व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांची खरी हकीकत

मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांची खरी हकीकत

मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांची खरी हकीकत

सुमारे पन्‍नास वर्षांआधी, एका बेडुइन मेंढपाळाने एका गुहेत असाच एक दगड फेकला. आणि २० व्या शतकातला सर्वात मोठा पुरातनवस्तुशास्त्रीय शोध सुरू झाला. तो कसा? गुहेच्या आत मातीचे मडके फुटल्याचा आवाज ऐकू आला. काय झाले हे पाहायला तो आत गेला तर त्याला काही गुंडाळ्या सापडल्या; त्या गुंडाळ्या मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांचा पहिला संग्रह होता.

यागुंडाळ्यांवरून विद्वानांमध्ये आणि प्रसारमाध्यमात पुष्कळ चर्चा आणि वादविवाद झाले. जनसामान्यांमध्ये गोंधळ आणि चुकीचे ग्रह पसरले. या गुंडाळ्यांमध्ये ख्रिश्‍चनांचा आणि यहुद्यांचा विश्‍वास कमकुवत करणाऱ्‍या गोष्टी आहेत अशा भीतीपोटी पुष्कळशा गुंडाळ्यांमधील माहिती लपवून ठेवली आहे असे म्हटले जाते. परंतु, या गुंडाळ्यांचे खरे महत्त्व काय आहे? आज, पन्‍नास वर्षांनंतर नेमकी वस्तुस्थिती जाणणे शक्य आहे का?

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या काय आहेत?

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या, प्राचीन यहुदी हस्तलिखिते आहेत; यांतल्या बहुतेक इब्री भाषेत, काही अरेमिकमध्ये तर काही ग्रीकमध्ये लिहिलेल्या आहेत. यांतल्या पुष्कळशा गुंडाळ्या आणि तुकडे २,००० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे आहेत, म्हणजे त्या येशूच्या जन्माआधीच्या आहेत. बेडुइन लोकांकडून प्राप्त केलेल्या पहिल्या गुंडाळ्यांमध्ये सात लांबलचक हस्तलिखिते आहेत; ही सगळी हस्तलिखिते नष्ट होण्याच्या मार्गावर होती. इतर गुहांमध्ये शोधल्यावर आणखी गुंडाळ्या आणि त्यांचे हजारो तुकडे सापडले. १९४७ आणि १९५६ या वर्षांदरम्यान, मृत समुद्राजवळ कुमरानच्या परिसरातील ११ गुहांमध्ये गुंडाळ्या सापडल्या.

सर्व गुंडाळ्या आणि त्यांचे तुकडे वेगवेगळे केल्यावर सुमारे ८०० हस्तलिखितांचे भाग उघडकीस आले. त्यांपैकी एक चतुर्थांश किंवा २०० हून अधिक हस्तलिखिते बायबलच्या इब्री भाषेतल्या लिखाणाच्या प्रती आहेत. बाकीची हस्तलिखिते, बायबलचा भाग नसलेली प्राचीन यहुदी लिखाणे आहेत; त्यांच्यात अपॉक्रिफा आणि सूडेपिग्राफा यांचाही समावेश आहे. *

ज्या गुंडाळ्यांमधील लिखाणे पूर्वी अज्ञात होती त्या गुंडाळ्यांमध्ये विद्वानांना जास्त रस होता. त्यामध्ये, यहुदी नियमाचे स्पष्टीकरण, कुमरानमधील पंथाचे सामाजिक नियम, उपासना गीत आणि प्रार्थना तसेच बायबल भविष्यवाणीची पूर्णता व शेवटले दिवस यांबद्दल मत व्यक्‍त करणारी लिखाणे होती. त्यात एकदम वेगळ्या पद्धतीने बायबलवर केलेली भाष्ये देखील होती. बायबलच्या प्रत्येक वचनावर आधुनिक काळातल्या भाष्यांची ही सर्वात प्राचीन उदाहरणे आहेत.

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या कोणी लिहिल्या?

प्राचीन लिखाणांना तारखा देण्याच्या विविध पद्धतींवरून दिसून येते की, सा.यु.पू. तिसऱ्‍या शतकापासून सा.यु. पहिल्या शतकापर्यंतच्या कालावधीत एकतर नकलाकारांनी या गुंडाळ्यांच्या प्रती तयार केल्या होत्या किंवा त्या तेव्हाच लिहिण्यात आल्या होत्या. काही विद्वानांचे म्हणणे आहे की, सा.यु. ७० मध्ये जेरूसलेमच्या मंदिराचा नाश होण्याआधी यहुद्यांनी या गुंडाळ्या तेथून आणून गुहांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. परंतु, गुंडाळ्यांमधील माहितीवरून हे दिसून येत नाही असे संशोधन करणाऱ्‍या बहुतांश विद्वानांना वाटते. पुष्कळ गुंडाळ्यांमध्ये जेरूसलेममधील धार्मिक अधिकारी वर्गाच्या विरोधात मांडलेली मते आणि चालीरीती आढळतात. त्या गुंडाळ्यांमध्ये खास एका समाजाविषयी सांगितले आहे जो मानत होता की, देवाने जेरूसलेममधील याजकवर्गाला आणि मंदिरातील सेवेला झिडकारले होते आणि त्यांच्या अर्थात त्या गटाच्या (वाळवंटातील) उपासनेला मंदिरातील पर्यायी सेवा मानले होते. अशा गुंडाळ्या असलेला संग्रह जेरूसलेम मंदिराच्या अधिकाऱ्‍यांनी लपवून ठेवला असावा याची फार कमी शक्यता आहे.

कुमरान येथे अनेक नकलाकार असले तरीही बहुतेक गुंडाळ्या इतर ठिकाणांहून गोळा करून कुमरानमध्ये त्या पंथाच्या अनुयायांनी आणल्या असाव्यात. मृत समुद्रातल्या गुंडाळ्या जणू एक मोठे पुस्तकालयच आहे. सहसा कोणत्याही पुस्तकालयातील पुस्तकांमधील विचार एकसारखे नसतात; शिवाय, त्या पुस्तकांमधील विचार वाचकांच्या धार्मिक विचारांशी जुळतीलच असे नसते. परंतु, एकाहून जास्त प्रती असलेल्या मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांमधील विचार त्या गटाच्याच विशिष्ट आचार-विचारांशी आणि विश्‍वासांशी अधिककरून जुळतात.

कुमरानमधील हे लोक एसेनी होते का?

या गुंडाळ्या कुमरान येथील होत्या तर मग तेथे कोण राहत होते? प्राध्यापक एलीएझर सुकेनिक (ज्यांनी १९४७ मध्ये जेरूसलेम येथील हिब्रू विद्यापीठासाठी तीन गुंडाळ्या प्राप्त केल्या होत्या) यांनी सर्वप्रथम असे मत मांडले की या गुंडाळ्या एसेनी लोकांच्या होत्या.

एसेनी लोक यहुदी पंथाचे सदस्य होते; त्यांचा उल्लेख, जोसीफस, ॲलेझांड्रियाचा फायलो आणि प्लायनी एल्डर या पहिल्या शतकातील लेखकांनी केला होता. एसेनी पंथाची सुरवात कशी झाली ते सांगणे शक्य नाही पण सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकात मक्काबी लोकांनी विद्रोह केल्यावर निर्माण झालेल्या उठावाच्या काळात हा पंथ निर्माण झाला असावा असे दिसते. * ते त्या काळातले होते याविषयी जोसीफसने लिहिले; एवढेच नव्हे तर, परुशी आणि सदुक्यांपेक्षा त्यांची धार्मिक मते कशाप्रकारे वेगळी होती याबद्दलही त्याने सविस्तर लिहिले. एसेनी लोकांचा एक समाज जेरीको आणि एन-गेद्दीदरम्यान मृत समुद्राजवळ होता असा उल्लेख प्लायनीने आपल्या लिखाणात केला आहे.

प्राध्यापक जेम्स वॉन्डरकॅम हे मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांचे विद्वान म्हणतात, “कुमरान येथे राहणाऱ्‍या एसेनी लोकांची वसाहत एका मोठ्या एसेनी चळवळीचा केवळ एक लहान भाग होता”; त्या चळवळीत सुमारे चार हजार लोक सामील होते असे जोसीफसने म्हटले. कुमरान येथे सापडलेल्या लिखाणांमधील वर्णनाशी एसेनी लोक हुबेहूब जुळत नसले तरी त्या काळातल्या इतर कोणत्याही ज्ञात यहुदी गटापेक्षा तेच त्या वर्णनाशी जास्त जुळतात.

काही जणांचा असा दावा आहे की, ख्रिस्ती धर्माची सुरवात कुमरान येथेच झाली. परंतु, कुमरानी पंथी आणि प्रारंभिक ख्रिस्ती यांच्या धार्मिक विश्‍वासात बरीच तफावत आढळते. कुमरानी लिखाणांमध्ये शब्बाथाचे नियम आणि विधीपूर्वक शुद्धता पाळण्यावर खूपच जास्त जोर देण्यात आला आहे. (मत्तय १५:१-२०; लूक ६:१-११) समाजाशी फारसे संबंध न ठेवणे, नशीबावरील विश्‍वास, आत्म्याच्या अमरत्वाची शिकवण, ब्रह्‍मचर्य, देवदूतांबरोबर त्यांच्या उपासनेत भाग घेण्यासारख्या अलौकिक कल्पना या गोष्टींवरही ते जरा जास्तच भर देत होते. यावरून, येशूच्या शिकवणींशी आणि प्रारंभिक ख्रिश्‍चनांच्या शिकवणींशी त्यांचे साम्य नव्हते हे दिसून येते.—मत्तय ५:१४-१६; योहान ११:२३, २४; कलस्सैकर २:१८; १ तीमथ्य ४:१-३.

कोणत्याही गुंडाळ्या लपवलेल्या नाहीत

मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांचा शोध लागल्यानंतरच्या वर्षांमध्ये, त्यांच्यासंबंधी बरीच पुस्तके छापण्यात आली ज्यामुळे जगभरातल्या विद्वानांना पहिल्या संशोधनात मिळालेल्या गुंडाळ्या मिळवता आल्या. परंतु, गुहा ४ मध्ये सापडलेल्या गुंडाळ्यांचे तुकडे उपलब्ध नव्हते. हे तुकडे, पूर्व जेरूसलेमच्या (त्या वेळी जॉर्डनचा भाग असलेल्या) पॅलेस्टाईन पुरातनवस्तुशास्त्रीय संग्रहालयातील आंतरराष्ट्रीय विद्वानांच्या लहानशा गटाकडे होते. त्या गटात यहुदी किंवा इस्राएली विद्वान नव्हते.

आपल्या संशोधनाचा निकाल जाहीर करेपर्यंत गुंडाळ्या कोणालाही देऊ नयेत असे त्या गटाने ठरवले होते. आणि मोजक्याच विद्वानांना गटात सामील केले होते. त्यांच्यातला कोणी मरण पावला तर त्याच्या जागी फक्‍त एक नवीन विद्वान घ्यायचा असा त्यांचा नियम होता. परंतु, त्यांनी हाती घेतलेले काम पाहता अधिक विद्वानांची गरज होती. शिवाय, काही वेळा, इब्री आणि अरेमिक भाषा चांगल्या अवगत असलेल्या तज्ज्ञांची गरज होती. जेम्स वॉन्डरकॅम यांनी म्हटले: “हजारो हजार तुकड्यांवर काम करणे हे फक्‍त आठ विद्वानांचे काम नव्हे; मग ते विद्वान किती कुशल असले तरीही.”

एकोणीसशे सदुसष्ट सालाच्या सहा दिवसांच्या युद्धानंतर पूर्व जेरूसलेम आणि तेथील गुंडाळ्या इस्राएलच्या ताब्यात आल्या; परंतु, संशोधन गटात काहीच बदल करण्यात आला नाही. पुष्कळ वर्षे होऊन गेली, दशके उलटली तरीही गुहा ४ मधील गुंडाळ्यांचे प्रकाशन होईना तेव्हा मात्र अनेक विद्वानांनी आवाज उठवला. १९७७ मध्ये, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक गेझा व्हर्मेस यांनी म्हटले की, २० व्या शतकातले शैक्षणिक क्षेत्रात कधीच घडले नाही असे हे प्रकरण होते. या गुंडाळ्यांमध्ये ख्रिस्ती धर्माला विघातक ठरणारी माहिती असल्यामुळे कॅथलिक चर्च मुद्दामहून या गुंडाळ्या लपवून ठेवायचा प्रयत्न करत आहे अशा अफवा पसरू लागल्या.

सरतेशेवटी, १९८० च्या दशकात त्या गटात एकूण २० विद्वान सामील झाले. मग, १९९० मध्ये जेरूसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील इमॅन्यूएल टोव्ह या नवीनच नियुक्‍त केलेल्या उपसंपादकाच्या निदर्शनाखाली, गटाच्या एकूण सदस्यांची संख्या ५० हून अधिक करण्यात आली. विद्वानांच्या टिपा असलेल्या बाकीच्या गुंडाळ्यांचे प्रकाशन करण्यासाठी एक खास आराखडा तयार करण्यात आला.

सन १९९१ मध्ये एक अनपेक्षित प्रगती झाली. प्रथम, प्रकाशित न झालेल्या मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांची प्राथमिक आवृत्ती (इंग्रजी) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संशोधकांच्या गटाजवळ असलेल्या शब्दसूचीच्या एका प्रतीवरून कम्प्युटरच्या साहाय्याने हे सगळे एकत्र करण्यात आले. त्यानंतर, कॅलिफोर्नियाच्या सॅन मरिनो येथील हंटिंग्टन संग्रहालयाने घोषणा केली की, त्यांनी काढलेल्या गुंडाळ्यांच्या फोटोंचा संपूर्ण संच कोणत्याही विद्वानाला उपलब्ध करून दिला जाईल. लवकरच, मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांची हुबेहूब नक्कल (इंग्रजी) या पुस्तकात आधी प्रकाशित न झालेल्या गुंडाळ्यांचे फोटो सहजपणे उपलब्ध करून देण्यात आले.

त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून, मृत समुद्रातल्या सर्व गुंडाळ्या परीक्षणासाठी उपलब्ध केल्या गेल्या आहेत. परीक्षणावरून दिसून येते की, कोणत्याही गुंडाळ्या लपवून ठेवलेल्या नाहीत. गुंडाळ्यांच्या अखेरच्या अधिकृत आवृत्ती प्रकाशित होत असल्यामुळे यानंतरच त्यांचे संपूर्ण परीक्षण सुरू होईल. या गुंडाळ्यांचे परीक्षण करणाऱ्‍या विद्वानांचा नवीन गट बनला आहे. पण हे संशोधन बायबल विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचे का आहे?

[तळटीपा]

^ अपॉक्रिफा (शब्दशः अर्थ, “लपलेले”) आणि सूडेपिग्राफा (शब्दशः अर्थ, “खोटी लिखाणे”) ही सा.यु.पू. तिसऱ्‍या शतकापासून सा.यु. पहिल्या शतकादरम्यान लिहिण्यात आलेली यहुदी लिखाणे आहेत. रोमन कॅथलिक चर्चमध्ये, अपॉक्रिफाच्या लिखाणांना, बायबलच्या प्रेरित पुस्तकांचा भाग म्हणून स्वीकारले जाते पण यहुदी आणि प्रोटेस्टंट या लिखाणांना स्वीकारत नाहीत. सूडेपिग्राफाची बहुतेक लिखाणे बायबलच्या कहाण्यांमध्ये भर घालून लिहिलेली आहेत आणि त्यांना बायबलमधील प्रसिद्ध व्यक्‍तींची नावे दिली आहेत.

^ “मक्काबी कोण होते?” हा टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १५, १९९८, पृष्ठे २१-४ वरील लेख पाहा.

[३ पानांवरील चित्र]

मृत समुद्राजवळच्या या काही गुहांमध्ये प्राचीन गुंडाळ्या सापडल्या

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

गुंडाळीचा तुकडा: पृष्ठे ३, ४ आणि ६: Courtesy of Israel Antiquities Authority

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of Shrine of the Book, Israel Museum, Jerusalem