युद्धाच्या जखमा
युद्धाच्या जखमा
“युद्धात कोणाचाही जय होत नाही. सर्वांचा पराजयच होतो,” असे दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या एका माजी सैनिकाने म्हटले. बहुतेक लोकांना या सैनिकाचे म्हणणे पटेल. जय व पराजय होणाऱ्या दोघांना युद्धाचे कठोर व निर्घृण तडाखे सहन करावे लागतात. सशस्त्र झगडे थांबले तरीसुद्धा या झगड्यांमध्ये जखमी झालेल्या कोट्यवधी लोकांच्या जखमा भरून निघत नाहीत.
पण कशाप्रकारच्या जखमा? युद्धात अख्खी पिढी नाहीशी होऊ शकते. अनेक स्त्रिया विधवा होतात तर मुले अनाथ होतात. युद्धातून वाचलेले कित्येक लोक जन्मभर अधू होतात, त्यांच्या मनावर कायमचा आघात होतो. युद्धाआधी त्यांच्याकडे सर्व काही असते पण युद्धानंतर कटू आठवणींशिवाय दुसरे काहीच उरत नाही. काहींना आपला देश सोडून दुसऱ्या देशात निर्वासिताचे जीवन जगावे लागते. मग अशा लोकांच्या मनात खदखदत असलेला द्वेष आणि दुःख याची कल्पना आपण करू शकतो का?
चिघळणाऱ्या जखमा
युद्धामुळे ज्यांच्या मनावर जखमा झालेल्या असतात त्या जखमा गोळीबार थांबल्यावर किंवा सैनिक आपापल्या घरी गेल्यावरही भरून निघत नाहीत. नवीन पिढीच्या मनात एकमेकांबद्दलच्या कटू भावना कायम घर करून राहतात. या जुन्या जखमांमुळेच कधीकधी नवीन युद्धाचा उद्रेक होतो.
उदाहरणार्थ, पहिले महायुद्ध कायदेशीररीत्या समाप्त करण्यासाठी १९१९ साली करण्यात आलेल्या व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर काही अटी लादल्या. पण जर्मनीच्या नागरिकांना या अटी कठोर, बदल्याच्या भावनेने लादल्या होत्या असे वाटले. द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिकानुसार, तहातील अटींमुळे “जर्मन लोक संतापले व त्यांच्या मनात सूडाची भावना जागृत झाली.” काही वर्षांनंतर “शांती तहामुळे चिडलेल्या जर्मनांचा संताप हिटलरने शिगेला पोहंचवला,” व दुसऱ्या महायुद्धाची सुरवात होण्याचे ते एक कारण ठरले.
दुसऱ्या महायुद्धाची सुरवात पश्चिम युरोपमध्ये झाली. नंतर त्यात बाल्कन राष्ट्रेही सामील झाली. १९४० च्या दशकात बाल्कन राष्ट्रांतील वांशिक गटांनी एकमेकांवर केलेल्या जखमा १९९० च्या दशकातील युद्धात चिघळल्या. डी झीट नावाच्या एका जर्मन बातमीपत्रकाने म्हटले: “द्वेष आणि बदल्याचे क्रूर चक्र थांबण्याऐवजी वाढतच चालले आहे.”
मानवजातीला शांतीने राहायचे असेल तर निश्चितच आधी युद्धाच्या जखमा भरून निघणे आवश्यक आहे. पण हे कसे शक्य आहे? द्वेष आणि दुःख मनातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे? युद्धाच्या जखमा कोणाला भरून काढता येतील?
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
COVER: Fatmir Boshnjaku
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
U.S. Coast Guard photo; UN PHOTO १५८२९७/J. Isaac