व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही कोणाकोणावर प्रेम करता?

तुम्ही कोणाकोणावर प्रेम करता?

तुम्ही कोणाकोणावर प्रेम करता?

“तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.”—मत्तय २२:३९.

१. आपण यहोवावर प्रेम करत असू तर शेजाऱ्‍यावरही प्रेम का केले पाहिजे?

 सर्वात मोठी आज्ञा कोणती असे विचारण्यात आले तेव्हा येशूने असे उत्तर दिले: “तू आपला देव परमेश्‍वर [“यहोवा,” NW] ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” मग त्याने यासारखीच एक दुसरी आज्ञा सांगितली: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३७, ३९) होय, शेजाऱ्‍यावर प्रीती करणे हे ख्रिस्ती व्यक्‍तीचे ओळखचिन्ह आहे. आपण यहोवावर प्रीती करत असू, तर शेजाऱ्‍यावरही आपण प्रीती केलीच पाहिजे. का? कारण आपण देवाच्या वचनाचे पालन केले तरच आपण म्हणू शकतो की आपले त्याच्यावर प्रेम आहे. आणि देवाचे वचन आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याची आज्ञा देते. जर आपण आपल्या बहीणभावांवर प्रेम करत नसू तर देवावर आपण खरोखर प्रेम करतो असे आपण म्हणू शकत नाही.—रोमकर १३:८; १ योहान २:५; ४:२०, २१.

२. शेजाऱ्‍याबद्दल आपण कशाप्रकारचे प्रेम दाखवले पाहिजे?

आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम केले पाहिजे असे येशूने सांगितले तेव्हा तो केवळ मैत्रीसंबंधांविषयी बोलत नव्हता. कौटुंबिक सदस्यांमध्ये किंवा स्त्रीपुरुषांत स्वाभाविकपणे असते त्या प्रेमाबद्दलही तो बोलत नव्हता. तर, जे यहोवाला त्याच्या समर्पित सेवकांबद्दल आणि त्यांना यहोवाबद्दल वाटते त्या प्रेमाविषयी तो बोलत होता. (योहान १७:२६; १ योहान ४:११, १९) एका यहुदी शास्त्र्याने येशूचे उत्तर मान्य केले की देवावर “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने” प्रेम करणे महत्त्वाचे आहे. या शास्त्र्याने सुज्ञपणाने उत्तर दिले हे येशूने ओळखले. (मार्क १२:२८-३४) त्याचे म्हणणे अगदी खरे होते. देवाबद्दल आणि शेजाऱ्‍याबद्दलचे प्रेम आपल्या भावना आणि बुध्दी या दोन्हीशी संबंधित आहे. हे प्रेम हृदयातून उत्पन्‍न होते आणि आपल्या बुद्धीने किंवा विचारशक्‍तीच्या साहाय्याने आपण ते व्यक्‍त करतो.

३. (अ) आपले शेजारी कोण याबद्दल आपला दृष्टिकोन संकुचित? नसावा हे येशूने एका ‘शास्त्र्याला’ कसे शिकवले? (ब) येशूने दिलेला दृष्टान्त आज ख्रिस्ती लोकांकरता कशाप्रकारे उपयुक्‍त आहे?

लूकच्या शुभवर्तमानाप्रमाणे, येशूने शेजाऱ्‍यावर प्रीती कर असे सांगितले तेव्हा एका ‘शास्त्र्याने’ विचारले: “पण माझा शेजारी कोण?” या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता येशूने एक दृष्टान्त सांगितला. एक माणूस रस्त्याने जात असताना त्याला लुटारूंनी मारले, लुबाडले आणि अर्धमेल्या अवस्थेत त्याला रस्त्यावर टाकून निघून गेले. त्याच रस्त्याने एक याजक आणि मग एक लेवी गेला. पण दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी एक शोमरोनी माणूस तेथे आला; त्याने त्या घायाळ माणसाला पाहिले आणि त्याने प्रेमाने त्याची सेवाशुश्रूषा केली. तर मग, या तिघांपैकी घायाळ मनुष्याचा खरा शेजारी कोण होता? या प्रश्‍नाचे उत्तर उघडच होते. (लूक १०:२५-३७) याजक व लेवी यांनी नाही तर एका शोमरोनी मनुष्याने खरा शेजारधर्म पाळला असे येशूने म्हटले तेव्हा त्या शास्त्र्याला कदाचित धक्का बसला असेल. पण येशू त्या माणसाला हे शिकवू इच्छित होता, की शेजाऱ्‍याबद्दलचे आपले प्रेम संकुचित नसावे. हा धडा सर्व ख्रिश्‍चनांसाठी आहे. ते कोणाकोणाबद्दल प्रेम व्यक्‍त करतात याविषयी आपण पाहू या.

कुटुंबातील प्रेम

४. सर्वात आधी ख्रिस्ती आपले प्रेम कोठे प्रदर्शित करतात?

ख्रिस्ती लोक आपल्या कुटुंबियांवर प्रेम करतात—पती, पत्नी, आईवडील व मुले एकमेकांवर प्रेम करतात. (उपदेशक ९:९; इफिसकर ५:३३; तीत २:४) अर्थात जवळजवळ सगळ्याच कुटुंबांत हे नैसर्गिक प्रेम दिसून येते. पण घटस्फोट, पतीपत्नींचा आपसांतील अनुचित व्यवहार, उपेक्षित मुले किंवा मुलांवर अत्याचार यांविषयीची वृत्ते वाचल्यावर कळून येते की आजकाल कुटुंबे अतिशय दबावाखाली आहेत. केवळ नैसर्गिक प्रेम या कुटुंबांना जोडून ठेवण्यासाठी पुरेसे नाही. (२ तीमथ्य ३:१-३) कौटुंबिक जीवन खऱ्‍या अर्थाने यशस्वी करण्यासाठी, ख्रिस्ती कुटुंबांत यहोवा व येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करणे आवश्‍यक आहे.—इफिसकर ५:२१-२७.

५. आईवडील आपल्या मुलांचे पालनपोषण करण्याकरता कोणाच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतात आणि त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांना याचे कोणते फळ मिळाले आहे?

ख्रिस्ती आईवडील, आपली मुले यहोवाकडून मिळालेली मौल्यवान देणगी आहेत असे समजतात. आणि त्याच्याच मार्गदर्शनानुसार ते आपल्या मुलांचे पालनपोषण करण्याचा प्रयत्न करतात. (स्तोत्र १२७:३-५; नीतिसूत्रे २२:६) ते ख्रिस्ती प्रीती उत्पन्‍न करतात, ज्यामुळे त्यांना आपल्या मुलांचे अनेक वाईट गोष्टींपासून व सहजासहजी गुंतवणाऱ्‍या पाशांपासून संरक्षण करण्यास मदत मिळते. असे केल्यामुळे अनेक ख्रिस्ती आईवडिलांना नेदरलंडच्या एका आईसारखाच आनंददायक अनुभव आला आहे. मागच्या वर्षी नेदरलंडमध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या एकूण ५७५ जणांपैकी तिचा मुलगा देखील होता. त्याचा बाप्तिस्मा झाला त्या क्षणी कसे वाटले याविषयी ती लिहिते: “या क्षणी मागच्या २० वर्षांच्या कष्टाचे फळ मिळाले असे वाटले. खर्च केलेला सगळा वेळ व शक्‍ती कारणी लागली. जे दुःख, कष्ट, त्रास सोसावा लागला ते सर्व मी विसरले आहे.” आपल्या मुलाने स्वतःहून यहोवाची सेवा करण्याचे निवडले हे पाहून या आईला किती आनंद झाला. मागच्या वर्षी नेदरलंड येथील एकूण ३१,०८९ प्रचारकांपैकी असे बरेच जण आहेत ज्यांना त्यांच्या आईवडिलांनीच यहोवावर प्रेम करायचे शिकवले आहे.

६. ख्रिस्ती प्रेम वैवाहिक बंधनाला कशाप्रकारे मजबूत करू शकते?

पौलाने म्हटले की प्रेम हे “पूर्णता करणारे बंधन” आहे. वैवाहिक जीवनात कठीण समस्या येतात तेव्हा देखील या प्रेमामुळे पतीपत्नीचे बंधन टिकून राहते. (कलस्सैकर ३:१४, १८, १९; १ पेत्र ३:१-७) ताहितीपासून ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुरुतू नावाच्या लहानशा बेटावर राहणाऱ्‍या एका माणसाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास सुरू केला. पण त्याची पत्नी त्याला खूप विरोध करू लागली. शेवटी ती त्याला सोडून आपल्या मुलांसोबत ताहिती येथे राहायला निघून गेली. पण त्याने मात्र तिला नियमितपणे पैसे पाठवून तिची व मुलांची विचारपूस करण्यासाठी नियमितपणे फोन करून आपले अजूनही तिच्यावर प्रेम आहे हे दाखवले. आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याचा त्याने होईल तितका प्रयत्न केला. (१ तीमथ्य ५:८) आपले कुटुंब पुन्हा एकत्र यावे म्हणून तो सतत प्रार्थना करत होता. शेवटी त्याची पत्नी खरोखर परत आली. ती परत आली तेव्हा तो तिच्याशी ‘प्रीतीने, धीराने व सौम्यतेने’ वागला. (१ तीमथ्य ६:११) १९९८ साली त्याचा बाप्तिस्मा झाला. यानंतर काही काळाने त्याची पत्नी देखील बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाली, तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. ताहिती शाखा दफ्तराच्या क्षेत्रात मागच्या वर्षी चालवण्यात आलेल्या एकूण १,३५१ अभ्यासांपैकी तिचाही एक होता.

७. जर्मनीतील एकाने आपले वैवाहिक बंधन कशामुळे अधिक मजबूत झाल्याचे सांगितले?

जर्मनीत एक स्त्री बायबलच्या सत्याबद्दल आवड दाखवू लागली तेव्हा तिच्या पतीने तिला विरोध केला. त्याला पूर्ण खात्री होती की साक्षीदार आपल्या बायकोची फसवणूक करत आहेत. पण नंतर ज्या बहिणीने त्याच्या पत्नीला पहिल्यांदा सत्याविषयी सांगितले होते, तिला त्याने हे पत्र लिहिले: “माझ्या पत्नीची यहोवाच्या साक्षीदारांसोबत ओळख करून दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. सुरवातीला मला काळजी वाटली कारण साक्षीदारांबद्दल मी बरेच उलटसुलट ऐकले होते. पण माझ्या पत्नीसोबत मी स्वतः साक्षीदारांच्या सभांना गेल्यानंतर मला जाणीव झाली की माझे मत किती चुकीचे होते. हेच सत्य आहे याची मला खात्री पटली आहे आणि या सत्यामुळेच आमचे वैवाहिक बंधन देखील आधीपेक्षा अधिक मजबूत झाले आहे.” जर्मनीतील एकूण १,६२,९३२ आणि ताहिती शाखा दफ्तराच्या देखरेखीखालील बेटांवरील १,७७३ यहोवाच्या साक्षीदारांत देवाच्या प्रेमामुळे मजबूत झालेली कित्येक कुटुंबे आहेत.

ख्रिस्ती बांधवांवर प्रेम

८, ९. (अ) आपल्या बांधवांवर प्रेम करण्यास आपल्याला कोण शिकवतो आणि हे प्रेम आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करते? (ब) प्रेमामुळे बांधव एकमेकांना कशाप्रकारे मदत करतात याचे एक उदाहरण सांगा.

थेस्सलनीकाकर ख्रिश्‍चनांना पौलाने म्हटले: “एकमेकांवर प्रीति करावी, असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे.” (१ थेस्सलनीकाकर ४:९) होय ज्यांना ‘देवाने शिकविले आहे’ ते एकमेकांवर प्रेम करतात. (यशया ५४:१३) त्यांचे हे प्रेम ते आपल्या कृतींतून दाखवतात. म्हणूनच पौलाने असे म्हटले होते, की “प्रीतीमध्ये एकमेकांची सेवा करा.” (गलतीकर ५:१३, ईजी टू रीड व्हर्शन; १ योहान ३:१८) खरे ख्रिस्ती एकमेकांची सेवा कशी करतात? ते आपल्या आजारी बहीणभावांना भेटायला जातात, खिन्‍न किंवा दुःखी असलेल्यांना सांत्वन देतात आणि दुर्बलांना साहाय्य करतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) या खऱ्‍या ख्रिस्ती प्रेमामुळेच आपले आध्यात्मिक परादीस वाढत चालले आहे.

इक्वादोर येथील एकूण ५४४ मंडळ्यांपैकी अँग्कोन मंडळीतील बांधवांनी खरोखर आपले प्रेम कृतींतून दाखवले. इथल्या बांधवांना आर्थिक फटका बसल्यामुळे त्यांच्याजवळ मिळकतीचा कोणताच मार्ग नव्हता. तेव्हा सर्व प्रचारकांनी मिळून पैसा उभारण्याचे ठरवले. रात्री मासेमारी करून पहाटे परत येणाऱ्‍या कोळ्यांना फराळाचे पदार्थ तयार करून विकण्याचे त्यांनी ठरवले. सर्वांनी सहयोग दिला, लहान मुलांनीसुद्धा मदत केली. त्यांना पहाटे १:०० वाजता काम सुरू करावे लागायचे कारण ४ वाजता कोळी परत यायचे. अशारितीने जो काही पैसा मिळाला तो प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार वाटून देण्यात आला. अशाप्रकारे एकमेकांना मदत करून या बांधवांनी ख्रिस्ती प्रेम प्रदर्शित केले.

१०, ११. ज्या बांधवांना आपण ओळखत देखील नाही त्यांच्याबद्दलही आपण प्रेम कसे दाखवू शकतो?

१० पण आपले प्रेम हे केवळ ज्या ख्रिस्ती बांधवांना आपण ओळखतो त्यांच्यापुरतेच मर्यादित नाही. प्रेषित पेत्राने म्हटले: “संपूर्ण बंधूवर्गावर प्रीती करा.” (१ पेत्र २:१७, NW) आपण आपल्या सर्व बहीणभावांवर प्रेम करतो कारण ते सर्वजण आपल्यासारखेच यहोवा देवाची उपासना करतात. एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणते संकट येते तेव्हा आपल्याला आपल्या बांधवांबद्दल वाटणारे प्रेम व्यक्‍त करण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, २००० सेवा वर्षादरम्यान मोझांबीकमध्ये बऱ्‍याच ठिकाणी पूर आले, तसेच अंगोला येथे चाललेल्या मुलकी युद्धामुळे बऱ्‍याच जणांना जबरदस्त आर्थिक फटका बसला. मोझांबीकमध्ये ३१,७२५ आणि अंगोला येथे ४१,२२२ बांधवांपैकी पुष्कळांना या संकटांची झळ लागली आहे. शेजारच्या दक्षिण आफ्रिका देशातील साक्षीदारांनी आपल्या या बांधवांच्या कठीण परिस्थितीत त्यांची मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जीवनावश्‍यक वस्तू पाठवल्या आहेत. या बांधवांनी आपल्या “वैपुल्यातून” गरजू बांधवांसाठी उदारपणे देणग्या दिल्या व अशारितीने त्यांच्यावर आपले प्रेम असल्याचे दाखवले.—२ करिंथकर ८:८, १३-१५, २४.

११ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या राष्ट्रांत राज्य सभागृहे व संमेलनगृहे बांधण्यासाठी देखील बांधव मुक्‍तहस्ताने देणग्या देतात. हा देखील प्रेमाचाच पुरावा नाही का? याचे एक उदाहरण म्हणजे सॉलोमोन बेटे. या ठिकाणीही बरीच उलथापालथ चालली आहे. तरीसुद्धा मागच्या वर्षी प्रचारकांच्या संख्येत ६ टक्के वाढ झाली. प्रचारकांची सर्वोच्च संख्या १,६९७ इतकी नोंदण्यात आली. या बांधवांनी एक संमेलनगृह बांधायचे ठरवले. अशांततेमुळे येथील कित्येक रहिवाशी बेट सोडून जात होते. पण अशा परिस्थितीत देखील ऑस्ट्रेलियाहून स्वयंसेवकांनी येथे येऊन बांधकामाकरता साहाय्य केले. कालांतराने या स्वयंसेवकांना परत जावे लागले, पण जाण्याआधी त्यांनी इथल्या बांधवांना फाउंडेशनचे काम पूर्ण करण्याचे प्रशिक्षण दिले होते. सभागृहाचे स्टीलचे संपूर्ण तयार स्ट्रक्चर ऑस्ट्रेलियाहून पाठवण्यात आले. या ठिकाणी बांधकाम अर्ध्यावरच सोडलेल्या कित्येक इमारती दिसतात. पण आपल्या संमेलनगृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ही सुंदर इमारत यहोवाच्या नावाची आणि बांधवांच्या प्रेमाची ग्वाही देईल.

देवाप्रमाणेच जगावर प्रीती करणे

१२. जे आपल्या विश्‍वासात सहभागी नाहीत अशांबद्दलही कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगून आपण यहोवाचे अनुकरण करतो?

१२ आपले प्रेम केवळ आपल्या कुटुंबापुरते किंवा आपल्या बांधवांपुरते मर्यादित आहे का? नाही, कारण आपण “देवाचे अनुकरण करणारे” आहोत. येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ५:१; योहान ३:१६) यहोवा देवाप्रमाणे आपण सर्वांबद्दल, जे आपल्या विश्‍वासात सहभागी नाहीत अशांबद्दलही प्रेम व्यक्‍त करतो. (लूक ६:३५, ३६; गलतीकर ६:१०) म्हणूनच आपण देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करतो आणि देवाने मानवांवर किती अद्‌भुतरित्या प्रेम व्यक्‍त केले हे सर्वांना सांगतो. जे कोणी या संदेशाकडे लक्ष देतात ते आपला जीव वाचवू शकतात.—मार्क १३:१०; १ तीमथ्य ४:१६.

१३, १४. अडथळ्यांवर मात करून, साक्षीदार नसलेल्यांबद्दलही प्रेम व्यक्‍त करणाऱ्‍या काही बांधवांना कोणते अनुभव आले?

१३ नेपाळमधील चार खास पायनियरांचे उदाहरण घ्या. त्यांना नेपाळच्या दक्षिण भागातील एका शहरात सेवा करण्यासाठी नेमले होते. गेल्या पाच वर्षांपासून हे पायनियर धीराने या शहरात आणि जवळपासच्या गावांत प्रचार करण्याद्वारे लोकांबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करत आहेत. या क्षेत्रात कार्य करताना कित्येकदा त्यांना ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात बरेच तास सायकलींवर प्रवास करावा लागतो. पण त्यांच्या प्रेमामुळे आणि ते ‘धीराने सत्कर्मे करीत राहिल्यामुळे’ चांगला परिणाम घडून आला. एका लहानशा गावात एक पुस्तक अभ्यास गट त्यांना सुरू करता आला. (रोमकर २:७) गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्किट ओव्हरसियरांच्या जाहीर भाषणाकरता ३२ लोक येथे उपस्थित होते. नेपाळमध्ये मागच्या वर्षी प्रचारकांच्या संख्येत ९ टक्के वाढ होऊन एकूण संख्या ४३० इतकी झाली. या देशातील बांधवांच्या प्रेमपूर्ण व आवेशी कार्यावर निश्‍चितच यहोवाचा विपुल आशीर्वाद आहे.

१४ कोलंबिया येथे काही तात्पुरते खास पायनियर वायू इंडियन्सच्या जमातीत सुवार्ता प्रचाराचे कार्य करायला गेले. यासाठी त्यांना एक नवीन भाषा शिकावी लागली. पण या लोकांबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमामुळे ते प्रयत्न करत राहिले. आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळाले. जाहीर भाषणाची व्यवस्था करण्यात आली तेव्हा, मुसळधार पाऊस असूनही २७ जण भाषण ऐकायला आले. या पायनियरांप्रमाणेच प्रेमाने व आवेशाने कार्य केल्यामुळे कोलंबियात ५ टक्के वाढ झाली असून प्रचारकांची विक्रमी संख्या १,०७,६१३ इतकी झाली आहे. डेन्मार्क येथे एका वयस्क बहिणीला इतरांना सुवार्ता सांगण्याची खूप इच्छा होती; पण ती चालूफिरू शकत नसल्यामुळे तिचा नाईलाज होता. तरीही ती निराश झाली नाही. सुवार्तेविषयी आवड असलेल्या लोकांना ती पत्राद्वारे सत्याविषयी सांगू लागली. सध्या ती ४२ लोकांशी नियमित पत्रव्यवहार करते आणि ११ बायबल अभ्यास चालवते. डेन्मार्कमध्ये मागच्या वर्षी सेवेचा अहवाल देणाऱ्‍या एकूण १४,८८५ जणांपैकी तीही एक होती.

शत्रूंवर प्रेम करा

१५, १६. (अ) येशूने सांगितल्याप्रमाणे आपण कोणा कोणावर प्रेम करावे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध खोटे आरोप करणाऱ्‍या एका व्यक्‍तीशी जबाबदार बांधवांनी कशाप्रकारे प्रेमळपणे व्यवहार केला?

१५ याआधी उल्लेख केल्याप्रमाणे, येशूने त्या शास्त्र्याला सांगितले की शोमरोनी देखील त्याचा शेजारीच होता. डोंगरावरील उपदेशात तर येशूने असे म्हटले: “‘आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर’ व आपल्या वैऱ्‍याचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४३-४५) लोक आपला विरोध करतात तेव्हासुद्धा आपण ‘बऱ्‍याने वाइटाला जिंकण्याचा’ प्रयत्न करतच राहतो. (रोमकर १२:१९-२१) शक्य झाल्यास आपल्याजवळ असलेले सर्वात मोलवान सत्य देखील त्यांना सांगण्याचा आपण प्रयत्न करतो.

१६ युक्रेनमध्ये क्रेमेनचुक हेरल्ड नावाच्या वृत्तपत्रात यहोवाचे साक्षीदार म्हणजे समाजाला धोकेदायक असलेला पंथ आहे असे एकदा म्हणण्यात आले होते. युरोपमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंधने घालण्यासाठी किंवा बंदी आणण्यासाठी काही लोक साक्षीदारांबद्दल असे म्हणून लोकांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतात. ही एक गंभीर बाब होती. त्यामुळे या वृत्तपत्राच्या संपादकाची भेट घेण्यात आली आणि त्यांना त्या लेखातील माहिती चुकीची होती या आशयाचे पत्रक काढण्यास सांगण्यात आले. ते तयार झाले पण या पत्रकासोबत त्यांनी असे विधान जोडले की मूळ लेखातील माहिती वस्तूस्थितीवर आधारित होती. मग संस्थेचे जबाबदार बांधव पुन्हा काही माहिती घेऊन त्यांच्याकडे गेले. शेवटी या संपादकाला जाणीव झाली की मूळ लेखातील माहिती चुकीचीच होती आणि त्यामुळे त्यांनी ती प्रकाशित केलेली चुकीची माहिती मागे घेतली. या संपादकासोबत स्पष्टपणे व आदरपूर्वक चर्चा करणे हाच सर्वात प्रेमळ मार्ग होता आणि असे केल्यामुळे चांगला परिणाम झाला.

प्रेम कसे उत्पन्‍न करावे?

१७. इतरांशी प्रेमाने वागणे नेहमीच सोपे नसते हे कशावरून सूचित होते?

१७ बाळाचा जन्म होतो, तेव्हा आईवडील लगेच त्या चिमुकल्याच्या प्रेमात पडतात. पण प्रौढांशी प्रेमाने वागणे इतके सहजासहजी शक्य होत नाही. म्हणूनच कदाचित, बायबल वारंवार आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्यास सांगते. कारण असे करण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. (१ पेत्र १:२२; ४:८; १ योहान ३:११) येशूने आपल्या बांधवाला “साताच्या सत्तर वेळा” क्षमा कर असे सांगितले तेव्हा त्याला माहीत होते की खऱ्‍या प्रेमाला कसोटीस उतरावे लागेल. (मत्तय १८:२१, २२) पौलाने देखील मोठ्या मनाने “एकमेकांचे सहन करा” असे आपल्याला प्रोत्साहन दिले. (कलस्सैकर ३:१२, १३) म्हणूनच आपल्याला असे सांगण्यात आले आहे, की “प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या.” (१ करिंथकर १४:१) हे आपण कसे करू शकतो?

१८. इतरांबद्दल प्रेम उत्पन्‍न करण्यासाठी आपल्याला काय मदत करील?

१८ सर्वप्रथम आपण यहोवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे. हे प्रेमच आपल्याला शेजाऱ्‍यांवरही प्रेम करण्याचे प्रोत्साहन देईल. का? कारण आपण असे करतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याला गौरव आणतो आणि त्याची स्तुती करतो. (योहान १५:८-१०; फिलिप्पैकर १:९-११) दुसरे म्हणजे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे. जितक्यांदा आपण पाप करतो ते यहोवाविरुद्ध करतो; पण तरीही यहोवा आपल्याला क्षमा करतो, आपल्यावर प्रेम करतच राहतो. (स्तोत्र ८६:५; १०३:२, ३; १ योहान १:९; ४:१८) आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकलो तर इतरांवर प्रेम करणे, आपल्याविरुद्ध त्यांनी केलेल्या चुका क्षमा करणे आपल्याला जड जाणार नाही. (मत्तय ६:१२) तिसरे म्हणजे इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली इच्छा आहे तसेच आपण त्यांच्याशी वागायला शिकले पाहिजे. (मत्तय ७:१२) अपरिपूर्णतेमुळे आपल्या हातून कित्येकदा चुका होतात; तेव्हा साहजिकच इतरांनी आपल्याला क्षमा करावी असेच आपल्याला वाटते. उदाहरणार्थ, कधीकधी आपण चुकून काहीतरी बोलून जातो ज्यामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात. तेव्हा आपण अशी अपेक्षा करतो की, कोणाकडूनही ही चूक होऊ शकते हे त्यांनी समजून घ्यावे. (याकोब ३:२) जर इतरांनी आपल्याशी प्रेमळपणे वागावे असे आपल्याला वाटते तर आपणही त्यांच्याशी प्रेमळपणे वागले पाहिजे.

१९. प्रेम उत्पन्‍न करण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत आपण कशी मिळवू शकतो?

१९ चौथे म्हणजे आपण पवित्र आत्म्याची मदत मागितली पाहिजे कारण प्रेम हे पवित्र आत्म्याचे फळ आहे. (गलतीकर ५:२२, २३) मैत्रीतले, कुटुंबातले आणि शृंगारिक प्रेम स्वाभाविक असते. पण जे प्रेम यहोवाला मानवांबद्दल आहे, जे प्रेम पूर्णता करणारे बंधन आहे, ते प्रेम मनात उत्पन्‍न करण्यासाठी मात्र यहोवाच्याच आत्म्याच्या मदतीची आपल्याला गरज आहे. यासाठी आपण परमेश्‍वराने प्रेरित केलेले त्याचे वचन अर्थात बायबलचे वाचन केले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण येशूच्या जीवनाबद्दल अभ्यास करतो तेव्हा तो लोकांशी कशाप्रकारे वागत होता हे आपल्या लक्षात येईल आणि हळूहळू आपण त्याचे अनुकरण करायला शिकू. (योहान १३:३४, ३५; १५:१२) तसेच, आपण पवित्र आत्मा देण्याची प्रार्थनेत यहोवाला विनंती केली पाहिजे. खासकरून जेव्हा प्रेमळपणे वागणे आपल्याला जड जाते अशा प्रसंगी आपण यहोवाकडे पवित्र आत्म्याची मदत मागितली पाहिजे. (लूक ११:१३) शेवटचे म्हणजे ख्रिस्ती मंडळीपासून आपण कधीही दूर जाऊ नये. आपल्या प्रेमळ बंधूभगिनींसोबत राहिल्यामुळे आपल्याला प्रेम विकसित करायला मदत मिळेल.—नीतिसूत्रे १३:२०.

२०, २१. यहोवाच्या साक्षीदारांनी २००० सेवा वर्षादरम्यान आपले प्रेम अभूतपूर्वरित्या कसे प्रदर्शित केले?

२० मागच्या वर्षी सबंध जगात प्रचारकांच्या संख्येचा उच्चांक ६,०३५,५६४ इतका होता. यहोवाच्या साक्षीदारांनी लोकांच्या भेटी घेऊन त्यांना सुवार्ता सांगण्यात एकूण १,१७,१२,७०,४२५ तास खर्च केले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता हे कार्य करत राहणे त्यांना प्रेमामुळेच शक्य झाले. तसेच, शाळासोबत्यांना, सहकर्मचाऱ्‍यांना आणि रस्त्यावर वा इतर ठिकाणी पूर्णपणे अनोळखी लोकांना सुवार्ता सांगण्यास त्यांना प्रेमानेच प्रवृत्त केले. यांपैकी बऱ्‍याच लोकांनी साक्षीदारांचा संदेश ऐकला नाही काहींनी विरोध देखील केला. पण काहींनी मात्र तो ऐकला आणि अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्‍त केली. अशा लोकांकडे ४३,३४,५४,०४९ पुनर्भेटी करण्यात आल्या आणि ४७,६६,६३१ बायबल अभ्यास घेण्यात आले. *

२१ हे सर्वकाही यहोवाच्या साक्षीदारांना आपल्या देवाबद्दल आणि शेजाऱ्‍यांबद्दल असलेल्या प्रेमाचाच अद्‌भुत पुरावा होता! त्यांचे हे प्रेम कधीही कमी होणार नाही. आम्हाला पूर्ण खात्री आहे की २००१ सेवा वर्षात सर्व मानवांना आणखी मोठ्या प्रमाणात साक्ष दिली जाईल. यहोवाचे निष्ठावान व आवेशी उपासक “सर्व प्रीतीने” करत असताना यहोवाचा विपुल आशीर्वाद त्यांच्यावर सदोदित राहो!—१ करिंथकर १६:१४.

[तळटीप]

^ २००० सेवा वर्ष अहवालाविषयी सविस्तर माहितीकरता पृष्ठ १८-२१ वरील तक्‍ता पाहा.

तुम्ही समजावून सांगू शकता का?

• शेजाऱ्‍यांवर प्रेम करण्याच्या बाबतीत आपण कोणाचे अनुकरण केले पाहिजे?

• आपण कोणा कोणावर प्रेम केले पाहिजे?

• ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा देणारे काही अनुभव सांगा.

• आपण ख्रिस्ती प्रेम कशाप्रकारे उत्पन्‍न करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८-२१ पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांचा २००० चा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल

[१५ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती प्रेमामुळे कौटुंबिक बंधने मजबूत होतात

[१७ पानांवरील चित्रे]

इतरांना आपल्या आशेविषयी सांगण्यास प्रेम आपल्याला प्रवृत्त करते