व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“असे धावा”

“असे धावा”

“असे धावा”

एका स्टेडियमचे दृश्‍य मनासमोर उभे करा. स्टेडियम खचाखच भरलेले आहे. तुम्हीसुद्धा तेथेच आहात असे समजा. धावपटू क्रिडांगणात उतरतात. त्यांना पाहून लोक ओरडून त्यांचे स्वागत करतात. नियमांनुसार सगळे काही पार पडावे म्हणून पंच देखील येतात. खेळ सुरू होताच, लोकांच्या आरडाओरड्याने स्टेडियम दणाणू लागते. कोणी धावपटूंना उत्तेजन देत आहे तर कोणी नाराजी व्यक्‍त करत आहे. मग, टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचे स्वागत केले जाते!

हे वर्णन आधुनिक दिवसातल्या खेळाचे नव्हे तर सुमारे २,००० वर्षांपूर्वी करिंथमधील इस्थमस येथे चालणाऱ्‍या खेळाचे वर्णन होते. येथे सा.यु.पू. सहाव्या शतकापासून ते सा.यु.पू. चवथ्या शतकापर्यंत प्रत्येक दोन वर्षांनी सुप्रसिद्ध इस्थमियन गेम्स चालत असत. बऱ्‍याच वर्षांपर्यंत ग्रीसमधील सर्वांना या खेळांचे वारे लागले होते. हे खेळ फक्‍त क्रिडात्मक स्पर्धा नव्हत्या. तर त्यात भाग घेणारे धावपटू लष्करी तयारीचे प्रतीक होत. विजेते ठरणाऱ्‍यांना वीरपुरुष समजले जात असे. त्यांना झाडाच्या पानांचा मुकुट चढवण्यात येत असे. त्यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव केला जाई आणि त्यांना सरकाराकडून आयुष्यभरासाठी पेन्शन मिळत असे.

प्रेषित पौलाला, करिंथजवळ भरवल्या जाणाऱ्‍या इस्थमियन गेम्सविषयी चांगलीच माहिती होती. त्याने एका ख्रिश्‍चनाच्या जीवनक्रमाची तुलना अशाच एका स्पर्धेशी केली. धावपटू, पहिलवान आणि मुष्टियोद्धे यांचा उल्लेख करून त्याने चांगले प्रशिक्षण, योग्य मेहनत आणि धीर यांमुळे मिळणाऱ्‍या प्रतिफळांचे अचूक वर्णन केले. अर्थात, ज्या ख्रिश्‍चनांना उद्देशून पौलाने पत्रे लिहिली होती त्यांना देखील या खेळांविषयी माहीत होते. कदाचित त्यांच्यापैकी काहीजण प्रेक्षकांपैकी असतील. त्यामुळे पौलाचे दृष्टान्त त्यांना लगेच समजले असतील. आज आपल्याविषयी काय? आपण देखील एका शर्यतीत आहोत—सार्वकालिक जीवनाचे ध्येय असलेल्या शर्यतीत. त्यामुळे पौलाने त्या काळातल्या स्पर्धा लक्षात ठेवून दिलेला बोध आपल्याकरता फायद्याचा कसा ठरू शकतो?

‘नियमांप्रमाणे मल्लयुद्ध करणे’

प्राचीन काळातल्या खेळांमध्ये प्रवेश मिळवणे फार कठीण होते. एक व्यक्‍ती प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकांपुढे आणून असे ओरडायची: ‘या व्यक्‍तीवर कोणी गुन्ह्याचा आरोप लावते का? तो चोर किंवा दुष्ट काम करणारा किंवा वाईट चालीचा आहे का?’ आर्कियोलॉजिया ग्राईका यानुसार, “कोणत्याही सराईत गुन्हेगाराला किंवा त्यांच्याशी [जवळचा] संबंध असलेल्यांना भाग घेण्याची परवानगी नव्हती.” खेळांच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यास, त्या व्यक्‍तीला स्पर्धेत भाग घेण्यास अपात्र ठरवून मोठी शिक्षा देण्यात येई.

यावरून, “जर कोणी मल्लयुद्ध करितो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालीत नाहीत,” या पौलाच्या शब्दांचा अर्थ समजायला आपल्याला मदत होते. (२ तीमथ्य २:५) त्याचप्रमाणे, जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण यहोवाच्या नियमांना जागले पाहिजे, बायबलमध्ये दिलेल्या या उच्च नीतिनियमांचे पालन केले पाहिजे. परंतु, बायबल असा इशारा देते की: “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१) म्हणजे, शर्यतीत प्रवेश केल्यावरही आपण नियमांप्रमाणे मल्लयुद्ध लढण्याविषयी सावध राहिले पाहिजे. कारण मगच यहोवा आपल्यावर संतुष्ट होईल आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल.

हे करण्यासाठी, देवाबद्दलचे प्रेम आपल्याला सर्वात जास्त मदत करते. (मार्क १२:२९-३१) अशा प्रेमामुळे आपण यहोवाला संतुष्ट करू आणि त्याच्या इच्छेनुसार कार्य करू.—१ योहान ५:३.

‘सर्व भार टाकून देणे’

प्राचीन काळी, धावपटू भार कमी करण्यासाठी कपडे किंवा इतर कोणतीही सामग्री अंगावर चढवत नव्हते. द लाईफ ऑफ द ग्रीक्स ॲण्ड रोमन्स हे पुस्तक म्हणते की, “शर्यतीत धावणारे . . . स्पर्धक वस्त्रहीन असत.” कपडे न घातल्यामुळे हे धावपटू चपळाईने, कोणत्याही बाधेविना वेगाने धावू शकत होते. अनावश्‍यक भार उचलण्यात त्यांची शक्‍ती खर्च होत नव्हती. कदाचित हेच लक्षात ठेवून पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिले: “म्हणून आपणहि सर्व भार . . . टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—इब्री लोकांस १२:१.

जीवनाच्या शर्यतीत आपल्याला कोणत्या भारामुळे बाधा येऊ शकते? अनावश्‍यक भौतिक वस्तू गोळा करण्याची किंवा ऐषारामात राहण्याची इच्छा असणे ही एक बाधा असू शकते. धनामुळे संरक्षण लाभते किंवा आनंद मिळतो असे काहींना वाटत असेल. अशा अनावश्‍यक “भारामुळे” धावपटूचा वेग कमी होऊन हळूहळू त्याला देवाचे इतके महत्त्व वाटणार नाही. (लूक १२:१६-२१) सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी खूप दिवस आहेत असे वाटू लागेल. ‘नवीन जग येईल, पण त्याला बराच अवकाश आहे. तोपर्यंत या जगातल्या गोष्टींचा आनंद घेण्यात काय हरकत आहे.’ अशाप्रकारे एखादी व्यक्‍ती विचार करू लागेल. (१ तीमथ्य ६:१७-१९) अशा भौतिकवादी दृष्टिकोनामुळे जीवनाच्या शर्यतीतल्या ध्येयापासून आपले लक्ष अगदी सहजपणे विकर्षित होऊ शकते. इतकेच नव्हे तर, काही लोकांना त्या शर्यतीत प्रवेश करायलाच नको वाटेल.

डोंगरावरील प्रवचनात येशू म्हणाला: “कोणीहि दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” यानंतर, यहोवाला प्राण्यांची आणि झाडाफुलांची काळजी असली, तरी मानवांना तो त्यांच्यापेक्षा जास्त मूल्याचे समजतो असे सांगितल्यावर येशू म्हणाला: “ह्‍यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:२४-३३.

“धीराने धावावे”

प्राचीन काळी सर्वच शर्यती काही कमी अंतराच्या नव्हत्या. डोलीखोस नावाची एक शर्यत चार किलोमीटरची होती. त्या शर्यतीत भाग घेण्यासाठी शक्‍ती आणि धीराची अत्यंत गरज होती. असे म्हटले जाते की, सा.यु.पू. ३२८ मध्ये एजिआस नावाचा एक धावपटू या शर्यतीत विजयी ठरल्यावर तो आपल्या विजयाची बातमी कळवायला घरापर्यंत म्हणजे आर्गोसपर्यंत धावत गेला. त्या दिवशी, तो अंदाजे ११० किलोमीटर धावला!

ख्रिस्ती शर्यत देखील एक लांब पल्ल्याची शर्यत आहे ज्यामध्ये आपल्या धीराची परीक्षा होते. यहोवाची संतुष्टी प्राप्त करण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी या शर्यतीत शेवटपर्यंत टिकून राहणे आवश्‍यक आहे. पौल अशाच प्रकारे धावला. म्हणून मरण्याआधी तो म्हणू शकला: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे.” (२ तीमथ्य ४:७, ८) पौलाप्रमाणे आपण धाव ‘संपवली’ पाहिजे. आपल्या अपेक्षेपेक्षा ही धाव जरा लांबची आहे असा विचार करून आपला धीर कमी होऊ लागला तर आपल्याला प्रतिफळ मिळणार नाही. (इब्री लोकांस ११:६) असे झाले तर किती दुःखाची गोष्ट ठरेल कारण आपण अंतिम सीमेच्या कितीतरी जवळ आहोत!

बक्षीस

प्राचीन ग्रीक मल्लयुद्धांमधील विजेत्यांना पाना-फुलांनी सजवलेले पुष्पचक्र मिळत असे. पायथियन गेम्समधील विजेत्यांना लारसच्या झाडाच्या पानांचा मुकूट मिळत असे. ऑलिम्पियन गेम्समध्ये जंगली जैतुनाच्या पानांचा तर इस्थमियन गेम्समध्ये पाईन वृक्षाच्या पानांचा मुकूट दिला जात असे. एका बायबल विद्वानाचे म्हणणे आहे, “स्पर्धकांना चालना देण्यासाठी स्पर्धेच्या दरम्यान मुकूट, विजयाचे प्रतिफळ आणि खजुरीच्या डहाळ्या स्टेडियममध्ये तिपायीवर किंवा टेबलावर त्यांना दिसेल अशा ठिकाणी ठेवल्या जात.” विजेत्याला मुकूट चढवला जाणे हे मोठ्या सन्मानाचे चिन्ह मानले जाई. मग घरी जाताना तो पराक्रमाने रथात बसून शहरात प्रवेश करी.

हे लक्षात ठेवून पौलाने आपल्या करिंथकर वाचकांना विचारले: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. . . . ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी असे करितो.” (१ करिंथकर ९:२४, २५; १ पेत्र १:३, ४) केवढा मोठा फरक! जीवनाच्या शर्यतीत शेवटपर्यंत धावणाऱ्‍यांना मिळणारे प्रतिफळ प्राचीन काळातल्या खेळांमध्ये मिळणाऱ्‍या मुकुटांसारखे नाशवंत नाही. तर ते अविनाशी आहे.

या सर्वोत्कृष्ट मुकुटाविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.” (१ पेत्र ५:४) अमरत्व अर्थात ख्रिस्तासोबत स्वर्गीय वैभवातील अविनाशी जीवनाचे बक्षीस जगाकडून मिळणाऱ्‍या कोणत्याही बक्षीसापेक्षा मोठे असू शकते का?

परंतु, आज शर्यतीत धावणारे बहुतांश ख्रिस्ती, स्वर्गामध्ये आत्मिक पुत्र बनण्यासाठी देवाकडून अभिषिक्‍त झालेले नाहीत आणि त्यांना स्वर्गीय आशा नाही. म्हणून ते अमरत्वाच्या बक्षीसासाठी धावत नाहीत. परंतु, देवाने त्यांच्यासमोरही एक अतुलनीय बक्षीस ठेवले आहे. ते आहे, स्वर्गीय राज्याधीन असलेल्या परादीसमय पृथ्वीवरील परिपूर्ण, सार्वकालिक जीवन. एखाद्या ख्रिश्‍चनाचे ध्येय, स्वर्गातील जीवन असो अथवा पृथ्वीवरील जीवन असो, त्याने कोणत्याही स्पर्धेतील धावपटूपेक्षा आणखी दृढनिश्‍चयाने आणि जोमाने धावावे. का? कारण मिळणारे बक्षीस नाशवंत नाही. “हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.”—१ योहान २:२५.

ख्रिस्ती धावपटूपुढे असे अतुलनीय बक्षीस असताना या जगाच्या पाशांविषयी त्याला काय वाटावे? त्याला पौलासारखेच वाटले पाहिजे. तो म्हणाला: “ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो.” यावरून विचार करा, पौल किती वेगाने धावला असेल! “बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्‍यांत घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, . . . बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो.” (फिलिप्पैकर ३:८, १३, १४) पौलाची नजर, सरळ बक्षीसावर केंद्रीत होती. आपणही तेच केले पाहिजे.

आपला सर्वोत्कृष्ट आदर्श

प्राचीन खेळांमधील विजेत्यांना खूप प्रसिद्धी मिळत असे. कवी त्यांच्यावर काव्य रचत, शिल्पकार त्यांच्या मूर्ती बनवत. इतिहासकार व्येर ओलिव्होव्हे म्हणतात की, “त्यांचे पुष्कळ गौरव केले जाई आणि त्यांना भरपूर लोकप्रियता मिळे.” तसेच पुढे विजेतेपद पटकवण्याचे ध्येय असलेल्या तरुण पिढीसाठी ते आदर्श ठरत.

अशाप्रकारे, ख्रिश्‍चनांपुढे सर्वोत्तम उदाहरण मांडणारा “विजेता” कोण आहे? पौल सांगतो: “[आपण] आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री लोकांस १२:१, २) होय, अनंतकालिक जीवनाच्या शर्यतीत आपल्याला विजयी व्हायचे असल्यास आपण एकाग्रतेने आपला आदर्श, येशू ख्रिस्त याच्याकडे पाहत राहावे. शुभवर्तमानांचे अहवाल वाचून, त्याचे अनुकरण कसे करता येईल यावर चिंतन करून आपण हे करू शकू. अशाप्रकारे अभ्यास केल्यास आपल्याला समजेल की, येशू ख्रिस्त देवाला आज्ञाधारक होता आणि धीराद्वारे त्याने आपल्या विश्‍वासाचा दर्जा दाखवून दिला. यामुळे त्याला यहोवा देवाची संतुष्टी आणि इतरही अनेक विशेषाधिकार प्रतिफळाच्या रूपात मिळाले.—फिलिप्पैकर २:९-११.

अर्थात, प्रेम हाच येशूचा सर्वात प्रमुख गुण होता. “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१३) आपल्या शत्रुंवरही प्रेम करा असे सांगून त्याने “प्रेम” हा शब्द आणखी अर्थभरित केला. (मत्तय ५:४३-४८) आपल्या स्वर्गीय पित्यावर प्रेम केल्यामुळेच त्याला पित्याची इच्छा करण्यात आनंद मिळत असे. (स्तोत्र ४०:९, १०; नीतिसूत्रे २७:११) येशू आपला आदर्श आहे आणि जीवनाच्या कष्टदायक शर्यतीत किती वेगाने धावावे याविषयी तो आपली मदत करील असे मानले तर आपणही देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करू लागू आणि आपल्या पवित्र सेवेत खरा आनंद मिळवू. (मत्तय २२:३७-३९; योहान १३:३४; १ पेत्र २:२१) आपण फक्‍त एवढे लक्षात ठेवावे की आपल्याला ज्या गोष्टी जमणार नाहीत त्यांची अपेक्षा येशू आपल्याकडून करणार नाही. तो आपल्याला असे आश्‍वासन देतो: “मी . . . मनाचा सौम्य व लीन आहे [म्हणून] ‘तुमच्या जिवास विसावा मिळेल;’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.

येशूप्रमाणे, आपण आपली नजर बक्षीसावर ठेवावी जे शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्‍यांकरता ठेवले आहे. (मत्तय २४:१३) आपण नियमांप्रमाणे मल्लयुद्ध केले, सर्व प्रकारचा भार टाकून दिला आणि धीराने धावलो तर निश्‍चितच जिंकू. आपले ध्येय आपल्याला जणू साद घालत आहे! ते आपल्याला अधिक बळ देते कारण ते आपल्यामध्ये आनंद निर्माण करते; याच आनंदामुळे आपला मार्ग सोपा बनतो.

[२९ पानांवरील चित्र]

ख्रिश्‍चनाची शर्यत लांब पल्ल्याची आहे; त्याकरता धीर हवा

[३० पानांवरील चित्र]

धावपटूंना मिळणाऱ्‍या मुकुटाप्रमाणे ख्रिश्‍चनांचे बक्षीस नाशवंत नाही, तर अविनाशी आहे

[३१ पानांवरील चित्र]

शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्‍या प्रत्येकाला बक्षीस मिळणार आहे

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Copyright British Museum