परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहा
परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहा
“तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे.”—कलस्सैकर ४:१२.
१, २. (अ) बाहेरचे लोक पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल काय म्हणायचे? (ब) ख्रिस्ती बांधवांचे आपसांतील प्रेम व एकमेकांविषयी त्यांना वाटणारी काळजी कलस्सैकर या पुस्तकातून कशाप्रकारे दिसून येते?
येशूच्या अनुयायांचे आपसांत खूप प्रेम होते; ते एकमेकांना साहाय्य करायचे. दुसऱ्या व तिसऱ्या शतकाचा लेखक टर्टुलियन याच्या लिखाणात ख्रिस्ती लोक अनाथांना, गोरगरिबांना आणि वृद्धांना कशाप्रकारे दयाळूपणे मदत करायचे याविषयी वाचायला मिळते. ते आपल्या बांधवांना मदत करण्याद्वारे, कृतीतून आपले प्रेम दाखवायचे. हे पाहून अनेकदा बाहेरचे लोक ख्रिस्ती लोकांविषयी कौतुकाने म्हणायचे, “पाहा, त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे.”
२ कलस्सैकर या पुस्तकात पौल व त्याचा सोबती एपफ्रास यांना देखील कलस्सै येथील बंधुभगिनींबद्दल किती प्रेम होते, त्यांच्याबद्दल किती काळजी वाटत होती हे दिसून येते. पौलाने या बांधवांना असे लिहिले: “[एपफ्रास] आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे.” यहोवाच्या साक्षीदारांचे २००१ सालचे वार्षिक वचन याच वचनातून म्हणजे, कलस्सैकर ४:१२ यातून घेतले आहे: “परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहा.”
३. एपफ्रासने आपल्या प्रार्थनेत कोणत्या दोन गोष्टींची विनंती केली?
३ एपफ्रासने आपल्या प्रिय बांधवांसाठी प्रार्थना करताना दोन गोष्टींची विनंती केली: (१) त्यांनी “परिपूर्ण” व्हावे आणि (२) देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार “दृढनिश्चयी असे स्थिर राहावे.” ही माहिती बायबलमध्ये देण्यात आली आहे त्याअर्थी यातून आपल्यालाही काहीतरी शिकण्यासारखे आहे हे निश्चित. तेव्हा स्वतःला प्रश्न करा: ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहण्याकरता मी काय केले पाहिजे? आणि असे केल्यामुळे काय परिणाम घडून येईल?’ याविषयी पाहू या.
‘परिपूर्ण व स्थिर’ राहण्याकरता झटा
४. कलस्सैकरांनी कोणत्या अर्थाने “परिपूर्ण” होणे आवश्यक होते?
४ एपफ्रसाला मनापासून असे वाटत होते की कलस्सै येथील बांधवांनी ‘परिपूर्ण व स्थिर’ राहावे. याठिकाणी पौलाने वापरलेल्या “परिपूर्ण” या शब्दाचा अर्थ निर्दोष, प्रौढ किंवा परिपक्व असा होतो. (मत्तय १९:२१; इब्री लोकांस ५:१४; याकोब १:४, २५) एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा झाला आहे याचा अर्थ ती व्यक्ती एक प्रौढ ख्रिस्ती आहे असे नाही. पौलाने कलस्सैच्या पश्चिमेकडे असलेल्या इफिस येथील बांधवांना असे लिहिले की मंडळीत नेतृत्व करणारे, “देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” (तिरपे वळण आमचे.) पोचण्यास सर्वांना मदत करतात. इतर ठिकाणी देखील पौलाने ख्रिस्ती जनांना “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा,” असा सल्ला दिला.—इफिसकर ४:८-१३; १ करिंथकर १४:२०.
५. पूर्णतेप्रत पोचण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्याचा काय अर्थ होतो?
५ कलस्सै मंडळीत जे लोक अद्याप आध्यात्मिकरित्या प्रौढ किंवा परिपक्व झालेले नव्हते त्यांनी हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून प्रगती करायची होती. आज आपणही असेच करू नये का? आपल्यापैकी काहींचा बाप्तिस्मा अनेक वर्षांपूर्वी झाला असेल तर काहींचा अलीकडे. पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत, आपल्या दृष्टिकोनांत प्रगती झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते का? कोणतेही निर्णय घेताना आपण बायबलच्या तत्त्वांचा विचार करतो का? यहोवाशी आणि त्याच्या उपासनेशी संबंधित असलेल्या बाबींना आपण प्राधान्य देत आहोत का? की पूर्वीप्रमाणेच अधूनमधून या गोष्टींकडे आपण लक्ष देतो. आध्यात्मिक पूर्णतेप्रत आपली वाढ झाली आहे हे कोणकोणत्या मार्गांनी दिसून येते याविषयी येथे सविस्तर सांगता येणार नाही. पण याविषयीची दोन उदाहरणे आपण पाहू या.
६. यहोवाप्रमाणे परिपूर्ण होण्याच्या दिशेने कोणत्या एका बाबतीत प्रगती करण्याची आवश्यकता असू शकते?
६ पहिले उदाहरण: ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे झालो त्यात विशिष्ट जातीच्या, देशाच्या किंवा विशिष्ट ठिकाणच्या लोकांबद्दल पूर्वग्रह बाळगले जात असतील किंवा त्यांचा तिरस्कार केला जात असेल. पण आपल्याला समजले आहे की देव पक्षपात करत नाही आणि आपणही करू नये. (प्रेषितांची कृत्ये १०:१४, १५, ३४, ३५) आपल्या मंडळीत किंवा सर्किटमध्ये कदाचित त्या विशिष्ट पार्श्वभूमीचे लोक असतील. साहजिकच आपण त्यांच्या सोबत उठतो बसतो. पण मनातल्या मनात अजूनही आपल्याला त्यांच्याविषयी कलुषित भावना आहेत का? किंवा त्यांच्याविषयी आपण मनात अढी बाळगतो का? त्यांच्यापैकी कोणाकडून एखादी चूक झाल्यास किंवा एखाद्या क्षुल्लक बाबतीत त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्यास आपण लगेच त्यांच्याविषयी नकारार्थी विचार करू लागतो का? याबाबतीत स्वतःला प्रश्न विचारा: ‘देवाप्रमाणे अपक्षपाती होण्यासाठी मला अजून प्रगती करण्याची गरज आहे का?’
७. ख्रिस्ती ‘परिपूर्णतेच्या’ दिशेने प्रगती करत असताना इतरांबद्दल कशाप्रकारे विचार करायला आपण शिकले पाहिजे?
७ दुसरे उदाहरण: फिलिप्पैकर २:३ हे वचन आपल्याला सांगते, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” याबाबतीत आपण कितपत प्रगती केली आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले तर काही वाईट गुण असतात. पूर्वी कदाचित इतरांकडे लगेच बोट दाखवण्याची आपली प्रवृत्ती असेल. पण आता आपण प्रगती केली आहे का? लोकांनी “परिपूर्ण” असावे अशी अपेक्षा करणे योग्य नाही हे आपल्याला कळले आहे का? (याकोब ३:२) पूर्वीच्या तुलनेत आता, इतरजण आपल्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे आपण पाहू शकतो का? निदान तसा प्रयत्न आपण करू लागलो आहोत का? ‘ही बहीण नक्कीच माझ्यापेक्षा जास्त सहनशील आहे.’ ‘त्याचा किंवा तिचा विश्वास माझ्यापेक्षा मजबूत आहे.’ ‘खरच, तो किंवा ती बायबलची वचनं माझ्यापेक्षा जास्त स्पष्टपणे समजावून सांगतो/सांगते.’ ‘रागावर नियंत्रण कसं करावं हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.’ अशाप्रकारे विचार करण्याच्याबाबतीत कदाचित काही कलस्सैकरांना अद्याप प्रगती करण्याची गरज होती. आपल्याबाबतीत काय?
८, ९. (अ) कलस्सैकरांनी परिपूर्ण होण्यासोबत “स्थिर” व्हावे अशी एपफ्रासने का विनंती केली? (ब) “स्थिर” होण्याचा भविष्याशी कसा संबंध होता?
८ एपफ्रासने कलस्सैकरांसाठी अशी प्रार्थना केली की त्यांनी ‘परिपूर्ण व स्थिर’ व्हावे. दुसऱ्या शब्दांत, कलस्सै येथील जे ख्रिस्ती आध्यात्मिकरित्या प्रौढ व परिपक्व झाले होते, त्यांनी पुढेही “स्थिर” राहावे अशी विनंती तो देवाला करत होता.
९ जो कोणी ख्रिस्ती बनतो, ख्रिस्ती जीवनात प्रौढतेप्रत प्रगती करतो तो पुढेही तसाच राहील असे आपण गृहीत धरू शकत नाही. येशूने एका देवदूताबद्दल अर्थात, एका देवपुत्राबद्दल असे म्हटले होते की तो “सत्यात टिकला नाही.” (योहान ८:४४) पौलानेही एकदा करिंथकरांना अशा लोकांची आठवण करून दिली होती की जे पूर्वी यहोवाची सेवा करत होते पण नंतर ते विश्वासातून ढळले. म्हणूनच त्याने अभिषिक्त बांधवांना ताकीद दिली: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथकर १०:१२) तेव्हा एपफ्रासने कलस्सैकरांनी ‘परिपूर्ण व स्थिर’ व्हावे अशी जी प्रार्थना केली ती निश्चितच योग्य होती. परिपूर्ण, प्रौढ किंवा परिपक्व झाल्यानंतर त्यांनी त्या स्थितीत टिकून राहणे महत्त्वाचे होते. प्रगती केल्यानंतर पुन्हा मागे पडण्याचा, निरुत्साही होण्याचा किंवा पुन्हा जगिक गोष्टींकडे वाहवत जाण्याचा धोका होता, त्यापासून सांभाळणे महत्त्वाचे होते. (इब्री लोकांस २:१; ३:१२; ६:६; १०:३९; १२:२५) तरच ते शेवटल्या न्यायाच्या दिवशी “परिपूर्ण” असे उभे राहू शकणार होते.—२ करिंथकर ५:१०; १ पेत्र २:१२.
१०, ११. (अ) एपफ्रासच्या प्रार्थनेवरून आपण काय शिकू शकतो? (ब) एपफ्रासची प्रार्थना लक्षात ठेवून आपण कोणता निर्णय घेऊ शकतो?
१० इतरांसाठी प्रार्थना करणे, खास एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन तिच्या समस्येविषयी यहोवाला प्रार्थना करणे, तिला यहोवाने मदत करावी, सांत्वन द्यावे व पवित्र आत्मा देऊन तिला आशीर्वादित करावे अशी प्रार्थना करणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे. कलस्सैकरांसाठी एपफ्रास अशाचप्रकारे प्रार्थना करत होता. पण यावरून, आपण स्वतःसाठी यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा काय विनंती करू शकतो याबाबतीत एक महत्त्वाची गोष्ट येथे लक्षात येते. ती अशी, की इतरांसाठी प्रार्थना करण्यासोबतच आपण स्वतः ‘परिपूर्ण व स्थिर’ राहावे म्हणून यहोवाची मदत मागणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही अशी प्रार्थना करता का?
११ तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल तुम्ही प्रार्थनेत उल्लेख करता का? ख्रिस्ती जीवनात “परिपूर्ण” म्हणजे प्रौढ किंवा परिपक्व होण्याच्या दिशेने तुम्ही कितपत प्रगती केली आहे याविषयी आपल्या भावना यहोवाजवळ व्यक्त करा. ज्या बाबतींत तुम्हाला अजून प्रगती करण्याची गरज आहे त्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देण्याची त्याला विनंती करा. (स्तोत्र १७:३; १३९:२३, २४) निश्चितच, आपल्या प्रत्येकामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांत सुधारणेची गरज आहे. मग, यांविषयी खंत बाळगण्याऐवजी या अवगुणांचा प्रार्थनेत स्पष्टपणे उल्लेख करून त्यांत सुधारणा करण्यासाठी यहोवाकडे मदतीची याचना करा. आणि फक्त एकदा असे करून थांबू नका. ‘परिपूर्ण व स्थिर’ होण्याकरता मदत देण्याची येत्या आठवड्यातच, यहोवाला वारंवार विनंती करण्याचे ठरवा. आणि पुढच्या वर्षाच्या वार्षिक वचनावर विचार करताना वारंवार अशी प्रार्थना करत राहा. देवाच्या सेवेपासून व त्याच्या लोकांपासून दूर जाण्याची, निरुत्साही होण्याची किंवा पुन्हा जगिक गोष्टींकडे वाहवत जाण्याची तुमच्यात चिन्हे दिसत असल्यास याविषयी व हे कसे टाळता येईल याविषयी प्रार्थनेत विशेष भर द्या.—इफिसकर ६:११, १३, १४, १८.
दृढनिश्चयाने स्थिर राहण्याकरता प्रार्थना करा
१२. कलस्सैकरांना ‘दृढनिश्चयी राहण्याची’ विशेष गरज का होती?
१२ कलस्सैकरांनी शेवटपर्यंत देवाच्या पसंतीस उतरावे म्हणून एपफ्रासने त्यांच्यासाठी यहोवाला आणखी एक विनंती केली. ज्याकरता त्याने प्रार्थना केली ते आज आपल्याकरताही अत्यंत महत्त्वाचे आहे. ते काय आहे? एपफ्रासने अशी प्रार्थना केली की गलतीकर ३:१९; कलस्सैकर २:८, १६-१८.
कलस्सैकर येथील ख्रिस्ती बांधवांनी “देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार . . . दृढनिश्चयी” राहावे. त्याकाळात सर्वत्र धर्मविरोधी मतांचे आणि घातक तत्त्वज्ञानाचे वातावरण होते. यांपैकी काही खोट्या शिकवणी खऱ्या उपासनेच्या नावाखाली पसरवल्या जात होत्या. उदाहरणार्थ, कलस्सैकरांवर पूर्वीच्या यहुदी उपासनेतील सण व तिथी पाळण्याचा, उपवास करण्याचा दबाव आणला जात होता. खोटे शिक्षक, ज्यांच्या माध्यमाने मोशेला नियमशास्त्र दिले गेले त्या शक्तिशाली देवदूतांची उपासना करण्याची शिकवण देण्याचा प्रयत्न करत होते. अशाप्रकारच्या खोट्या शिकवणुकींच्या दबावाला तोंड देणे किती कठीण असेल याची कल्पना करा! सगळीकडून त्यांच्यावर गोंधळवून टाकणाऱ्या परस्परविरोधी विचारांचा मारा होत होता.—१३. कोणती गोष्ट ओळखणे कलस्सैकरांसाठी महत्त्वाचे होते आणि ही गोष्ट ओळखल्यामुळे आज आपल्याला कशी मदत होईल?
१३ पौलाने येशू ख्रिस्ताच्या भूमिकेवर जोर देऊन सांगण्याद्वारे या खोट्या शिकवणुकींचे खंडन केले. “ख्रिस्त येशू जो प्रभु, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.” होय, देवाच्या उद्देशांत व आपल्या जीवनात ख्रिस्त येशूची भूमिका ओळखून विश्वासात दृढनिश्चयी राहण्याची गरज होती. कलस्सैकरांनाही होती आणि आज आपल्यालाही आहे. पौलाने याविषयी पुढे खुलासा केला: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या; कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहा.”—कलस्सैकर २:६-१०.
१४. कलस्सै येथील बांधवांकरता त्यांची आशा अगदी खरी का होती?
१४ कलस्सैकर मंडळीतील ख्रिस्ती आत्म्याने अभिषिक्त होते. त्यांना स्वर्गातील जीवनाची एक अद्भुत आशा होती. ही आशा त्यांनी सदैव आपल्या मनात बाळगायची होती. (कलस्सैकर १:५) या आशेविषयी त्यांनी पूर्ण विश्वास बाळगावा व दृढनिश्चयी असावे ही “देवाची इच्छा” होती. त्यांच्यापैकी कोणालाही या आशेविषयी शंका बाळगण्याचे कारण होते का? निश्चितच नाही! आज आपल्याबाबतीतही हेच खरे नाही का? परादीस पृथ्वीवर जीवनाचा उपभोग घेण्याची जी आशा देवाने आपल्याला देऊ केली आहे तिच्याविषयी जराही शंका बाळगण्याचे कारण नाही. आपली ही आशा पूर्ण व्हावी ही ‘देवाची इच्छा’ आहे. तेव्हा या प्रश्नांवर विचार करा: ‘मोठ्या संकटातून’ बचावणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायात’ असण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तुमची ही आशा तुम्हाला कितपत खरी वाटते? (प्रकटीकरण ७:९, १४) ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही याबाबत दृढनिश्चयी’ आहात का?
१५. पौलाने कोणत्या विविध गोष्टींसोबत आशेचा उल्लेख केला?
१५ ‘आशा’ म्हणजे केवळ एक इच्छा किंवा स्वप्न नव्हे. पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रांत जे अनेक मुद्दे मांडले होते त्यावरून हे दिसून येते. प्रत्येक मुद्दा पुढच्या मुद्द्याशी जुळलेला आहे. त्यांत पौल ‘आशेविषयी’ कोठे उल्लेख करतो याकडे लक्ष द्या. “[आपण] संकटांचाहि अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील [“स्वीकृत स्थिती,” NW] व शीलाने [“स्वीकृत स्थितीमुळे,” NW] आशा निर्माण होते; आणि आशा लाजवीत नाही; कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.”—रोमकर ५:३-५.
१६. बायबलमधून सत्य शिकत असताना तुम्हाला कोणती आशा मिळाली?
१६ यहोवाच्या साक्षीदारांकडून जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बायबलचा संदेश ऐकायला मिळाला तेव्हा कदाचित बायबलची एखादी विशिष्ट शिकवण तुम्हाला विशेष आवडली असेल. उदाहरणार्थ, मृतांची स्थिती किंवा पुनरुत्थान. बऱ्याचजणांना पृथ्वीवर सुंदर परिस्थितीत सर्वकाळ जगण्याच्या आशेविषयी ऐकल्यानंतर ही गोष्ट अतिशय नवीन आणि अद्भुत वाटली. तुम्ही स्वतः याविषयी ऐकले होते तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते याचा विचार करून पाहा. आजारपण नसेल, म्हातारपण नसेल, सर्वांना आपल्या श्रमांचे फळ मिळेल, प्राणी देखील मनुष्यांना काहीच हानी करणार नाही—खरोखर हे सर्व किती अद्भुत होते! (उपदेशक ९:५, १०; यशया ६५:१७-२५; योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:३, ४) तुम्हाला एक अद्भुत आशा मिळाली होती!
१७, १८. (अ) पौलाने ज्या विविध गोष्टींविषयी रोमकरांना लिहिले होते त्या आशेशी कशाप्रकारे संबंधित आहेत? (ब) रोमकर ५:४, ५ या वचनात कोणत्या प्रकारच्या आशेविषयी सांगितलेले आहे आणि तुमच्याजवळ अशी आशा आहे का?
१७ काही काळ अभ्यास केल्यावर कदाचित तुम्हाला विरोध होऊ लागला असेल. कदाचित तुमचा छळ देखील केला गेला असेल. (मत्तय १०:३४-३९; २४:९) अगदी अलीकडच्या काळात कित्येक देशांतील साक्षीदारांची घरे लुटण्यात आली, किंवा त्यांना निर्वासित व्हावे लागले. काहींना मारहाण करण्यात आली, त्यांचे बायबल साहित्य जप्त करण्यात आले किंवा प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्याविषयी खोटी माहिती छापण्यात आली. यांपैकी कोणत्याही प्रकारचा छळ कदाचित तुम्हालाही सहन करावा लागला असेल; पण रोमकर ५:३ यात सांगितल्यानुसार तुम्ही या संकटांतही आनंद मानला; आणि यामुळे एक चांगला परिणाम घडून आला. पौलाच्या शब्दांत सांगायचे तर संकटाने तुमच्यात धीर उत्पन्न झाला. धीरामुळे तुम्ही यहोवाच्या पसंतीस उतरला. आपण योग्य तेच करत आहोत, देवाची इच्छा पूर्ण करत आहोत याची जाणीव असल्यामुळे आपण यहोवाच्या पसंतीस उतरलो आहोत याची तुम्हाला खात्री होती. पौलाने म्हटल्याप्रमाणे आपण ‘स्वीकृत स्थितीत’ आहोत. याची तुम्हाला जाणीव होती. पुढे पौल म्हणतो की ‘स्वीकृत स्थितीमुळे आशा निर्माण होते.’ हे तुम्हाला कदाचित थोडे विचित्र वाटेल. पौलाने अगदी शेवटी ‘आशेचा’ उल्लेख का केला? सुवार्ता ऐकली तेव्हाच तुम्हाला एक अद्भुत आशा मिळाली नव्हती का?
१८ अगदी सुरवातीला परिपूर्ण जीवनाविषयी ऐकल्यावर आपल्याला जी आशा मिळाली, तेव्हाच्या आपल्या ज्या भावना होत्या त्यांविषयी येथे पौल बोलत नव्हता हे यावरून कळून येते. तो त्यापेक्षा गहन, दृढ अशा आशेविषयी बोलत होता. जेव्हा आपल्या मार्गात येणाऱ्या समस्यांना आपण विश्वासूपणे तोंड देतो
तेव्हा आपल्याला जाणीव होते की देव आपल्याबाबतीत संतुष्ट आहे, यामुळे आपोआपच आपली सुरवातीची आशा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत व दृढ होते. पूर्वी जी आशा आपण बाळगत होतो ती आता आपल्याला अधिकच वास्तविक वाटू लागते, आपलीशी वाटू लागते. ही दृढ झालेली आशा आपल्या मनात अधिक तेजस्वी होऊन चमकू लागते. आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर या आशेचा परिणाम होतो. “आणि आशा लाजवीत नाही. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणांत देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.”१९. आशेविषयी तुम्ही तुमच्या नियमित प्रार्थनांमध्ये कशाप्रकारे उल्लेख करू शकता?
१९ एपफ्रासची ही मनःपूर्वक प्रार्थना होती की कलस्सै येथील त्याच्या बहीण-भावांनी आपल्या भविष्याविषयीच्या आशेला धरून राहावे, त्याविषयी पूर्ण विश्वास बाळगावा, म्हणजेच ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार दृढनिश्चयी राहावे.’ आज आपण देखील देवाला नियमितपणे आपल्या आशेविषयी प्रार्थना केली पाहिजे. वैयक्तिक प्रार्थना करताना नव्या जगाविषयीच्या आशेचा जरूर उल्लेख करा. ही आशा पूर्ण होण्याची तुम्हाला किती उत्कंठा आहे आणि ती पूर्ण होईल याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे हे यहोवाजवळ व्यक्त करा. तुमचा हा विश्वास दिवसेंदिवस आणखी मजबूत व्हावा म्हणून मदत करण्याची त्याला विनंती करा. एपफ्रासने ज्याप्रमाणे कलस्सैकरांनी ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार दृढनिश्चयी राहावे,’ अशी प्रार्थना केली त्याचप्रमाणे तुम्ही देखील करा. वारंवार करा.
२०. ख्रिस्ती मार्गातून काहीजण दूर गेले तरीसुद्धा आपण यामुळे का खचून जाऊ नये?
२० सर्वचजण परिपूर्ण, स्थिर व दृढनिश्चयी राहात नाहीत. हे पाहून आपण खचून जाता कामा नये. किंवा यामुळे आपले लक्ष विचलित होता कामा नये. काहीजण स्वतःच यहोवाची सेवा सोडून देतात, काहींना बहकवले जाते तर काहीजण धीर सोडून देतात. येशूच्या सर्वात जवळचे संबंधी, अर्थात त्याच्या प्रेषितांपैकी एकाच्या बाबतीत देखील असेच घडले. पण यहुदाने विश्वासघात केला तेव्हा इतर प्रेषित यहोवाच्या सेवेत निरुत्साही झाले का? किंवा त्यांनी सेवा करण्याचे सोडून दिले का? नाही. पेत्राने स्तोत्र १०९:८ या वचनाचा उपयोग करून दाखवले की यहुदाच्या ठिकाणी दुसरा प्रेषित निवडला जाईल. आणि असेच घडले. देवाच्या विश्वासू सेवकांनी आपल्याला नेमलेले प्रचाराचे कार्य सुरू ठेवले. (प्रेषितांची कृत्ये १:१५-२६) कारण परिपूर्ण, स्थिर व दृढनिश्चयी राहण्याचा त्यांचा निर्धार होता.
२१, २२. तुम्ही परिपूर्ण, स्थिर व दृढनिश्चयी राहिल्यामुळे कोणाकडून तुमची प्रशंसा केली जाईल?
२१ परिपूर्ण, स्थिर व देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार दृढनिश्चयी राहिल्यामुळे कोणता चांगला परिणाम होईल? याबाबतीत तुमची प्रशंसा केली जाईल. कोणाकडून?
२२ एकतर तुमचे भाऊबहीण, जे तुम्हाला ओळखतात आणि तुमच्यावर प्रेम करतात ते तुमची प्रशंसा करतील. अर्थात सगळेच बांधव काही शब्दांत ही प्रशंसा व्यक्त करणार नाहीत, पण १ थेस्सलनीकाकर १:२-६ येथे सांगितल्याप्रमाणे याचा परिणाम होईल: “आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुति करितो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करितो. . . . कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली; [तुम्ही] आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला.” “देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर” आहात हे पाहून तुमचे विश्वासू ख्रिस्ती बांधव देखील तुमची अशाच प्रकारे प्रशंसा करतील.—कलस्सैकर १:२३.
२३. येणाऱ्या वर्षाकरता तुम्ही कोणता निर्धार केला पाहिजे?
२३ तुमचा स्वर्गीय पिता देखील तुमच्याकडे पाहून संतुष्ट होईल. याची तुम्ही खात्री बाळगू शकता. का? कारण तुम्ही “देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार” परिपूर्ण, स्थिर व दृढनिश्चयी राहण्याचा प्रयत्न करत आहात. पौलाने ‘सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागण्याबद्दल’ कलस्सैकरांना प्रोत्साहन दिले. (तिरपे वळण आमचे.) (कलस्सैकर १:१०) होय आपण अपरिपूर्ण असलो तरीही सर्व प्रकारे यहोवाला संतोषविणे शक्य आहे. कलस्सै येथील भाऊबहीणींनी असे करून दाखवले. आजही जगभरातले ख्रिस्तीजन असे करत आहेत. तेव्हा निश्चितच तुम्ही देखील करू शकता! येत्या वर्षभर दररोजच्या आपल्या प्रार्थनांतून आणि आपल्या कृतींतून हे दाखवून द्या, की ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहण्याचा’ तुम्ही निर्धार केला आहे.
तुम्हाला आठवते का?
• ‘परिपूर्ण व स्थिर’ राहण्यात काय समाविष्ट आहे?
• स्वतःविषयी तुम्ही कोणत्या गोष्टींचा प्रार्थनेत उल्लेख केला पाहिजे?
• रोमकर ५:४, ५ येथे सुचवल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्या प्रकारची आशा बाळगण्याची इच्छा आहे?
• या अभ्यासामुळे पुढच्या वर्षाकरता कोणते ध्येय डोळ्यापुढे ठेवण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२० पानांवरील चित्र]
एपफ्रासने ख्रिस्ती बांधवांकरता अशी प्रार्थना केली की त्यांनी परिपूर्ण, स्थिर आणि ख्रिस्ताविषयी व आपल्या आशेविषयी दृढनिश्चयी राहावे
[२३ पानांवरील चित्रे]
लाखो ख्रिस्ती तुमच्याप्रमाणेच एक निश्चित आशा आणि दृढनिश्चय बाळगतात