ऑप्टिशियन बी पेरतो
ऑप्टिशियन बी पेरतो
युक्रेनच्या ल्वीफ येथील एका ऑप्टिशियनने केलेला प्रयत्न आणि इस्राएलच्या हायफा येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या रशियन मंडळीची स्थापना यांच्यात काय संबंध असावा? या दोन्ही देशांच्या दरम्यान कितीतरी देश आहेत, शिवाय या दोन्ही देशांमध्ये जवळजवळ २,००० किलोमीटरचे अंतर आहे. सदर अनुभव, उपदेशक ११:६ येथील बायबलचे विधान खरे ठरवून दाखवते. त्यात असे म्हटले आहे: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल . . . हे तुला ठाऊक नसते.”
या कहाणीची सुरवात १९९० मध्ये झाली. त्या वेळी, एला नावाची एक तरुण यहुदी स्त्री ल्वीफमध्ये राहत होती. एला आणि तिचे कुटुंब खरे तर ल्वीफ सोडून इस्राएलला जाण्याच्या तयारीत होते. इस्राएलला जाण्याआधी एलाला एका ऑप्टिशियनकडे जायचे होते. तो ऑप्टिशियन यहोवाचा साक्षीदार होता. त्या वेळी, युक्रेनमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी होती. तरीसुद्धा त्याने एलाला आपल्या बायबल विश्वासांबद्दल सांगितले. देवाला एक व्यक्तिगत नाव आहे असे त्याने सांगितल्यावर तिला
आश्चर्य वाटले. तिला अधिक जाणून घ्यायचे होते त्यामुळे त्यांच्यात छान चर्चा झाली.एलाला ती चर्चा इतकी आवडली की, तिने पुढच्या आठवडी आणि त्याच्या नंतरच्या आठवडीही चर्चा करायची इच्छा दाखवली. या बायबल चर्चांमध्ये तिचा रस वाढू लागला; पण एक समस्या होती. ती आपल्या कुटुंबाबरोबर फार लवकर इस्राएलला राहायला जाणार होती. आणि एलाचा बायबल अभ्यास पूर्णही झाला नव्हता! मग होता होईल तितके शिकता यावे म्हणून एलाने ती जोपर्यंत तिथे होती तोपर्यंत दररोज अभ्यास करायचे सुचवले. इस्राएलला गेल्या गेल्या एलाने पुन्हा अभ्यास करायला सुरवात केली नाही; पण सत्याचे बीज तिच्या अंतःकरणात पेरले गेले एवढे मात्र खरे. त्याच वर्षाच्या शेवटी तिने पुन्हा एकदा बायबलचा उत्सुकतेने अभ्यास करायला सुरवात केली.
त्याच दरम्यान पर्शियन गल्फमध्ये युद्ध सुरू झाले आणि इराक इस्राएलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करू लागले. त्यामुळे लोकांमध्ये हा एक चर्चेचा विषय बनला होता. एकदा एका सुपरमार्केटमध्ये एलाने एका रशियन कुटुंबाला आपापसांत बोलताना ऐकले; हे कुटुंबसुद्धा नवीनच तेथे राहायला आले होते. त्यांचे बोलणे ऐकल्यावर एला त्यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगू लागली की, बायबलमध्ये सांगितल्यानुसार एक शांतीचे जग येणार आहे. स्वतः एलाचाही अभ्यास अजून पूर्ण झालेला नव्हता तरीही ती त्यांच्याशी याविषयी बोलली. त्याचा परिणाम असा झाला की, त्या कुटुंबातली आजी, गलीना; आई, नताशा; मुलगा, साशा (एरिअल); आणि मुलगी इलाना हे सगळे तिच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागले.
त्यांच्यापैकी साशाने सर्वात आधी बाप्तिस्म्याचे पाऊल उचलले. पण यासाठी त्याला पुष्कळ अडचणींचा सामना करावा लागला. शाळेत तो गुणवत्ता यादीत येणारा विद्यार्थी होता. पण त्याने आपल्या ख्रिस्ती विवेकानुसार लष्करपूर्व प्रशिक्षणासाठी (त्याच्या शालेय अभ्यासक्रमाचा एक अत्यावश्यक भाग) होकार दिला नाही म्हणून त्याला शाळेतून काढण्यात आले. (यशया २:२-४) साशाची केस जेरूसलेममधील इस्राएली उच्च न्यायालयात गेली. आणि तेथून साशाला त्याचे ते वर्ष पूर्ण करण्यासाठी शाळेत पुन्हा घेण्याचा आदेश देण्यात आला. या खटल्याविषयी सबंध इस्राएलमध्ये चर्चा होऊ लागली. परिणामस्वरूप, पुष्कळ इस्राएली लोकांना यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांविषयी कळाले. *
विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर साशाने यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्ण-वेळेच्या सेवेत पदार्पण केले. आज तो एक खास पायनियर आणि मंडळीत वडील आहे. साशाची बहीण इलाना ही देखील त्याच्याबरोबर पूर्ण-वेळेच्या सेवेत आहे. त्यांची आई आणि आजी या दोघींचा बाप्तिस्मा झाला आहे. ऑप्टिशियनने पेरलेल्या बियाचे अजूनही फळ मिळत होते.
दरम्यान, एलाने आध्यात्मिक प्रगती केली आणि बघता बघता तीसुद्धा घरोघरच्या प्रचारकार्यात सामील झाली. पहिल्याच घरात एलाला फेना भेटली; तीसुद्धा नुकतीच युक्रेनहून येथे राहायला आली होती. नैराश्येमुळे फेना मानसिक रुग्ण बनली होती. एलाला नंतर कळाले की, फेनाचा दरवाजा वाजवण्याआधीच फेनाने कळकळून देवाला अशी प्रार्थना केली होती: “तू कोण आहेस हे मला ठाऊक नाही; पण तुला माझी प्रार्थना ऐकू येत असेल तर कृपया माझी मदत कर.” एलासोबत तिची उत्स्फूर्त चर्चा झाली. फेनाने पुष्कळ प्रश्न विचारले आणि प्रत्येक उत्तराचा तिने बारकाईने विचार केला. कालांतराने, तिला खात्री पटली की, यहोवाचे साक्षीदार बायबलमधूनच सत्य शिकवतात. तिने आपल्या शिक्षणाच्या कार्यक्रमात फेरबदल करून मंडळीत आणि प्रचारकार्यात जास्त सहभाग घेण्यासाठी वेळ काढला. मे १९९४ मध्ये फेनाचा बाप्तिस्मा झाला. तिनेसुद्धा पायनियरींग सुरू
केली आणि कम्प्युटर क्षेत्रात अर्ध-वेळेची नोकरी करून ती आपला खर्च भागवू लागली.नोव्हेंबर १९९४ मध्ये, प्रचारकार्य करत असताना एलाला अचानक कमजोरपणा वाटला. दवाखान्यात तपासणी केल्यावर तिच्या आतड्यांना क्षते असून त्यातून रक्तस्राव होत असल्याचे निष्पन्न झाले. संध्याकाळपर्यंत तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण ७.२ इतके कमी झाले. एलाच्या मंडळीतले एक वडील तिथल्या हॉस्पिटल लेएझोन कमिटीचे (एचएलसी) अध्यक्ष होते; त्यांनी लागलीच डॉक्टरांना वेगवेगळ्या रक्तहीन उपचारपद्धतींबद्दल माहिती दिली. * त्यामुळे, रक्त संक्रमण न देता एलावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. एला पूर्णपणे बरी देखील झाली.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.
हे सगळे पाहून, एलाचे स्त्रीरोगतज्ज्ञ कार्ल (जर्मनीत जन्म झालेले एक यहुदी) फार प्रभावित झाले. मग त्यांना आठवले की, नात्सींच्या छळातून वाचलेल्या त्यांच्या आईवडिलांना छळ छावण्यांमधील यहोवाच्या साक्षीदारांविषयी माहिती होती. कार्ल यांनी तिला पुष्कळ प्रश्ने विचारली. कार्ल कामात फार व्यस्त होते तरीही नियमितपणे बायबलचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेळात वेळ काढला. नंतरच्या वर्षापर्यंत ते दर आठवडी होणाऱ्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागले.
ऑप्टिशियनने पेरलेल्या बियाचा काय परिणाम झाला? साशा आणि त्याच्या कुटुंबाचा अनुभव तर आपण पाहिलाच आहे. आणि एलाच्या बाबतीत पाहिले तर ती आता खास पायनियर आहे. तिची मुलगी इना हिने आताच शाळा पूर्ण केली आहे आणि ती देखील पायनियरींगच्या क्षेत्रात उतरण्याचा विचार करत आहे. फेना देखील खास पायनियर म्हणून कार्य करत आहे. एलाचे स्त्रीरोगतज्ज्ञ कार्ल यांनी बाप्तिस्मा घेतला आहे आणि ते ख्रिस्ती मंडळीत सेवा सेवक आहेत. आता ते बायबल सत्याच्या गुणकारक शक्तीविषयी त्यांच्या रुग्णांना आणि इतरांना सांगतात.
हायफा या इब्री भाषेच्या मंडळीचा एक लहान भाग म्हणून सुरू झालेल्या या रशियन गटाचे रूपांतर एका आवेशपूर्ण रशियन भाषेच्या मंडळीत झाले आहे. सध्या तेथे १२० पेक्षा अधिक राज्य प्रचारक आहेत. ही सगळी वाढ कशामुळे झाली? तर ल्वीफमध्ये राहणाऱ्या एका ऑप्टिशियनने बी पेरण्याची संधी दवडली नाही म्हणून!
[तळटीपा]
^ अधिक माहितीकरता, नोव्हेंबर ८, १९९४ चे सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे १२-१५ पाहा.
^ एचएलसीचे सदस्य, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांचे प्रतिनिधीत्व करून रुग्ण आणि दवाखान्यातील कर्मचारी वर्ग यांच्यात दळणवळण राखण्यास मदत करतात. ते अगदी नवनवीन वैद्यकीय संशोधनांवर आधारित पर्यायी वैद्यकीय उपचारपद्धतींविषयी माहिती देखील देतात.
[२९ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
युक्रेन
इस्राएल
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.
[३० पानांवरील चित्रे]
एला आणि तिची मुलगी इना
[३१ पानांवरील चित्र]
हायफामध्ये रशियन भाषिक साक्षीदारांचा आनंदी गट. डावीकडून उजवीकडे: साशा, इलाना, नताशा, गलीना, फेना, एला, इना आणि कार्ल