आतापर्यंत यहोवानेच सांभाळले
जीवन कथा
आतापर्यंत यहोवानेच सांभाळले
फोरेस्ट ली यांच्याद्वारे कथित
पोलिसांनी नुकतेच आमचे ग्रामोफोन आणि बायबल साहित्य जप्त केले होते. त्या दरम्यान दुसरे महायुद्ध चालू होते. आणि याच निमित्ताने विरोधकांनी कॅनडात नवीनच बनलेल्या गव्हर्नर-जनरलला यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य बेकायदेशीर आहे असे घोषित करण्यास प्रवृत्त केले. तो दिवस होता जुलै ४, १९४०.
या घोषणेचा आमच्यावर काहीच परिणाम झाला नाही; आमच्या साहित्याचा साठा होता तेथून आम्हाला साहित्य मिळत गेले आणि आम्हीसुद्धा प्रचार करत राहिलो. बाबांचे त्या वेळेचे शब्द मी कधीच विसरणार नाही. ते म्हणाले: “आम्हाला इतक्या सहजासहजी थांबवता येणार नाही. कारण प्रचार करायची आज्ञा आम्हाला थेट यहोवा देवाकडून मिळाली आहे.” त्या वेळी मी अवघ्या दहा वर्षांचा होतो आणि फार उत्साहीसुद्धा होतो. बाबांनी सेवेबद्दल दाखवलेला करारीपणा आणि उत्साह आज देखील याची सतत आठवण करून देतो की, यहोवा देव आपल्या विश्वासू जणांना सांभाळतो.
काही काळानंतर पुन्हा पोलिसांनी आम्हाला अडवले तेव्हा त्यांनी आमचे साहित्य आमच्याकडून काढून घेतले आणि सोबत बाबांनाही तुरुंगात नेले. मागे फक्त आम्ही चौघे भावंडे व आई राहिलो. ही घटना सप्टेंबर १९४० मध्ये सॅस्काटचेवन येथे घडली. त्यानंतर लगेचच मला शाळेतून काढण्यात आले कारण बायबलच्या शिकवणींनुसार माझ्या विवेकाला पटत नसल्यामुळे मी ध्वजवंदन करत नव्हतो किंवा राष्ट्रगीत गात नव्हतो. मग मी बाहेरून शाळा करू लागलो. त्यामुळे माझ्याजवळ वेळ होता आणि प्रचारकार्यात मी जास्त सहभाग घेऊ शकलो.
सन १९४८ मध्ये, कॅनडाच्या पूर्व किनारपट्टीवर जाऊन कार्य करण्यासाठी आणखी पायनियरांची (यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण-वेळेची सेवा करणारे) गरज आहे अशी मागणी करण्यात आली. मी लगेच नोव्हा स्कॉटियातील हॅलिफॅक्स
आणि प्रिन्स एडवर्ड आयलंडवरील केप वुल्फ येथे पायनियरींग करायला गेलो. त्यानंतरच्या वर्षी, टोरोंटो येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात दोन आठवडे काम करण्यासाठी मी होकार दिला. दोन आठवडे म्हणता म्हणता मी तेथे सहा वर्षे सेवा केली; ती माझी सेवा फार फलदायी ठरली. शेवटी, मला मर्ना भेटली; यहोवाविषयी तिला देखील प्रेम होते. डिसेंबर १९५५ साली आमचा विवाह झाला. आम्ही ओन्टारियो येथील मिल्टन येथे स्थायिक झालो आणि लागलीच तेथे एक नवीन मंडळी बनली. आमच्या घराचा तळमजला राज्य सभागृह बनले.सेवाकार्य वाढवण्याची इच्छा
त्यानंतरच्या वर्षांमध्ये आम्हाला एकामागोमाग एक अशी सहा मुले झाली. सर्वात आधी आमची मुलगी मिरियम ही झाली. मग शारमेन, मार्क, ॲनेट, ग्रँट आणि शेवटी ग्लेन झाला. मी कामावरून घरी आलो की हे सगळेजण जमिनीवर शेकोटीच्या शेजारी गोल बसलेले असायचे. आणि मर्ना त्यांना बायबलमधून उतारे वाचून, त्यातले अहवाल समजावून सांगत असायची. अशाप्रकारे ती त्यांच्या मनात यहोवाविषयी खरे प्रेम बिंबवत होती. तिच्या मदतीमुळे म्हणता येईल की, आमच्या सर्व मुलांना अगदी कोवळ्या वयातच बायबलचे बऱ्यापैकी ज्ञान होते.
माझ्या बाबांनी सेवेबद्दल दाखवलेला आवेश माझ्या मनात आणि अंतःकरणात जणू रुजला होता. (नीतिसूत्रे २२:६) त्यामुळे, १९६८ साली, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत जाऊन प्रचार कार्यात मदत करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबांना विचारण्यात आले तेव्हा आमच्या कुटुंबाने तयारी दर्शवली. तोपर्यंत आमची मुले ५ ते १३ या वयातली होती आणि आमच्यापैकी कोणालाही स्पॅनिश भाषेतले एक अक्षरही ठाऊक नव्हते. दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील राहणीमान कसे आहे ते पाहून आलो. मी परतल्यावर आम्ही सर्वांनी प्रार्थनापूर्वक सर्व ठिकाणांचा विचार केला आणि शेवटी निकाराग्वाला जाण्याचा निर्णय घेतला.
निकाराग्वातील सेवा
ऑक्टोबर १९७० पर्यंत आम्ही आमच्या नवीन घरात आलो होतो आणि तीन आठवड्यांच्या आत मला मंडळीतल्या सभेमध्ये एक लहानसा भाग देखील सादर करायला मिळाला. माझ्या तोडक्यामोडक्या स्पॅनिशमध्ये मी मुश्किलीने भाषण दिले आणि शेवटी म्हणालो, ‘शनिवारी सकाळी ९.३० वाजता सगळ्यांनी आमच्या घरी सर्वेसासाठी यावे.’ खरे तर मला सर्व्हिस्यो म्हणायचे होते म्हणजे क्षेत्र सेवा पण मी बियर पिण्यासाठी या असे म्हणत होतो. भाषा शिकणे खरोखरच एक आव्हान होते!
सुरवातीला मी माझ्या हातावर सादरता लिहून घ्यायचो आणि दुसऱ्या घरी जाईपर्यंत ती पाठ करायचो. मी म्हणायचो: “या पुस्तकाबरोबर मोफत गृह बायबल अभ्यास देखील मिळेल.” एकदा एक गृहस्थ अभ्यास करायला तयार झाले पण नंतर त्यांनी मला सांगितले मी त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो हे जाणून घेण्यासाठीच खास ते सभांना आले होते. शेवटी हे गृहस्थ यहोवाचे साक्षीदार बनले. नम्र लोकांच्या १ करिंथकर ३:७.
अंतःकरणात सत्याचे बी वाढवणारा देवच आहे हे यावरून किती स्पष्ट होते! प्रेषित पौलानेही हे मान्य केले.—मनाग्वा या राजधानी शहरात जवळजवळ दोन वर्षे राहिल्यावर आम्हाला निकाराग्वाच्या दक्षिण भागात जायला सांगण्यात आले. तेथे आम्ही रिव्हास मंडळीसोबत आणि आसपासच्या परिसरातील आस्थेवाईक लोकांच्या गटांसोबत सेवा करत होतो. या गटांना भेट देताना माझ्यासोबत पेड्रो पेन्या नावाचे एक विश्वासू, वयस्क साक्षीदार यायचे. असाच एक गट लेक निकाराग्वाच्या ज्वालामुखी द्वीपावर होता; तेथे यहोवाच्या साक्षीदारांचे केवळ एक कुटुंब होते.
हे कुटुंब गरीब असले तरीही आमच्याबद्दल कदर दाखवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आम्ही संध्याकाळी पोचल्या पोचल्या आमच्यासाठी जेवण तयार होते. आम्ही त्यांच्यासोबत एक आठवडा राहिलो. तेथे बायबलबद्दल प्रेम असलेल्या पुष्कळ लोकांनी आम्हाला जेवण दिले. रविवारच्या दिवशी १०१ लोक जाहीर भाषणासाठी उपस्थित होते हे पाहून तर आम्ही खूपच आनंदित झालो.
आणखी एकदा आम्ही कोस्टा रिकाच्या सीमेजवळ पर्वतांमध्ये असलेल्या आस्थेवाईक लोकांच्या गटाला भेट द्यायला गेलो होतो तेव्हा देखील यहोवाने आम्हाला तग धरून राहण्यास मदत केली असे मला वाटते. त्या दिवशी पेड्रो मला घ्यायला आले तर मला मलेरिया झालेला. मी म्हणालो, “मला नाही येता येणार पेड्रो.” मग त्याने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले: “तुला चांगला ताप आहे, पण तू तर आलंच पाहिजे! आपले बांधव आपली वाट पाहत असणार.” मग त्यांनी इतक्या कळकळीची प्रार्थना केली की काय सांगू. अशी प्रार्थना मी कधीच ऐकली नव्हती.
त्यानंतर मी म्हणालो: “जा, तुम्ही फ्रेस्को (फळाचा रस) घ्या. मी दहा मिनिटांत तयार होऊन येतो.” आम्ही ज्या भागात गेलो तेथे दोन साक्षीदार कुटुंबे राहत होती. त्यांनी आमची खूप छान काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी, मी तापामुळे कमजोर होतो तरीही त्यांच्यासोबत प्रचाराला गेलो. आमच्या रविवारच्या सभेला शंभरहून अधिक लोक आलेले पाहून आम्हाला खूप उत्तेजन मिळाले.
पुन्हा एकदा स्थलांतर
सन १९७५ मध्ये आमचा सातवा मुलगा व्हॉन जन्माला आला. त्यानंतरच्या वर्षी आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे कॅनडाला पुन्हा परतावे लागले. निकाराग्वा सोडून येताना खूप दुःख झाले कारण आम्हाला यहोवाने तग धरून राहण्यास मदत केली होती हे आम्ही खरोखर अनुभवले होते. आम्ही निकाराग्वा सोडले तेव्हा आमच्या मंडळीच्या क्षेत्रातले ५०० हून अधिक लोक सभांना येत होते.
आमची मुलगी मिरियम आणि मला निकाराग्वामध्ये खास पायनियर करण्यात आले होते तेव्हा एकदा मिरियम मला म्हणाली: “पप्पा, तुम्हाला जर कॅनडाला परत जावे लागले तर तुम्ही मला इथं राहू द्याल का?” त्या वेळी मी जाण्याचा कधी विचारच केला नव्हता म्हणून मी म्हणालो होतो: “हो, जरूर देईन!” त्यामुळे, आम्ही सगळे कॅनडाला परतलो पण मिरियम तेथेच पूर्ण-वेळेच्या सेवेत राहिली. नंतर तिचा विवाह ॲन्ड्रू रीड याच्याशी झाला. १९८४ साली ते गिलियडच्या (यहोवाच्या साक्षीदारांची मिशनऱ्यांसाठी असलेली प्रशाला) ७७ व्या वर्गात होते. त्या वेळी ही प्रशाला न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथे होती. मिरियम आता आपल्या पतीबरोबर डॉमिनिकन रिपब्लिक येथे कार्य करते; हे उत्तेजन तिला निकाराग्वाच्या मिशनऱ्यांनी दिले होते आणि तेव्हापासून तिचे ते स्वप्न होते.
पण मला सतत बाबांचे ते शब्द लक्षात यायचे: “आम्हाला सहजासहजी थांबवता येणार नाही.” म्हणून १९८१ पर्यंत, मध्य अमेरिकेला पुन्हा जाण्याइतका आमच्याजवळ पैसा साठवल्यावर आम्ही परत एकदा स्थलांतर केले. पण या वेळी आम्ही कोस्टा रिकाला गेलो. तेथे सेवा करत असताना त्यांच्या नवीन शाखेच्या बांधकामात हातभार लावायला आम्हाला आमंत्रित करण्यात आले. १९८५ साली, आमचा मुलगा ग्रँट याच्या वैद्यकीय उपचारासाठी आम्ही पुन्हा एकदा कॅनडाला गेलो. शाखेच्या बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी ग्लेन, कोस्टा रिकातच राहिला आणि ॲनट व शारमेन खास पायनियर म्हणून सेवा करू लागले. कोस्टा रिका सोडताना ही आमची अखेरची वेळ असेल असा आम्ही विचारही केला नव्हता.
संकटाचा सामना
सप्टेंबर १७, १९९३ चा दिवस उजाडला. छान ऊन पडले होते. आमचा थोरला मुलगा मार्क आणि मी छतावर कौले बसवत होतो. आम्ही दोघे नेहमीप्रमाणे आध्यात्मिक विषयांबद्दल बोलत बोलत आपले काम करत होतो. एवढ्यात माझा तोल कसा गेला कोण जाणे आणि मी एकदम छतावरून घसरून खाली आपटलो. शुद्धीवर आल्यावर मला लख्ख प्रकाशाचे दिवे आणि पांढऱ्या झग्यांमधील लोक दिसत होते. तो दवाखान्यातला तातडीचा सेवा वॉर्ड होता.
त्या क्षणी माझ्या मनात एकदम बायबलची वचने आठवली आणि मी म्हणू लागलो: “मला रक्त देऊ नका. रक्त देऊ नका!” (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) पण कुणीकडून मला शारमेनचा आवाज ऐकू आला आणि मला हायसे झाले. ती म्हणाली: “घाबरू नका पप्पा, आम्ही सगळे इथंच आहोत.” मला नंतर कळाले की, डॉक्टरांनी माझे नो-ब्लड कार्ड पाहिले होते आणि नाहीतरी रक्ताचा प्रश्नच उठला नव्हता. माझी मान मुरगळली होती आणि माझ्या पूर्ण शरीराला लकवा मारला होता. त्यामुळे मला श्वास घेणेसुद्धा कठीण होऊन बसले होते.
मला काही हालचाल करता येत नव्हती; अशा स्थितीत मला तग धरून राहण्यासाठी यहोवाची पूर्वीपेक्षा जास्त मदत लागली. माझे घशाचे ऑपेरेशन केल्यामुळे अर्थात श्वास घेण्यासाठी घशात ट्यूब घातल्यामुळे स्वरतंतूंना पोचणाऱ्या हवेत अडथळा झाला होता. त्यामुळे मला बोलता येईना. माझ्या ओठांची हालचाल पाहून मला काय बोलायचे आहे ते लोक समजून घेत असत.
आमचा खर्च दिवसागणिक वाढू लागला. माझी पत्नी आणि आमची बहुतेक मुले पूर्ण-वेळेच्या सेवेतच असल्यामुळे खर्चपाण्यासाठी त्यांना आपली सेवा सोडावी लागते की काय असे मला वाटायचे. परंतु, त्याच दरम्यान मार्कला एक काम मिळाले ज्यामुळे पुष्कळसा खर्च तीन महिन्यातच भागला. त्यामुळे, माझी पत्नी आणि मला सोडून बाकी सर्वांना पूर्ण-वेळेच्या सेवेत राहता आले.
दवाखान्यातल्या माझ्या खोलीत सहा विविध देशांमधील लोकांनी पाठवलेले शेकडो कार्ड भिंतींवर सगळीकडे लावले होते. यहोवा खरोखर मला सांभाळत होता. मी दवाखान्यातल्या अतिदक्षता विभागात साडेपाच महिने होतो. त्या दरम्यान, आमच्या मंडळीनेसुद्धा माझ्यासाठी जेवणाचे डबे पाठवून आम्हाला पुष्कळ मदत केली. दररोज एक ख्रिस्ती वडील दुपारच्या वेळी माझ्यासोबत राहून बायबल किंवा बायबलवर आधारित प्रकाशनांमधून मला काही वाचून दाखवत असत आणि उत्तेजनात्मक अनुभव देखील सांगत असत. माझ्या कुटुंबातले दोन सदस्य माझ्यासोबत मंडळीच्या प्रत्येक सभेची तयारी करत असत. त्यामुळे, आध्यात्मिक भोजन चुकवण्याचा कधी प्रसंगच आला नाही.
मी दवाखान्यात असतानाच माझ्यासाठी खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्या संपूर्ण दिवसासाठी माझ्यासोबत एक रेजिस्टर्ड नर्स आणि एक रेस्पिरेटरी टेक्निशियनला पाठवण्याची दवाखान्याने व्यवस्था केली. माझ्या ख्रिस्ती
बंधू-बहिणींना पुन्हा एकदा भेटण्याचा तो केवढा मोठा आनंद होता! शेकडो बंधूबहिणी मला भेटायला कसे ओळीने उभे राहिले होते ते दृश्य मी कधीच विसरणार नाही.आध्यात्मिकता शाबूत ठेवणे
माझा हा अपघात होऊन एक वर्ष झाल्यावर मी घरी जाऊ शकलो. परंतु, अजूनही माझी काळजी घेण्यासाठी कोणाला तरी माझ्यासोबत २४ तास राहावे लागते. माझ्यासाठी एक खास व्हॅन असल्यामुळे मी सभांना जाऊ शकतो. सहसा मी सभा कधीच चुकवत नाही. पण हे इतके सोपे नाही, त्यासाठी फार जिद्द असावी लागते. घरी आल्यापासून मला सगळ्या प्रांतीय अधिवेशनांना जाता आले आहे.
फेब्रुवारी १९९७ मध्ये मला थोडेफार बोलता येऊ लागले. मी माझ्या काही नर्सेसना बायबलमधील आशेविषयी सांगतो तेव्हा त्या फार लक्षपूर्वक ऐकतात. एका नर्सने तर जेहोवाज विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंगडम हे सबंध पुस्तक आणि इतरही वाचटावर संस्थेची काही प्रकाशने मला वाचून दाखवली आहेत. लोकांसोबत बोलताना मी कम्प्युटरवर एका काठीच्या साहाय्याने टाईपींग करतो. हे फार त्रासदायक आहे पण सेवाकार्यात भाग घ्यायला मिळतो याचेच मला खूप समाधान वाटते.
माझ्या नसांमधून मला खूप वेदना होतात. पण, लोकांना बायबलमधील सत्याबद्दल सांगताना किंवा इतरजण बायबलशी संबंधित काहीही मला वाचून दाखवत असतात तेव्हा माझे हे दुखणे कुठेतरी दूर पळून जाते. कधीकधी मी रस्त्यावरील साक्षकार्य करतो. माझी बायको मला साथ देते आणि गरज पडलीच तर मला बोलताना मदत करते. पुष्कळदा मी साहाय्यक पायनियरींग केली आहे. शिवाय, एक ख्रिस्ती वडील या नात्याने सेवा करण्यातही मला खूप आनंद मिळतो; खासकरून बांधव जेव्हा सभांमध्ये किंवा घरामध्ये मला येऊन भेटतात आणि मीसुद्धा त्यांना मदत किंवा उत्तेजन देऊ शकतो तेव्हा.
पण, नेहमी हसमुख राहणे फार कठीण आहे हे मला मान्य करावेच लागेल. म्हणून मी दुःखी झालो की लगेच देवाला प्रार्थना करून मला आनंदी ठेव असे सांगतो. मला यातून तग धरून राहण्यास मदत करावी म्हणून मी रात्रंदिवस यहोवाला प्रार्थना करतो. मला कोणाचे पत्र मिळते किंवा कोणी भेटायला येते तेव्हा नेहमी आनंद होतो. टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! मासिक वाचल्यानेही माझ्या मनात चांगले विचार येत राहतात. काही वेळा, वेगवेगळ्या नर्सेस मला ही मासिके वाचून दाखवत असतात. माझा अपघात झाल्यापासून, मी कॅसेटवर संपूर्ण बायबल सात वेळा ऐकले आहे. या विविध मार्गांनी यहोवाने मला सांभाळले आहे.—स्तोत्र ४१:३.
माझी अशी परिस्थिती असल्यामुळे आपला महान शिक्षक, यहोवा देव आपल्याला जीवनाचे शिक्षण कसे देतो यावर मनन करायला माझ्याजवळ पुष्कळ वेळ असतो. तो आपल्याला त्याची इच्छा, त्याचे उद्देश काय ते सांगतो, आनंदी कुटुंबाच्या रहस्याविषयी सल्ला देतो, संकटकाळी काय करावे ते सांगतो तसेच त्याने आपल्याला अर्थपूर्ण सेवाकार्य देखील दिले आहे. यहोवाने मला एक विश्वासू आणि चांगली पत्नी दिली आहे. माझ्या मुलांनी देखील मला आधार दिला आहे आणि माझ्या प्रत्येक मुलाने पूर्ण-वेळेची सेवा अनुभवली आहे याचा मला सर्वात जास्त आनंद होतो. मार्च ११, २००० रोजी आमचा मुलगा मार्क आणि त्याची पत्नी ॲलीसन गिलियड प्रशालेच्या १०८ व्या वर्गातून पदवीधर झाले आणि त्यांना निकाराग्वाला पाठवण्यात आले. माझी पत्नी आणि मी पदवीदान दिवशी हजर राहू शकलो. अपघाताने माझे जीवन बदलले परंतु मन बदलले नाही हे मी निश्चयाने सांगू शकतो.—स्तोत्र १२७:३, ४.
मला मिळालेला आध्यात्मिक वारसा माझ्या कुटुंबाला देण्याची मला बुद्धी मिळाली याबद्दल मी यहोवाचे आभार मानतो. “आम्हाला इतक्या सहजासहजी थांबवता येणार नाही. कारण प्रचार करायची आज्ञा आम्हाला थेट यहोवा देवाकडून मिळाली आहे” अशी माझ्या बाबांसारखीच मनोवृत्ती राखून माझी मुलेही निर्माणकर्त्याची सेवा करताहेत हे पाहून मला खूप उत्तेजन मिळते. खरेच यहोवाने मला आणि माझ्या कुटुंबाला आतापर्यंत सांभाळले आहे.
[२४ पानांवरील चित्र]
आमच्या चाकांवरील घराशेजारी बाबा, माझे भाऊ आणि माझी बहीण यांच्यासोबत पायनियरींग करत असताना. मी एकदम उजवीकडे आहे.
[२६ पानांवरील चित्र]
माझी पत्नी मर्ना हिच्यासोबत
[२६ पानांवरील चित्र]
आमच्या कुटुंबाचा अलीकडेच काढलेला एक फोटो
[२७ पानांवरील चित्र]
मी अजूनही पत्रांद्वारे लोकांना साक्ष देतो