निराशेवर औषध आहे!
निराशेवर औषध आहे!
एका बुद्धिमान लेखकाने एका ठिकाणी असे लिहिले आहे: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ति अल्प होय.” (नीतिसूत्रे २४:१०) तुम्हालाही एखाद्या प्रसंगी असा अनुभव कदाचित आला असेल, जेव्हा तुमचे धैर्य खचले असेल आणि तुम्ही अगदी निराश झाला असाल. हे खरे असल्यास, वरील विधानाशी तुम्ही नक्कीच सहमत व्हाल.
निराशेपासून कोणीही सुटलेला नाही. लहानमोठ्या गोष्टींमुळे आलेल्या निराशेच्या भावना एकदोन दिवसात निवळतात, पण, दुखावलेल्या भावना आणि चीड यामुळे आलेले नैराश्य सहजासहजी जात नाही. यहोवाच्या साक्षीदारांपैकी अशा कित्येक बांधवांची उदाहरणे आहेत की ज्यांनी अनेक वर्षे यहोवाची विश्वासूपणे सेवा केल्यानंतर एखाद्या गोष्टीमुळे निराश होऊन सभांना येण्याचे आणि क्षेत्र सेवाकार्य करण्याचे सोडून दिले आहे.
तुम्हीही एखाद्या कारणामुळे निराश झाला असाल, तर हिंमत सोडू नका! प्राचीन काळात विश्वासू सेवकांनी निराशेवर मात केली आणि यहोवाच्या मदतीने तुम्ही देखील असेच करू शकता.
कोणी तुमच्या भावना दुखावतात तेव्हा
कोणीही आपल्याशी अविचारीपणे बोलणार नाही किंवा वागणार नाही अशी तर अपेक्षा आपण करू शकत नाही. पण इतरजण जेव्हा असे वागतात किंवा बोलतात तेव्हा त्यांच्या अपरिपूर्णतेमुळे मी यहोवाच्या सेवेत खंड पडू देणार नाही असा निर्धार तुम्ही निश्चितच करू शकता. तुमच्या भावना कोणी दुखावल्या असतील तर शमुवेलाची आई हन्ना हिचे उदाहरण तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.
आपल्याला मूल व्हावे असे हन्नाला उत्कटपणे वाटत होते, पण ती वांझ होती. तिची सवत पेनिन्ना हिला मात्र मुलेबाळे होती. हन्नाचे दुःख समजून घेण्याऐवजी पेनिन्ना तिला पाण्यात पाहू लागली; हन्नाशी ती इतक्या दुष्टपणाने वागायची की बिचारी हन्ना “रडे व काही खात नसे.”—१ शमुवेल १:२, ४-७.
एकदा हन्ना निवासमंडपात प्रार्थना करायला गेली. इस्राएलचा मुख्य याजक एलीने तिला पाहिले; तिचे ओठ हालत होते. हन्ना प्रार्थना करत असावी हे एलीच्या लक्षात आले नाही. त्याला वाटले की ती दारूच्या नशेत असावी. तो तिला म्हणाला, “तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षारसाच्या नशेतून मुक्त हो.” (१ शमुवेल १:१२-१४) जरा कल्पना करा एलीच्या या शब्दांमुळे हन्नाला कसे वाटले असेल. खरे तर, दिलासा मिळावा म्हणून ती या निवासमंडपात आली होती. इस्राएलचा सर्वात सन्मानित पुरुष आपल्याशी असे वागेल, आपल्यावर असा आरोप लावेल असे तिला स्वप्नातही वाटले नसेल!
हन्नाच्या ठिकाणी दुसरे कोणी असते तर ती व्यक्ती कदाचित अतिशय निराश झाली असती. कदाचित ती त्याच क्षणी निवासमंडपातून निघून गेली असती; निदान एली तिथे मुख्य याजक असेपर्यंत तरी पुन्हा कधी त्या ठिकाणी पाय ठेवायचा नाही अशी तिने शपथ घेतली असती. पण हन्नाने असे केले नाही; यहोवाशी असलेला नातेसंबंध तिला गमवायचा नव्हता. अशाप्रकारे वागणे यहोवाला आवडणार नाही हे तिला माहीत होते. निवासमंडप हे खऱ्या उपासनेचे ठिकाण होते. यहोवाने या ठिकाणाला आपले नाव दिले होते. शिवाय, एली निर्दोष नसला तरीही तो यहोवाचा निवडलेला होता.
एलीने खोटा आरोप लावल्यानंतरही हन्ना ज्याप्रकारे देवाला भिऊन वागली त्यावरून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. तिने त्याला उत्तर दिले: “माझे स्वामी! मी दुःखीत हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षारसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका; मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते.”—१ शमुवेल १:१५, १६.
हन्नाने आपली बाजू स्पष्ट केली का? निश्चितच. पण ती एलीशी अत्यंत विचारशीलपणे बोलली. त्याने तिच्यावर खोटा आरोप केला असला तरीसुद्धा, तिने त्याला दोषी ठरवण्याचे धैर्य केले नाही. मग त्याने देखील तिला प्रेमळपणे उत्तर दिले: १ शमुवेल १:१७, १८.
“तू सुखाने जा, इस्राएलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.” गैरसमज एकदाचा दूर झाल्यावर, हन्नाने “परत जाऊन अन्न सेवन केले, व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.”—या घटनेच्या वृत्तान्तावरून आपण काय शिकतो? एलीला झालेला गैरसमज हन्नाने लगेच दूर केला, पण हे तिने अत्यंत भीडस्तपणाने केले. यामुळे यहोवा देवाशी व एलीशी देखील तिचा नातेसंबंध बिघडला नाही. समस्या सोडवताना जेव्हा आपण आपले विचार स्पष्टपणे पण थोड्या विचारशीलतेने मांडतो, तेव्हा सहसा लहानसहान समस्या आणखी चिघळत नाहीत!
पण समस्या सोडवण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी नम्रपणे वागणे आणि आपापला हेकेखोरपणा सोडून देणे आवश्यक आहे हे आपण सर्वांनी ओळखले पाहिजे. सलोखा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करूनही एखादा भाऊ किंवा बहीण तुमच्या प्रयत्नांना दाद देत नसेल तर मग तुम्ही ही गोष्ट यहोवाच्या हातात सोडून द्यावी. हा भरवसा बाळगून, की योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तो ही समस्या निश्चित सोडवेल.
सेवेतील एखादा विशेष बहुमान तुम्ही गमवला आहे का?
देवाच्या सेवेतील एखादा विशेष बहुमान सोडून द्यावा लागल्यामुळे काही बांधव हताश होतात. बांधवांची सेवा करताना जो आनंद त्यांना मिळत होता, तो गमवल्यामुळे आता आपण यहोवाच्या किंवा त्याच्या संस्थेच्या उपयोगाचे राहिलो नाहीत असे त्यांना वाटू लागते. तुम्हालाही असे वाटत असेल, तर बायबलचा लेखक मार्क ज्याला योहान मार्क देखील म्हटले आहे, त्याचे उदाहरण विचारात घेतल्यामुळे तुम्हाला योग्य दृष्टिकोन बाळगायला मदत मिळेल.—प्रेषितांची कृत्ये १२:१२.
पौल व बर्णबा यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यावर मार्क देखील त्यांच्यासोबत गेला होता. पण, प्रवासात मध्येच तो त्यांना सोडून जेरूसलेमला निघून गेला. (प्रेषितांची कृत्ये १३:१३) नंतर एकदा दुसऱ्या दौऱ्यावर जाताना बर्णबाने मार्कला आपल्यासोबत नेण्याची इच्छा व्यक्त केली. “परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही.” बर्णबाला ही गोष्ट पटली नाही. अहवालात पुढे सांगितले आहे, की “ह्यावरून, त्यांच्यामध्ये [पौल व बर्णबा] तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला; पौलाने सीलाला निवडून घेतले.”—प्रेषितांची कृत्ये १५:३६-४०.
मार्कला कसे वाटले असावे याची कल्पना करा. आपण ज्याचा इतका आदर करतो त्या प्रेषित पौलाला आपल्यासोबत काम करण्याची इच्छा नाही; आणि आपल्या पात्रतेच्या बाबतीत मतभेद झाल्यामुळे पौल व बर्णबा वेगळे झाले हे समजल्यावर साहजिकच त्याला धक्का बसला असेल. पण, पुढे काय झाले ते पाहा.
पौल व सीला हे प्रवासाकरता आणखी एक सोबती शोधत होते. लुस्रा येथे आल्यावर त्यांनी मार्कच्या ऐवजी तीमथ्य नावाच्या एका तरुण बांधवाला सोबत घेतले. यावेळी तीमथ्याचा बाप्तिस्मा होऊन जास्तीजास्त दोनतीन वर्षे झाली असावीत. मार्क मात्र ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यापासून सेवा करत होता; किंबहुना पौलापेक्षाही तो जुना होता. तरीसुद्धा, त्या मिशनरी दौऱ्यावर जाण्याचा विशेष बहुमान तीमथ्याला मिळाला.—प्रेषितांची कृत्ये १६:१-३.
आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या माणसाने आपली जागा घेतली हे कळल्यावर मार्कची काय प्रतिक्रिया होती? बायबल याविषयी काहीही सांगत नाही. पण इतर वृत्तान्तावरून हे नक्कीच सूचित होते की मार्क यहोवाच्या सेवेत सक्रिय राहिला. सेवेच्या ज्या काही संधी त्याला मिळाल्या त्या त्याने स्वीकारल्या. पौल व सीला यांच्यासोबत सेवा करण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा तो बर्णबासोबत कुप्रासला, म्हणजे त्याच्या घरच्या क्षेत्रात सेवा करण्यास जाऊ शकला. मार्कने पेत्रासोबत बॅबिलोनमध्येही सेवा केली. कालांतराने त्याला रोममध्ये पौलासोबत आणि तीमथ्यासोबत देखील कार्य करण्याची संधी मिळाली. (कलस्सैकर १:१; ४:१०; १ पेत्र ५:१३) शिवाय, देवाच्या प्रेरणेने मार्कने चार शुभवर्तमानांपैकी एक शुभवर्तमानाचे पुस्तक देखील लिहिले!
या सबंध वृत्तान्तातून आपल्याकरता एक महत्त्वाचा धडा आहे. मार्कला हवा असलेला बहुमान त्याला गमवावा लागला, पण तो याचेच दुःख करत बसला नाही. तर अद्यापही तो सेवेचे जे बहुमान मिळवू शकत होता, त्यांची त्याने कदर जाणली. तो यहोवाच्या सेवेत मग्न राहिला आणि यासाठी यहोवाने त्याला आशीर्वाद दिला.
तुम्हालाही एखादा विशेष बहुमान गमवावा लागला असेल तर खचून जाऊ नका. सकारात्मक मनोवृत्तीने तुम्ही यहोवाच्या कार्यात मग्न राहिला तर त्याची सेवा करण्याच्या इतर चांगल्या संधी चालून येतील. प्रभूच्या कामात करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत!—१ करिंथकर १५:५८.
एका विश्वासू सेवकाचे धैर्य खचले
विश्वासात टिकून राहण्याची लढाई सोपी नाही. कधीकधी आपण अगदी खचून जातो. मग आपण खचून गेलो याबद्दलही आपल्याला वाईट वाटू लागते. देवाच्या विश्वासू सेवकांनी कधीही खचून जाणे योग्य नाही असे वाटून, मनात दोषीपणाच्या भावना येतात. इस्राएलातील एक मुख्य संदेष्टा एलीया याचे उदाहरण पाहा.
इस्राएलची राणी ईजबेल ही बआल दैवताची कट्टर उपासक व समर्थक होती. एलीयाने बआलाच्या संदेष्ट्यांना जिवे मारले असे तिला समजले तेव्हा एलियाला मारून टाकण्याचा तिने निश्चय केला. एलियाने याआधी ईजबेलपेक्षा भयंकर शत्रूंना तोंड दिले होते, पण यावेळी अचानक त्याचे धैर्य इतके खचले की आपला प्राण गेला तर बरे होईल असे तो म्हणू लागला. (१ राजे १९:१-४) असे का घडले? कारण एलिया एक गोष्ट विसरला होता.
यहोवा आपल्याला ताकद देण्यास समर्थ आहे हे एलिया विसरला होता. यापूर्वी मृतांचे पुनरुत्थान करण्याचे आणि बआलाच्या संदेष्ट्यांचा सामना करण्याची शक्ती त्याला कोणी दिली होती? यहोवानेच. तेव्हा ईजबेल राणीच्या क्रोधालाही तोंड देण्याची शक्ती त्याला द्यायला यहोवा समर्थ होता.—१ राजे १७;१७-२४; १८:२१-४०; २ करिंथकर ४:७.
असे आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत घडू शकते. कधीकधी यहोवावरचा आपला विश्वास क्षणभर डगमगतो. एलियाप्रमाणे आपणही कधीकधी ‘वरून येणाऱ्या ज्ञानावर’ अवलंबून राहण्याऐवजी मानवी दृष्टिकोनाने आपल्या समस्येविषयी विचार करू लागतो. (याकोब ३:१७) पण एलियाचा विश्वास क्षणभर डगमगल्यामुळे यहोवाने त्याला एकटे सोडले नाही.
एलिया बेरशीबाला व तेथून एका अरण्यात निघून गेला. इथे आपल्याला कोणी शोधून काढू शकणार नाही असे त्याला वाटले. पण, यहोवाने त्याला शोधून काढले. त्याने एलियाचे सांत्वन करण्यासाठी आपल्या एका देवदूताला पाठवले. त्या देवदूताने एलियाला ताजी भाकरी आणि पाणी दिले. एलियाने थोडा विसावा घेतल्यानंतर देवदूताने त्याला ३०० किलोमीटरचा प्रवास करून होरेब पर्वतावर जायला सांगितले. तेथे यहोवाने त्याला आणखी प्रोत्साहन व उत्तेजन दिले.—१ राजे १९:५-८.
होरेब पर्वतावर एलियाला चमत्कारिकरित्या यहोवाच्या शक्तीचा साक्षात्कार झाला. मग यहोवाने संथ आवाजात त्याला आश्वासन दिले की तो एकटा नव्हता. यहोवा स्वतः त्याच्या पाठीशी होता; शिवाय एलिया ज्यांना ओळखतही नव्हता असे त्याचे ७००० बंधू देखील त्याच्यासोबत होते. असे सांगितल्यानंतर यहोवाने एलियाला एक नवीन काम दिले. तो अद्यापही यहोवाचा संदेष्टा होता!—१ राजे १९:११-१८.
निराशेला तोंड देण्याकरता मदत
कधी कधी आपल्याला एकदम गळून गेल्यासारखे वाटते तेव्हा विश्रांती आणि सकस भोजन केल्यामुळे पुन्हा तरतरी येते हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून १९७७ साली मृत्यू होईपर्यंत सेवा केलेल्या नेथन एच. नॉर यांनी एकदा असे म्हटले होते, की रात्रीची चांगली झोप झाल्यावर मोठमोठ्या समस्या हाताळणे इतके अवघड वाटत नाही. अर्थात तुमची समस्या सुटतच नसेल, तर हे लहानमोठे उपाय करून चालणार नाही—तुम्हाला तुमच्या निराशाजनक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणाचीतरी मदत घ्यावी लागेल.
एलियाला ताकद देण्यासाठी यहोवाने देवदूताला पाठवले. आज यहोवा मंडळीतल्या वडिलांच्या आणि इतर प्रौढ, समजूतदार ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमाने आपल्याला प्रोत्साहन देतो. वडील खरोखर आपल्याकरता “वाऱ्यापासून आसरा” बनू शकतात. (यशया ३२:१, २) पण त्यांच्याकडून सांत्वन आणि प्रोत्साहन मिळण्याकरता कदाचित पुढाकार तुम्हाला घ्यावा लागेल. एलियाचे उदाहरण पाहा. तो इतका निराश असूनही यहोवाकडून मार्गदर्शन मिळण्याकरता लांबचा प्रवास करून होरेब पर्वतावर गेला. आपल्याला आध्यात्मिक ताकद देणारे मार्गदर्शन ख्रिस्ती मंडळीतून मिळू शकते.
भावना दुखावल्या जातात, किंवा एखादा विशेष बहुमान गमवावा लागतो व अशाप्रकारच्या इतर परीक्षा आपल्यावर येतात तेव्हा आपण उपलब्ध असलेली मदत स्वीकारून या परीक्षांना तोंड दिले पाहिजे. असे केल्यामुळे आपण एका महत्त्वाच्या वादविषयात यहोवाची बाजू घेत असल्याचे सिद्ध करतो. येथे कोणत्या वादविषयाबद्दल आपण बोलत आहोत? सैतानाने असा दावा केला आहे की मनुष्य केवळ स्वार्थापोटी यहोवाची सेवा करतात. जीवनात सर्वकाही सुरळीत चालले असताना आपण यहोवाची सेवा करू याविषयी वाद नाही, पण जेव्हा आपल्यावर समस्या येतात तेव्हा आपण यहोवाची सेवा करण्याचे आपोआप थांबवू असा सैतानाचा दावा आहे. (ईयोब, १ ला व २ रा अध्याय) परंतु निराशाजनक परिस्थितीतही आपण यहोवाच्या सेवेत खंड पडू न दिल्यास आपण दियाबलाच्या दुष्ट आरोपाचे खंडन करण्यासाठी मदत करतो.—नीतिसूत्रे २७:११.
हन्ना, मार्क आणि एलिया या सर्वांना त्यांच्या समस्यांमुळे काही काळ निराशेने ग्रासले. पण त्यांनी आपापल्या समस्यांना तोंड दिले आणि ते आनंदाने यहोवाची सेवा करत राहिले. यहोवाच्या मदतीने तुम्ही देखील निराशेवर मात करू शकता!