आम्ही एकमेकांचा आधार होतो
जीवन कथा
आम्ही एकमेकांचा आधार होतो
मेल्बा बॅरी यांनी सांगितल्याप्रमाणे
बुधवार, जुलै २, १९९९ रोजी माझे पती व मी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मोठ्या अधिवेशनात उपस्थित होतो. आमच्या ५७ वर्षांच्या विवाहित जीवनात अशा हजारो अधिवेशनांना आम्ही गेलो होतो. शुक्रवारच्या दिवशी, लॉइड शेवटचे भाषण देत होते. अचानक ते कोसळले व बेशुद्ध पडले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करूनही फायदा झाला नाही. *
माझ्यावर जणू आभाळच कोसळले. पण हवाईच्या ख्रिस्ती बंधूभगिनींनी अक्षरशः माझ्याभोवती गराडा घातला आणि मला सावरले. हे बांधव मला किती प्रिय आहेत! त्यांच्यापैकी बहुतेकांना आणि जगातल्या इतर भागातील आणखी कित्येक बांधवांना लॉइडबद्दल खूप प्रेम व आदर होता.
त्यांच्या मृत्यूला आता दोन वर्षे होत आली आहेत. या काळात, आम्ही एकमेकांच्या सुखद सहवासात घालवलेली अनेक वर्षे माझ्या नजरेसमोर तरळली. आम्ही कित्येक वर्षे परदेशातील मिशनरी नेमणुकीत व न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयातही सेवा केली. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील आमचे जीवन आणि दुसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीला आम्हा दोघांना लग्न करण्यासाठी कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले अशा कित्येक आठवणींना उजाळा मिळाला. पण सुरवातीला, मी साक्षीदार कसे बनले आणि १९३९ साली लॉइडची भेट कशी झाली ते आधी तुम्हाला सांगते.
मी साक्षीदार कशी बनले
माझ्या आईवडिलांचे नाव जेम्स आणि हेन्रिएटा. ते दोघे खूपच प्रेमळ होते. १९३२ साली माझे शालेय जीवन संपुष्टात आले तेव्हा मी अवघी १४ वर्षांची होते. त्यावेळी सबंध जगात महामंदीचा काळ होता. आमच्या कुटुंबात माझ्याशिवाय आणखी दोन धाकट्या बहिणी होत्या. कुटुंबाच्या खर्चाला
हातभार लावण्यासाठी मी नोकरी करू लागले. काही वर्षांतच मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. कितीतरी मुली माझ्या हाताखाली काम करत होत्या.दरम्यान, १९३५ साली आईची यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झाली आणि त्यांनी तिला काही बायबलची पुस्तके दिली. आईने ती घेतली आणि तिला लवकरच खात्री झाली की हेच सत्य आहे. आम्ही सर्वांनी मात्र तिला वेड्यांत काढले. पण एक दिवशी, “मृत कोठे आहेत?” या शीर्षकाची एक पुस्तिका मला दिसली. शीर्षक वाचूनच मला कुतूहल वाटले. म्हणून कोणालाही न सांगता मी ती पुस्तिका वाचू लागले. मग काय! मी लगेच आईसोबत दर आठवडी होणाऱ्या मॉडेल स्टडी म्हटलेल्या सभेला जाऊ लागले. ही सभा, मॉडेल स्टडी नावाच्या एक पुस्तिकेतून घेतली जायची. नंतर अशा तीन पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. या पुस्तिकांमध्ये बरेच प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे व संबंधित शास्त्रवचने होती.
जवळजवळ त्याच दरम्यान १९३८ च्या एप्रिल महिन्यात यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाचे एक प्रतिनिधी जोसफ. एफ. रदरफोर्ड सिडनीला आले. त्यांच्या जाहीर भाषणाला मीही गेले. जाहीर भाषण ऐकण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. या सभेचे आयोजन सिडनीच्या टाऊन हॉलमध्ये करण्यात आले होते पण यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करणाऱ्या काही लोकांनी भाषणासाठी ही जागा मिळू दिली नाही. मग टाऊन हॉलऐवजी हे भाषण सिडनीच्या खेळाच्या मैदानावर देण्यात आले. विरोधामुळे या घटनेला प्रसिद्धी मिळाली आणि अनपेक्षितपणे १०,००० लोक भाषण ऐकायला आले. त्या वेळी ऑस्ट्रेलियात साक्षीदारांची संख्या केवळ १,३०० होती; त्या मानाने, १०,००० लोक भाषण ऐकायला आले ही कमालच म्हणायची!
यानंतर काही काळातच मी पहिल्यांदा क्षेत्र सेवेत सहभागी झाले. तेसुद्धा कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाशिवाय. आमचा गट प्रचाराच्या क्षेत्रात आला तेव्हा गटाचे नेतृत्व करणाऱ्याने मला म्हटले, “ते बघ, ते घर तू करायचे.” मला इतकी भीती वाटली, की त्या घरी एका स्त्रीने दार उघडले तेव्हा मी तिला विचारले, “किती वाजले जरा सांगता का?” ती आत गेली, घड्याळ पाहून आली आणि मला वेळ सांगितली. झालं. मी गपचूप कारमध्ये जाऊन बसले.
पण मी प्रयत्न करायचे सोडले नाही आणि लवकरच इतरांना राज्याचा संदेश नियमितपणे सांगू लागले. (मत्तय २४:१४) १९३९ साली मार्च महिन्यात, मी यहोवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेतला. आमच्या शेजारीच राहणाऱ्या डॉरथी हचिंग्स हिच्या बाथटबमध्ये मला बाप्तिस्मा देण्यात आला. मंडळीत कोणीही बांधव नसल्यामुळे माझा बाप्तिस्मा झाल्यावर काही काळातच, सहसा बांधवांना दिल्या जाणाऱ्या मंडळीच्या काही जबाबदाऱ्या मला सांभाळायला सांगण्यात आले.
आम्ही सहसा एखाद्याच्या घरीच सभा घ्यायचो आणि कधीकधी जाहीर भाषणांकरता भाड्याने एखादा हॉल घ्यायचो. एकदा आमच्या लहान मंडळीत भाषण देण्यासाठी आमच्या शाखा दफ्तरातून, म्हणजेच बेथेलमधून एक देखणा तरूण बांधव आला. पण तो फक्त जाहीर भाषण देण्यासाठी आलेला नव्हता; तर मला बघण्यासाठी तो आला होता. अर्थात मला याची कल्पना नव्हती. अशारितीने लॉइड व मी पहिल्यांदा भेटलो.
लॉइडच्या कुटुंबियांची भेट
एव्हाना, मलासुद्धा यहोवाची पूर्णवेळ सेवा करावी असे वाटू लागले. पण मी पायनियर सेवेकरता (पूर्ण वेळ प्रचार कार्य करण्याकरता) अर्ज भरला तेव्हा मला बेथेलला येऊन सेवा करायला आवडेल का असे विचारण्यात आले. त्यामुळे मग १९३९ साली सप्टेंबर महिन्यात (त्याच महिन्यात दुसरे महायुद्धही सुरू झाले) मी सिडनीच्या स्ट्रॅथफील्ड या उपनगरात असलेल्या बेथेल कुटुंबाची सदस्या बनले.
त्याच वर्षी, अर्थात १९३९ च्या डिसेंबर महिन्यात मी न्यूझीलंडला अधिवेशनाकरता गेले. लॉइड न्यूझीलंडचेच असल्यामुळे ते पण अधिवेशनाला जाणार होते. आम्ही एकाच जहाजातून प्रवास केला. त्या प्रवासादरम्यान आम्हाला एकमेकांबद्दल बरेच काही जाणून घेता आले. वेलिंग्टन येथे अधिवेशनात लॉइडने आवर्जून माझी त्याच्या आईबाबांशी आणि बहिणींशी ओळख करून दिली; नंतर मी क्राइस्टचर्च येथील त्यांच्या घरीही गेले होते.
आमच्या कार्यावर बंदी
शनिवार, जानेवारी १८, १९४१ रोजी काही सरकारी अधिकारी काळ्या लिमूसीन गाड्यांतून शाखा दफ्तरात आले. मालमत्ता जप्त करण्यासाठी ते आले होते. मी बेथेलच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या एका लहानशा गार्डहाउसमध्ये
काम करत होते. त्यामुळे पहिल्यांदा मीच त्यांना येताना पाहिले. सुमारे १८ तासांआधी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आल्याचे आम्हाला सूचित करण्यात आले होते त्यामुळे जवळजवळ सगळे साहित्य आणि फाइली इत्यादी सामान शाखा दफ्तरातून इतरत्र हलवण्यात आले होते. पुढच्या आठवड्यात लॉइडसहित बेथेल कुटुंबाच्या पाच सदस्यांना तुरुंगात टाकण्यात आले.तुरुंगात असलेल्या या बांधवांना सर्वात जास्त आध्यात्मिक अन्नाची गरज होती हे मला माहीत होते. त्यामुळे त्यांची मदत करण्यासाठी मी लॉइडच्या नावावर “प्रेमपत्रे” पाठवण्याचे ठरवले. सहसा प्रेमपत्र ज्याप्रकारे लिहिले जाते, काहीसा त्याच प्रकारचा मजकूर माझ्या पत्रांच्या सुरुवातीला असायचा. पुढे मात्र मी अख्खेच्या अख्खे टेहळणी बुरूज लेख पत्रात उतरवायचे आणि शेवटी तुझी प्रेयसी म्हणून सही करायचे. साडेचार महिन्यांनंतर लॉइडची सुटका झाली.
विवाह आणि त्यानंतरची सेवा
१९४० साली लॉइडच्या आई ऑस्ट्रेलियाला आल्या. लॉइडने त्यांना सांगितले की आम्ही दोघे लग्नाच्या विचारात होतो. पण या व्यवस्थीकरणाचा अंत अगदी जवळ आला असल्यामुळे, त्यांनी लॉइडना लग्न न करण्याचा सल्ला दिला. (मत्तय २४:३-१४) लॉइडनी आपल्या जवळच्या मित्रांनाही आपला लग्नाचा विचार असल्याचे सांगितले पण प्रत्येक वेळी ते त्यांचे मन बदलण्याचा प्रयत्न करायचे. शेवटी, १९४२ साली फेब्रुवारी महिन्यात लॉइडनी मला गपचूप एका रेजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नेले. आमच्यासोबत आणखी चार लोक साक्षीदार म्हणून आले होते. या सगळ्या प्रकाराविषयी कोणालाही न सांगण्याची त्यांना ताकीद देण्यात आली होती. अशारितीने आमचे लग्न झाले. ऑस्ट्रेलियात त्यावेळी साक्षीदारांपैकी कोणाला लग्न लावण्याचा अधिकृत परवाना नव्हता.
लग्न झाल्यानंतर आम्हाला बेथेल सेवा सोडावी लागली; आम्हाला खास पायनियर सेवा करायला आवडेल का असे विचारण्यात आले. आम्ही आनंदाने तयार झालो आणि वाग्गा वाग्गा नावाच्या एका लहानशा गावात देण्यात आलेली नेमणूक स्वीकारली. प्रचार कार्यावर अजूनही बंदी होती, शिवाय आम्हाला आर्थिक दृष्ट्या कोणाचाही आधार नव्हता. अशा वेळी यहोवावरच सगळा भार आम्हाला टाकावा लागला.—स्तोत्र ५५:२२.
दोन जणांनी चालवायची व्यवस्था असलेल्या एका सायकलवरून आम्ही खेडोपाडी जायचो; बरेच चांगले लोक आम्हाला भेटायचे आणि आम्ही बराच वेळ त्यांच्याशी सविस्तर
बोलायचो. अर्थात, बायबल अभ्यास करायला सहसा लोक तयार होत नसत. पण एका दुकानदाराला आमचे काम फारच आवडले आणि या कामाबद्दल प्रशंसा व्यक्त करण्यासाठी ते आम्हाला दर आठवड्यात भाज्या आणि फळे देऊ लागले. वाग्गा वाग्गा येथे सहा महिने राहिल्यानंतर आम्हाला पुन्हा बेथेलला बोलावण्यात आले.मे १९४२ मध्ये बेथेल स्ट्रॅथफील्ड येथून हलवण्यात आले आणि बांधवांच्या घरात काम सुरू ठेवण्यात आले. पण अधिकाऱ्यांना पत्ता लागू नये म्हणून बेथेलचे बांधव दर दोन तीन आठवड्यांनी वेगळ्या घरी जायचे. लॉइड व मी ऑगस्टमध्ये पुन्हा बेथेलला आलो तेव्हा आम्हीही एका घरी इतर बांधवांसोबत काम करू लागलो. छपाईचे काम सुरू ठेवण्यासाठी काही गुप्त छपाईखाने स्थापण्यात आले होते. दिवसा आम्ही यांपैकी एका छपाईखान्यात काम करायचो. शेवटी १९४३ सालच्या जून महिन्यात बंदी उठवण्यात आली.
परदेशात सेवा करण्याची तयारी
आम्हाला १९४७ सालच्या एप्रिल महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील साउथ लॅन्सिंग येथे असलेल्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याकरता प्रास्ताविक अर्ज देण्यात आले. दरम्यान आम्हाला ऑस्ट्रेलियातील मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना आध्यात्मिक उत्तेजन देण्यास सांगण्यात आले. काही महिन्यांतच आम्हाला गिलियडच्या ११ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले. सगळी तयारी, सामानाची बांधाबांध इत्यादी करून प्रशालेला उपस्थित राहण्याकरता आमच्याजवळ तीन आठवडे होते. १९४७ सालच्या डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या कुटुंबियांचा आणि जवळच्या मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन न्यूयॉर्कला निघालो. ऑस्ट्रेलियाहून आणखी १५ जणांना आमच्यासोबत याच वर्गाला उपस्थित राहण्याकरता बोलवण्यात आले होते.
गिलियड प्रशालेचे चारपाच महिने पाहतापाहता निघून गेले. आम्हाला जपानला नियुक्त करण्यात आले. जपानला जाण्याकरता कागदपत्रे तयार व्हायला अजून अवकाश असल्यामुळे लॉइडना यहोवाच्या साक्षीदारांचे प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य करण्याकरता नेमण्यात आले. लॉस एन्जल्सपासून थेट मेक्सिकोच्या सीमेपर्यंत असलेल्या अनेक मंडळ्यांना भेटी देण्यास आम्हाला सांगण्यात आले. आमच्याजवळ कार नव्हती त्यामुळे दर आठवडी बंधुभगिनी आम्हाला एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीपर्यंत पोचवायचे. त्या मोठ्या विभागाचे आता तीन इंग्रजी आणि तीन स्पॅनिश प्रांतांत विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रांतात दहा विभाग आहेत!
पाहता पाहता १९४९ सालचा ऑक्टोबर महिना उजाडला आणि आम्ही जहाजातून जपानला निघालो. हे मुळात लढाऊजहाज होते पण त्याला यात्रेकरू जहाजात बदलण्यात आले होते. जहाजाच्या एका बाजूला पुरूष होते आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया व मुले यांची व्यवस्था करण्यात आली होती. योकोहामाला पोचण्याच्या आदल्या दिवशी प्रचंड वादळ आले. पण त्यानंतर वातावरण अगदी स्वच्छ झाले; दुसऱ्या दिवशीचा म्हणजे ऑक्टोबर ३१ चा सूर्य उगवला तेव्हा माउंट फूजीचे जे दृश्य आम्हाला पाहायला मिळाले ते अवर्णनीय होते. आमच्या नव्या नेमणूक क्षेत्रात जणू आमचे स्वागत झाले!
जपानी बांधवांसोबत कार्य
बोटीचा धक्का जवळ येऊ लागला तसे सगळीकडे काळ्या केसांचे लोक दिसू लागले. बापरे, काय गोंगाट होता! सगळ्यांनी लाकडी बूट घातल्यामुळे धक्क्यावरील लाकडी पाट्यांवरून चालताना कर्कश्श आवाज येत होता. योकोहामा शहरात एक रात्र घालवल्यानंतर आम्ही आमच्या मिशनरी नेमणुकीचे क्षेत्र कोबे येथे रेल्वेने आलो. डॉन हॅस्लेट हे काही महिन्यांआधी जपानला आले होते. हॅस्लेट हे आमच्याचसोबत गिलियडमधून पदवीधर झाले होते. त्यांनी आधीच एक मिशनरी गृह भाड्याने घेऊन ठेवले होते. इमारत पाश्चात्त्य पद्धतीची, प्रशस्त आणि अतिशय सुंदर होती. पण फर्निचर मात्र काहीच नव्हते!
झोपण्याकरता आम्ही घराच्या आसपास वाढलेले उंच गवत कापून जमिनीवर टाकून कामचलाऊ गाद्या तयार केल्या. अशारितीने आमच्या मिशनरी जीवनाची सुरवात झाली. आमच्या बॅगांमध्ये असलेल्या वस्तूंखेरीज आमच्याजवळ काहीही नव्हते. ऊबेसाठी आणि स्वयंपाकासाठी आम्ही लहानशा कोळशाच्या शेगड्या आणल्या. जपानी भाषेत या शेगड्यांना हिबाची म्हणतात. पण शेगड्यांच्या धुरामुळे एका रात्री लॉइडना आमच्या सोबतचे दोन मिशनरी पर्सी आणि इल्मा इझ्लॉब बेशुद्धावस्थेत आढळले. खिडक्या उघडताच ताजी थंड हवा खोलीत आली तेव्हा कोठे ते दोघे शुद्धीवर आले. एकदा या शेगडीवर स्वयंपाक करताना मी पण बेशुद्ध पडले होते. काही गोष्टींची सवय व्हायला थोडा वेळ लागला!
आमच्यापुढे असलेले सर्वात मोठे आव्हान होते भाषा शिकणे. एक महिन्यापर्यंत दिवसातून ११ तास आम्ही जपानी भाषेचा अभ्यास केला. पण केव्हातरी सुरवात तर करावी लागणार होती. म्हणून मग आम्ही एक दोन वाक्ये लिहून ती पाठ केली आणि क्षेत्रात गेलो. पहिल्याच दिवशी मला एक खूप चांगली स्त्री भेटली. मियो ताकागी तिचे नाव. मियो माझ्याशी खूप प्रेमळपणे बोलली. पुनर्भेटी देण्याकरता मी तिच्याकडे जात असे, तेव्हा आम्ही दोघी जपानी-इंग्रजी शब्दकोश उलटेपालटे करून एकमेकींना समजून घेण्याचा कसाबसा प्रयत्न करायचो. पण शेवटी नियमित बायबल अभ्यास सुरू झाला आणि मियोने प्रगतीही केली. १९९९ साली जपानच्या शाखा दफ्तराच्या अतिरिक्त इमारतींच्या समर्पण समारोहाला आम्ही गेलो होतो तेव्हा मियोची पुन्हा भेट झाली. मी ज्यांच्यासोबत अभ्यास केला होता त्यांपैकी इतरही बरेच जवळचे लोक या प्रसंगी भेटले. पन्नास वर्षे उलटून गेली आहेत; पण आजही हे बांधव आवेशी राज्य प्रचारक आहेत; यहोवाच्या सेवेत होईल तितके करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एप्रिल १, १९५० रोजी कोबे शहरात जवळजवळ १८० जण ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिले. आणि दुसऱ्याच दिवशी काय आश्चर्य! ३५ जण सेवा कार्यात भाग घेण्याकरता आले. मग आम्ही सर्व मिशनरी या नव्या लोकांपैकी प्रत्येकी तीन किंवा चार लोकांना घेऊन सेवेला गेलो. ‘या परदेशी बाईला आपले बोलणे काय समजणार’ असे समजून घरमालक माझ्याशी बोलण्यापेक्षा माझ्यासोबत असलेल्या त्या नवीन लोकांशीच बोलत होते. त्यांचे आपसांतच तासन्तास बोलणे चालले होते, पण ते काय बोलत आहेत याची मला जराही कल्पना नव्हती. पण मला हे सांगायला आनंद वाटतो की या नव्या लोकांपैकी काहींनी सत्याच्या ज्ञानात प्रगती केली आणि आजपर्यंत ते प्रचार कार्यात सातत्याने सहभाग घेतात.
सेवेच्या अनेक विशेष संधी आणि नेमणुका
आम्ही १९५२ पर्यंत कोबे शहरातच मिशनरी कार्य करत होतो. त्या वर्षी मात्र लॉइडवर टोकिओ येथील शाखा दफ्तरात देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कामाच्या निमित्ताने त्यांना जपानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि इतर देशीही प्रवास करावा लागायचा. नंतर एकदा जागतिक मुख्यालयातून नेथन एच. नॉर टोकिओला आले होते तेव्हा त्यांनी मला विचारले: “तुमच्या पतींना पुढच्या झोन भेटीसाठी कुठे जायचे आहे माहीतंय का? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड.” मग ते म्हणाले: “वाटल्यास तुम्हीही जाऊ शकता, फक्त जाण्यायेण्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल.” मला किती आनंद झाला! कारण, घर सोडून आम्हाला आता नऊ वर्षे झाली होती.
आम्ही लगेच घरी पत्रं पाठवली. माझ्या आईने माझ्या तिकीटासाठी काही पैसे दिले. आतापर्यंत लॉइड व मी आमच्या नेमणुकींत अत्यंत व्यस्त होतो शिवाय घरी जाण्याइतके पैसेही आमच्याजवळ नव्हते. पण मला जणू माझ्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले. साहजिकच मला पाहून आईला अत्यंत आनंद झाला. ती मला म्हणाली: “तीन वर्षांनी तू पुन्हा ये, मी पैसे जमवून तुला पाठवीन.” असे ठरवून आम्ही परतलो, पण ती बिचारी पुढच्या जुलै महिन्यात कायमची गेली. नव्या जगात तिची पुन्हा भेट होईल त्या अद्भुत क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतेय!
१९६० सालापर्यंत मला केवळ मिशनरी कार्य करायला सांगण्यात आले होते, पण मग मला पत्राद्वारे असे कळवण्यात आले: “आजपासून तुम्हाला बेथेल कुटुंबाच्या सर्व सदस्यांचे कपडे धुवून इस्त्री करण्याचे काम करण्याची विनंती केली जात आहे.” त्या वेळी आमच्या कुटुंबात केवळ दहा बारा जण होते त्यामुळे मिशनरी कार्यासोबत हे काम करणे मला फार जड गेले नाही.
१९६२ साली जपानी पद्धतीने बांधलेली बेथेलची इमारत पाडून त्याच ठिकाणी पुढच्या वर्षी नवीन सहा मजली बेथेल गृह बांधण्यात आले. मला नव्या बेथेल गृहात नव्यानेच आलेल्या तरुण बांधवांना त्यांच्या खोल्या नीटनेटक्या ठेवणे, कपडे इत्यादी नीट लावून ठेवणे, जेवल्यावर ताट वाट्या धुवून-पुसून ठेवणे इत्यादी कामे शिकवायला सांगण्यात आले होते. जपानमध्ये सहसा मुलांना घरची कामे करायला शिकवले जात नव्हते. सहसा शाळा-कॉलेजचा अभ्यास करण्यावरच आईवडील जोर देत असावेत, शिवाय घरातील सगळी कामे आईच करायची. पण लवकरच त्यांना कळले की मी त्यांची आई नव्हते. कालांतराने यांपैकी बऱ्याच बांधवांनी प्रगती करून संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील हाती घेतल्या.
एकदा एक अभ्यास करणारी एक स्त्री बेथेल पाहायला आली. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या दिवशी खूपच उष्णता होती. तिने मला
बाथरूम्सची साफसफाई करताना पाहिले. ती म्हणाली, “तुमचे अधिकारी कोण असतील त्यांना सांगा की हे काम करण्यासाठी मी स्वखर्चाने एका बाईला पाठवायला तयार आहे.” मग मी त्या स्त्रीला समजावून सांगितले की तिच्या चांगल्या हेतूची मी कदर करते पण यहोवाच्या संघटनेत मला नेमलेले कोणतेही काम करायला मला आनंदच वाटतो.याच दरम्यान लॉइडना व मला गिलियडच्या ३९ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले! १९६४ साली वयाच्या ४६ वर्षी पुन्हा गिलियड प्रशालेला जाण्याची सुसंधी मिळाल्याचा आम्हाला फारच आनंद झाला. गिलियडचा हा विशिष्ट अभ्यासक्रम खासकरून शाखा दफ्तरांत सेवा करणाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्यास मदत करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला होता. दहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमानंतर आम्हाला पुन्हा जपानला जाण्यास सांगण्यात आले. एव्हाना जपानमध्ये ३,००० पेक्षा जास्त राज्य प्रचारक होते.
यानंतर इतक्या झपाट्याने वाढ होत गेली की १९७२ सालापर्यंत १४,००० पेक्षा जास्त प्रचारक झाले होते; टोकिओच्या दक्षिणेकडे नुमाझू येथे एक नवे पाचमजली बेथेल गृह बांधण्यात आले. आमच्या इमारतींतून माउंट फूजीचे विलक्षण दृश्य दिसायचे. दर महिन्यात एका मोठ्या रोटरी छपाई प्रेसमधून दहा लाखापेक्षा जास्त नियतकालिके तयार होऊ लागली. पण लवकरच आमची नेमणूक पुन्हा बदलणार होती.
१९७४ सालाच्या उत्तरार्धात, लॉइडना ब्रुकलिनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातून एक पत्र आले. त्यांना नियमन मंडळाचे सदस्य होण्याकरता निमंत्रित केले जात होते. सुरवातीला मी विचार केला: ‘लॉइड एकटेच ब्रुकलिनला गेलेले बरे. नाहीतरी त्यांना स्वर्गीय जीवनाची आशा असल्यामुळे कधी न कधी आमचे मार्ग वेगवेगळे होणारच आहेत.’ पण माझे असे विचार करणे चुकीचे होते हे मी लवकरच ओळखले आणि १९७५ सालच्या मार्च महिन्यात आनंदाने लॉइडसोबत ब्रुकलिनला गेले.
मुख्यालयातील आशीर्वाद
ब्रुकलिनला गेल्यावरही लॉइडचे मन मात्र जपानमध्येच अडकले होते. ते सतत तिथल्या वेगवेगळ्या अनुभवांची आठवण काढायचे. पण आता कितीतरी देशांत कार्य करण्याची संधी मिळाली. लॉइडना त्यांच्या शेवटल्या २४ वर्षांत झोन कार्यासाठी अनेक ठिकाणी पाठवण्यात आले. यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यांत प्रवास करायला मिळाला. मी देखील अनेकदा त्यांच्यासोबत जात असे.
इतर देशांतील आपल्या ख्रिस्ती बांधवांना भेटल्यावर मला त्यांपैकी बरेच जण किती कठीण परिस्थितीत जगतात आणि कार्य करतात हे जवळून पाहायला मिळाले. उत्तर आफ्रिकेत भेटलेल्या दहा वर्षांच्या एन्टेलिया या मुलीचा चेहरा मी कधीही विसरणार नाही. देवाचे नाव तिला प्रिय होते आणि ख्रिस्ती सभांना यायला तिला दीड तास आणि परत जातानाही तितकचे चालावे लागायचे. तिच्या कुटुंबाकडून खूप छळ होत असूनही एन्टेलियाने आपले जीवन यहोवाला समर्पित केले होते. आम्ही तिच्या मंडळीला भेट दिली तेव्हा भाषण देणाऱ्याच्या डोक्यावर फक्त कमी-व्होल्टेजच्या बल्बचा मंद प्रकाश होता. खोलीत तो एकच बल्ब, बाकीचे सर्वजण पूर्ण काळोखात. मात्र त्या काळोखात या आफ्रिकन बंधू भगिनींचे सुंदर गाणे ऐकण्याचा अनुभव विलक्षण होता.
आमच्या जीवनातील आठवणीत राहिलेल्या काही घटनांपैकी क्यूबा येथे डिसेंबर १९९८ साली झालेली “ईश्वरी जीवनाचा मार्ग” प्रांतीय अधिवेशने आहेत. या अधिवेशनांना गेलेल्या प्रतिनिधींमध्ये आम्ही देखील होतो. ब्रुकलिन मुख्यालयातून काही बांधव अधिवेशनांना आले याचा क्यूबाच्या बांधवांना फारच आनंद झाला. त्यांचा तो आनंद आणि कृतज्ञता पाहून आम्ही हरखून गेलो! यहोवाच्या नावाचे उत्साहाने गौरव करणाऱ्या कित्येक बांधवांशी ओळख व मैत्री करण्याची संधी मिळाली. त्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.
देवाचे लोक माझे लोक
मी मूळची ऑस्ट्रेलियाची असले तरीही यहोवाच्या संघटनेने मला जिथेही पाठवले, तिथल्या लोकांवर मी प्रेम करू लागले. जपानमध्ये असेच घडले आणि आता अमेरिकेत २५ हून अधिक वर्षे झाली आहेत, इथेही हेच घडले. लॉइडचा मृत्यू झाला तेव्हा मी ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचा विचार केला नाही, तर यहोवाने मला जिथे नेमले आहे अर्थात इथे ब्रुकलिन बेथेलमध्येच राहण्याचा मी निर्णय घेतला.
मी ८० वर्षे ओलांडली आहेत. ६१ वर्षे पूर्ण वेळेच्या सेवेत घालवल्यावर आजही यहोवाला जिथे योग्य वाटेल तिथे सेवा करण्याची माझी तयारी आहे. त्याने आजपर्यंत खरोखर माझी खूप चांगली काळजी वाहिली आहे. यहोवावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय साथीदारासोबत व्यतीत केलेल्या ५७ वर्षांच्या आठवणी मी जपून ठेवल्या आहेत. मला खात्री आहे की यहोवा पुढेही त्याच्या आशीर्वादांचा आमच्यावर वर्षाव करत राहील. आणि मला माहीत आहे की तो कधीही आमचे कार्य आणि त्याच्या नावाबद्दल आम्ही दाखवलेले प्रेम विसरणार नाही.—इब्री लोकांस ६:१०.
[तळटीप]
^ टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९९ अंकाची पृष्ठे १६ व १७ पाहा.
[२५ पानांवरील चित्र]
१९५६ साली आईसोबत
[२६ पानांवरील चित्र]
१९५० च्या दशकाच्या सुरवातीला लॉइड आणि काही जपानी प्रचारकांसोबत
[२६ पानांवरील चित्रे]
जपानमधली माझी पहिली बायबल विद्यार्थीनी, मियो ताकागी हिच्यासोबत, १९५० च्या सुरवातीला आणि मग १९९९ साली
[२८ पानांवरील चित्र]
लॉइडसोबत जपानमध्ये नियतकालिक कार्य करताना