व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे पुनर्स्थापित लोक जगभरात त्याची स्तुती करतात

यहोवाचे पुनर्स्थापित लोक जगभरात त्याची स्तुती करतात

यहोवाचे पुनर्स्थापित लोक जगभरात त्याची स्तुती करतात

“मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.”—सफन्या ३:९.

१. यहुदा व इतर राष्ट्रांच्या नाशाच्या भविष्यवाण्या का पूर्ण झाल्या?

 यहोवाने आपल्या न्यायदंडाच्या किती जबरदस्त भविष्यवाण्या घोषित करण्याची सफन्याला प्रेरणा दिली! त्याने केलेल्या नाशाच्या भविष्यवाण्या यहुदाचे राष्ट्र आणि त्याचे राजधानी शहर जेरुसलेम यांच्याबाबतीत पूर्ण झाल्या. कारण या राष्ट्राचे पुढारी व त्यांतील लोक यहोवाची इच्छा पूर्ण करत नव्हते. पलेशेथ, मवाब, आणि अम्मोन या जवळपासच्या राष्ट्रांवरही परमेश्‍वराचा क्रोध भडकणार होता. का? कारण ते अनेक शतकांपासून यहोवाच्या लोकांचा क्रूरपणे छळ करत होते. याच कारणामुळे, अश्‍शूरच्या जागतिक महाशक्‍तीचा देखील कायमचा नाश होणार होता.

२. सफन्या ३:८ येथील शब्द कोणाला उद्देशून असावेत?

पण प्राचीन यहुदा राष्ट्रात काही लोक चांगल्या मनोवृत्तीचे होते. परमेश्‍वराच्या न्यायदंडांच्या भविष्यवाण्या पूर्ण होण्याची ते वाट पाहात होते आणि या लोकांना असे सांगण्यात आले: “परमेश्‍वर म्हणतो, मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा कारण राष्ट्रे एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी; त्यांवर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.”—सफन्या ३:८.

“शुद्ध वाणी” कोणाकरता?

३. सफन्याला कोणता आशादायक संदेश घोषित करण्याची प्रेरणा मिळाली?

होय, सफन्याने यहोवाकडून येणाऱ्‍या नाशाच्या भविष्यवाण्यांची घोषणा केली. पण सफन्याला केवळ नाशाचाच नव्हे तर एक अद्‌भुत आशादायक संदेश देखील सांगण्याची प्रेरणा देण्यात आली. यहोवाला शेवटपर्यंत विश्‍वासू राहणाऱ्‍या त्याच्या सेवकांना मोठे सांत्वन देईल असा हा संदेश होता. सफन्या ३:९ येथे सांगितल्यानुसार यहोवा देवाने असे घोषित केले: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.”

४, ५. (अ) अभक्‍त कृत्ये करणाऱ्‍यांना कोणती शिक्षा मिळणार होती? (ब) यामुळे कोणाचा फायदा होणार होता आणि का?

पण असेही काही लोक होते, ज्यांना शुद्ध वाणी दिली जाणार नव्हती. या लोकांविषयी भविष्यवाणीत असे म्हटले आहे: “मी तुझ्या उन्‍नतीचा अभिमान धरणाऱ्‍यांस तुझ्यातून नाहीतसे करीन.” (सफन्या ३:११) परमेश्‍वराच्या नियमांकडे दुर्लक्ष करणारे व अभक्‍त कृत्ये करणारे गर्विष्ठ लोक नाहीसे केले जाणार होते. याचा फायदा कोणाला होणार होता? सफन्या ३:१२, १३ येथे असे म्हटले आहे: “मी तुजमध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्‍वराच्या नामावर श्रद्धा ठेवितील. इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखांत कपटी जिव्हा आढळावयाची नाही; ते चरतील व विश्रांति मिळवतील, कोणी त्यांस भेवडावणार नाही.”

प्राचीन यहुदात विश्‍वासू शेषजन नाशातून बचावणार होते. का? कारण त्यांनी या शब्दांनुरूप कार्य केले होते: “पृथ्वीतल्या सर्व नम्र जनांनो, ज्या तुम्ही यहोवाचे विधी पाळले आहेत ते तुम्ही त्याला शोधा; न्यायीपण शोधा; नम्रता शोधा; कदाचित यहोवाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल.”—सफन्या २:३, पं.र.भा.

६. सफन्याच्या पहिल्या पूर्णतेत काय घडले?

सफन्याच्या भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेत परमेश्‍वराने अविश्‍वासू यहुदा राष्ट्राला शिक्षा दिली. त्याने बॅबिलोनी महाशक्‍तीला त्यांच्यावर चढाई करून सा.यु.पू. ६०७ साली यहुदी लोकांना बंदिवान बनवून नेऊ दिले. पण, भविष्यवक्‍ता यिर्मया त्याचप्रमाणे आणखी काही लोकांचा बचाव झाला आणि बंदिवानांपैकीही काहीजण यहोवाला विश्‍वासू राहिले. सा.यु.पू. ५३९ साली कोरेश राजाच्या नेतृत्त्वाखाली मेद व पारस राष्ट्रांनी बॅबिलोन राष्ट्राला पाडले. सुमारे दोन वर्षांनंतर, कोरेशने एक हुकूम जारी केला; या हुकुमानुसार बंदिवासात असलेल्या यहुदी शेषजनांना आपल्या मायभूमीस परत जाण्याची परवानगी देण्यात आली. कालांतराने जेरुसलेममधील मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आणि याजकगण पुन्हा एकदा लोकांना नियमशास्त्राचे शिक्षण देऊ लागला. (मलाखी २:७) अशारितीने, परत आलेले शेषजन जोपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिले तोपर्यंत यहोवाने त्यांना आशीर्वादित  केले.

७, ८. सफन्या ३:१४-१७ या वचनांतील शब्द कोणाला उद्देशून लिहिण्यात आले होते आणि असे का म्हणता येईल?

जेरुसलेमच्या पुनर्स्थापनेचे आशीर्वाद ज्यांना मिळणार होते, त्यांच्याविषयी सफन्याने असे भाकीत केले: “सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर. परमेश्‍वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्‍वर तुजमध्ये आहे; तुला पुनः अरिष्टाची भीति प्राप्त होणार नाही. त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील. हे सीयोने, भिऊ नको, तुझे हात गळू देऊ नको, परमेश्‍वर तुझा देव, साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुजविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.”—सफन्या ३:१४-१७.

हे भविष्यसूचक शब्द बॅबिलोनच्या बंदिवासात असलेल्या यहुदी शेषजनांना उद्देशून होते. त्यांना एकत्रित करून त्यांच्या वाडवडिलांच्या राष्ट्रात परत आणले गेले. सफन्या ३:१८-२० या वचनांवरून हे स्पष्ट होते. येथे आपण असे वाचतो: “जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांस मी [यहोवा] एकत्र मिळवीन; त्यांजवर निंदेचा भार पडला आहे. पाहा, त्या समयी तुला पीडणाऱ्‍या सर्वांचा मी समाचार घेईन; जी लंगडी आहे तिला मी बचावीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रसंशा व नावलौकिक व्हावा असे मी करीन. त्या समयी मी तुम्हांस आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन, तेव्हा पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”

९. यहुदाच्या संबंधाने यहोवाने आपले नाव कशाप्रकारे सर्वांना प्रगट  केले?

यहोवाच्या लोकांचे शत्रू असलेल्या आसपासच्या राष्ट्रांना किती जबरदस्त धक्का बसला असेल याची कल्पना करा! यहुदाच्या रहिवाशांना बॅबिलोनच्या शक्‍तिशाली राष्ट्राने बंदिवान बनवले होते; त्या लोकांना कधीही सुटका होण्याची आशा नव्हती. शिवाय त्यांचा मायदेश उजाड पडला होता. पण परमेश्‍वराच्या शक्‍तीने ते ७० वर्षांनी आपल्या मायदेशी परत जाऊ शकले; दुसरीकडे पाहता, त्यांच्या शत्रूंचा नाश होणार होता. आपल्या विश्‍वासू लोकांना परत आणण्याद्वारे यहोवाने आपले नाव किती अद्‌भुतरित्या सर्वांवर प्रगट केले! त्याने आपल्या लोकांचा “लौकिक व गौरव” व्हावा असे केले. यहुदी शेषजनांची पुनर्स्थापना झाल्यामुळे यहोवाच्या नावाला व त्याचे नाव धारण करणाऱ्‍या त्याच्या लोकांनाही गौरव मिळाला!

यहोवाच्या उपासनेचा गौरव

१०, ११. सफन्याच्या पुनर्स्थापनेच्या भविष्यवाणीची मुख्य पूर्णता केव्हा होणार होती आणि हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१० सामान्य युगाच्या पहिल्या शतकात आणखी एक पुनर्स्थापना झाली. यावेळी येशू ख्रिस्ताने इस्राएलच्या शेषजनांना खऱ्‍या उपासनेकरता एकत्रित केले. ही केवळ एक पूर्वझलक होती कारण पुनर्स्थापनेची खरी पूर्णता भविष्यात होणार होती. मीखाच्या भविष्यवाणीत असे म्हटले होते: “शेवटल्या दिवसात असे होईल की, परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.”—मीखा ४:१.

११ हे केव्हा घडणार होते? भविष्यवाणीत म्हटल्याप्रमाणे हे “शेवटल्या दिवसात,” होय, या “शेवटल्या काळी” घडणार होते. (२ तीमथ्य ३:१) हे या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधीच, म्हणजे राष्ट्रे अद्याप खोट्या देवतांची भक्‍ती करत असतानाच घडणार होते. मीखा ४:५ (पं.र.भा.) सांगते: “सर्व लोक प्रत्येक आपापल्या देवाच्या नावाने, असे चालतात.” आणि खऱ्‍या उपासकांचे काय? मीखाचीच भविष्यवाणी याचे उत्तर देते: “परंतु आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.”

१२. या शेवटल्या काळात खऱ्‍या उपासनेला कशाप्रकारे उंचावण्यात आले आहे?

१२ म्हणूनच या शेवटल्या काळात, “परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात [आला आहे].” अतिश्रेष्ठ असणारी यहोवाची खरी उपासना पुनर्स्थापित करण्यात आली आहे आणि इतर कोणत्याही प्रकारच्या धर्मापेक्षा ती उंचावण्यात आली आहे. मीखाच्या भविष्यवाणीत असेही भाकीत केले आहे की “त्याकडे राष्ट्रे लोटतील.” तसेच, खऱ्‍या धर्माचे पालन करणारे ‘यहोवा देवाच्या नावाने सदासर्वकाल चालत जातील.’

१३, १४. या जगाने “शेवटल्या दिवसांत” केव्हा प्रवेश केला आणि तेव्हापासून खऱ्‍या उपासनेच्या संबंधाने काय घडले आहे?

१३ बायबलच्या भविष्यवाणींच्या पूर्णतेनुसार घडत असलेल्या घटना हे दाखवून देतात की १९१४ साली या जगाने “शेवटल्या दिवसात” पदार्पण केले आहे. (मार्क १३:४-१०) इतिहास हे दाखवून देतो की यहोवाने स्वर्गातील जीवनाची आशा असलेल्या अभिषिक्‍त जनांच्या विश्‍वासू शेषजनांना खऱ्‍या उपासनेकरता एकत्रित करण्यास सुरवात केली. यानंतर “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी . . . मोठा लोकसमुदाय” देखील एकत्रित करण्यात आला. या मोठ्या लोकसमुदायातील लोकांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे.—प्रकटीकरण ७:९.

१४ पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत यहोवाचे नाव धारण करणाऱ्‍यांच्या उपासनेत त्याच्या मार्गदर्शनाखाली उत्तरोत्तर प्रगती झाली आहे. पहिल्या महायुद्धात यहोवाच्या उपासकांची संख्या केवळ काही हजार इतकीच होती, पण आज त्यांची संख्या जवळजवळ ६० लाख झाली आहे. २३५ देशांत हे उपासक ९१,००० मंडळ्यांत त्याची उपासना करतात. दर वर्षी हे राज्य प्रचारक एक अब्जापेक्षा अधिक तास यहोवाची सार्वजनिकरित्या स्तुती करण्याकरता खर्च करतात. असे करण्याद्वारे ते सिद्ध करतात की केवळ तेच येशूच्या पुढील भविष्यसूचक शब्दांची पूर्ती करत आहेत: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

१५. सफन्या २:३ आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे?

१५ सफन्या ३:१७ म्हणते: “परमेश्‍वर तुझा देव, साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे.” यहोवाचे सेवक या शेवटल्या दिवसांत जी आध्यात्मिक समृद्धी अनुभवत आहेत त्याचे कारण हेच आहे की सर्वशक्‍तीमान परमेश्‍वर यहोवा ‘त्यांच्या ठायी’ आहे. सा.यु.पू. ५३७ मध्ये यहुदा राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या वेळी जसा यहोवा त्याच्या लोकांच्या पाठीशी होता तसा आज देखील आहे. अशारितीने आज आपल्या काळात सफन्या २:३ (पं.र.भा.) या वचनाची मोठ्या प्रमाणात पूर्णता होत आहे: “पृथ्वीतल्या सर्व नम्र जनांनो, [यहोवाला] शोधा.” (तिरपे वळण आमचे.) सा.यु.पू. ५३७ मध्ये, “सर्व” नम्र जनांत बॅबिलोनी बंदिवासातून सुटका झालेले सर्व यहुदी शेषजन होते. आज सर्व नम्र जन म्हणजे सबंध पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतील नम्र लोक जे जगभरात चाललेल्या राज्य प्रचाराच्या कार्याला चांगली प्रतिक्रिया दाखवून ‘परमेश्‍वराच्या मंदिराच्या डोंगराकडे’ लोटत आहेत.

खऱ्‍या उपासनेचा उत्कर्ष

१६. यहोवाच्या लोकांची या आधुनिक काळात होत असलेली भरभराट पाहून त्यांच्या काही शत्रूंची काय प्रतिक्रिया असेल?

१६ सा.यु.पू. ५३७ नंतर यहुदाच्या आसपासच्या अनेक राष्ट्रांना, देवाच्या लोकांची खरी उपासना त्यांच्या मायदेशात पुनर्स्थापित झालेली पाहून आश्‍चर्य वाटले. पण ही पुनर्स्थापना तुलनात्मकदृष्ट्या कमी प्रमाणात झाली. पण या आधुनिक काळात यहोवाच्या लोकांमध्ये होत असलेली आश्‍चर्यकारक वाढ, भरभराट आणि प्रगती पाहून काही लोकांना, देवाच्या लोकांच्या शत्रूंपैकीही काहींना काय वाटत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? येशूकडे सर्व लोकांना जाताना पाहून परुशी लोकांना जसे वाटले तसेच यांपैकी काहींना वाटत असेल. ते चकित होऊन म्हणायचे: “पाहा! जग त्याच्यामागे चालले आहे.”—योहान १२:१९.

१७. एका लेखकाने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय म्हटले आणि त्यांनी कोणती वाढ अनुभवली आहे?

१७ त्यांचा देखील विश्‍वास आहे (इंग्रजी) या पुस्तकात प्राध्यापक चार्ल्स एस. ब्रेडन म्हणतात: “यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या साक्षकार्याने अक्षरशः सबंध पृथ्वी व्यापून टाकली आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्याबद्दल दाखवलेला आवेश आणि या कार्यात त्यांची चिकाटी अतुलनीय आहे. इतर कोणत्याही धार्मिक गटाशी या बाबतीत त्यांची तुलना करता येत नाही. त्यांच्या कार्याची दिवसेंदिवस उन्‍नतीच होत जाणार आहे असे दिसते.” ब्रेडन यांचे म्हणणे अगदी खरे होते! ५० वर्षांपूर्वी त्यांनी हे शब्द लिहिले तेव्हा सबंध जगात सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या साक्षीदारांची संख्या फक्‍त ३,००,००० च्या आसपास होती. त्या संख्येच्या २० पटीने अधिक, म्हणजे जवळजवळ ६० लाख साक्षीदार सुवार्ता प्रचार करत आहेत हे पाहून आज ते काय म्हणतील?

१८. शुद्ध वाणी म्हणजे काय आहे आणि परमेश्‍वराने ही शुद्ध वाणी कोणाला दिली आहे?

१८ आपल्या भविष्यवक्‍त्‌याद्वारे परमेश्‍वराने अशी प्रतीज्ञा केली: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.” (सफन्या ३:९) या शेवटल्या काळात, यहोवाचे साक्षीदारच यहोवाच्या नावाचा धावा करत आहेत आणि ते “एकचित्ताने” म्हणजे प्रेमाच्या अतूट बंधनात एकजुटीने त्याची सेवा करत आहेत. त्यांना यहोवाने शुद्ध वाणी दिली आहे. ही शुद्ध वाणी म्हणजे परमेश्‍वराबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल योग्य समज. ही समज केवळ यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देऊ शकतो. (१ करिंथकर २:१०) यहोवाने आपला पवित्र आत्मा कोणाला दिला आहे? केवळ “[त्याच्या] आज्ञा पाळणाऱ्‍यांना.” (प्रेषितांची कृत्ये ५:३२) केवळ यहोवाचे साक्षीदारच सर्व बाबतीत परमेश्‍वराला आपला अधिकारी मानतात. त्यामुळे त्यांच्यावर परमेश्‍वराचा आत्मा आहे आणि ते यहोवाबद्दल आणि त्याच्या अद्‌भुत उद्देशांबद्दल सत्य सांगतात, अर्थात शुद्ध वाणीत बोलतात. या शुद्ध वाणीनेच ते सबंध पृथ्वीवर मोठ्या आणि दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात यहोवाची स्तुती करत आहेत.

१९. शुद्ध वाणीत बोलणे यात काय सामील आहे?

१९ शुद्ध वाणीत बोलणे म्हणजे सत्यावर विश्‍वास ठेवणे आणि ते इतरांना सांगणे. पण इतकेच नव्हे; यात परमेश्‍वराच्या नियमांनुसार आणि तत्त्वांनुसार वागणे देखील समाविष्ट आहे. यहोवाला शोधण्यात आणि शुद्ध वाणीत बोलण्याच्या बाबतीत अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी पुढाकार घेतला आहे. याद्वारे त्यांनी किती काही साध्य केले आहे याचा विचार करा! अभिषिक्‍त लोकांची संख्या कमी होत ती ८,७०० पेक्षा कमी झाली आहे, पण दुसरीकडे पाहता जवळजवळ ६० लाख साक्षीदार त्यांच्या विश्‍वासूपणाचे अनुकरण करून यहोवाला शोधत आहेत आणि शुद्ध वाणी बोलत आहेत. या मोठ्या लोकसमुदायातील लोकांची संख्या वाढत आहे. सर्व राष्ट्रांतून आलेल्या या लोकांनी येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला आहे आणि आज ते यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात पवित्र सेवा करत आहेत. या दुष्ट जगावर लवकरच येत असलेल्या ‘मोठ्या संकटातून’ त्यांचा बचाव होईल.—प्रकटीकरण ७:९, १४, १५.

२० विश्‍वासू अभिषिक्‍त जनांचे व मोठ्या लोकसमुदायातील लोकांचे काय भविष्य असेल?

२० मोठ्या लोकसमुदायाला परमेश्‍वराच्या नीतिमान नव्या जगात प्रवेश मिळेल. (२ पेत्र ३:१३) येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत राजे व याजक बनण्याकरता स्वर्गात पुनरुत्थान झालेले १,४४,००० अभिषिक्‍त जन पृथ्वीवर शासन करतील. (रोमकर ८:१६, १७; प्रकटीकरण ७:४; २०:६) मोठ्या संकटातून बचावणारे लोक पृथ्वीला परादीस बनवण्याकरता कार्य करतील आणि परमेश्‍वराने दिलेल्या शुद्ध वाणीत ते पुढेही बोलत राहतील. पुढील शब्दांचे तत्त्व त्यांना देखील लागू होते: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल. धार्मिकतेने तू खंबीर होशील.”—यशया ५४:१३, १४.

इतिहासातील सर्वात महान शैक्षणिक कार्य

२१, २२. (अ) प्रेषितांची कृत्ये २४:१५ यात सूचित केल्यानुसार कोणाला शुद्ध वाणी शिकवावी लागेल? (ब) राज्य शासनाधीन कोणते अभूतपूर्व शैक्षणिक कार्य या पृथ्वीवर केले जाईल?

२१ नव्या जगात ज्यांना शुद्ध वाणी आत्मसात करण्याची संधी दिली जाईल अशा एका अतिशय मोठ्या गटाविषयी प्रेषितांची कृत्ये २४:१५ यात सांगितले आहे: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” गतकाळात अब्जावधी लोक यहोवाविषयी अचूक ज्ञान मिळण्याआधीच मृत्यू पावतील. यहोवा देव त्यांना सुनियोजित पद्धतीने पुन्हा जिवंत करेल. या पुनरुत्थित जनांनाही शुद्ध वाणी शिकवावी लागेल.

२२ त्या महान शैक्षणिक कार्यात भाग घेणे खरोखर एक बहुमान असेल. मानवाच्या इतिहासातील हे सर्वात महान शैक्षणिक कार्य असेल. राज्य शासन चालवणाऱ्‍या ख्रिस्त येशूच्या कल्याणकारक राज्याधीन हे साध्य केले जाईल. परिणामतः मनुष्यजात यशया ११:९ येथील शब्दांची पूर्णता अनुभवेल; या वचनात असे म्हटले आहे: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”

२३. यहोवाचे लोक असण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे असे आपण का म्हणू शकतो?

२३ जेव्हा पृथ्वी खऱ्‍या अर्थाने यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल त्या अद्‌भुत काळाची तयारी करण्यात या शेवटल्या काळात सहभाग घेण्याचा आपल्याला बहुमान लाभला आहे! आणि आजही परमेश्‍वराचे लोक असण्याचा आणि सफन्या ३:२० या वचनातील भविष्यसूचक शब्दांची महान पूर्णता अनुभवण्याचा एक अतुलनीय सन्मान आपल्याला मिळाला आहे. त्या वचनात असे म्हटले आहे: “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• सफन्याच्या पुनर्स्थापनेच्या भविष्यावाणीची पूर्णता केव्हा झाली?

• या शेवटल्या काळात खऱ्‍या उपासनेची भरभराट कशाप्रकारे होत आहे?

• नव्या जगात कोणते महान शैक्षणिक कार्य केले जाईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

यहोवाचे लोक शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना करण्यासाठी आपल्या मायदेशी परतले. याचा आज काय अर्थ होतो हे तुम्हाला माहीत आहे का?

[२६ पानांवरील चित्रे]

“शुद्ध वाणी” बोलण्याद्वारे यहोवाचे साक्षीदार लोकांना बायबलचा सांत्वनदायक संदेश देतात