तुम्ही देवाची सेवा का करता?
तुम्ही देवाची सेवा का करता?
एका देवभिरू राजाने आपल्या मुलाला एकदा सल्ला दिला: “तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि पूर्ण हृदयाने व आनंदी अंतःकरणाने त्याची सेवा कर.” (१ इतिहास २८:९; NW) होय, आपल्या सेवकांनी आनंदाने आणि कृतज्ञतेने आपली उपासना करावी असे यहोवा देवाला वाटते.
यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेकजण कबूल करतात, की बायबलमधील सुखद आशांविषयी त्यांनी पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्यांची अंतःकरणे कृतज्ञ भावनेने दाटून आली होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी ते देवाच्या उद्देशांविषयी काही ना काही नवीन शिकले. आणि दिवसेंदिवस “पूर्ण हृदयाने आणि आनंदी अंतःकरणाने” देवाची उपासना करण्याची त्यांची इच्छा अधिकाधिक प्रबळ होत गेली.
यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेकांनी आयुष्यभर अतिशय आनंदाने यहोवाची सेवा केली. तर काहींच्या बाबतीत असे घडले, की त्यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने यहोवाची सेवा करण्यास सुरवात तर केली; पण, काही काळानंतर ते थंड पडले. दुसऱ्या शब्दांत, यहोवाची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्वीसारखी प्रेरणा राहिली नाही. तुमच्या बाबतीत कधी असे घडले का? असेल तर निराश होऊ नका. कारण गमावलेला आनंद तुम्हाला पुन्हा मिळवता येईल. तो कसा?
आशीर्वादांचा विचार करा
प्रथम, देवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांवर मनन करा. यहोवा देव तुमच्यावर दररोज किती आशीर्वादांचा वर्षाव करतो याचा विचार करा. उदाहरणार्थ, त्याने ही सृष्टी तुम्हाला दिली आहे. समाजातील गरीब-श्रीमंत सर्वजण तिचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. तसेच, तुमच्या खाण्यापिण्याची सोय साधण्याकरता त्याने निसर्गाची निर्मिती केली आहे; तुम्हाला चांगले आरोग्य दिले आहे, बायबलचे ज्ञान दिले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे पाप आणि मृत्यूतून तुमची सुटका करण्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान तुमच्यासाठी दिले. या बलिदानामुळेच तुम्ही शुद्ध अंतःकरणाने देवाची उपासना करू शकता. (योहान ३:१६; याकोब १:१७) देवाने दाखवलेल्या या औदार्यावर तुम्ही जितके अधिक मनन कराल तितकी अधिक त्याच्या उपकाराची तुम्हाला जाणीव होईल. ही जाणीव तुम्हाला आनंदाने व कृतज्ञतेने त्याची सेवा करण्याची प्रेरणा देईल. आणि निश्चितच तुम्ही देखील स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवाला म्हणाल: “हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; . . . ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.”—स्तोत्र ४०:५.
हे शब्द स्तोत्रकर्त्या दाविदाचे होते. दाविदाच्या वाट्याला अनेक संकटप्रसंगे आली. शौल नावाचा एक दुष्ट राजा आणि त्याचे सैनिक अक्षरशः हात धुवून त्याच्या मागे लागले होते. त्यामुळे शौलाची नजर चुकवत आश्रयासाठी भटकण्यातच दाविदाचे तारुण्य गेले. (१ शमुवेल २३:७, ८, १९-२३) या शिवाय, दाविदामध्ये अनेक कमतरता होत्या. ४० व्या स्तोत्रात त्याने हे कबूल केले: “असंख्य अरिष्टांनी मला घेरिले आहे; माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडिले आहे म्हणून मला तोंड वर करता येत नाही; ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; माझ्यात त्राण उरले नाही.” (स्तोत्र ४०:१२) होय, दाविदावर अनेक संकटप्रसंगे ओढवली. पण, या संकटांमुळे तो हतबल झाला नाही. उलट देवाकडून मिळालेल्या आशीर्वादांवर तो मनन करू लागला. आणि लवकरच त्याच्या लक्षात आले की देवाकडील आशीर्वादांपुढे ती संकटे काहीच नाहीत.
तुमच्यावरही संकटप्रसंगे ओढवतात किंवा कमीपणाची भावना तुम्हाला ग्रासून टाकते तेव्हा तुम्ही देखील दाविदाप्रमाणे देवाकडून मिळालेल्या आशीर्वादांचा विचार करू शकता. खरं म्हणजे यहोवाकडून मिळालेल्या आशीर्वादांमुळेच तर तुम्ही
यहोवाला आपल्या जीवनाचे समर्पण केले. अशा सर्व आशीर्वादांचा पुनर्विचार करून गमावलेला आनंद प्राप्त करण्यास आणि कृतज्ञ भावनेने देवाची सेवा करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल.ख्रिस्ती सभांद्वारे मदत
यहोवाच्या सेवेत गमावलेला आनंद पुन्हा मिळवण्याकरता ख्रिस्ती बंधू-भगिनींचा सहवासही तितकाच महत्त्वाचा आहे. देवावर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्याची नित्य सेवा करण्याच्या निश्चयावर दृढ असणाऱ्या आबालवृद्धांसह एकत्र आल्याने खरोखरच खूप प्रोत्साहन मिळते. त्यांच्या उदाहरणाने तुम्हाला जिवेभावे यहोवाची सेवा करण्याचे उत्तेजन मिळेल. शिवाय, सभांमध्ये तुमच्या उपस्थितीमुळे त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळते.
हे खरे, की दिवसभर काम करून, थकूनभागून घरी आल्यावर अथवा एखाद्या समस्येमुळे किंवा तुमच्या एखाद्या कमतरतेमुळे निराश झाल्यावर ख्रिस्ती सभांना जाण्यास तुम्ही इतके उत्साही नसाल. पण अशा वेळी, ख्रिस्ती बांधवांसोबत एकत्र येण्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्याला ‘आपले शरीर कुदलण्याची’ म्हणजे स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे.—१ करिंथकर ९:२६, २७; इब्री लोकांस १०:२३-२५.
स्वतःला शिस्त लावण्याची पाळी आल्यास यहोवावर आपले खरे प्रेम नाही असे म्हणता येईल का? मुळीच नाही. गतकाळात देवावर अपार प्रेम करणाऱ्या प्रौढ ख्रिश्चनांना देखील देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. (लूक १३:२४) त्या प्रौढ ख्रिश्चनांपैकी प्रेषित पौलाचे उदाहरण खरोखरच उत्तेजन देणारे आहे. त्याने अगदी उघडपणे आपल्या भावना व्यक्त करत म्हटले: “मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” (रोमकर ७:१८, १९) आणि करिंथच्या ख्रिश्चनांना त्याने म्हटले: “जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; . . . मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपविला आहे.”—१ करिंथकर ९:१६, १७.
आपल्यापैकी अनेकांप्रमाणे पौलामध्ये देखील पाप करण्याची प्रवृत्ती होती. आणि योग्य करण्याची इच्छा असूनही ही पापी प्रवृत्ती अडथळा आणत होती. पण, या वृत्तीशी त्याने शर्थीने झुंज दिली आणि त्यावर मात करण्यात तो बऱ्याचदा यशस्वी झाला. अर्थात, पौलाने हे सर्व स्वतःच्या बळावर केले नाही. त्याने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) तुम्ही देखील यहोवा देवाकडे मदतीची याचना केली तर पौलाप्रमाणे तो तुम्हालाही योग्य ते करण्याची शक्ती जरूर देईल. (फिलिप्पैकर ४:६, ७) तेव्हा, पौलाप्रमाणे आपला ‘विश्वास राखण्याकरता झटा’ आणि यहोवाच्या विपुल आशीर्वादांचा अनुभव घ्या.—यहुदा ३; पं.र.भा.
या संघर्षात तुम्ही एकटेच नाही, तर यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये ‘विश्वास राखण्याकरता झटणारे’ प्रौढ जण तुमची मदत करण्यास सदोदित तयार आहेत. तुम्ही मदतीसाठी एखाद्या वडिलांकडे गेल्यास ते तुम्हाला ‘धीर देतील.’ (१ थेस्सलनीकाकर ५:१४) आणि तुमच्यासाठी “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा” होण्याचा ते प्रयत्न करतील.—यशया ३२:२.
“देव प्रीति आहे” आणि आपल्या सेवकांनी प्रेमाने आपली सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. (१ योहान ४:८) देवावरील तुमचे प्रेम पुन्हा जागे करण्याची गरज निर्माण झाली तर सदर लेखात सांगितल्याप्रमाणे योग्य पावले उचला. तुम्हाला जरूर यश मिळेल!