यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा
यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा
“[यहोवाला] शोधा; न्यायीपण शोधा; नम्रता शोधा; कदाचित यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल.”—सफन्या २:३, पं.र.भा.
१. सफन्याने यहुदात भविष्यवाणी घोषित करण्यास सुरवात केली तेव्हा तेथील आध्यात्मिक स्थिती कशी होती?
सफन्याने भविष्यवाणी घोषित करण्यास सुरवात केली तो काळ यहुदाच्या इतिहासातील निर्णायक काळ होता. तेथील आध्यात्मिक स्थिती दयनीय होती. यहोवावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक मूर्तिपूजक पुजाऱ्यांकडून व ज्योतिषशास्त्र्यांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत होते. देशात बआल उपासना व त्यातील, सुपीकतेसाठी केले जाणारे विधी सर्रास चालले होते. देशाचा कारभार पाहणारे राजपुत्र, सरदार आणि न्यायाधीश यांच्यावर लोकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती; पण, संरक्षण करण्याऐवजी ते त्यांच्यावर जुलूम करत होते. (सफन्या १:९; ३:३) म्हणूनच यहोवाने यहुदा व जेरुसलमेवर ‘हात चालवण्याचा’ निर्धार व्यक्त केला.—सफन्या १:४.
२. यहुदातील परमेश्वराच्या विश्वासू सेवकांना कोणती आशा होती?
२ परंतु, यहुदातील दयनीय परिस्थिती अगदीच आशाहीन नव्हती. कारण आता अमोनचा पुत्र योशिया राजा बनला होता. तो वयाने लहान असला तरीही त्याचे यहोवावर खरोखर प्रेम होते. या नव्या राजाने यहुदात शुद्ध उपासना पुन्हा सुरू केल्यास, जे मोजके लोक तेथे अद्याप परमेश्वराची उपासना करत होते त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार होता! कदाचित इतरजणही त्यांच्यासोबत शुद्ध उपासना करू लागण्याची आणि यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी बचावले जाण्याची शक्यता होती.
बचावण्यासाठी पूर्ण करावयाच्या अटी
३, ४. ‘यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी’ बचावण्यासाठी एका व्यक्तीला कोणत्या तीन अटी पूर्ण करणे आवश्यक आहे?
३ यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी काहीजणांचे बचावले जाणे खरोखर शक्य होते का? होय, पण त्यासाठी त्यांना सफन्या २:२, ३ [पं.र.भा.] येथे सांगितलेल्या तीन अटी पूर्ण कराव्या लागणार होत्या. ही वचने वाचत असताना आपण या अटींकडे विशेष लक्ष देऊ या. सफन्याने लिहिले: “ठराव प्रसवेल, आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, यहोवाचा संतप्त क्रोध तुम्हावर येईल, त्यापूर्वी, यहोवाचा क्रोधाचा दिवस तुम्हावर येईल त्यापूर्वी तुम्ही एकत्र जमा. पृथ्वीतल्या सर्व नम्र जनांनो, ज्या तुम्ही यहोवाचे विधी पाळले आहेत ते तुम्ही त्याला शोधा; न्यायीपण शोधा; नम्रता शोधा; कदाचित यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल.”
४ बचावण्यासाठी, एका व्यक्तीने (१)यहोवाला शोधणे, (२)न्यायीपण अर्थात नीतीमत्त्व शोधणे आणि (३)नम्रता शोधणे आवश्यक होते. या अटींकडे लक्ष देणे आजच्या काळात विशेष महत्त्वाचे आहे. का? कारण ज्याप्रकारे यहुदा व जेरुसलेमवर सा.यु.पू. सातव्या शतकात न्यायाचा दिवस आला त्याचप्रकारे आज ख्रिस्ती धर्मजगताची राष्ट्रे, किंबहुना जगातले सर्व दुष्टजन त्या ‘मोठ्या संकटाकडे’ वाटचाल करत आहेत ज्यात यहोवा देव त्यांचा नाश करेल. (मत्तय २४:२१) त्या संकटातून ज्या कोणाला बचावण्याची इच्छा आहे त्यांनी लगेच निर्णायक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. कशाप्रकारे? उशीर होण्याआधी यहोवाला शोधण्याद्वारे, नीतिमत्ता शोधण्याद्वारे आणि नम्रता शोधण्याद्वारे!
५. ‘यहोवाला शोधण्याचा’ आजच्या काळात काय अर्थ होतो?
५ पण तुम्ही कदाचित म्हणाल: ‘मी तर यहोवाचा समर्पित, बाप्तिस्मा घेतलेला साक्षीदार आहे. त्याअर्थी या अटी मी आधीच पूर्ण केलेल्या नाहीत का?’ पण यहोवाला आपले जीवन समर्पित करणेच पुरेसे नाही. इस्राएल देखील एक समर्पित राष्ट्र होते, पण सफन्याच्या काळात यहुदाचे रहिवाशी यहोवाला केलेले समर्पण विसरले होते. म्हणूनच यहुदा राष्ट्राचा नाश करण्यात आला. तेव्हा ‘यहोवाला शोधण्याचा’ अर्थ, आपण त्याच्यासोबत एक निकटचा वैयक्तिक नातेसंबंध जोडून तो कायम ठेवला पाहिजे आणि त्याच्या पृथ्वीवरील संघटनेच्या सोबत त्याची सेवा केली पाहिजे. याचा असाही अर्थ होतो, की आपण कोणत्याही गोष्टीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या वागणुकीचा, विचारांचा त्याच्या भावनांवर कसा परिणाम होईल याचाही सदोदित विचार केला पाहिजे. यहोवाला शोधणे म्हणजे त्याच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे, त्यावर मनन करणे आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींचे पालन करणे. आपण यहोवाच्या मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाकडे लक्ष देऊन वागतो तेव्हा आपोआपच आपला यहोवासोबतचा नातेसंबंध दिवसेंदिवस घनिष्ट होत जातो आणि यामुळे आपल्याला ‘पूर्ण मनाने, जिवाने, शक्तीने’ सेवा करण्याची प्रेरणा मिळते.—अनुवाद ६:५; गलतीकर ५:२२-२५; फिलिप्पैकर ४:६, ७; प्रकटीकरण ४:११.
६. आपण कशाप्रकारे ‘न्यायीपणा शोधू’ शकतो आणि या जगातही हे कसे शक्य आहे?
६ सफन्या २:३ येथे सांगितलेली दुसरी अट म्हणजे, “न्यायीपण शोधा.” आपल्यापैकी बहुतेकांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी जीवनात बरेच बदल केले असतील; पण आपण जीवनभर यहोवाच्या न्याय्य व नीतीमान आदर्शांचे पालन करत राहिले पाहिजे. काहीजणांनी सुरवात चांगली केली पण नंतर ते जगाच्या प्रभावाला बळी पडले. न्यायीपणा शोधणे सोपे नाही. कारण आपण अशा लोकांमध्ये राहतो, वावरतो ज्यांना लैंगिक अनैतिकता, खोटे बोलणे आणि इतर पाप अगदी सर्वसाधारण वाटतात. पण जर आपल्याला यहोवाला संतुष्ट करण्याची मनस्वी इच्छा असेल, तर आपण जगातल्या लोकांना खूष करण्यासाठी त्यांच्याचप्रमाणे वागण्याच्या प्रवृत्तीवर मात करू शकतो. यहुदाने आपल्या आसपासच्या अभक्त राष्ट्रांचे अनुकरण केल्यामुळेच त्यांच्यावर यहोवाचा क्रोध भडकला. तेव्हा या जगाचे अनुकरण करण्याऐवजी आपण ‘देवाचे अनुकरण’ करून “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिसकर ४:२४; ५:१.
७. आपण कशाप्रकारे ‘नम्रपणा शोधू’ शकतो?
७ सफन्या २:३ येथे सांगितलेला तिसरा मुद्दा म्हणजे, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी बचावायचे असेल तर आपण ‘नम्रता शोधली’ पाहिजे. दररोज आपण अशा कित्येक स्त्रीपुरुषांच्या आणि तरुणांच्या संपर्कात येतो ज्यांच्या वागण्याबोलण्यात थोडीही नम्रता नसते. उलट त्यांच्या मते नम्रपणा हा एक दोष आहे. अधिकाऱ्यांना अधीन राहणे हे त्यांच्या मते दुबळ्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. सतत आपल्या हक्कांची मागणी करण्याची, आपलाच स्वार्थ साधण्याची आणि आपलेच म्हणणे खरे करण्याची त्यांची वृत्ती असते. अशाप्रकारचे गुण आपल्यात आल्यास ती किती खेदाची गोष्ट ठरेल! तेव्हा ‘नम्रता शोधण्याची’ हीच वेळ आहे. हे आपण कसे करू शकतो? परमेश्वराला अधीन राहून, त्याच्याकडून मिळणारा सुधारणुकीचा सल्ला नम्रपणे स्वीकारून आणि नेहमी त्याच्या इच्छेला प्राधान्य देऊन.
“कदाचित” लपवले जाल?
८. सफन्या २:३ येथे वापरण्यात आलेल्या “कदाचित” या शब्दावरून काय सूचित होते?
८ सफन्या २:३ येथे काय म्हटले आहे याकडे लक्ष द्या: “कदाचित यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल.” याठिकाणी “पृथ्वीतल्या सर्व नम्र जनांना” उद्देशून बोलताना “कदाचित” असे का म्हटले आहे? कारण त्या नम्र जनांनी जरी योग्य दिशेने पावले उचलली होती तरीसुद्धा भविष्याबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगणे चुकीचे होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत ते विश्वासू राहतील किंवा नाही हे आताच सांगता येत नव्हते. त्यांपैकी काहीजण पापाच्या मार्गात जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आजही हीच परिस्थिती आहे. येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) होय, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी बचावण्यासाठी शेवटपर्यंत त्याच्या नजरेत योग्य ते करत राहण्याची गरज आहे. असे करण्याचा आपण निर्धार केला आहे का?
९. लहान वयातच राजा योशियाने कोणती योग्य पावले उचलली?
९ सफन्याच्या शब्दांमुळे राजा योशियाला ‘यहोवाला शोधण्याची’ प्रेरणा मिळाली. बायबल सांगते: “तो आपल्या राज्याच्या आठव्या वर्षी, अद्याप लहानच असता आपला बाप दावीद याच्या देवाला शोधू लागला.” (२ इतिहास ३४:३, पं.र.भा.) एवढेच नव्हे तर योशियाने ‘न्यायीपण शोधले.’ त्याच्याविषयी असे म्हटले आहे: “बाराव्या वर्षी [योशिया २० वर्षांचा असताना] तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ति आणि कोरीव व ओतीव मूर्ति यहूदा व यरुशलेम यातून काढून टाकू लागला. लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तीच्या वेद्या मोडून टाकिल्या.” (२ इतिहास ३४:३, ४) तसेच योशियाने ‘नम्रताही शोधली.’ देशातून सर्व प्रकारची मूर्तिपूजा आणि खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या इतर गोष्टी काढून टाकल्या आणि अशारितीने यहोवाला संतुष्ट करण्यासाठी नम्रपणे कार्य केले. त्याच्या या कार्यामुळे इतर नम्र लोकांना देखील किती आनंद झाला असेल!
१०. सा.यु.पू. ६०७ साली यहुदात काय घडले पण कोणाचा बचाव झाला?
१० योशियाच्या राज्यात बरेच यहुदी लोक यहोवाकडे परतले. पण, राजाचा मृत्यू झाल्यानंतर मात्र यांपैकी बहुतेकजण पुन्हा पूर्वीच्याच मार्गाला लागले आणि यहोवाला वीट आणणाऱ्या गोष्टी पुन्हा करू लागले. यहोवाने ठरवल्याप्रमाणे सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी लोकांनी यहुदावर चढाई करून त्याचे राजधानी शहर जेरुसलेम नष्ट केले. पण अद्यापही स्थिती पूर्णपणे आशाहीन नव्हती. कारण संदेष्टा यशया, एबद-मलेख कूशी, योनादाबाचे वंशज आणि परमेश्वराच्या इतर विश्वासू सेवकांना त्याच्या क्रोधाच्या दिवशी बचाव मिळाला.—यिर्मया ३५:१८, १९; ३९:११, १२, १५-१८.
परमेश्वराच्या शत्रूंनो—लक्ष द्या!
११. आजच्या काळात परमेश्वराला विश्वासू राहणे एक आव्हान का आहे, पण यहोवाच्या लोकांच्या शत्रूंनी काय आठवणीत ठेवावे?
११ यहोवाचा क्रोधाचा दिवस या दुष्ट व्यवस्थीकरणावर येण्याची आपण वाट पाहात आहोत. पण दरम्यान “नाना प्रकारच्या परीक्षांना [आपल्याला] तोंड द्यावे लागते.” (याकोब १:२) बरेच देश आपण नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य जोपासत असल्याचा दावा तर करतात, पण पाळकवर्गाच्या चिथावणीला बळी पडून लौकिक अधिकारी देवाच्या लोकांचा भयंकर छळ करतात. तत्त्वहीन लोक यहोवाच्या साक्षीदारांविषयी खोटी माहिती पसरवतात, त्यांना “समाजाला धोकेदायक असलेला धर्मपंथ” म्हणून संबोधतात. अर्थात परमेश्वराच्या नजरेतून या सर्व गोष्टी सुटलेल्या नाहीत—त्याच्या सेवकांना छळणाऱ्यांना तो निश्चितच शिक्षा देईल. प्राचीन काळात देवाच्या लोकांच्या शत्रूंचे, उदाहरणार्थ पलिष्ट्यांच्या देशाचे शेवटी काय झाले, हे या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे: “गज्जाचे विस्मरण पडेल, अष्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल.” गज्जा, अष्कलोन, अश्दोद व एक्रोन या सर्व पलिष्टी नगरांचा सर्वनाश ठरलेला होता.—सफन्या २:४-७.
१२. पलिष्ट्यांचे राष्ट्र, मवाब आणि अम्मोनाचे शेवटी काय झाले?
१२ भविष्यवाणीत पुढे असे म्हटले आहे: “मवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन वंशजांनी केलेली निर्भत्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या महत्त्वाचा तोरा मिरविला आहे.” (सफन्या २:८) ईजिप्त व इथियोपिया राष्ट्रांना बॅबिलोनी सैन्यांने गारद केले हे खरे आहे. पण अब्राहामाचा पुतण्या लोट याच्यापासून आलेल्या मवाब आणि अम्मोन राष्ट्रांविरुद्ध यहोवाने काय निवाडा दिला? यहोवाने भाकीत केले: “मवाब सदोमासारखे निश्चये होईल, अम्मोन वंशज गमोऱ्यासारखे होतील.” सदोम व गमोराचा नाश झाला तेव्हा लोटाच्या दोन कन्यांचा बचाव झाला, पण त्यांच्यापासून निर्माण झालेल्या मवाब व अम्मोन या गर्विष्ठ राष्ट्रांना मात्र यहोवाच्या न्यायदंडापासून सुटका मिळणार नव्हती. (सफन्या २:९-१२; उत्पत्ति १९:१६, २३-२६, ३६-३८) आज पलिष्ट्यांचे राष्ट्र व त्याची शहरे कोठे आहेत? गर्विष्ठ मवाब व अम्मोनाचे काय झाले? त्यांचा शोध घेतला तरी ही राष्ट्रे सापडणार नाहीत.
१३. निनवे शहरात पुराणवस्तूशोधकांना काय सापडले?
१३ सफन्याच्या काळात, अश्शूरी साम्राज्य अत्यंत वैभवी व बलशाली होते. पुराणवस्तूशोधक ऑस्टन लेयर्ड यांनी अश्शूरी साम्राज्याची राजधानी निनवे येथे सापडलेल्या शाही महालाच्या एका भागाचे असे वर्णन केले: “तक्तपोशी . . . चौकोनांत विभागलेली होती; त्यांवर फुलांची व प्राण्यांची रंगीत चित्रे काढली होती. यातील काही आकृत्या हस्तिदंताने सजवल्या होत्या आणि प्रत्येक चौकोनाभोवती अतिशय सुरेख नक्षीकाम होते. महालातील विविध कक्षांचे बीम व भिंती सोन्याचा व चांदीचा मुलामा दिलेल्या होत्या. बांधकामासाठी अतिशय दुर्मिळ प्रकारचे, खासकरून देवदार लाकूड वापरले होते.” पण सफन्याच्या भविष्यवाणीत सांगितल्यानुसार, अश्शूर साम्राज्याचा नाश ठरलेला होता आणि त्याची राजधानी निनवे “वैराण रानाप्रमाणे” होणार होती.—सफन्या २:१३.
१४. निनवेविषयी सफन्याची भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण झाली?
१४ सफन्याने ही भविष्यवाणी केल्यावर केवळ १५ वर्षांनीच बलशाली निनवे शहर नष्ट झाले, तेथील आलिशान राजमहाल जमिनदोस्त झाला. अशारितीने एक गर्विष्ठ शहर धूळीस मिळाले होते. निनवे कशाप्रकारे उजाड होईल याविषयी असे भाकीत करण्यात आले होते: “पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील. त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल, उंबरठे ओस पडतील.” (सफन्या २:) निनवेच्या प्रशस्त महालांत केवळ पाणकोळी व साळू राहतील. रस्त्यांवर व्यापाऱ्यांचे, सैनिकांचे व पुजाऱ्यांचे आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाहीत. एकेकाळी ज्या रस्त्यांवर वर्दळ असायची तेथे आता खिडकीतून कोणाच्यातरी गाण्याचा भयाण आवाज ऐकू येईल. हा आवाज म्हणजे एखाद्या पक्षाचे विषण्ण गाणे किंवा वाऱ्याचे घोंघावणे असेल. अशाचप्रकारे देवाच्या सर्व शत्रूंचा नाश होवो! १४, १५
१५. पलिष्ट्यांचा देश तसेच मवाब, अम्मोन आणि अश्शूर या राष्ट्रांचे शेवटी जे झाले त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१५ पलिष्ट्यांचा देश, मवाब, अम्मोन, व अश्शूरचे शेवटी जे झाले त्यापासून आपण काय शिकू शकतो? आपण हे शिकतो की: यहोवाच्या सेवकांना त्यांच्या शत्रूंचे भय बाळगण्याचे काही कारण नाही. परमेश्वराच्या लोकांचा विरोध करणाऱ्यांना तो पाहतो. गतकाळात यहोवाने त्याच्या शत्रूंविरुद्ध कारवाई केली आणि आजही त्याचे न्यायदंड सबंध पृथ्वीवर येतील. पण सर्वांचा नाश होणार नाही—‘सर्व राष्ट्रांपैकी एक माठा लोकसमुदाय’ त्या नाशातून बचावेल. (प्रकटीकरण ७:९) तुम्ही देखील या लोकसमुदायापैकी एक असू शकता; पण त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत यहोवाला शोधले पाहिजे, न्यायीपण शोधले पाहिजे आणि नम्रता शोधली पाहिजे.
मगरूरपणे दुष्टाई करणाऱ्यांचा धिक्कार असो!
१६. यहुदाचे राजपुत्र आणि धार्मिक पुढारी यांच्याविषयी सफन्याच्या भविष्यवाणीत काय सांगितले आहे आणि हे शब्द ख्रिस्ती धर्मजगताला कशाप्रकारे लागू होतात?
१६ सफन्याची भविष्यवाणी आता पुन्हा एकदा यहुदा व जेरुसलेमवर केंद्रित होते. सफन्या ३:१, २ येथे म्हटले आहे: “ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो! तिने वचन मानिले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेविली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.” यहोवाने आपल्या लोकांना सुधारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ही किती दुःखाची गोष्ट आहे! यहुदातील राजपुत्र, सरदार आणि न्यायाधीश यांचा क्रूरपणा खरोखर शोचनीय होता. धार्मिक पुढाऱ्यांच्या लज्जास्पद व्यवहाराविषयी सफन्याने असे म्हटले: “तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करितात, त्यांनी धर्मशास्त्राचे अतिक्रमण केले आहे.” (सफन्या ३:३, ४) हे शब्द ख्रिस्ती धर्मजगताच्या भविष्यवक्त्यांना व पाळकांना किती तंतोतंत लागू होतात! त्यांनी मगरूरपणे आपल्या बायबल भाषांतरांतून परमेश्वराचे नाव देखील काढून टाकले आहे; तसेच ज्या परमेश्वराची उपासना करण्याचा ते दावा करतात, त्याचाच अनादर करणाऱ्या शिकवणुकी ते लोकांना देत आहेत.
१७. लोक ऐकोत किंवा न ऐकोत, आपण सुवार्ता का घोषित करत राहिले पाहिजे?
१७ प्राचीन काळात यहोवाने आपल्या लोकांवर नाश आणण्याआधी त्यांना दयाळूपणे याविषयी सतर्क केले. त्यांना पश्चाताप करण्यास प्रवृत्त करण्यासाठी यहोवाने त्यांच्याकडे आपल्या सेवकांना, अर्थात सफन्या, यिर्मया यांच्यासारख्या इतर संदेष्ट्यांना पाठवले. होय, यहोवा “काही अन्याय करीत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रगट करितो, चुकत नाही.” पण एवढे करूनही काय परिणाम झाला? सफन्या याचे उत्तर या शब्दांत देतो, “अधार्मिकास तर लाज कशी ती ठाऊक नाही.” (सफन्या ३:५) आजच्या काळात देखील अशाचप्रकारे एक इशारेवजा सूचना लोकांना दिली जात आहे. तुम्ही सुवार्तेचा प्रचार करत असाल तर तुम्ही देखील लोकांना ही सूचना देण्यात सहभाग घेत आहात. हे कार्य करत राहा, त्यात खंड पडू देऊ नका! लोक ऐकोत किंवा न ऐकोत, तुम्ही विश्वासूपणे तुमचे काम करत राहिल्यास यहोवाच्या दृष्टिकोनातून तुमचे सेवाकार्य यशस्वी ठरेल. परमेश्वराचे कार्य आवेशाने करणाऱ्यांना लाज वाटण्याचे काहीही कारण नाही.
१८. सफन्या ३:६ कशाप्रकारे पूर्ण होईल?
१८ परमेश्वराचे न्यायदंड केवळ ख्रिस्ती धर्मजगतावर येणार नाहीत. यहोवा सर्व राष्ट्रांना शिक्षा देईल: “मी राष्ट्रे नष्ट केली आहेत, त्यांचे बुरूज उध्वस्त केले आहेत; मी त्यांचे रस्ते उजाड केले आहेत, त्यांनी कोणी जातयेत नाही; त्यांची नगरे उध्वस्त केली आहेत.” (सफन्या ३:६) यहोवाचे हे शब्द इतके विश्वासार्ह आहेत की जणू या गोष्टी घडून गेल्या आहेत अशाप्रकारे यहोवा त्यांच्याविषयी बोलतो. पलिष्ट्यांचा देश तसेच मवाब, व अम्मोन या राष्ट्रांच्या शहरांचे काय झाले? अश्शूरांची राजधानी असलेल्या निनवेचे काय झाले? त्यांचा झालेला नाश आजच्या राष्ट्रांकरता एक इशारेवजा उदाहरण आहे. यहोवाची थट्टा केली जाऊ शकत नाही.
यहोवाला शोधत राहा
१९. आपण कोणते विचारप्रवर्तक प्रश्न विचारू शकतो?
१९ सफन्याच्या काळात, परमेश्वराचा क्रोध “दुष्कर्मे” करणाऱ्यांवर आला. (सफन्या ३:७) आपल्या काळातही असेच घडेल. यहोवाचा क्रोधाचा दिवस जवळ आला आहे याचा पुरावा तुम्हाला दिसतो का? तुम्ही सतत ‘यहोवाला शोधण्याचा’ प्रयत्न करत आहात का, अर्थात त्याचे वचन तुम्ही नियमित—दररोज वाचता का? परमेश्वराच्या आज्ञांनुसार नैतिकरित्या शुद्ध आचरण ठेवण्याद्वारे तुम्ही ‘न्यायीपण शोधत’ आहात का? तसेच परमेश्वराला आणि आपल्या तारणाकरता त्याने केलेल्या सर्व तरतुदींना नम्रपणे अधीन राहण्याची मनोवृत्ती दाखवण्याद्वारे तुम्ही ‘नम्रपणा शोधत’ आहात का?
२०. सफन्याच्या भविष्यवाणीवर आधारलेल्या या लेखमालेतील शेवटल्या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?
२० जर आपण विश्वासूपणे यहोवाला शोधत राहिलो, न्यायीपणा शोधत राहिलो व नम्रता शोधत राहिलो तर आपण सध्याच्या या काळात, होय, आपल्या विश्वासाची परीक्षा घेणाऱ्या या ‘शेवटल्या काळात’ देखील यहोवाचे समृद्ध आशीर्वाद उपभोगण्याची आशा बाळगू शकतो. (२ तीमथ्य ३:१-५; नीतिसूत्रे १०:२२) कदाचित आपण विचार करत असू, की ‘आज यहोवाचे सेवक या नात्याने आपण कोणकोणते आशीर्वाद उपभोगत आहोत आणि सफन्याच्या भविष्यवाणीनुसार जे लोक वेगाने येत असलेल्या यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी लपवले जातील त्यांना भविष्यात कोणते आशीर्वाद प्राप्त होतील?’
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• लोक कशाप्रकारे ‘यहोवाला शोधू’ शकतात?
• ‘न्यायीपण शोधण्याचा’ काय अर्थ होतो?
• आपण कशाप्रकारे ‘नम्रता शोधू’ शकतो?
• यहोवाला शोधा, न्यायीपण शोधा व नम्रता शोधा या सल्ल्याचे आपण का पालन करत राहिले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
बायबल अभ्यास व मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे तुम्ही यहोवाला शोधत आहात का?
[२१ पानांवरील चित्र]
सतत यहोवाला शोधत राहिल्यामुळे एक मोठा लोकसमुदाय त्याच्या क्रोधाच्या दिवशी बचावला जाईल