व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक परादीस काय आहे?

आध्यात्मिक परादीस काय आहे?

आध्यात्मिक परादीस काय आहे?

गुस्ताव्होचे, लहानपण ब्राझीलमधील एका लहान नगरात गेले. * सगळे चांगले लोक मेल्यावर स्वर्गात जातात असे त्याच्या बाल मनावर कोरले गेले होते. पण, देवाला विश्‍वासू राहणाऱ्‍या मानवजातीला पृथ्वीवरील एका परादीसात परिपूर्ण जीवन मिळेल या देवाच्या उद्देशाबद्दल त्याला काहीच ठाऊक नव्हते. (प्रकटीकरण २१:३, ४) त्याशिवाय, आतासुद्धा आपण आध्यात्मिक परादीसात राहू शकतो याची त्याला काहीच कल्पना नव्हती.

तुम्हीसुद्धा आध्यात्मिक परादीसविषयी कधी ऐकले आहे का? ते नेमके काय आहे आणि त्यात असण्यासाठी काय केले पाहिजे याची तुम्हाला कल्पना आहे का? खऱ्‍या अर्थाने आनंदी व्हायचे असल्यास या परादीसविषयी जाणून घेणे आवश्‍यक आहे.

आध्यात्मिक परादीस शोधणे

परादीसमध्ये राहणे शक्य आहे असे म्हणणे आजच्या काळात वास्तविक वाटत नाही. या जगाला परादीस म्हणताच येणार नाही. उलट, पुष्कळांची दशा एका प्राचीन इब्री राजाने म्हटल्याप्रमाणे आहे; तो म्हणाला होता: “तो पाहा, गांजलेल्यांचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.” (उपदेशक ४:१) आजच्या राजकीय, धार्मिक आणि आर्थिक संस्थांचा भ्रष्टाचार कोट्यवधी लोकांना सहन करावा लागतो; यातून त्यांची सुटका नाही, त्यांचे “सांत्वन करणारा” कोणी नाही. कित्येकांना खर्च भागवण्यासाठी, मुलांना वाढवण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यांना कोणी सांत्वन दिले किंवा त्यांचे ओझे जरा हलके केले तर त्यांना किती दिलासा मिळेल. अशा या लोकांसाठी परादीस फार दूरची गोष्ट आहे.

मग हे आध्यात्मिक परादीस कोठे आहे? “परादीस” असे भाषांतरित केलेल्या ग्रीक आणि इबी शब्दांचा अर्थ बगीचा किंवा बाग, विश्रामासाठी आणि मनाला तजेला देण्यासाठी असलेले शांतीमय ठिकाण असा होतो. एक दिवशी या पृथ्वीचे रूपांतर अशाच एका सुंदर परादीसात होईल असे बायबल वचन देते. ते पापमुक्‍त मानवजातीकरता एक बगीच्यासमान घर असेल. (स्तोत्र ३७:१०, ११) यावरून लक्षात येते की, आध्यात्मिक परादीस हे डोळ्यांना प्रसन्‍न करणारे आणि मनाला शांती-समाधान देणारे वातावरण आहे जेथे प्रत्येक व्यक्‍ती आपल्या सोबत राहणाऱ्‍या लोकांबरोबर आणि देवाबरोबर शांती अनुभवू शकते. हे परादीस आजही हयात आहे. गुस्ताव्होला ते प्राप्त झाले तसेच अनेकांना ते प्राप्त होत आहे.

बारा वर्षांचा असताना गुस्ताव्होने ठरवले की आपण रोमन कॅथोलिक पाळक बनायचे. आईवडिलांची संमती मिळाल्यावर त्याने सेमिनरीत प्रवेश घेतला. तेथे गेल्यावर तो संगीत, सिनेमा आणि राजकारण या गोष्टींमध्ये जास्त रस घेऊ लागला कारण युवकांना आकर्षित करण्यासाठी चर्चने या गोष्टींना उत्तेजन दिले होते. गुस्ताव्होला ठाऊक होते की, पाळक, लोकांची सेवा करण्यासाठी असतात आणि ते लग्न करू शकत नाहीत. परंतु, काही पाळक आणि सेमिनरीत शिकणारे काहीजण अनैतिक गोष्टी आचरीत होते. अशा सगळ्या वातावरणात त्याला पिण्याचे व्यसन लागले. स्पष्टतः, तो आध्यात्मिक परादीसात नव्हता.

एकदा, गुस्ताव्होने एक बायबल आधारित पत्रिका वाचली; त्यात पृथ्वीवरील परादीसविषयी सांगितले होते. यामुळे तो जीवनाच्या उद्देशाविषयी विचार करू लागला. तो म्हणतो: “मी नियमितपणे बायबल वाचायला सुरवात केली पण मला काहीच कळत नव्हतं. देवाचं एक नाव आहे हेसुद्धा मला ओळखता आलं नाही.” त्याने सेमिनरी सोडली आणि तो यहोवाच्या साक्षीदारांकडे बायबलची समज प्राप्त करायला गेला. बघता बघता त्याने प्रगती केली आणि आपले जीवन देवाला समर्पित केले. आध्यात्मिक परादीसबद्दल गुस्ताव्हो शिकत होता.

देवाच्या नावाकरता असलेले लोक

गुस्ताव्होला कळाले की, देवाचे यहोवा हे नाव कोणा बायबल विद्यार्थ्यासाठी केवळ आस्थेचा विषय नाही. (निर्गम ६:३) तर ते खऱ्‍या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. येशूने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करायला शिकवली होती: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) ख्रिस्ती बनलेल्या विदेश्‍यांविषयी बोलताना प्रेषित याकोब म्हणाला: “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट . . . घेतली.” (प्रेषितांची कृत्ये १५:१४) पहिल्या शतकामध्ये, ख्रिस्ती मंडळीतले लोक ‘त्याच्या नावाकरता असलेले लोक’ होते. पण, आज देवाच्या नावाकरता असलेले लोक आहेत का? होय आहेत आणि गुस्ताव्होने ओळखले की, यहोवाचे साक्षीदार ते लोक आहेत.

यहोवाचे साक्षीदार २३५ देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये कार्य करत आहेत. त्यांची संख्या ६० लाखापेक्षा अधिक आहे आणि याशिवाय ८० लाख आस्थेवाईक त्यांच्या सभांना उपस्थित राहिले आहेत. प्रचार कार्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे साक्षीदार येशूच्या शब्दांची पूर्णता करतात: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आपल्याला आध्यात्मिक परादीस सापडले असे गुस्ताव्होला का वाटले? तो म्हणतो: “जगाचे वातावरण आणि खासकरून सेमिनरीतले वातावरण याची तुलना मी यहोवाच्या साक्षीदारांमधील वातावरणाशी केली. तेव्हा मला खूप मोठा फरक दिसून आला; साक्षीदारांमध्ये मला खरं प्रेम दिसून आलं.”

इतरांनीही यहोवाच्या साक्षीदारांविषयी असेच म्हटले आहे. ब्राझीलची एक तरुणी मिरियम म्हणाली: “मला आनंदी असणं म्हणजे काय असतं हे माहीतच नव्हतं; माझ्या कुटुंबात देखील मला कधीच आनंद वाटला नव्हता. सर्वात पहिल्यांदा मला प्रेमाचा प्रत्यय आला तो यहोवाच्या साक्षीदारांमध्ये.” ख्रिश्‍चन नावाच्या एका गृहस्थाने म्हटले: “अधूनमधून मी जादूटोणा करायचो पण धर्माबद्दल मला फारसे महत्त्व वाटत नव्हते. समाजातले माझे स्थान आणि माझे इंजिनियरींगचे काम हे मला जास्त महत्त्वाचे होते. पण, माझ्या पत्नीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करायला सुरवात केली तेव्हा मला तिच्यात बदल दिसून येऊ लागला. तिला भेटायला येणाऱ्‍या आनंदी आणि आवेशी ख्रिस्ती स्त्रियांना पाहून मी खूप प्रभावित झालो.” यहोवाच्या साक्षीदारांविषयी लोक असे उद्‌गार का काढतात?

आध्यात्मिक परादीस काय आहे?

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये ठळक दिसून येणारी एक गोष्ट म्हणजे बायबलच्या ज्ञानाबद्दल त्यांची कदर. बायबल हे सत्य पुस्तक आणि देवाचे वचन आहे असे ते मानतात. त्यामुळे, आपल्या धर्मातील फक्‍त मूलभूत गोष्टी जाणून घेण्यात ते समाधान मानत नाहीत. ते नियमितपणे व्यक्‍तिगत अभ्यास आणि बायबल वाचन करतात. एखाद्या व्यक्‍तीचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत जितका जास्त सहवास असेल तितकेच तिला देवाबद्दल आणि बायबलमध्ये सांगितल्यानुसार त्याच्या इच्छेबद्दल शिकायला मिळते.

या ज्ञानामुळे, लोकांचा आनंद हिरावणाऱ्‍या अंधविश्‍वासांपासून आणि हानीकारक कल्पनांपासून यहोवाचे साक्षीदार मुक्‍त झाले आहेत. येशू म्हणाला: “सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील” आणि यहोवाच्या साक्षीदारांना याचा प्रत्यय आला आहे. (योहान ८:३२) एके काळी जादूटोणा करणाऱ्‍या फर्नांडोने म्हटले: “सार्वकालिक जीवनाविषयी शिकून मनाला खूप दिलासा मिळाला. मला सारखी भीती वाटायची की, एकतर माझे आईवडील मरतील नाहीतर मी तरी मरेन.” सत्य जाणून घेतल्यामुळे फर्नांडो, आत्मिक जगाच्या आणि मृत्यूनंतरच्या तथाकथित जीवनाच्या भीतीपासून मुक्‍त झाला.

बायबलमध्ये, देवाच्या ज्ञानाचा परादीसशी निकटचा संबंध जोडण्यात आला आहे. संदेष्टा यशया म्हणाला: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.

अर्थात, फक्‍त ज्ञान घेतल्याने यशयाने भाकीत केलेली शांती मिळेल असे नाही. तर शिकलेल्या गोष्टींवर कार्य करण्याची गरज आहे. फर्नांडोच्या मते “आत्म्याचे फळ विकसित करणारी व्यक्‍ती आध्यात्मिक परादीसात भर घालत असते.” फर्नांडो प्रेषित पौलाच्या शब्दांबद्दल उद्देशून बोलत होता ज्याने ख्रिस्ती व्यक्‍तीमध्ये आवश्‍यक असलेल्या चांगल्या गुणांना “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” म्हटले. त्यामध्ये, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” हे गुण आहेत.—गलतीकर ५:२२, २३.

हे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांच्या समाजासोबत सहवास राखणे परादीसमय परिस्थितीत असल्यासारखे का असेल याचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळाले का? या लोकांमध्ये संदेष्ट्या सफन्याने भाकीत केलेले आध्यात्मिक परादीस असेल. तो म्हणाला: “इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखांत कपटी जिव्हा आढळावयाची नाही; ते चरतील व विश्रांति मिळवतील, कोणी त्यांस भेवडावणार नाही.”—सफन्या ३:१३.

प्रेमाची महत्त्वपूर्ण भूमिका

तुमच्या लक्षात आले असेल की, पौलाने उल्लेखिलेल्या आत्म्याच्या फळांमध्ये सर्वात प्रथम प्रीतीचा उल्लेख केला आहे. या गुणाविषयी बायबलमध्ये पुष्कळ माहिती दिली आहे. येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) अर्थात, यहोवाच्या साक्षीदारांकडून काही चुका होतच नाहीत अशातली गोष्ट नाही. येशूच्या प्रेषितांमध्ये जशा समस्या होत्या तशाच समस्या त्यांच्यामध्येही काहीवेळा असतात. पण त्यांचे एकमेकांवर खरे प्रेम आहे आणि हा गुण दाखवताना ते पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करतात.

त्यामुळे त्यांचा हा समाज एकदम अनोखा आहे. त्यांच्यामध्ये जातीभेद किंवा राष्ट्रभेद नाही. उलट, २० व्या शतकाच्या शेवटल्या वर्षांमध्ये जातीभेद आणि वंशभेदामुळे मारहाण सुरू झाली तेव्हा पुष्कळ साक्षीदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एकमेकांना वाचवले. “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी” ते असले तरी त्यांच्यात इतके ऐक्य कसे आहे हे स्वतःहून अनुभवल्याशिवाय समजणे कठीण आहे.—प्रकटीकरण ७:९.

देवाची इच्छा करणाऱ्‍यांमध्ये परादीस

आध्यात्मिक परादीसमध्ये लोभ, अनैतिकता आणि स्वार्थीपणा यांच्यासाठी कोणतेही स्थान नाही. ख्रिश्‍चनांना सांगितले जाते: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) आपली वर्तणूक योग्य असते आणि आपण इतर मार्गांतही देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो तेव्हा आपण आध्यात्मिक परादीसाचा विस्तार करत असतो आणि स्वतःचा आनंदही वृद्धिंगत करत असतो. कार्ला नावाच्या एका स्त्रीला हाच अनुभव आला. ती म्हणते: “स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी माझ्या बाबांनी मला कष्ट करायला शिकवले. मी प्राप्त केलेल्या पदव्यांमुळे मला थोडीफार सुरक्षितता वाटत होती तरी कुटुंबातल्या एकतेचा आणि केवळ देवाच्या वचनाच्या ज्ञानाने मिळणाऱ्‍या सुरक्षिततेचा अनुभव मला आला नव्हता.”

अर्थात, आध्यात्मिक परादीसात असल्यामुळे जीवनातल्या समस्या नाहीशा होत नाहीत. ख्रिश्‍चनांना आजारपण येतेच. ते जेथे राहतात त्या राष्ट्रात अशांतता निर्माण होऊ शकते. पुष्कळजण तर गरिबीतही दिवस कंठत आहेत. परंतु, यहोवा देवासोबत जवळचा नातेसंबंध (जो की आध्यात्मिक परादीसाचा भाग बनण्यासाठी आवश्‍यक आहे) असला की आपण मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. किंबहुना तो असे म्हणतो की, ‘तू आपला भार माझ्यावर टाक.’ अत्यंत कठीण परिस्थितीत देवाकडून अद्‌भुत रीतीने मिळालेल्या मदतीचा अनेकांना प्रत्यय आला आहे. (स्तोत्र ५५:२२; ८६:१६, १७) ‘मृत्यूच्छायेच्या दरीतून’ जात असतानाही मी तुमच्याबरोबर आहे अशी हमी तो आपल्या उपासकांना देतो. (स्तोत्र २३:४) आपली मदत करायला देव सदोदित तयार आहे असा भरवसा बाळगल्याने “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत मिळेल. आणि हेच आध्यात्मिक परादीसात जाण्याचे रहस्य आहे.—फिलिप्पैकर ४:७.

आध्यात्मिक परादीसात भर

बहुतेक लोकांना बागेत जायला आवडते. बागेत उगाच फेरफटका मारायला किंवा बागेतल्या एखाद्या बाकावर नुसते बसून आजूबाजूच्या परिसराचा आनंद लुटायला त्यांना आवडते. त्याचप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांसोबत राहायलाही अनेकांना आवडते. त्यांचा सहवास त्यांना तजेला, शांती-समाधान देणारा वाटतो. एखाद्या बागेला सुंदर स्थितीत ठेवण्यासाठी तिची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे, आजच्या या घाणेरड्या जगात केवळ यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रयत्नांमुळे आणि त्या प्रयत्नांवर देवाचा आशीर्वाद असल्यामुळे आध्यात्मिक परादीस आहे. तर मग, या आध्यात्मिक परादीसात भर कशी घालता येईल?

सर्वात आधी, तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीशी सहवास राखावा लागेल, त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करावा लागेल आणि आध्यात्मिक परादीसाचा पाया असलेले बायबलमधील ज्ञान घ्यावे लागेल. कार्ला म्हणाली: “आध्यात्मिक अन्‍न नसेल तर आध्यात्मिक परादीसही असू शकत नाही.” त्यासाठी देवाच्या वचनाचे नियमित वाचन आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्याची आवश्‍यकता आहे. जे ज्ञान तुम्ही मिळवाल त्याच्या साहाय्याने तुम्ही यहोवा देवाशी आपला नातेसंबंध घनिष्ठ करू शकाल आणि कालांतराने त्याच्यावर प्रेम करू लागाल. तसेच त्याची इच्छा करण्यासाठी त्याच्या मार्गदर्शनासाठी आणि आत्म्याच्या मदतीसाठी तुम्ही त्याला प्रार्थना करू शकाल. येशूने आपल्याला सतत प्रार्थना करायला सांगितले. (लूक ११:९-१३) प्रेषित पौल म्हणाला: “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१७) आपली प्रार्थना देव ऐकत आहे या पूर्ण भरवशानिशी देवाला प्रार्थना करण्याचा सुहक्क म्हणजे आध्यात्मिक परादीसचा महत्त्वाचा भाग आहे.

शिकलेल्या गोष्टींमुळे हळूहळू तुमच्या जीवनात सुधार होईल आणि तुम्हाला या गोष्टी इतरांना सांगाव्याशा वाटतील. असे केल्यास तुम्ही येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन कराल: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) इतरांना यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताविषयी सांगितल्याने आणि त्यांनी मानवजातीला दाखवलेल्या प्रेमाचे गुणगान केल्याने पुष्कळ आनंद लाभतो.

अशी वेळ येत आहे जेव्हा सबंध पृथ्वीच एक परादीस बनेल अर्थात प्रदूषणमुक्‍त बाग बनेल—विश्‍वासू मानवजातीकरता योग्य घर. या ‘कठीण दिवसांमध्येही’ असलेले आध्यात्मिक परादीस देवाच्या शक्‍तीचा पुरावा आहे. तसेच देव काय साध्य करू शकतो आणि भवितव्यात काय करील याची ती झलक आहे.—२ तीमथ्य ३:१.

सध्या देखील, आध्यात्मिक परादीसात असलेले लोक यशया ४९:१० या वचनाची आध्यात्मिक पूर्णता अनुभवत आहेत. तेथे म्हटले आहे: “त्यांस तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन यांची बाधा त्यास होणार नाही; कारण त्यांजवर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झऱ्‍यावर तो त्यांस नेईल.” ही गोष्ट किती खरी आहे ते होसेच्या अनुभवावरून सिद्ध होते. एक सुप्रसिद्ध संगीतकार बनण्याचे त्याचे स्वप्न होते परंतु ख्रिस्ती मंडळीत देवाची सेवा करण्यात त्याला अधिक समाधान मिळाले. तो म्हणतो: “आता माझ्या जीवनाला अर्थ लाभला आहे. ख्रिस्ती बंधूबहिणींसोबत मला सुरक्षितता जाणवते. आणि यहोवा एक प्रेमळ देव आहे, आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो हे मी जाणले आहे.” होसेला वाटणाऱ्‍या आनंदाचे—आणि त्याच्याप्रमाणे इतर लाखो जणांना वाटणाऱ्‍या आनंदाचे वर्णन स्तोत्र ६४:१० मध्ये उचितपणे करण्यात आले आहे: “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंत:करणाचे सर्व जन उल्लास पावतील.” आध्यात्मिक परादीसाचे हे किती सुंदर वर्णन आहे.

[तळटीप]

^ येथे उल्लेखिलेल्या व्यक्‍ती खऱ्‍या आहेत, परंतु काहींची नावे बदलण्यात आली आहेत.

[१० पानांवरील चित्र]

आध्यात्मिक परादीस अनुभवा आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करा!