व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या सुखाचे रहस्य काय

खऱ्‍या सुखाचे रहस्य काय

खऱ्‍या सुखाचे रहस्य काय

बौद्ध धर्माचा एक गुरू, दलाई लामा यांनी म्हटले: “सुखाचा शोध घेणे हाच मूळात आपल्या जीवनाचा उद्देश आहे.” यावर खुलासा करत ते म्हणाले, की आपल्या मनाला आणि हृदयाला प्रशिक्षित केल्यास अथवा शिस्त लावल्यास आपण आयुष्यात सुखी होऊ शकतो. पुढे ते म्हणाले: “परमसुख प्राप्त करण्यासाठी मन असले म्हणजे पुरे.” पण, सुखी होण्यासाठी देवावर विश्‍वास ठेवणे आवश्‍यक नाही असे त्यांचे म्हणणे आहे. *

पण, येशूची शिकवण याच्या अगदी विरोधात होती. देवावर त्याचा अतूट विश्‍वास होता आणि आजवर कोट्यवधी लोकांच्या मनावर त्याच्या शिकवणुकींचा प्रभाव पडला आहे. मानवाच्या सुखासमाधानाची येशूला मनस्वी काळजी होती. म्हणूनच त्याने आपले सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचन नऊ धन्यवादित वचनांनी सुरू केले आणि त्या प्रत्येक वचनाच्या शेवटी “धन्य” असे म्हटले. (मत्तय ५:१-१२) या प्रवचनात त्याने श्रोत्यांना आपल्या मनाचे आणि हृदयाचे परीक्षण करण्यास, ते शुद्ध करण्यास आणि त्यांस शिस्त लावण्यास शिकवले. तसेच, मनातील व हृदयातील हिंसक, अनैतिक आणि स्वार्थी विचारसरणी दूर करून त्या जागी शांतीमय, शुद्ध आणि प्रेमळ विचार रुजवण्यास त्याने सांगितले. (मत्तय ५:२१, २२, २७, २८; ६:१९-२१) त्याच्या एका शिष्याने नंतर सल्ला: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुती त्यांचे [सतत] मनन” आपण केले पाहिजे.—फिलिप्पैकर ४:८.

आयुष्यात खऱ्‍या अर्थाने सुखी होण्यासाठी नातेसंबंध किती महत्त्वाचे असतात याची येशूला कल्पना होती. आपण मानव स्वभावतःच समाजप्रिय आहोत. त्यामुळे आपण फटकून राहिलो; किंवा मग, आपल्या सहवासात वावरणाऱ्‍या लोकांशी आपले नेहमीच खटके उडत राहिले तर आयुष्यात आपण कधीच सुखी होऊ शकणार नाही. इतरांवर भरभरून प्रेम केल्याने आणि इतरांचे प्रेम जिंकल्यानेच आपण सुखी होऊ शकतो. पण, इतरांसोबत असे प्रेमळ नातेसंबंध जोडण्यासाठी प्रथम देवाबरोबर निकटचा नातेसंबंध जोडणे आवश्‍यक आहे. खासकरून या ठिकाणी, येशूच्या आणि दलाई लामाच्या शिकवणुकीत फरक दिसून येतो. कारण देवाला डावलून मनुष्य केव्हाच आनंदी होऊ शकत नाही हे येशूने शिकवले. पण, येशूने असे का म्हटले?—मत्तय ४:४; २२:३७-३९.

आध्यात्मिक गरजांची जाणीव राखा

येशूच्या डोंगरावरील प्रवचनातले एक धन्यवादित वचन म्हणते: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.” (मत्तय ५:३; NW) येशूने असे का म्हटले? कारण आपण मानव सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. आपल्याला आध्यात्मिक गरजा असतात तशा प्राण्यांना नसतात. देवाने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले आहे. त्या अर्थी प्रेम, न्याय, दया आणि बुद्धी हे गुण आपण काही प्रमाणात नक्कीच विकसित करू शकतो. (उत्पत्ति १:२७; मीखा ६:८; १ योहान ४:८) आपल्या आध्यात्मिक गरजांमध्ये जीवनात उद्देश असण्याची गरज देखील समाविष्ट होते.

मग, या आध्यात्मिक गरजा आपण कशा तृप्त करू शकतो? मंत्राचा जप करून किंवा आत्म-परीक्षण करून नव्हे. तर येशूने म्हटले त्याप्रमाणे: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४) येशूने येथे काय म्हटले ते लक्षात घ्या. त्याने म्हटले, की आपल्या जीवनास आवश्‍यक असणाऱ्‍या ‘प्रत्येक वचनाचा’ स्रोत खुद्द देव आहे. त्यामुळे जीवनातल्या काही प्रश्‍नांची उत्तरे केवळ देवच देऊ शकतो. ही जाणीव आज अधिक उचित आहे कारण या जगात, अर्थपूर्ण आणि सुखी जीवनाबद्दलच्या कल्पनांची काहीएक कमी नाही. आरोग्य, सुबत्ता आणि सुखासमाधानाची हमी देणारी असंख्य पुस्तके दुकानांत उपलब्ध आहेत. हेही कमी म्हणून, इंटरनेटवर आज अशा काही साईट्‌स आहेत ज्या खासकरून सुखासमाधानाची माहिती देतात.

पण, वास्तविकता ही आहे की योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे मानवाचे असे सर्व विचार शेवटी चुकीचे ठरतात. मानवी विचार मुळात स्वार्थी अभिलाषा आणि अहंभाव तृप्त करतात. शिवाय, ते अल्प ज्ञानावर, अल्प अनुभवावर, खोट्या आधारावर व गृहितांवर आधारलेले असतात. उदाहरणार्थ, सेल्फ-हेल्प (आत्म-साहाय्य) पुस्तके लिहिणाऱ्‍या लेखकांच्या अधिकतर कल्पना “उत्क्रांतीवादी मनोविज्ञान” या सिद्धांतावर आधारलेल्या असतात. या सिद्धान्तानुसार मानवी भावनांचे, विचारांचे मूळ त्यांच्या पूर्वजात अर्थात जनावरांमध्ये सापडतात. पण, वास्तविकता ही आहे, की आपल्या निर्माणकर्त्यावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या कोणत्याही सिद्धान्ताच्या आधारावर सुखाचा शोध घेणे व्यर्थ ठरेल आणि सुखाऐवजी शेवटी निराशाच पदरी पडेल. एका प्राचीन भविष्यवक्‍त्‌याने म्हटले: “शहाणे लज्जित होतात, . . . पाहा, परमेश्‍वराचे वचन ते धिक्कारितात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!”—यिर्मया ८:९.

यहोवा देव आपला निर्माणकर्ता असल्यामुळे तो आपल्याला अंतर्बाह्‍य जाणतो आणि कोणती गोष्ट आपल्याला खरे सुखसमाधान देऊ शकते हे देखील केवळ तोच सगळ्यात चांगल्याप्रकारे जाणतो. आपण मनुष्याला पृथ्वीवर का ठेवले आहे आणि मनुष्याचे भविष्य काय आहे याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ही सर्व माहिती त्याने आपल्यासाठी बायबलमध्ये नमूद करून ठेवली आहे. या ईश्‍वर प्रेरित ग्रंथात प्रकट केलेल्या गोष्टी प्रामाणिक अंतःकरणाचे लोक वाचतात तेव्हा त्या त्यांच्या मनाला भिडतात आणि ते मनोमन सुखावतात. (लूक १०:२१; योहान ८:३२) येशूच्या दोन शिष्यांच्या बाबतीत हेच घडले. येशूच्या मृत्यूनंतर ते दोघे फार निराश झाले होते. पण, पुनरुत्थित येशूच्या तोंडून मनुष्याच्या उद्धारासंबंधी असलेल्या देवाच्या उद्देशात त्याची काय भूमिका आहे हे ऐकून त्यांनी म्हटले: “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आंतल्या आत उकळी येत नव्हती काय?”—लूक २४:३२.

जीवनातल्या सुखाची तुलना आपल्याला इंद्रधनुष्याशी करता येईल. वातावरण चांगले असते तेव्हा आपल्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पण, वातावरण अगदीच उत्तम असते तेव्हा तर ते अधिकच तेजस्वी होऊन चक्क दोन इंद्रधनुष्य बनतात. त्याचप्रमाणे, जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपण बायबलचे मार्गदर्शन विचारात घेतो तेव्हा आपल्या जीवनातले सुख-समाधान द्विगुणित होते. बायबलच्या शिकवणुकींचा जीवनात अवलंब केल्याने आपला आनंद कशाप्रकारे द्विगुणित होतो याची काही उदाहरणे आपण पाहू या.

साधेसुधे जीवन जगा

सर्वात प्रथम, संपत्तीच्या बाबतीत येशूने जो सल्ला दिला तो आपण पाहू या. जीवनात धनदौलतीला सर्वाधिक महत्त्व देऊ नये असा सल्ला दिल्यानंतर येशूने एक विलक्षण विधान केले. त्याने म्हटले: “ह्‍यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.” (मत्तय ६:१९-२२) मूळात तो हे सांगत होता, की धनसंपत्ती, सत्ता किंवा अनावश्‍यक ध्येये प्राप्त करण्याची आपण धडपड करत राहिलो तर जीवनातल्या अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींना आपण मुकू. कारण येशूने दुसऱ्‍या एका प्रसंगी म्हटले त्याप्रमाणे, “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) ज्या गोष्टी खऱ्‍याच महत्त्वाच्या आहेत (जसे की देवासोबतचा आपला नातेसंबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या आणि अशा इतर गोष्टी) त्यांना जीवनात प्राधान्य दिल्यास आपला “डोळा निर्दोष” राहील. याचा अर्थ आपल्या जीवनात अनावश्‍यक गोष्टींची गर्दी होणार नाही.

या ठिकाणी, मनुष्याने वैराग्य अथवा संन्यास पत्करावा असे येशू सूचित करत नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. येशू स्वतः देखील संन्यासी नव्हता. (मत्तय ११:१९; १ योहान २:१-११) उलट तो हे शिकवण्याचा प्रयत्न करत होता, की ज्या लोकांच्या जीवनात धनदौलत साठवणे हाच एकमेव उद्देश असतो ते जीवन मिळवण्याची हातची संधी घालवून बसतात.

जीवनाच्या सुरवातीला गडगंज संपत्ती मिळवलेल्यांविषयी बोलताना अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्को शहरातील एका सायकोथेरॅपिस्टने म्हटले की, “तणाव आणि भ्रमनिरास यांचे मूळ कारण आहे पैसा.” हे लोक “बंगला-गाडी आणि इतर वस्तूंवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण, या सगळ्यामुळे त्यांचा हेतू साध्य होत नाही [म्हणजे त्यांना सुख मिळत नाही] तेव्हा ते निराश होतात, त्यांना रितेपणा जाणवतो आणि उरल्या आयुष्याचे काय करावे असा प्रश्‍न त्यांना भेडसावत राहतो.” पण, यांच्या अगदी विरुद्ध, येशूने दिलेल्या सल्ल्यानुसार साधेसुधे जीवन जगणारे आणि आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना जास्त वेळ देणारे लोक अधिक सुखीसमाधानी होतात.

उदाहरणार्थ: टॉम हा हवाईमध्ये एक बिल्डर आहे. प्रशांत बेटांवरील लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तेथील उपासना-स्थळे बांधण्याच्या कामात हातभार लावण्यासाठी तो आपणहून पुढे आला. तिथल्या विनम्र लोकांबद्दल टॉमला काही तरी विशेष जाणवले. तो म्हणतो: “या बेटांवरील माझे ख्रिस्ती बंधूभगिनी खरोखरच किती आनंदी होते. पैसा आणि धनदौलत खऱ्‍या सुखाचं रहस्य नाही हे अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास त्यांनी माझी मदत केली.” बेटांवर त्याच्यासोबत काम करणाऱ्‍या स्वयंसेवकांना त्याने अगदी जवळून पाहिले, ते किती सुखी-समाधानी होते हेसुद्धा त्याला दिसून आले. टॉम म्हणतो: “हवं असतं तर त्यांना बक्कळ पैसा कमावता आला असता. पण, त्यांनी साधेसुधे जीवन जगून आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याचे निवडले.” यामुळे टॉम विलक्षण प्रभावित झाला. आपल्या कुटुंबासाठी तसेच आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी जास्त वेळ देता यावा म्हणून त्याने आपल्या जीवनात लक्षणीय बदल केले आणि एक साधेसुधे जीवन जगू लागला. हे पाऊल उचलल्याबद्दल त्याला कधीच पस्तावा झाला नाही.

सुख-समाधान आणि स्वाभिमान

सुखाची अनुभूती होण्यासाठी आत्म-सन्मानाची अथवा स्वाभिमानाची भावना असणे फार जरूरीचे असते. मानवी अपरिपूर्णतेमुळे आणि त्यामुळे आलेल्या कमतरतांमुळे काहींना कमीपणाच्या भावनेने ग्रासले आहे. कित्येकांमध्ये तर लहानपणापासूनच स्वतःविषयी असा न्यूनगंड असतो. या खोलवर मुळावलेल्या भावनांवर मात करणे कठीण असले तरी ते अशक्य मुळीच नाही. देवाच्या वचनातला सल्ला जीवनात लागू केल्याने अशा कटू भावना दूर करणे शक्य आहे.

आपल्याबद्दल निर्माणकर्त्याला काय वाटते ते बायबल आपल्याला सांगते. तेव्हा, कुठल्याही मनुष्याच्या—अगदी आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनापेक्षा देवाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा नाही का? प्रेमाची प्रतिमा असलेला देव कधीही आपल्याबद्दल पूर्वग्रह अथवा द्वेषभाव बाळगत नाही. आपल्यात किती क्षमता आहे आणि आपण किती करू शकतो याची त्याला पूर्ण कल्पना आहे. (१ शमुवेल १६:७; १ योहान ४:८) त्याचे मन आनंदी करू इच्छिणाऱ्‍यांमध्ये कितीही आणि कोणत्याही कमतरता असल्या तरीही तो त्यांना मोलवान—नव्हे परमप्रिय समजतो.—हाग्गय २:७, पं.र.भा.; दानीएल ९:२३.

पण, याचा अर्थ तो आपल्या कमतरतांकडे आणि आपण केलेल्या पापांकडे डोळेझाक करतो असा होत नाही. आपण योग्य ते करण्याचा होईल तितका प्रयत्न करावा अशी अपेक्षा तो धरतो आणि आपण तसा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्याला पाठबळही देतो. (लूक १३:२४) आपल्या कमतरतांकडे किंवा पापांकडे तो दुर्लक्ष करत नसला तरी बायबल म्हणते: “जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो.” ते असेही म्हणते: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.”—स्तोत्र १०३:१३; १३०:३, ४.

तेव्हा, देवाच्या नजरेतून स्वतःकडे पाहण्यास शिका. त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांमध्ये न्यूनगंड अथवा कमीपणाची भावना असली तरी देव मात्र त्यांना मोलवान, परमप्रिय समजतो आणि त्यांच्यावर त्याचा भरवसा आहे. ही जाणीव तुमच्या सुखात नक्कीच भर घालू शकते.—१ योहान ३:१९, २०.

आशा—सुखासमाधानासाठी आवश्‍यक

पॉझिटिव्ह सायकोलॉजी (सकारात्मक मनोवृत्ती) म्हटल्या जाणाऱ्‍या एका लोकप्रिय कल्पनेच्या मते विधायक विचाराने आणि आपल्या क्षमतांवर लक्ष देऊन विकसित केलेल्या आशावादाची परिणिती शेवटी सुखासमाधानात होऊ शकते. बहुतेक सगळेच जण मान्य करतील, की जीवनाविषयी आणि भविष्याविषयीचा आशावादी दृष्टिकोन जीवनातला आनंद द्विगुणीत करतो. पण, हा आशावाद कल्पनेवर नव्हे तर वास्तविकतेवर आधारलेला असावा. अर्थात, आपण कितीही आशावादी असलो किंवा आपली विचारसरणी कितीही सकारात्मक असली तरीही जीवनातले सुख-समाधान नष्ट करणारी कारणे अर्थात युद्धे, दुष्काळ, रोगराई, प्रदुषण, वार्धक्य, आजार किंवा मृत्यू यांचे निवारण मात्र होऊ शकणार नाही. पण, तरीसुद्धा आशावाद खूप महत्त्वाचा आहे.

लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही, की बायबलमध्ये कुठेही आशावाद हा शब्द आढळत नाही. त्याऐवजी ‘आशा’ असा अधिक वजनदार शब्द आढळतो. बायबलमधील “आशा” या शब्दाचा वाईन्स कम्प्लीट एक्सपोझिटरी डिक्शनरीमध्ये “सकारात्मक आणि खात्रीलायक अपेक्षा, . . . भल्याची आनंददायी उमेद” असा अर्थ दिला आहे. बायबलमध्ये वापरलेल्या या शब्दाचा केवळ आशावादी असणे असा अर्थ होत नाही. तर ज्यावर आपण आशा लावून आहोत त्या गोष्टीला देखील तो शब्द सूचित करतो. (इफिसकर ४:४; १ पेत्र १:३) उदाहरणार्थ, आधीच्या परिच्छेदात सांगितलेल्या सर्व अनिष्ट गोष्टी लवकरच नाहीशा होतील ही एक ख्रिस्ती आशा आहे. (स्तोत्र ३७:९-११, २९) पण, यात आणखीन बरेच काय सामावलेले आहे.

पृथ्वीवरील नयनरम्य परिस्थितीत विश्‍वासू मानवजात परिपूर्ण स्थितीला पोहंचेल त्या समयाकडे ख्रिस्तीजन डोळे लावून आहेत. (लूक २३:४२, ४३) ही आशा अधिक विस्तृत करत प्रकटीकरण २१:३, ४ म्हणते: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि . . . तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”

अशा भविष्याची आशा बाळणारा कोणीही—मग, सध्याची परिस्थिती हवी तशी चांगली नसली तरी आनंदी असू शकतो. (याकोब १:१२) पण, या गोष्टीवर आपण विश्‍वास का ठेवू शकतो हे जाणून घेण्यासाठी आवर्जून बायबलचे परीक्षण करा. आपली ही आशा अधिकाधिक प्रज्वलित करण्यासाठी दररोज बायबलचे वाचन करा. असे केल्याने तुम्ही आध्यात्मिकरित्या समृद्ध व्हाल. तसेच, ज्या गोष्टी तुमच्या जीवनातले सौख्य हिरावून घेतात त्या टाळण्यास तुम्हाला मदत मिळेल आणि तुम्ही अधिकाधिक समाधानी व्हाल. होय, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे हेच सुखाचे अंतिम रहस्य आहे. (उपदेशक १२:१३) बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यानेच जीवन सुखी होऊ शकते. कारण येशूने म्हटले: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”—लूक ११:२८.

[तळटीप]

^ बौद्ध धर्मियांच्या मते देवावर विश्‍वास ठेवणे आवश्‍यक नाही.

[५ पानांवरील चित्रे]

धनसंपत्ती साठवल्याने, फटकून राहिल्याने किंवा मनुष्याच्या अल्प ज्ञानावर भरवसा ठेवल्याने सुख मिळत नाही

[६ पानांवरील चित्र]

बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यानेच जीवन सुखी होऊ शकते

[७ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती आशा सुखी राहण्यास मदत करते