व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांचे तारण होईल

प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांचे तारण होईल

प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांचे तारण होईल

“परमेश्‍वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीति बाळगू?”—स्तोत्र २७:१.

१.यहोवा कोणत्या जीवनदायक तरतूदी करतो?

 पृथ्वीवरील सजीव सृष्टीला कायम ठेवणाऱ्‍या सूर्यप्रकाशाचा उगम यहोवा आहे. (उत्पत्ति १:२, १४) तोच आध्यात्मिक प्रकाशाचाही उगम आहे. हा प्रकाश सैतानाच्या जगातील घातक अंधकार दूर करतो. (यशया ६०:२; २ करिंथकर ४:६; इफिसकर ५:८-११; ६:१२) प्रकाशाचा मार्ग निवडणारे स्तोत्रकर्त्यासोबत असे म्हणू शकतात: “परमेश्‍वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीति बाळगू?” (स्तोत्र २७:१अ) पण येशूच्या काळात घडल्याप्रमाणेच अंधकाराचा मार्ग स्वतःहून निवडणारे यहोवाच्या न्यायदंडाला सामोरे जातील.—योहान १:९-११; ३:१९-२१, ३६.

२. प्राचीन काळी, यहोवाच्या प्रकाशाचा अव्हेर करणाऱ्‍यांचे काय झाले व ज्यांनी त्याच्या वचनाकडे लक्ष दिले त्यांना कोणते फळ मिळाले?

यशयाच्या काळात यहोवाच्या करारबद्ध लोकांपैकी बहुतेकांनी प्रकाशाचा अव्हेर केला. परिणामी, उत्तरी इस्राएल राष्ट्राचा नाश झाला. यशया या नाशाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेम व त्यातील मंदिराचा नाश करण्यात आला आणि यहुदाच्या रहिवाशांना बंदिवान बनवून बॅबिलोनला नेण्यात आले. पण ज्यांनी यहोवाच्या वचनाकडे लक्ष दिले त्यांना त्या काळातील धर्मत्यागापासून दूर राहण्याचे प्रोत्साहन मिळाले. सा.यु.पू. ६०७ मध्ये झालेल्या नाशाविषयी यहोवाने प्रतिज्ञा केली होती की जे कोणी त्याचे वचन ऐकतील त्यांचा नाश होणार नाही. (यिर्मया २१:८, ९) आज जे कोणी प्रकाशाची आवड धरतात ते त्याकाळातील घटनांवरून बरेच काही शिकू शकतात.—इफिसकर ५:५.

प्रकाशात चालणाऱ्‍यांचा आनंद

३. आज आपण कोणती खातरी बाळगू शकतो, कोणत्या ‘धार्मिक राष्ट्रावर’ आपले प्रेम आहे आणि या ‘राष्ट्रात’ कोणते ‘तटबंदी नगर’ आहे?

“आमचे नगर तटबंदी केलेले आहे; [देवाने] तारण हेच त्याचे कोट व तट नेमिले आहेत. वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल.” (यशया २६:१, २) हा यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍या त्याच्या लोकांचा आनंदी जयघोष आहे. यशयाच्या काळातील विश्‍वासू जनांनी देशातील इतर लोकांच्या खोट्या दैवतांवर नव्हे तर यहोवावर भरवसा ठेवला; तोच खरे संरक्षण देऊ शकतो याची त्यांना खातरी होती. आज आपल्यालाही याची खात्री आहे. शिवाय, यहोवाच्या ‘धार्मिक राष्ट्रावर,’ अर्थात, “देवाच्या इस्राएलावर” आपले प्रेम आहे. (गलतीकर ६:१६; मत्तय २१:४३) आणि या राष्ट्राच्या विश्‍वासूपणामुळे यहोवाचेही त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्या आशीर्वादानेच देवाच्या इस्राएलाचे “नगर तटबंदी” केलेले आहे. याचा अर्थ, नगराप्रमाणे असणारी एक संघटना या राष्ट्राला आधार देते व त्याचे संरक्षण करते.

४. आपण कोणती मनोवृत्ती राखली पाहिजे?

या ‘नगरात’ राहणाऱ्‍यांना जाणीव आहे की ‘स्थिर मनाला यहोवा पूर्ण शांतीत राखील कारण ते यहोवावर भाव ठेवते.’ ज्यांची यहोवावर भरवसा ठेवण्याची आणि त्याच्या धार्मिक तत्त्वांनुसार वागण्याची मनोवृत्ती आहे त्यांना यहोवा सांभाळतो. यहुदातील विश्‍वासूजनांनी यशयाच्या पुढील आर्जवाकडे लक्ष दिले: “सदासर्वकाल तुम्ही यहोवावर भरवसा ठेवा, कारण यहोवा याह याच्याठायी सर्वकालचा खडक आहे.” (यशया २६:३, ४, पं.र.भा.; स्तोत्र ९:१०; ३७:३; नीतिसूत्रे ३:५) अशा मनोवृत्तीचे लोक सदैव ‘याह यहोवावर’ भरवसा ठेवतात; तोच त्यांचा सर्वकालचा खडक आहे. त्याच्याठायी त्यांना “पूर्ण [निरंतर] शांती” लाभते.—फिलिप्पैकर १:२; ४:६, ७.

देवाच्या शत्रूंचा पाणउतारा

५, ६. (अ) प्राचीन बॅबिलोनचा कशाप्रकारे पाणउतारा झाला? (ब) ‘मोठ्या बाबेलचा’ कशाप्रकारे पाणउतारा झाला?

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना दुःख सोसावे लागले तर त्यांनी काय समजावे? त्यांना घाबरण्याचे कारण नाही. यहोवा काही काळ अशा गोष्टींना जरी अनुमती देत असला तरीसुद्धा तो लवकरच आपल्या लोकांचे दुःख दूर करतो आणि जे त्याच्या लोकांवर संकटे आणतात अशांना त्याच्या न्यायदंडांना सामोरे जावे लागते. (२ थेस्सलनीकाकर १:४-७; २ तीमथ्य १:८-१०) एका ‘उच्च नगराचे’ उदाहरण घ्या. यशया म्हणतो: “उच्चस्थळी राहणाऱ्‍यास [परमेश्‍वराने] खाली आणिले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकिले आहे; जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळविले आहे. ते पायांखाली तुडवितील. गरिबांचे पाय दीनाची पावले देखील ते तुडवितील.” (यशया २६:५, ६) येथे उल्लेखलेले उच्च नगर म्हणजे बॅबिलोन असावे. या नगराने निश्‍चितच देवाच्या लोकांवर खूप संकटे आणली. पण शेवटी बॅबिलोनचे काय झाले? सा.यु.पू. ५३९ साली ते मेद व पारस या राष्ट्रांकडून पराजित झाले. त्यांची सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळाली!

आपल्या काळात यशयाचे भविष्यसूचक शब्द, १९१९ सालापासून ‘मोठ्या बाबेलवर’ आलेल्या परिस्थितीचे अचूक वर्णन करतात. त्या वर्षी मोठ्या बाबेलला यहोवाच्या लोकांना आध्यात्मिक बंदिवासातून मुक्‍त करणे भाग पडले तेव्हा हे उच्च नगर एका अर्थाने खाली पडले. त्यांच्याकरता हे लज्जास्पद होते. (प्रकटीकरण १४:८) यानंतर जे घडले ते तर त्यांच्याकरता आणखीनच लज्जास्पद होते. ख्रिस्तीजनांचा हा छोटासा गट, त्यांना बंदिवासात ठेवणाऱ्‍याला ‘तुडवू लागला.’ १९२२ पासून ते ख्रिस्ती धर्मजगताच्या येणाऱ्‍या नाशाविषयी घोषणा करू लागले; प्रकटीकरण ८:७-१२ येथे उल्लेख केलेल्या चार देवदूतांच्या कर्णा वाजवण्याविषयी आणि प्रकटीकरण ९:१-११:१५ येथे सांगितलेल्या तीन आपत्तींविषयी ते घोषित करू लागले.

“धार्मिकाचा मार्ग नीट आहे”

७. यहोवाच्या प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांना कोणते मार्गदर्शन लाभते आणि ते कोणाकडे आशेने पाहतात व कशास अमूल्य मानतात?

यहोवाच्या प्रकाशाकडे वळणाऱ्‍यांचे तो तारण करतो आणि त्यांचे मार्गदर्शन करतो. हेच यशया यानंतर सांगतो: “धार्मिकाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून धार्मिकाची गति सरळ करितोस. हे परमेश्‍वरा, तुझ्या न्यायमार्गांत राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहो; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जीवास लागून राहिली आहे.” (यशया २६:७, ८) यहोवा स्वतः न्यायपरायण आहे आणि त्याची उपासना करणाऱ्‍यांनी देखील त्याच्या नीतिमान आदर्शांचे पालन केले पाहिजे. जेव्हा ते असे करतात, तेव्हा यहोवा त्यांचे मार्गदर्शन करून त्यांचा मार्ग सुरळीत करतो. त्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याद्वारे हे नम्र लोक दाखवून देतात की त्यांनी यहोवाचीच आशा बाळगली आहे आणि त्याचे नाव, अर्थात त्याचे “स्मरण” त्यांच्याकरता अमूल्य आहे.—निर्गम ३:१५.

८. यशयाने कोणते अनुकरणीय उदाहरण मांडले?

यशयाला यहोवाचे नाव प्रिय होते. त्याच्या पुढील शब्दांवरून हे स्पष्ट होते: “रात्री माझ्या जिवास तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंतःकरणपूर्वक तुझा शोध करीन; कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात.” (यशया २६:९) यशयाने “अगदी अंतःकरणपूर्वक,” म्हणजे पूर्ण जिवाने यहोवाची उत्कंठा बाळगली. रात्रीच्या प्रहरी शांत वातावरणात यशया कसा यहोवाला प्रार्थना करत असेल, आपल्या अंतःकरणातील विचार त्याच्यासमोर व्यक्‍त करत असेल व त्याच्या मार्गदर्शनाकरता याचना करत असेल याची आपण कल्पना करू शकतो. आपल्याकरता हे किती सुंदर उदाहरण आहे! तसेच, यशयाने यहोवाच्या न्यायकृत्यांवरून धार्मिकतेचा धडा शिकून घेतला. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की यहोवाची इच्छा जाणून घेण्याकरता सतत जागरूक व सतर्क राहणे किती अत्यावश्‍यक आहे.

काहीजण स्वतःहून अंधकार निवडतात

९, १०. यहोवाने आपल्या अविश्‍वासू राष्ट्रावर कशाप्रकारे कृपा दाखवली, पण त्यांची प्रतिक्रिया कशी होती?

यहोवाने यहुदावर मोठी दया व कृपा दाखवली पण दुःखाची गोष्ट म्हणजे या राष्ट्राने तरीही यहोवाचा मार्ग अवलंबला नाही. पुन्हा पुन्हा यहुदातील बहुतेकजण यहोवाच्या सत्याच्या प्रकाशात चालण्याऐवजी, त्याच्या विरोधात गेले आणि त्यांनी खऱ्‍या उपासनेचा त्याग केला. यशयाने म्हटले: “दुर्जनावर कृपा केली तरी तो नीति शिकायचा नाही; धर्मराज्यात देखील तो अधर्म करील; परमेश्‍वराचे ऐश्‍वर्य त्याला दिसावयाचे नाही.”—यशया २६:१०.

१० यशयाच्या काळात, यहोवाने कित्येकदा यहुदाला त्याच्या शत्रूंपासून बचावले, पण या राष्ट्रातील बहुतेकांनी हे ओळखले नाही. यहोवाने त्यांना त्याची शांती दिली तेव्हाही त्यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली नाही. म्हणूनच यहोवाने त्यांना ‘अन्य सत्ताधीशांच्या’ हाती सोडून दिले आणि शेवटी सा.यु.पू. ६०७ साली यहुद्यांना बॅबिलोनच्या बंदिवासात जाऊ दिले. (यशया २६:११-१३) तरीसुद्धा, शिक्षा भोगल्यानंतर कालांतराने या राष्ट्रातील शेषजन परत आपल्या मातृभूमीला परतले.

११, १२. (अ) यहुद्यांना बंदिवान बनवणाऱ्‍यांचे काय भविष्य होते? (ब) यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांना एकेकाळी बंदिवासात ठेवणाऱ्‍यांचे १९१९ सालानंतर काय भविष्य होते?

११ यहुदाला बंदिवान करून नेणाऱ्‍यांचे काय झाले? यशया भविष्यसूचक शब्दांत याचे उत्तर देतो: “ते मेलेले आहेत, जिवंत असणार नाहीत; ते प्रेते आहेत, ते उठणार नाहीत; याकरिता तू त्यांना दंड करून त्यांचा नाश केला आहे, आणि त्यांची आठवण अगदी नाहीशी केली आहे.” (यशया २६:१४, पं.र.भा.) होय, सा.यु.पू. ५३९ साली बॅबिलोन पडले, त्यानंतर या शहरासमोर कोणतेही भविष्य नव्हते. कालांतराने त्याचे नामोनिशाण नाहीसे होणार होते. जणू ते एक ‘प्रेत’ झाले होते व त्यांचे विस्तृत साम्राज्य केवळ इतिहासाच्या पानांवरच उरले. या जगातील शक्‍तिशाली लोकांवर आशा लावणाऱ्‍यांकरता हा किती मोठा धडा आहे!

१२ देवाने आपल्या अभिषिक्‍त सेवकांना १९१८ साली आध्यात्मिक बंदिवासात जाऊ दिले आणि मग १९१९ साली त्यांना सोडवले तेव्हा या भविष्यवाणीतल्या काही पैलूंची पूर्णता झाली. तेव्हापासून, देवाच्या लोकांना बंदिवान बनवणाऱ्‍यांचे, खासकरून ख्रिस्ती धर्मजगताचे भविष्य अंधारू लागले. पण यहोवाच्या लोकांकरता मात्र समृद्ध आशीर्वाद राखून ठेवले होते.

“तू राष्ट्राची वाढ केली आहे”

१३, १४. यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांनी १९१९ सालापासून कोणते समृद्ध आशीर्वाद अनुभवले आहेत?

१३ देवाने १९१९ साली त्याच्या अभिषिक्‍त सेवकांची पश्‍चात्तापी मनोवृत्ती पाहिली व त्यांना आशीर्वाद दिला, अर्थात त्यांच्यात वाढ होऊ दिली. सर्वप्रथम देवाच्या इस्राएलाच्या शेवटल्या सदस्यांना एकत्र करण्यात आले आणि त्यानंतर ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ एका ‘मोठ्या लोकसमुदायाला’ एकत्र करण्यास सुरवात झाली. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) यशयाच्या भविष्यवाणीत त्यांच्याकरता पुढील आशीर्वाद भाकीत करण्यात आले होते: “तू राष्ट्राची वाढ केली आहे, हे परमेश्‍वरा, तू राष्ट्राची वाढ केली आहे; तू आपला महिमा दाखविला आहे; तू देशाच्या चतुःसीमा वाढविल्या आहेत. हे परमेश्‍वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुजकडे दृष्टि फिरविली; त्यांस तुजकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‌गत तुला कळविले.”—यशया २६:१५, १६.

१४ आज देवाच्या इस्राएलाच्या सीमा संपूर्ण पृथ्वीवर पसरल्या आहेत आणि आता जवळजवळ ६० लाखाच्या घरात असलेल्या मोठ्या लोकसमुदायातील सदस्य सुवार्तेची घोषणा करण्यात मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत. (मत्तय २४:१४) यहोवाने खरोखर त्यांना आशीर्वादित केले आहे! आणि यामुळे त्याच्या नामाला किती महिमा मिळाला आहे! आज त्याचे नाव २३५ राष्ट्रांत घोषित केले जात आहे. खरोखर, त्याची भविष्यवाणी किती अद्‌भुत रित्या पूर्ण होत आहे.

१५. कशाप्रकारे १९१९ साली लाक्षणिक पुनरुत्थान झाले?

१५ बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्‍त होण्याकरता यहुदाला यहोवाच्या मदतीची गरज होती. स्वतःहून ते हे साध्य करू शकले नसते. (यशया २६:१७, १८) त्याचप्रकारे, १९१९ साली देवाच्या इस्राएलाला मुक्‍तता मिळाली तेव्हा हे सिद्ध झाले की यहोवा त्यांच्या पाठीशी होता. त्याच्या साहाय्याशिवाय हे शक्य झाले नसते. त्यांच्या परिस्थितीत अचानक आलेला बदल इतका काही आश्‍चर्यकारक होता की यशयाने त्याची तुलना पुनरुत्थानाशी केली: “तुझे मृत जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुजवरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमि प्रेते बाहेर टाकील.” (यशया २६:१९; प्रकटीकरण ११:७-११) होय, प्रेतांप्रमाणे निष्क्रिय झालेले देखील जणू नव्या उत्साहाने कार्य करण्याकरता पुन्हा जिवंत होतील!

कठीण काळांत संरक्षण

१६, १७. (अ) सा.यु.पू. ५३९ साली बॅबिलोनचा नाश झाला तेव्हा बचावासाठी यहुद्यांना काय करायचे होते? (ब) आज ‘खोल्या’ कदाचित कशाला सूचित करत असाव्यात आणि यांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१६ यहोवाच्या सेवकांना नेहमीच त्याच्या संरक्षणाची आवश्‍यकता आहे. पण लवकरच तो शेवटल्या वेळी सैतानाच्या जगाविरुद्ध आपला हात उगारेल आणि त्यावेळी त्याच्या उपासकांना पूर्वी कधी नव्हे इतकी त्याच्या संरक्षणाची गरज भासेल. (१ योहान ५:१९) त्या भयानक काळाविषयी यहोवा अशी ताकीद देतो: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. कारण पाहा, परमेश्‍वर पृथ्वीवरील रहिवाश्‍यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्‍त पृथ्वी प्रगट करील, वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही.” (यशया २६:२०, २१; सफन्या १:१४) यावरून यहुद्यांना हे दाखवण्यात आले की सा.यु.पू. ५३९ साली बॅबिलोनच्या नाशातून बचावण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे. या शब्दांकडे ज्यांनी लक्ष दिले ते आपापल्या घरांत राहिले असतील आणि त्यामुळे रस्त्यांवरील विजयी सैनिकांपासून त्यांना संरक्षण मिळाले असेल.

१७ या भविष्यवाणीत उल्लेखलेल्या ‘खोल्यांचा’ अर्थ कदाचित सबंध जगात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या हजारो मंडळ्यांशी संबंधित असावा. या मंडळ्यांत आजही खऱ्‍या ख्रिश्‍चनांना, आपल्या बांधवांच्या सहवासात व वडिलांच्या प्रेमळ देखरेखीखाली संरक्षण मिळते. (यशया ३२:१, २; इब्री लोकांस १०:२४, २५) खासकरून आज, कारण या व्यवस्थीकरणाचा अंत अगदी जवळ आला आहे आणि तो येईल तेव्हा आज्ञा मानणाऱ्‍यांचाच बचाव होऊ शकेल.—सफन्या २:३.

१८. लवकरच यहोवा कशाप्रकारे “समुद्रातील अजगराला ठार मारील”?

१८ त्या काळाविषयी यशयाने असे भाकीत केले: “त्या समयी परमेश्‍वर आपल्या दुःखकर, महान व बलवान खड्‌गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान यांचे पारिपत्य करील; समुद्रातील अजगराला ठार मारील.” (यशया २७:१) या आधुनिक काळात “लिव्याथान” कोण आहे? साहजिकच हे “जुनाट साप,” अर्थात सैतान याला सूचित करते. तसेच, ज्याचा उपयोग करून सैतान देवाच्या इस्राएलाविरुद्ध लढाई करत आहे त्या दुष्ट व्यवस्थीकरणाचाही यात समावेश आहे. (प्रकटीकरण १२:९, १०, १७; १३:१४, १६, १७) १९१९ सालापासून देवाच्या लोकांवर लिव्याथानाची पकड राहिली नाही. कालांतराने त्याचा पूर्णपणे नाश केला जाईल. (प्रकटीकरण १९:१९-२१; २०:१-३, १०) अशारितीने यहोवा “समुद्रातील अजगराला” ठार मारील. तोपर्यंत यहोवाच्या लोकांविरुद्ध लिव्याथानाने कोणत्याही मार्गाने संकट उभे केले तरीसुद्धा त्याला कायमची सफलता मिळणार नाही. (यशया ५४:१७) हे आश्‍वासन किती दिलासा देणारे आहे!

‘द्राक्षांचा रम्य मळा’

१९. आज शेषजनांची काय परिस्थिती आहे?

१९ यहोवाकडून मिळालेल्या या प्रकाशाचा विचार करता आपल्याला आनंद वाटायला नको का? निश्‍चितच! यशयाने यहोवाच्या लोकांच्या आनंदाचे सुरेख वर्णन केले आहे: “त्या समयी द्राक्षांच्या [“फेसाळ द्राक्षरसाच्या,” NW] रम्य मळ्यांविषयी गीत गा. त्याची निगा ठेवणारा मी परमेश्‍वर; मी त्यास घडोघडी पाणी घालितो; त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करितो.” (यशया २७:२, ३) यहोवाने त्याच्या ‘द्राक्षमळ्याची,’ अर्थात देवाच्या इस्राएलच्या शेषजनांची आणि त्यांच्या कष्टाळू सोबत्यांची आजपर्यंत काळजी घेतली आहे. (योहान १५:१-८) याचे फळ म्हणजे त्याच्या नावाला मिळालेला महिमा आणि पृथ्वीवरील त्याच्या सेवकांना मिळालेला मोठा आनंद.

२०. यहोवा ख्रिस्ती मंडळीचे कशाप्रकारे संरक्षण करतो?

२० यहोवाला त्याच्या अभिषिक्‍त जनांवर पूर्वी असलेला राग—ज्यामुळे त्याने त्यांना १९१८ साली आध्यात्मिक बंदिवासात जाऊ दिले—नाहीसा झाला आहे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. यहोवा स्वतः म्हणतो: “माझ्या ठायी राग कसला तो नाहीच; मजपुढे युद्धात काटे व काटेरी झुडपे असती तर ती मी पायाखाली तुडवून सर्व जाळून टाकिली असती; पण त्याने माझा आश्रय धरावा; त्याने मजबरोबर दोस्ती करावी. मजबरोबर दोस्ती करावी.” (यशया २७:४, ५) आपल्या द्राक्षमळ्यातून भरपूर ‘फेसाळ द्राक्षरस’ उत्पन्‍न होत राहावा म्हणून यहोवा त्यांच्यातील काटेरी झुडपे, अर्थात कोणताही नीतिभ्रष्ट करणारा प्रभाव नष्ट करतो. ख्रिस्ती मंडळीची शांती भंग करण्याचा कोणीही प्रयत्न करता कामा नये! सर्वांनी यहोवाचा “आश्रय धरावा” अर्थात त्याची कृपा व संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यास आपण जणू देवाबरोबर दोस्ती करतो—असे करणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवण्यासाठी यशया त्याचा दोनदा उल्लेख करतो.—स्तोत्र ८५:१, २, ८; रोमकर ५:१.

२१. भूपृष्ठ “फळांनी” कशाप्रकारे भरले आहे?

२१ यशया आणखी आशीर्वादांचे वर्णन करतो: “भावी काळी याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरितील.” (यशया २७:६) हे वचन १९१९ पासून पूर्ण होऊ लागले आहे आणि त्यावरून यहोवाच्या सामर्थ्याची आपल्याला अद्‌भुत प्रचिती आली आहे. अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांनी सबंध पृथ्वी “फळांनी” म्हणजेच पौष्टिक आध्यात्मिक अन्‍नाने भरली आहे. या भ्रष्ट जगातही ते देवाच्या उच्च आदर्शांचे आनंदाने पालन करत आहेत. आणि यहोवा त्यांच्यात वाढ करून त्यांना आशीर्वादित करत आहे. यामुळे त्यांचे लाखो सोबती, अर्थात दुसरी मेंढरे ‘अहोरात्र मंदिरात देवाची सेवा करितात.’ (प्रकटीकरण ७:१५) या आध्यात्मिक ‘फळांचा’ आस्वाद घेण्याचा व इतरांनाही असे करण्याची संधी देण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे याचा आपण कधीही विसर पडू देऊ नये!

२२. प्रकाशाचा मार्ग स्वीकारणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

२२ या कठीण काळात अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकत आहे, पण यहोवा आपल्या लोकांवर आध्यात्मिक प्रकाश चमकवत आहे; याबद्दल आपण यहोवाचे कृतज्ञ नाही का? (यशया ६०:२; रोमकर २:१९; १३:१२) जे कोणी प्रकाशाचा स्वीकार करतात त्यांना या प्रकाशामुळे आज मनाची शांती आणि आनंद तर मिळतोच पण भविष्यात त्यांना सर्वकाळचे जीवन मिळेल. म्हणूनच प्रकाशाचा मार्ग प्रिय मानणारे आपण यहोवाची स्तुती करण्यासाठी पूर्ण मनाने स्तोत्रकर्त्यासोबत असे म्हणतो: “परमेश्‍वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू? परमेश्‍वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्‍वराचीच प्रतीक्षा कर.”—स्तोत्र २७:१ब, १४.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाच्या लोकांवर संकटे आणणाऱ्‍यांचे भविष्य काय असेल?

• यशयाने कोणत्या वाढीविषयी भाकीत केले?

• आपण कोणत्या “खोल्यांत” लपून राहिले पाहिजे आणि का?

• यहोवाच्या लोकांच्या स्थितीमुळे त्याचे गौरव कशाप्रकारे होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चौकट]

नवे प्रकाशन

या दोन अभ्यास लेखात चर्चा केलेली बरीच माहिती २०००/२००१ सालच्या प्रांतीय अधिवेशनातील भाषणावर आधारित होती. या भाषणाच्या समाप्तीला एक नवे प्रकाशन अनावृत्त करण्यात आले; याचे शीर्षक होते, यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश १.  या ४१६ पृष्ठांच्या पुस्तकात यशयाच्या पुस्तकातील पहिल्या ४० अध्यायांतील वचनांची चर्चा करण्यात आली आहे.

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाच्या ‘तटबंदी नगरात’ अर्थात त्याच्या संघटनेत केवळ नीतिमान लोकांना प्रवेश मिळतो

[१९ पानांवरील चित्र]

यशया “रात्री” यहोवाला याचना करत असे

[२१ पानांवरील चित्र]

यहोवा त्याच्या ‘द्राक्षमळ्याची’ निगा राखतो आणि त्याला फलदायी करतो