व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धर्म आणतील का जागतिक शांती?

धर्म आणतील का जागतिक शांती?

धर्म आणतील का जागतिक शांती?

ऑगस्ट २८ ते ऑगस्ट ३१, २००० दरम्यान ७३ देशांमधील ५०० हून अधिक प्रतिनिधी न्यूयॉर्क सिटीत एकत्र जमले होते. ते सर्व संयुक्‍त राष्ट्रसंघ येथील “धार्मिक आणि आध्यात्मिक पुढाऱ्‍यांचे नवीन शतकातील जागतिक शांती अधिवेशन” यासाठी एकत्र आले होते. फेटे, भगव्या रंगाचे झगे, पिसांच्या टोप्या, लांब काळे झगे अशा वेगवेगळ्या वेषांतील पुढारी अनेक धर्मांचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांच्यामध्ये इस्लाम, जैन, झोरास्ट्र, ताओ, बहाई, बौद्ध, यहुदी, शिंतो, शीख, हिंदू धर्मांचे आणि वेगवेगळ्या ख्रिस्ती पंथांचे पुढारी होते.

या चार दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी हे प्रतिनिधी संयुक्‍त राष्ट्रसंघ येथे जमा झाले होते. ही परिषद संयुक्‍त राष्ट्रसंघाने आयोजित केली नव्हती किंवा त्यासाठी निधी दिला नव्हता तर वेगवेगळ्या संघटनांनी मिळून भरवली होती. मात्र, गरीबी, जातीभेद, वातावरणाशी संबंधित समस्या, युद्ध आणि असंख्य लोकांची हत्या करणाऱ्‍या हत्यारांचा खात्मा करण्यासाठी सर्वांना एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे असे धार्मिक पुढाऱ्‍यांनी तसेच संयुक्‍त राष्ट्रसंघातील पुढाऱ्‍यांनीही म्हटले.

या सर्व प्रतिनिधींनी “जागतिक शांती करार” यावर आपल्या सह्‍या केल्या. हिंसात्मक कृत्ये आणि युद्धे “काही वेळा धर्माच्या नावाखाली करण्यात येतात” असे त्या करारनाम्यात मान्य केले होते; परंतु त्यावर सही करणारे “शांती आणण्यासाठी . . . संयुक्‍त राष्ट्राला पाठिंबा देतील” असे त्यात म्हटले होते. पण हे नेमके कसे करण्यात येईल याविषयी काही खास ठराव नव्हते.

दुसऱ्‍या दिवशी, या अधिवेशनाचे उप-सचिव बावा जैन यांनी आपल्या सुरवातीच्या भाषणाच्या समाप्तीला म्हटले की, काही वर्षांआधी त्यांनी संयुक्‍त राष्ट्रसंघात एक चित्र पाहिले होते. त्यात संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या इमारतीपेक्षा उंच असा एक मनुष्य दाखवला होता. आणि दरवाजा ठोठावतात तसा चित्रातील तो मनुष्य त्या इमारतीवर ठोठावत होता. चित्राला असा मथळा दिला होता: “शांतीचा राजकुमार.” श्री. जैन म्हणाले: “[ते चित्र] पाहताच माझ्या मनावर खूप प्रभाव पडला. [त्याचा] काय अर्थ होतो हे मी अनेकांना विचारलं. पण आज मला त्याचं उत्तर मिळालं असं वाटतं. आज येथे जगातील आध्यात्मिक आणि धार्मिक पुढाऱ्‍यांचे एकत्र जमणे हे दाखवून देते, की [हाच] तो शांतीचा राजकुमार आहे जो संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या दारावर ठोठावत आहे.”

परंतु, याविषयी बायबल वेगळाच दृष्टिकोन सादर करते. त्यामध्ये सांगितले आहे की, शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त आहे. आणि तो देवाच्या राज्याकरवी जागतिक शांती आणणार आहे—या जगातील राजकीय किंवा धार्मिक पुढाऱ्‍यांच्या प्रयत्नांकरवी नाही. हेच राज्य अर्थात देवाचे स्वर्गीय सरकार आज्ञाधारक मानवजातीला एकत्र आणण्यात आणि पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी होईल.—यशया ९:६; मत्तय ६:९, १०.