व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

केनियातील योग्य लोकांना शोधून काढणे

केनियातील योग्य लोकांना शोधून काढणे

केनियातील योग्य लोकांना शोधून काढणे

केनिया हा नैसर्गिकरीत्या समृद्ध प्रदेश आहे. दाट वनराई, विस्तृत खुली पठारे, तळपती वाळवंटे आणि बर्फाच्छादित डोंगरे, अशा वैविध्याने नटलेला हा देश आहे. येथील गवताळ व अरण्यमय प्रदेश दहा लाखांपेक्षा अधिक नू प्राण्यांनी आणि नामशेष होत चाललेल्या गेंड्यांनी गजबजलेला आहे. तुम्हाला जिराफांचा मोठा कळप चरत असताना देखील पाहायला मिळू शकतो.

इतकेच नव्हे तर, केनियात पक्षी देखील विपुल आहेत. आसमंतात भरारी मारणाऱ्‍या शक्‍तिशाली घारींपासून गोड व मंजूळ आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्‍या रंगीबेरंगी व नानाविध पक्ष्यांपर्यंतची येथे रेलचेल आहे. शिवाय, येथील हत्ती व सिंह यांना विसरून कसे चालेल? केनियातील हे दृश्‍य आणि आवाज अविस्मरणीय आहेत.

पण या नयनरम्य प्रदेशात आणखी एक आवाज आपल्याला ऐकू येतो. आशेचा संदेश सांगणाऱ्‍या हजारो लोकांचा आवाज. (यशया ५२:७) ४० पेक्षा अधिक जातीच्या व भाषेच्या लोकांपर्यंत हा आवाज पोहंचवला जात आहे. म्हणून, केनिया हा आध्यात्मिकदृष्ट्या देखील समृद्ध प्रदेश आहे.

केनियातील बहुतेक लोक धार्मिक असल्यामुळे आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करायला त्यांना आवडते. पण येथे एक समस्या आहे. इतर देशांप्रमाणे केनियातली परिस्थितीही आता बदलत असल्यामुळे लोकांना घरी भेटणे कठीण होऊन बसले आहे.

कठीण आर्थिक परिस्थितींमुळे अनेकांना आपल्या दररोजच्या जीवनात फेरबदल करावे लागले आहेत. घरात राहून चूल आणि मूल सांभाळणाऱ्‍या स्त्रियांना आता कार्यालयांमध्ये कामाला जावे लागते किंवा रस्त्यावर फळे, भाजीपाला, मासळी, हाताने विणलेल्या टोकऱ्‍या विकत बसावे लागते. पुरुषांना आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्याकरता उशिरापर्यंत परिश्रमाची कामे करावी लागतात. लहान मुलेही आपल्या चिमुकल्या हातांमध्ये भाजलेल्या शेंगा व उकडलेल्या अंड्यांची पाकीटे घेऊन विकताना दिसतात. त्यामुळे दिवसा फार कमी लोक आपल्याला घरी भेटतात. म्हणूनच, सुवार्तेची घोषणा करणाऱ्‍या बंधूभगिनींना या परिस्थितीनुरूप काही फेरबदल करावे लागले.

यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील बांधवांना घराबाहेर काम करणाऱ्‍या आणि दररोजच्या कामासाठी ये-जा करणाऱ्‍या लोकांवर तसेच मित्रजनांवर, नातेवाईकांवर, व्यावसायिकांवर आणि कामाच्या ठिकाणच्या सहकर्मचाऱ्‍यांवर आपले लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. बांधवांनी हा सल्ला लागू केला. जेथे कोठे त्यांना लोक भेटले तेथे ते त्यांच्याशी बोलू लागले. (मत्तय १०:११) त्यांच्या प्रयत्नाला काही यश आले का? होय. यासाठी खालील उदाहरणे पाहा.

आपल्या अगदी जवळचे शेजारी—नातेवाईक

केनियाची राजधानी असलेल्या नायरोबीची लोकसंख्या सुमारे ३० लाख इतकी आहे. या शहराच्या पूर्वेकडे सैन्यातील एक निवृत्त मेजर राहत असत. त्यांना यहोवाचे साक्षीदार मुळीच आवडत नव्हते. आणि त्यात त्यांचा स्वतःचा मुलगा यहोवाचा साक्षीदार होता. एकदा, फेब्रुवारी महिन्यात ते १६० किलोमीटर प्रवास करून नाकुरूच्या रिफ्ट व्हॅली शहरात राहणाऱ्‍या आपल्या मुलाच्या घरी सुटीसाठी गेले. त्यादरम्यान त्यांच्या मुलाने त्यांना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान * हे पुस्तक बक्षीस म्हणून दिले. त्यांनी ते घेतले आणि आपल्या घरी परतले.

घरी आल्यावर त्यांनी ते पुस्तक आपल्या पत्नीला दिले. त्यांची पत्नी ते पुस्तक वाचू लागली. हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेले आहे याची तिला जराही कल्पना नव्हती. या पुस्तकातील बायबल सत्याचा हळूहळू तिच्या मनावर प्रभाव पडू लागला. ती आपल्या नवऱ्‍याला वाचलेल्या गोष्टी सांगू लागली. उत्सुकतेपोटी त्यांनीही ते पुस्तक वाचायला सुरवात केली. पण जेव्हा त्यांना कळाले की ते पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले होते तेव्हा जणू त्यांचे डोळे उघडले. आपल्याला आतापर्यंत यहोवाच्या साक्षीदारांविषयी खोटी माहिती देण्यात आली होती हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच स्थानीय साक्षीदारांशी संपर्क साधला आणि बायबलचा अभ्यास सुरू केला. पुस्तक वाचत असताना त्यांना कळाले होते, की तंबाखूचा वापर करणे किंवा ती विकणे देखील चुकीचे आहे. (मत्तय २२:३९; २ करिंथकर ७:१) मागे पुढे न पाहता त्यांनी लगेच आपल्या दुकानातील सर्व सिगारेट पाकीटे नष्ट केली. त्यानंतर काही महिन्यांनी ते बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनले आणि एका प्रांतीय अधिवेशनात त्यांनी बाप्तिस्माही घेतला.

कचऱ्‍यातून मिळते धन

प्रमुख जिल्ह्याच्या काही भागांमध्ये, लाखो लोकांच्या वस्त्या वर येत आहेत. माती, लाकूड, धातूचे तुकडे किंवा लोखंडी पत्रे यांनी बनवलेल्या चाळीच चाळी येथे पाहायला मिळतात. कारखान्यांमध्ये आणि कंपन्यांमध्ये काम कमी असते तेव्हा लोक घरच्या घरी काही तरी बनवून विकतात. रखरखत्या उन्हात काम करणाऱ्‍या लोकांना स्वाहिली भाषेत जुआ काली म्हटले जाते. हे लोक कारच्या जुन्या टायरपासून चपला किंवा फेकून दिलेल्या पत्र्याच्या डब्यांपासून रॉकेलचे दिवे बनवतात. काही लोक, उकिरड्यातील किंवा कचरा पेटीतील कागद, पत्र्याचे डबे आणि बाटल्या गोळा करतात. या वस्तूंवर पुन्हा प्रक्रिया करून त्या वापरल्या जातात.

पण या कचऱ्‍यातून धन मिळू शकते का? होय मिळू शकते. एक बांधव याविषयी असे म्हणतो: “एकदा, आमच्या संमेलन गृहाच्या मैदानात एक दणकट पण गबाळा आणि मवाली दिसणारा एक मनुष्य पाठीवर रद्दीने भरलेले प्लास्टिकचे पोते घेऊन आला. आपले नाव विल्यम असल्याचे सांगितल्यावर त्याने मला विचारले: ‘तुमच्याकडे टेहळणी बुरूजचे अलीकडचे अंक आहेत का?’ मी दोन मिनिटं घाबरून गेलो. त्यानं माझ्याकडे ही मासिकं का मागितली असावीत असा मी विचार करू लागलो. मी त्याला पाच प्रती दाखवल्या. त्याने प्रत्येक प्रत पाहिली आणि म्हणाला: ‘मी सगळेच अंक घेतो.’ मला खूप आश्‍चर्य वाटलं. मी माझ्या खोलीत गेलो आणि तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक घेऊन बाहेर आलो. * मी त्याला परादीसचं चित्र दाखवलं आणि सांगितलं, की आम्ही लोकांबरोबर विनामूल्य बायबलचा अभ्यास करतो. पुढे मी त्याला म्हणालो: ‘विल्यम, तू जर उद्या आलास तर आपण लगेच अभ्यास सुरू करू शकतो. चालेल?’ आणि तो खरंच दुसऱ्‍या दिवशी आला!

“एके रविवारी तो पहिल्यांदा सभेला आला. मी त्या दिवशी जाहीर भाषण देत होतो. मी स्टेजवरून विल्यमला आत येताना पाहिले. आत आल्यावर त्याने श्रोत्यांकडे पाहिलं मग माझ्याकडे पाहिलं आणि सभागृहातून तडक बाहेर निघून गेला. नंतर मी त्याला याचं कारण विचारलं. तो इतका ओशाळला, त्यानं मला सांगितलं, की ‘सभागृहात मी लोकांना पाहिलं, ते किती स्वच्छ दिसत होते, मला स्वतःची खूप लाज वाटली म्हणून मी बाहेर गेलो.’

“विल्यम जसजसा बायबलचा अभ्यास करत गेला तसतसे सत्यामुळे त्याच्या जीवनात परिवर्तन होऊ लागले. त्याने आपले केस कापले आणि आंघोळ करून स्वच्छ नीट कपडे घालून तो सभांना नियमित उपस्थित राहू लागला. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा आम्ही त्यातून अभ्यास करू लागलो. पण तोपर्यंत त्याने ईश्‍वरशासित प्रशालेत दोनदा भाषण दिले होते आणि तो बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनला होता. खास संमेलन दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला तेव्हा मला खूप आनंद झाला कारण आता तो माझा आध्यात्मिक बांधव झाला होता!”

पण विल्यमने सर्वात पहिल्यांदा टेहळणी बुरूज मासिक कोठे पाहिले होते? तो म्हणतो: “मला कचऱ्‍याच्या पेटीत टेहळणी बुरूज मासिकाचे काही अंक मिळाले.” होय, एका अजब मार्गाने त्याला सत्याचा खजिना मिळाला होता!

कामाच्या ठिकाणी साक्षकार्य

आपल्या कामाच्या ठिकाणी अनौपचारिक साक्ष देण्यासाठी आपण नेहमी संधी शोधत असतो का? नायरोबीच्या एका मंडळीतील एक वडील ज्यांचे नाव जेम्स आहे त्यांना अशाच प्रकारे बायबलमधील सत्य मिळाले होते. आणि आता जेम्स इतरांना सत्य शिकवण्यासाठी याच पद्धतीचा अगदी कुशलपणे उपयोग करतात. उदाहरणार्थ, एकदा बंधू जेम्सने त्यांच्याबरोबर काम करणाऱ्‍या एका मनुष्याला कार्यालयात येताना पाहिले. या मनुष्याने त्याच्या शर्टवर एक बॅज लावला होता. त्या बॅजवर “जिझस सेव्स” (येशू तारतो) असे लिहिले होते. सुवार्तिक फिलिप्पाचे अनुकरण करीत बंधू जेम्सने त्या मनुष्याला विचारले: “बॅजवर लिहिलेल्या शब्दांचा नेमका काय अर्थ होतो हे तुला ठाऊक आहे का?” (प्रेषितांची कृत्ये ८:३०) या प्रश्‍नामुळे या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. कालांतराने त्या मनुष्याबरोबर बायबलचा अभ्यास देखील सुरू करण्यात आला. त्याने नंतर बाप्तिस्माही घेतला. बंधू जेम्सकडे आणखी काही अनुभव आहेत का? आपण त्यांनाच विचारू या:

“टॉम आणि मी एकाच कंपनीत कामाला होतो आणि कंपनीच्या एकाच बसनं कामाला जायचो. एकदा असं झालं, की आम्ही दोघं शेजारी शेजारी बसलो. मी आपल्या संस्थेचं एक पुस्तक वाचत बसलो आणि टॉमला दिसेल अशाप्रकारे ते पुस्तक धरलं. मी विचार केल्याप्रमाणे टॉमही ते पुस्तक वाचू लागला. मी लगेच त्याच्या हातात ते पुस्तक दिलं. त्याला त्यातील मजकूर खूप आवडला आणि तो बायबलचा अभ्यास करायला तयार झाला. आता तो आणि त्याची पत्नी यहोवाचे बाप्तिस्मा प्राप्त सेवक आहेत.”

बंधू जेम्स पुढे म्हणतात: “कंपनीत जेवणाच्या सुटीत पुष्कळदा लोकांबरोबर माझ्या चर्चा होतात. अशाच सुट्यांमध्ये मी एफ्राईम आणि वॉल्टर यांना वेगवेगळ्या दिवशी भेटलो होतो. दोघांनाही मी साक्षीदार असल्याचे माहीत होते. लोकांना यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध इतका राग का होता हे एफ्राईमला जाणून घ्यायचे होते. तसेच साक्षीदारांमध्ये आणि इतर धर्मांमध्ये कोणता फरक होता हे वॉल्टरला जाणून घ्यायचे होते. मी त्यांना शास्त्रवचनांमधून त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली तेव्हा दोघेही खूप खूष झाले आणि बायबलचा अभ्यास करायला तयार झाले. एफ्राईमने जलद प्रगती केली. कालांतराने त्याने व त्याच्या पत्नीने यहोवाला आपले जीवन समर्पित केले. आता एफ्राईम मंडळीत एक वडील आहे आणि त्याची पत्नी सामान्य पायनियर आहे. पण वॉल्टरला इतका विरोध होऊ लागला की, त्याने अभ्यास थांबवून अभ्यासाचे पुस्तकच चक्क फेकून दिले. मी मात्र त्याला उत्तेजन देत राहिलो. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा अभ्यास सुरू केला. आणि आता तोही मंडळीत वडील या नात्याने सेवा करत आहे.” बंधू जेम्सनी कामाच्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतल्यामुळे ते ११ लोकांना खरे ख्रिस्ती बनण्यासाठी मदत करू शकले.

आश्‍चर्यकारक परिणाम

व्हिक्टोरिया सरोवराच्या किनाऱ्‍यावर वसलेल्या एका गावात, काही मित्रजन व नातेवाईक एका अंत्यविधीसाठी जमले होते. त्यांच्यापैकी एक वृद्ध गृहस्थ यहोवाचे साक्षीदार होते. ते डॉली नावाच्या एका शिक्षिकेजवळ गेले आणि त्यांनी तिला मृतांच्या स्थितीविषयी आणि मृत्यूला कायमचे काढून टाकण्याच्या यहोवाच्या उद्देशाविषयी सांगितले. डॉलीला आवड असल्याचे पाहून ते तिला म्हणाले: “तू तुझ्या घरी जाशील तेव्हा आमचे मिशनरी तुझ्याकडे येतील आणि तुला बायबलमधून शिकवतील.”

डॉली ज्या शहरात राहते ते केनियातील तिसरे मोठे शहर आहे. त्यावेळी तेथे फक्‍त चार मिशनरी सेवा करत होते. त्या वृद्ध बांधवाने खरे तर कोणाही मिशनरीला डॉलीची भेट घ्यायला सांगितले नव्हते. त्यांना पूर्ण खात्री होती की एक ना एक दिवशी डॉलीला मिशनरी भेटतीलच. आणि खरोखरच एकदा एक मिशनरी बहीण डॉलीला भेटली व तिने तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. सध्या डॉलीचा बाप्तिस्मा झालेला आहे. तिच्या लहान मुलीने ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आपले नाव दाखल केले आणि तिच्या दोन मुलांनीही बाप्तिस्मा घेतला. पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहण्याचाही सुहक्क डॉलीला मिळाला.

होणाऱ्‍या वाढीसाठी तरतूद करणे

अनौपचारिक साक्ष देण्यावर जोर दिल्यानंतर केनियामध्ये हजारो लोकांना सुवार्ता ऐकण्याची संधी मिळाली आहे. आता १५,००० पेक्षा अधिक प्रचारक या सर्वात महत्त्वपूर्ण कामात व्यस्त आहेत. आणि गेल्या वर्षी ४१,००० पेक्षा अधिक लोक ख्रिस्ताच्या स्मारक विधीसाठी उपस्थित होते. केनियातील सर्व मंडळ्यांत, राज्य प्रचारकांच्या दुप्पट संख्येने लोक सभांना उपस्थित असतात. यामुळे आणखी राज्य सभागृह बांधण्याची गरज भासली आहे.

प्रमुख शहरांमध्ये आणि दूरवरच्या भागांतही राज्य सभागृहे बांधली जात आहेत. यांतील एक सभागृह नायरोबीच्या ईशान्येकडे ३२० किलोमीटर दूर असलेल्या सांबुरू शहरात बांधण्यात आले. १९३४ मध्ये त्या शहराला सांबुरू भाषेत “मारालाल” म्हणजे “चमकणारे” असे नाव पडले. तेथे सर्वात पहिल्यांदा लोखंडी पत्र्याचे छत असलेली इमारत बांधण्यात आली होती. हा पत्रा उन्हात चमकायचा म्हणून त्या शहराला हे नाव पडले होते. बासष्ठ वर्षांनंतर मारालालमध्ये लोखंडी पत्र्याचे छत असलेली आणखी एक इमारत बांधण्यात आली. ही इमारतही “चमकते” व “चकाकते” कारण हे खऱ्‍या उपासनेचे ठिकाण आहे.

केनियाच्या या दूरवरच्या भागात पहिले राज्य सभागृह बांधण्यासाठी १५ प्रचारकांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्याजवळ पैसाही कमी असल्यामुळे बांधवांना त्या ठिकाणी मिळणाऱ्‍या साहित्यांवरच अवलंबून राहावे लागले. त्यांनी कूडाच्या भिंती बांधून पुढून व मागून त्यांना लाल मातीच्या चिखलाने लिंपले. आणि मग शेण व राखेच्या मिश्रणाने या भिंती सारवून सपाट केल्या. या भिंती मजबूत व पक्क्या असतात आणि खूप वर्ष टिकतात.

इमारतीसाठी लागणारे वासे मिळवण्यासाठी बांधवांना जंगलातून झाडे तोडण्याची परवानगी घ्यावी लागली. शिवाय सर्वात जवळचे जंगल सुमारे दहा किलोमीटर दूर होते. बंधूभगिनींना जंगलापर्यंत चालत जावे लागले, झाडे तोडावी लागली, तोडलेल्या झाडाच्या फांद्या, पाने छाटावी लागली आणि मग जेथे बांधकाम केले जाणार होते तेथे सर्व लाकडे उचलून आणावी लागली. जंगलातून येत असताना पोलिसांनी बांधवांना अडवले व म्हटले की झाडे तोडण्यासाठी त्यांनी मिळवलेला परवाना योग्य नव्हता. पोलिसांनी एका खास पायनियरला सांगितले, की झाडे तोडल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात येत आहे. मग समाजामध्ये आणि पोलिसांनाही चांगली परिचित असलेली एक स्थानीय बहीण पुढे आली आणि म्हणाली: “तुम्ही जर आमच्या बांधवाला अटक करत असाल तर त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना तुम्हाला अटक करावी लागेल कारण आम्ही सर्वांनीच झाडे तोडली आहेत.” हे ऐकल्यावर पोलिस अधिकाऱ्‍याने सर्वांना जाऊ दिले.

जंगलात पुष्कळ हिंस्र प्राणी देखील असल्यामुळे या बांधवांना अतिशय सावधगिरी बाळगावी लागली. एकदा एका बहिणीने एक झाड तोडले व ते जमिनीवर कोसळत असताना तिने कोणत्यातरी प्राण्याला उडी मारून पळून जाताना पाहिले. त्या प्राण्याचा पिवळसर तपकिरी रंग पाहिल्यावर तिला वाटले की ते हरीण असावे. पण प्राण्याच्या पायांचे ठसे पाहिल्यावर तिला समजले की तो प्राणी हरीण नसून सिंह होता! इतके धोके असूनही बांधवांनी राज्य सभागृह बांधले आणि आज ते यहोवाच्या स्तुतीचे “चमकणारे” स्थान आहे.

फेब्रुवारी १, १९६३ हा दिवस केनियाच्या ईश्‍वरशासित इतिहासाचा एक महत्त्वाचा दिवस होता. या दिवशी, पहिल्या शाखा दफ्तराचे उद्‌घाटन करण्यात आले. हे शाखा दफ्तर ८० चौरस फूट आकाराची एकच खोली होती. ऑक्टोबर २५, १९९७ रोजी केनियाच्या ईश्‍वरशासित इतिहासातील दुसरा महत्त्वाचा दिवस होता. ८४,८०० चौरस फूटच्या नवीन बेथेल कॉम्प्लेक्सचा तो समर्पण दिन होता! तीन वर्षांच्या मेहनतीनंतर तेथे एक सुंदरसे बेथेल गृह उभारण्यात आले. २५ विविध देशांहून आलेल्या स्वयंसेवकांनी, जंगली गवताने भरलेल्या ७.८ एकर ओल्या जमिनीचे रूपांतर एका सुंदर बागेत केले. सध्या या नवीन शाखा दफ्तरात ८० लोक बेथेल परिवाराचे सदस्य आहेत.

यहोवाने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल आपण आनंद व्यक्‍त करू शकतो. आपल्या सेवकांना, त्यांची अंतःकरणे विशाल करण्यास आणि केनियातील योग्य लोकांना शोधून काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यास त्यांना प्रेरित केल्याबद्दल आपण यहोवाचे आभार मानू या. हेच तर केनियाच्या आध्यात्मिक समृद्धतेचे कारण आहे!

[तळटीपा]

^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.