व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे

देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे

देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे

‘देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे.’—रोमकर ८:६.

१. काहीजण मानवी शरीराबद्दल कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतात, आणि कोणता प्रश्‍न विचारात घेण्याजोगा आहे?

 यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींपैकी मानवी शरीराविषयी विचार करताना दावीदाने एका स्तोत्रात असे म्हटले, “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो.” (स्तोत्र १३९:१४) दाविदाप्रमाणे यहोवाची स्तुती करण्याऐवजी काही धर्मगुरू मात्र मानवी शरीराबद्दल असे म्हणतात की ते केवळ पापाचे वस्तिस्थान आणि माध्यम आहे. ‘अज्ञानाचे पांघरूण, दुर्गुणांचे मूळ, पापाची बेडी, अंधारी गुहा, जिवंत प्रेत, आणि चालतेबोलते थडगे’ यांसारखी रूपके देखील मानवी शरीराच्या संदर्भात वापरण्यात आली आहेत. अर्थात प्रेषित पौलानेही एकदा म्हटले होते की “माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही.” (रोमकर ७:१८) पण देहस्वभावाच्या पापी प्रवृत्तींवर मात करणे अशक्य आहे असे त्याला म्हणायचे होते का?

२. (अ) “देह स्वभावाचे चिंतन” म्हणजे काय? (ब) देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्‍यांच्या ‘देहस्वभावात’ व ‘आध्यात्मिक प्रवृत्तीत’ कशाप्रकारचा संघर्ष होत असतो?

बायबलमध्ये कधीकधी “देह” हा शब्द अपरिपूर्ण स्थितीत असलेल्या आणि बंडखोर आदामापासून आलेल्या पापी मनुष्यजातीच्या संदर्भात वापरला जातो. (इफिसकर २:३; स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२) आदामाकडून उपजतपणे मिळालेल्या या पापी प्रवृत्तीला ‘देहस्वभावाची दुर्बलता’ म्हटले आहे. (रोमकर ६:१९) पौलाने अशी ताकीद दिली: ‘देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे.’ (रोमकर ८:६) “देह स्वभावाचे चिंतन” म्हणजे पापी शरीराच्या वासनांना वश होणे व त्यांनुसार वागणे. (१ योहान २:१६) म्हणूनच परमेश्‍वराला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या आध्यात्मिक प्रवृत्तीचे आणि पापी स्वभावाचे जणू निरंतर युद्ध चालले असते. कारण आपली स्वाभाविक पापी प्रवृत्ती सतत आपल्यावर “देहाची कर्मे” करण्याचा दबाव आणत असते. (गलतीकर ५:१७-२३; १ पेत्र २:११) या आंतरिक संघर्षाचे वर्णन केल्यावर पौल म्हणतो: “किती मी कष्टी माणूस! मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” (रोमकर ७:२४) पण याचा अर्थ, पौल पापाच्या या दडपणाला निमूटपणे वश झाला का? बायबल स्पष्टपणे सांगते की त्याने असे मुळीच केले नाही!

मोह आणि पाप यांचा खरा अर्थ

३. पाप व वासनांविषयी बऱ्‍याच जणांचा कसा दृष्टिकोन आहे, पण बायबल आपल्याला अशा वृत्तीपासून कशाप्रकारे सांभाळून राहण्यास सांगते?

आजकाल बऱ्‍याच लोकांच्या शब्दकोषात पाप हा शब्दच नाही. ते म्हणतात, ‘पाप वगैरे काही नसते. हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो.’ असे म्हणणारे लोक एक गोष्ट लक्षात घेत नाहीत; ती म्हणजे, ‘आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्‍या स्वरूपाने प्रगट होऊ. ह्‍यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो.’ (२ करिंथकर ५:१०) काहीजण पापाबद्दल अगदी बेपर्वा दृष्टिकोन बाळगतात. मनात येणारी प्रत्येक इच्छा, पुढचा मागचा विचार न करता लगेच तृप्त करा असे काही संस्कृतींतून प्रोत्साहन दिले जाते. खाण्यापिण्याबद्दल असो, शारीरिक वासना असोत, मौजमजा किंवा महत्त्वाकांक्षा असो, लोकांना सर्वकाही हवे असते आणि तेसुद्धा त्याच क्षणी हवे असते! (लूक १५:१२) क्षणिक सुखापलीकडे, भविष्यातील ‘खऱ्‍या जीवनाच्या’ आनंदाकडे ते पाहात नाहीत. (१ तीमथ्य ६:१९) पण बायबल आपल्याला काळजीपूर्वक पुढचा विचार करण्याचे प्रोत्साहन देते. ज्या गोष्टींमुळे आपल्याला आध्यात्मिक किंवा इतर प्रकारे नुकसान होऊ शकते त्या गोष्टी प्रकर्षाने टाळायचे मार्गदर्शन ते आपल्याला देते. परमेश्‍वराने प्रेरित केलेल्या एका नीतिसूत्रानुसार: “चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.”—नीतिसूत्रे २७:१२.

४. पौलाने १ करिंथकर १०:१२, १३ येथे काय सल्ला दिला?

करिंथ हे शहर अतिशय अनैतिक म्हणून ओळखले जात होते. याच करिंथ शहरात राहणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांना पौलाने मोहांपासून सांभाळून राहण्याविषयी व पापाच्या शक्‍तीविषयी असा व्यवहार्य सल्ला दिला: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परिक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्‍वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१२, १३) तरुण असो वा वयस्क, स्त्री असो वा पुरुष, वेळोवेळी आपल्या सर्वांसमोर शाळाकॉलेजांत, कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी वाईट गोष्टी करण्याचा मोह येतो. म्हणूनच आपण पौलाच्या शब्दांवर विचार करू या आणि त्याने जे सांगितले त्याचा आपल्याकरता काय अर्थ होतो हे पडताळून पाहू या.

फाजील आत्मविश्‍वास बरा नाही

५. फाजील आत्मविश्‍वास बाळगणे का धोक्याचे आहे?

पौल म्हणतो: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.” आपण अनैतिक गोष्टींत कधीच पडणार नाही असा फाजील आत्मविश्‍वास बाळगणे धोक्याचे आहे. असा विचार करणाऱ्‍याला पापाबद्दल आणि पापाच्या शक्‍तीबद्दल जाणीव नसते. जर मोशे, दावीद, शलमोन व प्रेषित पेत्र देखील पापात पडले तर मग आपण पापात पडणारच नाही असे म्हणणे खरोखर रास्त ठरेल का? (गणना २०:२-१३; २ शमुवेल ११:१-२७; १ राजे ११:१-६; मत्तय २६:६९-७५) नीतिसूत्रे १४:१६ म्हणते, “सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो.” तसेच येशूनेही म्हटले होते: आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे. (मत्तय २६:४१) अपरिपूर्ण मनुष्यांपैकी कोणीही वाईट इच्छांपासून सुटलेला नाही. त्यामुळे आपण पौलाने दिलेली ताकीद गंभीरतेने विचारात घेतली पाहिजे आणि वाईट गोष्टी करण्याच्या मोहाचा प्रतिकार केला पाहिजे; असे न केल्यास आपण पापात पडण्याचा धोका पत्करतो.—यिर्मया १७:९.

६. मोहाला तोंड देण्याची तयारी आपण केव्हा आणि कशी केली पाहिजे?

अनपेक्षितपणे येणाऱ्‍या समस्यांना तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयारी करणे केव्हाही चांगले. आसा नावाच्या राजाला या गोष्टीची जाणीव असल्यामुळेच, त्याने युद्ध सुरू होईपर्यंत वाट पाहण्याऐवजी, शांतीच्या काळातच आपले सैन्यबळ वाढवले. (२ इतिहास १४:२, ६, ७) शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिल्यास, खूप उशीर होऊ शकतो हे त्याला माहीत होते. त्याचप्रकारे, एखादी वाईट गोष्ट करण्याचा मोह झाल्यास आपण काय करणार हे ठरवण्यासाठी त्या क्षणापर्यंत थांबू नये. हा निर्णय आधीच, म्हणजे आपले मन शांत असते आणि आपण स्पष्टपणे विचार करण्याच्या स्थितीत असतो तेव्हाच केला पाहिजे. (स्तोत्र ६३:६) दानीएल व त्याच्या देवभीरू सोबत्यांवर राजाच्या मेजावरून पक्वान्‍ने खाण्याचा दबाव आणला गेला; पण कोणत्याही परिस्थितीत यहोवाच्या नियमशास्त्राला जडून राहण्याचा निर्णय त्यांनी फार आधीच केला होता. त्यामुळे त्यांना आपल्या निर्धारावर अडून राहणे जड गेले नाही. अशुद्ध भोजन खाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. (दानीएल १:८) आपणसुद्धा, वाईट गोष्टी करण्याचा मोह होईपर्यंत वाट न पाहता नैतिकदृष्ट्या नेहमी निष्कलंक राहण्याचा आतापासूनच निर्धार केला पाहिजे. असे केल्यास, आपण पापाचा यशस्वीपणे प्रतिकार करू शकू.

७. इतरांनीही मोहांना यशस्वीपणे तोंड दिले आहे हे जाणणे सांत्वनदायक का आहे?

“मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परिक्षा तुम्हावर गुदरली नाही.” पौलाचे हे शब्द किती सांत्वनदायक आहेत! (१ करिंथकर १०:१३) प्रेषित पेत्राने लिहिले: “[दियाबलाविरुद्ध] विश्‍वासांत दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:९) होय, आपल्यावर आलेल्या मोहांना ज्याअर्थी इतरांनीही तोंड दिले आहे आणि यशस्वीपणे त्यांवर मात केली आहे त्याअर्थी आपणही असे नक्कीच करू शकतो. पण या नैतिकरित्या पतीत झालेल्या जगात राहात असताना आज न उद्या आपल्यावरही वाईट गोष्टी करण्याचा मोह येईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. मग आपल्या दैहिक दुर्बलतेवर आणि पाप करण्याच्या मोहावर यशस्वीपणे मात करण्याचा आत्मविश्‍वास आपण कसा मिळवू शकतो?

मोहाला यशस्वीपणे तोंड देणे अशक्य नाही!

८. मोह टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?

‘पापाचे दास’ होण्याचे टाळण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पाप करण्याचा मोह होईल अशाप्रकारचे प्रसंग शक्यतो टाळणे. (रोमकर ६:६) म्हणूनच नीतिसूत्रे ४:१४, १५ येथे आवर्जून सांगितले आहे की “दुर्जनांच्या मार्गांत शिरू नको; दुष्टांच्या मार्गाने चालू नको. त्यापासून दूर राहा, त्याजवळून जाऊ नको; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग.” कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत आपल्या हातून सहज पाप घडू शकेल याची सहसा आपल्याला आधीच जाणीव होते. अशा वेळी कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने दुसरा विचार न करता लगेच ‘मागे फिरले’ पाहिजे. ज्यामुळे आपल्या मनात चुकीच्या इच्छा उत्पन्‍न होतील किंवा वाईट वासना अनावर होतील अशा कोणत्याही व्यक्‍तीपासून, वस्तूपासून किंवा ठिकाणापासून चार हात दूरच राहणे चांगले.

९. ख्रिस्ती तत्त्वांशी तडजोड करायला लावतील अशाप्रकारच्या प्रसंगांपासून पळ काढण्याच्या महत्त्वावर बायबलमध्ये कशाप्रकारे जोर देण्यात आला आहे?

मोहावर मात करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मोहात पाडणाऱ्‍या प्रसंगापासून पळ काढणे. पौलाने असा सल्ला दिला की “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.” (१ करिंथकर ६:१८) तसेच, त्याने लिहिले: “मूर्तिपूजेपासून दूर पळा.” (१ करिंथकर १०:१४) तीमथ्यालाही प्रेषित पौलाने संपत्तीच्या मागे लागण्याच्या प्रवृत्तीपासून आणि “तरुणपणाच्या वासनांपासून” दूर पळ अशी ताकीद दिली.—२ तीमथ्य २:२२; १ तीमथ्य ६:९-११.

१०. मोहात पाडणाऱ्‍या प्रसंगापासून पळ काढणे किती महत्त्वाचे आहे हे कोणत्या दोन विरोधात्मक उदाहरणांवरून स्पष्ट होते?

१० इस्राएलचा राजा दावीद याच्याबाबतीत काय घडले याचा विचार करा. महालाच्या गच्चीवर फिरत असताना, त्याला एक सुंदर स्त्री स्नान करताना दिसली. त्याच्या मनात अयोग्य वासना निर्माण झाल्या. त्याने लगेच तेथून निघून जायचे होते, त्या मोहविणाऱ्‍या प्रसंगापासून पळ काढायचा होता. पण त्याऐवजी त्याने त्या स्त्रीची म्हणजे बथशीबाची विचारपूस केली. परिणाम अर्थातच फार भयंकर झाला. (२ शमुवेल ११:१-१२:२३) दुसरीकडे पाहता, योसेफाच्या मालकाच्या पत्नीने त्याला आपल्यासोबत निजण्याची गळ घातली तेव्हा योसेफाने काय केले? बायबलमधील अहवालात म्हटले आहे: “ती रोज रोज योसेफाशी बोलत असताहि तिच्यापाशी निजावयास किंवा तिच्याजवळ असावयास तो तिचे ऐकेना.” मोशेचे नियमशास्त्र अद्याप देण्यात आले नव्हते; तेव्हा त्यातील आज्ञांविषयी माहीत नसतानाही योसेफाने तिला असे उत्तर दिले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करु?” एकदा तर तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले “मजपाशी नीज!” योसेफ तिची समजूत घालण्यासाठी तिथे थांबला का? नाही. तो “बाहेर पळून गेला.” योसेफाने आपल्या मनात लैंगिक वासना निर्माणच होऊ दिली नाही. तो लगेच पळून गेला!—उत्पत्ति ३९:७-१६.

११. एखादे वाईट कृत्य करण्याचा वारंवार मोह होत असल्यास आपण काय करू शकतो?

११ पळून जाणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे असे काहींचे मत आहे. पण मोहात पडण्याआधी स्वतःला त्या प्रसंगापासून दूर करणेच सहसा सर्वात उत्तम असते. कदाचित आपण ज्या ठिकाणी कामाला जातो तेथे आपल्याला वारंवार एखादी वाईट गोष्ट करण्याचा मोह होत असेल. कदाचित ती नोकरी सोडून देणे आपल्याला शक्य नसेल. पण मोह आणणाऱ्‍या परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवण्याचे इतर मार्ग आपण शोधू शकतो. विशिष्ट गोष्ट वाईट आहे हे माहीत असल्यावर, मग ती काहीही असो आपण त्या गोष्टीपासून दूर पळाले पाहिजे आणि जे योग्य तेच करण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. (आमोस ५:५) कदाचित इंटरनेटच्या विशिष्ट साईट्‌सवर दाखवली जाणारी उत्तेजक चित्रे पाहण्याच्या मोहापासून किंवा वाईट मनोरंजनाच्या ठिकाणी जाण्याच्या मोहापासून पळ काढण्याची आपल्याला गरज असेल. कदाचित एखादे अश्‍लील मासिक फेकून देण्याचे पाऊल आपल्याला उचलावे लागेल. किंवा विशिष्ट व्यक्‍तींशी आपल्याला मैत्री तोडावी लागेल. त्याऐवजी जे देवावर प्रेम करतात आणि जे आपली मदत करू शकतील अशा लोकांशी आपण मैत्री करू शकतो. (नीतिसूत्रे १३:२०) मोह कोणत्याही प्रकारचा असो, त्याकडे पाठ फिरवणेच शहाणपणाचे आहे.—रोमकर १२:९.

प्रार्थनेचे साहाय्य

१२. “आम्हाला परीक्षेत आणू नको” अशी देवाला प्रार्थना करण्याचा काय अर्थ होतो?

१२ पौल आपल्याला आश्‍वासन देतो: “देव विश्‍वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. (१ करिंथकर १०:१३) यहोवा आपल्याला कशाप्रकारे मदत करतो? एक मार्ग म्हणजे, आपण मोहापाशांना तोंड द्यायला मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो. येशूने आपल्याला प्रार्थना करायला शिकवले: “आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाइटापासून सोडीव.” (मत्तय ६:१३) आपण अशी मनःपूर्वक प्रार्थना करतो तेव्हा यहोवा आपल्याला त्या मोहाला तोंड देण्याकरता एकटे सोडणार नाही; तर सैतानाच्या कावेबाज कृत्यांपासून आपला बचाव करेल. (इफिसकर ६:११) आपण सैतानाच्या मोहापाशांना ओळखण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी यहोवाला मदत मागितली पाहिजे. या मोहापाशांना तोंड देताना अपयशी न होऊ देण्याची यहोवाला आपण विनंती केल्यास तो आपल्याला मदत करेल आणि “दुष्ट” सैतानाला वश होऊ देणार नाही.

१३. एखादे वाईट कृत्य करण्याचा मोह वारंवार होतो तेव्हा आपण काय केले पाहिजे?

१३ जेव्हा एखादे वाईट कृत्य करण्याचा मोह आपला पिच्छा सोडत नाही तेव्हा खासकरून आपण यहोवाला कळकळीची विनंती केली पाहिजे. काही वासनांमुळे आपल्या मनात एकप्रकारचा संघर्ष होतो. आपल्या विचारांचा, प्रवृत्तींचा हा संघर्ष असतो. या संघर्षामुळे आपल्याला जाणीव होते की आपण मुळात किती दुर्बल आहोत. (स्तोत्र ५१:५) कदाचित पूर्वीच्या एखाद्या वाईट सवयीची आठवण आपल्याला वारंवार अस्वस्थ करत असेल. अशावेळी आपण काय करावे? तेच वाईट कृत्य पुन्हा करण्याचा मोह होत असल्यास आपण काय करावे? केवळ या भावना दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आपण ही बाब प्रार्थनेत यहोवाला सांगितली पाहिजे, एकदा नव्हे तर वारंवार सांगितली पाहिजे. (स्तोत्र ५५:२२) यहोवा त्याच्या वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या माध्यमाने अशुद्ध विचार मनातून काढून टाकण्यास आपल्याला साहाय्य करेल.—स्तोत्र १९:८, ९.

१४. दैहिक दुर्बलतेविरुद्ध लढा देताना प्रार्थना करणे का आवश्‍यक आहे?

१४ गेथशेमाने बागेत प्रेषितांना जागे राहणे किती कठीण जात आहे हे पाहून येशूने त्यांना म्हटले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.” (मत्तय २६:४१) मोहावर विजय मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे तो मोह आपल्यावर कोणकोणत्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गांनी येऊ शकतो याविषयी सतर्क असणे. तसेच लगेच त्याविषयी प्रार्थना करणे देखील महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपल्याला या मोहाला तोंड देण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य मिळेल. आपण ज्याबाबतीत सर्वात दुर्बल असतो त्याचबाबतीत सहसा आपली परीक्षा होते. म्हणूनच आपल्यावर येणाऱ्‍या मोहांना आपण एकट्याने तोंड देऊ शकत नाही. देवाच्या सामर्थ्याकरता प्रार्थना करणे अत्यंत आवश्‍यक आहे कारण सैतानाला तोंड देण्याकरता तो आपल्या पाठीशी उभा राहतो. (फिलिप्पैकर ४:६, ७) यासोबत ‘मंडळीतल्या वडिलांच्या’ आध्यात्मिक मदतीची व प्रार्थनांचीही आपल्याला गरज पडू शकते.—याकोब ५:१३-१८.

मोहांना वश होऊ नका

१५. अयोग्य इच्छांचा प्रतिकार करण्यात काय सामील आहे?

१५ मोहात पाडणाऱ्‍या प्रसंगांना आपण शक्यतो टाळले पाहिजे; पण तरीसुद्धा असे प्रसंग उद्‌भवल्यास, वाईट कृत्य करण्याची इच्छा मरून जाईपर्यंत किंवा परिस्थिती बदलेपर्यंत आपण त्या मोहाला तोंड देत राहिले पाहिजे. सैतानाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा तो तेथून निघून जाईपर्यंत येशू त्याचा प्रतिकार करत राहिला. (मत्तय ४:१-११) शिष्य याकोबाने लिहिले: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) पण मोहांचा प्रतिकार करण्याचे पहिले पाऊल म्हणजे देवाच्या वचनाने मन बळकट करणे आणि कोणत्याही परिस्थितीत देवाच्या तत्त्वांना चिकटून राहण्याचा निर्धार करणे. आपल्याला वारंवार सतावणाऱ्‍या अयोग्य इच्छेवर प्रकाश टाकणारी मुख्य शास्त्रवचने तोंडपाठ करणे व त्यांवर मनन करणे देखील उपयोगी ठरेल. शिवाय, एखाद्या अनुभवी ख्रिश्‍चनाची—उदाहरणार्थ एखाद्या वडिलाची मदत घेणे देखील मदतीचे ठरू शकेल. त्यांना तुम्ही आपली समस्या सांगू शकता आणि वाईट इच्छा मनात प्रबल होतात तेव्हा लगेच त्यांची मदत घेऊ शकता.—नीतिसूत्रे २२:१७.

१६. आपण नैतिकरित्या निष्कलंक कसे राहू शकतो?

१६ बायबल आपल्याला नवा मनुष्य धारण करण्याचे प्रोत्साहन देते. (इफिसकर ४:२४) याचा अर्थ, यहोवा आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देतो व आपल्या चुका सुधारतो तेव्हा आपण त्याचे हे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे. पौलाने आपला सहकारी तीमथ्य याला असे लिहिले: “नीतिमत्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग. विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे.” (१ तीमथ्य ६:११, १२) ‘नीतिमत्त्वाच्या पाठीस लागण्याकरता’ आपण देवाच्या वचनाचे काळजीपूर्वक वाचन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी अधिकाधिक ज्ञान मिळेल. आणि हे ज्ञान घेण्यासोबत आपण यहोवाच्या अपेक्षांनुसार जीवनात कार्य केले पाहिजे. तसेच, प्रचार करणे, सभांना उपस्थित राहणे यांसारख्या ख्रिस्ती कार्यांत गुंतून राहणे देखील महत्त्वाचे आहे. देवाच्या जवळ येण्याद्वारे व त्याच्या आध्यात्मिक तरतुदींचा पुरेपूर फायदा घेण्याद्वारे आपल्याला आध्यात्मिकरित्या उन्‍नती करणे आणि नैतिकरित्या निष्कलंक राहणे शक्य होईल.—याकोब ४:८.

१७. आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा देव आपल्याला एकटे सोडणार नाही याची खात्री आपण का बाळगू शकतो?

१७ देवाने आपल्या सर्वांना मोहांचा प्रतिकार करण्याची शक्‍ती दिली आहे. पौल आपल्याला आश्‍वासन देतो की या शक्‍तीपलीकडे आपली परीक्षा कधीही घेतली जाणार नाही. तर देव या परीक्षेतून ‘निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, आपण ती सहन करावयास समर्थ व्हावे.’ (१ करिंथकर १०:१३) यहोवावर आपण विसंबून राहिल्यास, आपल्या आध्यात्मिक शक्‍तीच्या पलीकडे तो कोणतीही परीक्षा आपल्यावर येऊ देणार नाही. त्याच्या नजरेत जे वाईट आहे ते करण्याच्या मोहाचा आपण यशस्वीपणे प्रतिकार करावा अशी त्याची इच्छा आहे. तो स्वतः आपल्याला आश्‍वासन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५.

१८. देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे शक्य आहे हे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

१८ पौल स्वतः देखील आपल्या दैहिक दुर्बलतेविरुद्ध संघर्ष करत होता. पण या संघर्षात आपण यशस्वी होऊ किंवा नाही याविषयी त्याला शंका नव्हती. त्याने स्वतःला शारीरिक वासनांचा गुलाम बनू दिले नाही. उलट त्याने म्हटले: “मीहि तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धहि करितो, म्हणजे वाऱ्‍यावर मुष्टिप्रहार करीत नाही; तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यास घोषणा केल्यावर कदाचित्‌ मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (१ करिंथकर ९:२६, २७) आपण देखील अपरिपूर्ण शारीरिक वासनांचा यशस्वीपणे प्रतिकार करू शकतो. बायबल, बायबल-आधारित प्रकाशने, ख्रिस्ती सभा आणि अनुभवी व प्रौढ ख्रिस्ती बांधव यांच्याद्वारे आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा आपल्याला वारंवार त्याच्या निर्बंधांची आठवण करून देत असतो. हे निर्बंध आपल्याला निष्कलंक राहण्यास मदत करू शकतात. यहोवाच्या मदतीने आपण देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करू शकतो!

तुम्हाला आठवते का?

‘देहाचे चिंतन’ करणे म्हणजे काय?

आपल्यापुढे येणाऱ्‍या परीक्षांना तोंड देण्यासाठी आपण कशी तयारी करू शकतो?

परीक्षांना तोंड देण्यासाठी आपण काय करू शकतो?

परीक्षांना तोंड देण्यात प्रार्थना कशाप्रकारे आपली मदत करू शकते?

देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे शक्य आहे हे आपण का म्हणू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

आपण आपल्या शारीरिक वासनांपुढे असाहाय्य आहोत अशी शिकवण बायबल देत नाही

[१२ पानांवरील चित्र]

मोहात पाडणाऱ्‍या प्रसंगापासून पळ काढणे हा पाप टाळण्याचा एक मुख्य मार्ग आहे