एक खास घोषणा
एक खास घोषणा
ऑक्टोबर ७, २००० रोजी वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या वार्षिक सभेच्या समारोपास सभाध्यक्ष जॉन ई. बार (नियमन मंडळाचे सदस्य) यांनी एक खास घोषणा केली. थिओडर झराक आणि डॅनियल सिडलिक या बांधवांनी त्या दिवशी सकाळी दिलेल्या भाषणांवर ही घोषणा आधारित होती.—याच मासिकातील पृष्ठे २-१६ आणि २८-३१ पाहा.
एक महत्त्वाचा मुद्दा सांगताना बंधू बार यांनी म्हटले: “कायदेशीर निगमाच्या तुलनेत ‘विश्वासू व बुद्धिमान दासावर’ आणि त्याच्या नियमन मंडळावर सोपवलेली कामे अधिक जबाबदारीची आणि विस्तृत स्वरूपाची आहेत. प्रत्येक कायदेशीर निगमाच्या करारनाम्यावरून लक्षात येते, की त्यावर केवळ मर्यादित स्वरूपाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. आपला धनी येशू ख्रिस्त याने विश्वासू आणि बुद्धिमान दासाला आपल्या ‘सर्वस्वावर’ अर्थात पृथ्वीवरील आपल्या राज्य कार्यहालचालींवर देखरेख करण्यास नेमले आहे.”—मत्तय २४:४५-४७.
पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगमाविषयी बोलताना बंधू बार म्हणाले: “सन १८८४ साली वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाची स्थापना झाली तेव्हापासून या कायदेशीर निगमाने आपल्या आधुनिक इतिहासात एक महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पण, असे असले तरी कायद्याच्या दृष्टीने ते केवळ एक अधिकृत माध्यम असून गरज पडल्यास ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ याची मदत घेते.”
बंधू सिडलिक आणि झराक यांनी आपापल्या भाषणांत या गोष्टीचा खुलासा करत म्हटले: हे खरे की पृथ्वीवरील प्रभुच्या सर्वस्वावर “विश्वासू आणि बुद्धिमान दासाला” नेमले आहे. पण, याचा अर्थ, “दुसऱ्या मेंढरांतील” कार्यक्षम बांधवांवर नेहमीच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या अजिबातच सोपवल्या जाऊ नयेत असा होत नाही. (योहान १०:१६) तसेच, यहोवाच्या साक्षीदारांच्या कायदेशीर निगमाचे काही अथवा सर्व संचालक अभिषिक्त ख्रिश्चनच असावेत असा आग्रह धरण्यास कोणतेही शास्त्रीय कारण नाही.
बंधू बार यांनी श्रोतेगणांना सांगितले की संयुक्त संस्थानांच्या सर्व निगमांमध्ये संचालकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हुद्यावर काम करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातल्या सदस्यांनी अलीकडेच स्वेच्छेने आपले हे पद त्यागले. आणि त्यांच्या जागी दुसऱ्या मेंढरांतील जबाबदार बांधवांची निवड करण्यात आली.
नियमन मंडळाने घेतलेला हा निर्णय निश्चितच फायदेकारक आहे. कारण त्यामुळे आता नियमन मंडळाच्या सदस्यांना आध्यात्मिक अन्न तयार करण्यास आणि जगभरातील बंधुवर्गाच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळतो.
आपल्या आनंदी श्रोत्यांचा निरोप घेत सभापती म्हणाले: “अशाप्रकारे कायद्यासंबंधी आणि व्यवस्थापनेसंबंधी निरनिराळ्या जबाबदाऱ्या अनुभवी पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आल्या असल्या तरी, . . . ते सर्वजण नियमन मंडळाच्या आध्यात्मिक देखरेखेखाली काम करतात. . . . यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या सर्वश्रेष्ठ नावाचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी आपण एकत्र येऊन जे प्रयत्न करत आहोत त्यांवर यहोवाचा विपुल आशीर्वाद असो अशी आपण प्रार्थना करू.”