तुम्ही सत्य खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे का?
तुम्ही सत्य खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे का?
“देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून . . . आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:२.
१, २. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या विश्वासात टिकून राहणे सोपे का नाही?
या‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत,’ खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या विश्वासात टिकून राहणे सोपे नाही. (२ तीमथ्य ३:१) ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता आपल्याला या जगावर जय मिळवावा लागेल. (१ योहान ५:४) ख्रिस्ती मार्गावर चालण्याविषयी येशूने काय म्हटले होते तुम्हाला आठवत असेल: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” त्याने असेही म्हटले होते, की “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”—मत्तय ७:१३, १४; लूक ९:२३.
२ जीवनाकडे नेणाऱ्या अरुंद मार्गावर पाऊल ठेवल्यावर ख्रिस्ती व्यक्तीपुढे असलेले पुढचे आव्हान म्हणजे त्यावर टिकून राहणे. हे आव्हान का आहे? कारण समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपण सैतानाच्या डावपेचांचे अर्थात त्याच्या कुयुक्त्यांचे विशेष लक्ष्य बनतो. (इफिसकर ६:११, तळटीप, NW) आध्यात्मिकरित्या आपण कोठे कमी पडतो हे लक्षात ठेवून तो आपल्याला आणखी कमकुवत करण्याचा सतत प्रयत्न करतो. जर त्याने येशूलाही तडजोड करायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला, तर तो आपल्याला सोडेल का?—मत्तय ४:१-११.
सैतानाच्या कुयुक्त्या
३. सैतानाने हव्वेच्या मनात शंकेचे बीज कशाप्रकारे पेरले?
३ सैतानाची एक कुयुक्ती म्हणजे आपल्या मनात शंकाकुशंकांचे बीज पेरणे. आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करण्यात आपण कोठे कमी पडलो आहोत हे तो नेमके हेरतो. अगदी सुरवातीला त्याने हव्वेच्या बाबतीत असेच केले होते. त्याने तिला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगतिले हे खरे काय?” (उत्पत्ति ३:१) दुसऱ्या शब्दांत सैतान असे म्हणत होता की ‘देव तुमच्यावर असा निर्बंध कसा काय लादू शकतो? जे चांगले आहे ते उपभोगण्यापासून तो तुम्हाला रोखेल का? नाही, उलट देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल!’ अशाप्रकारे सैतानाने हव्वेच्या मनात शंकेचे बीज पेरले आणि त्याला अंकुर फुटण्याची तो वाट पाहू लागला.—उत्पत्ति ३:५.
४. काहींच्या मनात आज कोणत्या शंका येऊ शकतात?
४ हाच डावपेच सैतान आजही कशाप्रकारे खेळतो? आपण आपल्या बायबल वाचनाकडे, वैयक्तिक अभ्यासाकडे, आपल्या प्रार्थनांकडे, ख्रिस्ती सेवेकडे आणि सभांकडे दुर्लक्ष होऊ दिल्यास आपल्या मनातही कदाचित इतरांकडून शंकाकुशंका उत्पन्न होऊ शकतात. उदाहरणार्थ, “आपण आज ज्याला सत्य मानतो तेच येशूने शिकवले होते हे कशावरून?” “आपण खरोखर शेवटल्या दिवसांत राहात आहोत का? आता तर आपण २१ व्या शतकात पदार्पण केले आहे.” “हर्मगिदोन खरोखर जवळ आले आहे का, की अजून त्याला बराच अवकाश आहे?” अशाप्रकारच्या शंका आल्यास त्या मनातून काढून टाकण्याकरता आपण काय करू शकतो?
५, ६. मनात शंकाकुशंका उत्पन्न झाल्यास आपण काय केले पाहिजे?
५ याकोबाने या संदर्भात व्यावहारिक सल्ला दिला: “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो; पण त्याने कांही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.”—याकोब १:५-८.
६ तेव्हा, शंका उत्पन्न झाल्यास आपण काय करावे? आपला विश्वास मजबूत करावा असे आपण सदोदीत प्रार्थनेत “देवाजवळ मागावे;” तसेच जे प्रश्न किंवा शंका आपल्याला अस्वस्थ करत आहेत त्यांविषयी आपण आणखी कसून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय, जे विश्वासात मजबूत आहेत त्यांची मदत देखील आपण मागू शकतो. हे सर्व करताना, यहोवा आपल्याला आवश्यक असलेली मदत देईल याविषयी आपण जराही संशय बाळगू नये. याकोबाने पुढे म्हटले: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” अभ्यास व प्रार्थना करण्याद्वारे आपण जसजसे देवाच्या जवळ येऊ तसतशा आपल्या मनातल्या शंका नाहीशा होतील.—याकोब ४:७, ८.
७, ८. येशूने शिकवलेल्या खऱ्या उपासनेची काही मुख्य ओळखचिन्हे कोणती आहेत आणि ती कोणत्या लोकांत दिसून येतात?
७ उदाहरणार्थ, या प्रश्नाचा विचार करा: आज आपण ज्याप्रकारे उपासना करतो ती येशूने शिकवल्यानुसारच आहे हे कशावरून? हे आपण कशाच्या आधारावर ठरवू शकतो? बायबल स्पष्टपणे सांगते की खऱ्या ख्रिस्ती लोकांत खरे प्रेम दिसून आले पाहिजे. (योहान १३:३४, ३५) त्यांनी यहोवा देवाचे नाव पवित्र मानले पाहिजे. (यशया १२:४, ५; मत्तय ६:९) तसेच त्यांनी हे नाव इतरांना कळविले पाहिजे.—निर्गम ३:१५; योहान १७:२६.
८ खऱ्या उपासनेचे आणखी एक ओळखचिन्ह म्हणजे देवाचे वचन बायबल याबद्दल आदर. हे एकमेव पुस्तक आहे जे देवाच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या उद्देशांवर प्रकाश टाकते. (योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) शिवाय, खरे ख्रिस्ती देवाच्या राज्याची घोषणा करतात; केवळ या राज्यामुळेच मानवजातीला या पृथ्वीवर एका परादीसात सार्वकालिक जीवन उपभोगायला मिळेल असे ते सर्वांना सांगतात. (मार्क १३:१०; प्रकटीकरण २१:१-४) या जगातील भ्रष्ट राजकारणापासून आणि अनैतिकतेपासून ते अलिप्त राहतात. (योहान १५:१९; याकोब १:२७; ४:४) ही सर्व ओळखचिन्हे आज कोणत्या लोकांत दिसून येतात? वस्तूस्थितीच्या आधारावर आपण अगदी खातरीने म्हणू शकतो की केवळ यहोवाच्या साक्षीदारांत या सर्व गोष्टी दिसून येतात.
शंका मनात घोळत राहिल्यास काय करावे?
९, १०. मनात घोळत राहणाऱ्या शंका दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो?
९ शंकांच्या अंधाऱ्या व्यूहात आपण अडकतो तेव्हा आपण काय करावे? बुद्धिमान राजा शलमोन याचे उत्तर देतो: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” (तिरपे वळण आमचे.)—नीतिसूत्रे २:१-५.
१० याचा अर्थ, आपण देवाच्या बुद्धीकडे मनापासून लक्ष दिले तर आपल्याला ‘देवाविषयीचे ज्ञान प्राप्त होईल.’ हा विचार खरोखर किती विलक्षण आहे, नाही का? होय, या विश्वाच्या सार्वभौम प्रभू यहोवाचे ज्ञान आपल्या अवाक्याबाहेर नाही; केवळ त्याची वचने मनापासून स्वीकारण्याची आणि त्यांचे मोल जाणण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि वैयक्तिक अभ्यास केला पाहिजे. त्याच्या वचनात दडलेल्या ज्ञानाचा खजिना मिळाल्यावर आपल्या सर्व शंका नाहीशा होतील आणि आपल्या मनातला अंधार नाहीसा होऊन सत्याचा प्रकाश आपल्याला दिसेल.
११. अलीशाच्या सेवकाच्या मनात कशाप्रकारे शंका निर्माण झाली?
११ देवाच्या एका सेवकाच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्याला भीती वाटू लागली तेव्हा प्रार्थना केल्यामुळे त्याला कशाप्रकारे मदत मिळाली याचे एक स्पष्ट उदाहरण २ राजे ६:११-१८ येथे आपल्याला वाचायला मिळते. हा अलीशाचा सेवक होता. त्याने आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला नाही. त्यामुळे देवाच्या संदेष्ट्याला, अर्थात अलीशाला अरामच्या सैन्याने घेरले तेव्हा त्याचे संरक्षण करण्यासाठी स्वर्गीय सैन्ये होती हे अलीशाचा सेवक समजू शकला नाही. तो भयभीत होऊन म्हणाला, “स्वामी, हाय! हाय! आता आपण काय करावे?” अलीशाने त्याला काय उत्तर दिले? “भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” पण या सेवकाला याची खात्री कशी दिली जाऊ शकत होती? स्वर्गातील सैन्य तर तो पाहू शकत नव्हता.
१२. (अ) अलीशाच्या सेवकाच्या मनातील शंका कशाप्रकारे दूर करण्यात आल्या? (ब) आपल्या मनात शंका असल्यास आपण त्या कशा दूर करू शकतो?
१२ “अलीशाने प्रार्थना केली की ‘हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टि दे.’ परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले.” या घटनेत यहोवाने त्या सेवकाला अलीशाचे संरक्षण करण्यास सज्ज असलेल्या स्वर्गीय सैन्याचे दर्शन दिले. अर्थात, आज देव आपल्याला अशाचप्रकारे मदत करेल अशी अपेक्षा आपण करू नये. अलीशाच्या सेवकाजवळ त्याचा विश्वास दृढ करण्यासाठी पूर्ण बायबल नव्हते हे विसरू नका. आज आपल्याजवळ बायबल आहे. आपण त्याचा योग्य उपयोग केला तर आपला विश्वास देखील अशाचप्रकारे मजबूत होऊ शकतो. उदाहरणार्थ, यहोवा आपल्या स्वर्गीय दरबारात असतानाचे वर्णन करणाऱ्या अहवालांवर आपण विचार करू शकतो. हे अहवाल वाचल्यानंतर, यहोवाचे खरोखर एक स्वर्गीय संघटन आहे आणि आज हे स्वर्गीय संघटन सबंध पृथ्वीवर चाललेल्या त्याच्या सेवकांच्या शैक्षणिक कार्याला पाठिंबा देत आहे याविषयी आपल्या मनात कोणतीही शंका उरत नाही.—यशया ६:१-४; यहेज्केल १:४-२८; दानीएल ७:९, १०; प्रकटीकरण ४:१-११; १४:६, ७.
सैतानाच्या कुयुक्त्यांपासून सावध!
१३. सत्याच्या मार्गावरून आपल्याला दूर करण्याचा सैतान कशाच्या माध्यमाने प्रयत्न करतो?
१३ सैतान आणखी कोणत्या मार्गांनी आपल्या आध्यात्मिकतेला कमकुवत करण्याचा आणि सत्याच्या मार्गापासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो? एक मार्ग म्हणजे अनैतिकता. अनैतिकतेचे अनेक प्रकार आहेत. आणि आजचे जग तर वासनेने जणू झपाटलेले आहे. लोकांना ऐषोआरामाचे आकर्षण आहे, आणि हवे असलेले सुख कोणत्याही मार्गाने मिळवायला ते मागेपुढे पाहात नाहीत. केवळ मौजेखातर लैंगिक संबंध ठेवणे आणि विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे अगदी रोजचे प्रकार झाले आहेत. चित्रपट, टीव्ही, व्हिडियो देखील अशाचप्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत. प्रसार माध्यमे, विशेषतः इंटरनेट अश्लील चित्रांनी व माहितीने भरले आहे. अशा गोष्टींची जिज्ञासा बाळणाऱ्यांना मोहात पडायला फार उशीर लागत नाही.—१ थेस्सलनीकाकर ४:३-५; याकोब १:१३-१५.
१४. काही यहोवाचे साक्षीदार सैतानाच्या मोहापाशांना कशाप्रकारे बळी पडले आहेत?
१४ असल्या फाजील जिज्ञासूपणाला आवर न घातल्यामुळे काही यहोवाच्या साक्षीदारांनी आपली बुद्धी व मने अशी अश्लील, व काहींनी तर फारच अश्लील चित्रे पाहून भ्रष्ट केली आहेत. सैतानाच्या मोहविणाऱ्या पाशात ते स्वतःहून अडकले आहेत. यांपैकी बरेचजण विश्वासातून पडले आहेत. ते “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे” राहिले नाहीत आणि “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे” देखील झाले नाहीत. (१ करिंथकर १४:२०) देवाच्या वचनातील तत्त्वांनुसार व आदर्शांनुसार न चालल्यामुळे दर वर्षी हजारोंना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. यांनी “देवाची शस्त्रसामग्री” धारण करण्यात व ती सतत धारण करून ठेवण्यात दुर्लक्ष केले आहे.—इफिसकर ६:१०-१३; कलस्सैकर ३:५-१०; १ तीमथ्य १:१८, १९.
आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचे जतन करा
१५. काहींना आपल्या आध्यात्मिक संपत्तीचे मोल जाणणे जड का जाते?
१५ येशूने म्हटले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.” (योहान ८:३२) सत्य समजल्यावर, अधिकांश साक्षीदारांना त्यांची पूर्वीची जीवनशैली व धार्मिक संबंध सोडून द्यावे लागले. त्यामुळे सत्य कशाप्रकारे आपल्याला बंधमुक्त करते हे ते चांगल्याप्रकारे जाणतात. दुसरीकडे पाहता, ज्यांना त्यांच्या आईवडिलांकडून लहानपणापासून सत्य मिळाले त्यांना आपल्या आध्यात्मिक संपत्तीची कदर करणे जड जाते. ते कधीही खोट्या धर्मांत, किंवा या चंगळवादी, व्यसनाधीन, अनैतिक जगाचा भाग नव्हते. त्यामुळे सैतानाच्या नीतिभ्रष्ट जगात आणि आपण ज्या आध्यात्मिक परादीसात राहतो त्यात किती मोठा फरक आहे याची त्यांना तितकी जाणीव नसते. काहीजण तर, जगातल्या गोष्टी आपण अनुभवल्याच नाहीत असा विचार करून जगिक गोष्टींच्या मोहात पडतात आणि जणू मुद्दामहून या जगाचे विष चाखून पाहतात!—१ योहान २:१५-१७; प्रकटीकरण १८:१-५.
१६. (अ) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो? (ब) आपल्याला काय शिकवले जाते आणि काय करण्याचे प्रोत्साहन दिले जाते?
१६ पण दुःख व वेदना काय असते हे जाणून घेण्यासाठी आगीत बोट धरण्याची गरज आहे का? इतरांच्या वाईट अनुभवांवरून आपण धडा घेऊ शकत नाही का? जगातल्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या नाहीत हे पाहण्यासाठी पुन्हा त्या “गाळात” जाण्याची गरज आहे का? (२ पेत्र २:२०-२२) सैतानाच्या जगातून बाहेर आलेल्या पहिल्या शतकातील खिस्ती बांधवांना पेत्राने आठवण करून दिली: “परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ति, विषयवासना, मद्यासक्ति, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पूरे.” निश्चितच, जगिक लोक किती नीच पातळीला जाऊ शकतात हे पाहण्यासाठी आपल्याला या जगाच्या ‘बेतालपणात’ सामील होण्याची गरज नाही. (१ पेत्र ४:३, ४) उलट, बायबल शिक्षणाचे केंद्र असलेल्या आपल्या राज्य सभागृहांत यहोवाचे उच्च नैतिक आदर्श आपल्याला शिकवले जातात. तसेच, आपल्या तर्कशक्तीचा वापर करून हेच सत्य असल्याचे आपण समजून घ्यावे आणि ते खऱ्या अर्थाने स्वीकारावे म्हणून आपल्याला सदोदित प्रोत्साहन दिले जाते.—यहोशवा १:८; रोमकर १२:१, २; २ तीमथ्य ३:१४-१७.
आपले नाव केवळ लेबल नाही
१७. आपण खरोखर यहोवाचे साक्षीदार आहोत हे आपल्या कार्यावरून कसे दाखवू शकतो?
१७ आपण सत्य खऱ्या अर्थाने स्वीकारले असेल तर ते इतरांना सांगण्यासाठी आपण प्रत्येक संधीचा फायदा घेऊ. अर्थात, ज्यांना स्वारस्य नाही अशांना जबरदस्तीने आपला संदेश सांगण्याचा आपण प्रयत्न करावा असा याचा अर्थ होत नाही. (मत्तय ७:६) तर याचा असा अर्थ होतो की आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे सांगायला आपल्याला कधीही लाज वाटू नये. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे एखादा प्रश्न विचारून किंवा एखादे बायबल आधारित प्रकाशन स्वीकारून थोडीही आवड दाखवते तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या आशेविषयी सांगायला उत्सुक आणि तयार असायला पाहिजे. याचा अर्थ आपण कोठेही, म्हणजे घरात, कामाच्या ठिकाणी, शाळेत, बाजारात किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी असलो तरीसुद्धा आवड दाखवणाऱ्या लोकांना देण्यासाठी आपल्याजवळ नेहमी काही न काही साहित्य असले पाहिजे.—१ पेत्र ३:१५
१८. आपण ख्रिस्ती आहोत हे सर्वांना कळू दिल्यामुळे कोणता चांगला परिणाम आपल्याला अनुभवायला मिळेल?
१८ आपण यहोवाचे साक्षीदार आहोत असे स्पष्टपणे जाहीर करतो तेव्हा हे सैतानाच्या कावेबाज हल्ल्यांपासून आपल्याकरता एक संरक्षण ठरते. वाढदिवस, ख्रिस्मस पार्टी यांसारखे प्रसंग येतात तेव्हा किंवा ऑफीसात लॉटरी खेळली जाते अशा वेळी सहसा तुमचे सहकर्मी असे म्हणतील, “तिला विचारू नका. ती यहोवाची साक्षीदार आहे.” तसेच, लोक तुमच्यासमोर अश्लील विनोद करायला सहजासहजी धजणार नाहीत. अशारितीने, आपण आपले ख्रिस्ती विश्वास सर्वांना कळू दिल्यामुळे फार चांगला परिणाम होतो. प्रेषित पेत्राने म्हटल्याप्रमाणे: “तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य.”—१ पेत्र ३:१३, १४.
१९. आपण शेवटल्या काळात फार दूर येऊन पोचलो आहोत हे कशावरून म्हणता येते?
१९ खऱ्या अर्थाने सत्य स्वीकारण्याचा आणखी एक फायदा असा होईल, की आपण या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात जगत आहोत याविषयी आपण पूर्ण खातरी बाळगू शकू. बायबलमधील बऱ्याच भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण होत आहेत याची आपण जाणीव ठेवून चालू शकू. * गत शतकातील भयंकर घटनांवरून, “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील” या पौलाच्या शब्दांची आपल्याला खात्री पटली आहेच. (२ तीमथ्य ३:१-५; मार्क १३:३-३७) अलीकडेच एका वृत्तपत्रात २० व्या शतकाचा आढावा घेणाऱ्या एका लेखाचे शीर्षक होते, “बर्बरतेचे युग.” या लेखात असे म्हटले होते की “१९९९ साल आजवरच्या सर्वात रक्तरंजित शतकाच्या उत्तरार्धातील सर्वात रक्तरंजित वर्ष ठरले.”
२०. ही काय करण्याची वेळ आहे?
२० ही चंचलतेने वागण्याची वेळ नाही. सर्व जगाला साक्षीसाठी म्हणून जे अभूतपूर्व बायबल शिक्षणाचे कार्य चालले आहे त्यावर यहोवाचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (मत्तय २४:१४) तेव्हा, तुम्ही देखील खऱ्या अर्थाने सत्य स्वीकारून त्याविषयी इतरांनाही सांगा. आज तुम्ही जी पावले उचलाल त्यावर तुमचे अनंतकालिक भविष्य अवलंबून आहे. यहोवाच्या कार्यातून तुम्ही अंग चोरले तर त्याचा आशीर्वाद मिळण्यास तुम्ही पात्र ठरणार नाही. (लूक ९:६२) उलट ही वेळ ‘स्थिर व अढळ होऊन प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असण्याची’ आहे कारण “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.”—१ करिंथकर १५:५८.
[तळटीप]
^ टेहळणी बुरूज, जानेवारी १५, २००० अंकातील पृष्ठे १२-१४ पाहा. १३-१८ परिच्छेदात सहा पुरावे दिले आहेत जे दाखवून देतात की १९१४ पासून आपण शेवटल्या काळात जगत आहोत.
तुम्हाला आठवते का?
• आपल्या मनात येणाऱ्या शंका आपण कशा दूर करू शकतो?
• अलीशाच्या सेवकाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
• अनैतिकतेच्या कोणकोणत्या पाशांपासून आपण नेहमी सावध राहिले पाहिजे?
• आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे सर्वांना का कळू दिले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्रे]
नियमित बायबल अभ्यास व प्रार्थना आपल्या मनातील शंका दूर करण्यास सहायक ठरतील
[११ पानांवरील चित्र]
अलीशाच्या सेवकाला दर्शन देण्यात आले तेव्हा त्याच्या शंका दूर झाल्या
[१२ पानांवरील चित्र]
राज्य सभागृहांत आपल्याला यहोवाच्या उदात्त नैतिक आदर्शांविषयी शिकवले जाते. बेनिन येथील एक राज्य सभागृह