व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही जीवनात खरोखरच सुखी होऊ शकता का?

तुम्ही जीवनात खरोखरच सुखी होऊ शकता का?

तुम्ही जीवनात खरोखरच सुखी होऊ शकता का?

जॉर्ज हा खाऊनपिऊन सुखी माणूस होता. प्रत्येकाशी अगदी हसतमुखाने बोलणारा. त्याच्यासाठी जीवन एक देणगी होती आणि या देणगीचा तो मनसोक्‍त आनंद लुटू इच्छित होता. म्हातारपणाची दुखणीखुपणी सोसत असताना देखील तो तितकाच—नव्हे, त्याहून अधिक आनंदी वाटायचा. आनंदी, आशावादी मनोवृत्ती ही त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. अगदी मरेपर्यंत तो एक सुखी-समाधानी व्यक्‍ती म्हणून प्रख्यात होता. जॉर्जप्रमाणे तुम्ही देखील जीवनात सुखी आहात का? उजाडणारा प्रत्येक दिवस एक देणगी आहे असे समजून तुम्ही त्याचा मनमुराद आनंद लुटता का? की प्रत्येक नवीन दिवसाच्या विचाराने तुम्ही उदास वा भयभीत होता? कोणती गोष्ट तुमच्या जीवनातला आनंद हिरावून घेत आहे?

सुखाची व्याख्या, कमीअधिक प्रमाणात टिकून राहणारी सुस्थिती अशा प्रकारे करण्यात आली आहे. यामध्ये मानसिक समाधानापासून अपार सुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत निरनिराळ्या भावना आणि ही सुस्थिती टिकून ठेवण्याची प्रांजळ इच्छा सामावलेली असते. पण, तुम्ही म्हणाल, अशा प्रकारचे सुख अस्तित्वात तरी आहे का?

ज्याच्या पायापाशी अमाप सुबत्ता लोळण घेत आहे तोच आयुष्यात सुखी होऊ शकतो अशी एक समज हल्ली समाजात रुढ झाली आहे. त्यामुळे रातोरात श्रीमंत होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्‍या लाखो लोकांची घालमेल होत नसेल तरच नवल. या प्रयत्नांत मग ते आपली नातीगोती विसरतात आणि जीवनातल्या अतिमहत्त्वपूर्ण गोष्टींची देखील त्यांना आहुती द्यावी लागते. वारुळावरच्या मुंग्यांप्रमाणे त्यांची सतत धावपळ सुरू असते. आणि या धावपळीत त्यांना स्वतःसाठीसुद्धा वेळ काढता येत नाही; मग, दुसऱ्‍यांसाठी वेळ काढण्याची गोष्ट तर बाजूलाच राहिली. लॉस एन्जेलिस टाईम्स वृत्तपत्राने दिलेल्या महितीनुसार, “डिप्रेशनने (तीव्र नैराश्‍य) ग्रासलेल्या लोकांची संख्या अखंड वाढत आहे. शिवाय, अगदी कोवळ्या वयापासूनच लोक या आजाराला बळी पडत आहेत. . . . त्यामुळे औषध कंपन्यांमध्ये ॲन्टिडिप्रेसंट्‌सना (नैराश्‍येवरील औषध) सगळ्यात जास्त मागणी आहे,” याचे आपल्याला नवल वाटायला नको. जीवनातल्या समस्यांपासून पळ काढण्यासाठी आज लाखो लोक ड्रग्स घेतात किंवा मग स्वतःला दारूत बुडवून घेतात. काहीजण निराश होतात तेव्हा पाण्यासारखा पैसा ओतून धमाल खरेदी करतात. द गार्डियन या ब्रिटनमधील वृत्तपत्रानुसार एका सर्व्हेत दिसून आले, की आपल्या अतीव दुःखाला वाट देण्यासाठी खरेदीचा मार्ग अवलंबणाऱ्‍यांमध्ये स्त्रियांचा क्रमांक पहिला येतो. निराशेवर मात करण्यासाठी धमाल खरेदी करणाऱ्‍या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या तिप्पट होती.”

पण, आयुष्यात खरे सुख-समाधान दुकानात, बाटलीत, गोळ्याऔषधांत किंवा बँक अकाउंटमध्ये मिळत नाही. सुख ही काही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. खरे सुख सगळ्यांना मोफत मिळणारी एक देणगी आहे. मग, खऱ्‍या सुखाची ही अनमोल देणगी आपल्याला कुठे मिळू शकेल? त्याची चर्चा आपण पुढच्या लेखात करू या.