व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धीट सचोटी रक्षकांचा नात्सी छळातही विजय

धीट सचोटी रक्षकांचा नात्सी छळातही विजय

संपूर्ण आणि दृढनिश्‍चयी असे स्थिर राहा

धीट सचोटी रक्षकांचा नात्सी छळातही विजय

“माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) या विनंतीवरून दिसून येते की, यहोवाची बुद्धिमान सृष्टी त्याचे मन आनंदित करू शकते कारण ती त्याला विश्‍वासू आणि निष्ठावान आहे. (सफन्या ३:१७) परंतु, निंदा करणाऱ्‍या सैतानाने यहोवाच्या सेवकांची सचोटी तोडण्याची जणू शपथ घेतली आहे.—ईयोब १:१०, ११.

खासकरून २० व्या शतकाच्या सुरवातीला सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आले तेव्हापासून तो यहोवाच्या लोकांवर अतिशय संतप्त आहे. (प्रकटीकरण १२:१०, १२) परंतु खरे ख्रिस्ती, “परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर” राहून देवाला एकनिष्ठ राहिले आहेत. (कलस्सैकर ४:१२) अशा एकनिष्ठतेचे एक उल्लेखनीय उदाहरण आपण थोडक्यात पाहू या. ते उदाहरण आहे दुसऱ्‍या महायुद्धाच्या आधी आणि नंतर जर्मनीतील यहोवाच्या साक्षीदारांचे.

आवेशी कार्यामुळे सचोटीची परीक्षा

एकोणीशे वीस आणि एकोणीशे तीसच्या दशकांच्या सुरवातीला जर्मनीतील बिबलफोर्शर अर्थात यहोवाचे साक्षीदार मोठ्या प्रमाणात बायबल साहित्याचे वाटप करत होते. १९१९ आणि १९३३ च्या दरम्यान जर्मनीतल्या प्रत्येक कुटुंबाला त्यांनी सरासरी आठ पुस्तके, पुस्तिका किंवा मासिके दिली.

त्या वेळी, ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांचे सर्वात जास्त प्रमाण जर्मनीत होते. किंबहुना, १९३३ साली प्रभूच्या सांज भोजनात सहभाग घेतलेल्या ८३,९४१ व्यक्‍तींपैकी जवळजवळ ३० टक्के लोक जर्मनीतच होते. पण त्यानंतर लागलीच या जर्मन साक्षीदारांना जणू सचोटीच्या अग्नीपरीक्षेतून पार व्हावे लागले. (प्रकटीकरण १२:१७; १४:१२) सुरवातीला त्यांना नोकरीवरून काढण्यात येऊ लागले, त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात येऊ लागले आणि शाळांमधून साक्षीदार मुलांना काढून टाकण्यात येऊ लागले. पण नंतर छळ आणखी वाढतच गेला. आणि त्यांना मारहाण करण्यात येऊ लागली, अटक करून तुरुंगात डांबण्यात येऊ लागले. (चित्र १) त्यामुळे, दुसऱ्‍या महायुद्धाच्या सुरवातीला छळ छावण्यांमध्ये असलेल्या लोकांपैकी ५ ते १० टक्के लोक यहोवाचे साक्षीदार होते.

नात्सींनी साक्षीदारांचा छळ करण्याचे कारण

परंतु, यहोवाच्या साक्षीदारांवर नात्सी का भडकले? हिटलर—१८८६-१९३६: फाजील आत्मविश्‍वास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात इतिहासाचे प्राध्यापक इयन करशॉ म्हणतात की, साक्षीदारांनी “नात्सी सरकारला पूर्णपणे जुमानण्यास” नकार दिल्यामुळे त्यांचा छळ होऊ लागला.

बिट्रेयल—जर्मन चर्चेस ॲण्ड द होलोकॉस्ट या पुस्तकाचे संपादन केलेले इतिहासाचे प्राध्यापक रॉबर्ट पी. एरीकसन आणि यहुदी अभ्यासांच्या प्राध्यापिका सुझॅना हेशेल म्हणाले की, साक्षीदारांनी “हिंसक कृत्यांमध्ये किंवा लष्करात भाग घ्यायला नकार दिला होता. . . . साक्षीदार राजकीय मामल्यांमध्ये तटस्थ होते म्हणजेच ते हिटलरला मत किंवा सलामी देण्यासही तयार नव्हते.” सदर पुस्तकात पुढे म्हटले आहे की, याच कारणास्तव नात्सींचा क्रोध साक्षीदारांवर भडकला आणि साक्षीदारांचा छळ होऊ लागला कारण “राष्ट्रीय समाजसत्तावाद त्यांचा नकार स्वीकारायला तयार नव्हता.”

जागतिक निषेध आणि पूर्ण हल्ला

फेब्रुवारी ९, १९३४ रोजी साक्षीदारांच्या कार्याचे नेतृत्व करणारे जोसेफ एफ. रदरफोर्ड यांनी नात्सींच्या असहिष्णुतेचा निषेध करणारे एक पत्र एका खास संदेशवाहकाद्वारे हिटलरला पाठवले. (चित्र २) रदरफोर्ड यांच्या पत्रानंतर ऑक्टोबर ९, १९३४ रोजी, जर्मनीसोबत ५० इतर देशांतील यहोवाच्या साक्षीदारांनी निषेध व्यक्‍त करणारी जवळजवळ २०,००० पत्रे आणि तारा पाठवल्या.

याच्या प्रतिउत्तरात नात्सींनी त्यांचा छळ अधिक वाढवला. एप्रिल १, १९३५ साली जर्मनीत साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली. मग ऑगस्ट २८, १९३६ रोजी गेस्टापोंनी सर्व बळ एकवटून त्यांच्यावर हल्ला करायला सुरवात केली. तरीही, बिट्रेयल—जर्मन चर्चेस ॲण्ड द होलोकॉस्ट म्हणते की, साक्षीदारांनी “पत्रिका देण्याचे थांबवले नाही आणि आपला विश्‍वास कायम ठेवला.”

अगदी गेस्टापोंच्या देखत डिसेंबर १२, १९३६ रोजी सुमारे ३,५०० साक्षीदारांनी त्यांना दिलेल्या क्रूर वागणुकीसंबंधी ठराव छापून त्याच्या हजारो प्रती वितरित केल्या. या मोहिमेविषयी टेहळणी बुरूज मासिकाने असे वृत्त दिले: “हा एक मोठा विजय आणि शत्रूवरील तीव्र वार होता ज्यामुळे विश्‍वासू साक्षीदारांना अवर्णनीय आनंद मिळाला.—रोमकर ९:१७.

छळ निरर्थक ठरतो!

यहोवाच्या साक्षीदारांना अटक करण्याचे नात्सींचे कार्य सुरूच राहिले. १९३९ सालापर्यंत सहा हजार साक्षीदार तुरुंगात होते आणि आणखी हजारो साक्षीदारांना छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आले होते. (चित्र ३) दुसऱ्‍या महायुद्धाच्या शेवटी परिस्थिती कशी होती? तुरुंगात डांबलेल्या सुमारे २,००० साक्षीदारांचा मृत्यू झाला; त्यांपैकी २५० जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. प्राध्यापक एरीकसन आणि प्राध्यापिका हेशेल यांनी लिहिले की, इतके होऊनही “यहोवाच्या साक्षीदारांनी छळ सहन केला पण आपला विश्‍वास त्यागला नाही.” त्यामुळे, हिटलरचे शासन कोसळले तेव्हा हजारहून अधिक साक्षीदार छळ छावण्यांमधून विजयी होऊन बाहेर पडले.—चित्र ४; प्रेषितांची कृत्ये ५:३८, ३९; रोमकर ८:३५-३७.

हा सगळा छळ सहन करण्याची ताकद यहोवाच्या लोकांना कोठून मिळाली? छळ छावणीतून बाहेर आलेले अडॉल्फ आरनॉल्ड म्हणाले: “माणूस कितीही खचलेला असला तरीही यहोवाचे आपल्यावर लक्ष असते, आपल्यावर कसली परिस्थिती गुदरत आहे हे त्याला ठाऊक असते आणि त्या परिस्थितीत विश्‍वासू राहण्यास आणि तिच्यावर मात करण्यास तो आपल्याला शक्‍ती देतो. तो कोठेही उणा पडत नाही.”

त्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना संदेष्ट्या सफन्याने उद्‌गारलेले शब्द किती उचितपणे लागू होतात! तो म्हणाला: “परमेश्‍वर तुझा देव, साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करील.” (सफन्या ३:१७) आज खऱ्‍या देवाचे उपासक असलेल्या सर्वांनी, नात्सींचा छळ सोसून एकनिष्ठ राहिलेल्या त्या विश्‍वासू साक्षीदारांच्या विश्‍वासाचे अनुकरण करावे आणि त्यांनी केले त्याप्रमाणे यहोवाचे मन आनंदित करावे.—फिलिप्पैकर १:१२-१४.

[८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Państwowe Muzeum Oświȩcim-Brzezinka, courtesy of the USHMM Photo Archives