व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सिरिल आणि मेथोडियस एका वर्णमालेचा शोध लावणारे बायबल अनुवादक

सिरिल आणि मेथोडियस एका वर्णमालेचा शोध लावणारे बायबल अनुवादक

सिरिल आणि मेथोडियस एका वर्णमालेचा शोध लावणारे बायबल अनुवादक

“आमचे राष्ट्र एक ख्रिस्ती राष्ट्र आहे. पण, आम्हाला शिकवणारा कुणीच नाही. आम्हाला ग्रीक समजत नाही, की लॅटिन समजत नाही. . . . आम्हाला अक्षरओळख होत नाही, की त्यांचा अर्थबोध होत नाही; तेव्हा, आमच्याकडे असे शिक्षक पाठवावेत जे आम्हाला शास्त्रवचने वाचण्यास शिकवतील आणि त्यांचा अर्थ समजावून सांगतील.” —रास्तीस्लाव्ह, मोरेव्हियाचा राजकुमार, सा.यु. ८६२.

आज स्लॅव्हिक कुळातील भाषा बोलणारे ४३.५ कोटींहून अधिक लोक आपल्या मायबोलीत बायबलचे वाचन करू शकतात. * यांपैकी ३६ कोटी लोक सिरिलिक वर्णमालेचा उपयोग करतात. तरी, १२ शतकांआधी त्यांच्या पूर्वजांच्या बोली भाषांची कोणतीही लिपी अथवा वर्णमाला नव्हती. पण, सिरिल आणि मेथोडियस नावाच्या दोन भावांनी यात बदल घडवून आणला. बायबलचे जतन करण्यात आणि त्यास बढावा देण्यात या दोघा भावांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता धाडसी प्रयत्न आणि नवनवीन आविष्कार केले. त्यांच्या कार्यांचा हा रोचक इतिहास, देवाच्या वचनावर नितांत प्रेम करणाऱ्‍या लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. पण, हे दोघे पुरुष होते तरी कोण? आणि हे कार्य करत असताना कोण-कोणत्या दिव्यांतून त्यांना जावे लागले?

एक “तत्त्वज्ञानी,” तर दुसरा राज्यपाल

सिरिल (सा.यु. ८२७-८६९, मूळ नाव कॉन्स्टंटाइन) आणि मेथोडियस (सा.यु. ८२५-८८५) या दोघा भावंडांचा जन्म, ग्रीसच्या थेस्सलोनायका शहरात, एका प्रतिष्ठित घराण्यात झाला होता. त्यावेळी थेस्सलोनायका एक द्विभाषक शहर होते. म्हणजे तिथले रहिवासी ग्रीक आणि एक प्रकारची स्लॅव्हिक भाषा बोलायचे. त्या ठिकाणी असंख्य स्लाव्ह लोकांचे वास्तव्य होते. शिवाय, तिथल्या रहिवाशांचे सभोवतालच्या स्लाव्ह समाजाशी अगदी निकटचे संबंध. त्यामुळेच कदाचित सिरिल आणि मेथोडियस यांना दक्षिणेकडील स्लाव्ह लोकांच्या भाषेची सविस्तर माहिती मिळाली असेल. आणि त्यांची आई मूळची स्लाव्ह होती असाही उल्लेख मेथोडियसचा एक चरित्रकार करतो.

आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सिरिल, बायझंटाइन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टॅन्टीनोपल येथे जाऊन स्थायिक झाले. तिथल्या एका शाही विद्यापीठातून त्यांनी राज्य कारभारासंबंधीचे शिक्षण घेतले आणि शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्‍तींसोबत ते वावरू लागले. मग, पूर्वेकडील सर्वात प्रख्यात चर्च भवनात अर्थात आईया सोफीया येथे त्यांनी ग्रंथपाल म्हणून काम केले आणि नंतर ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक बनले. प्रज्ञावंत अभ्यासक असल्यामुळे सिरिल यांना ‘तत्त्वज्ञानी’ हे टोपणनाव पडले.

दरम्यान मेथोडियस यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच राजकीय प्रशासनाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरवले. बायझंटाइन साम्राज्याच्या सरहद्दीवरील एका जिल्ह्यात (जिथे असंख्य स्लाव्ह लोकांचे वास्तव्य होते) त्यांनी आर्कनचे अर्थात राज्यपालाचे पद भुषवले. पण, मेथोडियसने या पदाचा त्याग केला आणि आशिया मायनरच्या बिथनिया प्रांतातील एका मठात ते गेले. आणि सा.यु. ८५५ मध्ये सिरिलसुद्धा तिथे आले.

सा.यु. ८६० मध्ये कॉन्स्टॅन्टीनोपलच्या प्रमुख बिशपने सिरिया आणि मेथोडियस यांना एका महत्त्वाच्या कामासाठी परदेशी पाठवले. काळ्या समुद्राच्या ईशान्येकडील खझार जमातीत त्यांना पाठवण्यात आले. इस्लाम, यहुदी आणि ख्रिस्ती यांपैकी कोणता धर्म स्वीकारावा याविषयी हे लोक अजूनही साशंक होते. येथे येताना वाटेत, क्रिमियातील केर्सोनीस या ठिकाणी सिरिल यांनी काही दिवस मुक्काम केला. काही विद्वानांच्या मते, सिरिल यांनी येथेच हिब्रू आणि समॅरीटन भाषा शिकल्या असाव्यात आणि हिब्रू व्याकरणाचे एक पुस्तक खझारांच्या भाषेत अनुवादित केले असावे.

मोरेव्हियातून बोलावणे

सा.यु. ८६२ मध्ये मोरेव्हियाचा (आधुनिक दिवसांतले झेकिया, पश्‍चिम स्लोव्हाकिया आणि पश्‍चिम हंगेरी) राजकुमार रास्तीस्लाव्ह याने बायझंटाइनचा सम्राट मायकल तिसरा यास, या लेखाच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, शास्त्रवचनांचे शिक्षक पाठवण्याची विनंती केली. खरं म्हणजे, मोरेव्हियातील स्लॅव्हिक भाषिक रहिवाशांना पूर्व फ्रँक राज्यातून (आजचे जर्मनी आणि ऑस्ट्रिया) आलेल्या मिशनऱ्‍यांकडून चर्चच्या शिकवणुकींशी आधीच परिचय झाला होता. पण, आपल्या देशांवरील जर्मन जमातींच्या राजकीय आणि धार्मिक प्रभावाची चिंता रास्तीस्लाव्हला भेडसावत होती. पण, कॉन्स्टॅन्टीनोपलसोबतचे धार्मिक संबंध, राजकीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून आपले राष्ट्र स्वयं-शासित राहण्यास मदत करतील असे त्याला वाटत होते.

सम्राटाने सिरिल आणि मेथोडियस यांना मोरेव्हियाला पाठवण्याचे ठरवले. ही कामगिरी हाताळण्यास हे दोघेही अगदी योग्य होते. कारण त्यांनी विश्‍वविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले होते, ते दोघेही अतिशय प्रज्ञावंत अभ्यासक आणि भाषाविषारद होते. नवव्या शतकातल्या एका चरित्रकाराने म्हटले, की सिरिल आणि मेथोडियस यांना मोरेव्हियाला जाण्याची गळ घालताना सम्राटाने त्यांना म्हटले: “तुम्ही दोघं तर मूळचे थेस्सलोनायकातले आणि थेस्सलोनायकातले सर्व रहिवासी शुद्ध स्लाव्ह भाषा बोलतात.”

एका वर्णमालेचा आणि बायबल-भाषांतराचा जन्म

मोरेव्हियाला जाण्याआधी सिरिल यांनी आपल्या पुढील कार्याची तयारी करण्यास सुरवात केली. स्लाव्ह लोकांसाठी त्यांनी एक लिपी तयार केली. असे म्हटले जाते, की सिरिल यांना ध्वनीउच्चारांचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे ग्रीक आणि हिब्रू वर्णांचा उपयोग करून त्यांनी स्लॅव्होनिक * भाषेतल्या प्रत्येक स्वरासाठी एक वर्ण तयार करण्याचा प्रयत्न केला. काही संशोधकांच्या मते, ही वर्णमाला तयार करण्यास त्यांनी कित्येक वर्षांआधीच सुरवात केली होती. आणि सिरिल यांनी निर्माण केलेल्या वर्णमालेचे नेमके रुप कोणते हे अद्यापही निश्‍चित नाही.—“सिरिलिक की ग्लॅगलिडिक्‌?” ही पेटी पाहा.

याच काळादरम्यान सिरिल यांनी बायबलचे झटपट भाषांतर करण्याचा एक कार्यक्रम सुरू केला. असे म्हटले जाते, की नवीनच निर्माण केलेल्या वर्णमालेचा उपयोग करून सिरिल यांनी योहानाच्या शुभवर्तमाच्या पहिल्या वाक्यांशाचा ग्रीकमधून स्लॅव्होनिक भाषेत अनुवाद करून सुरवात केली: “सुरवातीला शब्द होता . . . ” त्यानंतर त्यांनी शुभवर्तामानाच्या चार पुस्तकांचे, पौलाच्या पत्रांचे आणि स्तोत्र या पुस्तकाचेही भाषांतर केले.

पण हे सर्व सिरिलने एकट्यानेच केले का? या कामात कदाचित मेथोडियसने सिरिलची मदत केली असेल. केम्ब्रिज मेडिव्हल हिस्ट्री हे पुस्तक देखील हेच म्हणते: “[सिरिल] यांना बहुधा इतरांनीसुद्धा मदत केली असावी. सुरवातीला, ग्रीक भाषेचे ज्ञान असलेल्या मूळच्या स्लाव्ह लोकांनी बहुधा त्याची मदत केली असेल. सिरिल यांनी अनुवादित केलेल्या सर्वात जुन्या साहित्याचे परीक्षण केल्यास, . . . त्यात उच्च प्रतीच्या स्लॅव्होनिक भाषेचा उपयोग केल्याचे दिसून येते. यावरून समजते की सिरिल यांना अशा काही लोकांनी बहुधा मदत केली असेल जे मूळात स्लाव्ह होते.” बायबलच्या उर्वरित भागाचे भाषांतर मेथोडियस यांनी पूर्ण केले. त्याबद्दल आता आपण पाहू या.

“वखवखलेल्या शिकारी कुत्र्यांप्रमाणे”

सा.यु. ८६३ मध्ये सिरिल आणि मेथोडियस यांनी मोरेव्हियातील कार्यास हात घातला. मोरेव्हियात त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. त्यांना बायबलचे आणि धार्मिक पुस्तकांचे भाषांतर करण्याखेरिज नवीनच आविष्कारलेल्या स्लॅव्होनिक लिपीचे शिक्षणही काही स्थानिक लोकांना द्यायचे हाते.

हे काम अर्थातच इतके सोपे नव्हते. कारण मोरेव्हियातील फ्रँक पाळक स्लॅव्हिक भाषेचा वापर करण्यास कडाडून विरोध करत होते. उपासनेत केवळ लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू या तीन भाषांचाच प्रयोग झाला पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता. आपण तयार केलेल्या नवीन लिपीचे प्रसारण करण्यासाठी पोपची मर्जी संपादन करण्याच्या हेतूने सा.यु. ८६७ मध्ये सिरिल आणि मेथोडियस रोमला रवाना झाले.

प्रवासादरम्यान, व्हेनिस येथे सिरिल आणि मेथोडियस यांना वरील तीन भाषांचा अट्टहास धरणाऱ्‍या लॅटिन पाळकांच्या आणखीन एका समूहाचा सामना करावा लागला. सिरिल यांच्या एका मध्ययुगीन चरित्रकाराने म्हटले त्याप्रमाणे स्थानिक बिशप, पाळक आणि मठवासी वखवखलेल्या शिकारी कुत्र्यांप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडले. त्या अहवालानुसार, विरोधकांना उत्तर देताना सिरिल यांनी १ करिंथकर १४:८, ९ चा उल्लेख केला: “कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीहि सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वाऱ्‍याबरोबर बोलणारे व्हाल.”

दोघे भाऊ शेवटी रोमला पोहंचले तेव्हा पोप ॲड्रियन दुसरे यांनी त्यांना स्लॅव्होनिक भाषा वापरण्याची पूर्ण संमती दिली. रोममध्ये असतानाच काही महिन्यांनंतर सिरिल यांना आजाराचे निमित्त झाले आणि दोनच महिन्यांत वयाच्या ४२ वर्षी मृत्यूने त्यांना गाठले.

सिरिलच्या मृत्यूनंतर पोप ॲड्रियन दुसरे यांनी मेथोडियसला धीर दिला आणि मोरेव्हियात व नीट्रा (सध्याचे स्लोव्हाकिया) नगराच्या आसपास आपले कार्य चालू ठेवण्यास सांगितले. त्या भागात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी पोपने मेथोडियसला काही पत्रे दिली. ही पत्रे, स्लॅव्होनिक भाषेचा उपयोग करण्याची संमती देण्याबाबत आणि मेथोडियसची आर्च-बिशप पदी नेमणूक करण्याबाबत होती. पण, सा.यु. ८७० मध्ये फ्रँक बिशप, हेरमानरिक यांनी नीट्राचा राजकुमार, स्वाटोप्लक याच्या मदतीने मेथोडियसला गजाआड केले. जर्मनीच्या आग्नेयास असलेल्या एका मठात तब्बल अडीच वर्षे मेथोडियसला डांबून ठेवले होते. शेवटी, ॲड्रियन दुसरा याचा वारस जॉन आठवा याने मेथोडियसची सुटका करण्याचा हुकूमनामा दिला. मग, पुन्हा एकदा त्याला बिशप पद बहाल करण्यात आले आणि उपासनेत स्लॅव्होनिक भाषाचा उपयोग करण्यास पोपने पुन्हा त्याला पूर्ण पाठबळ दिले.

पण, फ्रँकच्या पाळकांचा विरोध अजूनही कायम होता. मेथोडियसवर पाखंडी असल्याचा आरोप लावण्यात आला. पण, त्याने असे सर्व आरोप खोडून काढले आणि सरतेशेवटी पोप जॉन आठ यांजकडून एक आज्ञापत्र प्राप्त केले. चर्चमध्ये स्लॅव्होनिक भाषेचा खासपणे उपयोग करण्याची परवानगी देणारे हे पत्र होते. सध्याचे पोप जॉन पॉल दुसरे यांनी कबूल केले त्याप्रमाणे, “प्रवास, नागवणूक, हालअपेष्टा, शत्रुत्व आणि छळ . . . इतकेच नव्हे तर कठोर कारावास यांतच” मेथोडियसचे उभे आयुष्य गेले. सगळ्यात उपरोधिक गोष्ट म्हणजे, बिशपांकडून आणि रोमसोबत चांगले नातेसंबंध असलेल्या राजकुमारांकडून मेथोडियसला अशी निंद्य वागणूक मिळाली.

संपूर्ण बायबलचे भाषांतर होते

पण, एकसारखा विरोध आणि छळ होत असताना देखील मेथोडियस यांनी अनेक लघुलिपी-लेखकांना हाताशी धरून बायबलच्या उर्वरित भागाचे स्लॅव्होनिक भाषेत भाषांतर केले. मिळालेल्या माहितीनुसार, मेथोडियसने केवळ आठ महिन्यांत हे प्रचंड मोठे कार्य पूर्ण केले. पण, बायबलमध्ये जोडण्यात आलेली मकाबी लोकांची नकली पुस्तके मात्र त्याने अनुवादित केली नाहीत.

सिरिल आणि मेथोडियस यांनी केलेल्या भाषांतराच्या गुणवत्तेची अचूक पारख करणे आज कठीण आहे. कारण मूळ भाषांतर केले गेले त्या काळातील केवळ मोजक्याच हस्तलिखित प्रती आज उपलब्ध आहेत. त्या मूळ, विरळ हस्तलिखितांचे परीक्षण केल्यावर भाषाविषारदांच्या लक्षात येते की ते भाषांतर अगदी अचूक असून सहजसोप्या भाषेत केले होते. आवर स्लॅव्हिक बायबल या ग्रंथात म्हटले आहे, की या दोघा भावांना “अनेक नवीन शब्द आणि अभिव्यक्‍ती तयार कराव्या लागल्या. . . . आणि हे सर्व त्यांनी अतिशय चोखंदळपणे केले [व] स्लॅव्हिक भाषेला अभूतपूर्व व समृद्ध शब्द-संग्रह प्रदान केला.”

एक कायमस्वरूपी वारसा

सा.यु. ८८५ मध्ये मेथोडियसचा मृत्यू झाला त्यानंतर फ्रँकच्या विरोधकांनी त्याच्या शिष्यांना मोरेव्हियातून हाकलून लावले. तेव्हा त्यांनी बोहिमिया, दक्षिण पोलंड आणि बल्गेरिया या ठिकाणी आश्रय घेतला. अशाप्रकारे सिरिल आणि मेथोडियस यांच्या कार्यात कोणताही खंड न पडता ते चालू राहिले. इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्याची मूळे देखील सर्वत्र पसरली. स्लॅव्होनिक भाषेला या भावांनी एक लिखित आणि स्थायी स्वरूप दिले. ही भाषा पुढे समृद्ध झाली, तिचा विकास होत गेला आणि नंतर तिच्यातून अनेक भाषांचा जन्म झाला. आज स्लॅव्हिक कुळात १३ निरनिराळ्या भाषा आणि पोटभाषा आहेत.

याशिवाय, बायबलचे भाषांतर करण्यास सिरिल आणि मेथोडियस यांनी केलेल्या धाडसी प्रयत्नांचा परिणाम असा झाला की स्लॅव्हिक भाषांमध्ये शास्त्रवचनांचे इतर अनेक भाषांतर केले गेले असून ते सर्व आज उपलब्ध आहेत. या भाषा बोलणारे कोट्यवधी लोक आता आपल्या स्वतःच्या भाषेत देवाचे वचन वाचू शकतात. होय, बायबलचा कितीही विरोध झाला तरीसुद्धा त्यातील हे शब्द खरे ठरले आहेत: “आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”—यशया ४०:८.

[तळटीपा]

^ स्लॅव्हिक भाषा पूर्व व मध्य युरोपमध्ये बोलल्या जातात. यात रशियन, युक्रेनियन, सर्बियन, पोलिश, चेक, बल्गेरियन आणि अशा इतर भाषांचा समावेश होतो.

^ या लेखातला “स्लॅव्होनिक” शब्द, सिरिल आणि मेथोडियस यांनी आपल्या मिशनरी कार्यासाठी आणि साहित्यिक कार्यासाठी उपयोग केलेल्या स्लॅव्हिक बोली भाषेला सूचित करतो. आज काहीजण त्यास “ओल्ड स्लॅव्होनिक” अथवा “ओल्ड चर्च स्लॅव्होनिक” म्हणतात. सा.यु. नवव्या शतकात स्लाव्ह लोक केवळ एक नव्हे तर अनेक भाषा बोलायचे याबद्दल भाषाविषारदांना कोणतीही शंका नाही.

सिरिलिक की ग्लॅगलिडिक्‌

सिरिल यांनी तयार केलेली वर्णमाला नेमकी कोणती होती हे निश्‍चित नसल्यामुळे त्या वर्णमालेच्या रचनेवरून भाषाविषारदांमध्ये बरेच वादंग उठले आहेत. सिरिलिक म्हटलेली वर्णमाला हुबेहूबपणे ग्रीक वर्णमालेवर आधारित आहे. आणि स्लॅव्होनिक भाषेतील स्वरांसाठी आणखी बारा वर्ण तयार करण्यात आले आहेत. हे बारा वर्ण ग्रीक भाषेत आढळत नाहीत. स्लॅव्होनिक भाषेच्या काही सर्वात जुन्या हस्तलिखितांमध्ये मात्र एका वेगळ्याच लिपीचा अर्थात ग्लॅगलिडिक्‌ लिपीचा उपयोग केल्याचे दिसून येते. आणि नेमक्या याच लिपीचा सिरिलने आविष्कार केला होता असा अनेक विद्वानांचा विश्‍वास आहे. ग्लॅगलिडिक्‌ लिपीचे काही वर्ण ग्रीक आणि हिब्रूच्या प्रवाही लेखनपद्धतीतून उसने घेतले आहेत; तर काही मध्ययुगातील ध्वनि-उच्चार खुणांवरून घेतले आहेत. पण, बहुतेक वर्णांची रचना मूळ व संमिश्रित आहे. ग्लॅगलिडिक्‌ लिपी एक उच्च श्रेणीचा नवीन आविष्कार असल्याचे दिसून येते. पण, तरीसुद्धा आधुनिक काळातील रशियन, युक्रेनियन, सर्बियन, बल्गेरियन आणि मॅसेडोनियन लिपीचा तसेच २२ अधिकृत भाषांचा विकास (ज्यांपैकी काही स्लॅव्होनिक आहेत) सिरिलिक लिपीतूनच झाला आहे.

बाल्टिक समुद्र

(पोलंड)

बोहिमिया (झेकिया)

मोरेव्हिया (पू. झेकिया, प. स्लोव्हाकिया, प. हंगेरी)

नीट्रा

पूर्व फ्रँक राज्य (जर्मनी आणि ऑस्ट्रिया)

इटली

व्हेनिस

रोम

भूमध्य समुद्र

बल्गेरिया

ग्रीस

थेस्सलोनायका

(क्रिमिया)

काळा समुद्र

बिथनिया

कॉन्स्टॅन्टीनोपल (इस्तांबूल)

[३१ पानांवरील चित्र]

सिरिलिक लिपिमधले १५८१ सालातले एक स्लॅव्होनिक बायबल

[चित्राचे श्रेय]

बायबल: Narodna in univerzitetna knjiz̆nica-Slovenija-Ljubljana