व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धोकेदायक जगात सुरक्षिततेचा शोध

धोकेदायक जगात सुरक्षिततेचा शोध

धोकेदायक जगात सुरक्षिततेचा शोध

सुरूंग पेरलेल्या क्षेत्रावरून चालणे खरोखरच जीवघेणे असू शकते. पण, सुरूंग नेमके कुठे पेरले आहेत हे दाखवणारा नकाशा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तेथून सुरक्षितरित्या जायला मदत होणार नाही का? शिवाय, निरनिराळे सुरूंग ओळखण्याचे प्रशिक्षणही तुम्हाला मिळाले असेल तर दुखापतीचा किंवा मृत्यूचा धोका टाळण्यास हे ज्ञान तुमची मदत करणार नाही का? निश्‍चित!

बायबलची तुलना त्या नकाशाशी आणि सुरूंग ओळखण्याच्या प्रशिक्षणाशी करता येईल. जीवनात येणारी संकटप्रसंगे चुकवण्यास आणि समस्या हाताळण्यास बायबलची अप्रतिम बुद्धी आपल्याला मदत करू शकते.

बायबलमधील नीतिसूत्रे २:१०, ११ (NW) या वचनात दिलेले आश्‍वासक अभिवचन लक्षात घ्या: “बुद्धी तुझ्या अंतःकरणात प्रवेश करील, आणि ज्ञान तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विचारशक्‍ती तुझे रक्षण करील, समजबुद्धी तुला संभाळील.” या ठिकाणी उल्लेख केलेल्या बुद्धीचा आणि समजबुद्धीचा उगम कोणी मनुष्य नव्हे तर स्वतः देव आहे. म्हणूनच बायबल म्हणते “जो [ईश्‍वरी बुद्धी] ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.” (नीतिसूत्रे १:३३) या असुरक्षित जगात राहात असतानाही सुरक्षित जीवन जगण्यास आणि संकटप्रसंगे टाळण्यास बायबल कशी मदत करू शकते ते आता आपण पाहू या.

जीवघेणे अपघात टाळा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलीकडेच दिलेल्या आकडेवारीवरून लक्षात येते, की जगभरात दर वर्षी सुमारे ११,७१,००० लोक वाहन अपघातात आपला जीव गमावतात; तर तब्बल ४ कोटी लोक गंभीररित्या जखमी होतात आणि ८० लाखांहून अधिक जणांना कायमचे अपंगत्व येते.

पण, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास सर्वस्वी सुरक्षिततेची नाही तरी अधिक सुरक्षिततेची तर निश्‍चित हमी मिळते. वाहतुकीचे नियम बनवणाऱ्‍या आणि ते अंमलात आणणाऱ्‍या सरकारी अधिकाऱ्‍यांविषयी बायबल म्हणते: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे.” (रोमकर १३:१) या नियमांचे पालन करणाऱ्‍या वाहन चालकांना सहसा अपघाताचा जास्त धोका नसतो आणि अपघाताच्या भयंकर परिणामांपासून ते वाचतात.

गाडी जपून चालवण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे जीवनाबद्दलचा आदर. यहोवा देवाविषयी बायबल म्हणते: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.” (स्तोत्र ३६:९) होय, जीवन हे देवाकडून मिळालेले एक वरदान आहे. तेव्हा, कोणाचेही वरदान हिरावून घेण्याचा अथवा इतरांच्या वा आपल्या स्वतःच्या जीवनाचा अनादर करण्याचा अधिकार आपल्याला नाही.—उत्पत्ति ९:५, ६.

आपली गाडी आणि घर हे पुरेसे सुरक्षित आहेत की नाही याची खातरी करून घेण्याद्वारे देखील जीवनाबद्दलचा आदर दाखविला जाऊ शकतो. प्राचीन इस्राएलमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूत सुरक्षिततेला प्राधान्य दिले जायचे. उदाहरणार्थ, देवाच्या नियमानुसार, एखादे घर बांधताना घरावरील गच्चीला कठडा बांधणे बंधनकारक होते; कारण घरातले लोक सहसा त्या ठिकाणी काम करत असत. त्यामुळे देवाने त्यांना अशी आज्ञा दिली होती: “तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाही तर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील.” (अनुवाद २२:८) सुरक्षिततेसाठी दिलेला हा नियम न पाळल्यामुळे कोणी गच्चीवरून पडल्यास देवाच्या नजरेत घरमालक जबाबदार होता. देवाने दिलेल्या या नियमातल्या प्रेमळ सिद्धान्ताचे पालन केल्याने कामाच्या ठिकाणी अथवा करमणुकीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता कमालीची कमी होते यात शंका नाही.

जीवावर बेतणाऱ्‍या व्यसनांवर मात करणे

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात धूम्रपानाचे व्यसन असणाऱ्‍यांची संख्या कोटींच्या घरात आहे; तर दर वर्षी तंबाखूचे व्यसन सुमारे ४० लाख लोकांचा बळी घेते. आणि पुढच्या २० ते ३० वर्षांच्या काळात ही संख्या एक कोटीच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्‍त केली जाते. धूम्रपान करणारे आणि ‘मजेखातर’ ड्रग्स घेणारे कोट्यवधी लोक अशा व्यसनांपायी आपल्या आरोग्याचे नुकसान करून घेतील आणि आपल्या जीवनाचा दर्जा खालावतील.

देवाचे वचन, तबांखू आणि ड्रग्सच्या व्यसनाचा नेमका उल्लेख करत नसले तरी त्यातले सिद्धान्त अशा वाईट सवयींपासून आपले निश्‍चित संरक्षण करू शकतात. उदाहरणार्थ, २ करिंथकर ७:१ मध्ये असा सल्ला दिला आहे: “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू.” तंबाखू आणि ड्रग्समधील हानीकारक रासायने आपले शरीर दूषित अथवा अशुद्ध करतात यात कोणतीही शंका नाही. पण, आपली शरीरे “पवित्र” म्हणजे निष्कलंक आणि शुद्ध असावीत अशी देवाची इच्छा आहे. (रोमकर १२:१) या सिद्धान्तांचे पालन केल्यास आपल्यावरील धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल असे तुम्हाला वाटत नाही का?

प्राणघातक सवयींवर मात करणे

अनेक लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिरेक करतात. जास्त खाणाऱ्‍या लोकांना सहसा डायबिटिस, कॅन्सर आणि हृदयरोग होतात. तर स्वतःला दारूत बुडवून घेणाऱ्‍यांना मद्य आणि सिरोसिस रोग होतो, त्यांची कुटुंबे उद्धवस्त होतात आणि असे लोक सहसा वाहन अपघातांत सापडतात. दुसऱ्‍या बाजूला अति डायटिंग हे आरोग्याला धोकादायक ठरू शकते आणि अनोरेझिया नर्व्होसासारखे जीवावरचे दुखणे जडू शकते.

बायबल एक वैद्यकीय पुस्तक नसले तरी माफक प्रमाणात खाण्यापिण्याविषयी ते स्पष्ट शब्दांत असा सल्ला देते: “माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गांत राख. मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्‍यास उभा राहू नको; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो,” (नीतिसूत्रे २३:१९-२१) पण, त्याच वेळी आपले खाणेपिणे सुखावह आणि आनंददायक असावे असेही बायबल म्हणते. ते म्हणते: “तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१३.

बायबल व्यायामाबद्दल देखील एक संतुलित दृष्टिकोन राखण्याचे उत्तेजन देते. बायबल म्हणते: “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे.” पण, “सुभक्‍ति [ईश्‍वरी भक्‍ती] तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे,” असेही ते म्हणते. (१ तीमथ्य ४:८) परंतु, ‘सुभक्‍ती आताच्या जीवनात कशी उपयोगी आहे,’ असा कदाचित तुम्हाला प्रश्‍न पडेल. वास्तवात ती अनेक अर्थांनी उपयोगी आहे. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पैलू बनण्यासोबतच ईश्‍वरी भक्‍ती आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, आत्मसंयम यांसारखे सद्‌गुण विकसित करते. एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास आणि चांगले स्वास्थ्य राखण्यास हे सर्व गुण आपली मदत करतात.—गलतीकर ५:२२, २३.

अनैतिकतेचे कटू परिणाम

जगात असे असंख्य लोक आहेत ज्यांनी नैतिकतेचे नियम धाब्यावर बसवले आहेत. याचा एक परिणाम आहे एड्‌सची साथ. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एड्‌सची साथ सुरू झाली तेव्हा १.६ कोटींहून अधिक लोकांचा बळी गेला. तर आज जवळजवळ ३.४ कोटी लोकांना एचआयव्हीची म्हणजे एड्‌सची लागण झाली आहे. अधिकतर लोकांना अनेकांसोबत ठेवलेल्या लैंगिक संबंधांतून, ड्रग्जचे व्यसन असणाऱ्‍यांनी वापरलेल्या दूषित सुयांमधून किंवा दूषित रक्‍ताच्या संक्रमणातून हा रोग जडला आहे.

अशा स्वैराचाराचे इतर परिणाम म्हणजे परिसर्प, परमा रोग, हेपाटायटिस बी व सी आणि गरमी रोग. बायबलच्या काळात ही वैद्यकीय नावे वापरली जात नसली तरी लैंगिकरित्या संक्रमित रोगांमुळे शरीराच्या ज्या भागांवर परिणाम व्हायचा त्यांची नावे निश्‍चित दिली होती. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे ७:२३ जारकर्माच्या भयप्रत परिणामांचे वर्णन, ‘काळीज [यकृत] भेदून जाणारे तीर’ असे करते. हेपाटायटिसप्रमाणेच गरमी रोग देखील सहसा यकृतावर परिणाम करतो. होय, ‘रक्‍त आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी’ असा जो सल्ला बायबलमध्ये दिला आहे तो खरोखरच किती समयोचित आणि प्रेमळ आहे!—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

पैशाच्या हव्यासाचा पाश

रातोरात श्रीमंत होण्याच्या प्रयत्नांत अनेक जण पैसा बुडण्याची जोखमही पत्करतात. पण, असे धोके पत्करल्यामुळे अनेक जण रस्त्यावर आले आहेत. देवाची उपासना करणाऱ्‍या व्यक्‍तीला बायबल असा सल्ला देते: “गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२८) कष्ट करणारी व्यक्‍ती श्रीमंत होईलच असे नाही. पण, अशा व्यक्‍तीला निदान मनःशांती मिळते, तिला स्वाभिमान असतो. शिवाय, इतरांना दान करण्यासाठी तिच्याजवळ बहुधा पैसाही असेल.

पैशाच्या हव्यासासंबंधी बायबल असा इशारा देते: “जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते मोहात सापडतात, सापळ्यात अडकतात आणि ज्या गोष्टी मनुष्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा पुरा नाश करतात, अशा अनेक मूर्खपणाच्या व अनापायकारक वासनांमध्ये ते उडी टाकतात. कारण पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या दुष्टाईकडे घेऊन जाणारी पहिली पायरी होय. पैशाच्या आसक्‍तीने कित्येकजण तर देवापासून दूर गेले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०; सुबोध भाषांतर) “श्रीमंत होण्याची इच्छा” धरणारे अनेक जण श्रीमंत होतात म्हणा. पण, त्यासाठी त्यांना आपल्या आरोग्याची, कुटुंबाची, आध्यात्मिकतेची आणि विश्रांतीची किंमत मोजावी लागत नाही का?—उपदेशक ५:१२.

बुद्धिमान व्यक्‍तीला याची जाणीव असते, की “पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) समाजात राहण्याकरता थोडाफार पैसा आणि संपत्ती असणे जरूरीचे आहे. किंबहुना बायबलसुद्धा म्हणते की, ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ पण, बायबल पुढे असेही म्हणते, की “ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण [“बुद्धी,” NW] असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” (उपदेशक ७:१२) योग्य ज्ञान आणि बुद्धी सर्व प्रसंगी आणि खासकरून आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रत्येक प्रसंगी आपली मदत करतात. पण, पैसा असे करत नाही.—नीतिसूत्रे ४:५-९.

शेवटी बुद्धीच तुमचे संरक्षण करील

लवकरच अशी एक वेळ येईल जेव्हा ‘ईश्‍वरी बुद्धी असलेल्या लोकांच्या जीविताचे’ अपूर्वपणे ‘रक्षण होईल.’ होय, वेगाने येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटात’ देव दुष्टांचा नाश करील तेव्हा केवळ ईश्‍वरी बुद्धी त्या मोठ्या संकटातून वाचण्यास आपली मदत करील. (मत्तय २४:२१) त्यावेळी लोक “अमंगळ” वस्तू म्हणून आपला पैसा रस्त्यावर फेकून देतील असे बायबल म्हणते. का? कारण त्या वेळी त्यांना हे कळून चुकले असेल की “परमेश्‍वराच्या [“यहोवाच्या,” NW] कोपाच्या दिवशी” सोन्याचांदीने त्यांना आपले जीवन विकत मिळणार नाही. (यहेज्केल ७:१९) पण, त्याच वेळी, आध्यात्मिक गोष्टींना जीवनात प्रथम स्थान देऊन सुज्ञतेने ‘स्वर्गात संपत्ती साठवणाऱ्‍या’ ‘मोठ्या लोक समुदायाला’ आपल्या या खात्रीलायक गुंतवणुकीमुळे नक्कीच लाभ होईल. शिवाय, पृथ्वीवरील नयनरम्य बागेत अनंतकाळचे जीवनसुद्धा त्यांना मिळेल.—प्रकटीकरण ७:९, १४; २१:३, ४; मत्तय ६:१९, २०.

असे सुरक्षित भवितव्य प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे? याचे उत्तर येशूने दिले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे [ज्ञान घ्यावे].” (योहान १७:३) देवाचे वचन बायबल यातून आजवर लाखो लोकांनी हे ज्ञान घेतले आहे. अशा लोकांना भविष्याची एक अद्‌भुत आशा तर आहेच; शिवाय, आतासुद्धा ते मोठ्या प्रमाणात शांती आणि सुरक्षितता अनुभवतात. एका स्तोत्रकर्त्याने म्हटले अगदी त्याप्रमाणे ते म्हणतील: “मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे, परमेश्‍वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस.”—स्तोत्र ४:८.

आपल्या जीवनातले आणि आरोग्याचे धोके कमी करण्यास बायबल जितकी मदत करते तितकी इतर कोणतेही माहितीसूत्र करू शकत नाही. जगातल्या कोणत्याही पुस्तकाला बायबल इतका अधिकार नाही आणि सध्याच्या या धोकेदायक जगात खरी सुरक्षितता मिळवण्यास दुसरे कोणतेही पुस्तक तुमची मदत करू शकणार नाही. तेव्हा, बायबलचे आवर्जून परीक्षण करा.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

उत्तम आरोग्य आणि सुरक्षितता—केवळ बायबलमुळे

जीवनाच्या वास्तविकतेपासून पळ काढण्यासाठी जेन * नावाची एक तरुण स्त्री नेहमी हाशिश, तंबाखू, कोकेन, अँफीटेमिन्स, एलएसडी आणि अशा इतर ड्रग्सचा वापर करत असे. नंतर ती खूप दारूही पिऊ लागली. जेनच्या मते, तिच्या पतीची अवस्था देखील काहीशी तिच्यासारखीच होती. त्यांचे भविष्य अगदीच अंधकारमय वाटत होते. जेनची एकदा यहोवाच्या साक्षीदारांशी गाठ पडली. आणि ती नियमितपणे त्यांच्या सभांना जाऊ लागली. तसेच, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही मासिके वाचू लागली. आणि आपल्या पतीला त्यातल्या गोष्टी सांगू लागली. मग, दोघेही साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करू लागले. लवकरच त्यांना देवाच्या उच्च दर्जांची जाणीव झाली आणि सर्व मादक औषधे त्यांनी वर्ज्य केली. याचा परिणाम काय झाला? काही वर्षांनंतर जेनने लिहिले: “या नवीन जीवनामुळे आम्हाला खूप आनंद मिळाला. शुद्ध करणाऱ्‍या यहोवाच्या वचनाबद्दल, तसेच, एक स्वच्छंद आणि निरोगी जीवन दिल्याबद्दल आम्ही यहोवा देवाचे किती आभारी आहोत!”

प्रामाणिकपणाचे महत्त्व कर्ट नावाच्या एका कर्मचाऱ्‍याच्या अनुभवातून लक्षात येते. कर्ट कंप्यूटर सिस्टम्सचे काम सांभाळणारा कर्मचारी होता. एकदा नवीन उपकरणांची गरज पडली तेव्हा त्याच्या मालकाने त्याच्यावर किफायतशीर दरात ही उपकरणे विकत घेण्याची जबाबदारी सोपवली. कर्टने एक चांगला सप्लायर शोधून काढला आणि किंमत ठरवली. पण, झाले असे, की कोटेशन तयार करत असताना त्या सप्लायरच्या क्लार्कच्या हातून लिहिण्यात चूक झाली. त्यामुळे आधी ठरवलेली किंमत जवळजवळ २०,००,००० रूपयांनी कमी झाली. ही चूक कर्टच्या लक्षात आली आणि त्याने लगेच त्या कंपनीत फोन केला. त्यावर कंपनीच्या मॅनेजरने म्हटले की, २५ वर्षांच्या आपल्या नोकरीत आपण इतका प्रामाणिक माणूस कधीच पाहिला नव्हता. आपला विवेक बायबलच्या शिकवणींनुसार प्रशिक्षित आहे असे कर्टने मॅनेजरला सांगितले. आणि याचा परिणाम असा झाला, की कामात प्रामाणिकपणा कसा राखावा यावर माहिती देणाऱ्‍या सावध राहा! मासिकाच्या ३०० प्रती मॅनेजरने आपल्या सहकर्मचाऱ्‍यांसाठी मागवल्या. आपल्या प्रामाणिकपणाचा कर्टला काही फायदा झाला का? निश्‍चितच! त्याबद्दल त्याला प्रमोशन मिळाले.

[तळटीप]

^ नावे बदलली आहेत.

[७ पानांवरील चित्रे]

“तुला जे हितकारक ते मी [यहोवा] तुझा देव तुला शिकवितो.” यशया ४८:१७