व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाका

यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाका

यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाका

[शांतीचा देव] आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो.’—इब्री लोकांस १३:२०, २१.

१. जगाची लोकसंख्या काय आहे आणि वेगवेगळ्या धर्मांत अंदाजे किती लोक आहेत?

 जगाची लोकसंख्या १९९९ साली सहाशे कोटी झाली! द वर्ल्ड ॲल्मनॅक यात सांगितल्यानुसार यांपैकी अंदाजे १,१६,५०,००,००० लोक मुस्लिम, १,०३,००,००,००० रोमन कॅथलिक, ७६,२०,००,००० हिंदू, ३५,४०,००,००० बौद्ध, ३१,६०,००,००० प्रोटेस्टंट आणि २१,४०,००,००० ऑर्थोडोक्स धर्माचे पालन  करतात.

२. जगातल्या धार्मिक परिस्थितीकडे पाहून काय म्हणता येईल?

या जगात दिसणारे धार्मिक मतभेद आणि गोंधळ पाहता, हे कोट्यवधी लोक देवाच्या इच्छेप्रमाणे चालत आहेत असे खरोखर म्हणता येईल का? नाही, “कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.” (१ करिंथकर १४:३३) दुसरीकडे पाहता, यहोवाच्या सेवकांच्या आंतरराष्ट्रीय बंधूसमाजाविषयी काय म्हणता येईल? (१ पेत्र २:१७) काळजीपूर्वक परीक्षण केल्यास, ‘शांतीचा देव त्यांना प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करत आहे’ याची आपल्याला खात्री पटेल.—इब्री लोकांस १३:२०, २१.

३. सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेम येथे काय घडले आणि का?

अर्थात यहोवाच्या साक्षीदारांची संख्या ही त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा नाही. मोठमोठ्या आकड्यांचे देवाला कौतुक वाटत नाही. इस्राएली लोकांना देवाने निवडले ते इतर राष्ट्रांपेक्षा ते ‘संख्येने पुष्कळ’ होते म्हणून नव्हे. उलट ते “सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी” होते. (अनुवाद ७:७) पण इस्राएली लोक देवाला विश्‍वासू राहिले नाहीत. त्यामुळे सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी बनलेली एक नवीन मंडळी स्थापन केली आणि तिच्यावर आपला आशीर्वाद पाठवला. त्यांना यहोवाच्या पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले आणि त्यानंतर ते आवेशाने देवाबद्दल आणि ख्रिस्ताबद्दल सत्याचे ज्ञान इतरांना देऊ लागले.—प्रेषितांची कृत्ये २:४१, ४२.

प्रगतीशील वाटचाल

४. आरंभीची ख्रिस्ती मंडळी सातत्याने प्रगती करत होती असे का म्हणता येईल?

पहिल्या शतकात, ख्रिस्ती मंडळीची सातत्याने प्रगती होत होती; नवनव्या क्षेत्रात प्रचार व शिष्य बनवण्याचे कार्य केले जात होते, तसेच देवाच्या उद्देशांविषयीचे ज्ञान अधिकाधिक स्पष्ट होत होते. हे आरंभीचे ख्रिस्ती लोक देवाच्या प्रेरणेने लिहिल्या जाणाऱ्‍या पत्रांतील आध्यात्मिक ज्ञानानुसार पाऊल टाकून चालत होते. प्रेषितांच्या व इतर बांधवांच्या भेटींमुळे प्रोत्साहित होऊन ते आपले सेवाकार्य पूर्ण करत होते. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत याविषयी आपल्याला सविस्तर वाचायला मिळते.—प्रेषितांची कृत्ये १०:२१, २२; १३:४६, ४७; २ तीमथ्य १:१३; ४:५; इब्री लोकांस ६:१-३; २ पेत्र ३:१७, १८.

५. देवाच्या संघटनेत प्रगती होण्याचे कारण काय आणि आपण या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकून चालणे का महत्त्वाचे आहे?

त्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच या काळातील यहोवाच्या साक्षीदारांनी देखील अतिशय अल्प प्रमाणात सुरवात होऊनही सातत्याने प्रगती केली आहे. (जखऱ्‍या ४:८-१०) देवाचा आत्मा त्याच्या संघटनेवर आहे याचा भरपूर पुरावा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पाहायला मिळाला. मनुष्याच्या सामर्थ्यावर नव्हे तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर आपण अवलंबून राहिल्यामुळे आपले शास्त्रवचनांचे ज्ञान वाढत गेले आहे आणि देवाची इच्छा आणखी चांगल्याप्रकारे पूर्ण करणे आपल्याला शक्य झाले आहे. (जखऱ्‍या ४:६) आज आपण ‘शेवटल्या काळात’ पोचलो आहोत, त्यामुळे यहोवाच्या प्रगतीशील संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकून चालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (२ तीमथ्य ३:१-५) असे केल्यामुळे आपण आपली आशा सतत डोळ्यापुढे ठेवून, या व्यवस्थीकरणाचा अंत येण्याआधी लोकांना देवाच्या स्थापित राज्याविषयी साक्ष देण्याच्या कार्यात सहभाग घेऊ शकू.—मत्तय २४:३-१४.

६, ७. कोणत्या तीन गोष्टींच्या संदर्भात यहोवाच्या संघटनेने केलेल्या प्रगतीचा आपण विचार करणार आहोत?

आपल्यामध्ये असेही बांधव आहेत जे १९२०, ३० आणि ४० च्या दशकांत यहोवाच्या संघटनेत आले. आजच्या तारखेपर्यंत यहोवाच्या संघटनेत इतकी उल्लेखनीय प्रगती व वाढ होईल अशी त्या सुरवातीच्या वर्षांत कोणी कल्पना तरी केली होती का? देवाच्या संस्थेच्या आधुनिक काळातील इतिहासात घडलेल्या सर्व उल्लेखनीय घटनांचा विचार करा! खरोखर, यहोवाने त्याच्या संघटित लोकांच्या माध्यमाने किती काही साध्य केले आहे याचा विचार करून आध्यात्मिक समाधान मिळते.

प्राचीन काळात, दाविदाने यहोवाच्या अद्‌भुत कृत्यांचा विचार केला तेव्हा तो अचंबित झाला. त्याने म्हटले: “मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.” (स्तोत्र ४०:५) आपलीही दाविदासारखीच स्थिती आहे. यहोवाने आपल्या काळात केलेल्या असंख्य अद्‌भुत व स्तुतीपात्र कृत्यांचे आपण वर्णन करू लागलो तर ते आपल्याला शक्य होणार नाही. तरीसुद्धा, तीन गोष्टींच्या संबंधाने यहोवाच्या संघटनेने कशाप्रकारे प्रगती केली आहे यावर आपण विचार करू. (१) आध्यात्मिक ज्ञानात वृद्धी, (२) सेवाकार्याच्या गुणवत्तेत व क्षेत्रात वाढ आणि (३) संघटनेच्या कामकाजात कालपरत्वे सुयोग्य फेरबदल.

आध्यात्मिक ज्ञानाबद्दल कृतज्ञ

८. नीतिसूत्रे ४:१८ येथे सांगितल्यानुसार, आध्यात्मिक ज्ञानात वृद्धी झाल्यामुळे देवाच्या राज्याबद्दल आपल्याला काय समजू शकले?

नीतिसूत्रे ४:१८ या वचनात म्हटले आहे: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.” आध्यात्मिक ज्ञानात प्रगती होण्यासंबंधी हे वचन खरोखर पूर्ण झाले आहे. आपण स्वतः हे अनुभवले आहे आणि त्यासाठी आपण मनापासून आभारी आहोत. १९१९ साली ओहायो येथे सीडर पाँईटला झालेल्या अधिवेशनात देवाचे राज्य या विषयावर खास जोर देण्यात आला. यहोवा या राज्याच्या माध्यमाने त्याच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतो. आध्यात्मिक ज्ञानामुळेच आपल्याला हे समजण्यास मदत झाली की उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत देवाचा हाच उद्देश असल्याचे बायबल स्पष्ट करते. अर्थात, तो उद्देश म्हणजे, त्याच्या पुत्राच्या राज्याच्या माध्यमाने आपल्या नावाचे पवित्रीकरण करणे. नीतिप्रिय लोक याच राज्याची अद्‌भुत आशा बाळगून आहेत.—मत्तय १२:१८, २१.

९, १०. एकोणीसशे वीसच्या दशकात देवाच्या राज्याबद्दल आणि दोन विरोधी संघटनांबद्दल कोणते ज्ञान आपल्याला मिळाले, आणि या ज्ञानाचा आपल्याला कसा फायदा झाला आहे?

सीडर पॉइंटला १९२२ साली झालेल्या अधिवेशनात मुख्य वक्‍ता जे. एफ. रदरफोर्ड यांनी ‘राजाची व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा’ असे देवाच्या लोकांना आवाहन केले. टेहळणी बुरूज (इंग्रजी) मार्च १, १९२५ च्या अंकात “एका राष्ट्राचा जन्म” या शीर्षकाचा लेख प्रकाशित करण्यात आला. या लेखात १९१४ साली देवाच्या राज्याच्या स्थापनेकडे बोट दाखवणाऱ्‍या भविष्यवाण्यांचा आध्यात्मिक अर्थबोध स्पष्ट करण्यात आला. १९२० च्या दशकातच हे देखील समजले की एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन संघटना आहेत—एक यहोवाची आणि एक सैतानाची. या दोन संघटनांमधील संघर्ष सुरूच आहे आणि आपण यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकून चालत राहिलो तरच आपण विजयाचा आनंद अनुभवू शकू.

१० वृद्धिंगत होत गेलेल्या या आध्यात्मिक ज्ञानामुळे आपल्याला कशी मदत मिळाली आहे? देवाचे राज्य आणि राजा येशू ख्रिस्त या जगाचे भाग नसल्यामुळे आपणही या जगाचे भाग बनू नये. जगापासून अलिप्त राहिल्याने, आपण हे दाखवून देतो की आपण सत्याच्या बाजूने आहोत. (योहान १७:१६; १८:३७) या दुष्ट व्यवस्थीकरणाला पीडणाऱ्‍या गुंतागुंतीच्या समस्यांकडे पाहून आपण सैतानाच्या संघटनेत नाही याबद्दल किती आभारी आहोत! उलट यहोवाच्या संघटनेत आध्यात्मिक सुरक्षा मिळाल्याने आपण खरे आशीर्वादित आहोत!

११. शास्त्रवचनांच्या आधारावर देवाच्या लोकांनी १९३१ साली कोणते नाव धारण केले?

११ ओहायो येथील कोलंबसला १९३१ साली झालेल्या अधिवेशनात यशया ४३:१०-१२ या वचनांचा योग्य अर्थ समजवण्यात आला. त्याच अधिवेशनात बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. देवाच्या नावाचा धावा करून इतरांनाही तारण मिळावे म्हणून त्याच्या नावाची घोषणा करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला लाभला आहे!—स्तोत्र ८३:१८; रोमकर १०:१३.

१२. मोठ्या लोकसमुदायाच्या संदर्भात १९३५ साली कोणते आध्यात्मिक ज्ञान देण्यात आले?

१२ एकोणीसशे तीसच्या आधी देवाच्या लोकांपैकी बरेचजण भविष्यातील जीवनाच्या त्यांच्या आशेविषयी काहीसे साशंक होते. काहींना स्वर्गीय जीवनाविषयी थोडेफार कुतूहल होते पण बायबलमध्ये पृथ्वीवरील परादीसविषयी सांगणाऱ्‍या वचनांबद्दल त्यांना विशेष आकर्षण वाटायचे. १९३५ साली वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या अधिवेशनात मात्र अतिशय चित्तवेधक माहिती देण्यात आली. प्रकटीकरणातल्या ७ व्या अध्यायातील मोठा लोकसमुदाय हा पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेला गट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेव्हापासून मोठ्या लोकसमुदायातील लोकांना एकत्रित करण्याच्या कार्यात आणखीनच वेगाने प्रगती झाली. मोठा लोकसमुदाय आपल्याकरता एक गूढ रहस्य नाही याबद्दल आपण आभारी नाही का? आज खरोखरच सर्व राष्ट्रांतून, जातींतून व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांतून मोठ्या संख्येने लोकांना एकत्रित केले जात आहे. हे पाहून आपल्यालाही यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने जलद पावले टाकण्याचे प्रोत्साहन मिळते.

१३. कोणत्या मोठ्या वादविषयाकडे सेंट लुई, मिसूरी येथील १९४१ साली झालेल्या अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले?

१३ मानव समाजाने कोणत्या एका महान वादविषयाकडे लक्ष दिले पाहिजे याविषयी १९४१ साली सेंट लुई, मिसूरी येथे झालेल्या अधिवेशनात स्पष्टीकरण देण्यात आले. तो वादविषय म्हणजे या विश्‍वाचा अधिपती किंवा सार्वभौम कोण? लवकरच, देवाचा महान व भयप्रद दिवस येईल तेव्हा हा वादविषय कायमचा मिटवला जाईल. देवाचा तो दिवस फार वेगाने जवळ येत आहे! १९४१ साली देवाला विश्‍वासू राहण्याच्या विषयाकडेही लक्ष वेधण्यात आले. देवाला विश्‍वासू राहण्याद्वारे त्याच्या सार्वभौमत्त्वाच्या संबंधाने आपली वैयक्‍तिक भूमिका कोणती आहे हे आपण दाखवू शकतो.

१४. यशया ३२:१, २ येथे उल्लेखलेल्या सरदारांविषयी १९५० साली झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात काय स्पष्ट करण्यात आले?

१४ न्यू यॉर्क सिटी येथे १९५० साली झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात यशया ३२:१, २ येथे उल्लेखलेल्या सरदारांची ओळख करून देण्यात आली. बंधू फ्रेडरिक फ्रांझ यांनी या विषयावर भाषण दिले आणि त्यांनी समजावून सांगितले की नव्या पृथ्वीवरील सरदार या क्षणी आपल्यामध्ये आहेत. तो खरोखर अत्यंत रोमांचक क्षण होता! त्या अधिवेशनात आणि त्यानंतरच्या अनेक अधिवेशनांत कित्येक नवनवीन विषयांवर आध्यात्मिक प्रकाश टाकण्यात आला. (स्तोत्र ९७:११) आपला मार्ग “मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे” याबद्दल आपण किती आभारी आहोत!

सेवाकार्यात प्रगती

१५, १६. (अ) सेवाकार्याच्या बाबतीत १९२० व १९३० च्या दशकांत कशाप्रकारे प्रगती झाली? (ब) अलीकडील वर्षांत कोणत्या प्रकाशनांमुळे ख्रिस्ती सेवाकार्याला गती आली आहे?

१५ यहोवाच्या संघटनेने आणखी एका बाबतीत प्रगती केली आहे. ती म्हणजे आपल्या मुख्य कार्यासंबंधी, अर्थात राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात झालेली प्रगती. (मत्तय २८:१९, २०; मार्क १३:१०) हे कार्य पार पाडण्याकरता संघटनेने आपल्याला आपले सेवाकार्य वाढवण्याचे महत्त्व दाखवून दिले आहे. १९२२ साली सर्व ख्रिश्‍चनांना प्रचार कार्यात सहभागी होण्याचे प्रोत्साहन देण्यात आले. आपला प्रकाश चमकू देण्याद्वारे सत्याची साक्ष देण्याच्या कार्यात योगदान देण्याची वैयक्‍तिक जबाबदारी प्रत्येकाने ओळखावी, असे त्यावेळी सांगण्यात आले. (मत्तय ५:१४-१६) १९२७ साली, रविवारचा दिवस खास क्षेत्र सेवेकरता राखून ठेवण्याकरता निश्‍चित पावले उचलण्यात आली. १९४० सालच्या फेब्रुवारी महिन्यापासून वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यांवर यहोवाचे साक्षीदार टेहळणी बुरूजकॉन्सोलेशन (सध्या सावध राहा!) मासिके लोकांना देताना सर्रास दिसू लागले.

१६ एकोणीसशे सदतीस साली मॉडेल स्टडी नावाची पुस्तिका काढण्यात आली. यात इतरांना बायबलचे सत्य शिकवण्याकरता पुनर्भेटी करणे किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्यात आला होता. पुढच्या काही वर्षांत बायबल अभ्यास चालवण्याच्या कार्यावर सातत्याने भर देण्यात आला. १९४६ साली “देव सत्य होवो” आणि १९६८ साली सत्य जे चिरकालिक जीवनाकडे निरविते या पुस्तकांचे प्रकाशन झाल्यामुळे बायबल अभ्यास घेण्याच्या कार्याला गती मिळाली. सध्या आपण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा उपयोग करतो. या पुस्तकांतील माहितीचा अभ्यास केल्यामुळे भावी शिष्यांना बायबलविषयी मूलभूत ज्ञान मिळते.

संघटनेच्या कामकाजात फेरबदल करण्याद्वारे प्रगती

१७. यशया ६०:१७ यात सांगितल्यानुसार यहोवाच्या संघटनेने कशाप्रकारे प्रगती केली आहे?

१७ यहोवाच्या संघटनेने ज्या बाबतीत प्रगती केली आहे ती तिसरी गोष्ट म्हणजे संघटनेच्या कामकाजातील फेरबदल. यशया ६०:१७ या वचनात यहोवाने अशी प्रतिज्ञा केली: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” या भविष्यवाणीला अनुलक्षून राज्य प्रचाराच्या कार्यावर देखरेख आणि कळपाचे पालन अधिक परिणामकारकरित्या होण्याकरता आवश्‍यक पावले उचलण्यात आली आहेत.

१८, १९. काळाच्या ओघात, संघटनेच्या कामकाजात कोणत्या प्रकारचे प्रगतीशील फेरबदल झाले आहेत?

१८ एकोणीसशे एकोणीस साली क्षेत्र सेवेकरता व्यवस्था करण्याची विनंती करणाऱ्‍या प्रत्येक मंडळीत एक सेवा संचालक (सर्व्हिस डायरेक्टर) नेमण्यात आला. यामुळे क्षेत्र सेवाकार्यात जोरदार प्रगती होऊ लागली. १९३२ साली निवडणूक घेऊन वडील व डीकन यांना नियुक्‍त करण्याची प्रथा कायमची बंद करण्यात आली. यानंतर लोकशाहीच्या पद्धतीने कार्य करण्याचे थांबवण्यात आले. आणखी एक उल्लेखनीय प्रगती सन १९३८ मध्ये झाली, जेव्हा मंडळीतल्या सर्व सेवकांना नेमताना आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीतील ईश्‍वरशासित व्यवस्थेचे पूर्वीपेक्षा जास्त जवळून अनुकरण केले जाऊ लागले. (प्रेषितांची कृत्ये १४:२३; १ तीमथ्य ४:१४) १९७२ साली आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत होते त्याप्रमाणे अध्यक्ष व सेवा सेवक नेमले जाऊ लागले. एका मंडळीत केवळ एकच अध्यक्ष नेमण्याऐवजी फिलिप्पैकर १:१ आणि इतर वचनांनुसार अध्यक्ष होण्याची पात्रता पूर्ण करणाऱ्‍या बांधवांनी मिळून वडील वर्ग बनतो.—प्रेषितांची कृत्ये २०:२८; इफिसकर ४:११, १२.

१९ देवाच्या संघटनेच्या जागतिक कार्याची देखरेख करण्यासाठी १९७५ साली यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या वतीने काम करणाऱ्‍या समित्या स्थापन करण्यात येऊ लागल्या. देखरेख करण्यासाठी या शाखा समितींना (ब्रांच कमिटीज) विशिष्ट क्षेत्र नेमून देण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयातील आणि शाखा दफ्तरांतील कार्य सोपे करून आध्यात्मिकदृष्ट्या जे “श्रेष्ठ” त्याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला जातो. (फिलिप्पैकर १:९, १०) ख्रिस्ताच्या हाताखाली कार्य करणाऱ्‍या मेंढपाळांना अनेक जबाबदाऱ्‍या सांभाळाव्या लागतात. खासकरून सुवार्ता प्रचाराच्या कार्याचे नेतृत्व करणे, मंडळीत उपदेश देणे आणि देवाच्या कळपाचे योग्यरित्या पालन करणे.—१ तीमथ्य ४:१६; इब्री लोकांस १३:७, १७; १ पेत्र ५:२, ३.

येशू आपले नेतृत्व करत आहे

२०. यहोवाच्या प्रगतीशील संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकून चालण्याकरता येशूच्या भूमिकेविषयी काय ओळखणे आवश्‍यक आहे?

२० यहोवाच्या प्रगतीशील संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकून चालण्याकरता हे ओळखणे आवश्‍यक आहे की देवाने येशू ख्रिस्ताला “मंडळीचे मस्तक” म्हणून नेमले आहे. (इफिसकर ५:२२, २३) यशया ५५:४ येथील शब्द देखील लक्षात घेण्याजोगे आहेत. तेथे म्हटले आहे: “पाहा! मी [यहोवाने] त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे.” येशू अतिशय उत्तमरित्या आपले नेतृत्व करत आहे. तो त्याच्या कळपातील मेंढरांना ओळखतो आणि त्यांची कृत्ये त्याला माहीत आहेत. म्हणूनच, एशिया मायनर येथील सात मंडळ्यांचे त्याने परीक्षण केले तेव्हा पाच वेळा त्याने म्हटले: ‘तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत.’ (प्रकटीकरण २:२, १९; ३:१, ८, १५) तसेच येशूला त्याच्या पित्या यहोवाप्रमाणे आपल्या गरजा देखील ठाऊक आहेत. शिष्यांना आदर्श प्रार्थना शिकवण्याआधी येशूने म्हटले: “तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.”—मत्तय ६:८-१३.

२१. येशू कशाप्रकारे ख्रिस्ती मंडळीचे नेतृत्व करत आहे?

२१ येशू कशाप्रकारे आपले नेतृत्व करतो? एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती अध्यक्षांच्या अर्थात ‘मानवरूपी देणग्यांच्या’ माध्यमाने. (इफिसकर ४:८, NW) प्रकटीकरण १:१६ येथे अभिषिक्‍त अध्यक्षांना ख्रिस्ताच्या उजव्या हातात अर्थात त्याच्या नियंत्रणात असल्याचे दाखवले आहे. आज मंडळीतील वडील स्वर्गीय आशा बाळगणारे असोत अथवा पृथ्वीवरील, ते येशूच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करत आहेत. याआधीच्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे, त्यांची नेमणूक बायबलमध्ये दिलेल्या आवश्‍यकता लक्षात घेऊन, पवित्र आत्म्याद्वारे झाली आहे. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) पहिल्या शतकात जेरुसलेममध्ये वडीलधारी पुरुषांचे एक नियमन मंडळ होते. हे नियमन मंडळ सर्व मंडळ्यांची आणि एकंदर राज्य प्रचाराच्या कार्याची देखरेख करत होते. आजही यहोवाच्या संघटनेत हे काम पाहणारे एक नियमन मंडळ आहे.

बरोबरीने पाऊल टाका!

२२. नियमन मंडळ कोणत्या प्रकारचे साहाय्य पुरवते?

२२ पृथ्वीवर राज्याचे कामकाज पाहण्याची जबाबदारी “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला” नेमण्यात आली आहे. यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ या विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे प्रतिनिधीत्व करते. (मत्तय २४:४५-४७) नियमन मंडळाची प्रमुख जबाबदारी ख्रिस्ती मंडळीला आध्यात्मिक बोध व मार्गदर्शन करणे ही आहे. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६) पण, नैसर्गिक विपत्तींमुळे बांधवांना काही नुकसान होते तेव्हा देखील नियमन मंडळ त्या बांधवांना मदत पुरवण्याचे तसेच घरांना व राज्य सभागृहांना नुकसान झाले असल्यास दुरुस्ती किंवा नवे बांधकाम देखील करण्याचे काम एक किंवा त्यापेक्षा अधिक कायदेशीररित्या अधिकृत संस्थांना देते. ख्रिस्ती बांधवांचा छळ झाल्यास त्यांना आध्यात्मिकरित्या प्रोत्साहन देण्याकरता देखील पावले उचलण्यात येतात. शिवाय, “सुवेळी अवेळी” प्रचार कार्य सुरू ठेवण्यासाठी जमेल त्याप्रकारे प्रयत्न केला जातो.—२ तीमथ्य ४:१, २.

२३, २४. यहोवाच्या लोकांवर कोणतीही परिस्थिती आली तरीसुद्धा यहोवा त्यांना सातत्याने काय पुरवतो आणि आपण कोणता निर्धार केला पाहिजे?

२३ यहोवाच्या लोकांवर कशीही परिस्थिती आली तरीसुद्धा तो त्यांना सातत्याने आध्यात्मिक अन्‍न व आवश्‍यक मार्गदर्शन पुरवतो. तसेच ईश्‍वरशासित कामकाजात अधिक प्रगती व फेरबदलांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी तो जबाबदार बांधवांना समजबुद्धी आणि सूक्ष्मदृष्टी देखील देतो. (अनुवाद ३४:९; इफिसकर १:१६, १७) आपल्यावर सोपवलेले शिष्य बनवण्याचे कार्य पूर्ण करण्याकरता आणि जगभरात आपली सेवा पूर्ण करण्याकरता आपल्याला जे काही आवश्‍यक आहे ते सर्व काही यहोवा आपल्याला जरूर पुरवतो.—२ तीमथ्य ४:५.

२४ यहोवा आपल्या विश्‍वासू लोकांना कधीही एकटे सोडणार नाही याची आपल्याला पूर्ण खात्री आहे; तो त्यांना येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ सुखरूप बचावेल. (प्रकटीकरण ७:९-१४; स्तोत्र ९४:१४; २ पेत्र २:९) सुरवातीपासून आपण बाळगलेली ही खात्री आपण शेवटपर्यंत बाळगू या. (इब्री लोकांस ३:१४) यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकण्याचा आपण सर्व मिळून निर्धार करू या.

तुम्ही काय उत्तर द्याल?

• यहोवाची संघटना सतत प्रगती करते असे आपण का म्हणू शकतो?

• देवाच्या लोकांचे आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होत आहे याला काय पुरावा आहे?

• ख्रिस्ती सेवाकार्यात कशाप्रकारे प्रगती झाली?

• यहोवाच्या सेवकांमध्ये संघटनेच्या कामकाजांत कोणते आवश्‍यक फेरबदल करण्यात आले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

दाविदाप्रमाणे आपणही यहोवाच्या सर्व अद्‌भुत कृत्यांचे वर्णन करूच शकत नाही

[१८ पानांवरील चित्र]

संघटनेच्या कामकाजात कालपरत्वे सुयोग्य फेरबदल केल्यामुळे देवाच्या कळपाला फायदा झाला