व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंडळीतील पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जातात

मंडळीतील पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जातात

मंडळीतील पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जातात

“तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या.”—प्रेषितांची कृत्ये २०:२८.

१, २. यशया ६०:२२ ची आज आपल्या दिवसात कशाप्रकारे पूर्णता होत आहे?

 शेवटल्या काळात अतिशय विलक्षण असे काहीतरी घडण्याविषयी यहोवाने फार पूर्वी भाकीत केले होते. संदेष्टा यशयाच्या माध्यमाने त्याने असे भाकीत केले: “जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.”—यशया ६०:२२.

ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे असे पुराव्यानिशी म्हणता येईल का? होय, निश्‍चितच! १८७० च्या दशकादरम्यान यहोवाच्या लोकांची एक मंडळी अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया राज्यात अलेघनी शहरात स्थापन करण्यात आली. ही केवळ सुरवात होती. त्यानंतर जगभरात अक्षरशः हजारो मंडळ्या निर्माण झाल्या आणि आजही ही वाढ अखंड सुरू आहे. लाखो राज्य प्रचारकांचे जणू एक बलाढ्य राष्ट्रच निर्माण झाले आहे. पृथ्वीवरील २३५ राष्ट्रांत ९१,००० पेक्षा अधिक मंडळ्यांत ते यहोवाची उपासना करत आहेत. अगदी जवळ येऊन ठेपलेल्या ‘मोठ्या संकटाआधी’ यहोवा त्याच्या खऱ्‍या उपासकांना एकत्रित करत आहे याची आपल्याला निश्‍चितच खात्री मिळते.—मत्तय २४:२१; प्रकटीकरण ७:९-१४.

३. “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

वैयक्‍तिकरित्या यहोवाला आपले जीवन समर्पित केल्यानंतर, या लाखो उपासकांनी येशूने सांगितल्यानुसार “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेतला. (मत्तय २८:१९) ‘पित्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेण्याचा अर्थ असा होतो की यहोवा देव आपला स्वर्गीय पिता आणि जीवनदाता आहे हे ती समर्पित व्यक्‍ती ओळखते आणि त्याच्या सार्वभौमत्वाला अधीन होते. ‘पुत्राच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे म्हणजे येशू ख्रिस्ताला मानवांकरता खंडणी देणारा, ख्रिस्ती मंडळीचे नेतृत्त्व करणारा आणि राजा म्हणून ती व्यक्‍ती मान्य करते. तसेच जीवनातील कोणतेही निर्णय घेताना ही व्यक्‍ती देवाच्या पवित्र आत्म्याचे, अर्थात त्याच्या कार्यकारी शक्‍तीचे मार्गदर्शन स्वीकारते. याचाच अर्थ ती “पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेते.

४. ख्रिस्ती सेवकांची नेमणूक कशाप्रकारे केली जाते?

बाप्तिस्म्याच्या वेळी या नव्या शिष्यांची यहोवा देवाचे सेवक म्हणून नेमणूक होते. कोण त्यांना नेमतो? अभिषिक्‍तांच्या संदर्भात लिहिलेल्या २ करिंथकर ३:५ या वचनातील शब्दांचे तत्त्व त्यांना देखील लागू होते, जेथे म्हटले आहे: “आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.” स्वतः यहोवा देवाकडून नेमणूक मिळण्यापेक्षा मोठा सन्मान आणखी कोणता असू शकतो! हे सेवक बाप्तिस्म्यानंतरही ‘सुवार्तेचे’ सेवक याअर्थी प्रगती करतच राहतात. अर्थात, त्यांनी देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले आणि सदोदित त्याच्या वचनाचे पालन केले तरच.—मत्तय २४:१४; प्रेषितांची कृत्ये ९:३१.

लोकसत्ताक नव्हे तर ईश्‍वरशासित पद्धतीने नेमणूक

५. ख्रिस्ती पर्यवेक्षक व सेवा सेवकांना लोकशाहीच्या पद्धतीने निवडले जाते का? स्पष्टीकरण करा.

ख्रिस्ती सेवकांची संख्या वाढत आहे. या वाढत जाणाऱ्‍या सेवकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक पात्रता असलेल्या पर्यवेक्षकांची व त्यांना मदत करणाऱ्‍या कार्यक्षम सेवा सेवकांची गरज आहे. (फिलिप्पैकर १:१) या आध्यात्मिक पुरुषांना कशाप्रकारे नेमले जाते? चर्चेसमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्‍या पद्धतींनी या पर्यवेक्षकांना व सेवासेवकांना नेमले जात नाही. उदाहरणार्थ, लोकशाहीच्या पद्धतीने म्हणजे मंडळीतील बहुसंख्य लोकांच्या मतांच्या आधारावर ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही. तर, ईश्‍वरशासित पद्धतीने त्यांची नेमणूक केली जाते. याचा काय अर्थ होतो?

६. (अ) खऱ्‍या अर्थाचे ईश्‍वरशासन म्हणजे काय? (ब) पर्यवेक्षकांची व सेवा सेवकांची नेमणूक ईश्‍वरशासित पद्धतीने का केली जाते?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास खऱ्‍या अर्थाचे ईश्‍वरशासन म्हणजे देवाचे शासन. यहोवाचे साक्षीदार आपल्या इच्छेने यहोवाच्या शासनाला अधीन होतात आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता एकमेकांना सहयोग देतात. (स्तोत्र १४३:१०; मत्तय ६:९, १०) ख्रिस्ती पर्यवेक्षक अर्थात मंडळीतील वडील आणि सेवा सेवक यांची नेमणूक ईश्‍वरशासित पद्धतीने होते असे म्हणता येते; कारण या जबाबदार पुरुषांना नेमण्याकरता त्यांची शिफारस व प्रत्यक्ष नेमणूक देखील पवित्र शास्त्रवचनांत सांगितल्यानुसारच, देवाच्या व्यवस्थेनुसार केली जाते. साहजिकच, “सर्वांवर मस्तक” असलेल्या यहोवा देवालाच त्याच्या दृश्‍य संघटनेतील सर्व कार्ये त्याच्या इच्छेनुसार चालवण्याचा अधिकार आहे.—१ इतिहास २९:११, ईजी टू रीड व्हर्शन; स्तोत्र ९७:९.

७. यहोवाच्या साक्षीदारांत कोणती शासनपद्धती आहे?

ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक गटांनी आपापल्या मनाप्रमाणे धार्मिक शासनाच्या पद्धती निवडल्या आहेत. पण यहोवाच्या साक्षीदारांनी असे केलेले नाही. प्रामाणिक ख्रिस्ती या नात्याने ते सदोदित यहोवाचे कायदेकानून पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील पर्यवेक्षकांची नेमणूक मंडळीच्या, बिशपांच्या किंवा प्रेस्बुतरांच्याद्वारे केली जात नाही. या पर्यवेक्षकांना नेमताना बाहेरच्या लोकांनी लुडबुड करण्याचा प्रयत्न केल्यास यहोवाचे लोक त्यांच्या इच्छेला जुमानत नाहीत. पहिल्या शतकात प्रेषितांनी ज्याप्रमाणे ‘मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानण्याचा’ निर्धार व्यक्‍त केला त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देखील देवाच्याच आज्ञेला प्राधान्य देतात. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) अशारितीने, यहोवाचे साक्षीदार सर्व बाबतीत स्वतःला देवाच्या स्वाधीन करतात. (इब्री लोकांस १२:९; याकोब ४:७) ईश्‍वरशासित पद्धतीचे पालन केल्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळतो.

८. ईश्‍वरशासित व लोकशाहीच्या पद्धतींत काय फरक आहे?

ईश्‍वरशासनाचा सर्वोच्च अधिकारी यहोवा देव याचे आपण सेवक असल्यामुळे लोकशाही व ईश्‍वरशासित पद्धत यांतील फरक आपण ओळखला पाहिजे. लोकशाही पद्धतीत समान प्रतिनिधित्वाच्या तत्त्वानुसार निवडणुकीत उमेदवार उभे राहतात, निवडणुकीआधी प्रचार केला जातो आणि ज्याला बहुमत मिळेल त्याला निवडले जाते. ईश्‍वरशासित नेमणुका करताना या पद्धतींचा अवलंब केला जात नाही. या नेमणुका मनुष्यांकडून किंवा कोणत्या कायदेशीरपणे अधिकृत व्यक्‍ती अथवा संस्थेकडून केल्या जात नाहीत. “परराष्ट्रीयांचा प्रेषित” म्हणून आपल्याला येशू व यहोवाने नेमले याविषयी सांगताना कदाचित पौलाने गलतीकरांना असे लिहिले की त्याला “मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेहि नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्‍यांच्या द्वारे” नेमण्यात आले होते.—रोमकर ११:१३; गलतीकर १:१.

पवित्र आत्म्याद्वारे नेमणूक

९. ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या नेमणुकीबद्दल प्रेषितांची कृत्ये २०:२८ येथे काय म्हटले आहे?

इफिस येथे राहणाऱ्‍या वडिलांना पौलाने आठवण करून दिली की देवाने त्यांना पवित्र आत्म्याच्या माध्यमाने नेमले आहे. त्याने म्हटले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपांत पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्‍ताने स्वतःकरता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रेषितांची कृत्ये २०:२८) ख्रिस्ती मंडळीची देखरेख करणाऱ्‍या या वडिलांना देवाच्या कळपाचे मेंढपाळ या नात्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सदोदित पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज होती. जर नेमलेला एखादा पुरुष कालांतराने देवाच्या आदर्शांना जागला नाही तर आपोआपच पवित्र आत्मा त्या व्यक्‍तीला त्या पदावरून काढून टाकण्याकरता कार्यशील ठरणार होता.

१०. ईश्‍वरशासित नेमणुका करताना पवित्र आत्मा कशाप्रकारे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो?

१० या संदर्भात पवित्र आत्म्याची भूमिका इतकी महत्त्वाची का आहे? पहिले कारण असे की मंडळ्यांची देखरेख करण्यास पात्र ठरण्याकरता कोणते गुण आवश्‍यक आहेत हे दाखवणारा वृत्तान्त पवित्र आत्म्याच्याच प्रेरणेने लिहिलेला आहे. तीमथ्य व तीत यांना पत्र लिहिताना पौलाने पर्यवेक्षक व सेवासेवक यांकडून अपेक्षित असलेल्या गुणांविषयी लिहिले होते. उदाहरणार्थ, पर्यवेक्षकांनी अदूष्य, नेमस्त, स्वस्थचित्त, व्यवस्थित, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक व आदर्श कुटुंबप्रमुख असणे आवश्‍यक होते. मद्याच्या बाबतीत त्यांनी संयमी असावे, पैशाचे लोभी असू नये आणि त्यांच्या अंगी आत्मसंयम असावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. अशाच प्रकारचे गुण सेवा सेवक म्हणून नेमले जाण्याची इच्छा धरणाऱ्‍यांकडूनही अपेक्षित होते.—१ तीमथ्य ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९.

११. मंडळीतील जबाबदाऱ्‍या मिळवण्यास इच्छुक असणाऱ्‍यांकडून काय अपेक्षा केली जाते?

११ पर्यवेक्षक व सेवा सेवकांच्या पात्रतेकरता आवश्‍यक असलेल्या गुणांचा विचार केल्याने हेच दिसून येते की यहोवाच्या उपासनेत नेतृत्त्व करणाऱ्‍यांनी ख्रिस्ती आचरणात आदर्श असले पाहिजे. मंडळीत जबाबदारीचे पद मिळवण्यास इच्छुक असणाऱ्‍यांनी आपल्या आचरणातून हे दाखवले पाहिजे की पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात कार्य करत आहे. (२ तीमथ्य १:१४) देवाचा आत्मा या पुरुषांत “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे गुण उत्पन्‍न करत आहे हे सर्वांना दिसून आले पाहिजे. (गलतीकर ५:२२, २३) विश्‍वासू बांधवांसोबत व इतरांसोबत व्यवहार करताना त्यांचे हे गुण आपोआप दिसून येतील. अर्थात एकाच व्यक्‍तीत सगळे गुण असतीलच असे नाही. कोणी एका बाबतीत तर दुसरा दुसऱ्‍या एखाद्या बाबतीत श्रेष्ठ असेल. पण पर्यवेक्षक अथवा सेवा सेवक म्हणून नेमले जाण्याची इच्छा बाळगणाऱ्‍यांच्या एकंदर आचरणावरून ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि देवाच्या वचनातील अपेक्षा पूर्ण करत आहेत हे दिसून आले पाहिजे.

१२. कोणाची नेमणूक पवित्र आत्म्याने झाली आहे असे म्हणता येईल?

१२ पौलाने इतरांना त्याचे स्वतःचे अनुकरण करण्यास सांगितले. तो असे म्हणू शकला कारण येशू ख्रिस्त, ज्याने “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून [आपल्याकरता] कित्ता घालून दिला आहे,” त्याचे पौल स्वतः अनुकरण करत होता. (१ पेत्र २:२१; १ करिंथकर ११:१) पर्यवेक्षक किंवा सेवा सेवक या पदावर नेमले जाताना जे बंधू बायबलमधील अपेक्षा पूर्ण करत असतात त्यांची नेमणूक पवित्र आत्म्याने केली आहे असे म्हणता येते.

१३. मंडळीत सेवा करण्यासाठी विशिष्ट पुरुषांची शिफारस करणाऱ्‍यांना पवित्र आत्मा कशाप्रकारे मदत करतो?

१३ वडिलांच्या नेमणुकीत पवित्र आत्मा कशाप्रकारे कार्य करतो हे आणखी एका गोष्टीवरून स्पष्ट होते. येशूने म्हटले होते की ‘स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो पवित्र आत्मा देईल.’ (लूक ११:१३) तेव्हा स्थानिक मंडळीचे वडील एकत्र येऊन वडील किंवा सेवा सेवक या पदांकरता बांधवांची शिफारस करण्यासाठी चर्चा करतात तेव्हा ते देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाकरता प्रार्थना करतात. त्यांची शिफारस देवाच्या प्रेरित वचनात दिलेल्या सूचनांना अनुलक्षून असते; आणि त्यामुळे या पदांकरता ते ज्या व्यक्‍तीचे नाव सुचवतात ती व्यक्‍ती बायबलमधील अपेक्षा पूर्ण करते की नाही हे पारखण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना मदत करतो. शिफारस करणाऱ्‍यांनी व्यक्‍तीच्या बाह्‍य स्वरूपाकडे, शैक्षणिक पात्रतेकडे किंवा तिच्या स्वाभाविक बुद्धी व कौशल्याकडे आवश्‍यकतेपेक्षा जास्त लक्ष देऊ नये. तर हा बंधू मुळात आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे का, मंडळीतले बांधव बेधडक त्याच्याकडे जाऊन आध्यात्मिक सल्ला व मार्गदर्शन मागू शकतील का या बाबींना वडिलांनी प्राधान्य दिले पाहिजे.

१४. प्रेषितांची कृत्ये ६:१-३ या वचनांतून आपण काय शिकू शकतो?

१४ वडील व सेवा सेवक म्हणून कार्य करण्यासाठी बांधवांची शिफारस वडील वर्ग व विभागीय पर्यवेक्षक (सर्किट ओव्हरसियर्स) मिळून करत असले तरीसुद्धा या बांधवांची नेमणूक पहिल्या शतकात केली जात होती त्याच प्रकारे आजही केली जाते. एकदा एक महत्त्वाचे काम नेमण्याकरता आध्यात्मिक पात्रता पूर्ण करणाऱ्‍या बांधवांची गरज भासली तेव्हा नियमन मंडळाने जबाबदार बांधवांना सांगितले: “तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू.” (प्रेषितांची कृत्ये ६:१-३) या सात पुरुषांची शिफारस तेथील काही बांधवांनी केली तरीसुद्धा त्यांची प्रत्यक्ष नेमणूक ही जेरूसलेम येथे असलेल्या जबाबदार पुरुषांनी केली. आजही असेच केले जाते.

१५. वेगवेगळ्या पदांवर बांधवांना नेमण्यात नियमन मंडळाची कोणती भूमिका असते?

१५ शाखा समितीचे सर्व सदस्य थेट यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाकडून नेमले जातात. ही महत्त्वाची जबाबदारी कोणावर सोपवावी हे ठरवताना नियमन मंडळातील बांधव येशूचे हे विधान आठवणीत ठेवतात: “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.” (लूक १२:४८) शाखा समितीच्या सदस्यांव्यतिरिक्‍त बेथेल वडील व विभागीय आणि प्रांतीय पर्यवेक्षकांची नेमणूक देखील नियमन मंडळाकडूनच होते. पण इतर काही नेमणुका करताना नियमन मंडळ त्यांच्यावतीने कार्य करण्यासाठी काही जबाबदार बांधवांना नियुक्‍त करते. आणि याला देखील बायबलचा आधार आहे.

‘मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू वडील नेमावे’

१६. पौलाने तीताला क्रेत येथे का सोडले आणि यावरून आजच्या काळात ईश्‍वरशासित नेमणुका करण्याविषयी काय सूचित होते?

१६ आपल्यासोबत कार्य करणाऱ्‍या तीताला पौलाने असे सांगितले: “मी तुला क्रेतांत ह्‍यासाठी ठेवून आलो की, तू अपुऱ्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे.” (तीत १:५) या वडिलांना नेमताना तीताने कोणकोणत्या बाबतीत त्यांची पात्रता लक्षात घ्यावी हे देखील पौलाने स्पष्ट केले. आज देखील नियमन मंडळाच्या वतीने वडील व सेवा सेवकांना नेमण्याकरता शाखा दफ्तरांतील विशिष्ट सुयोग्य बांधवांना नियुक्‍त केले जाते. नियमन मंडळाच्या वतीने कार्य करणाऱ्‍या या बांधवांना नेमणूक करण्यासंबंधी बायबलमधील मार्गदर्शन नीट समजावे आणि त्यांनी त्याचे पालन करावे याची विशेष काळजी घेतली जाते. अशारितीने, जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांत सेवा करण्यासाठी सुयोग्य बांधवांना नियमन मंडळाच्या मार्गदर्शनानुसारच नेमण्यात येते.

१७. वडील व सेवा सेवकांना नेमण्याची जबाबदारी शाखा दफ्तराकडून कशाप्रकारे पार पाडली जाते?

१७ वडील व सेवा सेवक या पदांवर कार्य करण्याकरता बांधवांची नावे वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराला सुचवली जातात तेव्हा तेथील अनुभवी बांधव कोणत्याही नेमणुका करण्याकरता देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनावरच अवलंबून राहतात. हे काम किती गंभीर आहे आणि त्यासाठी ते देवाला जबाबदार आहेत याची त्यांना जाणीव असते. त्यांना माहीत असते की त्यांनी उतावीळपणे कोणावर हात ठेवल्यास कदाचित ते देखील त्या व्यक्‍तीच्या पापात सामील होतील.—१ तीमथ्य ५:२२.

१८, १९. (अ) काही नेमणुकांची सूचना कशाप्रकारे दिली जाते? (ब) शिफारस करण्यापासून नेमणुकीपर्यंत सगळे काही कशाप्रकारे पार पाडले जाते?

१८ काही नेमणुका अधिकृत संस्थेचा शिक्का असलेल्या पत्राद्वारे कळवल्या जातात. शिक्का असलेल्या अशाप्रकारच्या अधिकृत पत्राद्वारे मंडळीतल्या एका किंवा त्यापेक्षा अधिक बांधवांची नेमणूक केली जाते.

१९ ईश्‍वरशासित नेमणुका खुद्द यहोवा देव आपल्या पुत्राद्वारे व पृथ्वीवरील दृश्‍य माध्यम असलेल्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आणि त्याच्या नियमन मंडळाद्वारे करतो. (मत्तय २४:४५-४७) बांधवांची शिफारस करण्यापासून नेमणुकीपर्यंत सगळे काही पवित्र आत्म्याच्या निर्देशनानुसार व मार्गदर्शनानुसार पार पाडले जाते. कारण या पदांसाठी कोणती पात्रता लागते हे देवाच्या वचनात सांगितले आहे, जे पवित्र आत्म्याच्याच प्रेरणेने लिहिलेले आहे; शिवाय, नेमली जाणारी व्यक्‍ती जीवनात पवित्र आत्म्याची फळे उत्पन्‍न करत असल्याचे आपल्या एकंदर वागणुकीवरून दाखवते. या कारणांमुळे, मंडळीत नेमल्या जाणाऱ्‍या बांधवांची नेमणूक पवित्र आत्म्याद्वारे होते हे आपण ओळखले पाहिजे. पहिल्या शतकात ज्याप्रमाणे ईश्‍वरशासित पद्धतींनी पर्यवेक्षक व सेवा सेवकांना नेमले जात होते त्याच प्रकारे आजही केले जाते.

यहोवाचे मार्गदर्शन लाभलेले आपण धन्य आहोत

२०. स्तोत्र १३३:१ येथील दाविदाच्या भावना आपणही का व्यक्‍त करू शकतो?

२० आध्यात्मिक भरभराटीच्या आणि राज्य प्रचार कार्यात होत असलेल्या ईश्‍वरशासित प्रगतीच्या या काळात आपण खरोखर धन्य लोक आहोत कारण वडिलांची व सेवा सेवकांची नेमणूक स्वतः यहोवा देव करतो. ही व्यवस्था शास्त्रवचनांतील मार्गदर्शनानुसार पार पाडली जात असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांमध्ये देवाचे उदात्त नीतिनियम जोपासले जातात. शिवाय मंडळीत नेमल्या जाणाऱ्‍या पुरुषांच्या ख्रिस्ती गुणांमुळे व त्यांच्या मनस्वी प्रयत्नांमुळे यहोवाच्या सेवकांमध्ये अद्‌भुत शांती आणि एकता टिकून राहते. स्तोत्रकर्त्याप्रमाणेच असे म्हणावेसे वाटते की “पाहा, बंधूंनी ऐक्याने राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तोत्र १३३:१.

२१. यशया ६०:१७ यातील भविष्यवाणी आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे?

२१ यहोवा त्याच्या वचनाद्वारे व पवित्र आत्म्याद्वारे आपले मार्गदर्शन करतो म्हणून आपण त्याचे खरोखर आभारी आहोत! यशया ६०:१७ येथील शब्द किती अर्थपूर्ण आहेत: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” यहोवाच्या साक्षीदारांत ईश्‍वरशासित पद्धती प्रगतीशीलपणे अवलंबण्यात आल्यामुळे यशयाच्या वरील शब्दांप्रमाणे यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेने खरोखर त्याचा आशीर्वाद अनुभवला आहे.

२२. आपण कशाबद्दल कृतज्ञ आहोत आणि आपण काय निर्धार केला पाहिजे?

२२ यहोवाच्या लोकांमध्ये असणाऱ्‍या ईश्‍वरशासित व्यवस्थेकरता आपण खरोखरच कृतज्ञ आहोत. आणि ईश्‍वरशासित पद्धतीने नेमल्या जाणाऱ्‍या वडिलांच्या व सेवा सेवकांच्या कठीण पण समाधानदायक परिश्रमांसाठीही आपण त्यांचे ऋणी आहोत. आपल्याला ही आध्यात्मिक समृद्धी आणि अद्‌भुत आशीर्वाद देणाऱ्‍या प्रेमळ स्वर्गीय पित्याची आपण मनापासून स्तुती करतो. (नीतिसूत्रे १०:२२) पुढेही आपण यहोवाच्या संघटनेच्याबरोबरीने पाऊल टाकून चालण्याचा निर्धार करू या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सदैव ऐक्याने सेवा करण्याद्वारे यहोवाच्या महान आणि पवित्र नावाला गौरव, स्तुती व महिमा आणू या.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• वडील व सेवा सेवक यांची नेमणूक लोकशाहीच्या पद्धतीने नव्हे तर ईश्‍वरशासित पद्धतीने केली जाते असे का म्हणता येईल?

• जबाबदार ख्रिस्ती पुरुषांना पवित्र आत्म्याद्वारे कशाप्रकारे नेमले जाते?

• वडील व सेवा सेवकांची नेमणूक करताना पवित्र आत्मा कशाप्रकारे कार्य करतो?

• ईश्‍वरशासित नेमणुकांच्या संदर्भात आपण यहोवाचे आभारी का असायला हवे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

ईश्‍वरशासित पद्धतीने नेमल्या जाणाऱ्‍या वडिलांकरता आणि सेवा सेवकांकरता हा खरोखर बहुमान आहे