व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळ हे कायदेशीर निगमापासून वेगळे कसे?

नियमन मंडळ हे कायदेशीर निगमापासून वेगळे कसे?

नियमन मंडळ हे कायदेशीर निगमापासून वेगळे कसे?

वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या वार्षिक सभांची सुरवात १८८५ च्या जानेवारी महिन्यात झाली. १९ व्या शतकाच्या अखेरीस अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना एकत्र करण्याचे काम चालू होते तेव्हा या मंडळाच्या संचालकांना (डायरेक्टर्स) आणि अधिकाऱ्‍यांना (ऑफिसर्स) स्वर्गीय जीवनाची आशा होती. खरे म्हणजे, आतापर्यंत असेच होत आले आहे.

याला केवळ एक अपवाद होता. संस्थेचे त्यावेळचे कायदा सल्लागार आणि पृथ्वीवर जगण्याची आशा बाळगणाऱ्‍या ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकीचे’ हेडन सी. कोव्हिंग्टन यांची १९४० मध्ये संस्थेचे एक संचालक म्हणून निवड झाली. (योहान १०:१६) सन १९४२ ते १९४५ च्या काळात त्यांनी संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर काम केले. त्यावेळी अशी समज होती, की पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगमाचे सर्व संचालक आणि अधिकारी अभिषिक्‍त असले पाहिजेत अशी यहोवाची इच्छा आहे. म्हणून मग बंधू कोव्हिंग्टन यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संचालक मंडळावरील (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) हेडन सी. कोव्हिंग्टनची जागा लायमन ए. स्विंगल यांनी घेतली आणि फ्रेडरिक डब्ल्यू. फ्रान्झ यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली.

वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाचे सर्व संचालक आणि अधिकारी अभिषिक्‍त ख्रिस्ती असले पाहिजेत अशी त्यावेळी यहोवाच्या सेवकांची समज का होती? कारण त्या काळी पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगमाचे संचालक मंडळ व अधिकारी यांचा यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाशी (ज्यात नेहमी आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांचाच समावेश राहिला आहे) जवळचा संबंध जोडला जायचा.

एक ऐतिहासिक वार्षिक सभा

ऑक्टोबर २, १९४४ रोजी पिट्‌सबर्ग येथे झालेल्या वार्षिक सभेत पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगमाच्या सदस्यांनी सहा ठराव पास करून कायदेशीर निगमाच्या करारनाम्यात बदल केला. संस्थेच्या कामासाठी अनुदान करणारे लोकच फक्‍त मतदान करू शकतात असा एक नियम त्या करारनाम्यात दिला होता. पण, तिसऱ्‍या दुरुस्ती ठरावाने हा नियम रद्द करण्यात आला. त्या वार्षिक सभेच्या अहवालात असे म्हटले होते: “संस्थेचे सदस्यत्व केवळ ५०० पर्यंत मर्यादित असेल . . . आणि निवडून आलेली प्रत्येक व्यक्‍ती संस्थेची पूर्ण वेळ सेवक असली पाहिजे किंवा यहोवाच्या साक्षीदारांच्या कंपनीची (मंडळीची) अर्ध-वेळ सेवक असली पाहिजे आणि तिची प्रभुसारखी मनोवृत्ती असली पाहिजे.”

यास्तव, देव-राज्याच्या कार्यासाठी दिलेल्या रकमेचा विचार न करता संस्थेच्या संचालकांना निवडण्यासाठी मतदान करण्याचा अधिकार केवळ त्याच लोकांना होता ज्यांनी यहोवाच्या सेवेला सर्वस्वी वाहून घेतले होते. यशया ६०:१७ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे यात प्रगतीशीलपणे सुधार घडून आला. ते वचन असे म्हणते: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” या भविष्यवाणीत ‘सत्ता चालवणे’ आणि ‘कारभार पाहणे’ असे जे म्हटले आहे ते यहोवाच्या लोकांच्या संघटनात्मक पद्धतींमध्ये होणाऱ्‍या सुधारणांना सूचित करते.

ईश्‍वरशासित पद्धतीने संघटना चालवण्यासाठी उचललेले हे सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल दानीएल ८:१४ मध्ये सांगितलेल्या ‘दोन हजार तीनशे दिवसांच्या’ [“सांजसकाळ,” तळटीप.] अखेरीस आले. (दानीएल ८:१४) त्यावेळी, “पवित्रस्थानाची शुद्धि” करण्यात आली.

पण, १९४४ च्या ऐतिहासिक वार्षिक सभेनंतरही एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर मिळणे बाकी होते. त्यावेळी पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगमाच्या संचालक मंडळात सात सदस्य असायचे. आणि त्या काळी नियमन मंडळाचा या कायदेशीर निगमाशी जवळचा संबंध जोडला जात असल्यामुळे नियमन मंडळामध्ये सुद्धा केवळ सात अभिषिक्‍त ख्रिस्ती असले पाहिजेत असा त्याचा अर्थ होता का? शिवाय, कायदेशीर निगमाचे सदस्य, संचालकांची निवड करत असल्यामुळे नियमन मंडळाच्या सदस्यांची निवड देखील कायदेशीर निगमाच्या सदस्यांकडूनच वार्षिक सभेत होत होती का? वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाचे संचालक व अधिकारी आणि नियमन मंडळाचे सदस्य एकच आहेत का? की त्यांच्यात काही फरक आहे?

आणखीन एक अविस्मरणीय वार्षिक सभा

अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे ऑक्टोबर १, १९७१ रोजी झालेल्या वार्षिक सभेत देण्यात आली. त्या प्रसंगी, एका वक्‍त्‌याने स्पष्ट केले की, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ बनलेल्या नियमन मंडळाची स्थापना वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाची स्थापना होण्याच्या शेकडो वर्षांआधी झाली होती. (मत्तय २४:४५-४७) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी म्हणजे पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगम अस्तित्वात येण्याच्या सुमारे १८ शतके आधी एका नियमन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्या नियमन मंडळामध्ये सुरवातीला ७ नव्हे तर १२ प्रेषित होते. या संख्येत नंतर वाढ झाल्याचे दिसून येते कारण “यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग” पुढाकार घेत होते. (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये १५:२.

सन १९७१ मध्ये याच वक्‍त्‌याने असा खुलासा करून सांगितले की वॉच टावर संस्थेचे सदस्य मतदान करून नियमन मंडळाच्या अभिषिक्‍त सदस्यांची निवड करू शकत नाहीत. का? “कारण ‘दास’ वर्गाने बनलेले नियमन मंडळ कोणा मनुष्याद्वारे नेमले जात नाही. तर त्यांची नेमणूक . . . खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीचा मस्तक आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ वर्गाचा प्रभू आणि धनी येशू ख्रिस्त याच्याद्वारे होते.” यावरून स्पष्ट होते की नियमन मंडळाच्या सदस्यांची निवड कोणत्याही कायदेशीर निगमाच्या सदस्यांच्या मतदानाकरवी होऊ शकत नाही.

वक्‍त्‌याने पुढे एक महत्त्वाचे विधान केले: “संस्थेच्या संचालक मंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषपाल सचिव आणि उपकोषपाल सचिव यांसारखे अधिकारी असतात तसे नियमन मंडळात नसतात. नियमन मंडळामध्ये फक्‍त एक सभापती असतो.” कित्येक वर्षांपर्यंत पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगमाचे अध्यक्ष, नियमन मंडळाचे सगळ्यात प्रमुख सदस्य असत. पण, आता तसे होणार नाही. नियमन मंडळाच्या सदस्यांकडे सारखाच अनुभव आणि क्षमता नसली तरी त्यांच्या जबाबदाऱ्‍या मात्र समान असतील. वक्‍त्‌याने असेही म्हटले: ‘नियमन मंडळाचा कुठलाही सदस्य संस्थेचा अध्यक्ष नसला तरी तो . . . सभाध्यक्ष असू शकतो. अर्थात, नियमन मंडळामध्ये प्रत्येकाला आळीपाळीने सभाध्यक्ष बनण्याची संधी मिळते.’

सन १९७१ च्या अविस्मरणीय वार्षिक सभेत अभिषिक्‍त सदस्यांचे नियमन मंडळ आणि पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगम यांच्यातला फरक स्पष्ट करण्यात आला. असे असले तरी नियमन मंडळाचे सदस्य कायदेशीर निगमाचे संचालक आणि अधिकारी या नात्याने कार्य करत राहिले. आज मात्र असा एक प्रश्‍न निर्माण होतो: “नियमन मंडळाचे सदस्यच केवळ वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाचे संचालक बनावेत यासाठी बायबलमध्ये एखादे कारण दिलेले आहे का?

नाही. याकरता बायबलमध्ये कोणतेही कारण नाही. पेन्सिल्व्हेनिया कायदेशीर निगम ही यहोवाच्या साक्षीदारांची एकमेव अधिकृत संस्था नाही. अशा आणखीनही संस्था आहेत. एक, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इन्कोर्पोरेटेड ही आहे. या संस्थेमुळे संयुक्‍त संस्थानांत आपले कार्य सुरळीत चालते. आणि या कायदेशीर निगमाचे सर्व संचालक आणि अधिकारी प्रामुख्याने ‘दुसऱ्‍या मेंढरांमधले’ असले तरी त्यावर यहोवाचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट दिसून येते. तसेच, ब्रिटनमध्ये इंटरनॅशनल बायबल स्टुडेंट्‌स असोसिएशन ही एक अधिकृत संस्था आहे. इतर देशांत राज्य कार्यहालचालींना बढावा देण्यासाठी याशिवाय आणखी अधिकृत संस्था आहेत. अशा सर्व संस्था एकमेकांशी सहकार्य करून जगभरात सुवार्तेच्या प्रचार कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जगाच्या पाठीवर या संस्था कुठेही असल्या आणि त्यांत कोणीही संचालक किंवा अधिकारी असले तरी नियमन मंडळच त्यांच्यावर ईश्‍वरशासित पद्धतीने देखरेख करते, त्यांचा उपयोग करते आणि त्यांचे करारनामे अभ्यासून त्यास आपली मंजुरी देते. तेव्हा, राज्य कार्यहालचालींना बढावा देण्यासाठी अशा अधिकृत संस्थांवर कामे सोपवली जातात.

अशा अधिकृत संस्था आपल्यासाठी खूप लाभदायक आहेत. त्यांची स्थापना करून आपण स्थानिक आणि राष्ट्रीय कायद्यांचे पालन करत असतो. आणि देवाच्या वचनानुसार असे करण्यास आपण बांधील आहोत. (यिर्मया ३२:११; रोमकर १३:१) अशा अधिकृत संस्था बायबल, पुस्तके, मासिके, माहितीपत्रके आणि इतर साहित्य छापून राज्य प्रचाराच्या कार्यास गती देतात. जमीनजुमला आणि मालमत्तेसंबंधी बाबी हाताळण्यासाठी, विपत्तीग्रस्त क्षेत्रांत मदत कार्य करण्यासाठी, अधिवेशनांकरता स्थळ मिळवण्यासाठी आणि अशा इतर कार्यांसाठी त्या कायदेशीर माध्यम बनतात. या संस्था सादर करीत असलेल्या सेवेबद्दल आपण त्यांचे मनस्वी आभारी आहोत.

यहोवाच्या नावाला विशेष महत्त्व

सन १९४४ मध्ये वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या उद्दिष्टांवर अधिक भर देण्यासाठी या कायदेशीर निगमाच्या करारनाम्यातील कलम दोनमध्ये फेरबदल करण्यात आला. या करारनाम्यानुसार संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये या गोष्टी गोवल्या आहेत: “देवाच्या ज्या राज्याचा ख्रिस्त येशू राजा आहे त्या राज्याच्या सुवार्तेचा सर्व राष्ट्रांमध्ये प्रचार करणे जेणेकरून सर्वसमर्थ यहोवा देवाच्या नामाची, त्याच्या वचनाची आणि त्याच्या श्रेष्ठत्वाची लोकांना साक्ष मिळू शकेल.”

सन १९२६ पासून ‘विश्‍वासू दासाने’ यहोवाच्या नावाला विशेष महत्त्व दिले. आणि खासकरून १९३१ मध्ये, जेव्हा बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केले तेव्हा तर या नावाला अधिकच महत्त्व मिळाले. (यशया ४३:१०-१२) तसेच, संस्थेच्या प्रकाशनांनी देखील देवाच्या नावाला खास महत्त्व दिले. त्यातील इंग्रजी भाषेतली काही पुस्तके ही आहेत: जेहोवा (१९३४), “तुझे नाव पवित्र मानले जावो” (१९६१) आणि “राष्ट्रांना कळून येईल की मी यहोवा आहे”—कसे? (१९७१).

या ठिकाणी उल्लेख केलाच पाहिजे असे आणखीन एक प्रकाशन म्हणजे १९६० मध्ये इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले संपूर्ण न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स. इब्री शास्त्रवचनांत ज्या ज्या ठिकाणी टेट्राग्रॅमटन (इब्री भाषेत देवाचे नाव) आढळते त्या त्या ठिकाणी या भाषांतरात देवाचे ‘यहोवा’ हे नाव दिलेले आहे. तसेच, यातील ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत ईश्‍वरी नाम २३७ वेळा आढळते. कारण काळजीपूर्वक परीक्षण केल्यावर असे दिसून आले की या ठिकाणी देवाचे नाव असणे आवश्‍यक होते. जगभरात आपले नाव जाहीर करण्यासाठी यहोवा निरनिराळ्या मार्गांनी “दास” वर्गाला आणि नियमन मंडळाला प्रकाशने छापण्यास आणि अधिकृत संस्थांचा उपयोग करण्यास परवानगी देतो याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत!

देवाच्या वचनाचे वितरण करण्यास प्रोत्साहन

यहोवाच्या लोकांनी अखंडपणे यहोवाच्या नावाची साक्ष दिली. बायबलचे आणि बायबलवर आधारित साहित्यांचे प्रकाशन आणि वितरण करून त्यांनी त्याच्या वचनाचे समर्थन केले आहे. १९००  दशकाच्या सुरवातीला वॉच टावर संस्थेने दी एम्फॅटिक डायग्लॉटचे तसेच, बेन्जेमिन विल्सनच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या ग्रीक-इंग्रजी इंटरलिनियर आवृत्तीचे हक्क संपादन केले. या शिवाय, संस्थेने बायबल विद्यार्थ्यांचे किंग जेम्स व्हर्शन प्रकाशित केले. यात ५०० पानांचे परिशिष्ट होते. मग, १९४२ मध्ये संस्थेने किंग जेम्स व्हर्शनचे समासातील संदर्भांसह प्रकाशन केले. तर १९४४ साली संस्था १९०१ सालाच्या अमेरिकन स्टॅन्डर्ड व्हर्शनचे प्रकाशन करू लागली. यात सर्व ठिकाणी देवाच्या नावाचा प्रयोग केलेला आहे. स्टीफन टी. बायइंग्टनच्या द बायबल इन लिव्हिंग इंग्लिश यातही यहोवाच्या नावाचा उपयोग केला होता. १९७२ मध्ये संस्थेने याचे देखील प्रकाशन केले.

यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिकृत संस्थांनी अशा सर्व बायबल अनुवादांचे प्रकाशन आणि वितरण करण्यास मदत केली. पण, वॉच टावर संस्था आणि न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटीचे (नवे जग बायबल भाषांतर समिती) अभिषिक्‍त यहोवाचे साक्षीदार यांच्यातला जवळचा सहयोग विशेष उल्लेखनीय आहे. आजपर्यंत या भाषांतराच्या पूर्ण किंवा काही भागांच्या ३८ भाषांमध्ये १०,६४,००,००० प्रती छापण्यात आल्या आहेत याचा आम्हाला आनंद वाटतो. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया खरोखरच एक बायबल संस्था आहे!

धन्याने ‘आपल्या सर्वस्वावर विश्‍वासू दासाला’ नेमले आहे. यात अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील मुख्यालयांचा आणि सध्या जगभरात कार्यरत असलेल्या ११० शाखांचा समावेश होतो. आपल्या जबाबदारीवर जे काही सोपवले आहे त्याचा ज्याप्रकारे आपण वापर करतो त्याचे आपल्याला उत्तर द्यायचे आहे याची दास वर्गाच्या सदस्यांना कल्पना आहे. (मत्तय २५:१४-३०) पण, याचा अर्थ नेहमीच्या प्रशासकीय जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी ‘दुसऱ्‍या मेढरांमधील’ कार्यक्षम बांधवांना ‘दास’ वर्ग नियुक्‍त करत नाही असे नाही. खरं म्हणजे असे केल्याने नियमन मंडळाच्या सदस्यांना “प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर” राहण्यास अधिक वेळ देता येतो.—प्रेषितांची कृत्ये ६:४.

जागतिक परिस्थिती अनुमती देईल तोपर्यंत ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाला’ चित्रित करणारे नियमन मंडळ अधिकृत संस्थांचा उपयोग करत राहील. अधिकृत संस्थांमुळे आपले कार्य सुरळीत चालत असले तरी त्यांच्यावर आपले कार्य पूर्णतः अवलंबून आहे असे नाही. अशी एखादी संस्था सरकारने बंद केली तरी राज्य प्रचाराचे कार्य चालूच राहील. ज्या देशांत प्रतिबंध घातल्यामुळे अधिकृत संस्थांचा उपयोग होऊ शकत नाही अशा देशांमध्ये आजही राज्याच्या संदेशाचा प्रचार केला जात आहे, शिष्य बनवले जात आहेत आणि ईश्‍वरशासित वाढ होत आहे. या मागचे कारण म्हणजे, यहोवाचे साक्षीदार रोप लावतात व त्यास पाणी घालतात पण, ‘देव त्याची वाढ करत राहतो.’—१ करिंथकर ३:६, ७.

भविष्याची आस धरत असता, यहोवा आपल्या लोकांच्या आध्यात्मिक तसेच भौतिक गरजांकडे लक्ष देईल याची खात्री आपण बाळगू शकतो. राज्य प्रचाराचे कार्य पूर्ण करण्यात यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त स्वर्गातून आपले मार्गदर्शन करतील आणि आवश्‍यक ते पाठबळही देतील. अर्थात, देवाचे सेवक या नात्याने आपण जे काही साध्य करू ते ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर यहोवाच्या आत्म्याने’ साध्य होईल. (जखऱ्‍या ४:६) या शेवटल्या काळी देवाने जे कार्य आपल्यावर सोपवले आहे ते स्वतःच्या बळावर नव्हे तर देवाने दिलेल्या शक्‍तीनेच आपण करू शकतो. तेव्हा, मदतीसाठी आपण सतत त्याला प्रार्थना करत राहू!