व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परीक्षांमध्येही जिवाभावाने केलेली सेवा

परीक्षांमध्येही जिवाभावाने केलेली सेवा

जीवन कथा

परीक्षांमध्येही जिवाभावाने केलेली सेवा

रोडॉल्फो लोझॅनो यांच्याद्वारे कथित

माझा जन्म सप्टेंबर १७, १९१७ रोजी मेक्सिकोच्या ड्युरांगो राज्यात गोमेझ पलासियो या शहरामध्ये झाला. याच दरम्यान, मेक्सिकन क्रांतिकारी चळवळींनी सगळा देश व्यापलेला. १९२० साली ही क्रांती थांबली. पण आम्ही राहत होतो त्या ठिकाणी कित्येक वर्षांपर्यंत उठाव होत राहिले. लोकांचे जगणे मुश्‍किल होऊन बसले होते.

एकदा, बंडखोरांचा गट आणि सैन्य यांच्यात चकमक होणार असे आईला कोठून तरी कळाले. तेव्हा तिने मला, माझ्या तीन भावांना आणि दोन बहिणींना कितीतरी दिवसांपर्यंत घराच्या बाहेर पडू दिले नाही. आमच्याकडे पुरेसे अन्‍नधान्यसुद्धा नव्हते. माझी धाकटी बहीण आणि मी पलंगाखाली कसे लपून बसायचो ते मला चांगले आठवते. त्यानंतर, आईने आम्हा मुलांना अमेरिकेला न्यायचे ठरवले. आमचे बाबा मागून येणार होते.

आम्ही १९२६ साली कॅलिफोर्नियाला येऊन टेकलो. त्यानंतर काही काळातच महामंदीने अमेरिकेला ग्रासले. कामाच्या शोधात आम्ही भटकत राहिलो. कधी सॅन होआकिन व्हॅली, कधी सान्ता क्लॅरा, कधी सॅलीनास तर कधी किंग सिटीत. शेतातली कामे, सर्व प्रकारच्या फळांची आणि भाज्यांची तोडणी करायला आम्ही शिकलो. माझे तरुणपण फार कष्टात गेले तरी माझ्या आयुष्यातला तो सर्वात उत्तम काळ होता.

बायबल सत्य मिळाले

मार्च १९२८ मध्ये, एक बायबल विद्यार्थी (यहोवाच्या साक्षीदारांना तेव्हा हे नाव होते) आमच्या घरी आले. ते स्पॅनिश बोलणारे एक वृद्ध गृहस्थ होते आणि त्यांचे नाव होते एस्टेबान रिव्हेरा. त्यांनी आम्हाला एक पुस्तिका दिली; तिचे शीर्षक होते, “मृत कोठे आहेत?” शीर्षक पाहूनच मला ते पुस्तक आवडले. त्यातली माहितीसुद्धा खूप छान होती. मी त्या वेळी तरुण होतो, पण तरी बायबल विद्यार्थ्यांसोबत मी अभ्यास करू लागलो आणि सहवाससुद्धा ठेवू लागलो. कालांतराने, माझी आई आणि माझी बहीण अरोरा या दोघीही यहोवाच्या आवेशी सेविका बनल्या.

सन १९३० च्या दशकाच्या मध्यात, सॅन होसे येथे इंग्रजी भाषेच्या मंडळीसाठी एक राज्य सभागृह बांधण्यात आले. त्या परिसरात पुष्कळसे हिस्पॅनिक लोक मळ्यांमध्ये काम करत होते. त्यांना आम्ही सुवार्ता सांगायचो आणि त्यांच्यासोबत टेहळणी बुरूजचा अभ्यास करायचो. सॅन फ्रॅन्सिस्को येथील काही हिस्पॅनिक साक्षीदार आम्हाला मदत करायला यायचे. तेथून सॅन फ्रॅन्सिस्को ८० किलोमीटर दूर वसलेले होते. पाहता पाहता, सॅन होस येथील राज्य सभागृहात भरवल्या जाणाऱ्‍या स्पॅनिश सभांसाठी ६० लोक उपस्थित राहू लागले.

सरतेशेवटी माझ्या बाप्तिस्म्याची वेळ आली. सॅन होस येथे भरवलेल्या एका संमेलनात फेब्रुवारी २८, १९४० रोजी मी बाप्तिस्मा घेऊन यहोवाला केलेले समर्पण प्रकट केले. त्याच्या पुढील वर्षी मला पायनियर अर्थात यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण-वेळेचा सेवक बनवण्यात आले. मग एप्रिल १९४३ मध्ये, मला स्टॉकटन येथे जाऊन एक स्पॅनिश मंडळी स्थापण्याचे आमंत्रण मिळाले; हे शहर १३० किलोमीटर दूर होते. त्या वेळी, मी सॅन होसमधील इंग्रजी मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक होतो. तसेच तेथील स्पॅनिश बोलणाऱ्‍या साक्षीदारांची देखरेख देखील मी करत होतो. मग इतरांना या जबाबदाऱ्‍या देऊन मी स्टॉकटनला गेलो.

माझ्या सचोटीची परीक्षा

सन १९४० पासून मला कित्येकदा अधिकाऱ्‍यांपुढे बोलवण्यात आले. पण प्रत्येक वेळी, युद्धात भाग घेणे माझ्या विवेकाला पटत नाही असे मी सांगायचो आणि ते मला जाऊ द्यायचे. डिसेंबर १९४१ मध्ये अमेरिकेने दुसऱ्‍या महायुद्धात प्रवेश केल्यावर मात्र अधिकाऱ्‍यांकडून मला जास्तच दबाव येऊ लागला. शेवटी, १९४४ मध्ये मला तुरुंगात टाकण्यात आले. माझी शिक्षा अद्याप सुनावली गेली नव्हती; तोपर्यंत मला गुन्हेगारांसोबत तळमजल्यात ठेवण्यात आले होते. मी एक यहोवाचा साक्षीदार आहे असे तेथील गुन्हेगारांना कळताच, पुष्कळजण मला येऊन विचारायचे, आम्ही अमुक अमुक गुन्हा केलाय, तर देव आम्हाला माफ करील का?

सॅन होस येथील साक्षीदारांनी मला जामीनावर सोडवले, पण माझी चौकशी पुढे होणार होती. लॉस एंजेलीझमध्ये नागरी हक्कांच्या खटल्यांसाठी लढणारा एक वकील होता. त्याने माझी केस पैसे न घेताच स्वीकारली. न्यायाधीश मला सोडायला तयार होते; पण त्यांची एक अट होती. मी पायनियरींग सोडून नोकरी करावी आणि दर महिन्याला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्‍यांना जाऊन रिपोर्ट करावा असे त्यांचे म्हणणे होते. मी ती अट मान्य न केल्यामुळे मला वॉशिंग्टन येथील मॅक्‌नील आयलंड तुरुंगात दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली. तेथे मी माझा वेळ बायबलचा गहन अभ्यास करण्यात घालवला. तेथेच मी टायपिंगही शिकलो. दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच, चांगल्या वर्तनामुळे माझी सुटका करण्यात आली. सुटका होताच मी पायनियर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी करू लागलो.

कार्याचा विस्तार

मला १९४७ च्या हिवाळ्यात, टेक्सासच्या कोलोरॅडो सिटीत स्पॅनिश भाषेच्या लोकांना जाऊन सुवार्ता सांगण्याची नियुक्‍ती मिळाली. माझ्यासोबत माझा एक पायनियर साथीदारसुद्धा होता. पण कडाक्याची थंडी असल्यामुळे आम्ही सॅन ॲन्टोनियाला निघून गेलो. तर तेथे मुसळधार पाऊस पडत होता. इतका की, आम्हाला घरोघरी जाऊन सेवा करताच आली नाही. आमचे पैसेसुद्धा लवकर संपले. कितीतरी आठवड्यांपर्यंत आम्ही कच्च्या कोबीचे सँडविच आणि अल्फाल्फाचा चहा पिऊन कसेबसे दिवस काढले. माझा साथीदार शेवटी स्वतःच्या घरी गेला. मी मात्र तेथेच राहिलो. मग इंग्रजी बोलणाऱ्‍या साक्षीदारांना माझी आर्थिक तंगी कळाल्यावर ते मला मदत करू लागले.

नंतरच्या उन्हाळ्यात, मी पुन्हा कोलोरॅडो सिटीत गेलो आणि कालांतराने एक लहानशी स्पॅनिश मंडळी तेथे स्थापन झाली. त्यानंतर मी टेक्सास येथील स्वीटवॉटर येथे गेलो; तेथेही एक स्पॅनिश मंडळी स्थापायला मदत केली. स्वीटवॉटरमध्ये असतानाच मला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १५ व्या वर्गाचे आमंत्रण मिळाले. मिशनऱ्‍यांसाठी असलेले हे प्रशिक्षण फेब्रुवारी २२, १९५० रोजी सुरू झाले. न्यूयॉर्क शहरातल्या याँकी स्टेडियममध्ये त्या उन्हाळ्यात भरवलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात पदवीधर झाल्यावर, मी यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात अर्थात ब्रुकलिन येथे सुमारे तीन महिने राहिलो. तेथे मला मेक्सिको शाखा दफ्तराच्या नियुक्‍तीसाठी प्रशिक्षण देण्यात आले.

मेक्सिकोतील कार्य

ऑक्टोबर २०, १९५० मध्ये मी मेक्सिको सिटीत पाऊल ठेवले. दोन आठवड्यांनंतर मला शाखा पर्यवेक्षक बनवले गेले; ही नियुक्‍ती मी साडेचार वर्षांपर्यंत केली. पायनियर सेवा, तुरुंग, गिलियड आणि ब्रुकलिन या विविध ठिकाणी लाभलेल्या अनुभवांचा मला बराच फायदा झाला. मेक्सिकोत आल्यावर, मेक्सिकन बंधू-बहिणींची आध्यात्मिकता वाढवण्याची गरज आहे हे पटकन माझ्या लक्षात आले. खासकरून देवाच्या वचनात सांगितलेल्या नीतिनियमांचे काटेकोर पालन करण्याच्या संबंधी त्यांना मदत देण्याची फार गरज होती.

लॅटिन अमेरिकन देशांमध्ये, विवाह न करताच एकत्र राहण्याची प्रथा आहे; मेक्सिकोतही असेच होत होते. ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांनी आणि विशेषकरून रोमन कॅथलिक चर्चने ही अशास्त्रीय प्रथा चालू दिली होती. (इब्री लोकांस १३:४) म्हणून, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्येही असे काही लोक होते ज्यांचा कायदेशीरदृष्ट्या विवाह झालेला नव्हता. अशा लोकांना सहा महिन्याची मुदत देण्यात आली. त्यांनी याबाबतीत काही केले नाही तर यहोवाचे साक्षीदार म्हणून राहता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले.

पुष्कळांना फक्‍त कोर्टात जाऊन आपल्या विवाहाची नोंद करायची होती. पण काहींच्या समस्या गुंतागुंतीच्या होत्या. जसे की, काहीजणांनी दोन-तीन विवाह केले होते आणि हे विवाह करण्याआधी त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोटही घेतलेला नव्हता. यहोवाच्या लोकांनी विवाहासंबंधी देवाच्या वचनात सांगितलेल्या शिकवणींनुसार जेव्हा पावले उचलली तेव्हा मंडळ्यांनाही आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले.—१ करिंथकर ६:९-११.

त्या काळात, मेक्सिकोमध्ये शिक्षण व्यवस्था काही धड नव्हती. मी तेथे १९५० मध्ये जाण्याआधीच शाखेने मंडळ्यांमध्ये साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते. परंतु त्या वर्गांची चांगली व्यवस्था करण्यात आली आणि कायदेशीररित्या त्यांची नोंद करण्यासाठीही योजना करण्यात आली. १९४६ सालापासून, (नोंद ठेवायला सुरवात केल्यापासून) मेक्सिकोमध्ये साक्षीदारांनी १,४३,००० व्यक्‍तींना लिहायला वाचायला शिकवले.

धर्माच्या बाबतीत मेक्सिकोतील नियम फारच बंधनकारक होते. परंतु, अलीकडील वर्षांमध्ये बरेच महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. १९९२ साली, धार्मिक बाबींसंबंधी एक नवीन नियम लागू करण्यात आला म्हणून १९९३ मध्ये मेक्सिकोतल्या यहोवाच्या साक्षीदारांची धार्मिक संघटना म्हणून नोंद करण्यात आली.

या बदलांमुळे मला सर्वात जास्त आनंद मिळाला आहे कारण एकेकाळी हे मला अशक्य वाटत होते. कित्येक वर्षे मी सरकारी कार्यालयांमध्ये जात होतो आणि मला चांगला प्रतिसाद मिळतच नव्हता. परंतु, आमच्या शाखा दफ्तराच्या कायदा विभागाने हे सर्व कसे व्यवस्थितपणे साध्य केले ते पाहून आनंद वाटतो. त्यामुळे आता आमच्या प्रचार कामाला कशाचीच बाधा नाही म्हटले तरी चालेल.

मिशनरी जोडीदारासोबत सेवा

मी मेक्सिकोत आलो तेव्हा गिलियडच्या आधीच्या वर्गातील अनेक पदवीधर तेथे होते. यांपैकी एक होती एस्तर, वार्टानियन. ती मूळची अर्मेनिया येथील होती. तिने १९४२ साली कॅलिफोर्नियाच्या वालेजो येथे पायनियरींग सुरू केली होती. जुलै ३०, १९५५ रोजी आमचा विवाह झाला आणि त्यानंतरही आम्ही मेक्सिकोतच सेवा करत राहिलो. एस्तर मेक्सिको सिटीत मिशनरी म्हणून काम करत होती तर मी शाखेत काम करत होतो. पण राहायला आम्ही शाखेतच होतो.

एस्तरला १९४७ मध्ये मेक्सिकोतल्या न्यूवो लिऑनच्या मॉन्टेरी येथे पहिली मिशनरी नियुक्‍ती मिळाली होती. मॉन्टेरीमध्ये तेव्हा एकच मंडळी होती; ४० साक्षीदारांची. पण १९५० मध्ये मेक्सिको सिटीत तिची बदली झाली तेव्हा तेथे चार मंडळ्या झाल्या होत्या. आमच्या मेक्सिको सिटी जवळ असलेल्या शाखेत सध्या दोन व्यक्‍ती आहेत ज्यांच्या नातेवाईकांसोबत एस्तरने, आम्ही मॉन्टेरीत असताना बायबल अभ्यास केला होता.

सन १९५० मध्ये, मेक्सिको सिटीचे संपूर्ण शहरच तेथील मिशनऱ्‍यांच्या प्रचाराचे क्षेत्र होते. हे मिशनरी एकतर पायी जात किंवा खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करत. मी १९५० सालाच्या अगदी शेवटी जेव्हा येथे आलो तेव्हा सात मंडळ्या होत्या. आता मेक्सिको सिटीत १,६०० मंडळ्या आहेत आणि ९०,००० पेक्षा अधिक प्रचारक आहेत! शिवाय, मागच्या वर्षी तेथे ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीसाठी २,५०,००० हून अधिक लोक उपस्थित राहिले होते! एस्तर आणि मला यांतील अनेक मंडळ्यांमध्ये सेवा करायचा विशेषाधिकार लाभला आहे.

एस्तर आणि मी बायबल अभ्यास सुरू करतो तेव्हा नेहमी कुटुंबातल्या पित्यावर जास्त लक्ष केंद्रीत करतो. कारण पित्याने आस्था दाखवली की, कुटुंबातील बाकीचे सगळे त्यात आपोआपच सामील होतात. अशाप्रकारे, अनेक मोठ्या कुटुंबांनी यहोवाची सेवा स्वीकारलेली आम्ही पाहिले आहे. मला तर वाटते की, सबंध कुटुंबेच खऱ्‍या उपासनेत सहभागी होतात हेच मेक्सिकोतल्या खऱ्‍या उपासनेच्या भरभराटीमागचे कारण असावे.

यहोवाने कार्यावर आशीर्वाद दिला आहे

सन १९५० पासून मेक्सिकोतल्या कार्याची प्रगती एकदम उल्लेखनीय ठरली आहे—संख्या वाढीतही आणि संघटनेत झालेल्या बदलांमध्येही. या वाढीत थोडासा हातभार लावल्याचा आणि इतक्या मनमिळाऊ व आनंदी लोकांसोबत काम करायला संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद होतो.

काही वर्षांआधी, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य कार्ल क्लाईन आणि त्यांची पत्नी मार्गरेट हे सुटीवर असताना आम्हाला भेटायला आले होते. मेक्सिकन क्षेत्रात कशी काय प्रगती चालली आहे हे पाहायला म्हणून ते आणि मार्गरेट मेक्सिको सिटीतल्या सॅन हुआन टेझॉनट्‌ला मंडळीत आले. त्या वेळी, आम्हीसुद्धा त्याच मंडळीत होतो. आमचे सभागृह १५ फूट बाय १८ फूटच्या आकाराचे होते. आम्ही तेथे पोचलो तेव्हा ७० लोक आधीच उपस्थित होते आणि उभे राहायलासुद्धा जागा शिल्लक नव्हती. वृद्ध बहीण-भाऊ खुर्च्यांवर, तर तरुण लोक बाकांवर आणि लहान मुले जमिनीवर विटा टाकून त्यांवर बसले होते.

सगळ्या मुलांकडे आपापले बायबल होते आणि वक्‍त्‌यासोबत ते देखील बायबल उघडून वचने वाचत होते हे पाहून बंधू क्लाईन फार प्रभावित झाले. जाहीर भाषणानंतर बंधू क्लाईन यांनी मत्तय १३:१९-२३ या वचनांवर भाषण दिले आणि म्हणाले की, येथे येशूने सांगितलेली ‘चांगली जमीन’ बऱ्‍याच प्रमाणात मेक्सिकोत आहे. त्या दिवशी त्या भाषणाला उपस्थित राहिलेल्या मुलांपैकी सात मुले सध्या मेक्सिको सिटीजवळच विस्तारित शाखेच्या बांधकामाच्या मोठ्या प्रकल्पात काम करत आहेत. आणखी एक बेथेलमध्ये आहे आणि बाकीचे पुष्कळ जण पायनियर आहेत!

मी मेक्सिको सिटीत आलो तेव्हा आमच्या शाखेत फक्‍त ११ जण काम करत होते. पण आता सुमारे १,३५० लोक आहेत; त्यातले सुमारे २५० लोक नवीन शाखेच्या इमारतींच्या बांधकामासाठी येथे आहेत. हे सगळे काम पूर्ण झाल्यावर, आमच्या विस्तारलेल्या शाखेत कदाचित आणखी १,२०० लोक येऊ शकतील (२००२ मध्ये हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे). १९५० साली या संपूर्ण देशात ७,००० राज्य प्रचारकसुद्धा नव्हते, पण आता ५,००,००० हून जास्त आहे! यहोवाची स्तुती करण्यासाठी आपल्या नम्र आणि मेहनती मेक्सिकन बांधवांच्या प्रयत्नांवर यहोवाने कसा आशीर्वाद दिला आहे ते पाहून माझे अंतःकरण भरून येते.

मोठे आव्हान

अलीकडे, माझे आजारपण एक मोठे आव्हान बनले आहे. तसे पाहिले तर माझी प्रकृती चांगली ठणठणीत होती. पण नोव्हेंबर १९८८ मध्ये, मला लकवा मारला आणि त्याचा माझ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. यहोवाच्या दयेने तसेच व्यायाम आणि इतर उपचारांनी माझ्यात बराच सुधार झाला आहे. पण मी पूर्वीसारखा राहिलेलो नाही. माझ्यावर अजूनही उपचार चालू आहेत कारण मला अजूनही तीव्र डोकेदुखी आणि इतर काही त्रास होतात.

मी पूर्वीसारखे आता जास्त काम करू शकत नसलो तरी यहोवाच्या उद्देशांविषयी शिकण्यासाठी आणि त्याचे समर्पित सेवक होण्यासाठी मी पुष्कळांना मदत केली आहे या विचाराने मला समाधान मिळते. आमच्या शाखेत येणाऱ्‍या ख्रिस्ती बंधू-बहिणींशीही मी होता होईल तितके जास्त बोलायचा प्रयत्न करतो. कारण मला वाटते त्यामुळे दोघांनाही उत्तेजन मिळते.

आपण यहोवाला देत असलेल्या सेवेची तो कदर करतो आणि आतापर्यंत केलेले आपले प्रयत्न व्यर्थ नाहीत हे जाणल्यामुळे मला खूप उत्तेजन मिळाले आहे. (१ करिंथकर १५:५८) शारीरिक मर्यादा आणि आजारपण असूनही कलस्सैकर ३:२३, २४ मधील शब्दांनी मी स्वतःला धीर देतो. तेथे म्हटले आहे: “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे.” ही सूचना लक्षात ठेवून परीक्षांमध्येही यहोवाची जिवाभावाने सेवा करायला मी शिकलो आहे.

[२४ पानांवरील चित्र]

सन १९४२ मध्ये, मी पायनियर असताना

[२४ पानांवरील चित्र]

माझी पत्नी १९४७ साली मेक्सिकोमध्ये मिशनरी म्हणून आली

[२४ पानांवरील चित्र]

आज एस्तरसोबत

[२६ पानांवरील चित्रे]

वर डावीकडे: १९५२ साली मेक्सिकोतले आमचे बेथेल कुटुंब; मी समोर आहे

वर: १९९९ मध्ये मेक्सिको सिटीतल्या या स्टॅडियममध्ये १,०९,००० हून अधिक लोक प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिले होते

खाली डावीकडे: आमच्या विस्तारलेल्या शाखेचे पूर्ण होत आलेले बांधकाम