व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रकाशात चालणारे आनंदी

प्रकाशात चालणारे आनंदी

प्रकाशात चालणारे आनंदी

“या, आपण यहोवाच्या प्रकाशात चालू.”—यशया २:५, पं.र.भा.

१, २. (अ) प्रकाशाचे महत्त्व काय? (ब) अंधकार पृथ्वीला झाकेल ही ताकीद इतकी गंभीर का आहे?

 यहोवा प्रकाशाचे उगमस्थान आहे. बायबलमध्ये त्याच्याविषयी असे म्हटले आहे की तो “दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे यांचे नियम लावून देतो.” (यिर्मया ३१:३५; स्तोत्र ८:३) आपल्याला प्रकाश देणारा सूर्य यहोवानेच निर्माण केला. सूर्य म्हणजे प्रत्यक्षात एक भले मोठे आण्विक अग्निकुंड आहे, ज्यात प्रकाशाच्या व उष्णतेच्या रूपात मोठ्या मात्रेत उर्जा उत्पन्‍न होते. या उर्जेचा फारच लहान अंश सूर्यप्रकाशाच्या रूपात पृथ्वीला मिळतो आणि यामुळे या पृथ्वीवरील सजीवसृष्टी कायम राहते. सूर्यप्रकाश नसता तर आपण जिवंत राहू शकलो नसतो. या पृथ्वीवर सजीवसृष्टीच नसती.

हे लक्षात ठेवल्यास, संदेष्टा यशया याच्या पुढील शब्दांचे गांभीर्य आपल्याला समजू शकते. त्याने म्हटले: “पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे.” (यशया ६०:२) अर्थात, येथे अंधाराचा शब्दशः अर्थ घेतला जाऊ नये. एके दिवशी सूर्य, चंद्र आणि तारे चमकायचे थांबतील असे यशया सुचवत नव्हता. (स्तोत्र ८९:३६, ३७; १३६:७-९) तर तो आध्यात्मिक अंधकाराविषयी बोलत होता. आध्यात्मिक अंधकार जीवनाला घातक आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाशिवाय आपण जास्त दिवस जिवंत राहू शकणार नाही त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रकाशाविना देखील आपण जिवंत राहू शकत नाही.—लूक १:७९.

३. यशयाच्या शब्दांना अनुलक्षून खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी काय केले पाहिजे?

यशयाचे शब्द प्राचीन यहुदा राष्ट्राच्या बाबतीत आधीच पूर्ण झाले असले तरीसुद्धा त्यांची मोठ्या प्रमाणात आज आपल्या काळात पूर्णता होत आहे; ही एक लक्ष देण्याजोगी बाब आहे. आपल्या या काळात सबंध जगात आध्यात्मिक अंधकार आहे. अशा या जीवघेण्या परिस्थितीत, आध्यात्मिक प्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूच्या आर्जवाकडे लक्ष दिले पाहिजे: ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या.’ (मत्तय ५:१६) विश्‍वासू ख्रिस्ती नम्र लोकांच्या जीवनातील अंधकार काढून त्यांना आध्यात्मिक प्रकाश व त्याद्वारे जीवन मिळवण्याची संधी देऊ शकतात.—योहान ८:१२.

इस्राएलातील अंधकारमय काळ

४. यशयाचे भविष्यसूचक शब्द पहिल्यांदा केव्हा पूर्ण झाले, पण त्याआधीच यशयाच्या काळात कशी परिस्थिती होती?

प्राचीन काळी जेव्हा यहुदा राष्ट्र ओसाड झाले व त्यातील रहिवाशांना बंदिवान करून बॅबिलोनला नेण्यात आले तेव्हा अंधकार पृथ्वीला झाकील हे यशयाचे शब्द पहिल्यांदा पूर्ण झाले. पण त्याही आधी, यशयाच्या काळात, यहुदा राष्ट्र आध्यात्मिक अंधकारातच होते. म्हणूनच यशयाने आपल्या देशबांधवांना असे आर्जवले: “अहो याकोबाचे घराणेहो, या, आपण यहोवाच्या प्रकाशात चालू”!—यशया २:५, पं.र.भा.; ५:२०.

५, ६. यशयाच्या काळात यहुदात अंधकारमय परिस्थिती असण्याची कोणती कारणे होती?

यशया संदेष्टा याने “उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळी” यहुदात भविष्यवाण्या घोषित केल्या. (यशया १:१) राजकीय क्षेत्रातील अस्थिरता, धार्मिक क्षेत्रातील ढोंगीपणा, न्यायव्यवस्थेतील भ्रष्टता आणि गरिबांवर होणारा जुलूम यामुळे हा काळ अशांततेचा होता. योथामसारख्या विश्‍वासू राजांच्या काळात देखील अनेक डोंगरमाथ्यांवर खोट्या दैवतांच्या वेद्या होत्या. अविश्‍वासू राजांच्या काळातील परिस्थितीविषयी तर विचारायलाच नको. उदाहरणार्थ, राजा आहाज याने तर स्वतःचे मूल मोलेख दैवताला अर्पण केले. खरोखर हा अंधकाराचाच काळ होता!—२ राजे १५:३२-३४; १६:२-४.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती देखील फारशी चांगली नव्हती. यहुदाच्या सीमेलगत असणारी मवाब, एदोम आणि पलेशेथ ही राष्ट्रे त्यांच्यावर टपूनच होती. उत्तरेकडील इस्राएल राष्ट्र देखील, यहुदाशी रक्‍ताचे संबंध असूनही त्यांचे हाडवैरी होते. उत्तरेकडे आणखी पुढे असलेल्या अराम राष्ट्राकडूनही यहुदाला युद्धाची भीती होती. पण त्याहूनही मोठा धोका क्रूर असेरिया राष्ट्राचा होता, कारण हे राष्ट्र सतत आपले साम्राज्य वाढवण्याची संधी शोधत होते. यशया भविष्यवाण्या घोषित करत असतानाच्या काळात असेरियाने इस्राएल राष्ट्राला नकाशातून काढून टाकले आणि यहुदालाही जवळजवळ नाशच केले. एक अशीही वेळ आली जेव्हा एक जेरूसलेमला सोडून यहुदातील इतर सर्व शहरे असेरियाच्या ताब्यात होती.—यशया १:७, ८; ३६:१.

७. इस्राएल व यहुदाने कोणती निवड केली होती पण यहोवाने काय केले?

देवासोबत करार असलेल्या या लोकांनाही अशा संकटांना तोंड द्यावे लागण्याचे कारण म्हणजे इस्राएल व यहुदा यहोवाला अविश्‍वासू राहिले. नीतिसूत्रांच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या लोकांप्रमाणे “ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी” चालू लागले. (नीतिसूत्रे २:१३) पण यहोवा त्याच्या लोकांवर क्रोधिष्ट झाला तरीसुद्धा त्याने त्यांना सोडून दिले नाही. उलट राष्ट्रातील जे कोणी अद्यापही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करू इच्छित होते त्यांना आध्यात्मिक प्रकाश देण्याकरता त्याने यशया व इतर संदेष्ट्यांना पाठवले. या संदेष्ट्यांनी दिलेला प्रकाश खरोखर अमूल्य होता. जीवनदायक होता.

आजही अंधकाराचा काळ

८, ९. जगातील अंधकाराला आज कोणकोणत्या गोष्टी जबाबदार आहेत?

यशयाच्या काळातील परिस्थितीचे आजच्या काळाशी बरेच साम्य आहे. आपल्या या काळात, मानवी नेत्यांनी यहोवाकडे व सिंहासनावर बसलेला त्याचा राजा, येशू ख्रिस्त याकडे पाठ फिरवली आहे. (स्तोत्र २:२, ३) ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी आपल्या कळपातील लोकांची फसवणूक केली आहे. हे धर्मपुढारी देवाची सेवा करत असल्याचा दावा करतात, पण खरे पाहता त्यांच्यापैकी बहुतेक लोक या जगाच्या देवांचे—अर्थात, राष्ट्रीयवाद, भौतिकवाद, धनसंपत्ती यांसारख्या गोष्टींची आणि प्रतिष्ठित लोकांची जणू पुजा करतात. शिवाय, ते बायबलच्या विरोधात असलेल्या शिकवणुकी देतात.

कित्येक ठिकाणी, ख्रिस्ती धर्मजगताने युद्धात आणि देशांतील अंतर्गत संघर्षांत सहभाग घेतला; यात जातीसंहार व इतर भयानक रक्‍तपाताच्या घटना समाविष्ट आहेत. तसेच बायबलमध्ये सांगितल्यानुसार नैतिकतेचे समर्थन करण्याऐवजी बरेच चर्च एकतर जारकर्म व समलैंगिकता यांसारख्या अनैतिक गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा त्यांना बढावा देतात. बायबलच्या आदर्शांना धिक्कारल्यामुळे ख्रिस्ती धर्मजगत प्राचीन काळी स्तोत्रकर्त्याने वर्णन केलेल्या लोकांप्रमाणे ठरले आहेत: “त्यांना माहिती नाही व कळतहि नाही; ते अंधारात इकडेतिकडे फिरतात; पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत.” (स्तोत्र ८२:५) खरोखर यहुदाप्रमाणेच, ख्रिस्ती धर्मजगत घोर अंधकारात आहे.—प्रकटीकरण ८:१२.

१०. आज अंधकारातही प्रकाश कशाप्रकारे चमकत आहे आणि यामुळे नम्र लोकांना कोणता फायदा होतो?

१० अशा या अंधकारमय परिस्थितीत, नम्र लोकांकरता यहोवा देव प्रकाश चमकवत आहे. यासाठी, तो पृथ्वीवरील आपल्या अभिषिक्‍त सेवकांचा, अर्थात, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाचा’ उपयोग करत आहे; हे अभिषिक्‍त सेवक आज ‘जगात ज्योतीसारखे’ आहेत. (मत्तय २४:४५; फिलिप्पैकर २:१५) हा दास वर्ग ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेल्या लाखो सोबत्यांसह देवाच्या वचनातील अर्थात बायबलमधील आध्यात्मिक प्रकाश प्रतिबिंबित करत आहे. (योहान १०:१६) या प्रकाशामुळे या अंधकारमय जगातही नम्र लोकांना आशेचा किरण मिळतो; त्यांना देवासोबत नातेसंबंध जोडण्याची संधी मिळते आणि आध्यात्मिक जीवनाला घातक ठरणारे पाश टाळण्यास मदत मिळते. हा प्रकाश खरोखर अमूल्य, जीवनदायक आहे.

‘मी तुझ्या नामाचे स्तवन करीन’

११. यशयाच्या काळात यहोवाने कशाप्रकारचे मार्गदर्शन आपल्या लोकांना दिले?

११ यशयाच्या दिवसांतील अंधकारमय काळात आणि त्यानंतर बॅबिलोन्यांनी यहोवाच्या लोकांना बंदिवासात नेले तेव्हाच्या आणखीनच अंधकारमय काळात यहोवाने आपल्या लोकांना कशाप्रकारचे मार्गदर्शन दिले? नैतिक मार्गदर्शन पुरवण्याखेरीज, आपले उद्देश आपण कशाप्रकारे पूर्ण करणार आहोत हे यहोवाने त्याच्या लोकांना स्पष्टपणे सांगितले. उदाहरणार्थ, यशयाच्या २५-२७ अध्यायांत असलेल्या अद्‌भुत भविष्यवाण्या विचारात घ्या. या अध्यायांवरून, यहोवाने त्याकाळी कशाप्रकारे व्यवहार केला आणि आज तो कशाप्रकारे कार्य करत आहे याविषयी बरेच काही आपल्याला कळून येते.

१२. यशया कशाप्रकारे मनापासून यहोवाची स्तुती करतो?

१२ सर्वप्रथम यशया म्हणतो: “हे परमेश्‍वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन.” अशाप्रकारे यशया मनापासून यहोवाची स्तुती करतो! पण संदेष्ट्या यशयाने अशी प्रार्थना का केली? याचे एक महत्त्वपूर्ण कारण याच वचनाच्या दुसऱ्‍या भागात सापडते; त्यात असे म्हटले आहे: “कारण तू आश्‍चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत.”—यशया २५:१.

१३. (अ) कोणत्या ज्ञानामुळे यहोवाप्रती यशयाची कृतज्ञता आणखी वाढली? (ब) यशयाच्या उदाहरणावरून आपण कसे शिकू शकतो?

१३ यशयाच्या काळापर्यंत, यहोवाने इस्राएल राष्ट्राकरता अनेक अद्‌भुत चमत्कार केले होते आणि या सर्व चमत्कारांविषयी लिहून ठेवण्यात आले होते. स्पष्टतः, हे लिखित चमत्कार यशयाच्या परिचयाचे होते. उदाहरणार्थ, यहोवाने आपल्या लोकांना ईजिप्तच्या गुलामीतून सोडवून तांबड्या समुद्रात संतप्त फारोच्या सैन्यापासून कशाप्रकारे सुखरूप बचावले होते हे त्याला माहीत होते. तसेच, अरण्यात भटकताना यहोवाने कशाप्रकारे आपल्या लोकांचे नेतृत्त्व केले आणि कशाप्रकारे त्यांना वचनयुक्‍त देशापर्यंत आणले हे देखील त्याला माहीत होते. (स्तोत्र १३६:१, १०-२६) याप्रकारच्या ऐतिहासिक अहवालांवरून यहोवाचा विश्‍वासूपणा आणि भरवसा दिसून येतो. त्याचे “संकल्प” अर्थात त्याचे सर्व उद्देश निश्‍चित पूर्ण होतात. यहोवाने पुरवलेल्या अचूक ज्ञानाने यशयाला त्याच्या प्रकाशात चालत राहण्यास मदत केली. त्याचे उदाहरण आपल्या सर्वांकरता अनुकरणीय आहे. आपण देवाच्या लिखित वचनाचा लक्षपूर्वक अभ्यास करून त्याचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास आपणही प्रकाशात चालत राहू शकतो.—स्तोत्र ११९:१०५; २ करिंथकर ४:६.

एका शहराचा नाश

१४. एका शहराविषयी काय भाकीत करण्यात आले आणि हे भाकीत कोणत्या शहराच्या संदर्भात असावे?

१४ यहोवाने केलेल्या एका संकल्पाविषयी यशया २५:२ येथे आपल्याला वाचायला मिळते: “तू शहराला मोडतोडीचा ढीग बनविले आहे; तटबंदीचा गाव धुळीस मिळविला आहे; विदेश्‍यांच्या वाड्यांनी भरलेले शहर नष्ट केले आहे; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.” हे कोणते शहर होते? कदाचित यशया बॅबिलोनविषयी बोलत असावा. कारण खरोखर एक अशी वेळ आली जेव्हा बॅबिलोन शहर केवळ दगडमातीचा ढीग बनले.

१५. आज कोणती “मोठी नगरी” अस्तित्वात आहे आणि लवकरच तिचे काय घडेल?

१५ यशयाने उल्लेख केलेल्या शहराची आज कशाशी तुलना करता येईल का? होय. प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणाऱ्‍या मोठ्या नगरीविषयी’ उल्लेख करण्यात आला आहे. (प्रकटीकरण १७:१८) ती मोठी नगरी म्हणजे “मोठी बाबेल,” अर्थात, खोट्या धर्मांचे जागतिक साम्राज्य. (प्रकटीकरण १७:५) आज मोठ्या बाबेलचा एक मुख्य भाग ख्रिस्ती धर्मजगत असून त्यांचा पाळकवर्ग यहोवाच्या लोकांच्या राज्य प्रचाराच्या कार्यात अडथळे आणण्यात अग्रेसर आहे. (मत्तय २४:१४) पण प्राचीन बॅबिलोनप्रमाणे मोठी बाबेल देखील लवकरच नष्ट केली जाईल व ती पुन्हा कधीही अस्तित्वात येणार नाही.

१६, १७. यहोवाच्या शत्रूंनी प्राचीन काळी व आधुनिक काळातही यहोवाची स्तुती कशाप्रकारे केली आहे?

१६ ‘तटबंदीच्या गावाविषयी’ यशया आणखी काय भाकीत करतो? यहोवाला उद्देशून यशया म्हणतो: “यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील. बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील.” (यशया २५:३) हे शत्रूंचे शहर अर्थात ‘बलात्कारी लोकांचे शहर’ यहोवाची स्तुती कशी काय करील? बॅबिलोनचा अतिबलाढ्य राजा नबुखेदनस्सर याचे काय झाले हे तुम्हाला आठवत असेल. यहोवासमोर तो किती क्षुल्लक आहे याचा अनुभव आल्यावर यहोवा किती महान व सर्वशक्‍तीमान आहे हे त्याला कबूल करावेच लागले. (दानीएल ४:३४, ३५) यहोवा त्याच्या शक्‍तीचा उपयोग करतो तेव्हा त्याच्या शत्रूंना देखील, नाईलाजाने का होईना, त्याचे अद्‌भुत सामर्थ्य कबूल करावेच लागते.

१७ मोठ्या बाबेललाही कधी यहोवाचे अद्‌भुत कार्य कबूल करण्यास भाग पाडण्यात आले होते का? होय. पहिल्या महायुद्धादरम्यान यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांना बरेच कष्ट सोसून प्रचार करावा लागला. १९१८ साली त्यांना आध्यात्मिक बंदिवास सोसावा लागला कारण वॉच टावर संस्थेचे नेतृत्व करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांना तुरुंगात टाकण्यात आले. सुसंघटित रितीने प्रचार कार्य जवळजवळ थांबलेच होते. मग १९१९ साली यहोवाने त्याच्या लोकांचे पुनरुज्जीवन केले व पवित्र आत्म्याच्या माध्यमाने त्यांना नवा उत्साह दिला; यानंतर सबंध पृथ्वीवर नव्या जोमाने सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कामाला ते लागले. (मार्क १३:१०) प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे सर्व भाकीत केले होते; शिवाय यहोवाच्या लोकांच्या विरोधकांवर याचा काय परिणाम होईल हे देखील भाकीत करण्यात आले होते. ते ‘भयभीत झाले व त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले.’ (प्रकटीकरण ११:३, ७, ११-१३) ते काही यहोवाचे सेवक बनले नाहीत, पण यशयाने भाकीत केले होते त्याप्रमाणे त्यांना यहोवाच्या अद्‌भुत कार्याची दखल घ्यावीच लागली.

“दुर्बलास दुर्ग”

१८, १९. (अ) यहोवाच्या लोकांच्या विरोधकांना त्यांची सचोटी भंग करण्यात यश का आलेले नाही? (ब) कशाप्रकारे “क्रूरांचे गायन खालावले जाईल”?

१८ आता यशया यहोवाच्या प्रकाशात चालणाऱ्‍यांवर तो कशी दया करतो हे सांगतो. तो यहोवाला म्हणतो: “निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणाऱ्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळांत निवारा, उन्हात सावली, असा झालास. रुक्ष भूमीवर जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करितोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्काऱ्‍यांचे जयगीत होते [“क्रूरांचे गायन खालावले जाईल,” पं.र.भा.].”—यशया २५:४, ५.

१९ निर्दय लोकांनी खरोखरच १९१९ पासून आजपर्यंत खऱ्‍या उपासकांची सचोटी भंग करण्याचा हरतऱ्‍हेने प्रयत्न केला आहे, पण त्यांना यश आले नाही. का? कारण यहोवा त्याच्या लोकांचा दुर्ग व आश्रय आहे. तळपत्या उन्हाप्रमाणे त्यांच्यावर छळ येतो तेव्हा तो त्याच्या लोकांकरता शीतल सावलीसारखा होतो; आणि विरोधाच्या वादळात अढळ दुर्गाप्रमाणे तो त्यांच्या बाजूने उभा राहतो. देवाच्या प्रकाशात चालणारे या नात्याने आपण आत्मविश्‍वासाने त्या दिवसाची वाट पाहात आहोत, जेव्हा “क्रूरांचे गायन खालावले जाईल.” होय, आपण आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहात आहोत, जेव्हा यहोवाच्या शत्रूंचे नामोनिशाण राहणार नाही.

२०, २१. यहोवाने कोणती मेजवानी दिली आहे आणि नव्या जगात या मेजवानीत आणखी काय असेल?

२० यहोवा केवळ आपल्या सेवकांचे संरक्षणच करत नाही तर तो प्रेमळ पित्याप्रमाणे त्यांच्या सर्व गरजाही भागवतो. १९१९ साली त्याच्या लोकांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सोडवल्यानंतर त्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक अन्‍नाची जणू मेजवानीच दिली. यशया २५:६ येथे याविषयी भाकीत करण्यात आले होते: “सेनाधीश परमेश्‍वर ह्‍या डोंगरावर सर्व राष्ट्रासाठी मिष्टान्‍नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे; उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.” या मेजवानीत सामील होण्याचा किती अद्‌भुत आशीर्वाद आपल्याला लाभला आहे! (मत्तय ४:४) ‘प्रभूच्या मेजावर’ खरोखर उत्कृष्ट मिष्टान्‍ने मुबलक प्रमाणात सजवली आहेत. (१ करिंथकर १०:२१) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या लागणारे सर्व काही पुरवले जाते.

२१ देवाने आपल्याकरता पुरवलेल्या मेजवानीत अजून बरेच काही आहे. आज आपण ज्या आध्यात्मिक मेजवानीचा आस्वाद घेत आहोत ती देवाच्या प्रतिज्ञात नव्या जगात आपल्याकरता जे शारीरिक अन्‍न विपुल प्रमाणात पुरवले जाईल, त्याची आठवण करून देते. त्या नव्या जगात, ‘मिष्टान्‍ने’ म्हणजेच शारीरिक भोजन सर्वांकरता विपूल प्रमाणात असेल. शारीरिक किंवा आध्यात्मिक दृष्ट्या कोणीही भुकेला राहणार नाही. येशूच्या उपस्थितीच्या ‘चिन्हात’ समाविष्ट असलेल्या पूर्वभाकीत ‘दुष्काळांमुळे’ आज कित्येकांची उपासमार होत आहे; पण अशा खडतर परिस्थितीतही विश्‍वासू राहणाऱ्‍या आपल्या प्रिय बांधवांना लवकरच या क्लेशांतून मुक्‍ती मिळेल. (मत्तय २४:३, ७) त्यांच्याकरता स्तोत्रकर्त्याचे शब्द खरोखरच दिलासा देणारे आहेत. त्याने म्हटले: “पृथ्वीवरील डोंगरांच्या माथ्यांवर भरपूर धान्य होईल.”—स्तोत्र ७२:१६, पं.र.भा.

२२, २३. (अ) कोणते “झाकण” किंवा “आच्छादन” काढून टाकले जाईल आणि हे कसे घडेल? (ब) ‘यहोवाच्या लोकांची अप्रतिष्ठा’ कशाप्रकारे दूर केली जाईल?

२२ आता आणखी एका अद्‌भुत प्रतिज्ञेकडे लक्ष द्या. यशया, पाप व मृत्यू यांची तुलना एखाद्या ‘झाकणाशी’ किंवा ‘आच्छादनाशी’ करतो. तो म्हणतो: “सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन, तो या डोंगरावरून उडवून देत आहे.” (यशया २५:७) जरा विचार करा! मनुष्यजातीला गुदमरून टाकणारे पाप व मृत्यूचे आच्छादन नाहीसे होईल. येशूच्या खंडणी बलिदानाचे लाभ आज्ञाधारक व विश्‍वासू मानवजातीला पूर्णपणे लागू केले जातील त्या दिवसाची आपण किती आतुरतेने वाट पाहात आहोत!—प्रकटीकरण २१:३, ४.

२३ त्या अद्‌भुत काळाच्या संदर्भात संदेष्टा यशया यहोवाच्या प्रेरणेने अशी शाश्‍वती देतो: “तो मृत्यू कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण परमेश्‍वर हे बोलला आहे.” (यशया २५:८) तेव्हा कोणीही नैसर्गिक कारणांमुळे मरणार नाही; कोणावरही आपल्या प्रियजनाच्या मृत्यूमुळे रडण्याची पाळी येणार नाही. खरोखर आजच्यापेक्षा ती अद्‌भुत परिस्थिती किती वेगळी असेल! आपण बऱ्‍याच काळापासून सहन केलेली देवाविषयीची आणि त्याच्या सेवकांविषयीची निंदा व खोटा प्रचार पुन्हा कधीही पृथ्वीच्या कोणत्याही भागात ऐकावा लागणार नाही. का नाही? कारण ही निंदा व खोटा प्रचार जो मुळात घडवून आणतो त्याचा म्हणजे, लबाडीचा बाप म्हटलेल्या दियाबल सैतानाचा व त्याच्या सर्व संततीचा यहोवा नाश करेल.—योहान ८:४४.

२४. प्रकाशात चालणाऱ्‍यांकरता यहोवाने केलेल्या अद्‌भुत कृत्यांचा ते विचार करतात तेव्हा ते कशी प्रतिक्रिया दाखवतात?

२४ यहोवाचे सामर्थ्य कोणकोणत्या अद्‌भुत मार्गांनी प्रकट केले जाईल याचा विचार केल्यावर प्रकाशात चालणारे आनंदाने घोषणा करतात: “पाहा, हा आमचा देव आहे, आम्ही याची वाट पाहिली आहे, आणि हा आम्हाला तारील; हा यहोवा आहे, याची आम्ही वाट पाहिली आहे; याच्या तारणात आम्ही उल्लासू व आनंद व्यक्‍त करू.” (यशया २५:९, पं.र.भा.) लवकरच नीतिमान मानवजात आनंदोल्लास करेल. अंधकार पूर्णपणे नाहीसा होईल आणि विश्‍वासू जन यहोवाच्या प्रकाशात सदासर्वकाळ आनंद करतील. यापेक्षा अद्‌भुत आशा कोणती असू शकेल का? निश्‍चितच नाही!

तुम्ही समजावून सांगू शकता का?

• आज प्रकाशात चालणे का महत्त्वाचे आहे?

• यशयाने यहोवाच्या नावाची स्तुती का केली?

• देवाच्या लोकांचे शत्रू त्यांची सचोटी भंग करण्यात कधीही यशस्वी का होणार नाहीत?

• प्रकाशात चालणाऱ्‍यांकरता कोणते वैभवी आशीर्वाद राखून ठेवले आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२, १३ पानांवरील चित्र]

यहुदाचे रहिवाशी मोलेख दैवताला लहान मुले अर्पण करीत

[१५ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या अद्‌भुत कृत्यांच्या ज्ञानामुळे यशयाने यहोवाच्या नावाची स्तुती केली

[१६ पानांवरील चित्र]

नीतिमान लोक यहोवाच्या प्रकाशात सदासर्वकाळ आनंद करतील