लॅटव्हियात सुवार्तेला प्रतिसाद
राज्य घोषकांचा वृत्तान्त
लॅटव्हियात सुवार्तेला प्रतिसाद
बायबलमध्ये स्पष्टपणे दाखवल्यानुसार “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” ही देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) कित्येक वर्षांपासून ज्यांना सुवार्ता ऐकण्याची संधी मिळत नव्हती त्यांना आता ती मिळत आहे! जगातल्या इतर भागांप्रमाणेच लॅटव्हियात देखील सगळ्या वयोगटाचे आणि पार्श्वभूमीचे लोक सुवार्तेला प्रतिसाद देत आहेत. पुढील अनुभवांवरून हे प्रत्ययास येते.
• पूर्व लॅटव्हियाच्या रीझेकने या शहरात एका मुलीला आणि तिच्या आईला एका विशिष्ट ठिकाणी जायचे होते. पण तेथे कसे जायचे हे विचारण्यासाठी त्या रस्त्यावरील एका स्त्रीकडे गेल्या. ती स्त्री एक यहोवाची साक्षीदार होती. तिने त्यांना कसे जायचे हे नीट समजावून सांगितले आणि सोबतच साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले.
त्या दोघी मायलेकी धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांनी सभांना जायचे ठरवले. सभांना जाताना त्या एकमेकींना म्हणाल्या, तिकडे काही अनुचित चालले आहे असे वाटले तर लगेच उठून यायचे. परंतु, सभा इतक्या छान होत्या की तेथून उठून जायचा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही. त्यांनी बायबल अभ्यास करण्याची तयारी दर्शवली आणि लगेच सभांना येऊ लागल्या. तीन महिन्यांच्या आत त्यांनी प्रचारकार्यात सामील व्हायची इच्छा दाखवली आणि बाप्तिस्मा घ्यायचा विचार करू लागल्या.
• पश्चिम लॅटव्हियाच्या एका शहरात, ॲना नावाच्या ८५ वर्षांच्या एका स्त्रीशी एका साक्षीदाराची भेट झाली. तिने बायबलमध्ये आस्था दाखवली आणि बायबल अभ्यास करायला तयार झाली. तिच्या मुलीने आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांनी तिचा खूप विरोध केला. पण त्यांचा विरोध, स्वतःचे म्हातारपण आणि आजारपण या कशालाही तिने दाद दिली नाही. तिने बायबलचा अभ्यास चालूच ठेवला.
आपण बाप्तिस्मा घेणार आहोत असे एकदा ॲनाने तिच्या मुलीला सांगितले. तिची मुलगी म्हणाली, “तू बाप्तिस्मा घेऊनच पाहा, मी तुला अनाथ आश्रमातच पाठवते.” मुलीने दिलेल्या या धमकीमुळे ॲनाचे धैर्य खचले नाही. तिच्या प्रकृतीमुळे तिच्या घरीच तिला बाप्तिस्मा देण्यात आला.
ॲनाच्या मुलीची काय प्रतिक्रिया असावी? तिच्यात एकाएकी बदल झाला. बाप्तिस्म्यानंतर तिने उलट ॲनासाठी खास जेवण तयार केले. मग तिने आपल्या आईला विचारले, “आता बाप्तिस्मा घेतल्यावर तुला कसं वाटतंय?” ॲना म्हणाली, “जणू आताच माझा जन्म झालाय!”
• डिसेंबर १९९८ मध्ये, दोन साक्षीदारांची भेट, भूतपूर्व सोव्हिएत युनियनच्या एका निवृत्त सेना अधिकाऱ्याशी झाली. त्या अधिकाऱ्याचा निर्माणकर्त्यावर विश्वास होता म्हणून त्याने बायबलचा अभ्यास करायची तयारी दर्शवली. मागाहून त्याची पत्नीही त्याच्यासोबत अभ्यास करू लागली. पाहता पाहता त्यांनी बरीच प्रगती केली आणि ते बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारकसुद्धा बनले. पूर्वीच्या या सेना अधिकाऱ्याचा पुढील उन्हाळ्यात बाप्तिस्मा झाला. आध्यात्मिक गोष्टींबद्दल त्यांची आस्था पाहून मंडळीतल्या सर्वांना उत्तेजन मिळते. एवढेच नव्हे तर, एका घराचे राज्य सभागृहात रूपांतर करण्यातही त्यांनी बरीच मदत केली.