आपले हावभाव आपल्याविषयी काय सांगतात?
आपले हावभाव आपल्याविषयी काय सांगतात?
दुसऱ्यांशी दळणवळण करताना केलेले हातवारे, हालचाली आणि बोलण्याचालण्यातील सवयी यांना हावभाव म्हणतात. आपले हावभाव काय दर्शवतात? त्याद्वारे आदर, नम्रता, आनंद हे गुण प्रदर्शित होतात का? की ते राग आणि चिडचिडेपणाचे संकेत आहेत? बायबलमध्ये वेगवेगळ्या हावभावांविषयी आणि बसण्याच्या व उभे राहण्याच्या पद्धतींविषयी सांगितले आहे ज्याद्वारे पुष्कळ काही दर्शवले जाते. काही देशांमधील लोक आपल्या भावना शारीरिक हावभावांद्वारे मोकळेपणाने दर्शवतात. परंतु, बायबल काळामध्ये लोक आपली मनोवृत्ती कशी व्यक्त करत होते हे पाहून आपण काही शिकू शकतो.
बसण्याची किंवा उभे राहण्याची आदरपूर्वक पद्धत
यहोवाला प्रार्थना करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि म्हणून प्रार्थना करताना आपली आदरपूर्वक वृत्ती असली पाहिजे. इब्री लोकांमध्ये आणि प्रारंभीच्या ख्रिश्चनांमध्ये, प्रार्थना करताना हात जोडण्याची किंवा हात घट्ट पकडण्याची कोणतीही विशिष्ट पद्धत नव्हती. परंतु, अत्यंत आदरपूर्वक पद्धतीनेच प्रार्थना केली जायची. उभे राहून किंवा गुडघ्यांवर टेकून प्रार्थना करण्याची पद्धत रूढ होती. बाप्तिस्म्यानंतर येशूने उभे राहूनच प्रार्थना केली असावी; तसेच, गेथशेमाने बागेत त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. (लूक ३:२१, २२; २२:४१) उभे राहून प्रार्थना करताना किंवा गुडघे टेकून प्रार्थना करत असताना स्वर्गाकडे हात पसरले जात किंवा विनवणीच्या वेळी करतात तसे हात उंचावले अथवा पुढे केले जात. तसेच वर आकाशाकडे पाहूनही प्रार्थना केली जात असे.—नहेम्या ८:६; मत्तय १४:१९; ईयोब २२:२६.
असे दिसून येते की, काहीजण गुडघे टेकून, डोके खाली घालून किंवा एलीयासारखे जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घालून प्रार्थना करत होते. (१ राजे १८:४२) अति दुःखी होऊन किंवा कळवळून प्रार्थना करणारी व्यक्ती चक्क दंडवत घालून प्रार्थना करत होती. परंतु, प्रार्थना मनापासून असाव्यात, उगाच भक्तीचा किंवा पवित्रतेचा आव आणून प्रार्थना करू नये असे येशूने स्पष्ट सांगितले होते.
एकमेकांबद्दल आदर दाखवताना आणि विशेषतः वरिष्ठांना विनवणी करताना पौर्वात्य लोकांची जी मनोवृत्ती आणि पद्धत होती तीच प्रार्थनेच्या वेळीही अवलंबली जात होती. इतरांसमोर गुडघे टेकून विनंती करण्याची अनेक उदाहरणे आहेत. अशातऱ्हेने केलेली विनंती त्या व्यक्तीची उपासना नव्हती तर तिचे स्थान किंवा पद लक्षात घेऊन दाखवला जाणारा खोल आदरभाव होता. (मत्तय १७:१४) आदर दाखवण्याविषयी आपण शास्त्रवचनांमधून पुष्कळ शिकू शकतो.
नम्र मनोवृत्ती
बायबल काळात, दुसऱ्या व्यक्तीच्या चपलांचे बंद सैल करणे किंवा त्याच्या चपला उचलून घेणे हे कमी दर्जाचे काम समजले जात होते. तसेच हे काम करणारी व्यक्ती नम्र आहे आणि मालकासमोर आपण लहान आहोत अशी जाणीव तिला आहे असे मानले जात होते. जेवणानंतर व्यक्तीच्या हातांवर पाणी घालणे, दुसऱ्या व्यक्तीचे पाय धुणे हे आदरातिथ्य, आदर आणि काही प्रसंगी नम्रता दाखवण्यासाठी केले जायचे. “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा” या अभिव्यक्तीवरून अलीशा एलीयाचा सेवक किंवा दास होता हे दिसून येते. (२ राजे ३:११) त्याच्या हावभावांवरून निश्चितच त्याची नम्र मनोवृत्ती दिसून आली. आपल्या शिष्यांना नम्रतेसंबंधी आणि एकमेकांची सेवा करण्यासंबंधी शिकवण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांचे प्रत्यक्षात पाय धुऊन या पौर्वात्य परंपरेचा उपयोग केला.—योहान १३:३-१०.
कंबर कसण्याद्वारेही सेवा करण्याची आपली तयारी आहे असे नम्रपणे दर्शवले जात होते. बायबल काळातल्या परंपरेला ते सूचित करत होते; काम करताना किंवा धावताना लांब झग्याचा अडथळा होऊ नये म्हणून एखाद्या पट्ट्याने किंवा कमरपट्ट्याने तो बांधण्याची तेव्हा रीत होती. एकमेकांना सहकार्य करण्याची नम्रता आपल्यात आहे अथवा मिळून किंवा सोबत काम केले जात आहे हे दाखवण्यासाठी एकमेकांना हात दिला जात होता किंवा दुसऱ्या व्यक्तीचा हात धरला जात होता. (गलतीकर २:९) बांधव एकमेकांना हात देतात तेव्हा किती छान वाटते!
दुःख, लाज आणि राग
प्राचीन काळी, यहोवाचे विश्वासू सेवक उघडपणे या भावना व्यक्त करत असत. डोक्यात धूळ किंवा राख घालून घेणे, झगे फाडणे, गोणपाट परिधान करणे, रडणे, दुःखाने डोके लववणे किंवा जमिनीवर बसणे यांद्वारे दुःख व्यक्त केले जात होते. (ईयोब २:१२, १३; २ शमुवेल १३:१९) स्वतःच्याच डोक्याचे किंवा दाढीचे केस तोडणे, मस्तक झाकणे, स्वतःचे कपाळ बडवून घेणे हे दुःखाचे किंवा लज्जेचे चिन्ह होते. (एज्रा ९:३; एस्तेर ६:१२; यिर्मया २:३७) स्वतःचे कपाळ बडवून घेणे म्हणजे देवाचा शाप दुःख करणाऱ्या व्यक्तीवर आला आहे असा काहींचा विश्वास होता. दुःखाचे किंवा लज्जेचे कारण हे खऱ्या उपासकांकरता क्षुल्लक कारण नव्हते.
उपास करण्याद्वारेही दुःख आणि पश्चात्ताप झाल्याचे दर्शवले जात होते. (२ शमुवेल १:१२; योएल १:१३, १४) येशू पृथ्वीवर होता तेव्हा ढोंगी लोक आपण उपास करीत आहोत असे दाखवण्यासाठी दुःखी चेहरा करायचे किंवा आपले तोंड विरूप करायचे. परंतु, आपण उपास करत आहोत हे लोकांना दिसून येऊ नये म्हणून डोक्याला तेल लावावे आणि तोंड धुवावे असे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले कारण देव आपले अंतःकरण पाहतो. (मत्तय ६:१६-१८) आध्यात्मिक गोष्टींमध्ये पूर्ण लक्ष लागावे म्हणून काही वेळा ख्रिस्ती देखील उपास करत होते.—प्रेषितांची कृत्ये १३:२, ३.
हावभावांसोबत शब्दांनीही संताप, वैर, विटंबना, निंदा, तिरस्कार, थट्टा वगैरे भाव व्यक्त केले जात होते. तसेच चेहऱ्याचे हावभाव, डोके हलवणे किंवा हातवारे करणे, तोंडात मारणे, धूळ फेकणे आणि थैथै नाचल्यासारखे पाय आपटणे यांद्वारेही हे भाव व्यक्त केले जात होते. (यहेज्केल २५:६; स्तोत्र २२:७; सफन्या २:१५; मत्तय ५:३९; २ शमुवेल १६:१३) या गोष्टींनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचे, कडव्या शत्रूचे किंवा विरोधकाचे वाईट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात होता. ख्रिस्ती जण दुःख व्यक्त करू शकतात किंवा पाप केले असल्यास आपल्या वागणुकीतून शरम वाटत असल्याचे दाखवू शकतात. मात्र संतापून किंवा तिरस्काराने प्रतिक्रिया दाखवण्याचे ते नेहमी टाळतात.
मैत्री आणि आनंद दर्शवणे
बायबल काळात लोक अत्यंत स्नेहभावाने मैत्री दर्शवत होते. चुंबनाद्वारे मैत्री दर्शवली जात होती. गळ्यात गळा घालून चुंबन देऊन आणि रडून अधिक प्रेम दर्शवले जात होते. (उत्पत्ति ३३:४; प्रेषितांची कृत्ये २०:३७) येशू या पृथ्वीवर होता तेव्हा जेवताना टेकून बसण्याची रीत होती. अशा वेळी, दुसऱ्या व्यक्तीच्या उराशी टेकून बसण्याद्वारे त्या व्यक्तीशी आपली घनिष्ट मैत्री आहे किंवा त्या व्यक्तीची कृपा आपल्यावर आहे असे दाखवले जात होते. (योहान १३:२३, २५) या पद्धतीच्या आधारेच लूक १६:२२, २३ मधील दृष्टान्त देण्यात आला आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबत बसून त्याची भाकर खाणे मैत्री आणि परस्परातील शांतीचे सूचक होते. ज्याच्यासोबत असा संबंध आहे त्याला दगा देणे हा सर्वात मोठा विश्वासघात मानला जाई.—स्तोत्र ४१:९.
आनंद व्यक्त करण्यासाठी सहसा टाळ्या वाजवल्या जाई आणि संगीतावर नाच केला जात असे. कामाच्या वेळी, जसे की, द्राक्षांची कापणी करताना हर्षनादाने किंवा गाणी म्हणून आनंद व्यक्त केला जात किंवा आभारप्रदर्शन केले जाई. (स्तोत्र ४७:१; शास्ते ११:३४; यिर्मया ४८:३३) आज यहोवाच्या आनंदी सेवकांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय बंधूवर्गातील लोकांशी मैत्री असल्याचे कौतुक वाटते; शिवाय, ते ‘परमेश्वराविषयीच्या आनंदाला आपला आश्रयदुर्ग’ मानतात आणि देवाला उत्साहाने स्तुतीगीते गातात.
चालणे आणि धावणे
येथे ‘चालणे’ हे एक रूपक आहे; त्याचा अर्थ एखादे मार्गाक्रमण करणे असा होतो. उदाहरणार्थ, “नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:९) देवाबरोबर चालणाऱ्यांनी देवाच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन जगले आणि त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये याच अभिव्यक्तीचा उपयोग करून देवाचा सेवक होण्याआधीच्या आणि नंतरच्या दोन विरोधात्मक मार्गाक्रमणांचे वर्णन केले आहे. (इफिसकर २:२, १०) त्याचप्रमाणे, ‘धावणे’ हा शब्द देखील एखाद्या मार्गाक्रमणाला सूचित करण्यासाठी वापरला जातो. देवाने म्हटले की, यहुदाच्या संदेष्ट्यांना त्याने पाठवले नसताना ते “धावत सुटले”; अर्थात, त्यांना अधिकार नसताना त्यांनी खोटी भविष्यवाणी केली. ख्रिस्ती मार्गाक्रमणाला पौल ‘धावणे’ असे म्हणतो. त्याची तुलना तो एका शर्यतीशी करतो; जर एखाद्या व्यक्तीला बक्षीस मिळवायचे असेल तर तिला नियमांनुसार धावणे आवश्यक आहे.—यिर्मया २३:२१; १ करिंथकर ९:२४.
आपल्या हावभावांतून बरेच काही व्यक्त केले जाते. त्यामुळे आपल्या हावभावांतून राग आणि चीडचीड नव्हे तर आदर, नम्रता, मित्रत्व आणि आनंद नेहमी व्यक्त झाला पाहिजे. ‘देवाबरोबर चालत’ असताना आपण सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत ‘धावण्यास’ यशस्वी ठरू.