व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहोवाची साक्षीदार असलेली पत्नी, पतीने मागितलेला घटस्फोट कोणत्या परिस्थितीत नाकारू शकते?

यहोवाने सर्वात पहिला विवाह रचल्यावर असे म्हटले की पती आणि पत्नीने एकमेकांशी “जडून” राहावे. (उत्पत्ति २:१८-२४) परंतु मानव अपरिपूर्ण झाल्यावर विवाहात अनेक समस्या येऊ लागल्या. पण यामुळे देवाच्या विचारात काही बदल झाला नाही. समस्या आल्यावरही पतीपत्नीने एकमेकांशी जडून राहावे ही देवाची इच्छा कायम राहिली आणि ती आजही आहे. म्हणूनच प्रेषित पौलाने लिहिले: “ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करितो, मी नव्हे तर प्रभु करितो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेहि पत्नीला सोडू नये.”—१ करिंथकर ७:१०, ११.

पौलाच्या या शब्दांवरून आपल्याला कळते, की अपरिपूर्ण असल्यामुळे काही वेळा पती किंवा पत्नी वेगळे राहण्याचा निर्णय घेतील. एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर मात्र त्यांनी “लग्न केल्यावाचून राहावे” असे पौल म्हणाला. याचे काय कारण असावे? त्याचे कारण असे आहे, की पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाले असले तरीसुद्धा देवाच्या नजरेत मात्र ते अजूनही विवाहाच्या बंधनातून मुक्‍त झालेले नाहीत. शिवाय, येशूने ख्रिस्ती विवाहासाठी घालून दिलेला दर्जा पौलाला माहीत होता म्हणूनच त्याने वरीलप्रमाणे म्हटले. येशूने म्हटले होते की: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या [ग्रीकमध्ये पोर्निया] कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.” (मत्तय १९:९) होय शास्त्रवचनांनुसार, पतीपत्नी केवळ ‘जारकर्माच्या’ म्हणजे लैंगिक अनैतिकतेच्या कारणावरूनच एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात. आणि पौल ज्या प्रकरणाविषयी बोलत होता त्या प्रकरणात पती किंवा पत्नी दोघांकडूनही अनैतिक कार्य घडलेले नव्हते. म्हणूनच, हे पतीपत्नी एकमेकांपासून वेगळे झाले असले तरीसुद्धा देवाच्या नजरेत मात्र त्यांचा विवाह संपुष्टात आला नव्हता.

दोघांपैकी एक जोडीदार यहोवाचा साक्षीदार नाही अशा परिवाराला पौल काय मार्गदर्शन देतो ते पाहा: “जर ख्रिस्तीत्तर व्यक्‍ति वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे.” (१ करिंथकर ७:१२-१६) पण समजा, ख्रिस्ती विश्‍वास न बाळगणारा पती आपल्या पत्नीला सोडून कायदेशीररीत्या घटस्फोटही देऊ इच्छित असेल तर काय?

आपण आपल्या पतीबरोबरच राहावे अशी या पत्नीची इच्छा असेल. ती त्याच्यावर पहिल्यासारखेच प्रेम करेल, एकमेकांच्या भावनिक व शारीरिक गरजा ओळखेल. आणि तिला व तिच्या लहान मुलांना आर्थिक साहाय्याची गरज आहे हेही ती समजून घेईल. तिचा पती आज नाही तर उद्या यहोवाचा साक्षीदार होईल आणि येणाऱ्‍या नाशातून आपला जीव वाचवेल अशी ती आशा बाळगेल. पण तिचा पती मात्र (काही अशास्त्रवचनीय आधारावर) आपला विवाह संपुष्टात आणू इच्छित असेल तर पौलाने लिहिल्याप्रमाणे ही पत्नी त्याला तिच्यापासून ‘वेगळे’ होऊ देऊ शकते. आणखी एका बाबतीत हे तत्त्व लागू होते. यहोवाचा साक्षीदार असलेला एक पती विवाहाविषयी असलेल्या देवाच्या दृष्टिकोनाचा अनादर करून आपल्या पत्नीला सोडू इच्छित असेल तर तेव्हा देखील हेच तत्त्व लागू होते.

अशावेळी पत्नी स्वतःचा आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करील. मुलांचा ताबा मिळवण्याचा ती प्रयत्न करील म्हणजे ती त्यांना प्रेमळपणे सांभाळू शकेल, त्यांना नैतिक शिक्षण देऊ शकेल आणि त्यांच्या मनात बायबलमधील उत्तम शिकवणींच्या आधारे विश्‍वास उत्पन्‍न करू शकेल. (२ तीमथ्य ३:१५) हे तिचे हक्क घटस्फोटामुळे गमावले जाण्याची शक्यता आहे. यास्तव, मुलांचा ताबा मिळवण्याचा तिचा हक्क तिच्याकडे सुरक्षित राहावा म्हणून व कुटुंबाचे भरणपोषण करण्याच्या जबाबदारीतून पती मुक्‍त होत नाही याची खात्री करण्यासाठी ती वकिलांमार्फत अधिकाऱ्‍यांपुढे स्वतःची बाजू योग्यपणे मांडण्याचा प्रयत्न करील. काही देशांमध्ये, घटस्फोटाची केस लढणाऱ्‍या स्त्रीला, पतीने मागितलेला घटस्फोट मान्य न करता मुलांच्या ताब्यासंबंधी आणि आर्थिक साहाय्यासंबंधी कागदपत्रांवर सही करता येऊ शकते. परंतु, इतर ठिकाणी, कागदपत्राच्या आशयातून असे सूचित होते की तिला घटस्फोट मान्य आहे; तेव्हा, जर तिचा पती जारकर्मासाठी दोषी असेल आणि तिने या कागदपत्रांवर सही केली तर त्याचा अर्थ असा होईल की ती त्याला नाकारत आहे.

पण, समाजात आणि मंडळीत बहुतेकांना या जोडप्यामध्ये नेमके काय झाले आहे, त्यांचा घटस्फोट शास्त्रवचनानुसार आहे की नाही हे माहीत नसेल. त्यामुळे या थराला परिस्थिती पोहंचण्याआधी, जर पत्नीने तिच्या मंडळीचे अध्यक्षीय पर्यवेक्षक आणि आणखी एक वडील अशा दोघांना सर्व काही सविस्तर सांगितल्यास (लेखी दिल्यास उत्तम) पुढे किंवा त्याचवेळेला कोणी आक्षेप घेतलाच तर त्यांना उत्तर देता येईल.

आता आपण पुन्हा एकदा येशूच्या या शब्दांकडे लक्ष देऊ: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.” एखाद्या पतीने लैंगिक अनैतिकतेसारखे पाप केले असेल व तरीसुद्धा तो आपल्या पत्नीबरोबर राहू इच्छित असेल तर त्याला क्षमा करून त्याच्याशी लैंगिक संबंध पुढे चालू ठेवायचे की त्याला नाकारायचे हे त्या पत्नीने (जी येशूच्या उदाहरणात निर्दोष आहे) ठरवावे. ती त्याला क्षमा करून त्याच्याबरोबर राहू इच्छित असेल तर असे केल्याने ती नैतिकरीत्या अशुद्ध होत नाही.—होशेय १:१-३; ३:१-३.

असेही होऊ शकते की, एक अनैतिक पती आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित असेल परंतु आपला पती कधीतरी आपल्याकडे पुन्हा येईल या आशेने ती त्याला क्षमा करण्याची इच्छा बाळगत असेल. पण हा तिचा व्यक्‍तिगत निर्णय असेल. पती तिला घटस्फोट मागतो तेव्हा ही केस कोर्टात लढावी का, हे तिने तिच्या विवेकानुसार व परिस्थितीनुसार ठरवावे. काही देशांमध्ये, घटस्फोटाची केस लढणाऱ्‍या स्त्रीला, घटस्फोट मान्य आहे असे सूचित न करता मुलांचा ताबा आणि आर्थिक साहाय्य मिळण्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सही करता येऊ शकते. त्या कागदपत्रांवर फक्‍त सही केल्याने, पत्नी आपल्या पतीला नाकारत आहे असा अर्थ होणार नाही. परंतु, इतर ठिकाणी, घटस्फोटाची केस लढणाऱ्‍या पत्नीला, पतीने मागितलेला घटस्फोट मान्य आहे अशा आशयाच्या कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले जाते. तेव्हा जर तिने त्या कागदपत्रांवर सही केली तर त्यावरून हे स्पष्ट होईल की ती तिच्या दोषी पतीला नाकारत आहे.

या बाबतीतही गैरसमज टाळण्यासाठी, पत्नीने मंडळीतील वडिलांना एक पत्र लिहावे व त्यात नमूद करावे की कोणकोणती पावले उचलण्यात आली आहेत व का असे करण्यात आले आहे. ती त्यात हेही नमूद करू शकते, की ती तिच्या पतीला क्षमा करून त्याची पत्नी म्हणून राहायला तयार होती. यावरून हे स्पष्ट होईल की हा घटस्फोट तिच्या इच्छेविरुद्ध घेतला गेला आहे व आपल्या पतीला नाकारण्याऐवजी ती त्याला क्षमा करण्यास तयार होती. ती त्याला क्षमा करून त्याच्याशी विवाहबद्धच राहू इच्छित होती असे स्पष्ट केल्यावर तिने केवळ आर्थिक अडचणी व/किंवा मुलांचा ताबा मिळण्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सही केल्यास ती तिच्या पतीला नाकारत होती असे त्यावरून दिसून येणार नाही. *

घटस्फोटानंतरही पत्नी आपल्या पतीला क्षमा करू इच्छित होती हे सिद्ध केल्यावर ते दोघेही दुसरा विवाह करू शकत नाहीत. परंतु निर्दोष सोबत्याने अर्थात पत्नीने (जी क्षमा करायला तयार होती परंतु पतीने तयारी दाखवली नाही) पतीच्या अनैतिकतेसाठी त्याला नंतर नाकारले तर दोघेही विवाह करण्यास मोकळे आहेत. आणि निर्दोष सोबत्याला हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हे येशूने दाखवून दिले.—मत्तय ५:३२; १९:९; लूक १६:१८.

[तळटीप]

^ परि. 11 प्रत्येक ठिकाणच्या कायदेशीर कारवाया आणि कागदपत्रे वेगवेगळी असतात. त्यामुळे सही करण्याआधी घटस्फोटाच्या कागदपत्रांवरील अटी लक्षपूर्वक वाचणे आवश्‍यक आहे. आपण घटस्फोटाला काही आक्षेप घेत नाही अशा आशयाच्या कागदपत्रांवर निर्दोष विवाह सोबत्याने सही करणे हे पतीने किंवा पत्नीने आपल्या सोबत्याला नाकारण्यासारखेच आहे.—मत्तय ५:३७.