गरज होती तेथे सेवा केली
जीवन कथा
गरज होती तेथे सेवा केली
जेम्स बी. बेरी यांच्याद्वारे कथित
सन १९३९ सुरू होते. अमेरिकेत महामंदीमुळे जगणे कठीण होऊन बसले होते आणि युरोपात युद्धाचे वारे वाहत होते. त्यावेळी आम्ही मिसिसिपी येथे राहात होतो. पण कामाच्या शोधात माझा धाकटा भाऊ बेनेट आणि मी टेक्सस राज्यातील ह्यूस्टन येथे आलो.
उन्हाळा संपत आला होता. एके दिवशी रेडियोवर ही सनसनाटी बातमी देण्यात आली: हिटलरच्या सैन्याने पोलंडमध्ये प्रवेश केला आहे. हे ऐकताच माझा भाऊ म्हणाला: “हर्मगिदोन सुरू झाले!” लगेच आम्ही आमच्या नोकऱ्या सोडून दिल्या आणि सर्वात जवळच्या राज्य सभागृहात जीवनात पहिल्यांदाच सभेला उपस्थित राहण्याकरता गेलो. पण राज्य सभागृहात का? सुरवातीपासूनची हकीकत सांगतो.
मिसिसिपी राज्यातल्या हीब्रनमध्ये १९१५ साली माझा जन्म झाला. आमच्या भागात लोक मुख्यतः शेतीचा व्यवसाय करतात. सहसा वर्षातून एकदा बायबल विद्यार्थी (तेव्हाचे यहोवाचे साक्षीदार) आमच्या भागात येऊन कोणत्याही एका घरी भाषण वगैरे आयोजित करायचे. त्यामुळे माझ्या आईवडिलांकडे बायबलवर आधारित अनेक पुस्तके होती. या पुस्तकांत शिकवलेल्या गोष्टींवर बेनेटचा व माझाही विश्वास होता: नरक अग्निमय नाही, आत्मा देखील मरतो, नीतीमान लोक पृथ्वीवर सदासर्वकाळ राहतील इत्यादि. पण अद्याप बऱ्याच गोष्टींची आम्हाला माहिती नव्हती. माझे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळाने माझा भाऊ व मी टेक्ससला कामाच्या शोधात आलो होतो.
शेवटी, राज्य सभागृहात आम्हाला साक्षीदार भेटले; त्यांनी आम्हाला, आम्ही पायनियर आहोत का असे विचारले. पायनियर म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांतले पूर्णवेळचे सेवक असतात याची आम्हाला कल्पना नव्हती. मग आम्हाला प्रचार कार्याला जायला आवडेल का असे त्यांनी आम्हाला विचारले. “जरूर!” आम्ही उत्तर दिले. आम्हाला वाटले की आमच्यासोबत कोणीतरी येईल आणि प्रचार कार्य कसे करतात ते आम्हाला
दाखवेल. पण त्यांनी फक्त आमच्या हातात एक नकाशा दिला आणि “तुम्ही तिथे काम करा” असे सांगून निघून गेले. प्रचार कार्य कसे करतात याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. म्हणून फजिती करून घेण्याऐवजी आम्ही टपालपेटीत ते टेरीटरी कार्ड टाकून दिले आणि मिसिसिपीला परतलो!बायबल सत्याचा स्वीकार
घरी परतल्यावर आम्ही जवळजवळ एक वर्ष साक्षीदारांनी दिलेली पुस्तके दररोज वाचत होतो. घरात वीज पुरवठा नसल्यामुळे रात्री आम्ही विस्तवाजवळ बसून वाचन करायचो. त्याकाळचे झोन सर्व्हंट्स अर्थात प्रवासी पर्यवेक्षक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना आणि एकाकी गटांना भेटी देऊन त्यांना आध्यात्मिक प्रोत्साहन द्यायचे. यांपैकी एक झोन सर्व्हंट टेड क्लाईन आमच्या मंडळीला भेट द्यायचे. ते कधी बेनेटला तर कधी मला आपल्यासोबत घरोघरच्या प्रचार कार्याला घेऊन जायचे. कधीकधी तर ते आम्हा दोघांना एकदम न्यायचे. पायनियर कार्य काय असते हे त्यांनीच आम्हाला समजावून सांगितले.
त्यांच्या सहवासात राहून, आम्ही देवाबद्दल आणि त्याची सेवा आणखी चांगल्या प्रकारे कशी करता येईल याबद्दल अधिकाधिक विचार करू लागलो. अशारितीने, एप्रिल १८, १९४० रोजी ब्रदर क्लाईन यांनी बेनटला, मला आणि आमची बहीण व्हेल्व्हा हिला बाप्तिस्मा दिला. आमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा आमचे आईवडील देखील तेथे होते आणि त्यांना आमच्या निर्णयाचा फार आनंद झाला. जवळजवळ दोन वर्षांनंतर त्यांचा देखील बाप्तिस्मा झाला. १९५६ साली बाबांचा तर १९७५ साली आईचा मृत्यू झाला. दोघेही शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू राहिले.
ब्रदर क्लाईन यांनी मला पायनियर कार्य करायला आवडेल का असे विचारले. मी त्यांना सांगितले, की “मला इच्छा तर आहे पण माझ्याजवळ ना पैसाअडका ना कपडे. अक्षरशः काहीच नाही माझ्याजवळ.” ते म्हणाले, “त्याची चिंता करू नको, मी व्यवस्था करतो.” आणि खरोखर त्यांनी व्यवस्था केली. सर्वात आधी त्यांनी माझा पायनियरिंगचा अर्ज संस्थेला पाठवला. मग ते मला ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या न्यू ऑर्लीअन्स येथे घेऊन गेले. तेथे एका राज्य सभागृहाच्या वरच्या मजल्यावर राहण्याची सोय असलेल्या छान खोल्या दाखवल्या. या खोल्या मुद्दाम पायनियरांकरता बांधण्यात आल्या होत्या. लवकरच मी येथे येऊन राहू लागलो. अशारितीने पायनियर म्हणून माझे करियर सुरू झाले. न्यू ऑर्लीअन्स येथील बांधव पायनियरांना अधूनमधून कपडे, पैसे आणि जेवण इत्यादी देऊन मदत करायचे. कधीकधी आम्ही नसताना बांधव आमच्यासाठी जेवणाचे डबे आमच्या दारापाशी किंवा कधीकधी फ्रिजमध्ये ठेवून जायचे. जवळच एका ब्रदरचे हॉटेल होते. हॉटेल बंद होण्याच्यावेळी, दिवसभरातून उरलेल्या पण ताज्या खाण्याच्या वस्तू (मटन, ब्रेड इत्यादी) घेऊन जाण्यासाठी ते आम्हाला वेळोवेळी बोलवायचे.
जमावांना तोंड देण्याचे प्रसंग
काही काळानंतर मला मिसिसिपी राज्यातील जॅक्सन येथे नियुक्त करण्यात आले. तेथे एका तरुण बांधवासोबत कार्य करत असताना एका जमावाने आमच्यावर हल्ला केला. स्थानिक कायदा व सुव्यवस्था प्रशासकांनीच या जमावांना प्रवृत्त केले होते असे वाटत होते! त्यानंतर आम्हाला मिसिसिपी राज्यातच कोलंबस येथे नियुक्त करण्यात आले; तेथेही तीच कथा. आम्ही सर्व वंशांच्या, देशांच्या लोकांना प्रचार करत असल्यामुळे काही गोरे लोक आमचा द्वेष करत होते. बऱ्याच जणांचे असे मत होते की आम्ही देशद्रोही आहोत. अमेरिकन लीजन नावाची एक देशभक्त संघटना होती, या संघटनेच्या पोस्ट कमांडरला आमच्याबद्दल असेच वाटायचे. त्यामुळे कित्येक वेळा त्याने जमावांकडून आमच्यावर हल्ला केला.
पहिल्यांदा कोलंबस येथे आमच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा आम्ही रस्त्यावर नियतकालिके देत होतो. अचानक लोकांचा जमाव आमच्या दिशेने आला. त्यांनी एका दुकानाच्या काचेच्या तावदानापर्यंत आम्हाला ढकलत नेले. काय चालले आहे हे पाहण्यासाठी आजूबाजूला गर्दी जमली. थोड्या वेळातच तेथे पोलीस आले आणि त्यांनी आम्हाला कोर्टहाऊसमध्ये नेले. आमच्या मागे मागे तो जमाव देखील कोर्टात आला आणि
त्यांनी सर्व अधिकाऱ्यांपुढे अशी घोषणा केली की विशिष्ट तारखेपर्यंत आम्ही शहर सोडून गेलो तर अंगावरच्या चामडीसहित जाऊ शकतो. अन्यथा चामडीशिवाय जावे लागले! अशा परिस्थितीत काही काळासाठी शहर सोडून जाणेच योग्य राहील असे आम्ही ठरवले. पण दोन चार आठवड्यांनी आम्ही परत आलो आणि प्रचार कार्य पुन्हा सुरू केले.या घटनेला फार काळ लोटला नव्हता, तोच आठ माणसांच्या टोळीने पुन्हा आमच्यावर हल्ला केला आणि त्यांनी जबरदस्तीने आम्हाला त्यांच्या दोन मोटारींत बसायला लावले. मग ते आम्हाला जंगलात घेऊन गेले आणि आमचे कपडे काढून माझ्या बेल्टने आम्हाला प्रत्येकी तीस फटके मारले! त्यांच्याजवळ बंदुका आणि दोर होते; यावेळी आम्ही खरच घाबरलो. मला तर वाटले की आता ते आम्हाला बांधून नदीत फेकणार. त्यांनी आमच्या जवळची सगळी पुस्तके फाडून टाकली; फोनोग्राफ पण झाडावर आपटून त्याचे तुकडे तुकडे केले.
आम्हाला फटके मारल्यानंतर त्यांनी आम्हाला कपडे घालायला सांगितले आणि मागे न पाहता एका पायवाटेवरून चालायला सांगितले. चालता चालता आम्ही विचार करत होतो की आता जर आम्ही चुकूनही मागे पाहिले तर ते नक्कीच आमच्यावर गोळी झाडतील आणि आमचे काय झाले हे कुणाला कळणार देखील नाही! पण काही मिनिटांनी आम्हाला त्यांच्या मोटारींचा आवाज आला. ते निघून गेले होते.
दुसऱ्या एका प्रसंगी, एक संतप्त जमाव आमच्या मागे धावत आला; त्यावेळी आम्हाला जीव वाचवण्यासाठी कपडे गळ्याला बांधून नदीतून पोहावे लागले होते. या घटनेच्या काही काळानंतर आम्हाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. न्यायालयीन खटला होण्याआधी तीन आठवडे आम्हाला तुरुंगात काढावे लागले. या घटनेबद्दल कोलंबसमध्ये बरीच जाहिरात करण्यात आली. खटल्याच्या दिवशी जवळच्या एका कॉलेजातल्या विद्यार्थ्यांना कोर्टात हजर राहता यावे म्हणून सुटी देण्यात आली. त्या दिवशी सबंध कोर्ट खचाखच भरले होते—फक्त उभे राहायला थोडी जागा होती! सरकारी साक्षीदारांत दोन पाळक, महापौर आणि पोलीस होते.
आमची बाजू कोर्टापुढे मांडण्याकरता जी. सी. क्लार्क नावाच्या एका साक्षीदार वकिलाला व त्यांच्या एका सोबत्याला पाठवण्यात आले. पुरावा नसल्यामुळे आमच्याविरुद्ध केलेले देशद्रोहाचे आरोप मागे घेण्यात यावी अशी त्यांनी कोर्टाला विनंती केली. ब्रदर क्लार्क यांच्यासोबत काम करणारे वकील स्वतः यहोवाचे साक्षीदार नसले तरीही आमच्या वतीने ते कोर्टात ठणकावून बोलले. एकदा तर त्यांनी न्यायमूर्तींना म्हटले, “लोक म्हणतात यहोवाचे साक्षीदार वेडे आहेत. वेडेच ना? थॉमस एडिसन पण वेडा होता!” मग भिंतीकडे बोट दाखवून ते म्हणाले, “पण तो बल्ब पाहा!” बल्बचा शोध लावणारा वैज्ञानिक एडिसन याला काही लोक वेडा समजत होते, पण त्याने लावलेल्या शोधाविषयी कोणी वाद घालू शकत नव्हता.
साक्ष ऐकल्यानंतर सर्किट कोर्टच्या न्यायमूर्तींनी फिर्यादी वकिलाला उद्देशून म्हटले, “यांनी राजद्रोह केला आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याजवळ रत्तीभर पुरावा नाही; शिवाय हे कार्य करण्याचा त्यांना हक्क आहे. तेव्हा, पुरेसा पुरावा असल्याशिवाय पुन्हा कधी त्यांना विनाकारण या कोर्टात आणून सरकारचा वेळ व पैसा आणि माझाही वेळ वाया घालवू नका!” अशारितीने ती केस आम्ही जिंकलो!
पण, नंतर न्यायमूर्तींनी आम्हाला त्यांच्या कक्षात बोलावून घेतले. संपूर्ण शहर त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आहे याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी आम्हाला सावध केले. ते म्हणाले, “मी जे काही बोललो ते कायद्याच्या आधारावरच बोललो, पण मी तुम्हा दोघांनाही हा सल्ला देतो की तुम्ही इथून निघून जा, हे लोक तुम्हाला जिवंत ठेवणार नाहीत!” त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे हे आम्हाला माहीत होते, त्यामुळे आम्ही ते शहर सोडले.
यानंतर मी, बेनेट व व्हेल्व्हा यांच्याकडे गेलो. ते टेनेसी राज्यातील क्लार्क्सव्हिल येथे खास पायनियर म्हणून सेवा करत होते. काही महिन्यांनंतर आम्हाला केन्टुकीमधील पॅरिस मला एक खास निमंत्रण मिळाले.
येथे नियुक्त करण्यात आले. सुमारे दीड वर्षाने आम्ही तेथे एक नवी मंडळी स्थापन करण्याच्या बेतात असतानाच बेनेट वमिशनरी सेवेत पदार्पण
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या दुसऱ्या वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाहून आम्ही विचार केला, ‘यांनी चुकून आपल्याला हे पत्र पाठवले असेल! मिसिसिपीच्या दोन साध्यासुध्या मुलांना गिलियड प्रशालेला कशाला बोलावतील?’ आमचा असा ग्रह होता की ते फक्त सुशिक्षित लोकांना घेत असतील; असो, आम्ही बोलावल्याप्रमाणे गेलो. आमच्या वर्गात १०० विद्यार्थी होते आणि हा अभ्यासक्रम पाच महिन्यांचा होता. आणि ३१ जानेवारी १९४४ रोजी पदवीदान समारंभ होता. दुसऱ्या देशी जाऊन सेवा करायला आम्ही उत्सुक होतो. पण त्याकाळात पासपोर्ट, व्हिसा सहजासहजी मिळत नसे त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना तात्पुरत्या काळासाठी संयुक्त संस्थानांतच नियुक्त करण्यात आले. ॲलबामा आणि जॉर्जिया येथे काही काळ पायनियर सेवा केल्यावर शेवटी बेनेटला व मला बार्बेडोस, वेस्ट इंडीज येथे नेमण्यात आले.
दुसरे महायुद्ध अजूनही सुरूच होते आणि बार्बेडोससहित अनेक ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर आणि साहित्यावर बंदी होती. बार्बेडोसच्या कस्टम अधिकाऱ्यांनी आमचे सामान उघडून पाहिले तेव्हा त्यात आम्ही लपवलेले साहित्य त्यांना सापडले. आम्ही विचार केला, ‘झाले, आता संपले.’ पण एका अधिकाऱ्याने आम्हाला फक्त एवढेच म्हटले: “क्षमा करा, आम्हाला तुमचे सामान पाहावे लागले. यातील काही साहित्यावर बार्बेडोसमध्ये बंदी आहे.” आणि त्याने आम्ही सोबत आणलेले सर्वच्या सर्व साहित्य नेऊ दिले! नंतर आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना राज्याविषयी साक्ष दिली तेव्हा ते म्हणाले की आपल्या साहित्यावर बंदी का लावण्यात आली आहे हे त्यांनाही कळत नव्हते. काही महिन्यांनंतर बंदी उठवण्यात आली.
बार्बेडोस येथे आमची सेवा अत्यंत फलदायी ठरली. आम्ही प्रत्येकी १५ बायबल अभ्यास चालवत होतो आणि यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक प्रगती केली. त्यांपैकी काही मंडळीच्या सभांना येऊ लागले तेव्हा आम्हाला फार आनंद झाला. आपल्या साहित्यावर काही काळापासून बंदी असल्यामुळे तेथील बांधवांना सभा चालवण्याविषयी संस्थेच्या अद्ययावत पद्धतींची माहिती नव्हती. पण लवकरच आम्ही बऱ्याच कार्यक्षम बांधवांना या दृष्टीने प्रशिक्षित केले. आमच्याकडून बायबल अभ्यास घेणाऱ्या बऱ्याच जणांना प्रचार कार्य सुरू करण्यासाठी मदत करण्याचा आणि मंडळीत वाढ होताना पाहण्याचा बहुमान व आनंद आम्हाला मिळाला.
कौटुंबिक जबाबदाऱ्या
बार्बेडोस येथे आल्यानंतर साधारण १८ महिन्यांनंतर मला एका शस्त्रक्रियेसाठी संयुक्त संस्थानांत परतावे लागले. काही काळापासून मी डॉरथी नावाच्या एका साक्षीदार मुलीशी पत्रव्यवहार करत होतो. अमेरिकेत परत आल्यानंतर आमचा विवाह झाला. मग मी माझ्या पत्नीसोबत फ्लोरिडा येथील टॉलाहॅसी येथे पायनियर सेवा करू लागलो. पण सहा महिन्यानंतर आम्ही केन्टुकी येथील लुइजव्हिल येथे राहायला गेलो. येथे एका साक्षीदार बांधवाने मला काम दिले. माझा भाऊ बेनेट बरीच वर्षे बार्बेडोस येथेच सेवा करत राहिला. नंतर त्याने दुसऱ्या एका मिशनरीशी लग्न केले आणि मग द्वीपांवर प्रवासी कार्य करू लागला. शेवटी त्यांना आरोग्याच्या समस्यांमुळे अमेरिकेला परतावे लागले. १९९० साली बेनेटचा वयाच्या ७३ व्या वर्षी मृत्यू झाला. तोपर्यंत ते दोघे स्पॅनिश मंडळ्यांना भेटी देण्याचे प्रवासी कार्य करत होते.
आमच्या पहिल्या मुलीचा जन्म १९५० साली झाला. तिचे नाव आम्ही डॅरल ठेवले. यानंतर आम्हाला आणखी चार मुले झाली. पण आमचा दुसरा मुलगा डेरिक अडीच वर्षांचा असतानाच स्पायनल मेनिन्जायटिसने वारला. १९५६ साली लेस्लीचा आणि मग १९५८ साली एव्हरिटचा जन्म झाला. डॉरथी व मी नेहमी आमच्या मुलांवर बायबल सत्याचे संस्कार करण्याचा प्रयत्न केला. दर आठवडी आम्ही कौटुंबिक बायबल अभ्यास घेण्याचा प्रयत्न करायचो आणि मुलांना तो आवडावा असाही आमचा प्रयत्न असायचा. डॅरल, लेस्ली आणि एव्हरिट लहान होते तेव्हा आम्ही दर आठवडी त्यांना काही प्रश्न द्यायचो आणि मग ते या प्रश्नांवर आणखी माहिती काढून पुढच्या आठवडी सांगायचे. खेळाखेळातच ते घरोघरच्या प्रचार कार्याचा सराव करायचे. एकजण दुसऱ्या खोलीत जाऊन घरमालक असण्याचे नाटक करायचा. आणि दुसराजण बाहेरून दारावर ठकठक करायचा. मग उगाच एकमेकांची फजिती करण्यासाठी कधीकधी ते काहीतरी मजेशीर बोलायचे. पण हे सर्व केल्यामुळे हळूहळू त्यांना प्रचार कार्य मनापासून आवडू लागले. आम्ही नियमितपणे त्यांना प्रचाराला घेऊन जायचो.
आमचा सर्वात धाकटा मुलगा एल्टन याचा १९७३ साली जन्म झाला तेव्हा डॉरथी जवळजवळ ५० वर्षांची होती आणि मी ६० च्या आसपास होतो. मंडळीत सर्वजण आम्हाला अब्राहाम व सारा म्हणायचे! (उत्पत्ति १७:१५-१७) मोठी मुले लहानग्या एल्टनला प्रचार कार्यात सोबत घेऊन जायची. सबंध कुटुंब—भाऊबहिणी, आईवडील व मुले सर्वजण मिळून प्रचार कार्य करतात, लोकांना बायबलची सत्ये सांगतात हे पाहून लोकांवर आपल्या साक्षकार्याविषयी फार चांगला प्रभाव पडत असावा असे आम्हाला वाटते. एल्टनला त्याचे मोठे भाऊ खांद्यावर बसवून त्याच्या हातात ट्रॅक्ट द्यायचे. मोठ्या भावाच्या खांद्यावर बसलेल्या या गोंडस मुलाला पाहून सहसा लोक आमचे ऐकून घ्यायला तयार व्हायचे. मुलांनी एल्टनला शिकवले होते, की त्यांचे बोलून झाल्यावर त्याने घरमालकाला ट्रॅक्ट द्यायचे आणि एकदोन शब्द बोलायचे. अशारितीने तो प्रचार करायला शिकला.
आजपर्यंत आम्हाला कित्येक लोकांना यहोवाला जाणून घेण्यासाठी मदत करण्याची संधी मिळाली. १९७० च्या दशकाच्या शेवटी शेवटी आम्ही लुइजविल्ला येथून केन्टुकीतल्या शेल्बिव्हिल येथे येऊन राहू लागलो. इथल्या मंडळीत गरज असल्यामुळे आम्ही इथे आलो. याठिकाणी आल्यावर या मंडळीत बरीच वाढ होताना आम्हाला पाहायला मिळाली, शिवाय योग्य जागा शोधून तिथे राज्य सभागृह बांधण्यात मदत करण्याची देखील आम्हाला संधी मिळाली. नंतर आम्हाला जवळच्याच दुसऱ्या एका मंडळीत जायला सांगण्यात आले.
कौटुंबिक जीवनातील उतारचढाव
आमची सर्व मुले यहोवाच्या मार्गावर चालत आहेत असे म्हणता आले असते तर मला फार आनंद झाला असता, पण असे घडले नाही. मोठी झाल्यावर आमची मुले वेगळी राहायला गेली आणि चौघांपैकी तिघांनी सत्याचा मार्ग सोडून दिला. पण आमच्या एव्हरिटने मात्र माझ्या पावलांवर पाऊल ठेवून पूर्ण वेळेची सेवा निवडली. नंतर त्याने न्यूयॉर्क येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा केली आणि १९८४ साली त्याला गिलियड प्रशालेच्या ७७ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले. गिलियडची पदवी मिळाल्यावर त्याला पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लियोन येथे सेवा करण्याकरता नेमण्यात आले. १९८८ साली त्याने बेल्जियमच्या मेरियाना नावाच्या एका पायनियर मुलीशी लग्न केले. आजही ते दोघे मिशनरी कार्य करत आहेत.
आमच्या तीन मुलांनी सत्याचा मार्ग सोडून दिला, सध्याच्या जीवनातले समाधानही गमावले आणि येणाऱ्या परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची अद्भुत आशाही गमावली हे पाहून आम्हाला किती दुःख झाले असेल हे कोणतेही आईवडील समजू शकतात. कधीकधी मी स्वतःला दोषी ठरवायचो. पण मला हे जाणून खूप सांत्वन मिळाले; की यहोवा जरी प्रेमाने शिस्त लावतो, अपात्र कृपा दाखवतो आणि तो परिपूर्ण आहे तरीसुद्धा त्याच्या आत्मिक पुत्रांपैकीही कित्येकांनी त्याची सेवा करण्याचे सोडून दिले. (अनुवाद ३२:४; योहान ८:४४; प्रकटीकरण १२:४, ९) मला हे कळून चुकले आहे, की मुलांवर यहोवाच्या मार्गाचे संस्कार करण्याचे आईवडिलांनी कितीही प्रयत्न केले तरीही काही मुले सत्याचा स्वीकार करणार नाहीत.
एखाद्या विशाल वृक्षाने ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे वारावादळे झेलली असतात, त्याचप्रमाणे आपल्यालाही जीवनात अनेक समस्यांपुढे व खडतर प्रसंगांपुढे झुकावे लागते. पण या सर्व वर्षांत मी एक शिकलो आहे, ते म्हणजे, नियमित बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला सर्व समस्यांपुढे तग धरण्याची आणि आध्यात्मिकरित्या टिकून राहण्याची शक्ती मिळते. जीवनाकडे वळून पाहताना गतकाळात केलेल्या अनेक चुका मला लक्षात येतात. पण मी या चुकांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतो. जीवनातले कटू अनुभव देखील जणू आध्यात्मिक विकासातल्या पायऱ्या असतात. काहीही झाले तरी, यहोवाला विश्वासू याकोब १:२, ३.
राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर आपल्या चुकांपासून धडा घेण्याचा आपण प्रयत्न केला, तर जीवनाच्या नकारात्मक अनुभवांतही आपल्याला काही सकारात्मक गोष्टी पाहायला मिळतील.—डॉरथीला व मला अजूनही यहोवाच्या सेवेत खूप काही करण्याची इच्छा आहे, पण आता पूर्वीसारखी शक्ती राहिली नाही, शिवाय, तब्येतही साथ देत नाही. असे असूनही, मंडळीतले ख्रिस्ती भाऊबहिणी आम्हाला खूप मदत करतात; हे बांधव आम्हाला प्रिय आहेत आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. जवळजवळ प्रत्येक सभेत बांधव आमच्याजवळ येऊन, सभेला आल्याबद्दल आमची प्रशंसा करतात. शिवाय कोणत्याही प्रकारची मदत लागली, घरातले किंवा गाडीचे काही दुरुस्तीचे काम निघाले तर ते लगेच आमच्या मदतीला धावून येतात.
अधूनमधून आम्ही सहायक पायनियर सेवा करतो, तसेच बायबल संदेशाविषयी आस्था बाळगणाऱ्या लोकांसोबत बायबल अभ्यासही करतो. आफ्रिकेत सेवा करत असलेल्या आमच्या मुलाकडून पत्र वगैरे आले की आम्हाला विशेष आनंद होतो. आजही आमचा कौटुंबिक अभ्यास सुरू आहे, अर्थात आता आम्ही दोघेच असतो. इतकी वर्षे आम्ही यहोवाच्या सेवेला वाहू शकलो याचे आम्हाला समाधान वाटते. कारण तो आपल्याला आश्वासन देतो की ‘आपण केलेली सेवा आणि त्याच्यावर दाखवलेली प्रीती तो विसरणार नाही.’—इब्री लोकांस ६:१०.
[२५ पानांवरील चित्र]
व्हेल्व्हा, बेनेट आणि मला १८ एप्रिल, १९४० रोजी बाप्तिस्मा देताना टेड क्लाईन
[२६ पानांवरील चित्रे]
माझी पत्नी डॉरथी हिच्यासोबत १९४० दशकाच्या सुरवातीला आणि १९९७ मध्ये
[२७ पानांवरील चित्र]
बार्बेडोसच्या एका सिटी बसवर “शांतीचा राजकुमार” या जाहीर भाषणाची जाहिरात
[२७ पानांवरील चित्र]
मिशनरी गृहासमोर माझा भाऊ बेनेट