व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या का असाव्यात?

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या का असाव्यात?

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या का असाव्यात?

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या सापडण्याआधी, सर्वात जुनी हस्तलिखिते ही सा.यु. नवव्या आणि दहाव्या शतकांतील इब्री शास्त्रवचनांची होती. इब्री शास्त्रवचनांचे लिखाण पूर्ण होऊन एक हजारहून अधिक वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे ही हस्तलिखिते देवाच्या वचनातली तंतोतंत माहिती देण्याबाबतीत विश्‍वसनीय आहेत असे म्हणता येऊ शकते का? मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांच्या आंतरराष्ट्रीय संपादकीय गटातील एक सदस्य, प्राध्यापक हुल्यो ट्रिबोले बरीरा म्हणतात: “बायबलमधील जी वचने लिहून काढायला यहुदी नकलाकारांना हजार वर्षांहून अधिक वर्षे लागली ती पूर्णपणे विश्‍वसनीय आहेत आणि काळजीपूर्वक उतरवून काढण्यात आली आहेत असा पक्का पुरावा [कुमरान येथील] यशयाच्या गुंडाळीतून प्राप्त होतो.”

बरीरा यांनी ज्या गुंडाळीचा उल्लेख केला आहे त्यात यशयाचे संपूर्ण पुस्तक सामावलेले आहे. आतापर्यंत, कुमरान येथे सापडलेल्या २०० हून अधिक बायबल हस्तलिखितांमध्ये एस्तेरचे पुस्तक वगळता इब्री शास्त्रवचनांतील प्रत्येक पुस्तकाचे फक्‍त भाग सापडले आहेत. यशयाच्या पुस्तकाची जशी संपूर्ण गुंडाळी सापडली आहे तशा संपूर्ण गुंडाळ्या बहुतेक पुस्तकांच्या सापडलेल्या नाहीत. बहुतेक पुस्तकांचे फक्‍त एक दशांशपेक्षा कमी भाग आहेत. कुमरान येथे सापडलेल्या पुस्तकांपैकी सर्वात जास्त प्रती स्तोत्रसंहिता (३६ प्रती), अनुवाद (२९ प्रती) आणि यशया (२१ प्रती) या पुस्तकांच्या आहेत. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्येही याच पुस्तकांचा सर्वात जास्त उल्लेख आढळतो.

बायबलच्या लिखाणातील मूलभूत गोष्टींमध्ये बदल झालेला नाही असे या गुंडाळ्यांवरून दिसून येत असले तरी हेसुद्धा प्रकट होते की, दुसऱ्‍या मंदिराच्या काळात यहुदी लोक वापरत असलेली बायबलची इब्री लिखाणे वेगवेगळी होती. आणि त्या प्रत्येक लिखाणात थोडाफार फरक होता. शुद्धलेखन किंवा शब्दरचना यांच्या बाबतीत सगळ्याच गुंडाळ्या मॅसोरेटिक लिखाणाशी जुळत नव्हत्या. काही गुंडाळ्यांचे ग्रीक सेप्ट्यूएजिंटशी अधिक साम्य होते. सुरवातीला, विद्वानांना असे वाटायचे की, सेप्ट्यूएजिंटमध्ये असलेले फरक, काही चुकांमुळे किंवा भाषांतरकाराने आपणहून केलेल्या फेरफारांमुळे असावेत. परंतु, आता या गुंडाळ्यांवरून स्पष्ट होते की, यांतले बहुतेक फरक इब्री लिखाणांतच होते. यावरून, प्रारंभीच्या ख्रिश्‍चनांनी इब्री शास्त्रवचनांतून घेतलेल्या काही लिखाणांमध्ये मॅसोरेटिक लिखाणांपेक्षा वेगळी शब्दरचना का होती याचे स्पष्टीकरण मिळते.—निर्गम १:५; प्रेषितांची कृत्ये ७:१४.

त्यामुळे, बायबलच्या गुंडाळ्यांचा आणि तुकड्यांचा हा खजिना, बायबलच्या इब्री लिखाणांची नक्कल कशी करण्यात आली त्याचा अभ्यास करण्यासंबंधी भक्कम आधार देते. लिखाणांमध्ये तुलना करण्यासाठी सेप्ट्यूएजिंट आणि समॅरिटन पेन्टेट्यूक महत्त्वाचे आहेत हे मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या गुंडाळ्यांमुळे, मॅसोरेटिक लिखाणांमधील संभाव्य सुधार कशामुळे केले असावेत हे समजायला बायबलच्या भाषांतरकारांना आणखीन एक सूत्र मिळाले आहे. मॅसोरेटिक लिखाणांमध्ये ज्या ठिकाणी यहोवाचे नाव गाळले होते त्या ठिकाणी ते घालण्याचा नवे जग बायबल भाषांतर समितीने (न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटी) घेतलेल्या निर्णयांना या गुंडाळ्यांनी पुष्कळदा पुष्टी दिली आहे.

कुमरान पंथाचे नियम आणि विश्‍वासांचे वर्णन करणाऱ्‍या या गुंडाळ्या एक गोष्ट एकदम स्पष्ट करतात की, येशूच्या काळात यहुदी धर्माचा एकच प्रकार नव्हता. कुमरान पंथाच्या परंपरा परुशी आणि शास्त्र्यांच्या परंपरांपेक्षा वेगळ्या होत्या. कदाचित याच फरकांमुळे तो पंथ ओसाड प्रदेशात गेला असावा. यहोवासाठी रानात सरळ मार्ग करण्याच्या वाणीविषयी यशया ४०:३ या वचनाची आपण पूर्ती करत आहोत असा त्यांचा गैरसमज होता. त्या गुंडाळ्यांच्या अनेक तुकड्यांमध्ये मशिहाचा उल्लेख केला आहे; तो लवकरच येणार आहे असा त्या लेखकांचा समज होता. हा मुद्दा विशेष लक्ष देण्याजोगा आहे कारण लूकने असे म्हटले होते की, मशिहाच्या येण्याची “लोक वाट पाहत असत.”—लूक ३:१५.

मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांवरून, येशूच्या काळातील यहुदी लोकांच्या जीवनाविषयी थोडीफार माहिती मिळते. प्राचीन इब्री भाषा आणि बायबल यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी त्या माहिती देतात. परंतु, मृत समुद्रातल्या गुंडाळ्यांच्या पुष्कळ लिखाणांचे आणखी खोल परीक्षण करण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे, नवीन समज मिळण्याची आणखी शक्यता आहे. होय, २० व्या शतकातला सर्वात मोठा शोध या २१ व्या शतकातही विद्वानांच्या आणि बायबल विद्यार्थांच्या आस्थेचा आहे.

[७ पानांवरील चित्राचे श्रेय]

कुमरान येथील उत्खनन: Pictorial Archive (Near Eastern History) Est.; हस्तलिखित: Courtesy of Shrine of the Book, Israel Museum, Jerusalem