याचे समाधान त्याला वाटले. अडॉल्फो म्हणतो: “आता माझा बाप्तिस्मा झाला आहे आणि मी ठामपणे म्हणू शकतो, की मी यहोवाचा साक्षीदार आहे!”

“यहोवानं आम्हाला सांभाळलं”

EZLN गटाने रेडिओवरून सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याची घोषणा केल्यानंतर लगेच लोक शहर सोडून पळून गेले. पळून गेलेल्या लोकांमध्ये पूर्ण वेळेचा एक सेवक फ्रान्सिस्को आणि त्यांची पत्नी देखील होती. पण यहोवाने त्यांना कशी मदत केली त्याबद्दल ते आपल्याला काय सांगतात ते पाहा.

“आम्ही एका ठिकाणी जायचं ठरवलं. पायी चालत गेल्यास तीन तास लागतात या ठिकाणी पोहंचायला. तिथं एक मंडळी असल्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही बांधवांबरोबरच राहू शकतो. काही दिवसांनंतर पालेनक्यू या ठिकाणी विभागीय संमेलन होणार होते. संमेलनाआधी होणारी पायनियर सभा आम्हा पतीपत्नीला चुकवायची नव्हती. पण संमेलनाचा मार्ग तर EZLN गटाच्या लोकांनी अडवला होता. म्हणून आम्ही दुसऱ्‍या मार्गाने म्हणजे जंगलातून जायचे ठरवले. या मार्गानं गेल्यास, तिथं पोहंचायला आम्हाला नऊ तास लागणार होते. तरीपण आम्ही निघालो आणि पायनियर सभेला उपस्थित राहू शकलो. पायनियर सभेला तर उपस्थित राहता आलेच शिवाय संमेलनाचा संपूर्ण कार्यक्रमही ऐकायला मिळाला म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला.

“पण आम्ही आमच्या घरी परतलो तेव्हा आमचं घर जळाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं, आमची जनावरं देखील लोकांनी चोरुन नेली होती. फक्‍त कपडे असलेली एक बॅगच तेवढी उरली होती. आमच्या घराची ही दशा पाहून आम्हाला वाईट वाटले, पण ओकोसिंगोतील बांधवांनी आम्हाला त्यांच्या घरात आश्रय दिला. आम्ही मुळात शेतकरी आहोत. पण या बांधवांनी आम्हाला शेतीव्यतिरिक्‍त दुसरीही कामं करायला शिकवले. एका बांधवानं मला फोटो कसे काढायचे ते शिकवले. दुसऱ्‍या बांधवानं मला बूट कसे दुरुस्त करायचे ते शिकवले. पायनियरींग न सोडता हीच कामं करून आम्ही आता आमची पोटं भरत आहोत. जे घडले त्यावर विचार केल्यावर आम्हाला समजलं, की आमच्यावर गुदरलेली परिस्थिती साधीसुधी नव्हती; पण यहोवानं आम्हाला सांभाळलं आणि सर्व काही सहन करायला शक्‍ती दिली.”

पेरलेले बी फळ देते

चीआपास राज्यातील साक्षीदार, त्यांच्यावर आलेल्या या संकटामुळे घाबरून घरात बसले नाहीत. उलट, लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी खास परिश्रम घेतले. उदाहरणार्थ, १९९५ सालच्या एप्रिल व मे महिन्यात त्यांनीही जगातील इतर बांधवांप्रमाणे किंगडम न्यूज क्र. ३४ या पत्रिकेच्या वितरण मोहिमेत भाग घेतला. त्या पत्रिकेचे शीर्षक अगदी उचित होते: जीवन इतक्या समस्यांनी ग्रस्त का आहे?

या मोहिमेदरम्यान पिऊब्लो नुईवो नावाच्या एका ठिकाणी, सिरो नावाच्या सामान्य पायनियरला सत्याबद्दल आवड दाखवणारे एक कुटुंब भेटले. तीन दिवसांनंतर सिरोने त्यांना पुन्हा भेट देऊन त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. पण दुसऱ्‍या वेळेस जेव्हा सिरो व आणखी एक बांधव बायबल अभ्यासासाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्या कुटुंबातले कोणीच घरात नव्हते, उलट, बुरखाधारी लोकांचा एक गट त्या घरातल्या लोकांची वाट पाहत बसला होता. ते या मनुष्याच्याच शोधात आले होते. त्यांनी सिरोला आणि त्याच्याबरोबर आलेल्या बांधवाला त्यांच्या येण्याचा उद्देश विचारला. त्याने त्यांना ठार मारण्याचीही धमकी दिली. आपल्या या दोन बांधवांनी मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना केली आणि त्या बुरखाधारी लोकांना सांगितले, की ते या कुटुंबाबरोबर बायबलचा अभ्यास करतात. हे स्पष्टीकरण ऐकल्यावर त्या बुरखाधारी लोकांनी या दोघांना जाऊ दिले. पण त्या घरातील तो मनुष्य कोणत्या तरी कारणास्तव त्या दिवशी घरी गेला नाही.

पण या गोष्टीला जवळजवळ तीन वर्षे उलटून गेल्यानंतर तोच मनुष्य सिरोच्या दारात उभा राहिला तेव्हा सिरोला खूप आश्‍चर्य वाटले. सिरोला त्याने सांगितले की तो आपल्या कुटुंबाला घेऊन दुसरीकडे राहायला गेला होता आणि तेथे बायबलचा अभ्यास करून त्याच्या संपूर्ण कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला होता. सध्या ते ग्वाटेमालामधील एका मंडळीत होते. त्यांची एक मुलगी सामान्य पायनियरींगही करते!

आध्यात्मिक अन्‍नाबद्दल कदर

चीआपासमध्ये चाललेल्या या दंगलीतही साक्षीदारांनी सभांना एकत्र येण्याचे सोडले नाही असे एका प्रांतीय पर्यवेक्षकांनी सांगितले. (इब्री लोकांस १०:२४, २५) त्यांनी अलिकडेच झालेल्या एका खास दिवसीय संमेलनाविषयी सांगितले. या संमेलनाचा कार्यक्रम सकाळी लवकर ठेवण्यात आला होता जेणेकरून उपस्थित असलेले लोक दिवस मावळायच्या आत आपापल्या घरी जाऊ शकतील. संमेलन ज्या ठिकाणी झाले तेथे पोहंचण्यासाठी बहुतेक बंधूभगिनींना तीनपेक्षा अधिक तास जंगलातून चालावे लागले आणि तरीसुद्धा सर्वजण सकाळी ७ वाजता आपल्या जागेवर होते. श्रोत्यांमध्ये EZLN गटातील सहा लोकही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रम ऐकला आणि श्रोत्यांबरोबर टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्‍त केला. असे दिसते की त्यांनाही कार्यक्रम आवडला होता. संमेलनाला येण्यासाठी तेही इतर बांधवांप्रमाणे तीन तास चालत आले होते. नंतर, या EZLN गटातील वीस लोक, स्थानिक राज्य सभागृहात झालेल्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित राहिले.

गनिमी चळवळीतील एकाला त्याच्या अधिकाऱ्‍यांनी एका विशिष्ट जंगल क्षेत्रात गस्त घालण्यासाठी नेमले. त्या क्षेत्रातील वस्तीत आल्यावर त्याने पाहिले की वस्तीत कुत्रं सुद्धा दिसत नव्हते. सर्वजण आपापली घरे सोडून गेले होते. सोडून गेलेल्यांपैकी बहुतेक लोक यहोवाचे साक्षीदार होते. मग हा मनुष्य असाच एका निर्जन घरात गेला. त्याने घरात इकडे तिकडे पडलेली काही पुस्तके उचलली आणि दुसरे काही काम नसल्यामुळे तो ती वाचू लागला. हे घर साक्षीदारांचं असल्यामुळे ही पुस्तके वॉच टावर संस्थेची होती. या एकांतामुळे या मनुष्याला वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी वेळ मिळाला होता. आपली जीवनशैली बदलण्याचा व शस्त्र बाळगण्याचे सोडून देण्याचा त्याने निर्णय घेतला. होता होईल तितक्या लवकर त्याने साक्षीदारांना शोधून काढले आणि बायबलचा अभ्यास सुरू केला. सहा महिन्यात तो इतरांनाही सुवार्ता सांगू लागला. तो आणि एकेकाळी गनिमी चळवळीचे समर्थन करणारे त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य आता बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती आहेत.

सकारात्मक बाजू

चीआपासमध्ये उसळलेल्या या दंगलीमुळे बांधवांना अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले खरे, पण याच संघर्षामुळे अनेक लोकांचा प्रचार कार्याविषयीचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी जे लोक ऐकत नसत ते ऐकू लागले आहेत. दंगल नेमकी ज्या शहरात सुरू झाली तेथे राहणारे वडील म्हणाले: “दंगल सुरू होऊन पाच दिवस उलटले होते. आम्ही शहरात आणि शहराच्या बाहेर जाऊन प्रचार कार्य करण्याची योजना केली. आम्ही सांगत असलेला संदेश लोक लक्ष देऊन ऐकत होते. आम्ही पुष्कळ बायबल साहित्य लोकांना दिले आणि अनेक बायबल अभ्यास देखील सुरू केलेत. एका क्षेत्रात आम्ही गेलो, तिथं लोक पूर्वी आमचा खूप विरोध करायचे पण दंगलीनंतर ते आमचं ऐकू लागले, बायबल अभ्यास करू लागले आणि सभांना व संमेलनांना देखील उपस्थित राहू लागले.”

बांधवांना एका गोष्टीचा आनंद होतो, की या अशांत वातावरणातही त्यांनी त्यांच्या ईश्‍वरशासित कार्यहालचाली थांबवल्या नाहीत. साक्षीदार जेव्हा संमेलने भरवतात तेव्हा सरकार आणि EZLN गटाला त्याची माहिती असते. या संमेलनांमुळे साक्षीदारांची आध्यात्मिकता आणखी वाढते. प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटींमुळे देखील बांधवांना प्रचार कार्य करीत राहण्यासाठी बरेच प्रोत्साहन मिळते. विशेष म्हणजे, जे लोक दंगलीत सामील आहेत त्यांच्याकडूनही साक्षीदारांना त्यांचे प्रचार कार्य चालू ठेवण्याचे उत्तेजन मिळते.

चीआपासमधील लोकांना सहन करावी लागलेली परिस्थिती आता पूर्णपणे नाही तरी काहीशी सुधरली आहे. पण परिस्थिती काहीही असो, यहोवाच्या साक्षीदारांनी देवाचे वचन बायबल यांतील शांतीची सुवार्ता सांगण्याचा निर्धार केला आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:३४-३६; इफिसकर ६:१५) संदेष्टा यिर्मयाने म्हटले होते, की “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) साक्षीदार यिर्मया संदेष्ट्याच्या या शब्दांची सत्यता ओळखतात. त्यांचा विश्‍वास आहे की येशू ख्रिस्त ज्या राज्याचा राजा आहे ते देवाचे राज्यच जगातील अन्याय व दारिद्र्‌य कायमचे काढून टाकील.—मत्तय ६:१०.

[९ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

मेक्सिकोचे आखात

चीआपास

ग्वाटेमाला

पॅसिफिक महासागर

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[९ पानांवरील चित्र]

चीआपासच्या डोंगराळ भागातून सेवेला निघालेले साक्षीदार