व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या पुनरुत्थानाची चौकशी

येशूच्या पुनरुत्थानाची चौकशी

येशूच्या पुनरुत्थानाची चौकशी

“स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, येशू जिवंत होता अशी आपल्याला खात्री आहे परंतु . . . देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले हे आपण तितक्याच खात्रीने सांगू शकत नाही.” असे चर्च ऑफ इंग्लंडमध्ये उच्च पदावरील कॅन्टरबरीचे आर्कबिशप यांनी म्हटले.

परंतु, प्रेषित पौलाला अशी कोणतीही शंका वाटली नव्हती. प्राचीन करिंथमधील सह-ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पहिल्या प्रेरित पत्राच्या १५ व्या अध्यायात त्याने लिहिले: “मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्‍या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले.”—१ करिंथकर १५:३, ४.

येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर त्याच्या शिष्यांना विश्‍वास असल्यामुळेच “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” अर्थात सबंध ग्रीस आणि रोममध्ये त्यांनी शुभवर्तमानातल्या गोष्टी लोकांना जाऊन सांगितल्या. (कलस्सैकर १:२३) खरे म्हणजे, येशूचे पुनरुत्थान हाच ख्रिस्ती विश्‍वासाचा आधारस्तंभ आहे.

परंतु, अगदी सुरवातीपासूनच येशूच्या पुनरुत्थानाविषयी शंकाकुशंका व्यक्‍त केल्या गेल्या आहेत. सुळावर चढवलेला हा मनुष्य मशीहा आहे असा येशूच्या शिष्यांनी दावा करणे निंदास्पद आहे असे यहुद्यांना सर्वसाधारणपणे वाटत होते. तर दुसऱ्‍या बाजूला बहुतांश सुशिक्षित ग्रीक लोकांचा आत्म्याच्या अमरत्वावर विश्‍वास असल्यामुळे पुनरुत्थानाची कल्पनाच त्यांना मुळात मान्य नव्हती.—प्रेषितांची कृत्ये १७:३२-३४.

आधुनिक काळातील संशयखोर

अलीकडील वर्षांमध्ये, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या काही विद्वानांनी येशूचे पुनरुत्थान केवळ एक काल्पनिक कथा आहे असे पुस्तकांद्वारे आणि लेखांद्वारे छापल्यामुळे या विषयावर तीव्र वादविवादाला सुरवात झाली आहे. ‘ऐतिहासिक येशूवर’ परीक्षण करताना विविध विद्वानांचे म्हणणे आहे की, रिकामी कबर आणि पुनरुत्थानानंतर दिसलेला येशू यांसंबंधीचे शुभवर्तमानातील वृत्तान्त निव्वळ कल्पना आहेत; तो स्वर्गामध्ये अधिकार पदावर आहे या गोष्टीला पुष्टी देण्यासाठी त्याच्या मृत्यूपश्‍चात अनेक वर्षांनी या कल्पना लोकांनी बनवल्या, असे त्यांचे मत आहे.

उदाहरणार्थ, नव्या कराराचे प्राध्यापक तसेच येशूचे नेमके काय झाले—पुनरुत्थानावरील ऐतिहासिक दृष्टिकोन (इंग्रजी) या पुस्तकाचे लेखक जर्मन विद्वान, गर्ट लुडमन यांचे विचार आपण पाहू या. त्यांच्या मते, येशूचे पुनरुत्थान “एक निराधार सिद्धान्त” आहे आणि “वैज्ञानिक प्रगतीवर विश्‍वास” असलेल्या प्रत्येकाला तो अमान्य असला पाहिजे.

प्राध्यापक लुडमन यांचा दावा आहे की, प्रेषित पेत्राला दिसलेला पुनरुत्थित ख्रिस्त हा एक भास होता कारण येशूला नाकारल्यामुळे तो दुःख आणि दोषभावनेने भारावलेल्या स्थितीत होता. तसेच, एके प्रसंगी पाचशेपेक्षा अधिकांना दिसलेला येशू देखील ‘पुष्कळांना झालेल्या भावनिक उद्रेकाचाच’ एक प्रकार होता असे लुडमन यांचे मत आहे. (१ करिंथकर १५:५, ६) थोडक्यात सांगायचे तर, येशूच्या पुनरुत्थानाच्या संदर्भातील बायबलचे वृत्तान्त केवळ भावनेच्या भरात झालेले अनुभव आहेत ज्यांकरवी शिष्यांचा आध्यात्मिक गोष्टींबद्दलचा आत्मविश्‍वास आणि प्रचाराविषयीचा आवेश आणखी वाढला असे अनेक विद्वानांचे म्हणणे आहे.

अर्थात, शैक्षणिक विषयांवरील अशा वादविवादांमध्ये कोणाला फारसा रस नसतो. तरीही, येशूच्या पुनरुत्थानाची चर्चा आपल्याकरता महत्त्वाची आहे. का? कारण ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नाही तर ख्रिस्ती विश्‍वास खोट्या पायावर आधारलेला असेल. आणि जर ख्रिस्ताचे पुनरुत्थान एक हकीकत आहे तरच ख्रिस्ती विश्‍वासाचा पाया खरा असेल. असे असल्यास, ख्रिस्ताने केलेले दावेच केवळ खरे ठरणार नाहीत तर त्याने केलेली अभिवचने देखील खरी सिद्ध होतील. शिवाय, पुनरुत्थान एक वास्तविकता असल्यास, मृत्यू विजेता नव्हे तर पराजित होऊ शकणारा शत्रू ठरेल.—१ करिंथकर १५:५५.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

किंग जेम्स आणि रिव्हाईज्ड व्हर्शनचा समावेश असलेल्या सेल्फ-प्रोनाउन्सिंग एडिशन ऑफ द होली बायबल यातून