“प्रभू खरोखर उठला आहे!”
“प्रभू खरोखर उठला आहे!”
येशूला ठार मारण्यात आले तेव्हा त्याच्या शिष्यांची काय मनःस्थिती झाली असेल याचा जरा विचार करा. अरिमथाईकर योसेफाने कबरेत ठेवलेल्या निर्जीव देहासारखीच त्यांची आशा देखील मूर्च्छित झाली असेल. शिवाय, रोमी लोकांच्या जुलमी शासनातून यहुद्यांची सुटका करण्याच्या त्यांच्या अपेक्षाही विरल्या असतील.
तसे असते तर, मशीहा असल्याचा दावा करणाऱ्या अनेकांचे शिष्य जसे कालांतराने टिकत नाहीत तसेच येशूचे शिष्य देखील राहिले नसते. पण येशू जिवंत होता! शास्त्रवचनांनुसार, त्याच्या मृत्यूनंतर लगेचच तो पुष्कळदा त्याच्या अनुयायांना दिसला. त्यामुळेच काहीजण असे म्हणू शकले की, “प्रभू खरोखर उठला आहे.”—लूक २४:३४.
येशू मशीहा आहे हा आपला विश्वास शिष्यांना सिद्ध करून दाखवावा लागला. आणि याला ठोस पुरावा म्हणून त्यांनी येशूचे मृतातून झालेले पुनरुत्थान याचाच खासकरून उपयोग केला. होय, “प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभु येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते.”—प्रेषितांची कृत्ये ४:३३.
येशूचे पुनरुत्थान कधी झालेच नाही असे एखाद्या शिष्याला मान्य करायला लावून किंवा येशूचे शरीर कबरेतच राहिले हे दाखवून कोणी या पुनरुत्थानाला खोटे ठरवले असते तर ख्रिस्ती धर्म सुरवातीलाच डळमळला असता. पण तसे झाले नाही. ख्रिस्त जिवंत आहे हे ठाऊक असल्यामुळे त्याचे अनुयायी सगळीकडे जाऊन त्याच्या पुनरुत्थानाविषयी सांगत होते आणि हजारो लोक पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवू लागले.
येशूच्या पुनरुत्थानावर तुम्ही देखील विश्वास का ठेवू शकता? हे पुनरुत्थान खरोखरच घडले होते याला काय पुरावा आहे?
पुरावे का पाहावेत?
शुभवर्तमानाची चारही पुस्तके येशूच्या पुनरुत्थानाचा वृत्तान्त देतात. (मत्तय २८:१-१०; मार्क १६:१-८; लूक २४:१-१२; योहान २०:१-२९) * आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या इतर भागांमध्ये ख्रिस्ताचे मृतातून पुनरुत्थान झाल्याचे निश्चितपणे सांगितले गेले आहे.
म्हणूनच, येशूच्या अनुयायांनी त्याच्या पुनरुत्थानाविषयी लोकांना जाऊन सांगितले! देवाने त्याला जिवंत केले ही बातमी जगातील कोणत्याही बातमीपेक्षा सर्वात अद्भुत होती. त्याचा अर्थ देव अस्तित्वात आहे आणि येशू देखील सध्या जिवंत आहे असा होतो.
याचा आपल्याशी काय संबंध आहे? येशूने प्रार्थनेत म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) होय, आपण येशू आणि त्याचा पिता यांच्याविषयीचे जीवनदायी ज्ञान घेऊ शकतो. या ज्ञानाचा जीवनात अंमल केल्याने आपला मृत्यू झाला तरी येशूसारखे आपलेही पुनरुत्थान होऊ शकते. (योहान ५:२८, २९) आपला गौरविलेला पुत्र, राजांचा राजा, येशू ख्रिस्त याच्या शासनाधीन असलेल्या देवाच्या स्वर्गीय राज्यात आपण परादीसमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची आशा ठेवू शकतो.—यशया ९:६, ७; लूक २३:४३; प्रकटीकरण १७:१४.
तर मग, येशू खरोखर मृतातून पुनरुत्थित झाला की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण सध्याच्या आपल्या जीवनावर आणि भविष्यातील प्रत्याशांवर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच, येशू मरण पावला आणि पुनरुत्थित झाला हे सिद्ध करणाऱ्या चार पुराव्यांचे परीक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.
येशू खरोखर वधस्तंभावर मरण पावला
येशूच्या पुनरुत्थानाबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या काही लोकांचे म्हणणे आहे की, येशूला वधस्तंभावर चढवण्यात आले खरे परंतु तो त्यावर मरण पावला नाही. त्यांचा असा दावा आहे की, तो मेला नव्हता, त्याच्यात प्राण होता आणि म्हणून जेव्हा त्याला कबरेत ठेवण्यात आले तेव्हा तेथील थंडाव्याने तो पुन्हा शुद्धीवर आला. परंतु, उपलब्ध असलेला प्रत्येक पुरावा सिद्ध करतो की, येशूचे निर्जीव शरीरच कबरेत ठेवण्यात आले होते.
येशूला सर्वांदेखत वधस्तंभावर चढवण्यात आल्यामुळे तो त्यावर खरोखर मेला हे पुष्कळांनी पाहिले होते. मृत्यूदंड देणाऱ्या सेनाधिकाऱ्याकडून तो मरण पावल्याची निश्चिती मिळाली होती. सेनाधिकाऱ्याचा हा पेशाच असल्यामुळे मृत्यूदंड दिलेला मनुष्य मेला आहे की नाही हे निश्चित करण्याचे काम त्याचेच होते. शिवाय, येशू खरोखर मेला आहे हे रोमन सुभेदार पंतय पिलाताने निश्चित केल्यावरच त्याने येशूचा देह पुरण्यासाठी अरिमथाईकर योसेफाच्या हवाली केला.—मार्क १५:३९-४६.
कबर रिकामी होती
रिकाम्या कबरेनेच येशूच्या शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाचा पहिला पुरावा दिला आणि तो कोणालाच खोटा ठरवता येत नाही. कारण, ती एक नवीन कबर होती. येशूच्या आधी येथे कोणालाही पुरण्यात आले नव्हते. येशूला जेथे खिळण्यात आले होते तेथे जवळपासच ही कबर होती आणि तिला सहजगत्या ओळखता येऊ शकत होते. (योहान १९:४१, ४२) शुभवर्तमानातील सर्व अहवाल हे मान्य करतात की, येशूच्या मृत्यूपश्चात दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे मित्रजन तेथे आले तेव्हा त्याचे शरीर तेथे नव्हते.—मत्तय २८:१-७; मार्क १६:१-७; लूक २४:१-३; योहान २०:१-१०.
रिकाबी कबर पाहून येशूचे मित्र गोंधळून गेले; त्याचे शत्रूही थक्क झाले. कारण तो कधी एकदाचे मरतो आणि त्याला पुरले जाते याचीच ते केव्हापासून वाट पाहत होते. त्यांचा हेतू साध्य झाल्यामुळे त्यांनी कबरेवर शिक्कामोर्तब
करून तेथे पहारेकरीसुद्धा बसवले. परंतु, आठवड्याचा पहिला दिवस उजडताच कबर रिकामी झाली होती.येशूच्या मित्रांनी त्याचे शरीर कबरेतून नेले असावे का? तशी शक्यता नाही, कारण येशूला खिळण्यात आल्यावर ते फार दुःखी होते असे शुभवर्तमानाच्या अहवालांमधून दिसून येते. शिवाय, हे सगळे खोटे आहे असे त्याच्या शिष्यांना ठाऊक असते तर ते छळ किंवा मृत्यू सहन करायला तयार झालेच नसते.
मग कबर कोणी रिकामी केली? येशूचे शत्रू तर असूच शकत नाहीत. कारण त्यांनी जरी येशूचा मृतदेह लपवला असता तरी त्याचे पुनरुत्थान होऊन तो जिवंत आहे हा त्याच्या शिष्यांचा दावा खोटा ठरवण्यासाठी त्यांनी नंतर तो देह दाखवला असता. पण असे काहीच घडले नाही कारण हे काम देवाने केले होते.
काही आठवड्यांनंतर पेत्राने येशूच्या पुनरुत्थानाची ग्वाही दिली तेव्हा येशूच्या शत्रूंनी त्याचे खंडन केले नाही. पेत्राने म्हटले: “अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याद्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले; त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठविले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो; ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; . . . आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.”—प्रेषितांची कृत्ये २:२२-२७.
पुष्कळांनी पुनरुत्थित येशूला पाहिले
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात शुभवर्तमानाचा लेखक लूक याने लिहिले: “मरण सोसल्यानंतरहि [येशूने प्रेषितांना] पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.” (प्रेषितांची कृत्ये १:२, ३) अनेक शिष्यांनी पुनरुत्थित येशूला विविध ठिकाणी पाहिले—एकदा बागेत, एकदा वाटेत, एकदा जेवणाच्या वेळी आणि एकदा तिबिर्याच्या समुद्राजवळ.—मत्तय २८:८-१०; लूक २४:१३-४३; योहान २१:१-२३.
टीकाकार या घटनांच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त करतात. हे वृत्तान्त लेखकांच्या कल्पनेवर आधारलेले आहेत असे ते म्हणतात किंवा त्यामधील तथाकथित विसंगती ते दाखवतात. पण, शुभवर्तमानाच्या अहवालांमधील बारीकसारीक फरक दाखवून देतात की, हे संगनमताने केलेले नाही. एका लेखकाची माहिती जेव्हा ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनातील काही घटनांच्या अहवालांना पूरक ठरते तेव्हा येशूबद्दलच्या आपल्या ज्ञानात अधिक भर पडते.
येशूची पुनरुत्थानापश्चात घडलेली दर्शने केवळ भास होते का? या दाव्यात काही दम नाही कारण त्याला कितीतरी लोकांनी पाहिले. त्याला पाहिलेल्या लोकांपैकी काहीजण कोळी होते, काही स्त्रिया होत्या, काही सरकारी सेवक होते आणि शंका घेतलेला प्रेषित थोमाही होता; त्याने तर निश्चित पुरावा पाहिल्यावरच विश्वास ठेवला की येशूचे पुनरुत्थान झाले होते. (योहान २०:२४-२९) अनेकदा येशूच्या शिष्यांनी आपल्या पुनरुत्थित प्रभूला पाहिल्या पाहिल्या ओळखले नव्हते. आणि एकदा तर त्याला ५०० हून अधिक लोकांनी पाहिले होते. प्रेषित पौलाने येशूचे पुनरुत्थान झाले हे सिद्ध करताना या घटनेचा उल्लेख केला तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक जण हयात होते.—१ करिंथकर १५:६.
जिवंत येशूचा लोकांवर प्रभाव
येशूचे पुनरुत्थान झाले की नाही हा केवळ जिज्ञासेचा किंवा वादाचा विषय नाही. येशू जिवंत असल्यामुळे अनेकांवर त्याचा चांगला प्रभाव पडला आहे. पहिल्या शतकापासून आतापर्यंत, धर्माबद्दल आवड नसणाऱ्या किंवा ख्रिस्ती धर्माचा कडाडून विरोध करणाऱ्या असंख्य लोकांना पूर्ण खात्री पटली आहे की हाच एक सत्य धर्म आहे. हा बदल त्यांच्यात कसा घडून आला असावा? शास्त्रवचनांचे परीक्षण केल्यावर त्यांची खात्री पटली की, देवाने येशूला पुनरुत्थित करून त्याला स्वर्गातील वैभवी आत्मिक जीवन दिले. (फिलिप्पैकर २:८-११) त्यांनी येशूवर आणि ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाकरवी यहोवा देवाने तारणासाठी केलेल्या तरतूदीवर विश्वास जाहीर केला आहे. (रोमकर ५:८) अशा व्यक्तींना देवाच्या इच्छेनुसार चालल्यामुळे आणि येशूच्या शिकवणींनुसार जगल्यामुळे खरा आनंद मिळाला आहे.
पहिल्या शतकात ख्रिस्ती असणाऱ्या व्यक्तीची काय स्थिती होती ते आपण पाहू या. त्या व्यक्तीला प्रतिष्ठा, सत्ता किंवा धनसंपत्ती मिळत नसे. उलट, पुष्कळ प्रारंभिक ख्रिश्चनांनी आपल्या विश्वासाकरता “आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.” (इब्री लोकांस १०:३४) ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांना त्याग करावा लागत असे आणि इतपत छळ सोसावा लागत असे की पुष्कळजणांना हुतात्मिक मरण पत्करावे लागे.
ख्रिस्ताचे अनुयायी बनण्याआधी काहीजण प्रतिष्ठा मिळण्याच्या आणि धनवान होण्याच्या मार्गावर होते. तार्सच्या शौलाला नियमशास्त्राचा नामवंत शिक्षक गमलिएल याच्याकडून शिक्षण मिळाले होते आणि यहुद्यांमध्ये तो प्रसिद्ध होऊ लागला होता. (प्रेषितांची कृत्ये ९:१, २; २२:३; गलतीकर १:१४) तरीही, शौल नंतर पौल बनला. त्याने आणि इतर अनेकांनी या जगाची प्रतिष्ठा आणि अधिकारपद नाकारले. कशासाठी? देवाच्या अभिवचनातील खऱ्या आशेचा संदेश सांगण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले आहे या घटनेची घोषणा करण्यासाठी. (कलस्सैकर १:२८) सत्यासाठी ते काहीही सोसायला तयार होते.
आजही लाखो लोक असे आहेत. जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये असे लोक तुम्हाला भेटतील. एप्रिल ८, २००१ रोजी, सूर्यास्तानंतर होणाऱ्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारकविधीसाठी साक्षीदार तुम्हाला आमंत्रण देत आहेत. त्या प्रसंगी आणि त्यांच्या राज्य सभागृहांमध्ये होणाऱ्या बायबल अभ्यासाच्या सर्व सभांना तुम्ही हजर राहिल्यास त्यांना आनंद होईल.
येशूचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान याविषयीच नव्हे तर त्याचे जीवन आणि त्याच्या शिकवणी यांविषयीही तुम्ही अधिक शिकून घेऊ शकता. तो आपल्याला त्याच्याजवळ बोलवत आहे. (मत्तय ११:२८-३०) यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याविषयी अचूक ज्ञान घेण्याचा आताच प्रयत्न करा. असे केल्याने, आपल्या प्रिय पुत्राच्या शासनाधीन असलेल्या देवाच्या राज्यात तुम्हाला अनंत जीवन मिळू शकेल.
[तळटीप]
^ शुभवर्तमानातील अहवाल सत्य आहेत याचा पुरावा मिळण्यासाठी मे १५, २००० च्या टेहळणी बुरूज मासिकातील “येशूची जीवनकथा खरी आहे की खोटी?” हा लेख पाहा.
[७ पानांवरील चित्रे]
येशू ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे लाखो जणांना खरा आनंद मिळतो
[६ पानांवरील चित्राचे श्रेय]
किंग जेम्स आणि रिव्हाईज्ड व्हर्शनचा समावेश असलेल्या सेल्फ-प्रोनाउन्सिंग एडिशन ऑफ द होली बायबल यातून